एहूद—विश्वासू आणि धैर्यवान पुरुष
इस्राएलांना वचनयुक्त देशात जाऊन खूप वर्ष उलटली होती. मोशे आणि त्याचा उत्तराधिकारी यहोशवा केव्हाच मरण पावले होते. असे विश्वासू पुरुष नसल्यामुळे शुद्ध उपासनेबद्दलची कृतज्ञता आता राहिली नव्हती. इस्राएलांनी बाल दैवताची आणि पवित्र स्तंभांची उपासना करण्यासही सुरूवात केली होती.a त्यामुळे यहोवाने आपल्या लोकांना आठ वर्षांपर्यंत सिरियन लोकांच्या हाती दिले होते. तेव्हा इस्राएलांनी देवाकडे मदतीसाठी याचना केली. दयाळूपणे त्याने त्यांचे ऐकले. यहोवाने आपल्या लोकांची सुटका करण्यासाठी अथनिएल नावाचा एक न्यायाधीश त्यांच्यामध्ये उभा केला.—शास्ते ३:७-११.
या घटनांनी इस्राएलांना मूळ सत्य—यहोवाच्या आज्ञेत राहिल्यावर आशीर्वाद मिळतात तर अवज्ञा केल्यास शाप येतात, हे शिकवावयास हवे होते. (अनुवाद ११:२६-२८) परंतु, इस्राएल लोक हा धडा शिकले नाहीत. ४० वर्षांच्या शांतिमय काळानंतर, त्यांनी पुन्हा शुद्ध उपासना सोडून दिली.—शास्ते ३:१२.
मवाबियांनी केलेला कब्जा
यावेळेला यहोवाने आपल्या लोकांना मवाबचा राजा एग्लोनच्या हाती पडू दिले. बायबल त्याला “लठ्ठ” मनुष्य म्हणते. अम्मोन व अमालेकच्या साहाय्याने एग्लोनने इस्राएलवर हल्ला करून “खजुरीचे नगर,” यरिहोत आपला राजवाडा स्थापन केला. इस्राएलने विजय मिळवलेले पहिले कनानी शहर आता कमोश नावाच्या खोट्या दैवताची उपासना करणाऱ्याचे मुख्यालय बनले, हे किती विसंगत होते!b—शास्ते ३:१२, १३, १७.
एग्लोनने आणखी १८ वर्षांपर्यंत इस्राएलांवर जुलूम केला, त्यांच्याकडून भारी कर मागितला. वेळोवेळी कर घेण्याद्वारे मवाबने इस्राएलची साधनसंपत्ती लुटून आपला आर्थिक दर्जा बळकट केला. तेव्हा देवाच्या लोकांनी मदतीची याचना केली व पुन्हा एकदा यहोवाने त्यांचे ऐकले हे समजण्याजोगे आहे. यहोवाने त्यांच्याकरता एक दुसरा तारणकर्ता उभा केला, तो एहूद नामक एक बन्यामिनी होता. इस्राएलवरील एग्लोनचा जुलूम समाप्त करण्याकरता एहूदने कर भरण्याच्या दुसऱ्या दिवशीच कार्य करण्याची योजना आखली.—शास्ते ३:१४, १५.
आपल्या धैर्यवान युक्तीची तयारी करताना, एहूदने एक हातभर लांबीची दुधारी तरवार बनवली. ते शस्त्र हातभर लांब होते म्हणजे ३८ सेंटीमीटर लांबीचे होते. काहीजण म्हणतात की ते खंजीर असावे. परंतु, पात आणि मुठ यामध्ये आडवा तुकडा नव्हता. यास्तव, एहूद आपली छोटीशी तलवार त्याच्या वस्त्राच्या घड्यांमध्ये लपवू शकला. शिवाय, एहूद डावखुरा असल्यामुळे, सर्वसामान्यपणे शस्त्र बांधले जात नाही त्या उजव्या बाजूला तो आपली तलवार लटकवू शकला.—शास्ते ३:१५, १६.
एहूदने रचलेला डावपेच जोखिमीचा होता. उदाहरणार्थ, राजाच्या सेवकांनी एहूदकडे शस्त्र आहेत की नाही हे पाहण्यासाठी त्याची झडती घेतली असती तर? आणि त्यांनी जरी झडती घेतली नाही तरी, आपल्या राजाला नक्कीच ते एका इस्राएलीसोबत एकटे सोडणार नाहीत! पण त्यांनी तसे केले आणि एग्लोनचा खून झाला तर एहूद तेथून कसा निसटणार होता? एग्लोनच्या सेवकांना काय घडले होते हे समजण्याच्या आधी तो कोठपर्यंत पळाला असता?
एहूदने या सर्व गोष्टींचा विचार केला होता, कदाचित अनेक संकटमय परिणामांची देखील त्याने कल्पना केली होती, यात काहीच शंका नाही. तरीसुद्धा, तो आपल्या योजनेप्रमाणे पुढे गेला, व धैर्य प्रकट करून त्याने यहोवावर विश्वास ठेवला.
एहूद एग्लोनला भेटतो
दुसरा कर देण्याचा दिवस उगवतो. एहूद आणि त्याचे लोक राजाच्या दरबारात प्रवेश करतात. थोड्याच वेळात ते राजा एग्लोनसमोर उभे राहतात. परंतु एहूदने हल्ला करण्याची ही वेळ नव्हती. कर पेश केल्यानंतर, एहूदने कर घेऊन आलेल्या लोकांची रवानगी केली.—शास्ते ३:१७, १८.
एहूद एग्लोनवर हल्ला चढवण्यात दिरंगाई का करीत होता? तो घाबरला होता का? मुळीच नाही! आपली योजना पूर्ण करण्यासाठी एहूदला एग्लोनला एकांतात गाठायचे होते—आणि पहिल्या भेटीत हे शक्य नव्हते. शिवाय, एहूदला तेथून त्वरित पळ काढणे आवश्यक होते. एकट्याला तेथून पळ काढणे जसे सोपे होते तसे कर घेऊन आलेल्यांसोबत पळ काढणे सोपे नव्हते. यास्तव, एहूद उचित वेळेची वाट पाहत होता. एग्लोनसोबतच्या संक्षिप्त भेटीमुळे तो राजवाड्याच्या रचनेशी परिचित होऊ शकला व राजा कितपत सुरक्षित होता हे ठरवू शकला.
“गिलगालाजवळील पाषाणमूर्तीपर्यंत गेल्यावर” एहूदने आपल्या लोकांना तेथेच सोडले व पुन्हा एग्लोनच्या राजवाड्यात आला. जवळजवळ दोन किलोमीटर पायी चालत असताना एहूदला आपल्या कामगिरीवर विचार करावयास व यहोवाच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावयास वेळ मिळाला.—शास्ते ३:१९.
एहूद पुन्हा येतो
एहूदचे राजवाड्यात पुन्हा स्वागत केले जाते. कदाचित त्याने आधी सादर केलेल्या करामुळे एग्लोन बेहद खूष झाला होता. पहिली भेट संक्षिप्त असली तरीसुद्धा, एहूदला राजाबरोबर संबंध प्रस्थापित करण्याची कदाचित पुरेशी संधी मिळाली. असो, एहूद पुन्हा एग्लोनसमोर उभा होता.
एहूद म्हणाला: “महाराज, मला आपल्याला काही गुप्त गोष्ट सांगायची आहे.” तो इतक्या दूरहून आला होता ही वस्तुस्थिती दाखवून देते, की यहोवा त्याला मार्गदर्शन करीत होता. तरी, एक समस्या होती. एहूद ती “गुप्त गोष्ट” राजाच्या सेवकांसमोर सांगू शकत नव्हता. यहोवा हस्तक्षेप करणार होता तर एहूदला लागलीच मदतीची आवश्यकता होती. राजाने आज्ञा दिली: “गप्प राहा.” ही गुप्त गोष्ट कोणीही ऐकू नये म्हणून एग्लोनने आपल्या सेवकांना बाहेर जाण्यास सांगितले. कल्पना करा, एहूदला तेव्हा किती बरे वाटले असावे!—शास्ते ३:१९.
एहूद जवळ आला त्या समयी एग्लोन आपल्या हवेशीर माडीवर एकटा बसला होता आणि त्याला म्हणाला: “मी आपणासाठी देवाचा संदेश आणला आहे.” “देवाचा” असा उल्लेख करण्याद्वारे एहूद कमोशविषयी बोलत होता का? एग्लोनला तसेच वाटले असावे. उत्सुकतेने तो लागलीच आपल्या आसनावरून उठला व एहूदकडे आशेने पाहू लागला. एहूद हल्ला चढवणार आहे याची पुसट देखील शंका त्याला येऊ न देता त्याच्या जवळ गेला. मग, एका झटक्यात त्याने “आपला डावा हात लावून आपल्या उजव्या मांडीवरून कट्यार काढून [एग्लोनच्या] पोटात खुपसली. आणि पात्याबरोबर मूठहि आत गेली, आणि मांदे पात्यावर असे लगटले की त्याच्याने कट्यार त्याच्या पोटातून काढवेना, आणि विष्ठा बाहेर आली.”—शास्ते ३:२०-२२, पं.र.भा.
दरवाजाच्या जवळपास घुटमळत असलेले राजाचे सेवक जागृत झाले नाहीत. पण एहूद अजूनही धोक्यातच होता. कोणत्याही क्षणी एग्लोनचे सेवक आत येऊन खाली पडलेल्या राजाचे शव पाहू शकत होते. एहूदला तेथून त्वरित पळ काढण्याची गरज होती! दाराला कुलूप लावून तो माडीवरील खोलीच्या झरोक्यातून पळाला.—शास्ते ३:२३, २४अ.
शोध लागणे व पराजय
एग्लोनच्या सेवकांची उत्सुकता वाढतच राहिली. तरीही, राजाच्या खासगी बैठकीत व्यत्यय आणून राजाला नाखूष करण्याचा धोका पत्करण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. मग त्यांनी पाहिले की माडीवरील दरवाजे बंद होते. त्यांना वाटले की, “तो आपल्या हवेशीर खोलीच्या संडासात गेला असेल.” परंतु वेळ जशी निघून गेली तशी त्यांच्या उत्सुकतेचे चिंतेत रूपांतर झाले. एग्लोनचे सेवक अधिक काळ थांबू शकले नाहीत. “त्यांनी किल्ली घेऊन [माडीवरील दरवाजे] उघडले आणि पाहतात तो त्यांचा स्वामी मरुन भूमीवर पडला होता!”—शास्ते ३:२४ब, २५.
यावेळेपावेतो, एहूद तेथून पळाला होता. तो पाषाणमूर्तीच्या पलीकडे, एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील एका ठिकाणी म्हणजेच सईरा येथे जाऊन पोहंचला. एहूदने इस्राएली लोकांना एकत्र बोलावले आणि सर्वांनी संयुक्त होऊन मवाबियांवर हल्ला चढवला. अहवाल सांगतो, की “त्यांनी मवाबियांचे सुमारे दहा हजार लोक मारले; ते सर्व धिप्पाड व शूर वीर होते; त्यांच्यातला कोणीहि बचावला नाही.” मवाबवर विजय मिळवल्यावर इस्राएल देशाला पुढील ८० वर्षांपर्यंत काहीच त्रास झाला नाही.—शास्ते ३:२६-३०.
एहूदच्या उदाहरणावरून शिकणे
देवावरील विश्वासाने एहूदला प्रेरणा दिली होती. इब्री लोकांस ११ वा अध्याय, ‘विश्वासाच्या द्वारे राज्ये जिंकणारा, लढाईत पराक्रमी झालेला, परक्यांची सैन्ये पळवणारा,’ असा त्याच्याबद्दल खास उल्लेख करीत नाही. (इब्री लोकांस ११:३३, ३४) तरीसुद्धा, एहूदने विश्वासाद्वारे कार्य करून इस्राएल राष्ट्राला एग्लोन राजाच्या जुलूमी सत्तेतून सोडवताना यहोवा त्याच्या पाठीशी होता.
धैर्य हा एहूदचा एक गुण होता. प्रभावकारीपणे तलवार चालवण्याकरता त्याला धैर्याची आवश्यकता होती. देवाचे वर्तमानकाळचे सेवक या नात्याने, आपण तलवार बाळगत नाही. (यशया २:४; मत्तय २६:५२) तरीसुद्धा, आपण “आत्म्याची तरवार” म्हणजेच देवाच्या वचनाचा उपयोग करतो. (इफिसकर ६:१७) शस्त्र चालवण्यात एहूद तरबेज होता. राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना आपणही देवाच्या वचनाचा वापर करण्यात कौशल्यपूर्ण असण्याची गरज आहे. (मत्तय २४:१४) बायबलचा व्यक्तिगत अभ्यास, ख्रिस्ती सभांमध्ये नियमित उपस्थिती, सेवाकार्यात आवेशी भाग आणि आपल्या स्वर्गीय पित्यावरील प्रार्थनापूर्वक भरवसा या गोष्टी विश्वास आणि धैर्य असलेल्या एहूदने प्रकट केलेल्या गुणांचे अनुकरण करण्यास मदत करतील.
[तळटीपा]
a पवित्र स्तंभ, कदाचित पुरुष लिंगाच्या प्रतिमा होत्या. अत्यंत अनैतिक लैंगिक पार्ट्यांशी त्यांचा संबंध होता.—१ राजे १४:२२-२४.
b कमोश मवाबियांचे मुख्य दैवत होते. (गणना २१:२९; यिर्मया ४८:४६) काही प्रसंगी तरी, या घृणास्पद खोट्या दैवताला मुलांचा बळी दिला जात होता.—२ राजे ३:२६, २७.
[३१ पानांवरील चित्र]
एहूद आणि त्याच्या लोकांनी एग्लोन राजाला कर पेश केला
[चित्राचे श्रेय]
Illustrirte Pracht - Bibel/Heilige Schrift des Alten und Neuen Testaments, nach der deutschen Uebersetzung D. Martin Luther’s यातून पुनःनिर्माण केलेले.