वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 ३/१५ पृ. २५-२८
  • तुम्ही तुमच्या मुलाला बोर्डींगमध्ये दाखल करावे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही तुमच्या मुलाला बोर्डींगमध्ये दाखल करावे का?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शिक्षण आणि आध्यात्मिकता
  • इतर विद्यार्थ्यांचा प्रभाव
  • शिक्षकांचा प्रभाव
  • मर्यादित हालचाल
  • वेगळे असल्याचे उठून दिसणे
  • पालकीय जबाबदारी
  • पर्यायी मार्ग आहेत का?
  • मी शाळा सोडावी का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • तुमची मुले शाळेत दृढनिश्‍चयी असतात का?
    आमची राज्य सेवा—१९९०
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 ३/१५ पृ. २५-२८

तुम्ही तुमच्या मुलाला बोर्डींगमध्ये दाखल करावे का?

समजा तुम्ही न्यूनविकसित देशातील एका लहानशा गावात राहत आहात. प्राथमिक शाळेत जाणारी तुमची मुले आहेत पण १२ व्या वर्षी ते माध्यमिक शाळेत जाऊ लागतील. तुमच्या क्षेत्रात माध्यमिक शाळा खच्चून भरल्या आहेत, सोयी सवलती नाहीत व कर्मचारी वर्गही कमी आहे. संपांमुळे कधी कधी अनेक आठवड्यांपर्यंत व महिन्यांपर्यंत शाळा बंद राहते.

कोणीतरी तुम्हाला शहरातील एका बोर्डींगचे वर्णन करणारे एक आकर्षक माहितीपत्रक देतो. तुम्ही आनंदी, नीटनेटके गणवेश घातलेल्या, सर्व सुविधा असलेल्या वर्गांत, प्रयोगशाळांत व ग्रंथालयांत अभ्यास करीत असणाऱ्‍या विद्यार्थ्यांची चित्रे पाहता. विद्यार्थी संगणकांचा उपयोग करत आहेत व स्वच्छ, आकर्षक डॉमेट्रीमध्ये आराम करतात. विद्यार्थ्यांना “ते पात्र असलेल्या सर्वात उच्च दर्जाचे शिक्षण साध्य करण्यास” मदत करण्याचा शाळेचा एक उद्देश असल्याचे तुम्ही वाचता. सर्वसामान्यपणे, एखाद्या कुटुंबात ज्याप्रमाणे “सभ्यपणा, शिष्टाचार, पालक आणि वडीलजणांबद्दल आदर, सहकार्य, सहिष्णुता, दया, प्रामाणिकता व निष्ठा या गुणांवर जोर दिला जातो, अशाच प्रकारच्या वर्तनाची अपेक्षा सर्व विद्यार्थ्यांकडून केली जाते,” असेही तुम्ही वाचता.

एका हसमुख तरुणाला असे म्हणत असल्याचे उद्धृत केले आहे: “माझ्या पालकांनी मला सर्वात उत्तम शाळेत जाण्याचा उल्लेखनीय विशेषाधिकार दिला.” एक मुलगी म्हणते: “शाळा आव्हानात्मक आणि उत्तेजनात्मक आहे. येथील वातावरण आपल्याला शिकण्यासाठी मदत करते.” तुम्ही आपल्या मुलाला अथवा मुलीला अशा एका बोर्डींगमध्ये दाखल कराल का?

शिक्षण आणि आध्यात्मिकता

काळजी वाहणाऱ्‍या सर्व पालकांना आपल्या मुलांच्या जीवनाची उत्तम सुरवात करण्याची इच्छा असते व त्यासाठी पूर्ण, समतोल शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. बहुतेक वेळा लौकिक शिक्षणामुळे भवितव्यात नोकरीची संधी मिळते व तरुणांना प्रौढ होऊन आपल्या पायांवर उभे राहून आपल्या भावी कुटुंबाची काळजी घेण्यास मदत करते.

‘एखादे बोर्डींग उत्तम शिक्षणासोबत काही नैतिक मार्गदर्शन देत असल्यास त्याचा फायदा का घेऊ नये?’ असे कदाचित तुम्ही विचाराल. या प्रश्‍नाचे उत्तर देताना, ख्रिस्ती पालकांनी एका अतिमहत्त्वपूर्ण कारणाचा अर्थात आपल्या मुलांच्या आध्यात्मिक कल्याणाचा प्रार्थनापूर्वक विचार करावा. येशू ख्रिस्ताने विचारले: “मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?” (मार्क ८:३६) अर्थातच, त्यामध्ये काहीच फायदा नाही. यास्तव, आपल्या मुलांना एखाद्या बोर्डींग शाळेत पाठवण्याचा निर्णय घेण्याआधी ख्रिस्ती पालकांनी, यामुळे त्यांच्या मुलांच्या सार्वकालिक जीवनाच्या भावी आशेवर कोणता परिणाम घडू शकतो याचा विचार करावा.

इतर विद्यार्थ्यांचा प्रभाव

काही बोर्डींग शाळांमध्ये प्रभावकारी शैक्षणिक दर्जे असू शकतात. परंतु, तेथे शिकत असलेल्या इतरांच्या किंवा कदाचित अशा शाळा चालवणाऱ्‍यांच्या नैतिक दर्जांविषयी काय? या ‘शेवटल्या काळात’ ज्या प्रकारचे लोक फोफावतील त्याबद्दल प्रेषित पौलाने लिहिले: “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील . . . कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासूनहि दूर राहा.”—२ तीमथ्य ३:१-५.

हा नैतिक व आध्यात्मिक ऱ्‍हास विश्‍वव्यापी आहे जो बायबलच्या तत्त्वांनुरूप जगणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांसमोर एकप्रकारचे आव्हान मांडतो. दररोज शाळेतून घरी येणाऱ्‍या विद्यार्थ्यांना, जगिक शाळासोबत्यांसोबतची मर्यादित संगतीसुद्धा त्यांच्या आध्यात्मिकतेवर शक्‍तिशाली नकारात्मक प्रभाव पाडू शकते, असे दिसून आले आहे. त्या प्रभावाचा विरोध करण्यासाठी तरुण साक्षीदारांना आपल्या पालकांचा भावनिक व आध्यात्मिक पाठिंबा, सल्ला व उत्तेजन असतानाही झगडावे लागते.

तेव्हा, आपल्या घरांपासून दूर बोर्डींग शाळेत पाठवलेल्या मुलांची अवस्था कशी आहे? ते आपल्या प्रेमळ पालकांच्या नियमित आध्यात्मिक पाठिंब्याला मुकले आहेत, वंचित आहेत. ते २४ तास आपल्या वर्गसोबत्यांसोबत राहत असल्यामुळे, इतर मुलांप्रमाणे वागण्याचा दबाव त्यांच्या कोवळ्या मनांवर व अंतःकरणावर जोरदार प्रभाव पाडतो, जो घरी राहणाऱ्‍या विद्यार्थ्यांवर कदाचित इतका पडणार नाही. एका विद्यार्थ्याने म्हटले: “बोर्डींग शाळेत राहणारा सकाळपासून रात्रीपर्यंत नैतिकरीत्या धोक्याच्या टांगत्या तरवारीखाली असतो.”

पौलाने लिहिले: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) देवाची सेवा न करणाऱ्‍यांसोबत निरंतर सहवास राखल्याने आपल्या मुलांना आध्यात्मिक हानी होणार नाही असा विचार करून ख्रिस्ती पालकांनी स्वतःची दिशाभूल करून घेऊ नये. काही काळानंतर, ईश्‍वरी मुले ख्रिस्ती मूल्यांप्रती बधिर होऊन आध्यात्मिक गोष्टींबद्दलची सर्व कृतज्ञता गमावू शकतात. मुलांनी बोर्डींग शाळा सोडेपर्यंत पालकांना ते जाणवणार नाही. अनेकदा ही गोष्ट हाताबाहेर गेल्याची दिसते.

क्लेमेंटचा अनुभव विशिष्ट आहे. तो सांगतो: “बोर्डींग शाळेत जाण्याआधी मला सत्य आवडत होते व मी बांधवांसोबत क्षेत्र सेवेत जात होतो. मला आमच्या कौटुंबिक बायबल अभ्यासात आणि मंडळीच्या पुस्तक अभ्यासात भाग घेण्यास विशेष आवडत असे. परंतु, वयाच्या १४ व्या वर्षी बोर्डींग शाळेत आल्यापासून मी सत्य पूर्णपणे सोडून दिले. बोर्डींग शाळेतील माझ्या पाच वर्षांच्या वास्तव्यादरम्यान मी केव्हाही सभांना उपस्थित राहिलो नाही. वाईट संगतीमुळे मी अंमली पदार्थ सेवन करून लागलो, धुम्रपान करू लागलो व दारूडा बनलो.”

