वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१ पृ. १८-२३
  • शांतीच्या संदेशवाहकांना आनंदी घोषित केले जाते

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • शांतीच्या संदेशवाहकांना आनंदी घोषित केले जाते
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आज देवाच्या संदेशवाहकांना ओळखणे
  • देवाच्या संदेशवाहकांचा आनंद
  • यहोवाची संघटना आगेकूच करते
  • योग्य संदेशवाहक ओळखणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “त्यांस समजेल की मी यहोवा आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • ऐका यहोवाचा पहारेकरी बोलत आहे!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • यहेज्केल पुस्तकातील ठळक मुद्दे—भाग १
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१ पृ. १८-२३

शांतीच्या संदेशवाहकांना आनंदी घोषित केले जाते

“मुक्‍त केलेले परमेश्‍वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील.”—यशया ३५:१०.

१. जगाला कशाची नितान्त गरज आहे?

पूर्वी कधीही नव्हती तितकी आज, मानवजातीला सुवार्तेच्या संदेशवाहकाची आवश्‍यकता आहे. देव आणि त्याच्या उद्देशांविषयीचे सत्य सांगणाऱ्‍याची, येणाऱ्‍या नाशाविषयी दुष्टांना इशारा व सरळ अंतःकरणाच्या लोकांना ईश्‍वरी शांती मिळवण्यास मदत करणाऱ्‍या धाडसी साक्षीदाराची अत्यंत निकडीची गरज आहे.

२, ३. इस्राएलच्या बाबतीत यहोवाने आमोस ३:७ मधील आपले अभिवचन कसे पूर्ण केले?

२ इस्राएलच्या दिवसांमध्ये यहोवाने, अशाप्रकारचे संदेशवाहक पाठवण्याचे अभिवचन दिले होते. सा.यु.पू. नवव्या शतकाच्या शेवटी, संदेष्टा आमोस म्हणाला: “प्रभु परमेश्‍वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” (आमोस ३:७) ही घोषणा केल्यानंतरच्या शतकांदरम्यान यहोवाने अनेक सामर्थ्यशाली कृत्ये केली. उदाहरणार्थ, सा.यु.पू. ६०७ मध्ये त्याने आपल्या बंडखोर व रक्‍तपाती लोकांना कडक शिक्षा दिली. इस्राएलवरील संकट पाहून संतोष मानणाऱ्‍या आजूबाजूच्या राष्ट्रांनाही त्याने शिक्षा केली. (यिर्मया अध्याय ४६-४९) मग, सा.यु.पू. ५३९ मध्ये यहोवाने पराक्रमी बॅबिलोनी जागतिक सत्तेला धुळीस मिळवले व याचा परिणाम असा झाला, की सा.यु.पू. ५३७ मध्ये इस्राएलचा एक शेष मंदिराची पुनः बांधणी करण्यासाठी आपल्या मायदेशी परतला.—२ इतिहास ३६:२२, २३.

३ जगाला हादरवून टाकणाऱ्‍या या घटना होत्या, आणि आमोसच्या शब्दांच्या सुसंगतेत यहोवाने, संदेशवाहक या नात्याने कार्य करणाऱ्‍या संदेष्ट्यांना इस्राएलवर ओढवणाऱ्‍या गोष्टींबद्दल आगाऊ इशारा दिला. सा.यु.पू. आठव्या शतकाच्या मध्यंतरात, त्याने यशयाला उभे केले. सा.यु.पू. सातव्या शतकाच्या मध्यंतरात, त्याने यिर्मयाला उभे केले. मग, त्या शतकाच्या अंताला त्याने यहेज्केलला उभे केले. या आणि इतर विश्‍वासू संदेष्ट्यांनी यहोवाच्या उद्देशांबद्दल चांगलीच साक्ष दिली.

आज देवाच्या संदेशवाहकांना ओळखणे

४. काय दर्शवते की मानवांना शांतीच्या संदेशवाहकांची आवश्‍यकता आहे?

४ आजच्याबद्दल काय? जगातील अनेक जण मानवी समाजाचा ऱ्‍हास होताना पाहतात तेव्हा त्यांना काहीतरी भयानक होणार आहे असे वाटते. धार्मिकतेची आवड असणारे ख्रिस्ती धर्मजगताचा दांभिकपणा व निखालस दुष्टपणा पाहतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते. यहेज्केलद्वारे यहोवाने भाकीत केल्याप्रमाणे ते, “आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत.” (यहेज्केल ९:४) परंतु, यहोवाचे उद्देश काय आहेत हे पुष्कळांना माहीत नाही. त्यांना ते सांगण्याची गरज आहे.

५. आपल्या दिवसांत संदेशवाहक असतील हे येशूने कसे दाखवून दिले?

५ यशया, यिर्मया आणि यहेज्केलसारख्या निर्भयतेच्या आत्म्याने आज कोणी बोलतो का? होय, येशूने म्हटले होते की काहीजण बोलतील. आपल्या दिवसांतील घटना भाकीत करताना तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.” (मत्तय २४:१४) आज ही भविष्यवाणी कोण पूर्ण करीत आहे, संदेशवाहक अर्थात सुवार्तेचा प्रचारक या नात्याने कोण कार्य करीत आहे? आपल्या आणि प्राचीन इस्राएलच्या काळातील साम्यता या प्रश्‍नाचे उत्तर देण्यास आपली मदत करतात.

६. (अ) पहिल्या महायुद्धादरम्यान ‘देवाच्या इस्राएलच्या’ अनुभवांचे वर्णन करा. (ब) यहेज्केल ११:१७ प्राचीन इस्राएलच्या बाबतीत कसे पूर्ण झाले?

६ पहिल्या महायुद्धाच्या अंधकारमय दिवसांदरम्यान, यहोवाचे आधुनिक दिवसांतील लोक म्हणजेच, ‘देवाच्या इस्राएलच्या’ अभिषिक्‍तांपैकीचे शेष, बॅबिलोनमध्ये इस्राएलप्रमाणे दास्यत्वात गेले. (गलतीकर ६:१६) ख्रिस्ती धर्मजगत सर्वात प्रमुख व दोषास्पद असलेल्या जगातील खोट्या धर्मांच्या संमिश्रणात, त्यांनी आध्यात्मिक बंदिवास सहन केला. तरीसुद्धा, यहेज्केलला दिलेल्या यहोवाच्या शब्दांनी दाखवून दिले, की त्यांना त्यागण्यात आले नाही. तो म्हणाला: “मी तुम्हांस राष्ट्रांतून गोळा करून आणीन; ज्या ज्या देशात तुम्ही पांगला आहा त्यांतून मी तुम्हांस गोळा करून घेईन, आणि इस्राएल देश तुम्हांस देईन.” (यहेज्केल ११:१७) प्राचीन इस्राएलासाठी असलेले ते अभिवचन पूर्ण करण्याकरता यहोवाने पर्शियन राजा कोरेशला उभे केले ज्याने बॅबिलोनी जागतिक सत्तेला उलथून पाडले व इस्राएली शेषांस आपल्या मायदेशी परतण्यासाठी मार्ग खुला केला. आणि आज?

७. वर्ष १९१९ मध्ये अशी कोणती घटना घडली जिने येशूने मोठ्या बाबेलविरुद्ध कार्य केल्याचे दर्शवले? वर्णन करा.

७ या शतकाच्या आरंभाला, महान कोरेश कार्यमग्न असल्याचा ठोस पुरावा होता. तो कोण होता? दुसरे कोणी नव्हे तर, १९१४ पासून स्वर्गीय राज्याचा राजा झालेला येशू ख्रिस्त. या महान राजाने, वर्ष १९१९ मध्ये पृथ्वीवरील आपल्या अभिषिक्‍त बांधवांना, अर्थात अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना आध्यात्मिक बंदिवासातून मुक्‍त करण्याद्वारे व त्यांचे आध्यात्मिक वतन, अर्थात आपल्या ‘देशी’ पाठवण्याद्वारे त्यांच्याप्रती आपली सदिच्छा दाखवली. (यशया ६६:८; प्रकटीकरण १८:४) अशा प्रकारे, यहेज्केल ११:१७ ची आधुनिक दिवसात पूर्णता झाली. प्राचीन काळी बॅबिलोनचे पतन झाल्यावरच इस्राएली आपल्या देशी परतू शकत होते. आधुनिक काळात, देवाच्या इस्राएलची पुनर्स्थापना, महान कोरेशच्या हातून मोठ्या बाबेलचा पाडाव झाल्याचा पुरावा होता. या पाडावाबद्दल प्रकटीकरण अध्याय १४ मधील दुसऱ्‍या देवदूताने घोषित केले जेव्हा त्याने म्हटले: “पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.” (प्रकटीकरण १४:८) मोठ्या बाबेलसाठी, विशेषकरून ख्रिस्ती धर्मजगतासाठी ही केवढी प्रतिकूलता! पण, खऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता तो केवढा आशीर्वाद!

८. यहेज्केलचे पुस्तक, १९१९ मध्ये देवाच्या लोकांची सुटका झाल्यानंतर त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन कसे करते?

८ यहेज्केल ११:१८-२० मध्ये आपण देवाच्या लोकांच्या पुनर्वसनानंतर त्यांना झालेल्या आनंदाचे संदेष्ट्याने केलेले वर्णन वाचतो. त्याच्या शब्दांच्या पहिल्या पूर्णतेचा अर्थ, एज्रा आणि नहेम्याच्या दिवसांत इस्राएलचे शुद्धीकरण असा होतो. आधुनिक दिवसांतील पूर्णतेचा अर्थ असाच काहीसा होतो. आपण तो पाहू या. यहोवा म्हणतो: “ते [त्यांच्या देशी] येतील आणि येथल्या सर्व तिरस्करणीय व अमंगळ वस्तु येथून काढून टाकितील.” भाकीत केल्याप्रमाणे, १९१९ पासून यहोवाने आपल्या लोकांना शुद्ध केले व त्याची सेवा करण्यासाठी त्यांच्यात पुनः उत्साह घातला. यहोवाच्या दृष्टीत त्यांना भ्रष्ट करणाऱ्‍या सर्व बॅबिलोनी प्रथा व सिद्धान्तापासून ते आपला आध्यात्मिक परिसर स्वच्छ करू लागले.

९. यहोवाने, आपल्या लोकांना कोणते महत्त्वपूर्ण आशीर्वाद दिले ज्यांची सुरवात १९१९ पासून झाली?

९ मग १९ व्या वचनानुसार यहोवा पुढे म्हणतो: “मी त्यांस एकच हृदय देईन; तुमच्यात नवीन आत्मा घालीन; मी त्यांच्या देहातून पाषाणहृदय काढून टाकून त्यांस मांसमय हृदय देईन.” या शब्दांच्या सुसंगतेत, १९१९ मध्ये यहोवाने आपल्या अभिषिक्‍त सेवकांना संयुक्‍त केले, ते त्याची सेवा ‘खांद्याला खांदा लावून’ करतील म्हणून त्याने त्यांना, जणू काय “एकच हृदय” दिले. (सफन्या ३:९) पुढे यहोवाने, आपल्या लोकांना साक्षकार्यासाठी तसेच गलतीकर ५:२२, २३ मध्ये वर्णिलेली आत्म्याची फळे स्वतःमध्ये उत्पन्‍न करण्यासाठी जोम यावा म्हणून आपला पवित्र आत्मा त्यांना दिला. तसेच दुर्लक्ष करणाऱ्‍या, पाषाण हृदयाऐवजी, यहोवाने त्यांना मृदू, लवणारे, आज्ञाधारक अर्थात त्याच्या इच्छेला प्रतिसाद देणारे हृदय दिले.

१०. यहोवाने १९१९ पासून पुढे आपल्या पुनर्वसीत लोकांना आशीर्वाद का दिला?

१० त्याने असे का केले? यहोवा स्वतः त्याचे स्पष्टीकरण देतो. यहेज्केल ११:२० मध्ये आपण असे वाचतो: “म्हणजे ते माझ्या नियमांस अनुसरून चालतील; माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे वागतील; ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.” देवाचे इस्राएल आपल्याच कल्पना अनुसरण्यापेक्षा यहोवाचे नियम पाळण्यास शिकले. मनुष्याच्या भयाविना देवाची इच्छा पूर्ण करण्यास ते शिकले. अशा प्रकारे, ख्रिस्ती धर्मजगतातील नकली ख्रिश्‍चनांपासून ते वेगळे असे उठून दिसतात. ते यहोवाचे लोक होते. म्हणूनच, यहोवा त्यांना आपले संदेशवाहक, त्याचे ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास,’ या नात्याने त्यांचा उपयोग करण्यास तयार होता.—मत्तय २४:४५-४७.

देवाच्या संदेशवाहकांचा आनंद

११. यशयाचे पुस्तक यहोवाच्या लोकांच्या आनंदाचे वर्णन कसे करते?

११ त्यांचा दर्जा सुहक्कासमान आहे हे त्यांनी जाणले तेव्हा त्यांना झालेल्या आनंदाची तुम्ही कल्पना करू शकता का? सामुदायिकरीत्या, त्यांनी यशया ६१:१० मधील शब्द उच्चारले: “मी परमेश्‍वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो.” त्यांच्याबाबतीत यशया ३५:१० मधील अभिवचनाची पूर्णता झाली: “मुक्‍त केलेले परमेश्‍वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.” १९१९ मध्ये यहोवाच्या ईश्‍वरी शांतीच्या संदेशवाहकांनी सर्व मानवजातीला सुवार्तेचा प्रचार करण्याकरता सुरवात केली तेव्हा त्यांना वरीलप्रमाणे आनंद झाला. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी ही कामगिरी पार पाडण्याचे सोडून दिलेले नाही व त्यांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे. डोंगरावरील आपल्या प्रवचनात येशूने म्हटले: “शांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” (मत्तय ५:९) ‘देवाच्या अभिषिक्‍त पुत्रांच्या’ शेषाने १९१९ पासून आजपर्यंत या घोषणेच्या सत्यतेचा अनुभव घेतला आहे.

१२, १३. (अ) यहोवाची सेवा करण्यात देवाच्या इस्राएलला कोण सामील झाले व त्यांनी कोणते कार्य केले? (ब) यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांनी कोणत्या महान आनंदाचा उपभोग घेतला?

१२ वर्षे जसजशी पार होत गेली, देवाच्या इस्राएलची संख्या १९३० च्या दशकांपर्यंत वाढत गेली, कारण त्या वर्षी अभिषिक्‍त जनांच्या शेषांना एकत्र करण्याचे काम पूर्ण होत आले. मग, सुवार्तेचा प्रचार करणाऱ्‍यांची संख्या वाढण्याचे थांबले का? मुळीच नाही. पार्थिव आशा असलेल्या ख्रिश्‍चनांचा एक मोठा लोकसमुदाय आधीच त्यांच्यासोबत सहवास राखू लागला होता व आपल्या अभिषिक्‍त बांधवांसोबत प्रचार कार्यात सामील होऊ लागला होता. प्रेषित योहानाने या मोठ्या लोकसमुदायाला एका दृष्टान्तात पाहिले व त्यांचे जे वर्णन केले ते अगदी उल्लेखनीय आहे: ‘ते देवाच्या राजासनासमोर आहेत; ते अहोरात्र त्याची पवित्र सेवा करतात.’ (प्रकटीकरण ७:१५) होय, मोठा लोकसमुदाय देवाची सेवा करण्यात मग्न झाला. परिणामी, १९३५ पासून जेव्हा अभिषिक्‍तांच्या संख्येत घट होऊ लागली तेव्हा या विश्‍वासू सोबत्यांनी साक्षकार्य वाढत्या संवेगाने पुढे नेले.

१३ या प्रकारे, यशया ६०:३, ४ ची पूर्णता झाली: “राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. तू आपले डोळे वर करून चोहोकडे पाहा; ते सर्व एकत्र होत आहेत, तुजकडे येत आहेत; तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत.” या अभिवृद्धीमुळे देवाच्या इस्राएलला झालेल्या आनंदाचे छानसे वर्णन यशया ६०:५ मध्ये करण्यात आले आहे, तेथे आपण वाचतो: “हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुजकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ति तुजकडे येईल.”

यहोवाची संघटना आगेकूच करते

१४. (अ) यहेज्केलने स्वर्गीय गोष्टींचा कोणता दृष्टान्त पाहिला, व त्याला कोणती आज्ञा मिळाली? (ब) यहोवाच्या आधुनिक काळातील लोकांनी काय जाणले व त्यांचे कर्तव्य काय आहे असे त्यांना वाटले?

१४ सा.यु.पू. ६१३ मध्ये, यहेज्केलने एका दृष्टान्तात यहोवाची स्वर्गीय, रथासमान संघटना आगेकूच करत असल्याचे पाहिले. (यहेज्केल १:४-२८) त्यानंतर, यहोवा त्याला म्हणाला: “मानवपुत्रा, जा, इस्राएल घराण्याकडे जा आणि त्याजवळ माझी वचने बोल.” (यहेज्केल ३:४) १९९७ या वर्षातही यहोवाची स्वर्गीय संघटना देवाचे उद्देश पूर्ण करण्याकरता न थांबता आगेकूच करत असल्याचे आपल्याला समजते. म्हणूनच, इतरांना ते उद्देश सांगण्यास आपण अजूनही प्रवृत्त होतो. यहेज्केल त्याच्या काळी यहोवाकडून थेट प्रेरित होऊन बोलत होता. आज आपण यहोवाचे ईश्‍वरप्रेरित वचन, बायबलमधून बोलतो. मानवजातीसाठी किती उत्कृष्ट संदेश या पुस्तकात आहे! पुष्कळ लोकांना भवितव्याची चिंता लागलेली असताना, बायबल दाखवते, की परिस्थिती हाताबाहेर गेली आहे पण त्यासोबतच लोक कल्पना करतात त्यापेक्षा ती कितीतरी पटीने चांगली असल्याचेही ते दाखवते.

१५. आज लोक विचार करतात त्यापेक्षा परिस्थिती इतकी बिकट का आहे?

१५ परिस्थिती बिकट आहे कारण आपण मागील लेखात शिकलो त्याप्रमाणे, सा.यु.पू. ६०७ मध्ये जेरुसलेमचा जसा पूर्णपणे नाश करण्यात आला होता त्याचप्रमाणे ख्रिस्ती धर्मजगत आणि इतर सर्व धर्मांचा लवकरच नाश केला जाणार आहे. याशिवाय, जेरुसलेमच्या अनेक मूर्तीपूजक शेजाऱ्‍यांप्रमाणे, प्रकटीकरणाच्या पुस्तकात सात डोकी व दहा शिंगांचे जंगली श्‍वापद ज्याला चित्रित करते ते विश्‍वव्यापी राजनैतिक अस्तित्वच मिटवून टाकले जाईल. (प्रकटीकरण १३:१, २; १९:१९-२१) यहेज्केलच्या दिवसांमध्ये यहोवाने जेरुसलेमवर येणाऱ्‍या नाशामुळे वाटणाऱ्‍या भयाचे स्पष्ट वर्णन दिले. पण, या जगाच्या जवळ येऊन ठेपलेल्या नाशाची लोकांना जाणीव होते तेव्हा यहोवाच्या शब्दांचे त्यांना आणखी महत्त्व कळेल. यहोवाने यहेज्केलास म्हटले: “यास्तव हे मानवपुत्रा, कंबर मोडे असा उसासा टाक, त्यांजसमक्ष कष्टाने उसासा टाक आणि उसासा का टाकितोस असे तुला कोणी विचारतील तेव्हा त्यांस सांग की, ही वार्ता प्रत्ययास येत आहे म्हणून; तेव्हा सर्वांची मने खचतील, सर्वांचे हात निर्बल होतील, सर्वांचा उत्साह विरेल, सर्वांच्या गुडघ्यांचे पाणी होईल; पाहा, ती प्रत्ययास येत आहे, तीप्रमाणे खास घडेल, असे प्रभु परमेश्‍वर म्हणतो.” (यहेज्केल २१:६, ७; मत्तय २४:३०) भयप्रेरित घटना लवकरच घडणार आहेत. सहमानवांबद्दल आपल्याला जास्त चिंता असल्यामुळे आपण इशारा देण्यास, यहोवाच्या येणाऱ्‍या क्रोधाची “वार्ता” सांगण्यास प्रेरित होतो.

१६. नम्र लोकांकरता इतरांना वाटते त्यापेक्षा परिस्थिती चांगली का आहे?

१६ त्यासोबतच नम्र जनांची परिस्थिती बहुतेक लोक कल्पना करू शकतील त्याहूनही कितीतरी पटीने चांगली आहे. कोणत्या अर्थाने? ते या अर्थाने, की येशू ख्रिस्त आपल्या पापांकरता मरण पावला आणि आता देवाच्या राज्याचा राजा या नात्याने राज्य करीत आहे. (१ तीमथ्य १:१५; प्रकटीकरण ११:१५) या स्वर्गीय राज्याकरवी मानवजातीच्या अडेलतट्टू भासणाऱ्‍या समस्यांवर लवकरच मात केली जाईल. मृत्यू, आजारपण, भ्रष्टाचार, उपासमार आणि गुन्हेगारी इतिहासात जमा होतील व देवाचे राज्य एका परादीस पृथ्वीवर बिनविरोध राज्य करील. (प्रकटीकरण २१:३, ४) मानवजात ईश्‍वरी शांतीचा उपभोग घेईल—यहोवा देवासोबत आणि एकमेकांसोबत शांतीपूर्ण नातेसंबंध.—स्तोत्र ७२:७.

१७. कोणत्या वृद्धीमुळे ईश्‍वरी शांतीच्या संदेशवाहकांची अंतःकरणे आनंदित होतात?

१७ जगाच्या काही भागांमध्ये, नम्र जनांचा विलक्षण मोठा समूह ईश्‍वरी शांतीच्या या संदेशाला प्रतिसाद देत आहे. त्यातील काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत. गेल्या वर्षी युक्रेनने प्रचारकांमध्ये १७ टक्के वाढीचा अहवाल दिला. मोझांबिकने १७ टक्के आणि लिथुआनियाने २९ टक्के वाढीचा अहवाल दिला. रशियात ३१ टक्क्यांनी वाढ झाली, तर अल्बेनियात प्रचारकांमध्ये ५२ टक्क्यांनी वाढ झाली. ही वृद्धी हजारो प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना सूचित करते ज्यांना ईश्‍वरी शांती उपभोगण्याची इच्छा आहे व ज्यांनी धार्मिकतेसाठी पवित्रा घेतला आहे. अशाप्रकारच्या जलद वृद्धीमुळे संपूर्ण ख्रिस्ती बंधूसमाज आनंदी होतो.

१८. लोक ऐकोत अगर न ऐकोत आपली मनोवृत्ती काय असेल?

१८ तुम्ही जेथे राहता तेथील लोक तुम्हाला अनुकूल प्रतिसाद देतात का? असल्यास, आम्हाला त्याबद्दल आनंद वाटतो. परंतु, काही क्षेत्रांमध्ये, कोणी आस्थेवाईक भेटूपर्यंत कित्येक तास कठीण परिश्रम करावे लागतात. अशा क्षेत्रांमध्ये कार्य करणारे आळस करतात किंवा निराश होतात का? नाही. देवाने तरुण संदेष्टा यहेज्केलला आपल्या यहुदी सहदेशवासींना प्रचार करण्याची कामगिरी सोपवून त्याला जे म्हटले त्याची यहोवाचे साक्षीदार आठवण करतात: “ते तुझे ऐकोत न ऐकोत, निदान त्याजकडे कोणी तरी संदेष्टा गेला होता हे त्यांस समजेल; ती तर बोलूनचालून फितुरी जात आहे.” (यहेज्केल २:५) लोक ऐकोत अगर न ऐकोत, ईश्‍वरी शांतीविषयी यहेज्केलप्रमाणे आपणही सांगत राहतो. त्यांनी ऐकले तर आपण हर्षित होतो. त्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली, आपली थट्टा केली, आपला छळ केला तरीसुद्धा आपण टिकून राहतो. आपण यहोवावर प्रीती करतो आणि बायबल म्हणते: “प्रीति . . . सर्व काही सहन करिते.” (१ करिंथकर १३:४, ७) आपण सहनशीलतेने प्रचार करत असल्यामुळे, कोण यहोवाचे साक्षीदार आहेत हे लोकांना माहीत आहे. त्यांना आपला संदेश ठाऊक आहे. अंत येईल तेव्हा त्यांना याची जाणीव होईल, की यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांना ईश्‍वरी शांतीचा उपभोग घेण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला होता.

१९. खऱ्‍या देवाचे सेवक या नात्याने आपण कोणता सुहक्क जपून ठेवतो?

१९ यहोवाची सेवा करण्यापेक्षा दुसरा कोणता वरचढ सुहक्क आहे का? मुळीच नाही! देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधामुळे आणि आपण त्याची इच्छा पूर्ण करत आहोत या जाणीवेमुळे आपल्याला सर्वाधिक आनंद मिळतो. “ज्या लोकांस उत्साहशब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे परमेश्‍वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात.” (स्तोत्र ८९:१५) मानवजातीकरता देवाचे शांतीचे संदेशवाहक होण्याचा आनंद आपण नेहमी जपून ठेवू या. यहोवाने, आता पुरे, असे म्हणेपर्यंत आपण या कार्यात परिश्रमपूर्वक भाग घेऊ या.

तुम्हाला आठवते का?

◻ आज देवाचे शांतीचे संदेशवाहक कोण आहेत?

◻ मोठ्या बाबेलचा १९१९ मध्ये पाडाव झाला हे आपल्याला कसे माहीत होते?

◻ ‘मोठ्या लोकसमुदायाची’ मुख्य चिंता काय आहे?

◻ आज अनेक लोक विचार करतात त्यापेक्षा भवितव्य अधिक आशाहीन का आहे?

◻ सरळ अंतःकरणाच्या लोकांचे भवितव्य त्यांना वाटते त्यापेक्षा उज्ज्वल का असू शकते?

[२१ पानांवरील चित्र]

मानवी समाजाचा ऱ्‍हास होत असल्याचे पाहताना अनेकांना भवितव्यात काहीतरी भयानक होणार आहे असे वाटते

[२३ पानांवरील चित्रं]

ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक आज पृथ्वीवरील सर्वात आनंदी लोक आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा