वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१ पृ. २४-२९
  • देव माझा आश्रय व माझे सामर्थ्य आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देव माझा आश्रय व माझे सामर्थ्य आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भवितव्यासाठी बळकट करण्यात येते
  • शत्रुंचे उत्तर—तुरुंग
  • लिछटेनबर्ग येथे
  • रॉवेन्सब्रुक येथे
  • कठीण युद्धोत्तर वर्षे
  • पुन्हा एकदा बंदी व अटक
  • यहोवाकडून सामर्थ्य आणि साहाय्य
  • यहोवा माझा आश्रय आणि सामर्थ्य राहतो
  • माझ्या तारुण्यापासून मी सबुराईनं यहोवाची आस धरली
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाच्या ममतेवर भरवसा ठेवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • देवाची सेवा करण्याच्या शब्दाला जागलो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • अंधाऱ्‍या कोठडीतून देखण्या स्वीस ॲल्प्सपर्यंत
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१ पृ. २४-२९

देव माझा आश्रय व माझे सामर्थ्य आहे

शॉरलॉट म्युलर यांच्याद्वारे कथित

“हिटलरच्या सत्तेखाली नऊ वर्षांपर्यंत तुमचे टिकून राहणे खरोखरीच स्तवनीय आहे, तुम्ही वास्तविकतेत युद्धाच्या विरोधात होता, पण आता तुम्ही आमच्या शांतीच्या विरोधात आहात!” असे एका कम्युनिस्ट न्यायाधीशाने म्हटले.

नात्सींनी मला पूर्वी दिलेल्या कारावासाच्या शिक्षेला आणि जर्मन लोकशाही गणराज्यातील समाजवादाला उद्देशून ते बोलत होते. सुरवातीला माझी वाचाच बसली पण मग मी उत्तर दिले: “इतर लोकांप्रमाणे ख्रिश्‍चनांना खऱ्‍या शांतीसाठी झटावे लागत नाही. मी देवावर आणि आपल्या शेजाऱ्‍यावर प्रीती करा या बायबलमधील आज्ञेचे पालन करण्याचा प्रयत्न करते. देवाचे वचन मला माझ्या बोलण्यात व कृतीत शांती राखण्यासाठी मदत करते.”

त्या दिवशी, सप्टेंबर ४, १९५१ रोजी, कम्युनिस्टांनी मला आठ वर्षांची—नात्सी राजवटीने मला दिलेल्या तुरुंगवासातील शिक्षेपेक्षा एक वर्ष कमी—तुरुंगवासाची शिक्षा दिली.

नॅशनल समाजवादी आणि कम्युनिस्टांकडून आम्हा यहोवाच्या साक्षीदारांचा छळ होत असे तेव्हा मला स्तोत्र ४६:१ मधून सांत्वन मिळाले, जेथे म्हटले आहे: “देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे; तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो.” केवळ यहोवानेच मला टिकून राहण्याचे बळ दिले व जितकी मी त्याच्या वचनात गढून गेले तितकी मी दृढ झाले.

भवितव्यासाठी बळकट करण्यात येते

माझा जन्म १९१२ मध्ये, जर्मनीतील थुरिंजिया येथील गोथॉ झिबलेबन नावाच्या शहरात झाला. माझे आईवडील प्रोटेस्टंट असले तरीसुद्धा, माझे वडील बायबल सत्याच्या आणि एका धार्मिक सरकाराच्या शोधात होते. माझ्या आईवडिलांनी “फोटो-ड्रामा ऑफ क्रिएशन” पाहिले तेव्हा त्यांना आनंदी आनंद झाला.a वडील ज्याच्या शोधात होते तेच त्यांना सापडले होते—देवाचे राज्य.

आई, बाबा आणि आम्ही सर्व सहाही मुलांनी मार्च २, १९२३ रोजी, चर्चला राजीनामा दिला. आम्ही सॅक्सेनीच्या केमनिट्‌स येथे राहत होतो. तेथे आम्ही बायबल विद्यार्थ्यांसोबत संगती करू लागलो. (माझी तीन भावंडे यहोवाचे साक्षीदार झाले.)

बायबल विद्यार्थ्यांच्या सभांमधील शास्त्रीय वचने आणि अमूल्य सत्य माझ्या मनात खोलवर रुजल्यामुळे माझे कोवळे अंतःकरण आनंदाने भरले. सर्वात विशेष म्हणजे आम्हा ख्रिस्ती तरुणांना रविवारच्या दिवशी प्रशिक्षण दिले जाई, आम्ही एकूण ५० जण होतो. माझी थोरली बहीण कॅथी आणि मला काही काळापर्यंत ते प्रशिक्षण मिळाले. आमच्यासोबत तरुण कॉनरॅट फ्रँक देखील होता जो आम्हाला फिरवायला न्यायची व्यवस्था करायचा आणि आमच्यासोबत गाण्याच्या तालिमी घ्यायचा. नंतर, १९५५ पासून १९६९ पर्यंत, बंधू फ्रँक यांनी जर्मनीतील वॉच टावर शाखेत पर्यवेक्षक या नात्याने कार्य केले.

१९२० चे दशक बरेच खळबळ माजवणारे होते, कधी कधी तर देवाच्या लोकांमध्ये सुद्धा खळबळ उडाली. काहींनी टेहळणी बुरूज नियतकालिक ‘यथाकाळचे अन्‍न’ म्हणून नाकारल्यामुळे ते घरोघरच्या प्रचारकार्याविरुद्ध झाले. (मत्तय २४:४५) यामुळे ते धर्मत्यागाकडे वळाले. पण, याच ‘अन्‍नाने’ आम्हाला त्याकाळी अत्यंत जरूरीचे सामर्थ्य दिले. जसे की, त्यामध्ये “निर्भय जन आशीर्वादित आहेत,” (१९१९) व “यहोवाचा आदर कोण करील?” (१९२६) अशाप्रकारचे लेख छापले. धाडसी कार्याद्वारे यहोवाचा आदर करायची माझी इच्छा होती म्हणून मी बंधू रदरफोर्ड यांच्या अनेक पुस्तकांचे आणि पुस्तिकांचे वाटप केले.

मार्च १९३३ मध्ये यहोवाची साक्षीदार या नात्याने माझा बाप्तिस्मा झाला. त्याचवर्षी, आमच्या सुवार्तिक कार्यावर जर्मनीत बंदी आली. बाप्तिस्म्याच्या वेळी, भवितव्यासाठी प्रकटीकरण २:१० वचन सल्ला म्हणून सांगण्यात आले: “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हांपैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे; आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.” मला कठीण परिक्षांना तोंड द्यावे लागणार आहे, याबद्दल कोणतीच शंका न बाळगता मी या वचनावर मनन केले. आणि ते खरेही ठरले.

राजकारणाच्या बाबतीत आम्ही तटस्थ असल्यामुळे आमचे बहुतेक शेजारी आमच्याकडे संशयाने पाहू लागले. एका राजकीय मतदानानंतर, वेषधारी नात्सी सैनिकांचा एक गट आमच्या घरापुढे उभा राहून ओरडला, “येथे राजद्रोही राहतात!” जर्मन भाषेतील डिसेंबर १९३३ च्या टेहळणी बुरूज नियतकालिकातील “त्यांना भिऊ नका” या अंकाने मला विशेष उत्तेजन दिले. सर्वात प्रतिकूल परिस्थितीतही मी यहोवाची एक विश्‍वासू साक्षीदार राहू इच्छित होते.

शत्रुंचे उत्तर—तुरुंग

सन १९३५ च्या शरद ऋतुपर्यंत, केमनिट्‌झमध्ये गुप्तपणे टेहळणी बुरूज नियतकालिक छापणे शक्य होते. त्यानंतर वापरण्यात येणारे प्रतिलिपी यंत्र, ओर पर्वतांतील बायअरफेल्ट येथे न्यावे लागले. तेथे ऑगस्ट १९३६ पर्यंत साहित्य पुन्हा छापले जात होते. कॅथी आणि मी, बाबा आम्हाला ज्यांचे ज्यांचे पत्ते देत त्यांना नियतकालिकाच्या प्रती जाऊन देत असू. काही काळापर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते. पण मग, गेस्टापोंनी माझ्यावर नजर ठेवली व ऑगस्ट १९३६ मध्ये त्यांनी माझ्या घरी येऊन मला ताब्यात घेतले व मला स्थानबद्ध केले; तेथे मी माझ्या न्यायचौकशीची वाट पाहत राहिले.

फेब्रुवारी १९३७ मध्ये, २५ बंधूंना आणि माझ्यासहित दोन भगिनींना सॅक्सनीमधील एका खास न्यायालयात हजर करण्यात आले. यहोवाच्या साक्षीदारांची संघटना विध्वंसक आहे असा दावा करण्यात आला. टेहळणी बुरूज नियतकालिक पुनःनिर्माण करणाऱ्‍या बांधवांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मला दोन वर्षांची शिक्षा झाली.

माझी शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मला सोडण्याऐवजी मला गेस्टापोंनी ताब्यात घेतले. मी पुन्हा यहोवाची साक्षीदार या नात्याने सक्रिय राहणार नाही अशा एका प्रतिज्ञापत्रावर मला सही करायची होती. मी ठामपणे नकार दिल्यामुळे अधिकाऱ्‍यांचा पारा इतका चढला की ते खुर्चीतून ताडकन उठले आणि मला स्थानबद्ध करण्याविषयीचे वॉरंट दिले. चित्रात ते वॉरंट दाखवलेले आहे. माझ्या आईवडिलांना पाहू न देता मला तत्काळ लिछटेनबर्ग येथील एल्ब नदीवरील महिलांसाठी असलेल्या एका लहानशा छळछावणीत नेण्यात आले. त्यानंतर थोड्या दिवसांनी माझी आणि कॅथीची भेट झाली. ती डिसेंबर १९३६ पासून मोरिंगजेन येथील एका छळछावणीत होती, पण ती छावणी बंद पडल्यावर इतर अनेक साक्षीदार भगिनींसोबत ती लिछटेनबर्ग येथे आली होती. माझ्या वडिलांना देखील स्थानबद्ध करण्यात आले व १९४५ पर्यंत मी त्यांना पुन्हा पाहिले नाही.

लिछटेनबर्ग येथे

मला इतर महिला साक्षीदारांसोबत संगती करण्याची लगेचच परवानगी मिळाली नाही कारण त्यांना दुसऱ्‍या कारणास्तव शिक्षा मिळाली होती. सभागृहांपैकी एकात मी कैद्यांचे दोन गट पाहिले—नेहमीप्रमाणे टेबलावर बसणाऱ्‍या स्त्रियांचा एक गट आणि साक्षीदार महिलांचा दुसरा गट ज्यांना काही खायला न देता दिवसभर स्टूलवर बसावे लागत असे.b

मी कोणतेही काम स्वीकारत असे या हेतुने की कदाचित मी कॅथीला भेटू शकेन. आणि एकदा असेच घडले. ती दोन कैदींसोबत कामाला चालली असताना आम्ही दोघी समोरासमोर आलो. मला इतका आनंद झाला की मी तिला जोराने मिठी मारली. पण तेथील महिला रक्षकने आमची नावे लगेच कळवली. आमची विचारपूस झाली व तेव्हापासून आम्हाला मुद्दाम वेगळे ठेवण्यात आले. मला ते खूप कठीण वाटले.

लिछटेनबर्ग येथील आणखी दोन घटना अविस्मरणीय आहेत. एके प्रसंगी सर्व कैद्यांना रेडिओवरून हिटलरचे राजकीय भाषण ऐकण्याकरता पटांगणात एकत्र व्हायचे होते. आम्ही यहोवाच्या साक्षीदारांनी याला नकार दिला कारण तेव्हा काही देशभक्‍तीसंबंधित विधी होणार होते. रक्षकांनी आमच्यावर जोरदार पाण्याचा फवारा मारत आम्हा संरक्षणहीन महिलांना चौथ्या मजल्यावरून पटांगणापर्यंत पळवत आणले. तेथे आम्हाला तसेच चिंब भिजलेल्या अवस्थेत उभे राहावे लागले.

दुसऱ्‍या प्रसंगी हिटलरचा वाढदिवस जवळ येत असल्यामुळे गर्ट्रुड आऊम आणि गर्टल ब्युरलन या दोघींसह मला कमांडंटचे मुख्यालय रोशनाईने सजवण्याचा हुकूम दिला. लहानसहान गोष्टी करून आमच्या सचोटीचा भंग करण्याद्वारे आम्हाला हातमिळवणी करावयास लावण्याचा सैतान चतुराईने प्रयत्न करीत आहे हे ओळखून आम्ही यास नकार दिला. शिक्षा म्हणून, आम्हा प्रत्येक तरुण भगिनीला एका लहानशा अंधाऱ्‍या कोठडीत पुढील तीन आठवडे घालवावे लागले. पण, यहोवा आमच्या निकट होता आणि इतक्या भयजनक ठिकाणी देखील तो आमचा आश्रयदाता ठरला.

रॉवेन्सब्रुक येथे

मे १९३९ मध्ये, लिछटेनबर्ग येथील कैद्यांना रॉवेन्सब्रुक छळछावणीत हलवण्यात आले. मला आणि इतर अनेक साक्षीदार बहिणींना लॉण्ड्रीत नेमण्यात आले. युद्धाचा उद्रेक झाल्यावर काही काळातच आम्हाला स्वास्तिक झेंडे आणण्यास सांगितले, पण आम्ही ते आणले नाहीत. परिणाम, आमच्यापैकी दोघींना, मिल्केन अर्नस्ट आणि मला बराकीत टाकण्यात आले. हा शिक्षेतील सर्वात कडक प्रकार होता आणि त्याचा अर्थ आम्हाला दररोज, रविवारी देखील कोणतेही हवामान असो, सर्वात कठीण काम करायचे होते. सहसा, तीन महिन्यांपर्यंत सर्वात जास्त शिक्षा असायची पण आम्ही तेथे एक वर्षापर्यंत होतो. यहोवाच्या मदतीविना तर मी मुळीच जिवंत राहू शकले नसते.

सन १९४२ मध्ये, आम्हा कैद्यांची परिस्थिती थोडीशी सुधारली, मला छावणीच्या जवळ राहणाऱ्‍या एका एस.एस. कुटुंबासाठी आया म्हणून काम करण्यास नेमण्यात आले. त्या कुटुंबाने मला काही प्रमाणात मोकळीक दिली होती. जसे की, एकदा मुलांना फिरवायला घेऊन जात असताना वस्त्रावर जांभळे त्रिकोण चिन्ह असलेल्या योसेफ रेहवॉल्ड आणि गॉटफ्रीट मेलहॉर्न या दोन कैद्यांना मी भेटले, मी त्यांच्याशी उत्तेजनाची देवाणघेवाण करू शकले.c

कठीण युद्धोत्तर वर्षे

सन १९४५ मध्ये दोस्तसैन्य चाल करून आले तेव्हा मी ज्या कुटुंबासोबत काम करीत होते त्यांनी तेथून पळ काढला आणि मलाही त्यांच्याबरोबर जावे लागले. इतर एस.एस. कुटुंबांसोबत त्यांनी एक मोठा संरक्षक गट बनवला व सर्व जण पश्‍चिमेकडे प्रवास करीत गेले.

युद्धाची शेवटली वर्षे अत्यंत अव्यवस्थित व धोक्याची होती. सरतेशेवटी, आम्ही काही अमेरिकी सैनिकांना भेटलो ज्यांनी मला दुसऱ्‍या गावात मुक्‍त व्यक्‍ती या नात्याने माझे नाव नोंदवण्याची परवानगी दिली. तेथे मी कोणाला भेटले असेन? योसेफ रेहवॉल्ड आणि गॉटफ्रीट मेलहॉर्न यांना! शॅचसेनहाऊसेन येथील छळछावणीतील सर्व साक्षीदार जोखीमपूर्ण मृत्यू प्रवास करून श्‍वेरीन येथे पोहंचल्याचे त्यांना समजले होते. म्हणून आम्ही तिघे ७५ किलोमीटर दूर असलेल्या त्या शहराकडे जाण्यास निघालो. छळछावणीतील उत्तरजीवी, सर्व विश्‍वासू बांधव आणि कॉनरॅड फ्रँक यांना श्‍वेरीनमध्ये पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला.

डिसेंबर १९४५ पर्यंत देशातील परिस्थिती थोडीशी सुधारल्यामुळे मी ट्रेनने प्रवास करू शकले. मी माझ्या घरी चालले होते! परंतु, मला रेल्वेच्या डब्यावर झोपून व पायफळीवर उभे राहून प्रवास करावा लागला. केमनिट्‌झमध्ये पोहंचल्यावर रेल्वेस्टेशन पासून, आम्ही सर्व कुटुंब जेथे राहत होतो तेथपर्यंत मी चालत गेले. नात्सी सैनिक जेथे उभे राहून “येथे राजद्रोही राहतात!” असे ओरडले होते तेथील एकही घर टिकले नव्हते. लोक जिथे राहत होते तो सर्व परिसर बॉम्बमुळे उद्‌ध्वस्त झाला होता. पण आई, बाबा, कॅथी आणि माझ्या इतर भावंडांना जिवंत पाहून माझ्या जिवात जीव आला.

युद्धोत्तर जर्मनीतील आर्थिक परिस्थितीने उग्र स्वरूप धारण केले होते. मात्र, देवाच्या लोकांच्या मंडळ्यांची अख्ख्या जर्मनीत भरभराट होऊ लागली होती. आम्हाला प्रचार कार्यासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न करण्यात वॉच टावर संस्थेने कोणतीच कसर मागे सोडली नाही. मॅग्डेबर्ग येथील नात्सींनी बंद पाडलेल्या बेथेलमधील कामास पुन्हा सुरवात झाली. सन १९४६ च्या वसंत ऋतुत मला तेथे काम करण्याचे आमंत्रण मिळाले व स्वयंपाक घरात नेमणूक मिळाली.

पुन्हा एकदा बंदी व अटक

मॅग्डेबर्ग, जर्मनीच्या त्या भागात आहे जो भाग कम्युनिस्टांनी ताब्यात घेतला होता. ऑगस्ट ३१, १९५० मध्ये त्यांनी आमच्या कार्यावर बंदी घातली व मॅग्डेबर्ग बेथेल बंद केले. माझी बेथेल सेवा तेथेच समाप्त झाली, पण तो मौल्यवान प्रशिक्षणाचा काळ होता. कम्युनिस्टांच्या अधिकाराखाली देखील सत्यावरील माझी पकड अशीच घट्ट ठेवण्याचा व त्रस्त मानवजातीकरता देवाचे राज्य हीच एकमात्र आशा आहे हे घोषित करत राहण्याचा निर्धार करून मी पुन्हा केमनिट्‌झला आले.

एप्रिल १९५१ मध्ये, मी एका बंधूसोबत टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रती गोळा करण्याकरता बर्लिनला गेले. पुन्हा आल्यावर, केमनिट्‌झमधील रेल्वेस्टेशन स्थानीय पोलिसांनी घेरलेले पाहून आम्ही भांबावून गेलो. ते आमचीच वाट पाहत होते; आम्हाला जागीच अटक करण्यात आली.

न्यायचौकशीच्या आधी स्थानबद्ध केले तेव्हा माझ्याकडे, नात्सींनी मला अनेक वर्षांपर्यंत तुरुंगात डांबले होते हे शाबीत करणारा दस्तऐवज होता. परिणामतः, रक्षकांनी मला आदराने वागवले. एका प्रमुख महिला रक्षकने म्हटले: “तुम्ही यहोवाचे साक्षीदार गुन्हेगार नाहीत; तुरुंग तुमच्यासाठी नाही.”

एकदा, मी इतर दोन भगिणींसोबत माझ्या तुरुंग कोठडीत असताना ती तेथे आली आणि तिने गुपचूप एका बिछान्याखाली काही तरी ठेवले. ते काय असेल बरे? तिने तिचे स्वतःचे बायबल आम्हाला दिले होते. दुसऱ्‍या एका प्रसंगी, माझे घर तुरुंगापासून जास्त दूर नसल्यामुळे ती माझ्या घरी माझ्या आईवडिलांकडे गेली. येताना तिने आपल्या जबाबदारीवर टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या काही प्रती आणि थोडेसे अन्‍न आणले आणि चोरून सर्व माझ्या कोठडीत आणून दिले.

मला आणखी एक गोष्ट आठवते. कधीकधी रविवारी सकाळी, आम्ही आमचे ईश्‍वरशासित गीत इतक्या मोठ्याने गात असू, की इतर कैदी देखील अगदी आनंदाने प्रत्येक गाण्याला टाळ्या वाजवून प्रशंसा करत.

यहोवाकडून सामर्थ्य आणि साहाय्य

सप्टेंबर ४, १९५१ रोजी न्यायालयीन कार्यवाही दरम्यान, या लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे न्यायाधीश उद्‌गारले होते. मी, पहिल्यांदा वॉल्डहेम मग हॉल आणि शेवटी होअनेक येथील तुरुंगात शिक्षा भोगली. देव आम्हा यहोवाच्या साक्षीदारांचा आश्रय व सामर्थ्य कसा होता व त्याच्या वचनाने आम्हाला प्रोत्साहन कसे दिले त्याची एक वा दोन लहानशा घटनांवरून ग्वाही मिळेल.

वॉल्डहेम येथील तुरुंगात असताना, सर्व साक्षीदार भगिनी एका सभागृहात नियमितरीत्या एकत्र जमत जेणेकरून आम्ही ख्रिस्ती सभा चालवू शकलो. पेन्सिल आणि कागद बाळगण्याची आम्हाला परवानगी नसल्यामुळे, काही बहिणींनी कापडाच्या काही चिंध्या आणून एक लहानसा बॅनर बनवला व त्यावर, “पवित्र थाटाने यहोवाची उपासना करा,” हे १९५३ चे वार्षिक वचन लिहिले.—स्तोत्र २९:२, अमेरिकन स्टॅण्डर्ड व्हर्शन.

एक महिला रक्षक अचानक आली; तिने आमच्याकडे आश्‍चर्याने पाहिले आणि वेळ न दवडता आमच्याबद्दल वर जाऊन सांगितले. तुरुंगाचे प्रमुख आमच्याकडे आले आणि त्यांनी आमच्यापैकी दोन बहिणींना तो बॅनर वर धरून उभे राहण्यास सांगितले. त्यांनी विचारले, “हे कोणी केले? काय अर्थ होतो याचा?”

एक बहीण आमच्या सर्वांचा दोष एकटीवर घेऊन सर्व काही सांगण्यास तयार झाली पण आम्ही लगेचच आमच्यामध्ये कुजबुजून सर्वांनी जबाबदारी घेण्याचे ठरवले. आम्ही उत्तरलो: “आमचा विश्‍वास बळकट करण्यासाठी आम्ही तो बनवला.” तो बॅनर जप्त करण्यात आला आणि शिक्षा म्हणून आमचे जेवण बंद करण्यात आले. परंतु, संपूर्ण चर्चेदरम्यान बहिणींनी तो बॅनर उंचावून धरला जेणेकरून आम्ही आमच्या मनांवर ते उत्तेजनात्मक वचन बिंबवू शकलो.

वॉल्डहेम येथील महिलांचे तुरुंग बंद पडले तेव्हा आम्हा बहिणींची हॉल येथे बदली झाली. आम्ही बाहेरून पार्सल प्राप्त करू शकत असल्यामुळे माझ्या बाबांनी माझ्याकरता पाठवलेल्या स्लिपरच्या आत काय शिवून पाठवले असावे बरे? टेहळणी बुरूज लेख! मला अजूनही ते लेख आठवतात, “खरी प्रीती व्यावहारिक आहे,” आणि “लबाडीमुळे जीवन गमावू,” असे त्यांचे विषय होते. हे आणि इतर लेख खरोखरच सर्वोत्कृष्ट होते. आम्ही ते गुप्तपणे एकमेकींना पाठवत असू व प्रत्येकजण स्वतःचे नोट्‌स करत असत.

एकदा, छापा घालताना, एका महिला रक्षकला गवतापासून बनवलेल्या माझ्या गादीत मी लपवून ठेवलेल्या माझ्या व्यक्‍तिगत नोट्‌स सापडल्या. नंतर तिने मला चौकशीसाठी बोलवले व म्हटले, की तिला, “१९५५ वर्षाकरता यहोवाचे भय बाळगणाऱ्‍यांना आशा” या लेखाचा अर्थ काही करून जाणून घ्यायचा होता. एक कम्युनिस्ट असल्यामुळे, तिला १९५३ मध्ये घडलेल्या तिच्या नेत्याच्या म्हणजे स्टॅलीनच्या मृत्यूची काळजी वाटत होती, तिला तिचे भवितव्य अगदी अंधुक वाटत होते. भवितव्यात तुरुंगातील आमच्या परिस्थितीत काही सुधारणा होणार होत्या, पण मला याबद्दल काहीही माहीत नव्हते. मी अगदी आत्मविश्‍वासाने तिला सांगितले की यहोवाच्या साक्षीदारांसाठी उत्तम आशा होत्या. का बरे? मी लेखाचे मुख्य वचन, स्तोत्र ११२:७ तिला दाखवले, जेथे लिहिले आहे: “तो वाईट बातमीला भिणार नाही; त्याचे अंतःकरण यहोवावर भाव ठेवून अढळ राहते.”—एएस.

यहोवा माझा आश्रय आणि सामर्थ्य राहतो

मी खूप आजारी पडल्यामुळे मला मार्च १९५७ मध्येच, म्हणजे दोन वर्ष आधीच तुरुंगातून मुक्‍त करण्यात आले. यहोवाच्या सेवेतील माझी क्रियाशीलता पाहून पूर्व जर्मन अधिकाऱ्‍यांनी पुन्हा एकदा माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. यास्तव, मे ६, १९५७ रोजी मी संधी साधून पश्‍चिम बर्लिनला पळून गेले आणि तेथून मग पश्‍चिम जर्मनीला गेले.

माझी तब्येत सुधारण्यास बरीच वर्षे लागली. पण, आजपर्यंत मला पुरेशी आध्यात्मिक भूक आहे व टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या प्रत्येक नवीन प्रतीची मी वाट पाहत असते. मी वेळोवेळी स्वपरिक्षण करत असते. माझा अजूनही आध्यात्मिक गोष्टींकडेच कल आहे का? मी स्वतःमध्ये उत्तम गुण विकसित केले आहेत का? माझ्या विश्‍वासाची पारख यहोवाची स्तुती आणि सन्मान करण्याचे एक कारण आहे का? सर्व गोष्टींमध्ये यहोवाला संतुष्ट करण्याचे माझे ध्येय आहे जेणेकरून तो सदासर्वकाळ माझा आश्रय व सामर्थ्य राहील.

[तळटीपा]

a सन १९१४ पासून सुरू झालेले “फोटो-ड्रामा,” हे स्लाईड्‌स आणि चलचित्रांचे होते. वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात हे दाखवत असत.

b स्वित्झर्लंड, बर्न येथील वॉच टावर संस्थेने प्रकाशित केलेल्या ट्रोस्ट (कन्सोलेशन), नामक नियतकालिकाने मे १, १९४०, पृष्ठ १० वर असा अहवाल दिला, की लिछटेनबर्ग येथे एकदा महिला यहोवाच्या साक्षीदारांना, नात्सी स्तुतीगीते चालू असताना त्यांनी आदरचिन्ह करण्याचे नाकारल्यामुळे लागोपाठ १४ दिवसांपर्यंत दुपारचे जेवण मिळाले नाही. तेथे ३०० यहोवाचे साक्षीदार होते.

c योसेफ रेहवॉल्डबद्दलचा अहवाल सावध राहा! च्या फेब्रुवारी ८, १९९३ पृष्ठे २०-३ (इंग्रजी) मध्ये आला आहे.

[२६ पानांवरील चित्र]

रॉवेन्सब्रुक येथील एस.एस. कार्यालय

[२६ पानांवरील चित्राचे श्रेय]

वरील: Stiftung Brandenburgische Gedenkstätten

[२६ पानांवरील चित्र]

छावणीच्या बाहेर काम करण्याकरता मला दिलेला पास

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा