वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ५/१ पृ. ८-१२
  • योग्य संदेशवाहक ओळखणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • योग्य संदेशवाहक ओळखणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा खोट्या संदेष्ट्यांचे बिंग बाहेर काढतो
  • बॅबिलोन आणि जेरुसलेमविषयीचे धडकी भरविणारे संदेश
  • देव आपल्या संदेशवाहकांचे शब्द पूर्ण करतो
  • सीयोनेकरता संदेशवाहकांकडे असलेली सुवार्ता!
  • शांतीच्या संदेशवाहकांना आनंदी घोषित केले जाते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • देवाचे लोक बॅबिलोन सोडतात
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • सामर्थ्यशाली बाबेल—तिसरी बलाढ्य जागतिक सत्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ५/१ पृ. ८-१२

योग्य संदेशवाहक ओळखणे

“मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे.”—यशया ४४:२५, २६.

१. यहोवा खऱ्‍या संदेशवाहकांची ओळख कशी करून देतो व खोट्यांचे बिंग कसे बाहेर काढतो?

यहोवा देव, आपल्या खऱ्‍या संदेशवाहकांची ओळख पटवून देण्यात महान आहे. त्यांना सांगितलेले संदेश खरे करण्याद्वारे तो त्यांची ओळख पटवून देतो. तसेच, खोट्या संदेशांचे बिंग बाहेर काढण्यातही यहोवा महान आहे. तो त्यांचे बिंग कसे बाहेर काढतो? तो त्यांची चिन्हे व भाकिते निष्फळ ठरवतो. याद्वारे तो दाखवून देतो, की ते आपल्याच मनानुसार भविष्य सांगणारे बनले आहेत, वास्तविकतेत त्यांचे संदेश आपल्याच खोट्या तर्कातून—होय, त्यांच्या मूर्ख, ऐहिक विचारसरणीतून येतात!

२. इस्राएल लोकांच्या काळी संदेशवाहकांमध्ये कोणता वाद निर्माण झाला?

२ यशया आणि यहेज्केल या दोघांनी आपण यहोवा देवाचे संदेशवाहक आहोत असा दावा केला. ते खरोखरच होते का? चला पाहू या. सुमारे सा.यु.पू. ७७८ पासून ते सा.यु.पू. ७३२ नंतर काही काळापर्यंत यशयाने जेरुसलेममध्ये भविष्यवाणी केली. सा.यु.पू. ६१७ मध्ये यहेज्केल बॅबिलोनमध्ये बंदिवासात होता. तेथे राहून त्याने आपल्या यहुदी बांधवांना भविष्यवाणी केली. जेरुसलेमचा नाश होणार आहे असे दोन्ही संदेष्ट्यांनी अगदी निर्भीडपणे घोषित केले. देव असे होऊ देणार नाही असे इतर संदेष्ट्यांचे म्हणणे होते. पण, खरे संदेशवाहक कोण शाबीत झाले?

यहोवा खोट्या संदेष्ट्यांचे बिंग बाहेर काढतो

३, ४. (अ) बॅबिलोनमध्ये इस्राएली लोकांना कोणते दोन विरोधात्मक संदेश देण्यात आले होते व यहोवाने एका खोट्या संदेशवाहकाचे बिंग कसे बाहेर काढले? (ब) खोट्या संदेष्ट्यांचे काय होईल असे यहोवाने म्हटले?

