बायबलमधील सत्य मला रुमानियामध्ये शिकायला मिळाले
गोल्डी रुमाशियन यांच्याद्वारे कथित
सन १९७० मध्ये मी रुमानियात सुमारे ५० वर्षांनंतर पहिल्यांदा माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेले. तेथील लोकांवर जुलमी कम्युनिस्ट पक्षाचे आधिपत्य होते आणि मी जे काही बोलत होते याविषयी मला एकसारखे सावधान केले जात होते. आमच्या गावातील सरकारी दफ्तरात मी हजर झाले तेव्हा तेथील अधिकाऱ्याने मला होता होईल तितक्या लवकर देश सोडण्यास सांगितले. त्याने असे का म्हटले हे सांगण्याआधी मी तुम्हाला हे सांगू इच्छिते, की मला रुमानियात बायबलमधील सत्य कसे शिकायला मिळाले.
वायव्येकडील रुमानियात झॉलू शहराच्या जवळ असणाऱ्या ऑरटेलेक नामक खेडेगावात मार्च ३, १९०३ रोजी माझा जन्म झाला. आम्ही ज्या ठिकाणी राहत होतो तेथील परिसर नयनरम्य होता. हवा शुद्ध आणि पाणी निर्मळ होते. आमची स्वतःची शेती होती आणि आम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी अशी नव्हतीच. माझ्या बालपणी देशात शांती नांदत होती.
गावातील लोक देव-भीरू होते. म्हणून की काय आमच्या घरात तीन-तीन धर्मांचे पालन करणारे लोक होते. माझ्या बाबांची आई ऑर्थोडक्स धर्माला तर आईची आई ॲडव्हेंटिस्ट धर्माला आणि आई-बाबा बॅप्टिस्ट धर्माला मानणारे होते. मला या तिन्ही धर्मांचे विश्वास पटत नसल्यामुळे मी नास्तिक होणार असे माझ्या कुटुंबातील सदस्य मला म्हणत असत. मी असा विचार करत असे, ‘देव जर एक आहे तर धर्म देखील एकच असण्यास हवा—आणि माझ्या एका घरात तर तीन तीन धर्म आहेत.’
धर्मातील गोष्टी पाहून मी अस्वस्थ होत असे. उदाहरणार्थ, चर्चचे देय गोळा करत पाळक घरोघरी फिरत असे. जेव्हा लोकांकडे त्याला देण्यासाठी पैसे नसत तेव्हा तो त्याऐवजी लोकांची उत्तम लोकरीचे ब्लँकीटे घेऊन जात असे. आजीला, कॅथलिक चर्चमध्ये मारियाच्या फोटोपुढे गुडघे टेकून प्रार्थना करत असताना मी पाहत असे. ‘फोटोला प्रार्थना का म्हणून करावी?’ असा विचार माझ्या मनात येई.
कठीण काळ
आमच्यावर झालेल्या कर्जाचा बोजा फेडता यावा म्हणून पैसे कमावण्यासाठी बाबा सन १९१२ मध्ये संयुक्त संस्थानांत गेले. ते गेले आणि इकडे युद्धाला तोंड फुटले त्यामुळे गावातील स्त्रिया, मुले आणि वृद्ध वगळता—बाकी सर्व जण सैन्यात भरती झाले. काही काळापर्यंत आमचे गाव हंगेरीयन आधिपत्याखाली आले, परंतु, रुमानियन सैन्य परतले आणि त्यांनी गाव पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. तत्काळ गाव सोडण्याची त्यांनी आम्हाला आज्ञा दिली. तथापि, घाईघाईत आणि सामानाची बांधाबांध करण्यात तसेच मुलांना बैलगाडीत बसविण्याच्या गडबडीत मी मागेच राहिले. कारण मी पाचही भावंडांत सर्वात थोरली होते.
आमच्या शेजारी राहणारे एक वयोवृद्ध गृहस्थही मागे राहिले होते; त्यांच्या घरी मी धावत गेले तेव्हा ते मला म्हटले: “घरी जा. घराला कुलूप लाव आणि कोणालाही आत येऊ देऊ नकोस.” मी अगदी तसेच केले. घाई गडबडीत घरी राहिलेले थोडेसे चिकन सूप व कोबी-मसाला खालल्यानंतर पलंगापाशी गुडघे टेकून मी प्रार्थना केली. आणि मला गाढ झोप कधी लागली ते कळलेच नाही.
मी डोळे उघडले तेव्हा सूर्य केव्हाच डोक्यावर आला होता, मी म्हटले: “हे देवा, मी तुझे आभार मानते! मी जिवंत आहे!” बंदुकांच्या गोळ्यांनी भिंतींची अक्षरशः चाळण केली होती, जणू तेथे रात्रभर गोळीबार चालू होता. पुढील गावात पोहंचल्यानंतर आईला जेव्हा कळले, की मी त्यांच्यासोबत नाही तेव्हा मला घेण्यासाठी जॉर्ज रुमाशियन नामक युवकाला तिने पाठविले, त्याने मला शोधून काढले आणि मला माझ्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. काही काळ लोटल्यानंतर आम्ही आमच्या गावी परत आलो आणि आधीसारखे पुन्हा नेहमीच्या कामकाजाला लागलो.
बायबल सत्याची माझी आस
मी बॅप्टिस्ट म्हणून बाप्तिस्मा घ्यावा, असे माझ्या आईला फार वाटत होते, पण तसे करण्याची माझी इच्छा नव्हती कारण प्रेमळ देव लोकांना नरकात चिरकालापर्यंत जाळणार या गोष्टीवर मी विश्वास ठेवूच शकत नव्हते. मला समजावण्याच्या प्रयत्नात तिने म्हटले: “काही लोक वाईट आहेत.” पण मी पुढे म्हटले: “लोक वाईट आहेत तर त्यांना कायमचे मारून टाका; पण त्यांचे असे हालहाल मात्र करू नका. मी तर एखाद्या कुत्र्याला किंवा मांजराला देखील यातना देणार नाही.”
मला अजूनही आठवते, तो शरद ऋतूचा प्रसन्न दिवस होता, त्यावेळी मी १४ वर्षांची होते, गुरांना गायरानात घेऊन जाण्यासाठी आईने मला सांगितले होते. मी नदीच्या किनारी गवतावर पहुडले होते, नदीचा पलीकडचा तीर वृक्षवल्लींनी बहरला होता, मी आकाशाकडे पाहत म्हटले: “हे देवा, मला माहीत आहे, की तू आहेस; पण मला या धर्मांतील एकही धर्म आवडत नाही. तुला मान्य असलेला एखादा धर्म देखील हवा.”
माझी ही प्रार्थना देवाने खरोखरच ऐकली कारण त्याच म्हणजे १९१७ च्या उन्हाळ्यात बायबलचे दोन विद्यार्थी (तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना या नावाने संबोधण्यात येत असे) आमच्या गावी आले. ते कालपोर्चर किंवा पूर्ण-वेळेचे सेवक होते आणि प्रचार करत असताना ते बॅप्टिस्ट चर्चमध्ये आले त्यावेळी चर्चमध्ये विधी चालू होता.
बायबलमधील सत्य रुमानियामध्ये पसरते
संयुक्त संस्थानांमध्ये बायबल विद्यार्थी झालेले कॅरोल सोबो आणि योसिफ किस, बायबलमधील सत्याची ओळख करून देण्यासाठी काही वर्षांआधी म्हणजे १९११ मध्ये रुमानियात परत आले. आमच्या गावाच्या आग्नेय दिशेस सुमारे १६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टिरगु-म्युरेज या ठिकाणी ते स्थिरावले. काही वर्षांच्या आतच अक्षरशः शेकडो लोकांनी राज्य संदेशाला प्रतिसाद देऊन ख्रिस्ती सेवाकार्याचा अंगीकार केला.—मत्तय २४:१४.
