धार्मिक स्वातंत्र्याचा तुमच्याकरता काय अर्थ होतो?
संयुक्त संस्थानांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याला मूलभूत हक्क समजले जात असले तरी, १९४० च्या दशकात, संपूर्ण देशात यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध जमाव-हिंसाचाराची लाट उसळली
कोट्यवधी लोक त्याच्यासाठी लढले. काहींनी तर त्याच्यापायी आपले प्राण देखील दिले. खरेच, मानवजातीच्या मालमत्तेतील ते सर्वात मौल्यवान आहे. काय आहे ते? स्वातंत्र्य! द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ स्वातंत्र्याची व्याख्या, “निवड करण्याची आणि ती पूर्ण करण्याची क्षमता,” अशी करतो. तो पुढे म्हणतो: “कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता, समाजाने लोकांवर अन्यायी, अनावश्यक किंवा असमंजस मर्यादा लादल्या नाहीत तर ते स्वतंत्र आहेत. समाजाने त्यांच्या हक्कांचे—म्हणजे, त्यांच्या मूलभूत मोकळीकींचे, कर्तृत्त्वशक्तीचे आणि सुहक्कांचे संरक्षण केले पाहिजे.”
ही कल्पना अगदी सोपी वाटते. परंतु व्यवहारात, स्वातंत्र्याच्या सीमा खरोखरीच जेथे घालावयाच्या असतात त्यावर लोकांचे एकमत होणे वास्तविकतेत अशक्य वाटते. जसे की, काहींना वाटते की सरकारने आपल्या नागरिकांच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी नियम करावेत. परंतु इतर जण असा वाद घालतील की या नियमांच्या बंधनांतूनच तर नागरिकांना मुक्त करण्याची गरज आहे! स्पष्टपणे, वेगवेगळ्या लोकांना स्वातंत्र्य म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी वाटतात.
धार्मिक स्वातंत्र्याबद्दल काय?
ज्या स्वातंत्र्याविषयी सर्वात तीव्र मतभेद होतात ते कदाचित धर्माचे स्वातंत्र्य आहे आणि त्याची व्याख्या “एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याचा हक्क व एखाद्या आवडीनुसार आचारण्याचा विश्वास,” अशी करण्यात आली आहे. मानवी हक्कांच्या संयुक्त राष्ट्राच्या सार्वत्रिक प्रतिज्ञेनुसार, “प्रत्येकाला विचार, विवेक व धर्म यांच्या स्वातंत्र्याचा हक्क आहे.” यामध्ये, एखाद्या व्यक्तीला “त्याचा धर्म अथवा विश्वास बदलण्याचा हक्क” आणि यासोबतच “शिकवण्याद्वारे, आचरणाद्वारे, उपासनेद्वारे व पाळण्याद्वारे आपला धर्म किंवा विश्वास प्रकट करण्याच्या स्वातंत्र्याचा” समावेश आहे.—१८ वा अनुच्छेद.
निश्चितच आपण अशा राष्ट्राची अपेक्षा करू की जे आपल्या प्रजेला अशा प्रकारचे स्वातंत्र्य देण्याची खरी काळजी वाहते. पण नेहमीच ते घडत नाही ही दुःखाची गोष्ट आहे. “धर्म, अनेक लोकांच्या अंतस्थ भावनांवर प्रभाव पाडतो,” अशी द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ नोंद करतो. “काही सरकारांचे एकाच धर्माशी मजबूत नाते असते आणि इतर विश्वासाच्या लोकांना, ते स्वतःच्या राजकीय अधिकाराला धोकेदायक समजतात. एखादे सरकार खुद्द धर्माला देखील राजकीयरित्या धोकादायक लेखू शकते कारण कदाचित धर्म, राज्याच्या प्रती अधीनतेपेक्षा देवाच्या अधीनतेला पहिले स्थान देतील.”
या कारणांमुळे काही सरकार धर्माच्या आचरणावर बंधने घालतात. काही तर कोणत्याही प्रकारच्या विश्वासाच्या आचरणावर प्रतिबंध घालतात. इतर, उपासनेच्या स्वातंत्र्याचा दावा करत असले तरी, सर्व धार्मिक कार्यांवर कडक आळा घालतात.
उदाहरणार्थ, मेक्सिकोत अनेक वर्षे प्रचलित असलेल्या परिस्थितीचा विचार करा. तेथील संविधानाने धार्मिक स्वातंत्र्याचे आश्वासन दिले तरी त्याने अशी अट घातली: “सार्वजनिक उपासनेकरता वापरले जाणारे चर्चेस राष्ट्राची मालमत्ता आहे, ज्याचे प्रतिनिधीत्व संघीय सरकार करते जे, कोणती चर्चेस वापरली जाऊ शकतील हे ठरवील.” हा निर्बंध समाप्त करण्यासाठी १९९१ मध्ये संविधानात सुधारणा करण्यात आली. तरीसुद्धा, हे उदाहरण दाखवून देते, की विविध देशांमध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा वेगवेगळा अर्थ लावला जाऊ शकतो.
दुसऱ्या प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य
तुम्ही ज्या देशात राहता तेथे धार्मिक स्वातंत्र्य आहे का? असल्यास, त्याची व्याख्या कशी करता येईल? तुमच्या निवडीप्रमाणे तुम्ही देवाची उपासना करू शकता का, की सरकारच्या धर्माचे सदस्य होण्यास तुम्हाला भाग पाडले जाते? तुम्हाला धार्मिक साहित्य वाचण्याची व त्यांचा प्रसार करण्याची परवानगी आहे का, की अशा प्रकारच्या छापील साहित्यावर सरकार बंदी घालते? तुम्ही इतरांसोबत तुमच्या विश्वासाबद्दल बोलू शकता का, की असे करणे त्यांच्या धार्मिक हक्कांचे उल्लंघन केल्याप्रमाणे आहे असे लेखले जाते?
या प्रश्नांची उत्तरे, तुम्ही जेथे राहता त्यावर अवलंबून आहे. परंतु आस्थेची गोष्ट अशी आहे, की एक अशा प्रकारचे धार्मिक स्वातंत्र्य आहे जे विशिष्ट ठिकाणावर मुळीच अवलंबून नाही. सा. यु. ३२ या वर्षी, जेरुसलेममध्ये असताना येशू आपल्या अनुयायांना म्हणाला: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.”—योहान ८:३१, ३२.
असे म्हणण्याचा येशूचा काय अर्थ होता? त्याचे यहुदी श्रोते रोमी शासनापासूनच्या स्वातंत्र्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. परंतु येशू राजनैतिक जुलमापासूनच्या स्वातंत्र्याबद्दल चर्चा करीत नव्हता. उलट, तो आपल्या शिष्यांना त्याहीपेक्षा उत्तम अभिवचन देत होता. त्याबद्दल आपण पुढील लेखात पाहू या.