सत्यामुळे स्वतंत्र झालेले
संयुक्त संस्थानांत, दहा लाखांपेक्षा अधिक लोक तुरुंगवासात आहेत. यांपैकी, जवळजवळ तीन हजार जणांना मृत्युदंड देण्यात आला आहे. तुम्ही स्वतः त्या परिस्थितीत असल्याचे चित्र उभे करा. तुम्हाला कसे वाटेल? निश्चितच, अशा प्रकारच्या आशेचा विचार खिन्न करणारा आहे. तरीसुद्धा, सर्व मानवजात एका अर्थाने अशाच एका परिस्थितीत आहे. बायबल म्हणते: “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३) होय, आदामाचे वंशज या नात्याने, आपण एका पापी अवस्थेत “बंदिस्थ” आहोत. (रोमकर ५:१२) ख्रिस्ती प्रेषित पौलाप्रमाणे आपल्यालाही आपल्या बंदिवासाचे परिणाम रोज जाणवतात, ज्याने असे लिहिले: “माझ्या अवयवांत मला निराळाच नियम दिसतो; तो माझ्या मनातला नियमाबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवांतील पापाच्या नियमाच्या स्वाधीन करितो.”—रोमकर ७:२३.
आपल्या पापी स्वभावामुळे, आपल्यातील प्रत्येकाला जणू काय मृत्युदंड मिळाला आहे कारण बायबल म्हणते: “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) स्तोत्रकर्त्या मोशेनेसुद्धा आपल्या अवस्थेचे अगदी उचितपणे वर्णन केले: “आमचे आयुष्य सत्तर वर्षे—आणि शक्ति असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.”—स्तोत्र ९०:१०; पडताळा याकोब ४:१४.
“सत्य तुम्हाला बंधमुक्त करील,” असे येशूने आपल्या अनुयायांना म्हटले तेव्हा त्याच्या मनात, मानवजातीचे पाप आणि मृत्यूचे दास्यत्व होते. (योहान ८:३२) या शब्दांनी येशू आपल्या अनुयायांना रोमी शासनापासूनच्या स्वातंत्र्यापेक्षा उत्तम आशा प्रदान करत होता—तो त्यांना पापाची क्षमा आणि मृत्यूपासून सुटका सादर करीत होता! ते त्यांना कसे मिळणार होते? येशूने त्यांना सांगितले, “जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल.” (योहान ८:३६) होय, ‘पुत्राने’ म्हणजेच येशूने आपले जीवन देऊन आदामाने जे गमावले ते पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रायश्चित बलिदान या नात्याने कार्य केले. (१ योहान ४:१०) यामुळे सर्व आज्ञाधारक मानवजातीसमोर पाप आणि मृत्यूच्या दास्यत्वातून मुक्त होण्याचा मार्ग खुला झाला. देवाचा एकुलता एक पुत्र मरण पावला जेणेकरून “जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”—योहान ३:१६.
यास्तव, आपल्याला बंधमुक्त करणारे सत्य येशू ख्रिस्ताभोवती केंद्रित आहे. जे कोणी त्याच्या पावलांवर पाऊल ठेवणारे त्याचे अनुयायी बनतात त्या सर्वांना, देवाचे राज्य जेव्हा पृथ्वीवरील सर्व कारभार आपल्या हाती घेईल तेव्हा पाप आणि मृत्यूपासून मुक्त होण्याची आशा आहे. आताही, देवाच्या वचनातील सत्याचा जे स्वीकार करतात ते अस्सल स्वातंत्र्याचा आनंद लुटतात. कोणत्या प्रकारे?
मृतांच्या भयापासून स्वातंत्र्य
कोट्यवधी लोकांना आज मृतांचे भय आहे. का बरे? कारण, मृत्यूनंतर आत्मा शरीर सोडून जातो व एका आत्मिक क्षेत्रात प्रवेश करतो असे त्यांच्या धर्माने त्यांना शिकवले आहे. म्हणूनच तर, काही देशांमध्ये प्रथेनुसार, मृताचे नातेवाईक अनेक दिवस आणि रात्र जागरण करतात. यामध्ये बहुतेकवेळा, मोठमोठ्याने गायन व ढोल वाजवणे समाविष्ट आहे. शोक करणाऱ्यांना वाटते की असे केल्याने मृत व्यक्ती संतुष्ट होईल आणि जिवंत असलेल्यांना त्रास देण्यासाठी तिचा आत्मा पुन्हा येण्याचे टळेल. मृतांबद्दल ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या शिकवणुकींनी तर या परंपरेला जिवंत ठेवले आहे.
