राज्य घोषकांचा वृतान्त
सत्याद्वारे सर्व प्रकारच्या लोकांप्रत पोहंचणे
प्रेषित पौल देवाच्या राज्याचा आवेशी प्रचारक होता. “सुवार्ता” प्रचार करण्याच्या आपल्या कार्यनियुक्तीमध्ये त्याने विरोधामुळे व्यत्यय येऊ दिला नाही. (१ करिंथकर ९:१६; प्रेषितांची कृत्ये १३:५०-५२) आपल्या उदाहरणाचे अनुकरण करावे, असे पौलाने इतरांना आर्जवले.—१ करिंथकर ११:१.
यहोवाचे साक्षीदार प्रचारातील आपल्या निग्रही प्रयत्नांमुळे जगभरात ज्ञात आहेत. खरोखरच, ‘शिष्य बनविण्याचे’ देवाने दिलेले काम पूर्ण करण्यास्तव ते “सुवेळी” आणि “अवेळी” इतरांसोबत बोलत असतात. (२ तीमथ्य ४:२; मत्तय २८:१९, २०) खालील अनुभव दाखवून देतात, की ज्या देशांत त्यांना विरोध आहे अशा ठिकाणी देखील प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांपर्यंत देवराज्याचा सर्वात महत्त्वाचा संदेश पोहंचवला जात आहे.
◻ यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी असलेल्या पाश्चात्त्य पॅसिफिकमधील एका द्वीपावरील १२ वर्षांच्या मुलाला आढळले, की त्याच्या शाळेमध्ये तो कुसंगतीने अक्षरशः वेढलेला आहे. त्याचे अनेक वर्गमित्र नियमितपणे धूम्रपान करत, अश्लिल साहित्य वाचत, शिक्षकांना नकोसे करून सोडत आणि हाणामाऱ्या करत. ही परिस्थिती इतकी विकोपाला गेली, की आपल्याला या शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत घालावे, असे या मुलाने आपल्या वडलांना सांगितले. तथापि, आसपासच्या शाळांतील मुलांचे वर्तन यापेक्षा काही वेगळे नसल्याचे वडलांना वाटल्यामुळे त्यांनी त्याला त्याच शाळेत राहायला सांगितले. ते आपल्या मुलाला कशा प्रकारे मदत करणार होते?
तरुणांसाठी असणारे एक पुस्तक घरात असल्याचे वडलांना आठवले. यहोवाचा साक्षीदार असलेल्या त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना ते भेट दिले होते. यास्तव त्यांनी ते पुस्तक शोधून काढले आणि आपल्या मुलाला दिले. तरुणांचे प्रश्न—उपयुक्त उत्तरे (इंग्रजी) हे त्या पुस्तकाचे शीर्षक होते.a “मी समवयस्कांच्या दबावाचा सामना कसा करू शकतो?” या अध्यायाने त्या मुलाला विशेष मदत केली. या अध्यायाने स्वाभिमान कायम राखण्याचे महत्त्व शिकवले इतकेच नाही, तर इतर जण वाममार्गी लावण्यासाठी आपल्यावर दबाव आणतात तेव्हा त्यांना हुशारीने नाही, कसे म्हणावे हे देखील त्या अध्यायाने त्याला शिकवले. या पुस्तकातील शास्त्रवचनीय तत्त्वांचा अवलंब केल्याने समवयस्कांच्या दबावास कशाप्रकारे यशस्वीपणे तोंड द्यावे हे देखील तो शिकला.
आपल्या मुलातील हे परिवर्तन आणि इतर सकारात्मक बदल पाहून त्याच्या वडलांनी ते पुस्तक वाचण्याचे ठरवले. या पुस्तकातील व्यावहारिक सल्ला पाहून प्रभावित झाल्यामुळे त्याच्या वडलांनी यहोवाच्या साक्षीदारांकडे गृह बायबल अभ्यासासाठी विचारले. कालांतराने, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही अभ्यासाला बसू लागले. परिणाम? हा मुलगा, त्याचा धाकटा भाऊ, त्याचे वडील आणि त्या मुलाचे आजी-आजोबा आता यहोवाचे साक्षीदार आहेत.
◻ याच देशातील दोघा यहोवाच्या साक्षीदारांना बायबल तत्त्वांच्या आपल्या काटेकोर आज्ञाधारकपणामुळे तुरुंगात डांबण्यात आले. तथापि, त्यांच्या या परिस्थितीमुळे देवाच्या राज्याबद्दल धैर्याने बोलण्यात ते खचून गेले नाहीत. ते तुरुंग अधिकाऱ्याकडे गेले आणि प्रभूच्या सांज भोजनाचा विधी तेथे साजरा करण्याची त्यांनी परवानगी मिळवली. तेथील १४ कैद्यांनी बायबलमध्ये आस्था दाखवली आणि या महत्त्वाच्या घटनेच्यावेळी त्यांना आपल्यासोबत पाहून या साक्षीदारांना किती आनंद झाला होता! त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांपैकी काही जणांनी आपला बायबल अभ्यास चालू ठेवला आणि आता यहोवाच्या साक्षीदारांशी सहवास राखत आहेत.
सुमारे २५ पेक्षा अधिक देशांत यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी आहे किंवा विरोध अथवा छळाच्या विविध प्रकारांना ते तोंड देत आहेत. तथापि, प्रेषितांप्रमाणे ‘शिकवण्यात आणि येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजवण्यात’ साक्षीदार कायम आहेत.—प्रेषितांची कृत्ये ५:४२.
[तळटीप]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.