आमच्या ऑरटेलेक गावातील बॅप्टिस्ट चर्चमध्ये जेव्हा दोन युवक बायबल विद्यार्थी आले तेव्हा केवळ १८ वय असलेला जॉर्ज रुमाशियन चर्चचा विधी चालवत होता त्यावेळी तो रोमकर १२:१ या वचनाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करीत होता. अखेरीस, त्या दोहांपैकी एक कालपोर्चर उभा राहिला आणि त्याने म्हटले: “बंधूंनो आणि मित्रांनो, प्रेषित पौल आपल्याला या ठिकाणी काय सांगत आहे?”
तो बोलायला उभा राहिलेला पाहून मला फार आश्चर्य वाटले होते! मला वाटले, ‘कदाचित या लोकांना बायबलचं स्पष्टीकरण करता येत असावं.’ परंतु तेथे उपस्थित असलेल्यांपैकी अनेक जण मोठ्याने ओरडले: “खोटे संदेष्टे! तुम्ही कोण आहात हे आम्हाला ठाऊक आहे!” त्यानंतर एकच गलबला झाला. मग मात्र जॉर्जचे वडील उभे राहिले आणि म्हणाले: “तुम्ही सर्वजण शांत व्हा! तुम्ही असे काय वागता—प्याल्यासारखे? या लोकांना आपल्याला काही सांगायचं आणि तुम्हाला ते ऐकायचं नसेल, तर मी त्यांना माझ्या घरी बोलावतो. ज्या कोणाला त्यांचं ऐकायचं असेल त्यानं माझ्या घरी यावं.”
मी अगदी भारावून जाऊन घरी पळत गेले आणि जे काही झाले होते ते सर्व आईला सांगून टाकले. रुमाशियनच्या घरी जाण्याचे ज्या लोकांनी ठरवले होते त्यांपैकी मी एक होते. नरकाग्नी नाही, हे बायबलमधून कळल्यानंतर आणि माझ्या स्वतःच्या रुमानियन बायबलमधून देवाचे नाव, यहोवा आहे हे पाहिल्यानंतर त्या संध्याकाळी मी किती चक्रावून गेले होते! कालपोर्चर असलेल्या या दोघांनी आम्हाला शिकविण्यासाठी रुमाशियनच्या घरी दर रविवारी एका बायबल विद्यार्थ्याला पाठविण्याची व्यवस्था केली. त्यानंतरच्या उन्हाळ्यात वयाच्या १५ व्या वर्षी मी यहोवाला समर्पणाचे प्रतीक म्हणून पाण्याने बाप्तिस्मा घेतला.
कालांतराने, प्रत्यक्षात प्रॉडन कुटुंबाने आणि रुमाशियनच्या कुटुंबाने बायबलमधील सत्याचा स्वीकार केला आणि यहोवाला स्वतःच्या जीवनांचे समर्पण केले. आमच्या गावातील इतर अनेकांनी देखील असे केले त्यात एका तरुण दांपत्याचा देखील समावेश होता ज्यांच्या घराचा पूर्वी बॅप्टिस्ट चर्च म्हणून वापर करण्यात येत असे. नंतर याच घरात बायबल विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी एकत्र येऊ लागले. शास्त्रवचनीय सत्यांचा प्रसार आसपासच्या गावांत देखील फार झपाट्याने झाला आणि १९२० पर्यंत रुमानियामध्ये सुमारे १,८०० राज्य प्रचारक झाले!
संयुक्त संस्थानांकडे
माझे वडील, पीटर प्रॉडन यांना आम्ही जे काही शिकलो ते सांगण्यासाठी आम्ही अधीर झालो होतो. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही त्यांना लिहिण्याआधीच त्यांचे पत्र आम्हाला मिळाले; आपण यहोवाचे बाप्तिस्मा प्राप्त सेवक झाल्याचे त्यांनी त्या पत्रात लिहिले होते. त्यांनी ॲक्रॉन, ओहियो येथे बायबल विद्यार्थ्यांसोबत अभ्यास केला होता आणि आम्ही सर्वांनी त्यांच्यासोबत संयुक्त संस्थानांत राहायला यावे, अशी त्यांची इच्छा होती. परंतु रुमानिया सोडून जाण्यास आई तयार नव्हती. म्हणून बाबांनी जे पैसे पाठविले होते त्याच्या साह्याने मी १९२१ मध्ये ॲक्रॉन येथे त्यांच्यासोबत राहण्यासाठी गेले. मी येथे येण्याच्या एका वर्षापूर्वीच जॉर्ज रुमाशियन आणि त्याचा भाऊ अमेरिकेत स्थलांतरीत झाले होते.
मी जहाजाने न्यूयॉर्क, इलीस आयलंड येथे आले तेव्हा परदेशगमन अधिकाऱ्याला माझ्या ऑरेलिया या नावाचे इंग्रजीमध्ये कसे भाषांतर करावे, हे कळेना तेव्हा त्याने म्हटले: “तुझं नाव आता गोल्डी झालं.” तेव्हापासून मला त्याच नावाने ओळखण्यात येऊ लागले. त्यानंतर काही काळाने म्हणजे मे १, १९२१ मध्ये जॉर्ज रुमाशियनबरोबर मी विवाहबद्ध झाले. सुमारे एका वर्षानंतर बाबा रुमानियाला परत गेले आणि १९२५ मध्ये परत येताना ते माझी धाकटी बहीण मेरी हिला ॲक्रॉनला आपल्यासोबत घेऊन आले. त्यानंतर बाबा आईसोबत आणि इतर कुटुंबीयांसमवेत राहण्यासाठी रुमानियाला निघून गेले.
अमेरिकेतील आमचे आरंभीचे सेवाकार्य
माझे पती यहोवाचे अगदी एकनिष्ठ आणि धर्मपरायण सेवक होते. सन १९२२ ते १९३२, या काळात आम्हाला चार सुंदर मुली झाल्या—एस्तेर, ॲन, गोल्डी एलिझाबेथ आणि आयरिन. ॲक्रॉनमध्ये आता एक रुमानियन मंडळी सुरू झाली होती आणि सुरवातीला सभा आमच्या घरातच होत असत. कालांतराने, दर सहा महिन्यांतून ब्रुकलिन, न्युयॉर्क येथील बायबल विद्यार्थ्यांच्या जागतिक मुख्यालयाचा एक प्रतिनिधी आमच्या मंडळीला भेट देत असे आणि मुक्कामाला आमच्याकडे असे.
आम्ही कित्येक रविवार संपूर्ण दिवसभर प्रचार कार्य करण्यात घालवले. आम्ही आमच्यासोबत पुस्तके आणि दुपारचे जेवण घेत असू आणि आमच्या मुलींना मॉडेल टी फोर्ड गाडीमध्ये घेऊन ग्रामीण भागात प्रचार करण्यात आमचा संपूर्ण दिवस जात असे. संध्याकाळी आम्ही टेहळणी बुरूज अभ्यासासाठी उपस्थित राहत असू. आमच्या मुलींना देखील प्रचार कार्यात गोडी निर्माण झाली होती. सन १९३१ मध्ये कोलंबस, ओहिओ येथे बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे भेददर्शक नाव स्वीकारले तेव्हा मी देखील तेथे उपस्थित होते.
मला सुधारणेची आवश्यकता
काही वर्षांनंतर वॉच टावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटीचे तत्कालिन अध्यक्ष जोसफ एफ. रदरफोर्ड यांचा मला राग आला होता. आपली समस्या कान देऊन न ऐकण्याद्वारे बंधू रदरफोर्ड आपल्याबरोबर अन्यायीपणे वागले, असे एका नवोदित साक्षीदाराला वाटत होते. बंधू रदरफोर्ड यांचे चुकले असे मलाही वाटत होते. एके रविवारी, माझी बहीण मेरी आणि तिचे पती डॅन पेस्ट्रॉइ आमच्या घरी आले. दुपारचे जेवण झाल्यानंतर डॅनने म्हटले: “सभेसाठी तयार व्हा पाहू.”
“येथून पुढं आम्ही सभांना जाणार नाही,” मी म्हटले. “आम्हाला बंधू रदरफोर्ड यांचा राग आलांय.”
डॅनने काही वेळ विचार केला आणि नंतर म्हटले: “तुमचा बाप्तिस्मा झाला तेव्हा तुम्ही बंधू रदरफोर्ड यांना ओळखत होता का?”
“ते कसं शक्य आहे?” मी उत्तर दिले. “माझा बाप्तिस्मा रुमानियामध्ये झालाय, हे तर तुम्हाला ठाऊकच आहे.”
“तुम्ही बाप्तिस्मा का घेतला बरं?” त्यांनी विचारले.
“कारण यहोवा हाच खरा देव असल्याचं मी शिकले होते आणि त्याची सेवा करण्यासाठी मला माझं जीवन समर्पित करायचं होतं,” मी उत्तर दिले.
“तुम्ही ते कधीही विसरू नका!” त्यांनी उत्तर दिले. “बंधू रदरफोर्ड यांनी सत्य सोडलं, तर तुम्ही देखील सत्य सोडाल का?”
“नाही, कधीच नाही!” मी म्हटले. त्यानंतर मी ताळ्यावर आले आणि मी म्हटले: “चला, सर्व जण सभेसाठी तयार व्हा.” तेव्हापासून आम्ही सभांना जाण्याचे सोडले नाही. माझ्या मेहुण्यांनी माझ्यात केलेल्या प्रेमळ सुधारणेसाठी मी यहोवाची किती कृतज्ञ होते!
मंदीच्या काळात तग धरणे
सन १९३० च्या दशकात जी मंदी आली त्यावेळी जगणे मुश्कील होऊन बसले होते. एके दिवशी हे कामावरून अगदी हताश होऊन घरी आले आणि रबराच्या कारखान्यातील त्यांची नोकरी गेल्याचे त्यांनी मला सांगितले. “काही काळजी करू नका,” मी म्हटले, “आपला स्वर्गातील पिता श्रीमंत आहे आणि तो आपल्याला सोडणार नाही.”
त्या दिवशी माझे पती त्यांच्या एका मित्राला भेटले ज्याच्याकडे मश्रूमची मोठी टोपली होती. हे मश्रूम त्याच्या मित्राने कोठून आणले होते, हे यांना कळल्यानंतर त्यांनी घरी मोठ्या प्रमाणात मश्रूम आणले. मग आमच्याकडे असणारे अखेरचे तीन डॉलरही त्यांनी छोट्या आकाराच्या काही टोपल्या घेण्यासाठी खर्च केले. मी त्यांना विचारले: “आपल्याला लहान मुली आहेत आणि त्यांना प्यायला दूध लागतं हे माहीत असूनही तुम्ही पैसे खर्च केले तरी कसे?”
“काही काळजी करू नकोस,” त्यांनी उत्तर दिले, “मी जे सांगतो तेवढं करं.” पुढील काही आठवडे आमच्या घरात छोटासा कारखानाच सुरू झाला होता, येथे आम्ही मश्रूम स्वच्छ करीत असू आणि नंतर ते पॅक करीत असू. आम्ही ते मश्रूम एखाद्या चांगल्या उपाहारगृहात विकत असू आणि त्यामुळे आम्हाला दिवसाकाठी ३० ते ४० डॉलर सहज मिळत असत आणि ते आमच्यासाठी पुष्कळ होते. ज्या शेतकऱ्याने आम्हाला त्याच्या कुरणातून मश्रूम घेण्याची परवानगी दिली होती त्याने म्हटले, की तो तेथे २५ वर्षांपासून राहत होता पण त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात मश्रूम यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. लवकरच रबर कारखान्याने यांना कामावर परत बोलावले.
विश्वास कायम ठेवणे
सन १९४३ मध्ये आम्ही कॅलिफोर्नियातील लॉस ॲन्जेलेसमध्ये राहण्यासाठी गेलो आणि आम्ही चार वर्षे एल्सिनॉरमध्ये स्थायिक झालो. आम्ही तेथे किराणा मालाचे दुकान उघडले आणि आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आळीपाळीने दुकानात बसत असे. त्यावेळी एल्सिनॉर २,००० लोकवस्ती असलेले लहानसे गाव होते त्यामुळे ख्रिस्ती सभांसाठी आम्हाला ३० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या दुसऱ्या शहरात जावे लागत असे. सन १९५० मध्ये एल्सिनॉरमध्ये एक छोटीशी मंडळी सुरू झाली तेव्हा मला किती आनंद झाला होता! याच क्षेत्रात आता १३ मंडळ्या आहेत.
सन १९५० मध्ये आमची मुलगी गोल्डी एलिझाबेथ (बहुतेक जण बेथ या नावाने ओळखतात) हिला न्यूयॉर्क, साऊथ लेंसींग येथील वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेमधून पदवीधर झाल्यानंतर मिशनरी या नात्याने तिला व्हेनेझुएलामध्ये नियुक्त करण्यात आले. सन १९५५ मध्ये आमची सर्वात धाकटी मुलगी आयरिन हिला फार आनंद झाला होता कारण तिच्या पतीला प्रवासी सेवक म्हणून बोलवण्यात आले. सन १९६१ मध्ये न्यूयॉर्क, साऊथ लेंसींग येथील राज्य सेवा प्रशालेस उपस्थित राहिल्यानंतर त्यांना थायलंडमध्ये पाठविण्यात आले. काही वेळा मला माझ्या मुलींची इतकी आठवण येत असे, की मला रडू आवरत नव्हते परंतु त्यानंतर मी असा विचार करायचे, की ‘त्यांनी याच कार्यात राहावे, अशी माझी इच्छा आहे.’ मग, मी प्रिचिंगची माझी बॅग घ्यायचे आणि प्रचार कार्याला बाहेर पडायचे. प्रचारानंतर घरी आल्यावर मला नेहमी प्रसन्न वाटत असे.
सन १९६६ मध्ये माझे प्रिय पती जॉर्ज यांना मस्तिष्काघात झाला. प्रकृती बरी नसल्यामुळे बेथला व्हेनेझुएलामधून परत घरी यावे लागले होते, तिने त्यांची काळजी घेतली. त्याच्या पुढील वर्षी हे मरण पावले; ते शेवटपर्यंत यहोवाशी विश्वासू राहिले आणि त्यांना त्यांचे स्वर्गीय प्रतिफळ प्राप्त झाले या वास्तविकतेमुळे मला सांत्वन मिळाले. स्पेनमध्ये राज्य प्रचारकांची अधिक गरज असल्याने बेथ तेथे सेवा करण्यासाठी गेली. माझी सर्वात थोरली मुलगी एस्तेर कर्करोगाने आजारी पडली आणि सन १९७७ मध्ये आम्हाला सोडून गेली, तर सन १९८४ मध्ये ॲन ल्युकेमियाने मरण पावली. दोघींनी आपल्या जीवनभर यहोवाची विश्वासूपणे सेवा केली.
ॲनच्या मृत्यूच्या वेळी बेथ आणि आयरिन आपल्या परदेशी नियुक्तींवरून परत आल्या होत्या. त्यांनी आपल्या बहिणींची काळजी घेतली परंतु तिच्या मृत्यूनंतर आम्हाला आमचे दुःख अनावर झाले. त्यानंतर मी माझ्या मुलींना सांगितले: “झालं इतकं पुरं झालं! बायबलमधल्या मौल्यवान अभिवचनांनी आपण इतरांचं सांत्वन केलंय. आता आपल्याला स्वतःचं सांत्वन करायला हवं. यहोवाची सेवा केल्यानं मिळणारा आनंद सैतान आपल्यापासून हिरावून घेऊ पाहतोय, पण आपण त्याला तसं करू देता कामा नये.”
रुमानियातील आमचे विश्वासू कुटुंब
रुमानियातील आमच्या कुटुंबीयांना भेट देण्यासाठी मी आणि माझी बहीण मेरी हिने १९७० मध्ये रुमानियाची संस्मरणीय सफर केली. आमची एक बहीण मरण पावली होती, परंतु अद्यापही ऑरटेलेक गावात राहणारा आमचा भाऊ जॉन आणि बहीण लोदोव्हिका त्यांच्याकडे मात्र आम्हाला जाता आले. आमच्या भेटीआधीच आई-बाबा केव्हाच आम्हाला सोडून गेले होते; ते शेवटपर्यंत यहोवाशी विश्वासू राहिले. बाबा मंडळीचे आधारस्तंभ होते, असे अनेकांच्या तोंडून आम्ही ऐकले. आता तर रुमानियातील त्यांची पतवंडे देखील साक्षीदार आहेत. बायबलमधील सत्यात दृढ राहिलेल्या माझ्या सासरच्या नातेवाईकांकडे देखील आम्ही गेलो.
सन १९७० मध्ये, रुमानिया निकोली सियॉसिक्यूच्या जुलमी कम्युनिस्ट आधिपत्याखाली आले आणि यहोवाच्या साक्षीदारांचा अघोरीपणे छळ करण्यात येऊ लागला. माझा भाऊ जॉन याचा मुलगा फ्लोअर याने तसेच माझ्या इतर नातेवाईकांनी आपल्या ख्रिस्ती विश्वासामुळे अनेक वर्षे छळ छावण्यात काढली आणि माझ्या पतीचा चुलत भाऊ गॅबॉर रुमाशियन हा देखील छळछावणीत होता. यामध्ये कोणतेही आश्चर्य नाही, की न्युयॉर्कमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात काही पत्रे पोचते करण्यासाठी आमच्याकडे देण्यात आली होती. त्यामुळे आमचे रुमानियन बांधव म्हटले, की जोपर्यंत आम्ही देशाच्या बाहेर सुखरूप पोहंचल्याचे ते ऐकत नाही तोपर्यंत त्यांना अन्न गोड लागणार नाही!
आमच्या व्हिसाची मुदत संपल्यानंतर आम्ही ऑरटेलेकच्या सरकारी दफ्तरात गेलो. ती शुक्रवारच्या दुपारची वेळ होती आणि केवळ एक अधिकारी कामावर होता. आम्ही कोण आहोत आणि आमचा पुतण्या छळछावणीत आहे, हे समजल्यानंतर त्याने म्हटले: “तुम्ही येथून ताबडतोब निघा!”
“पण आज तर कोणतीच रेल्वे नाहीए,” माझ्या बहिणीने म्हटले.
“म्हणून काय झालं,” तो तत्काळ उत्तरला. “बसनं जा. रेल्वेनं जा. टॅक्सीनं जा. पायी जा. तुम्हाला जितक्या लवकर जाता येईल तितक्या लवकर येथून जा!”
आम्ही तेथून निघणार, तितक्यात आम्हाला परत बोलावण्यात आले आणि असे सांगण्यात आले, की संध्याकाळी ६.०० वाजता एक अनपेक्षित लष्करी रेल्वे येत आहे. आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला! अन्यथा नेहमीच्या रेल्वेत आमची कागदपत्रे वारंवार तपासण्यात आली असती. परंतु या रेल्वेत लष्कर असल्यामुळे आम्ही दोघीजणीच त्यांच्यापासून वेगळ्या होतो आणि आमच्या पासपोर्टची कोणी विचारपूस देखील केली नाही. आम्ही कोणा आधिकाऱ्यांच्या आज्या असल्याचे त्यांना कदाचित वाटले असावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही टिमिसोअराला पोहंचल्यानंतर तेथील आमच्या मित्राच्या नातेवाईकाच्या मदतीने आम्हाला आमचा व्हिसा मिळवता आला. दुसऱ्या दिवशी आम्ही देशाच्या बाहेर होतो. आम्ही आमच्यासोबत रुमानानियातील आमच्या एकनिष्ठ ख्रिस्ती भाऊ बहिणींच्या अनेक सुखद आणि अविस्मरणीय आठवणी सोबत आणल्या होत्या.
रुमानियाला जाऊन एक वर्ष झाल्यानंतर त्या देशातील बंदीच्या काळातील प्रचार कार्याच्या काही बातम्या आम्हाला ऐकायला मिळाल्या. तथापि, आमचे ख्रिस्ती बंधू आणि भगिनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या देवाला एकनिष्ठ राहतील, असा आमचा पूर्ण विश्वास होता. आणि निश्चितच ते देवाला एकनिष्ठ राहिले आहेत! एप्रिल १९९० मध्ये रुमानियातील धार्मिक संघटना अशी यहोवाच्या साक्षीदारांना अधिकृत मान्यता मिळाली तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला! उन्हाळ्यात रुमानियामध्ये आयोजित अधिवेशनांचे अहवाल ऐकायला मिळाले तेव्हा आमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आठ शहरांमध्ये ३४,००० पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिले आणि २,२६० लोकांनी बाप्तिस्मा घेतला! रुमानियामध्ये आता ३५,००० पेक्षा अधिक जण प्रचार कार्यात सहभाग घेत आहेत आणि मागील वर्षी ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला ८६,०३४ लोक उपस्थित होते.
सत्य अद्यापही माझ्यासाठी मौल्यवान आहे
मी काही वर्षे स्मारकविधीच्या वेळी बोधचिन्हांमध्ये भाग घेण्याचे थांबवले होते. अतिशय योग्यताप्राप्त बांधव बोधचिन्हांमध्ये भाग घेत नसल्याचे मी पाहिले तेव्हा मी विचार केला: ‘इतर जण इतके चांगले अस्खलित वक्ते असताना स्वर्गात त्याच्या पुत्रासह वारीस म्हणून जाण्याचा विशेषाधिकार यहोवा मला का देऊ करील?’ परंतु मी जेव्हा बोधचिन्हांमध्ये भाग घेत नसे तेव्हा मला फार अस्वस्थ वाटत असे. जणू मी कोणत्यातरी गोष्टीला नाकारत होते. पुष्कळ अभ्यास आणि प्रार्थनापूर्वक विनवणी केल्यानंतर बोधचिन्हांमध्ये भाग घेण्यास मी पुन्हा सुरवात केली. मला शांती आणि आनंद पुन्हा मिळाला व अद्यापही कायम आहे.
आता मला दिसत नसल्यामुळे वाचता येत नाही, परंतु मी बायबलच्या तसेच टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांच्या टेप दररोज ऐकते. मी अजूनही प्रचार कार्याला जाते. मी दर महिन्याला साधारण ६० ते १०० च्या आसपास नियतकालिके देते, परंतु मागील एप्रिल महिन्यात आम्ही जेव्हा सावध राहा! नियतकालिकाची खास मोहीम राबवली तेव्हा मी ३२३ नियतकालिकांचे वाटप केले. माझ्या मुलींच्या मदतीने मी ईश्वरशासित सेवा प्रशालेतील भाग देखील प्रस्तुत करते. मी अद्यापही इतरांना उत्तेजन देऊ शकते यामुळे मी आनंदी आहे. राज्य सभागृहातील जवळजवळ सर्वजण मला आजी म्हणून बोलावतात.
यहोवाला समर्पित सुमारे ७९ वर्षांच्या समर्पित सेवेकडे सिंहावलोकन केल्यानंतर मी यहोवाचे दररोज आभार मानते कारण त्याने त्याचे मोलवान सत्य जाणून घेण्याची आणि त्याच्या सेवेत माझे जीवन खर्च करण्याची मला अनुमती दिली. या शेवटल्या काळात देवाच्या मेंढरासमान लोकांना एकत्रित करण्याच्या बायबल भविष्यवाणीची वैभवी पूर्णता पाहण्यासाठी मी जिवंत राहिल्यामुळे मी फार कृतज्ञ आहे.—यशया ६०:२२; जखऱ्या ८:२३.
[२३ पानांवरील चित्र]
माझी बहिण मेरी आणि बाबा उभे आहेत, तसेच मी, जॉर्ज व आमच्या मुली एस्तेर आणि ॲन
[२४ पानांवरील चित्र]
बेथ आणि आयरिन या माझ्या दोन मुलींसोबत तसेच आयरिनचे पती व त्यांचे दोन मुलगे जे यहोवाची विश्वासूपणे सेवा करीत आहेत