पण बायबल मृत्यांच्या स्थितीबद्दलचे सत्य प्रकट करते. ते स्पष्टपणे सांगते की तुमचा जीव, मृत्यूनंतर जिवंत राहणारा तुमच्या शरीरातील कोणताही गूढ भाग नसून तुम्ही स्वतः आहात. (उत्पत्ति २:७; यहेज्केल १८:४) तसेच, मृतांना अग्निमय नरकात यातना दिल्या जात नाहीत किंवा जिवंतांवर प्रभाव पडू शकेल अशा कोणत्याही आत्मिक क्षेत्राचे ते भाग नाहीत. बायबल म्हणते, “मृतास तर काहीच कळत नाही . . . ज्या अधोलोकाकडे [कबर] तू जावयाचा आहेस तेथे काही उद्योग, युक्ति-प्रयुक्ति, बुद्धि व ज्ञान यांचे नाव नाही.”—उपदेशक ९:५, १०.
या बायबल सत्यांनी अनेक लोकांना मृतांच्या भयापासून मुक्त केले आहे. ते आता त्यांच्या पूर्वजांना संतुष्ट करण्याकरता महागडी अर्पणे वाहत नाहीत किंवा त्यांच्या प्रियजनांना त्यांच्या चुकांबद्दल निर्दयीपणे यातना दिल्या जात आहेत याची चिंताही करत नाहीत. त्यांनी शिकून घेतले आहे, की बायबल मृतांसाठी आश्चर्यकारक आशा प्रदान करते, कारण ते सांगते की देवाच्या नियुक्त समयी, “नीतिमानांचे व अनीतिमानांचे पुनरुत्थान होईल.” (प्रेषितांची कृत्ये २४:१५; योहान ५:२८, २९) अशाप्रकारे, मृत आता फक्त आराम करत आहेत, जणू काय ते गाढ झोपेत आहेत.—पडताळा योहान ११:११-१४.
मृतांच्या स्थितीबद्दलचे सत्य आणि पुनरुत्थानाची आशा, मृत्यूमुळे येऊ शकणाऱ्या निराशेपासून आपल्याला मुक्त करू शकते. संयुक्त संस्थानांतील एका विवाहित जोडप्याचा चार वर्षांचा मुलगा अपघातात मरण पावला तेव्हा या आशेने त्यांना टिकवून ठेवले. त्याची आई म्हणते, “आमच्या जीवनात एक अशी पोकळी निर्माण झाली आहे जी, जोपर्यंत आम्ही आमच्या मुलाला पुनरुत्थानाद्वारे पुन्हा पाहत नाही तोपर्यंत भरून निघणार नाही. पण आमचे दुःख तात्पुरते आहे हे आम्हाला माहीत आहे कारण यहोवा सर्व अश्रू पुसून टाकण्याचे अभिवचन देतो.”—प्रकटीकरण २१:३, ४.
भवितव्याबद्दलच्या भयापासून स्वातंत्र्य
भवितव्यात काय राखून आहे? आपल्या पृथ्वीला आण्विक विनाशात जाळून टाकले जाईल का? पृथ्वीच्या पर्यावरणाची नासधूस होत असल्यामुळे आपला ग्रह वास्तव्य करण्याच्या लायक न राहण्याची शक्यता आहे का? नैतिक बिघाडामुळे अराजक स्थिती व गोंधळ निर्माण होईल का? आज अनेकांना या गोष्टींचे वास्तविक भय आहे.
परंतु बायबल अशा अस्वस्थकारी भयांपासून स्वातंत्र्य देते. ‘पृथ्वी कायम राहते,’ असे सांत्वन ते आपल्याला देते. (उपदेशक १:४) बेजबाबदार मानवांकडून आपल्या ग्रहाचा नाश होताना पाहण्यासाठी यहोवाने तो निर्माण केलेला नाही. (यशया ४५:१८) उलट, एका संयुक्त मानवी कुटुंबाचे ते परादीस गृह व्हावे म्हणून यहोवाने पृथ्वीची निर्मिती केली. (उत्पत्ति १:२७, २८) त्याचा उद्देश बदललेला नाही. देव, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश” करील, असे बायबल आपल्याला सांगते. (प्रकटीकरण ११:१८) त्यानंतर, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील,” असेही बायबल म्हणते.—स्तोत्र ३७:११.
हे अभिवचन विश्वासयोग्य आहे कारण देव खोटे बोलत नाही. यहोवाने आपला संदेष्टा यशया याच्याद्वारे असे म्हटले: ‘माझ्या मुखातून निघणारे वचन पूर्ण झाल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्यावाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही.’ (यशया ५५:११; तीत १:२) यास्तव, “ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो,” या बायबलमधील २ पेत्र ३:१३ वचनात लिहून ठेवलेल्या देवाच्या अभिवचनाच्या पूर्णतेची आपण पूर्ण आत्मविश्वासाने वाट पाहू शकतो.
मनुष्याच्या भयापासून स्वातंत्र्य
बायबल आपल्याला अशा पुरुष आणि स्त्रियांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण सादर करते ज्यांनी देवाच्या उपासनेत निर्भयता प्रकट केली. यांपैकी काहींची नावे—गिदोन, बाराक, दबोरा, दानीएल, एस्तेर, यिर्मया, अबीगईल आणि याएल ही आहेत. या विश्वासू स्त्रीपुरुषांनी, “देवावर मी भरवसा ठेविला आहे. मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार?” असे ज्या स्तोत्रकर्त्याने लिहिले त्याची मनोवृत्ती प्रकट केली.—स्तोत्र ५६:११.
पहिल्या शतकात, पेत्र आणि योहान या प्रेषितांनी, धार्मिक अधिकाऱ्यांनी त्यांना प्रचार थांबवण्याची आज्ञा दिली तेव्हा अशाच प्रकारचे धैर्य दाखवले. त्यांनी उत्तर दिले, “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” त्यांच्या दृढ भूमिकेमुळे पेत्र आणि योहानाला नंतर तुरुंगात टाकण्यात आले. चमत्कारिकरीत्या त्यांची सुटका झाल्यावर त्यांनी पुन्हा त्यांचे कार्य चालू केले व “देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.” लवकरच, पेत्र आणि इतर प्रेषितांना यहुदी न्यायसभेपुढे उभे करण्यात आले. प्रमुख याजक त्यांना म्हणाला, “ह्या नावाने शिक्षण देऊ नका असे आम्ही तुम्हाला निक्षून सांगितले होते की नाही? तरी पाहा, तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरून टाकले आहे.” पेत्र आणि इतर प्रेषितांनी उत्तर दिले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ४:१६, १७, १९, २०, ३१; ५:१८-२०, २७-२९.
यहोवाचे साक्षीदार, देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याच्या त्यांच्या कार्यात आज, पहिल्या शतकातील ख्रिश्चनांच्या आवेशाचे अनुकरण करण्यासाठी झटतात. त्यांच्यातील तरुणही नेहमी आपल्या विश्वासाबद्दल इतरांसोबत बोलून स्वतःला धैर्यवान शाबीत करतात. काही उदाहरणे विचारात घ्या.
स्टेसी नामक एक किशोरवयीन स्वभावाने लाजाळू आहे. त्यामुळे आपल्या विश्वासाबद्दल इतरांशी बोलणे सुरवातीला तिच्यासाठी आव्हान होते. तिच्या या लाजऱ्या स्वभावावर मात करण्यासाठी तिने काय केले? ती म्हणते, “मी बायबलचा अभ्यास केला आणि मी जे काही बोलते ते चांगल्याप्रकारे मला समजले आहे याची मी खात्री केली. त्यामुळे ते सोपे झाले आणि माझा आत्मविश्वास वाढला.” स्टेसीच्या उत्तम वर्तनाविषयी स्थानिक वृत्तपत्रात छापण्यात आले. तिच्या शाळेतील एका शिक्षिकेने तो लेख लिहिला होता आणि त्यात असे म्हटले होते: “असे दिसते, की [स्टेसीच्या] विश्वासाने तिला, बहुतेक किशोरवयीनांना वाटणाऱ्या दबावांना तोंड देण्यासाठी शक्ती दिली. . . . तिला वाटते की तिच्या मनात देवाच्या सेवेला प्रथम स्थान असले पाहिजे.”
टॉमी अवघ्या पाच वर्षांचा होता तेव्हाच आपल्या पालकांकडून बायबल शिकू लागला. कोवळ्या वयातच त्याने खऱ्या उपासनेसाठी धाडसी भूमिका घेतली. टॉमीचे लहान वर्गमित्र उत्सवांचे चित्र काढत होते तेव्हा त्याने देवाच्या वचनयुक्त परादीसची चित्रे काढली. किशोरवयीन या नात्याने, टॉमीने पाहिले की अनेक विद्यार्थ्यांचा यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासांबद्दल गोंधळ झाला होता. घाबरून शांत राहण्याऐवजी त्याने त्याच्या एका शिक्षकांना विचारले, की एकाच वेळी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देता यावीत म्हणून तो त्याच्या वर्गासोबत प्रश्न उत्तराने चर्चा करू शकतो का. त्याला परवानगी मिळाली आणि उत्तम साक्ष देण्यात आली.
मॉर्किटा नावाच्या एका तरुणीला १७ वर्षांची असताना तिच्या वर्गांतील इतरांसोबत आपल्या विश्वासाबद्दल बोलण्याची चांगली संधी मिळाली. ती म्हणते, “आम्हाला, भाषण तयार करण्याची नेमणूक देण्यात आली. मी, तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरेa (इंग्रजी) पुस्तकातून माझा विषय निवडला. मी पुस्तकातील पाच अध्याय निवडले आणि त्यांची शीर्षके फळ्यावर लिहिली. मग मी विद्यार्थ्यांना, त्यांना महत्त्वपूर्ण वाटणाऱ्या शीर्षकांना क्रमाने लावण्यास सांगितले.” संपूर्ण वर्गाने सहभाग घेतला अशी एक चर्चा झाली. मॉर्किटा शेवटी म्हणते, “मी वर्गाला ते पुस्तक दाखवले आणि अनेक विद्यार्थ्यांनी त्याच्या प्रती मागितल्या. माझ्या शिक्षकांना देखील एक प्रत हवी होती.”
तुम्ही सत्यामुळे स्वतंत्र होऊ शकता
आपण पाहिल्याप्रमाणे, बायबलमधील सत्याचा जे अभ्यास करतात आणि त्यातील संदेश आत्मसात करतात त्या सर्व वयोगटांतील लोकांवर त्याचा मुक्ती देणारा प्रभाव पडतो. ते त्यांना मृतांच्या भयापासून, भवितव्याच्या भयापासून आणि मनुष्याच्या भयापासून स्वतंत्र करते. शेवटी, येशूची खंडणी आज्ञाधारक मानवजातीला पाप आणि मृत्यूपासून स्वतंत्र करील. वारशाने मिळालेल्या पापी अवस्थेच्या बंदिवासातून मुक्त, परादीस पृथ्वीवर अनंतकाळ जगणे केवढे आनंदमय असेल!—स्तोत्र ३७:२९.
देवाने दिलेल्या अभिवचनांबद्दल तुम्हाला आणखी शिकण्यास आवडेल का? असल्यास, तुम्ही काय केले पाहिजे? येशूने म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुझे व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे ज्ञान त्यांनी घ्यावे.” (योहान १७:३, NW) येशूने आपल्या शिष्यांना वचन दिलेल्या स्वातंत्र्याचा आनंद तुम्हाला लुटायचा आहे तर तुम्ही यहोवा देव आणि त्याचा पुत्र यांच्याविषयी शिकून घेतले पाहिजे. तुम्ही देवाची इच्छा काय आहे हे जाणून ती पूर्ण केली पाहिजे कारण बायबल म्हणते: “जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.
[७ पानांवरील चित्र]
देवाच्या राज्याखाली मानवजात सरतेशेवटी पाप आणि मृत्यूपासून स्वतंत्र केली जाईल