“ट्रायरचा पवित्र अंगरखा”
ट्रायर, २,००० वर्षांचा इतिहास असलेले जर्मनीतील सर्वात जुने शहर आहे.a अनेक शतकांपर्यंत ट्रायरचे कॅथलिक चर्चसोबत घनिष्ठ संबंध होते. १९९६ मध्ये ट्रायरमधील कॅथड्रलने एका स्मारकावशेषाला प्रदर्शनासाठी ठेवले जे त्या शहराइतकेच जुने आहे असे समजले जाते. त्याला “ट्रायरचा पवित्र अंगरखा” संबोधले जाते.
तो अंगरखा १.५७ मीटर लांब व १.०९ मीटर रुंद आहे व अर्ध्या बाह्याचा आहे. तो कॉटनचा आहे व वॉलफट्र्सफुहर्र ट्रीर ऊंट उंगेबंग (ट्रायरच्या तीर्थयात्रेचे आणि आजूबाजूचे मार्गदर्शक), नामक आपल्या पुस्तकात हॅन्स-योयाकीम कॉन यांच्यानुसार, तो कदाचित बाह्य अंगरखा म्हणून वापरला जात होता. तो मूळ अंगरखा—अनेक शतकांपासून त्याला रफू करून व इतर वस्त्रे जोडून मजबूत करण्यात आले आहे—सा. यु. दुसऱ्या अथवा पहिल्या शतकातील असावा असा काहींचा अंदाज आहे. हा अंदाज बरोबर असेल तर, तो अंगरखा वस्त्रांतील दुर्मिळ व संग्रहालयातील मनोरंजक नमुना होईल.
परंतु, हे वस्त्र केवळ दुर्मिळच नव्हे तर पवित्र देखील आहे—यामुळे त्याला पवित्र अंगरखा हे नाव देण्यात आले आहे, असे काहींचे प्रतिपादन आहे. हे, असे आहे कारण तो अंगरखा, येशू ख्रिस्ताच्या आंतील अंगरख्याप्रमाणे बिनशिवणीचा आहे. (योहान १९:२३, २४) काहींचा दावा आहे, की तो “पवित्र अंगरखा” खरे तर मशीहाचा होता.
तो अंगरखा ट्रायरमध्ये कसा आला हे अनिश्चित आहे. एक संदर्भ ग्रंथ म्हणतो, की “कॉन्स्टंटाईन द ग्रेटची आई, सम्राज्ञी हेलन हिने तो शहराला नजराणा म्हणून दिला होता.” हा अंगरखा ट्रायरमध्ये ११९६ पासून आहे हा सर्वात पहिला विश्वसनीय पुरावा आहे असे कॉन म्हणतात.
कॅथड्रलमध्ये जपून ठेवलेला तो अंगरखा, १६ व्या शतकापासून अधूनमधून प्रदर्शनासाठी बाहेर ठेवला जातो. उदाहरणार्थ, तीस वर्षांच्या युद्धाच्या काही काळानंतर, १६५५ मध्ये, तो बाहेर ठेवण्यात आला होता पण ट्रायरला तसे करणे फार महागात पडले. तीर्थयात्रेतील स्मृतिचिन्हांच्या विक्रीने वेळोवेळी बराच फायदा करून दिला.
या शतकात—१९३३, १९५९ आणि १९९६ मध्ये, ‘पवित्र अंगरख्याच्या’ तीन तीर्थयात्रा होत्या. सन १९३३ मध्ये, हिटलरला जेव्हा जर्मन रिकचा चॅन्सलर नेमण्यात आले त्याच दिवशी तीर्थयात्रा घोषित करण्यात आली. ती तीर्थयात्रा कशी होती हे, योगायोगाने एकाच तारखेला घडलेल्या या दोन्ही घटनांवरून स्पष्ट होते असे कॉन दाखवतात. गणवेष घातलेल्या नात्सी सैन्याने, कॅथड्रलबाहेरील यात्रेकरूंच्या सन्मानार्थ सलामी दिली. त्या वर्षी अडीच कोटी लोकांनी तो अंगरखा पाहिला.
अनेक वर्षांपासून ट्रायरच्या रहिवासी हर्बटने १९५९ व १९९६ च्या तीर्थयात्रांची तुलना केली. “१९५९ मध्ये, प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर स्मरणिकांच्या विक्री करणाऱ्या टपऱ्यांमुळे रस्ते गजबजून गेले होते. त्यामानाने ह्या वर्षी बरीच शांतता आहे.” होय, १९९६ मध्ये केवळ ७,००,००० लोकांनी तो अंगरखा पाहिला, १९५९ मधील संख्येपेक्षा ही संख्या दहा लाखांनी कमी आहे.
ते तो अंगरखा पाहण्यासाठी का जातात?
त्या अंगरख्याला पूजेचे प्रतीक म्हणून लेखू नये असे चर्चचे ठाम म्हणणे आहे. बिनशिवणीचा तो अंगरखा चर्च ऐक्याचे द्योतक मानला जातो. फ्रँकफुरर्ट अलजमिन झीटुंग अहवाल देते, की तीर्थयात्रा घोषित करताना, बिशप श्पीटॉल म्हणाले: “आपल्या जगातील असामान्य परिस्थिती आम्हा ख्रिश्चनांसमोर असामान्य उत्तरे देण्याचे आव्हान मांडते. आपण द्वेष, निर्घृणपणा आणि हिंसेच्या वाढत्या लाटांविरुद्ध प्रतिकार केला पाहिजे.” तो अंगरखा पाहिल्याने एखाद्याला ऐक्याची आठवण होईल असे बिशपांनी म्हटले.
परंतु, चर्च ऐक्याची आठवण होण्याकरता एखाद्याला ‘पवित्र अंगरख्याची’ काय आवश्यकता आहे? तो अंगरखा खराब झाला अथवा फाटला किंवा बनावट म्हणून उघडकीस आला तर? चर्च ऐक्य धोक्यात येईल का? ट्रायरला तीर्थयात्रेला जाणे अशक्य असलेल्या लोकांबद्दल काय? चर्चमधील ऐक्याची त्यांना कमी जाणीव आहे का?
ख्रिस्ती ऐक्याची आठवण करून देण्यासाठी प्राचीन ख्रिश्चनांना चिन्हांची आवश्यकता होती असा उल्लेख पवित्र शास्त्रवचने कोठेही करीत नाहीत. होय, प्रेषित पौलाने ख्रिश्चनांना या शब्दांनी उत्तेजन दिले: “आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही.” (२ करिंथकर ५:७) म्हणूनच, खरे ख्रिश्चन अनुभवत असलेल्या ऐक्याचे वर्णन ‘विश्वासातील ऐक्य’ असे करण्यात आले आहे.—इफिसकर ४:११-१३.
[तळटीपा]
a सावध राहा! एप्रिल २२, १९८०, (इंग्रजी) पृष्ठे २१-३ पाहा.