तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का?
“तू भारतात होतास तेव्हा आपल्या शेजारी राहणाऱ्या ज्या मुलीच्या प्रेमात पडला होतास ती मुलगी तुला आठवते का? काही आठवड्यात तिचं लग्न होणार आहे. मला वाटलं तुला त्याबद्दल सांगावं,” असे मुकूंदभाईंनी संयुक्त संस्थानांतील एका विद्यापीठात शिकणाऱ्या आपल्या मुलास लिहिले.
या पित्याने आपल्या मुलाला ही बातमी का बरे सांगितली? कारण, मुकूंदभाईंनीच कैक वर्षांआधी या प्रेमी युगुलाचे हे प्रेमप्रकरण थांबवले होते. शिवाय, हा मुलगा सहा वर्षांपासून अमेरिकेत उच्च शिक्षण घेत होता. या काळादरम्यान त्याचा या मुलीशी कोणताच संपर्क नव्हता आणि मुकूंदभाईंना याची कल्पना होती.
मग एवढी चिंता कशासाठी? कारण मुकूंदभाईंचा पुनर्जन्मावर विश्वास होता.a जर कदाचित या दोघांतील हे बालपणाचे आकर्षण, पूर्वजन्मी ते दोघे वैवाहिक सोबती असल्यामुळे असले तर, विवाह करण्याच्या वयाचे झाल्यावर, म्हणजे आता त्यांना वेगळे ठेवणे क्रूरपणाचे ठरेल. या जन्मी ती मुलगी कोणा दुसऱ्याची पत्नी होण्याआधी मुकूंदभाई आपल्या मुलाला तिच्या विवाहाविषयी जागृत करू इच्छित होते.
आणखी एक उदाहरण पहा. भारत, मुंबई येथील एका इस्पितळात, एका चार वर्षीय मुलीला खूप वेदनादायक दिवस काढावे लागले. तिच्या हृदयातील एका झडपेत दोष होता. तिच्या संपन्न पालकांना तिचे हे हाल पाहावेनात. पण, त्यांचे म्हणणे होते: “आम्ही हे स्वीकारायलाच हवं. तिनं कदाचित पूर्वजन्मी काहीतरी पाप केलं असावं म्हणूनच तिला आता हे भोगावं लागतंय.”
हिंदू, बौद्ध, जैन, शीख आणि भारतात उगम झालेल्या इतर धर्मांतील कोट्यवधी लोकांच्या जीवनावर पुनर्जन्मावरील विश्वास प्रभाव पाडतो. वर्तमानजन्मातील अनुभव—प्रेमात पडण्यापासून तीव्र दुःखापर्यंतचे सर्व अनुभव—पूर्वजन्मातील किंवा जन्मांतील कर्मांचा परिणाम समजला जातो.
पाश्चात्य देशांतील अनेकांना पुनर्जन्माचा सिद्धान्त मोहित करतो. अमेरिकन नटी शर्ली मॅक्लेन पुनर्जन्मावर विश्वास असल्याचा दावा करते. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया, वँखूवर येथील लेखिका लॉरल फेलन ५० पूर्वजन्म आठवत असल्याचा दावा करते. सीएनएन/युएसए टुडेकरता १९९४ मध्ये घेतलेल्या एका मतनोंदणीत, १,०१६ प्रौढांपैकी २७० पेक्षा अधिक प्रौढांनी पुनर्जन्मावर विश्वास असल्याचा दावा केला. पुनर्जन्मावर विश्वास नव युग चळवळीचा देखील एक भाग आहे. पण या विश्वासाला कोणता पुरावा पाठबळ देतो?
“पूर्वजन्माच्या आठवणी!” असे पुनर्जन्मावर विश्वास ठेवणाऱ्यांचे म्हणणे आहे. यास्तव, बँकॉकमधील तीन वर्षीय रत्नाला, “ती पूर्वजन्मी साठीत मरण पावलेली धार्मिक स्त्री असल्याच्या आठवणी” येऊ लागल्या तेव्हा तिला पाहणाऱ्या पुष्कळांनी, हा पुनर्जन्माचा पुरावा मानला.
परंतु तरीही याविषयी अनेक शंका आहेत. पूर्वजन्माशी निगडित असलेल्या आठवणींची इतर स्पष्टीकरणे शक्य आहेत.b हिंदुत्व: आत्म्याच्या मुक्ततेकरता त्याचा अर्थ (इंग्रजी) नामक आपल्या पुस्तकात हिंदू तत्त्वज्ञानी निखिलानंद म्हणतात की, ‘मृत्यूनंतरचे अनुभव विचारशक्तीने शाबीत केले जाऊ शकत नाहीत.’ तरीसुद्धा, “पुनर्जन्माचा सिद्धान्त असंभवनीय असण्यापेक्षा अधिक संभवनीय आहे,” असे ते ठामपणे सांगतात.
पण बायबल या शिकवणुकीला आधार देते का? तसेच देवाचे ईश्वरप्रेरित वचन मृत जनांसाठी कोणती आशा देते?
[तळटीपा]
a “पुनर्जन्म याचा” अर्थ, “मनुष्य, पशू किंवा काही प्रसंगी वनस्पती अशा एक किंवा अधिक प्रकारच्या योनीत जीवात्म्याचा दुसरा जन्म होय,” असे द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका म्हणतो.
b सावध राहा! (इंग्रजी) जून ८, १९९४, पृष्ठे ५-७ पाहा.
[४ पानांवरील चित्र]
तिला तिच्या पूर्वजन्माच्या पापांची शिक्षा मिळत आहे का?