वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१५ पृ. ४-८
  • तुम्ही पुनर्जन्मावर विश्‍वास ठेवावा का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही पुनर्जन्मावर विश्‍वास ठेवावा का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उगम आणि आधाराची ओळख करून घेणे
  • मनुष्याचा एक भाग अमर असतो का?
  • लोक दुःखित का आहेत?
  • शांतिपूर्ण भवितव्य
  • मृत्यूनंतर जीवन—बायबल काय म्हणते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • पुनरुत्थानावरील तुमचा विश्‍वास किती भक्कम आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • चांगल्या लोकांसोबत वाईट होते असे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • तुमचा पुनर्जन्मावर विश्‍वास आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१५ पृ. ४-८

तुम्ही पुनर्जन्मावर विश्‍वास ठेवावा का?

ग्रीक तत्त्वज्ञानी प्लेटोने, प्रेमात पडण्याचा संबंध पुनर्जन्माच्या कल्पनेशी जोडला. त्याच्या विश्‍वासाप्रमाणे शरीराच्या मृत्यूनंतर अमर असलेला आत्मा, “सत्‌सामान्यांच्या राज्यात” प्रवेश करतो. मग, सत्‌सामान्यांवर मनन करीत काही काळपर्यंत तो अमूर्त अवस्थेत तेथेच राहतो. दुसऱ्‍या योनीत गेल्यावर आत्म्याला पुसटपुसट स्मरण होऊ लागते व त्याला इतर सत्‌सामान्यांच्या राज्याची ओढ लागते. प्लेटोच्या मते, लोक प्रेमात यासाठी पडतात कारण ते त्यांच्या प्रिय व्यक्‍तीत, त्यांना पुसटपुसट आठवणारा व ते शोधत असलेला सौंदर्य नमुना पाहतात.

उगम आणि आधाराची ओळख करून घेणे

पुनर्जन्माच्या शिकवणीनुसार आत्मा अमर असला पाहिजे. तेव्हा, आत्म्याच्या अमरत्वाचा विश्‍वास ज्या लोकांमध्ये वा राष्ट्रांमध्ये होता अशा लोकांमध्ये वा राष्ट्रांमध्ये पुनर्जन्माच्या शिकवणीचे मूळ शोधून काढणे आवश्‍यक आहे. या आधारावर काहींना वाटते, की हा विश्‍वास इजिप्तमधून आला असावा. इतर काही जण म्हणतात, की तो बॅबिलोनियामधून आला. बॅबिलोनी धर्माला श्रेष्ठत्व मिळावे म्हणून त्या धर्माच्या पुरोहितांनी आत्म्याच्या पुनर्जन्माच्या सिद्धान्ताचा पुरस्कार केला. याद्वारे ते दावा करू शकले, की त्यांचे धार्मिक वीरपुरुष, प्रसिद्ध पण खूप वर्षांपूर्वी मरण पावलेल्या पूर्वजांचे अवतार होते.

परंतु, भारतात पुनर्जन्माचा विश्‍वास पूर्णपणे विकसित झाला होता. हिंदू ऋषी, दुष्टाईच्या व मानवांमधील दुःखाच्या अनेक विश्‍वव्यापी समस्यांवर मननचिंतन करत होते. ‘एका धार्मिक निर्माणकर्त्याच्या कल्पनेशी यांचा मेळ कसा घालता येईल?’ असे त्यांनी विचारले. त्यांनी देवाची धार्मिकता आणि आकस्मिक संकटे व जगाची विषमता यासर्वांमधील झगडे सोडवण्याचा प्रयत्न केला. कालांतराने त्यांनी “कर्माचा नियम,” कारण आणि परिणामाचा नियम तयार केला—‘मनुष्य जे काही पेरतो त्याचीच कापणी करील.’ त्यांनी, कर्मविपाकाची तपशीलवार सुसंगत व्यवस्था तयार केली ज्यात एका जीवनातील सत्कर्मांचे व असत्कर्मांचे प्रतिफळ किंवा शिक्षा पुढील जीवनात मिळणार असे सांगितले आहे.

“कर्म” याचा सरळ अर्थ “कृत्य” असा होतो. एक हिंदू व्यक्‍ती सामाजिक व धार्मिक कृत्य आचरणारी असेल तर ती सत्कर्मी व ते आचरत नाही ती असत्कर्मी असते. तिची कृत्ये, किंवा कर्म भविष्यातील तिचा प्रत्येक पुनर्जन्म ठरवतात. “सर्व मनुष्यांच्या शारीरिक सवयी अनुवंशिकतेद्वारा ठरवलेल्या असल्या तरीसुद्धा ते, गुणलक्षणांची नीलप्रत घेऊनच जन्माला येतात, त्यांच्या पूर्वजीवनातील कर्मांआधारे ती खासकरून तयार केलेली असते. [यास्तव] माणूस तत्त्वतः स्वतःच स्वतःच्या नशीबाचा, कर्मगतीचा शिल्पकार असतो,” असे तत्त्वज्ञानी निखिलानंद यांचे मत आहे. परंतु, पुनर्जन्माच्या या चक्रातून सुटका मिळवून सनातन सत्य असलेल्या ब्रम्हाशी एकरूप होणे हे अंतिम उद्दिष्ट आहे. सामाजिक स्वीकृत वर्तन व खास हिंदू ज्ञान संपादण्याचा प्रयत्न करून हे साध्य केले जाऊ शकते असा विश्‍वास बाळगला जातो.

अशा प्रकारे पुनर्जन्माची शिकवण, जीवात्म्याच्या अमरत्वाच्या सिद्धान्ताला आधारभूत मानून कर्माच्या नियमाच्या साहाय्याने त्या सिद्धान्ताचा विकास करते. देवाचे ईश्‍वरप्रेरित वचन, बायबलचे या कल्पनांच्या संबंधाने काय मत आहे ते आपण पाहू या.

मनुष्याचा एक भाग अमर असतो का?

या प्रश्‍नाचे उत्तर देण्यासाठी, या विषयावरील सर्वोच्च प्रमाण—सृष्टीकर्त्याच्या प्रेरित वचनाकडे आपण वळू या. पहिल्या मनुष्याच्या अर्थात आदामाच्या निर्मितीचे वर्णन करताना बायबलचे सर्वात पहिले पुस्तक म्हणते: “परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्‍वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी [नेफेश] झाला.”a (उत्पत्ति २:७) स्पष्टतः, शास्त्रवचने पहिल्या मनुष्यापासून भिन्‍न अशा जीवात्म्याचा किंवा प्राणाचा उल्लेख करीत नाहीत. मनुष्य प्राण बाळगत नसून तो स्वतः एक प्राण आहे. येथे प्राण यासाठी वापरण्यात आलेला हिब्रू शब्द नेफेश आहे. बायबलमध्ये तो जवळजवळ ७०० वेळा आढळतो; तो मानवातील भिन्‍न व दिव्य भाग आहे असा त्याचा कधीही उल्लेख केलेला नाही, उलट तो स्पर्शनीय व शारीरिक आहे असाच उल्लेख आहे.—ईयोब ६:७; स्तोत्र ३५:१३; १०७:९; ११९:२८.

तर मग मृत्यूनंतर काय होते? आदामाचा मृत्यू झाला तेव्हा त्याचे काय झाले त्याचा विचार करा. त्याने पाप केले तेव्हा देवाने त्याला म्हटले: “तू . . . अंती पुनः मातीला जाऊन मिळशील; कारण तिच्यातून तुझी उत्पत्ति आहे; तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) याचा काय अर्थ होतो त्याचा जरा विचार करा. देवाने आदामाला मातीपासून बनवण्याआधी तो अस्तित्वात नव्हता. त्याच्या मृत्यूनंतर आदाम पुन्हा अस्तित्वविरहीत झाला.

सरळ शब्दांत सांगायचे म्हणजे, मरण जीवनाच्या विरुद्ध आहे अशी बायबल शिकवण देते. उपदेशक ९:५, १० येथे आपण वाचतो: “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतास तर काहीच कळत नाही; त्यांस आणखी काही फलप्राप्ति व्हावयाची नसते; त्यांचे स्मरण कोणास राहत नाही. जे काही काम तुझ्या हाती पडेल ते आपले सगळे सामर्थ्य खर्च करून कर; कारण ज्या अधोलोकाकडे तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्‍ति-प्रयुक्‍ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”

म्हणजेच, मृत काहीच करू शकत नाहीत किंवा त्यांना कशाचीही जाणीव नसते. त्यांना कोणतेही विचार नसतात किंवा त्यांना कशाचेही स्मरण राहत नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरंवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही. त्याचा प्राण जातो, तो आपल्या मातीस पुन्हा मिळतो; त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.”—स्तोत्र १४६:३, ४.

मृत्यूनंतर जीवात्मा किंवा प्राण एका शरीरातून दुसऱ्‍या शरीरात प्रवेश करीत नाही तर तो मरतो असे बायबल स्पष्टपणे दाखवते. बायबल अगदी ठामपणे सांगते: “जो जिवात्मा पाप करितो तो मरेल.” (यहेज्केल १८:४, २०; प्रेषितांची कृत्ये ३:२३; प्रकटीकरण १६:३) म्हणूनच, पुनर्जन्माच्या शिकवणुकीचा मूळाधार अर्थात आत्म्याच्या अमरत्वाच्या सिद्धान्ताला शास्त्रवचनांमध्ये कोणताही आधार नाही. त्यामुळे तो सिद्धान्त ढासळतो. पण मग, आपण जगात पाहतो त्या दुःखाचे कारण काय असेल बरे?

लोक दुःखित का आहेत?

पापी आदामाकडून आपण वारशाने प्राप्त करतो ते अपूर्णत्व मानवी दुःखाचे मूळ कारण आहे. “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले,” असे बायबल म्हणते. (रोमकर ५:१२) आदामाचे वंशज असल्यामुळे आपण सर्व जण आजारी पडतो, वृद्ध होतो व शेवटी मरतो.—स्तोत्र ४१:१, ३; फिलिप्पैकर २:२५-२७.

शिवाय, सृष्टीकर्त्याचा अपरिवर्तनीय नैतिक नियम स्पष्टपणे सांगतो: “फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही; कारण माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावापासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.” (गलतीकर ६:७, ८) यास्तव, तारतम्य नसलेल्या जीवनशैलीमुळे मानसिक त्रास, नको असलेल्या गर्भधारणा आणि लैंगिक संक्रमित आजार होऊ शकतात. “[संयुक्‍त संस्थानांत] थक्क करून टाकणारे ३० टक्के प्राणघातक कर्करोग, प्रामुख्याने धुम्रपान आणि तेवढ्याच संख्येने जीवनशैली खासकरून पथ्यसंबंधी प्रथा व व्यायामाची उणीव यामुळे होतात,” असे वैज्ञानिक अमेरिकन (इंग्रजी) नामक नियतकालिक म्हणते. काही विपत्ती, माणूस पृथ्वीच्या साधनसंपत्तीचा दुरुपयोग करीत असल्यामुळे ओढवतात.—पडताळा प्रकटीकरण ११:१८.

होय, माणूसच त्याच्या बहुतेक दुःखास कारणीभूत आहे. परंतु, जीव अमर नसल्यामुळे, ‘जे काही पेरतो त्याचीच कापणी करू’ या नियमाचा उपयोग मानवी दुःखाचा संबंध कर्माशी—कल्पिलेल्या पूर्वजन्मातील कृत्यांशी—लावण्यासाठी करता येणार नाही. “जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्‍त होऊन नीतिमान्‌ ठरला आहे,” असे बायबल म्हणते. (रोमकर ६:७, २३) यास्तव, पापाचे प्रतिफळ मृत्यूनंतरच्या जीवनात मिळत नाही.

दियाबल सैतानही पुष्कळ संकटांना कारणीभूत आहे. खरे पाहता, सैतानाचेच या जगावर प्रभुत्व आहे. (१ योहान ५:१९) शिवाय, येशू ख्रिस्ताने भाकीत केल्याप्रमाणे ‘त्याच्या नावामुळे सर्व लोक त्याच्या शिष्यांचा द्वेष करितील.’ (मत्तय १०:२२) म्हणून वाईटांपेक्षा धार्मिकांनाच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

या जगामध्ये अशा काही घटना घडतात ज्यांची कारणे लगेचच ज्ञात होत नाहीत. एक वेगवान धावपट्टू अडखळून शर्यत हरू शकतो. एखाद्या शक्‍तिशाली सैन्याचा दुर्बळ सैन्यापुढे पराजय होऊ शकतो. एखाद्या सुज्ञ मनुष्याला चांगली नोकरी मिळणार नाही व त्यामुळे तो उपाशी राहील. व्यापार व्यवस्थापनाची सर्वोत्तम माहिती असलेले लोक, परिस्थितीमुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग करू शकणार नाहीत व यामुळे दारिद्र्‌यात दिवस काढतील. बुद्धिमान लोकांवर त्यांच्या अधिकाऱ्‍यांचा रोष येऊ शकतो व त्यामुळे ते त्यांच्या मर्जीतून उतरू शकतात. हे सर्व का घडते बरे? कारण “आपत्तीचा काल सर्वांनाच येतो,” असे सुज्ञ राजा शलमोन उत्तरतो.—उपदेशक ९:११, सुबोध भाषांतर.

दुःख अस्तित्वात का आहे याचे स्पष्टीकरण देण्याचा हिंदू ऋषींनी प्रयत्न करण्याआधीपासूनच मानवजात दुःखाचा सामना करत आहे. परंतु, उज्ज्वल भवितव्याची काही आशा आहे का? बायबल मृतांबद्दल कोणते अभिवचन देते?

शांतिपूर्ण भवितव्य

सृष्टीकर्ता लवकरच सैतानाच्या कबजात असलेल्या सद्याच्या जगिक समाजाचा अंत करणार आहे असे त्याने अभिवचन दिले आहे. (नीतिसूत्रे २:२१, २२; दानीएल २:४४) धार्मिक नवा मानवी समाज—“नवी पृथ्वी”—ही तेव्हा एक वास्तविकता बनेल. (२ पेत्र ३:१३) तेव्हा “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४) मृत्यूमुळे होणाऱ्‍या तीव्र मानसिक वेदना देखील नाहीशा होतील कारण देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.

देवाच्या वचनयुक्‍त नवीन जगातील रहिवाशांविषयी स्तोत्रकर्त्याने असे भाकीत केले: “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” (स्तोत्र ३७:२९) तसेच, लीन जन “पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:११.

मागच्या लेखात ज्यांचा उल्लेख करण्यात आला त्या मुकूंदभाईंचा, देवाच्या आश्‍चर्यकारक अभिवचनांची माहिती होण्याआधीच देहान्त झाला. पण देवाची ओळख होण्याआधी मरण पावलेल्या कोट्यवधी लोकांना एका शांतिपूर्ण नवीन जगात पुनरुत्थित होण्याची आशा आहे कारण बायबल असे अभिवचन देते: “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.”—प्रेषितांची कृत्ये २४:१५; लूक २३:४३.

अनास्तासिस या ग्रीक शब्दातून येथे “पुनरुत्थान” हा शब्द भाषांतरित करण्यात आला आहे, ज्याचा शब्दशः अर्थ “पुन्हा उभे राहणे” असा होतो. यास्तव, पुनरुत्थान म्हणजे एखाद्या व्यक्‍तीच्या जीवन पद्धतीला पुनः क्रियाशील बनवणे.

स्वर्ग आणि पृथ्वीच्या निर्मात्याकडे अपरंपार सुज्ञता आहे. (ईयोब १२:१३) मृत लोकांची जीवन पद्धत आठवणीत आणणे त्याला कठीण वाटत नाही. (पडताळा यशया ४०:२६.) शिवाय, यहोवा देवाकडे विपुल प्रीती आहे. (१ योहान ४:८) याकारणास्तव, मृतांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दलची शिक्षा देण्याकरता नव्हे तर मृत्यूपूर्वी त्यांचे जे व्यक्‍तिमत्त्व होते त्याच व्यक्‍तिमत्त्वात त्यांना परादीस पृथ्वीवर पुन्हा जिवंत करण्याकरता तो आपल्या परिपूर्ण स्मरणशक्‍तीचा उपयोग करू शकतो.

मुकूंदभाईंप्रमाणे कोट्यवधी लोकांकरता पुनरुत्थानाचा अर्थ, आपल्या प्रियजनांसोबत पुनः असणे असा होतो. परंतु, सध्या जिवंत असलेल्यांकरता त्याचा काय अर्थ होतो त्याची कल्पना करा. मुकूंदभाईंच्या मुलाचेच उदाहरण घ्या. त्याला देव आणि त्याच्या उद्देशांबद्दलचे आश्‍चर्यकारक सत्य समजले. आपले वडील, अंत नसलेल्या व प्रत्येक चक्र दुष्टाईने व दुःखाने घेरलेल्या पुनर्जन्माच्या चक्रात अडकलेले नाहीत हे समजल्यावर त्याला किती समाधान वाटले! ते मृत्यूच्या निद्रेत, पुनरुत्थानाची वाट पाहत आहेत. तो स्वतः बायबलमधून जे काही शिकला ते एक ना एक दिवस आपल्या वडिलांना सांगू शकेल हा विचारच केवढा आनंददायक आहे!

“सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे,” अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:३, ४) तुम्ही आणि देवाची इच्छा पूर्ण करत असलेल्या इतर लाखो जनांसह परादीस पृथ्वीवर कशाप्रकारे कायम जगू शकाल याबद्दलचे शिक्षण घेण्याची आता वेळ आहे.—योहान १७:३.

[तळटीपा]

a इब्री शब्द नेफेश आणि ग्रीक शब्द सायके यांचे भारतीय भाषांमधील बायबलमध्ये, “आत्मा,” “जीव,” “जीवात्मा,” “प्राण,” “देही” व “व्यक्‍ती” असे विविध तऱ्‍हेने भाषांतर करण्यात आले आहे. (उदाहरणार्थ, टॅमिल ऑथराईझ्ड व्हर्शन व न्यू हिंदी बायबल यामध्ये यहेज्केल १८:४ व मत्तय १०:२८ पाहा.) तुमचे बायबल मूळ भाषेतील शब्दांचे “आत्मा,” “प्राण” किंवा दुसरे काही सुसंगतपणे भाषांतर करत असले, तरी नेफेश आणि सायके हे शब्द ज्या ज्या वचनांत आहेत त्या त्या वचनांचे परीक्षण केल्याने प्राचीन काळच्या देवाच्या लोकांनी याचा कोणता अर्थ घेतला ते समजण्यास तुम्हाला मदत होईल. यावरून तुम्ही जीवात्म्याचे खरे स्वरूप काय आहे ते स्वतः ठरवू शकाल.

[७ पानांवरील संक्षिप्त आशय]

“आपत्तीचा काल सर्वांनाच येतो.”—उपदेशक ९:११, सु.भा.

[६ पानांवरील चौकट]

देवाचे व्यक्‍तिमत्त्व आणि कर्माचा नियम

“कर्माचा नियम, अपरिवर्तनीय आहे व चुकवता येत नाही. यास्तव, देवाला मध्ये पडण्याची गरजच भासत नाही. त्याने नियम घालून दिला आणि जणू काय आपल्या जबाबदारीतून मोकळा झाला,” असे मोहनदास गांधींनी स्पष्टीकरण दिले.

पण स्वतः गांधींनाच हे स्पष्टीकरण अस्वस्थजनक वाटले. दुसऱ्‍या बाजूला पाहता, देवाला आपल्या सृष्टीबद्दल गहन आस्था आहे हे पुनरुत्थानाची आशा प्रकटविते. परादीस पृथ्वीवर एखाद्या मृत व्यक्‍तीला पुन्हा जिवंत करण्याकरता देवाला त्या व्यक्‍तीबद्दलची एकूणएक माहिती ठाऊक व आठवणीत असली पाहिजे. खरेच, देवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे.—१ पेत्र ५:६, ७.

[५ पानांवरील चित्र]

हिंदू संसार चक्र

[८ पानांवरील चित्र]

देवाचे वचन पुनरुत्थानाची शिकवण देते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा