त्यांनी यहोवाच्या इच्छेप्रमाणे केले
पालकांच्या विश्वासाचे प्रतिफळ मिळाले
इस्राएली लोकांमध्ये मुलगा जन्माला आल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावार राहत नसे. त्यामुळे त्यांचा वंश पुढे चालू राहत असे आणि त्यांची जमीन देखील त्यांच्या कुटुंबात राहत असे. परंतु, सा.यु.पू. १५९३ या वर्षाच्या आसपास इब्री लोकांना, घरात मुलाचा जन्म होणे हा आशीर्वाद वाटण्याऐवजी शापच वाटला असेल. का? इजिप्तचा फारो राजा त्याच्या आधिपत्याखाली असलेल्या राज्यातील यहुदी लोकांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भयभीत झाला होता त्यामुळे त्याने नवजात मुलगे ठार मारण्याची आज्ञा दिली होती.—निर्गम १:१२, १५-२२.
जातीयसंहार करण्याचा हा अघोरी प्रयत्न चालू असताना अम्राम आणि योखबेद या इब्री विवाहित जोडप्याच्या घरात एका सुंदर मुलाचा जन्म झाला. फारोने जारी केलेला हुकूम लक्षात आल्यानंतर त्यांच्या आनंदावर कसे विरजण पडले असावे, हे समजण्याजोगे आहे. तरी देखील अम्राम आणि योखबेद यांनी परिणामांची कोणतीही तमा न बाळगता आपल्या मुलाचा सांभाळ करण्याचे त्याने ठरविले.—निर्गम २:१, २; ६:२०.
विश्वासाने कार्य करणे
अम्रामाने आणि योखबेद हिने त्यांच्या मुलाला तीन महिने लपवून ठेवले. (निर्गम २:२) परंतु, हे फार जोखमीचे होते कारण इब्री आणि ईजिप्शियन हे अगदी जवळजवळ राहत असत. फारोच्या आज्ञेचे उल्लंघन करण्याचा कोणी प्रयत्न करत असल्याचे कळून आल्यास त्याला कदाचित मृत्यूची शिक्षा झाली असती—आणि बाळाला देखील ठार मारण्यात आले असते. तर मग, या धार्मिक पालकांना आपल्या मुलाला आणि स्वतःला देखील जिवंत राहता यावे म्हणून काय करता येणे शक्य होते?
योखबेद हिने लव्हाळ्याच्या काही कांड्या गोळा केल्या. लव्हाळ्याच्या कांडक्या बांबूप्रमाणे मजबूत असतात आणि त्या बोटाच्या आकाराच्या असून त्यांना तीन बाजू असलेले देठ असतात. त्या सहा मीटर पर्यंत वाढू शकतात. कागद, चटई, गलबते, चपला आणि हलक्या वजनाच्या बोटी तयार करण्यासाठी ईजिप्शियन या वनस्पतीचा वापर करत असत.
योखबेद हिने लव्हाळ्याच्या फांद्यांचा आपल्या मुलाला पुरेल इतक्या आकाराचा एक पेटारा तयार केला. तिने त्यानंतर पेटाऱ्यात पाणी शिरू नये म्हणून त्यावर डांबर व राळ चोपडली. त्यानंतर, योखबेद हिने आपले मूल पेटाऱ्यात ठेवले आणि तो पेटारा नील नदीकाठच्या लव्हाळ्यात नेऊन ठेवला.—निर्गम २:३.
मूल दृष्टीस पडते
त्यानंतर काय होते, हे पाहण्यासाठी योखबेद हिची मुलगी मिर्याम जवळच उभी असते. मग फारोची मुलगी स्नान करण्यासाठी नील नदीवर येते.a राजकुमारी नील नदीच्या या काठावर बहुतेक वेळा येत असल्याचे कदाचित योखबेदला माहीत असावे आणि म्हणूनच तिने हेतुतः पेटारा अशा ठिकाणी ठेवला जेथे तो सहज दृष्टीस पडू शकेल. आणि फारोच्या मुलीला तो पेटारा लव्हाळ्यांत लगेच दिसला आणि तिने तो पेटारा आणण्यासाठी आपल्या दासीला सांगितले. त्या पेटाऱ्यातील रडणारे मूल पाहिल्यानंतर तिला त्याचा फार कळवळा आला. ते इबऱ्याचे बाळ होते, हे समजायला तिला फार वेळ लागला नाही. पण, त्या गोंडस बाळाची हत्या होताना तिला पाहवलं असतं का? मानवी कृपाळूपणाखेरीज, आपल्या जीवनकाळात आपण जी चांगली कामे करतो त्यावर स्वर्गातील प्रवेश आधारित असतो, या प्रचलित ईजिप्शियन प्रभावाचा देखील तिच्यावर पगडा राहिला असेल.b—निर्गम २:५, ६.
काही अंतरावरून मिर्याम सर्वकाही पाहत होती त्यानंतर ती फारोच्या मुलीकडे गेली. “आपणाकरिता मुलास दूध पाजावयासाठी इब्री स्त्रियांतून एखादी दाई बोलावू काय?” तिने विचारले. त्या राजकुमारीने उत्तर दिले: “जा बोलव!” तेव्हा मिर्यामने धावत जाऊन आपल्या आईला बोलावून आणले. काही वेळातच फारोच्या मुलीसमोर योखबेद हजर होती. राजकुमारीने तिला म्हटले, “या मुलाला घेऊन जा, आणि माझ्याकरिता याला दूध पाज, म्हणजे मी तुला वेतन देईन.” योखबेद ही मुलाची आई असल्याचे कदाचित यावेळी फारोच्या मुलीने हे ओळखले असावे.—निर्गम २:७-९.
जोपर्यंत हे मूल अंगावर पित होते तोपर्यंत योखबेद हिने त्या मुलाला आपल्याकडे ठेवले.c यामुळे, खरा देव यहोवा याविषयी शिकवण्याच्या अनेक मौल्यवान सुसंधी तिला मिळाल्या होत्या. त्यानंतर, योखबेदने त्या मुलाला फारोच्या मुलीकडे परत आणले आणि फारोच्या मुलीने त्या मुलाला मोशे असे नाव दिले; याचा अर्थ ‘पाण्यातून वाचविण्यात आलेला’ असा होतो.—निर्गम २:१०.
आपल्यासाठी धडा
आपल्या मुलाला शुद्ध उपासनेची तत्त्वे शिकवण्यासाठी अम्राम आणि योखबेद यांना जी काही संधी मिळाली होती त्या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. आज पालकांनी असेच केले पाहिजे. खरोखरच, असे करणे त्यांच्यासाठी अत्यावश्यक आहे. दियाबल सैतान “गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.” (१ पेत्र ५:८) मौल्यवान मुलांना—मुलग्यांना आणि मुलींना देखील—ज्यांना यहोवाचे चांगले सेवक होण्याची आशा आहे अशांना आपले भक्ष्य बनवायला त्याला आवडते. सैतानाच्या मनात युवकांविषयी कोणतीही सहानुभूती नाही! हे लक्षात ठेवून सुज्ञ पालक आपल्या तान्ह्या मुलांना खरा देव यहोवा याचे भय मानण्याचे प्रशिक्षण देतात.—नीतिसूत्रे २२:६; २ तीमथ्य ३:१४, १५.
अम्राम आणि योखबेद यांनी आपल्या तान्ह्या मुलाला तीन महिन्यांपर्यंत लपवून ठेवले हे कार्य इब्री लोकांस ११:२३ येथे विश्वासाचे कार्य म्हणून नमूद करण्यात आले आहे. या दोन्ही देव-भीरू पालकांनी आपल्या मुलाचा त्याग करण्यास नकार देण्याद्वारे यहोवाच्या बचाव सामर्थ्यावर विश्वास असल्याचे दाखवले आणि यामुळे त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला. आपण देखील यहोवाच्या नियमांना आणि तत्त्वांना अगदी जडून राहिले पाहिजे या विश्वासाने, की यहोवा आपल्यावर ज्या काही गोष्टी आणण्याची परवानगी देतो त्या कालांतराने आपल्याला कायमस्वरूपी लाभात आणि आनंदात परिणीत होतील.—रोमकर ८:२८.
[तळटीपा]
a जनन देवता म्हणून ईजिप्शियन नील नदीची उपासना करीत असत. त्यांचा असा विश्वास होता, की या नदीच्या पाण्यात फलद्रूप होण्याची आणि दीर्घ जीवन प्राप्त करण्याची शक्ती होती.
b ईजिप्शियनांचा असा विश्वास होता, की मृत्यूनंतर एखाद्याचा आत्मा ऑसरीसच्या उपस्थित सविस्तरपणे असे ठाम सांगतो की, “मी कोणा मानवाला दुःख दिले नाही,” “मी दुधपित्या बाळाच्या तोंडातून दूध काढून घेतले नाही,” आणि “मी भुकेलेल्यास भाकरी दिली आणि तान्हेलेल्यास प्यायला दिले.”
c आज, सामान्यपणे ज्या काळापर्यंत मुले अंगावर पितात त्यापेक्षा पुष्कळ अधिक काळापर्यंत प्राचीन काळातील मुले अंगावर पित असत. शमुवेलाने अंगावर पिण्याचे सोडले तेव्हा तो तीन वर्षांचा होता आणि इसहाक पाच वर्षांचा होता.