३ बॅबिलोनमध्ये असताना यहेज्केलला जेरुसलेमच्या मंदिरात काय चालले होते त्याचा दृष्टान्त देण्यात आला होता. पूर्वाभिमुख पूर्ववेशीवर २५ इसम होते. त्यांपैकी याजन्या व पलट्या नामक दोन राजपुत्र होते. या दोघांकडे यहोवाचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? यहेज्केल ११:२, ३ उत्तरते: ‘मानवपुत्रा, अधर्माची योजना करणारे व या नगरात अनिष्ट संकल्प करणारे पुरुष ते हेच. ते म्हणतात, घरे बांधण्याची वेळ जवळ आली नाही का?’ हे उद्धट शांतीचे संदेशवाहक म्हणत होते की, ‘जेरुसलेमला काही धोका नाही. उलट, आम्ही लवकरच तिथे आणखी घरे बांधणार आहोत!’ यास्तव, देवाने यहेज्केलला या लबाड संदेष्ट्यांविरुद्ध विपरीत भविष्यवाणी करण्यास सांगितले. त्यांपैकी एकाचे काय झाले त्याबद्दल यहेज्केल आपल्याला ११ व्या अध्यायाच्या १३ व्या वचनात सांगतो: “मी हा संदेश देत असता असे झाले की पलट्या बिन बनाया मेला.” पलट्या, सर्वात प्रमुख व प्रभावकारी राजपुत्र आणि मूर्तीपूजेत पुढाकार घेणारा होता म्हणून कदाचित असे घडले असावे. त्याच्या अचानक मृत्यूमुळे तो खोटा संदेष्टा असल्याचे शाबीत झाले!

४ यहोवाने पलट्याचा वध केलेला पाहूनही इतर खोट्या संदेष्ट्यांनी देवाच्या नावाने लबाडी करण्याचे सोडले नाही. या फसवेगिरी करणाऱ्‍यांनी देवाच्या इच्छेविरुद्ध भाकीत करत राहण्याचे त्यांचे मूर्ख मार्गाक्रमण चालूच ठेवले. यास्तव, यहोवा देवाने यहेज्केलास सांगितले: “जे मूर्ख संदेष्टे दृष्टांत पाहिल्यावाचून आपल्याच मनातील संदेश देतात ते हायहाय करोत!” ते “शांति नसता शांति आहे असा” उर्मटपणे जेरुसलेमला दृष्टान्त सांगत राहिल्यामुळे पलट्याप्रमाणे त्यांचाही ‘नाश’ होणार होता.—यहेज्केल १३:३, १५, १६.

५, ६. सर्व खोटे संदेशवाहक असतानाही यशयाचे खरा संदेष्टा म्हणून समर्थन कसे करण्यात आले?

५ यशयाच्या बाबतीत पाहता, जेरुसलेमविषयीचे त्याचे सर्व ईश्‍वरप्रेरित संदेश सत्य ठरले. सा.यु.पू. ६०७ च्या उन्हाळ्यात, बॅबिलोन्यांनी शहराचा नाश केला व उरलेल्या यहुद्यांना दास करून बॅबिलोनला नेले. (२ इतिहास ३६:१५-२१; यहेज्केल २२:२८; दानीएल ९:२) निदान या संकटांमुळे तरी, देवाच्या लोकांवर निरर्थक बडबडीचा भडिमार करण्याचे या खोट्या संदेष्ट्यांनी थांबवले का? नाही, ते लबाड संदेशवाहक निरर्थक बडबडीचा भडिमार करतच राहिले!

६ याशिवाय, इस्राएली बंदिवान, बॅबिलोनचे घमेंडी भविष्य सांगणारे, शकुन सांगणारे व फलज्योतिष यांच्याबरोबर राहत होते. परंतु, यहोवाने या सर्व खोट्या संदेशवाहकांना निष्फळ मूर्ख ठरवले, घडणाऱ्‍या गोष्टींच्या उलट भविष्य कथन करणारे ठरवले. कालांतराने, त्याने दाखवून दिले, की यशयाप्रमाणेच यहेज्केल त्याचा खरा संदेशवाहक होता. अभिवचन दिल्याप्रमाणे, त्यांच्याद्वारे भाकीत केलेली आपली सर्व वचने यहोवाने पूर्ण केली: “खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांस वेडे ठरविणारा, ज्ञान्यांस मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरविणारा मी आहे. मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे.”—यशया ४४:२५, २६.

बॅबिलोन आणि जेरुसलेमविषयीचे धडकी भरविणारे संदेश

७, ८. बॅबिलोनसाठी यशयाकडे कोणता ईश्‍वरप्रेरित संदेश होता व त्याच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

७ यहुदा आणि जेरुसलेम ७० वर्षांपर्यंत निर्जन राहणार होते. परंतु, यहोवाने यशया आणि यहेज्केल यांच्याद्वारा घोषित केले की त्या शहराचे पुनर्वसन होईल व त्याने भाकीत केलेल्या उचित समयी ते पुन्हा वसेल! हे एक आश्‍चर्यजनक भाकीत होते. का बरे? कारण बॅबिलोन आपल्या कैद्यांना केव्हाही मुक्‍त न करणारे म्हणून नावाजलेले होते. (यशया १४:४, १५-१७) तेव्हा, या कैद्यांना मुक्‍त करणे कोणास शक्य होते? भव्य भिंती आणि नदीचे संरक्षण असलेल्या शक्‍तिशाली बॅबिलोनला कोण उलथून पाडू शकत होते? सर्वसमर्थ यहोवा! तो काय करणार याबद्दल तो म्हणतो: “मी खोल पाण्याच्या डोहास [अर्थात, शहराचे संरक्षण करणारी नदी] म्हणतो, ‘कोरडा हो, मी तुझ्या सर्व नद्या आटवीन;’ मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, मला आनंदविणारे माझे सर्व मनोरथ तो सिद्धीस नेईल.’ मी यरुशलेमेविषयी म्हणतो, ‘ती बांधण्यात येईल,’ आणि मंदिराविषयी म्हणतो ‘तुझा पाया घालण्यात येईल.’”—यशया ४४:२५, २७, २८, NW.

८ विचार करा! मानवांसाठी अजिंक्य अडथळा असलेली एफ्रात नदी, यहोवासमोर लालभडक तप्त पृष्ठभागावरील पाण्याच्या एका थेंबाप्रमाणे होती. एका क्षणात तो अडथळा, अर्थात ती नदी कोरडी पडेल! बॅबिलोनचे पतन होईल. पर्शियन राजा कोरेश याचा जन्म होण्याच्या १५० वर्षांपूर्वीच यहोवाने यशयास हे भाकीत करण्यास प्रेरित केले, की हा राजा बॅबिलोनवर कब्जा करील व जेरुसलेमची व मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी यहुदी कैद्यांना मुक्‍त करण्याची आज्ञा देईल.

९. बॅबिलोनवर न्यायदंड बजावणाऱ्‍या आपल्या प्रतिनिधीचे नाव यहोवाने काय सांगितले?

९ ती भविष्यवाणी आपल्याला यशया ४५:१-३ मध्ये वाचावयास मिळते: “परमेश्‍वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्‍त आहे; त्याच्यापुढे राष्ट्रे पादाक्रांत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरिला आहे; . . . त्याच्यापुढे दरवाजे उघडतील, वेशी बंद राहणार नाहीत, असे मी करितो. परमेश्‍वर त्याला म्हणतो, मी तुझ्यापुढे चालेन व उंचसखल असलेले सपाट करीन; मी पितळी दरवाजे फोडून त्यांचे तुकडे करीन, लोखंडाचे अडसर मोडून टाकीन. तुला अंधारातील निधि व गुप्त स्थळी लपविलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्‍वर [यहोवा, NW] देव आहे.”

१०. कोरेश कशाप्रकारे “अभिषिक्‍त” होता व त्याच्या जन्माच्या शंभरपेक्षा अधिक वर्षांआधी यहोवा त्याच्याशी कसा बोलू शकला?

१० कोरेश जणू आधीच जिवंत असल्याप्रमाणे यहोवा त्याच्याविषयी बोलतो याकडे लक्ष द्या. हे, “जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करितो,” या पौलाच्या विधानाच्या सुसंगतेत आहे. (रोमकर ४:१७) तसेच, कोरेश “माझा अभिषिक्‍त आहे,” अशी देखील यहोवा त्याची ओळख करून देतो. त्याने असे का म्हटले बरे? कारण, यहोवाच्या महायाजकाने केव्हाही कोरेशच्या माथ्यावर तेल ओतून त्याचा अभिषेक केला नव्हता. होय, पण हा भविष्यसूचक अभिषेक आहे. तो एका खास जबाबदारीच्या पदाधिष्ठानाला सूचित करतो. म्हणूनच देव कोरेशाच्या पूर्व नियुक्‍तीविषयी अभिषिक्‍त करणे असे म्हणू शकला.—पडताळा १ राजे १९:१५-१७; २ राजे ८:१३.

देव आपल्या संदेशवाहकांचे शब्द पूर्ण करतो

११. बॅबिलोनच्या रहिवाशांना सुरक्षित का वाटत होते?

११ कोरेश बॅबिलोनविरुद्ध चढाई करण्यास आला तेव्हा बॅबिलोनच्या नागरिकांना खूपच सुखरूप व सुरक्षित वाटत होते. त्यांच्या शहराभोवती, एफ्रात नदीमुळे तयार झालेले खोल व रुंद संरक्षक खंदक होते. नदी शहरातून जेथे वाहत होती तेथे तिच्या पूर्व किनाऱ्‍यावर अखंड धक्का होता. शहर आणि धक्का यांच्यामध्ये नबुखद्‌नेस्सरने त्याच्या म्हणण्याप्रमाणे “एक प्रचंड भिंत बांधली, डोंगराला जसे हलवता येणार नाही तसे तिलाही हलवता येणार नाही. . . . डोंगराच्या शिखराइतकी तिची उंची होती.”a या भिंतीला तांब्याचे भले मोठे दरवाजे होते. आत प्रवेश करण्याकरता एखाद्याला नदीच्या काठावरील उतार चढावा लागत असे. म्हणूनच, कदाचित बॅबिलोनच्या कैद्यांनी मुक्‍त होण्याची कधीच आशा केली नाही!

१२, १३. बॅबिलोन कोरेशच्या हाती पडले तेव्हा आपला संदेशवाहक यशयाद्वारे यहोवाचे शब्द कसे खरे ठरले?

१२ परंतु, यहोवावर भरवसा असलेल्या यहुदी कैद्यांना तसे वाटले नाही. त्यांना एक उज्ज्वल आशा होती. देवाने आपल्या संदेष्ट्यांद्वारा त्यांना मुक्‍त करण्याचे वचन दिले होते. देवाने आपले हे वचन कसे तडीस नेले? कोरेशने आपल्या सैन्याला एफ्रात नदीला बॅबिलोनच्या उत्तरेकडे अनेक किलोमीटर दूरपर्यंत वळवण्याचा हुकूम दिला. अशाप्रकारे, शहराचे मुख्य संरक्षण कोरड्या नदीप्रमाणे बनले. कायापालट करणाऱ्‍या त्या रात्री, मद्यपानात मस्त झालेल्या बॅबिलोनमधील लोकांनी निष्काळजीपणे एफ्रात नदीसमोरील दोन्ही दरवाजे सताड उघडी ठेवली. यहोवाने अक्षरशः ते तांब्याचे दरवाजे तोडले नाहीत; किंवा त्यांचे लोखंडाचे अडसर मोडून टाकले नाहीत पण कोणत्याही अडथळ्याविना त्यांना उघडे ठेवण्याच्या त्याच्या आश्‍चर्यकारक युक्‍तीचा असाच परिणाम झाला. बॅबिलोनच्या भिंतींचा काहीच उपयोग झाला नाही. कोरेशच्या सैन्याला आत शिरण्याकरता भिंतीवरून चढून जावे लागले नाही. यहोवा कोरेशपुढे गेला, “उंचसखल असलेले सपाट” केले, अर्थात, सर्व अडथळे त्याने दूर केले. यशया देवाचा खरा संदेशवाहक शाबीत झाला.

१३ कोरेशने संपूर्ण शहराला आपल्या ताब्यात घेतले तेव्हा सर्व खजिना, अंधाऱ्‍या, गुप्त खोल्यांमध्ये दडवून ठेवलेला खजिना देखील त्याच्या हाती लागला. यहोवा देवाने कोरेशसाठी हे सर्व का केले? जेणेकरून त्याला हे समजेल की, ‘त्याला त्याच्या नावाने हाक मारणारा’ यहोवा, खऱ्‍या भविष्यवाणीचा देव आणि विश्‍वाचा सार्वभौम प्रभू आहे. कोरेशला हे समजून येईल, की देवाने आपल्या इस्राएल लोकांना मुक्‍त करण्याकरता त्याला सत्तेवर आणण्याची व्यवस्था केली होती.

१४, १५. कोरेशने बॅबिलोनवर विजय मिळवल्याबद्दलचे श्रेय यहोवास दिले हे आपल्याला कसे कळते?

१४ कोरेशला उद्देशून यहोवा काय म्हणतो ते ऐका: “माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्राएल याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली; तू मला ओळखीत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्‍वर, अन्य कोणी नव्हे, मजवेगळा देव नाही; तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले, येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मजवेगळा कोणी नाही; मीच परमेश्‍वर, अन्य कोणी नव्हे. प्रकाशकर्ता, अंधाराचा उत्पन्‍नकर्ता, शांतीचा जनक [कैदेत असलेल्या त्याच्या लोकांसाठी] व अरिष्टांचा उत्पादक [बॅबिलोनसाठी] मीच आहे; हे सर्व करणारा मी परमेश्‍वर [यहोवा, NW] आहे.”—यशया ४५:४-७.

१५ कोरेशने बॅबिलोनवर मिळवलेल्या विजयाचे श्रेय त्याने यहोवाला दिले; कारण त्या दुष्ट शहराविरुद्ध आपले मनोरथ पूर्ण करण्याकरता व बंदिवासात असलेल्या आपल्या लोकांना सोडवण्याकरता यहोवानेच त्याला बळ दिले होते. असे करताना, देवाने स्वर्गातून धार्मिक प्रभाव किंवा शक्‍तीची वृष्टी होण्यास आज्ञा दिली. त्याने पृथ्वीला उकलण्यास व धार्मिक घटना तसेच बंदिस्त असलेल्या आपल्या लोकांचे तारण उत्पन्‍न करण्यास सांगितले. आणि त्याच्या लाक्षणिक स्वर्गांनी व पृथ्वीने त्याची ही आज्ञा मानली. (यशया ४५:८) यशयाचा मृत्यू होऊन शंभरपेक्षा अधिक वर्षे उलटल्यावर तो यहोवाचा खरा संदेशवाहक असल्याचे दाखवण्यात आले.

सीयोनेकरता संदेशवाहकांकडे असलेली सुवार्ता!

१६. बॅबिलोनचा पराजय झाला तेव्हा उजाड पडलेल्या जेरुसलेम शहरात कोणती सुवार्ता घोषित करता आली?

१६ पण इतकेच नाही. यशया ५२:७ जेरुसलेमकरता असलेल्या सुवार्तेबद्दल सांगते: “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.” पर्वतांवरून जेरुसलेमच्या दिशेने एखाद्या संदेशवाहकाला येताना पाहणे किती आनंदविणारे होते त्याची कल्पना करा! त्याच्याकडे सुवार्ता असावी. कोणती सुवार्ता? सियोनेला उद्दीपित करणारी वार्ता. ती शांतीची वार्ता, होय, देवाच्या सदिच्छेची वार्ता. जेरुसलेम आणि तिच्या मंदिराचे पुन्हा बांधकाम करायचे होते! संदेशवाहक विजयी उत्साहाने घोषित करतो: “तुझा देव राज्य करीत आहे!”