शिक्षकांचा प्रभाव

कोणत्याही शाळेत आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करणारे नैतिकरीत्या भ्रष्ट शिक्षक असू शकतात. काही जण क्रूर व कठोर असतात आणि इतर आपल्या विद्यार्थ्यांचा लैंगिकरीत्या उपयोग करतात. बोर्डींग शाळांमध्ये अशा शिक्षकांच्या कृत्यांची सहसा तक्रार न होण्याची शक्यता असू शकते.

परंतु, बहुतेक शिक्षक मुलांनी समाजाचे फलदायक सदस्य व्हावे, सभोवतालच्या जगाचे भाग व्हावे, तदनुरूप व्हावे म्हणून प्रामाणिक प्रयत्न करत असतात. पण साक्षीदार मुलांकरता येथे आणखी एक समस्या आहे. जगाची मूल्ये नेहमीच ख्रिस्ती तत्त्वांशी जुळत नाहीत. शिक्षक मुलांना जगाचे भाग होण्यास उत्तेजन देतात पण आपले अनुयायी ‘जगाचे भाग होणार नाहीत’ असे येशू म्हणाला होता.—योहान १७:१६.

मुले बायबल तत्त्वे अनुसरत असताना समस्या आल्यास काय? मुले घरीच राहून एखाद्या स्थानिक शाळेत जात असतील तर ते आपल्या पालकांसोबत या गोष्टींची चर्चा करू शकतात. आणि पालक, आपल्या मुलांना मार्गदर्शन देऊ शकतात, शक्य असल्यास, शिक्षकांसोबत बोलूही शकतात. यामुळे, समस्या आणि गैरसमजुती यांचे बहुधा लवकर निरसन होते.

बोर्डींग शाळेत असे नसते. बोर्डींगमधील विद्यार्थी कायम त्यांच्या शिक्षकांच्या ताब्यात असतात. ख्रिस्ती तत्त्वांमुळे मुलांनी एखादा पवित्रा घेतला तर तो त्यांना त्यांच्या पालकांच्या दररोजच्या पाठिंब्याविना घ्यावा लागतो. कधीकधी मुले अशा परिस्थितीतही देवाशी विश्‍वासू राहतात. परंतु बहुतेक वेळा ते राहतही नाहीत. एखाद्या मुलाने शिक्षकाच्या इच्छेप्रमाणे वागण्याची शक्यता असू शकते.

मर्यादित हालचाल

युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांना आपल्या मनानुसार येण्याची वा जाण्याची मोकळीक असते पण, बोर्डींग शाळेत मुलांच्या हालचालींवर मर्यादा असते. पुष्कळ बोर्डींग शाळा, विद्यार्थ्यांना रविवार शिवाय शाळेचे कंपाउंड सोडून बाहेर जाऊ देत नाहीत आणि काही तर तेवढ्यालाही परवानगी देत नाहीत. बोर्डींग शाळेत जाणारी एरू नामक ११ वर्षीय मुलगी म्हणते: “शाळा अधिकारी आम्हाला सभांना व क्षेत्र सेवेला तर कधीच जाऊ देत नाहीत. शाळेच्या आत फक्‍त कॅथलिक आणि मुस्लिमांसाठी धार्मिक सेवा असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने यापैकी कोणते तरी एक निवडावे नाही तर शिक्षक आणि मुलांकडून येणाऱ्‍या तीव्र विरोधाला तोंड द्यावे. विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत व चर्चगीत गाण्यास बळजबरी केली जाते.”

पालक आपल्या मुलांना अशा शाळांमध्ये दाखल करतात तेव्हा ते आपल्या मुलांच्या मनावर काय बिंबवत असतात? कदाचित हे, की उपासनेसाठी एकत्र होण्यापेक्षा व शिष्य बनवण्याच्या कार्यात भाग घेण्यापेक्षा तसेच देवाशी एकनिष्ठ राहण्याच्या महत्त्वापेक्षा लौकिक शिक्षण जास्त महत्त्वाचे आहे.—मत्तय २४:१४; २८:१९, २०; २ करिंथकर ६:१४-१८; इब्री लोकांस १०:२४, २५.

काही बोर्डींग शाळांमध्ये, तरुण साक्षीदार एकत्र मिळून बायबलचा अभ्यास करू शकले आहेत पण हेही बहुतेक वेळा कठीण आहे. १६ वर्षीय ब्लेसिंग, आपल्या बोर्डींग शाळेविषयी म्हणते: “स्वतःला ख्रिस्ती म्हणवून घेणारे विद्यार्थी दररोज प्रार्थना करायला एकत्र जमतात. आम्ही साक्षीदार त्यांना विनंती करत असतो, की त्यांनी आम्हाला बायबल अभ्यास करण्याची परवानगी द्यावी, पण सिनियर आम्हाला म्हणतात, की तुमची संघटना मान्यता प्राप्त नाही. मग ते आम्हाला त्यांच्यासोबत प्रार्थना करायला भाग पाडतात. नकार दिल्यास ते आम्हाला शिक्षा देतात. शिक्षकांना याविषयी सांगितले तर प्रकरण आणखीनच चिघळते. ते आम्हाला नावं ठेवतात आणि सिनियर विद्यार्थ्यांना आम्हाला शिक्षा द्यायला सांगतात.”

वेगळे असल्याचे उठून दिसणे

बोर्डींग शाळेतील विद्यार्थी यहोवाचे साक्षीदार म्हणून स्पष्ट ओळखले जातात तेव्हा त्यांचा फायदा होऊ शकतो. शाळा अधिकारी, साक्षीदारांच्या विश्‍वासांच्या विरोधात जाणाऱ्‍या सक्‍तीच्या खोट्या धार्मिक कार्यांमध्ये भाग घेण्यापासून कदाचित त्यांना माफ करू शकतात. सहविद्यार्थी अहितकारक कार्यांमध्ये व संभाषणांमध्ये कदाचित त्यांना गोवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. सहविद्यार्थ्यांना व शिक्षकांना साक्ष देण्याची त्यांना संधी मिळू शकते. शिवाय, ख्रिस्ती तत्त्वांनुरूप जगणाऱ्‍यांवर गंभीर अपराधाचा कदाचित संशय घेतला जाणार नाही, केव्हा केव्हा त्यांना शिक्षकांकडून आणि सहविद्यार्थ्यांकडून आदर मिळू शकतो.

परंतु सर्वच वेळी असे घडत नसते. वेगळे असल्याचे उठून दिसत असल्यामुळे एखादा तरुण विद्यार्थी आणि शिक्षकांकडून छळाचा व थट्टेचा विषय बनतो. बोर्डींग शाळेत जाणारा १५ वर्षीय यिंकॉ म्हणतो: “तुम्ही यहोवाचे साक्षीदार म्हणून शाळेत ओळखले जात असाल तर तुम्ही निशाणा बनता. त्यांना आपला आध्यात्मिक व नैतिक पवित्रा माहीत असल्यामुळे कशात न्‌ कशात ते आपल्याला पकडायचा प्रयत्न करत असतात.”

पालकीय जबाबदारी

कोणताही शिक्षक, शाळा किंवा कॉलेज, मुलांना यहोवाचे समर्पित सेवक घडवण्याचे काम योग्य रीतीने करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. ते त्यांचे काम नव्हे किंवा त्यांची जबाबदारीही नव्हे. देवाचे वचन सांगते, की स्वतः पालकांनी आपल्या मुलांच्या आध्यात्मिक गरजांची काळजी घेतली पाहिजे. पौलाने लिहिले: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका, तर प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात त्यांना वाढवा.” (इफिसकर ६:४) पण आपली मुले एखाद्या बोर्डींग शाळेत असतील आणि महिन्यातून केवळ एकदा किंवा दोनदाच त्यांना भेटण्याची परवानगी असते तेव्हा पालक हा ईश्‍वरी सल्ला कसा लागू करू शकतात?

प्रत्येक वेळा परिस्थिती बदलते, पण ख्रिस्ती पालक पुढील प्रेरित विधानाच्या सुसंगतेत कार्य करण्यासाठी झटत असतात की, “जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्‍वास नाकारला आहे; तो माणूस विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.”—१ तीमथ्य ५:८.

पर्यायी मार्ग आहेत का?

बोर्डींग शाळा अथवा सोयी सवलती नसलेली स्थानिक शाळा—या दोनच निवडी पालकांसमोर असल्यास ते काय करू शकतात? अशा परिस्थितीत काही पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी स्थानिक शाळेतच ट्युशनची व्यवस्था केली आहे. इतर पालक आपल्या मुलांना स्वतःच शिक्षण देण्यासाठी वेळ काढतात.

कधीकधी काही पालक, आपली मुले माध्यमिक शाळेत जाण्याच्या वयाची होण्याआधीच व्यवस्था करण्याद्वारे समस्या टाळतात. तुमची मुले लहान असतील किंवा कुटुंब वाढवण्याची तुमची योजना असेल तर, तुम्ही राहता तेथे बऱ्‍यापैकी माध्यमिक शाळा आहे की नाही हे तुम्ही पाहू शकता. नसल्यास, जेथे आहे तेथे जवळपास कोठे राहवयास जाऊ शकता.

पालकांना माहीत आहेच, की मुलाठायी यहोवाविषयी प्रेम बिंबवण्याकरता कौशल्य, धीर आणि खूप वेळेची आवश्‍यकता असते. मूल घरी असताना तसे करणे कठीण आहे तर मूल कोठे तरी दूर राहत असते तेव्हा तर ते किती तरी कठीण! यामध्ये मुलाचे सार्वकालिक जीवन गोवल्यामुळे, पालकांनी गंभीरपणे व प्रार्थनापूर्वक निर्णय घेतला पाहिजे, की आपल्या लहान मुलाला एखाद्या बोर्डींगच्या हवाली करण्याचा धोका पत्करण्यालायक आहे की नाही. एका बोर्डींग शाळेतील शिक्षणाच्या फायद्यासाठी मुलाच्या आध्यात्मिक आस्था त्यागणे किती अदूरदर्शीपणाचे ठरेल! असे करणे म्हणजे एका जळत्या घरात शिरून, एखादे लहानसे खेळणे जळू नये म्हणून ते काढण्याचा प्रयत्न करण्याप्रमाणे होईल.

देवाचे वचन म्हणते: “चतुर मनुष्य अरिष्ट येता पाहून लपतो; भोळे पुढे जातात आणि हानि पावतात.” (नीतिसूत्रे २२:३) वाईट प्रसंग नंतर सुधारण्याऐवजी तो ओढवण्याआधीच टाळणे बरे आहे. ‘माझ्या मुलाला मी बोर्डींगमध्ये दाखल करावे का?’ असा प्रश्‍न स्वतःला विचारून वरील गोष्टींचा विचार करणे सुज्ञपणाचे ठरेल.

[२८ पानांवरील चौकट]

बोर्डींग शाळेबद्दल तरुण साक्षीदारांचे मनोगत

“बोर्डींग शाळेत तरुण साक्षीदार आध्यात्मिक सहवासापासून वंचित असतात. ते वातावरण अगदी प्रतिकूल आहे जेथे चूक करण्याकरता खूप दबाव आणला जातो.”—११ ते १४ वयोमानादरम्यान बोर्डींग शाळेत असलेला रोटमी.

“ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे अगदीच कठीण होते. मी फक्‍त रविवारच्या दिवशी उपस्थित राहू शकत होते, आणि त्यासाठी मला सर्व मुले चर्चला जाण्याकरता रांगेत उभे असताना तेथून निसटावे लागत असे. मी कधीही आनंदी नव्हते, कारण घरी असताना मंडळीच्या सर्व सभांना उपस्थित राहण्याची मला सवय झाली होती व शनिवार रविवार मी क्षेत्र सेवेत जात होते. शाळेचा मला उभारणीकारक अनुभव आला नाही. मी खूप गोष्टी गमावल्या.”—शाळेतील चर्च सेवांत भाग घेत नसल्यामुळे वारंवार शिक्षकांकडून छडीचा मार खाणारी एस्तेर.

“बोर्डींग शाळेत सहविद्यार्थ्यांना साक्ष देणं इतकं सोपं नाही. वेगळे उठून दिसणे इतकं सोपं नाही. मला दुसऱ्‍या मुलांसारखं व्हायचं होत. मी सभांना व क्षेत्र सेवेत जाऊ शकले असते तर कदाचित धीट झाले असते. पण असे मी, वर्षातून फक्‍त तीन वेळा, म्हणजे सुटीवर असतानाच करू शकत होते. तुमच्याकडे एखादा दिवा असेल व त्यात तुम्ही तेल ओतले नाही तर त्याचा प्रकाश अगदी अंधुक पडतो. शाळेत माझी हीच गत होती.”—११ ते १६ वयोमानादरम्यान बोर्डींग शाळेत असलेली लॉरा.

“मी आता बोर्डींग शाळेत नाही म्हणून मला आनंद वाटतो कारण मी सर्व सभांना उपस्थित राहू शकते, क्षेत्र सेवेत भाग घेऊ शकते आणि माझ्या संपूर्ण कुटुंबासोबत दैनिक वचनाचा आनंद लुटू शकते. बोर्डींग शाळेत शिक्षण घेण्याचे काही फायदे असले तरीसुद्धा यहोवासोबतच्या माझ्या नातेसंबंधापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक महत्त्वाची नाही.”—बोर्डींग शाळेतून काढण्यास आपल्या पित्याला पटवू शकणारी नओमी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा