दुःखितांना कधीतरी शांती लाभेल का?
केवळ तुमच्याच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीच्या दुःखांचा अंत झालेला तुम्हाला पाहायला आवडेल का? या उदाहरणांवर विचार करा:
सोनियाच्या वाट्याला दुःखच दुःख आले आहे.a तिच्या नवऱ्याचे तब्बल दहा वर्षांपासून व्यभिचारी संबंध होते हे तिला समजले तेव्हाच याची सुरुवात झाली. यानंतर, तिच्या सर्वात धाकट्या मुलाला एचआयव्ही विषाणूची लागण झाली आणि तो एड्समुळे मरण पावला. दोन वर्षांनी तिचा आणखी एक मुलगा आजारी पडला आणि लवकरच तोही एड्सला बळी पडला. सोनिया आठवून सांगते, “त्याच्या आजारपणाचा शेवटचा टप्पा असह्यपणे लांबला. त्याला भयंकर अवसाद सहन करावा लागला, त्याचे केस गेले आणि त्याला नीट दिसतही नव्हतं. दुःखानं काळीज पिळवटून निघायचं.”
ब्राझीलची एक विश्वविद्यालयीन विद्यार्थिनी, फाबियाना, हिला जगातल्या सामाजिक अन्यायांविषयी काळजी वाटायची. पण मग, तिच्या स्वतःच्याच जीवनाची शोकांतिका बनली. तिच्या भावाला अवसादाने ग्रासले आणि त्याने कंटाळून आत्महत्या केली. त्यातल्या त्यात फाबियानाची नोकरीसुद्धा तिच्या हातून गेली, तेव्हा तिच्या एका मैत्रिणीने तिला एखाद्या पाय-डी-सेन्ट्यूची (मांत्रिक) मदत घेण्याचा सल्ला दिला कारण तिच्या मते, ज्याअर्थी फाबियानावर इतकी संकटे येताहेत त्याअर्थी नक्कीच तिच्यावर कोणीतरी करणी केली असावी! पण, पाय-डी-सेन्ट्यूची मदत घेऊनही काही उपयोग झाला नाही. उलट, फाबियाना आणखीनच त्रस्त झाली, तिला तिच्या दुःखांमुळे झोप येईनाशी झाली.
आना हिचे दुःख जीवनात फारच लवकर सुरू झाले. ती सांगते, “मी वर्षाचीच होते तेव्हा माझी आई मला टाकून निघून गेली, माझ्या आजीने माझी जबाबदारी घेतली.” मग, आना अवघ्या तीन वर्षांची होती तेव्हा तिची आजी वारली. आनाला रीउ दे झानेइरु येथल्या एका अनाथालयात पाठवण्यात आले जिथे ती १३ वर्षांची होईपर्यंत राहिली. ती म्हणते, “आमची तिथे सतत हेळसांड व्हायची, आणि यामुळे मी शिरजोर बनले. मी मोठी होऊ लागले तसतशी मला प्रत्येक लहानसहान गोष्टीसाठी भांडण्याची सवय लागली.”
प्रत्येक माणसाच्या जीवनावर कोणत्या न कोणत्या प्रकारे दुःखाचा प्रभाव असतोच. खरे तर, जेव्हा जेव्हा आपण बातम्या पाहतो, वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा तेव्हा—आपल्याला मानवांच्या शोचनीय अनुभवांचे दर्शन घडते. डॉ. मेरी साइक्स वायली या लिहितात, “जनसंचारणाच्या आपल्या या युगात विशेषतः . . . दुःखद बातम्यांच्या निरंतर भडीमारापासून स्वतःला वाचवणं जणू अशक्यच झालंय. युद्धं, नैसर्गिक संकटं, औद्योगिक दुर्घटना, रस्त्यांवर भयंकर प्रमाणावर होणारे अपघाती मृत्यू, गुन्हेगारी, दहशतवाद, लैंगिक अत्याचार, बलात्कार, कौटुंबिक हिंसाचार—यांसारख्या भयंकर दैनंदिन घटनांमागे दुःखाची मूळ लय सबंध २० व्या शतकात कायम राहिली आहे.” ख्रिस्ती प्रेषित पौलाने एकंदर मानवी अनुभव पुढील वास्तववादी शब्दांत व्यक्त केला: “सृष्टि आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे.”—रोमकर ८:२२.
तुमच्याविषयी काय? तुम्ही दुःख भोगताहात का? यातून कशाप्रकारे सुटका मिळण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता? तुम्हाला कधीतरी खरी शांती प्राप्त होईल का? सोनिया, फाबियाना आणि आना यांना खरे समाधान आणि बऱ्याच प्रमाणात शांती देखील लाभली आहे! याविषयी तुम्हाला पुढच्या लेखात वाचायला मिळेल.
[तळटीपा]
a या लेखातील नावे बदलण्यात आलेली आहेत.