आध्यात्मिकरीत्या तुम्ही योग्य प्रकारे सेवन करता का?
“योग्य आहार ही मानवाची जीवनावश्यक गरज आहे. . . . पुरेशा अन्नाविना आपल्यावर मृत्यू ओढावला असता.”—अन्न आणि पौष्टिकता (इंग्रजी).
वरील मूलभूत सत्य पुरुष, स्त्रिया आणि मुलांच्या शरीरांमध्ये जीवंतपणे दिसून येते ज्यांनी “मानवाच्या मूलभूत गरजे”कडे दुर्लक्ष केले आहे. काही जण ही गरज काही प्रमाणात भागवतात देखील तरी सुद्धा ते अत्यंत कुपोषित आहेत. तथापि, ज्यांना चांगल्या प्रकारे खाता येणे शक्य आहे असे अनेक जण निकस आहार सेवन करून तृप्त होतात त्यामुळे त्यांना फार कमी प्रमाणात पौष्टिकता मिळते. स्वास्थ्यकर अन्न (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “आपली सर्वात दुर्लक्षित गोष्ट म्हणजे अन्न होय.”
देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये आढळणाऱ्या—आध्यात्मिक अन्नाच्या बाबतीत देखील असेच आहे. काही लोक तर अगदी मूलभूत आध्यात्मिक पौष्टिकतेपासून देखील वंचित आहेत; त्यांची आध्यात्मिकरीत्या उपासमार होत आहे. इतर जण, उपलब्ध असलेल्या आध्यात्मिक अन्नाचा फायदा घेण्याकडे निव्वळ कानाडोळा करतात. तुमच्याबद्दल काय? तुम्ही व्यक्तीशः आध्यात्मिकरीत्या चांगल्या प्रकारे सेवन करता का? किंवा तुम्ही आध्यात्मिक पौष्टिकतेपासून स्वतःला वंचित ठेवत आहात का? या बाबतीत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे कारण शारीरिक अन्नापेक्षा आपल्याला आध्यात्मिक अन्नाची अधिक आवश्यकता आहे.—मत्तय ४:४.
आध्यात्मिक वाढीसाठी अन्न
अन्न आणि पौष्टिकता हे पाठ्यपुस्तक योग्य आहाराच्या महत्त्वाविषयी चर्चा करते आणि चांगल्या प्रकारचा आहार घेण्याची तीन कारणे आपल्याला देते. पहिले कारण म्हणजे, अन्नामुळे “वाढ होते आणि शरीरातील खर्च होणाऱ्या पेशी भरून काढण्यासाठी मदत होते.” तुम्हाला हे माहीत होते का, की आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी तुमच्या शरीराच्या एक हजार अब्ज पेशी खर्च होतात आणि त्यांची भरपाई होण्याची आवश्यकता असते? योग्य वाढ आणि शरीराची योग्य स्थिती यांसाठी चांगल्या अन्नाची आवश्यकता असते.
आध्यात्मिकतेच्या बाबतीत देखील हे खरे आहे. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने इफिसमधील मंडळीला लिहिले तेव्हा त्याने यावर जोर दिला, की कशा प्रकारे प्रत्येक ख्रिश्चनाला “प्रौढ मनुष्यपणाप्रत” जाण्यासाठी चांगल्या आध्यात्मिक अन्नाची आवश्यकता असते. (इफिसकर ४:११-१३) जेव्हा आपण पौष्टिक आध्यात्मिक अन्न योग्य प्रकारे सेवन करतो तेव्हा स्वतःची निगा घेण्यास असमर्थ असणाऱ्या, सर्व प्रकारच्या धोक्यांना सहज बळी पडणाऱ्या कमजोर बाळांसारखे आपण राहत नाही. (इफिसकर ४:१४) उलटपक्षी, आपले रूपांतर सुदृढ प्रौढांमध्ये होते, विश्वासासाठी कडा संघर्ष करणे आपल्याला शक्य होते कारण आपण ‘विश्वासाच्या वचनांनी पोषित’ होत असतो.—१ तीमथ्य ४:६.
हे तुमच्या बाबतीत खरे आहे का? तुमची आध्यात्मिकरीत्या वाढ झाली आहे का? किंवा तुम्ही अद्यापही भेद्य, पूर्णपणे इतरांवर अवलंबून आणि सर्व ख्रिस्ती जबाबदाऱ्या पेलवण्यास असमर्थ—आध्यात्मिक बाळ आहात का? हे समजण्याजोगे आहे, की आपल्यांतील काही जण कोणताही विचार न करता म्हणतील, की ते आध्यात्मिकरीत्या बाळासारखे आहेत, परंतु प्रांजळपणे स्वतःचे आत्मपरीक्षण करणे उचित आहे. पहिल्या शतकात काही अभिषिक्त ख्रिस्ती जणांची अवस्था देखील अशाच प्रकारची होती. खरे तर त्यांनी स्वतः “शिक्षक” होण्यास हवे होते, देवाचे वचन काय म्हणते हे इतरांना स्वेच्छेने सांगण्यास त्यांनी समर्थ असण्यास हवे होते, याबद्दल प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्हाला देवाच्या वचनाची मुळाक्षरे पुन्हा कोणीतरी शिकविण्याची जरूरी आहे, आणि तुम्हाला दुधाची गरज आहे, जड अन्न चालत नाही, असे तुम्ही झाला आहा.” तुमची आध्यात्मिकरीत्या वाढ व्हावी, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चांगल्या अर्थात आध्यात्मिक जड अन्नाची भूक विकसित केली पाहिजे. आध्यात्मिक शिशु आहाराने संतुष्ट होऊ नका!—इब्री लोकांस ५:१२.
या शत्रूत्वाच्या जगात जगत असताना आपण दररोज परीक्षांना तोंड देतो त्यावेळी होणारी इजा भरून काढण्यासाठी देखील आपल्याला या आध्यात्मिक जड अन्नाची आवश्यकता असते. या परीक्षांमुळे आपल्या आध्यात्मिक शक्तीचा ऱ्हास होऊ शकतो. परंतु देव आपल्यात नवचैतन्य भरू शकतो. पौलाने म्हटले: “आम्ही धैर्य सोडीत नाही; परंतु जरी आमचा बाह्य देह क्षय पावत आहे, तरी अंतरात्मा दिवसानुदिवस नवा होत आहे.” (२ करिंथकर ४:१६) आपण ‘दिवसेनदिवस नवे’ कसे होतो? थोडक्यात, शास्त्रवचनांचा आणि बायबल आधारीत प्रकाशनांचा व्यक्तिगतरीत्या आणि सामुहिकरीत्या अभ्यास करून नियमितपणे देवाच्या वचनाचे सेवन करण्याद्वारे आपण दिवसेनदिवस नवे होतो.
आध्यात्मिक ऊर्जेसाठी अन्न
“उष्णता आणि ऊर्जा निर्माण” करण्यासाठी देखील अन्नाची आवश्यकता असते. आपल्या शरीराचे कार्य सुरळीतपणे चालावे म्हणून अन्न आपल्याला इंधन पुरवते. आपण योग्य आहार घेतला नाहीतर आपल्याला इतकी ऊर्जा प्राप्त होणार नाही. आपल्या शरीरातील खनिज पदार्थांमधील लोहाचे प्रमाण अल्प झाल्यास आपल्याला थकवा आणि सुस्ती जाणवू शकते. आध्यात्मिक कार्याची बाब येते तेव्हा तुम्हाला काही वेळा असेच वाटते का? ख्रिस्ती या नात्याने तुमच्यावर ज्या जबाबदाऱ्या येतात त्या पार पाडण्यास तुम्हाला कठीण जाते का? येशूचे अनुयायी असल्याचा दावा करणारे काही जण चांगले ते करण्यात मागे पडतात आणि ख्रिस्ती कार्यासाठी आवश्यक असणारा इतका जोम देखील त्यांच्याकडे नसतो. (याकोब २:१७, २६) हे तुमच्या बाबतीत खरे असल्याचे तुम्हाला दिसून आल्यास उपचार अधिकतर प्रमाणात तुमचा आध्यात्मिक आहार सुधारण्यावर किंवा आध्यात्मिक अन्न जास्तीत-जास्त सेवन करण्यावर अवलंबून असेल.—यशया ४०:२९-३१; गलतीकर ६:९.
निकस आध्यात्मिक अन्न सेवन करण्याच्या सवयी विकसित करून मूर्ख बनू नका. सैतानाने अनेक शतकांपासून अतिशय चतूर क्लृप्तीचा वापर केला आहे; ती क्लृप्ती म्हणजे लोकांना याची खात्री पटवून देणे, की त्यांना बायबल वाचण्याची आणि त्यातून अचूक ज्ञान संपादन करण्याची काहीएक आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे आक्रमण करणारे सैन्य शत्रूच्या मुलखावर कब्जा करण्यासाठी—त्यांना अन्नापासून वंचित ठेवतात आणि शरण यावे म्हणून त्यांची उपासमार करतात त्याचप्रमाणे सैतानही याच पुरातन युक्तीचा वापर करतो. परंतु तो आता ही युक्ती वापरण्यात आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. तो अशा लोकांभोवती “वेढा” टाकून त्यांची फसगत करतो जे खरे तर विपुल प्रमाणात आध्यात्मिक अन्नानी घेरलेले असतानाही स्वतःची उपासमार करून घेतात. यात कोणतेही आश्चर्य नाही की अनेक जण त्याच्या हल्ल्यांचे शिकार होतात!—इफिसकर ६:१०-१८.
आध्यात्मिक प्रकृतीसाठी अन्न
आपल्याला अन्नाची आवश्यकता आहे याचे तिसरे कारण अन्न आणि पौष्टिकता हे पुस्तक सांगते, “शरीराची प्रकृती ठणठणीत राहावी. . . . आणि रोगापासून संरक्षण प्राप्त व्हावे याकरता.” तूप खाल्लं आणि रूप आलं असं कधी होत नाही. आपण एखादे चांगले जेवण खातो तेव्हा आपण क्वचितच असा विचार करतो, की ‘यामुळे माझ्या हृदयाला (किंवा किडनीला किंवा माझ्या स्नायूंना आणि इतर इंद्रियांना) लाभ झाला आहे.’ तथापि, तुम्ही अन्नाविना काही काळापर्यंत राहण्याचा प्रयत्न करा आणि त्यामुळे तुमच्या प्रकृतीवर होणारे परिणाम अगदी स्पष्टपणे दिसतील. कोणते परिणाम? एक वैद्यकीय संदर्भ पुस्तक म्हणते, “कुपोषणाचे सर्वसामान्य चित्र नकारात्मक आहे: वाढ खुंटणे, सर्वसामान्य संसर्गांना सहज बळी पडणे, ऊर्जा किंवा जोम कमी होणे.” अशाच प्रकारच्या कमजोर आध्यात्मिक आरोग्याचा प्राचिन इस्राएलावर काही काळापर्यंत परिणाम झाला होता. त्यांच्याविषयी यशया संदेष्ट्याने म्हटले: “हरएक मस्तक व्यथित झाले आहे, हरएक हृदय ग्लान झाले आहे. पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही.”—यशया १:५, ६.
अशा प्रकारच्या आध्यात्मिक कमजोरीला आणि आध्यात्मिक संसर्गाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी चांगले आध्यात्मिक अन्न आपल्याला शक्ती पुरवते. आध्यात्मिकरीत्या चांगल्या स्थितीत राहण्यासाठी देवाचे ज्ञान आपल्याला मदत करते—आपण त्याचे सेवन केले तर! येशू ख्रिस्ताने टिपणी केली, की कशा प्रकारे त्याच्या दिवसांतील बहुतेक लोकांनी योग्य प्रकारच्या आध्यात्मिक अन्नाच्या बाबतीत त्यांच्या वाडवडिलांनी केलेल्या दुर्लक्षितपणातून धडा घेतला नाही. तो जी सत्ये शिकवत होता ती सेवन करण्यास देखील त्यांनी नकार दिला. परिणाम काय झाला? येशूने म्हटले: “ह्या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात, आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत; ह्यासाठी की, त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये, आणि मी त्यांना बरे करू नये.” (मत्तय १३:१५) देवाच्या वचनाच्या बरे करण्याच्या शक्तीचा अधिकांश लोकांनी कधीही फायदा घेतला नाही. ते आध्यात्मिकरीत्या आजारी राहिले. अभिषिक्त ख्रिस्ती देखील “दुर्बळ व आजारी” झाले होते. (१ करिंथकर ११:३०) देव प्रदान करीत असलेल्या आध्यात्मिक अन्नाचा आपण कधीही तिटकारा करता कामा नये.—स्तोत्र १०७:२०.
आध्यात्मिक भेसळ
आध्यात्मिक उपासमार होण्याच्या भीतीखेरीज आणखी एक धोका आहे ज्याविषयी आपण सावध असले पाहिजे—आपण ज्या प्रकारचे अन्न सेवन करतो कदाचित तेच भेसळयुक्त असेल. जंतूंनी आणि विषारी द्रव्यांनी प्रदूषित झालेले शारीरिक अन्न सेवन केल्यामुळे ज्याप्रकारे सहज विषबाधा होऊ शकते अगदी त्याचप्रकारे धोकेदायक दुरात्मिक कल्पनांनी प्रभावित झालेल्या शिकवणी आत्मसात केल्यामुळे आपल्याला विषबाधा होऊ शकते. (कलस्सैकर २:८) विषारी अन्न ओळखणे प्रत्येक वेळी इतके सोपे नसते. एक अधिकार सूत्र असे म्हणते, “अन्न काही वेळा स्वास्थ्यकर वाटेल परंतु त्यात कदाचित रोगकारक सूक्ष्मजंतूंचा जणू बालेकिल्ला असेल.” काही साहित्य अशास्त्रीय शिकवणी आणि तत्त्वज्ञानाच्या प्रवेशामुळे संसर्गदूषित झालेले असेल त्यामुळे आपण आपल्या लाक्षणिक अन्नाच्या उगमाचे परीक्षण करणे आपल्यासाठी चांगले आहे. ग्राहकांना फसविण्यासाठी काही खाद्यपदार्थांचे उत्पादक आपल्या उत्पादित पदार्थांवर खोटी लेबले देखील लावतात. असे करण्याची अपेक्षा आपण महान फसवेगिरी करणाऱ्याकडून अर्थात सैतानाकडून करू शकतो. यामुळे याची खात्री करा, की तुम्हाला अशा प्रकारचे लाक्षणिक अन्न विश्वसनीय स्रोताकडून मिळेल जेणेकरून तुम्ही “विश्वासात खंबीर” व्हाल.—तीत १:९, १४.
थॉमस ॲडम्स या १७ व्या शतकातील प्रचारकाने आपल्या काळातील लोकांविषयी म्हटले: “त्यांनी आपल्या दातांनी स्वतःची कबर खोदली आहे.” दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास त्यांनी जे काही खाल्ले त्यामुळे ते मरण पावले. आध्यात्मिकरीत्या तुम्ही जे सेवन करता ते तुम्हाला मारक तर ठरत नाही ना याची खात्री करा. चांगल्या आध्यात्मिक अन्न पुरवठ्याचा शोध घ्या. आपली सेवा करण्याचा दावा करणारे जेव्हा खोट्या शिक्षकांकडे आणि संदेष्ट्यांकडे वळले तेव्हा यहोवाने त्यांना पुढील प्रमाणे प्रश्न विचारला व म्हटले: “जे अन्न नव्हे त्याकरिता तुम्ही दाम का देता? . . . माझे लक्षपूर्वक ऐका, आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो. कान द्या, मजकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल.”—यशया ५५:२, ३; पडताळा यिर्मया २:८, १३.
आध्यात्मिक अन्नाची विपुलता
निश्चितपणे चांगल्या आध्यात्मिक अन्नाचा कोणताही तुटवडा नाही. येशूने भविष्यवाणी केली होती त्यानुसार त्याच्याकडे विश्वासू आणि बुद्धिमान दास आहे आणि ज्या कोणाला अन्न हवे आहे त्याला ते “यथाकाळी खावयास” देण्यात तो दासवर्ग व्यग्र आहे. (मत्तय २४:४५) यहोवाने यशया संदेष्ट्याद्वारे असे अभिवचन दिले: “पाहा! माझे सेवक खातील, पण तुम्ही उपाशी राहाल. . . . माझे सेवक हर्षित चित्ताने जयजयकार करितील, पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल.” खरे तर तो अशा लोकांना मेजवानीचे अभिवचन देतो ज्यांना खाण्याची इच्छा आहे. “सेनाधीश परमेश्वर . . . सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी, राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे; उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेविल्यावर गाळलेल्या द्राक्षारसाची मेजवानी करीत आहे.”—यशया २५:६; ६५:१३, १४.
परंतु याचा जरा विचार करा, की मेजवानी समोर असूनही आपली उपासमार होऊ शकते! आपल्या अवतीभोवती अन्नाची विपुलता असूनही आपण जर स्वतः होऊन त्यातून खाण्यासाठी प्रयत्न केला नाही तर आपण गंभीररीत्या कुपोषित होऊ शकतो. नीतिसूत्रे २६:१५ याचे शब्दशः वर्णन देते: “आळशी आपला हात ताटात घालितो, तो परत तोंडाकडे नेण्यास त्याला श्रम वाटतात.” किती दुःखमय अवस्था! त्याचप्रमाणे आपणही देवाचे वचन आणि आध्यात्मिक अन्न प्राप्त करण्यासाठी मदत म्हणून तयार करण्यात आलेली बायबलवर आधारित प्रकाशनांचा व्यक्तिगत अभ्यास करण्याच्या प्रयत्नांत आळशी होऊ शकतो. किंवा आपण इतके थकून जाऊ शकतो, की ख्रिस्ती मंडळीच्या सभांची तयारी करणे आणि त्यांत सहभाग घेणे आपल्याला शक्य होत नाही.
सेवन करण्याच्या चांगल्या सवयी
यामुळे आध्यात्मिक अन्न सेवन करण्याच्या चांगल्या सवयी जोपासण्याचे आपल्याकडे सबळ कारण आहे. तथापि, खरे तर अनेक जण आध्यात्मिक अन्न अगदी कमी प्रमाणात सेवन करत असतात आणि काही तर पूर्णपणे भुकेले राहतात. ते अशा लोकांप्रमाणे आहेत ज्यांना योग्य आहार घेण्याचे महत्त्व तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत त्यांच्या पुढील जीवनात त्याच्या परिणामांचा ते अनुभव घेत नाहीत. स्वास्थ्यकर जेवण (इंग्रजी) हे पुस्तक या गोष्टीचे कारण देते, की जीवनासाठी चांगल्या प्रकारच्या जेवणाची आवश्यकता आहे हे आपल्याला ठाऊक असतानाही आपण आपल्या खाण्याच्या सवयींकडे का दुर्लक्ष करू शकतो: “रस्ता ओलंडल्याचा परिणाम एकदम दिसून येतो परंतु खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करण्याच्या बाबतीत समस्या ही आहे की [योग्य प्रकारे आहार न घेण्याच्या सवयींचे परिणाम] त्याचा प्रकृतीवर लगेचच दिसून येत नाही. उटलपक्षी, एखाद्याच्या प्रकृतीचा ऱ्हास अगदी मंद आणि नकळत होईल, संसर्गाला तो सहज बळी पडेल; हाडांतील कणखरपणा आणखी कमी होईल; जखम भरून येण्यास तसेच रोगाचे निवारण होण्यास जास्त वेळ लागेल.”
अगदी कमालीच्या बाबतींत एखाद्या व्यक्तीची अवस्था ॲनोरेक्सिया नर्व्होसाने पीडित असणाऱ्या युवतीप्रमाणे होईल. ती स्वतःची समजूत काढते, की तिला फार थोड्या अन्नाची आवश्यकता आहे; तिची प्रकृती अगदी उत्तम आहे; वास्तविकरीत्या तिची प्रकृती खालवत असते. अखेरीस तिची जेवणावरची वासनाच उडते. “वैद्यकीय संदर्भ पुस्तक म्हणते: “ही धोकेदायक स्थिती आहे.” का बरे? “भूक कमी झाल्याने रुग्ण जरी मरत नसला तरी संबंधित स्त्री गंभीररीत्या कुपोषित होते आणि कोणत्याही सामान्य रोगाला सहज बळी पडते.”
एका ख्रिस्ती स्त्रीने मान्य केले: “कित्येक वर्षे मी सभांची नियमित तयारी आणि व्यक्तिगत अभ्यासाची गरज जाणून त्या अनुषंगाने प्रयत्न करीत राहिले परंतु मला ते कधी शक्य झालंच नाही.” तिने अखेरीस काही बदल केले आणि ती देवाच्या वचनाची चांगली विद्यार्थीनी झाली, परंतु हे सर्व तेव्हा झाले जेव्हा तिने आपल्या परिस्थितीच्या निकडीला पूर्णपणे ओळखले.
तर मग, प्रेषित पेत्राने दिलेल्या सल्ल्यावर आपले मन लावा. “नूतन जन्मलेल्या बालकांसारखे” व्हा आणि ‘तारणासाठी आणि तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून निऱ्या दुधाची इच्छा धरा.’ (१ पेत्र २:२) होय “इच्छा धरा”—तीव्र इच्छा विकसित करा—देवाच्या ज्ञानाने तुमचे अंतःकरण आणि मन भरून टाका. आध्यात्मिक प्रौढांना देखील ही इच्छा विकसित करत राहण्याची आवश्यकता आहे. ‘आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींपैकी सर्वात दुर्लक्षित गोष्ट’ आध्यात्मिक अन्न असू नये. आध्यात्मिकरीत्या चांगल्या प्रकारे सेवन करा आणि देवाच्या वचनात अर्थात बायबलमध्ये आढळणाऱ्या ‘सुवचनांपासून’ पूर्णपणे लाभ घ्या.—२ तीमथ्य १:१३, १४.
[२८ पानांवरील चित्र]
तुमच्या आहारामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे का?