१७, १८. कोरेशने बॅबिलोनचा पराजय केल्यामुळे यहोवाच्या नावावर कोणता परिणाम झाला?

१७ यहोवाने जेव्हा, दावीदाच्या राजवंशावळीतील राजे ज्या नमुनेदार सिंहासनावर बसत त्या सिंहासनाला उलथून पाडण्यास बॅबिलोन्यांना परवानगी दिली तेव्हा, लोकांना असे वाटले असावे, की आता यहोवा राजा नव्हता. उलट, बॅबिलोनचे मुख्य दैवत, मार्डुक राजा आहे असे भासले असावे. परंतु, सीयोनेच्या देवाने बॅबिलोनचा पराभव केला तेव्हा त्याने विश्‍वासाचे आपले सार्वभौमत्व प्रदर्शित केले—की तोच सर्वात महान राजा होता. शिवाय, या वस्तुस्थितीवर जोर देण्याकरता “थोर राजाची नगरी” जेरुसलेम तसेच तिच्यातील मंदिर पुनर्स्थापित होणे आवश्‍यक होते. (मत्तय ५:३५) ही सुवार्ता आणणाऱ्‍या संदेशवाहकाचे पाय धुळीने माखलेले, घाणेरडे व जखमी होते तरीसुद्धा, सीयोन आणि तिच्या देवाच्या चाहत्यांच्या नजरेत ते किती मनोरम दिसत होते!

१८ भविष्यसूचक अर्थाने, बॅबिलोनचा पाडाव म्हणजे, देवाच्या राज्याची स्थापना झाली होती व सुवार्ता आणणारा या वस्तुस्थितीची घोषणा करणारा होता. पुढे, यशयाद्वारे भाकीत केलेल्या या प्राचीन निरोप्याने अप्रतिम सुवार्तेच्या संदेशवाहकाला पूर्वसूचित केले—अत्युत्कृष्ट आशय, राज्याचा विषय आणि विश्‍वास बाळगणाऱ्‍या सर्व लोकांसाठी आश्‍चर्यकारक ध्वनितार्थामुळे ती अप्रतिम सुवार्ता आहे.

१९. यहोवाने इस्राएल देशासाठी यहेज्केलद्वारा कोणता संदेश दिला?

१९ यहेज्केलला देखील पुनर्स्थापनेच्या उल्लेखनीय भविष्यवाण्या देण्यात आल्या होत्या. त्याने याप्रमाणे भाकीत केले: “प्रभु परमेश्‍वर म्हणतो, . . . नगरे वसतील व पडीत जागा बांधण्यात येतील असे मी करीन. तेव्हा लोक म्हणतील, ही भूमि वैराण झाली होती ती आता एदेन बागेसारखी झाली आहे.”—यहेज्केल ३६:३३, ३५.

२०. यशयाने जेरुसलेमला भविष्यसूचकपणे कोणते आनंदी प्रोत्साहन दिले?

२० बॅबिलोनच्या दास्यत्वात असताना, देवाचे लोक सीयोनेबद्दल शोक करीत होते. (स्तोत्र १३७:१) आता ते आनंद करू शकत होते. यशयाने प्रोत्साहन दिले: “यरुशलेमाच्या उध्वस्त झालेल्या स्थलांनो, आनंदघोष करा, सर्व मिळून गा; कारण परमेश्‍वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, त्याने यरुशलेमास उद्धरिले आहे. परमेश्‍वराने सर्व राष्ट्रांपुढे आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारिली आहे; सगळ्या दिगंतास आमच्या देवाने केलेले तारण दिसून येत आहे.”—यशया ५२:९, १०.

२१. बॅबिलोनचे पतन झाल्यावर यशया ५२:९, १० च्या शब्दांची पूर्णता कशी झाली?

२१ होय, यहोवाच्या निवडलेल्या लोकांकडे आनंद करण्यासाठी बरीच कारणे होती. एके काळी ओसाड पडलेल्या भूमीवर ते पुन्हा वसाहत करणार होते, तिला एदेन बागेसारखी फुलविणार होते. यहोवाने त्यांच्याकरता “आपल्या पवित्र हाताची अस्तनी मागे सारिली” होती. त्यांच्या आवडत्या मायदेशी पुन्हा आणण्यासाठी त्याने जणू काय आपल्या बाह्‍या वर केल्या होत्या. ही इतिहासातील एखादी गौण, क्षुल्लक घटना नव्हती. होय, तेव्हा जिवंत असलेल्या सर्वांनी, एका राष्ट्राचे अद्‌भुत तारण करण्याकरता मानवी कारभारांमध्ये हस्तक्षेप करणाऱ्‍या देवाच्या ‘हाताची अस्तनी’ पाहिली. यशया आणि यहेज्केल हे दोघेही यहोवाचे खरे संदेशवाहक होते हा अदूषणीय पुरावा त्यांना देण्यात आला होता. सीयोनेचा देवच केवळ सर्व पृथ्वीतलावर जिवंत व खरा देव होता यावर कोणीच शंका करण्याचे धाडस करू शकत नव्हते. यशया ३५:२ मध्ये आपण वाचतो: “ती परमेश्‍वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्‍वर्य, पाहतील.” यहोवाच्या देवपणाचा हा पुरावा स्वीकारणारेच त्याच्या उपासनेकडे वळाले.

२२. (अ) आज आपण कोणत्या कारणासाठी आभारी असू शकतो? (ब) यहोवा खोट्या संदेशवाहकांचे बिंग बाहेर काढतो म्हणून आपण त्याचे विशेष आभार का मानले पाहिजे?

२२ यहोवा आपल्या खऱ्‍या संदेशवाहकांची ओळख करून देतो याबद्दल आपण किती आभारी असावयास हवे! खरेच, तो “आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा, आपल्या दूतांची संदेशवचने सिद्धीस नेणारा आहे.” (यशया ४४:२६) पुनर्स्थापनेविषयी यशया आणि यहेज्केल यांना त्याने दिलेल्या भविष्यवाण्या, आपल्या सेवकांप्रती त्याची प्रीती, अपात्री कृपा आणि दया यांची थोरवी गातात. निश्‍चितच, या सर्व कारणांमुळे यहोवा आपल्या स्तुतीस पात्र आहे! शिवाय, आज तो खोट्या संदेशवाहकांचे बिंग बाहेर काढत असल्यामुळे आपण त्याचे विशेष आभार मानले पाहिजे. कारण, आज जगाच्या पाठीवर असे अनेक खोटे संदेशवाहक आहेत. त्यांचे अवडंबरी संदेश यहोवाच्या घोषित उद्देशाकडे दुर्लक्ष करतात. पुढील लेख त्या खोट्या संदेशवाहकांची ओळख करण्यास आपली मदत करील.

[तळटीपा]

a आयरा मॉरिस प्राईस, १९२५ यांचे स्मारके आणि जुना करार (इंग्रजी).

तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकाल का?

◻ यहोवा आपल्या खऱ्‍या संदेशवाहकांची ओळख कशी करून देतो?

◻ बॅबिलोनचा पराजय करणाऱ्‍या आपल्या प्रतिनिधीचे नाव यहोवाने यशयाद्वारे काय सांगितले?

◻ बॅबिलोनच्या पराजयाचे वर्णन करणाऱ्‍या यशयाच्या भविष्यवाण्या कशारीतीने पूर्ण झाल्या?

◻ बॅबिलोनचा पराजय झाल्यामुळे यहोवाच्या नावावर कोणता चांगला परिणाम घडला?

[९ पानांवरील चित्र]

यहेज्केलच्या दिवसांतील राष्ट्रांना बॅबिलोन अजिंक्य वाटत होते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा