देवाच्या अपेक्षा शिकण्यास लोकांना मदत करणारे नवीन साधन
“त्याची सरळ, थेट आणि विनयशील सुरवात अपेक्षांपलिकडील परिणाम उत्पन्न करील. त्यातील विषय इतक्या सहज व आकर्षक पद्धतीने सादर केले आहेत, की कोणतीही प्रांजळ, जिज्ञासू व्यक्ती, ‘देव खरोखरच तुमच्यामध्ये आहे,’ असे म्हणण्यास प्रवृत्त होईल.” (१ करिंथकर १४:२५) असे थायलंडमधील एका यहोवाच्या साक्षीदाराने देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या नवीन माहितीपत्रकाचे वर्णन करताना म्हटले. १९९६/९७ दरम्यान झालेल्या “ईश्वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनांत वॉच टावर संस्थेने ते प्रदर्शित केले.
हे ३२ पानी रंगीत माहितीपत्रक बायबल अभ्यास सत्रासाठी रचले आहे. त्यामध्ये बायबलच्या मूळ शिकवणुकी आहेत. त्याची शब्दरचना अगदी साधी आणि थोडक्यात असून, देव आपल्याकडून काय अपेक्षितो त्याचे स्पष्टपणे विवरण करते. वाचकांना ते समजण्यास कठीण वाटू नये. या नवीन माहितीपत्रकातून तुम्ही बायबल अभ्यास कसा घेऊ शकाल?
प्रश्नांचा उपयोग करा. प्रत्येक धड्याच्या सुरवातीला प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नानंतर कंसात तुम्हाला परिच्छेदांचे क्रमांक दिसतील ज्यांमध्ये उत्तरे आहेत. ही प्रश्न पूर्वविचार आणि पुनर्विचाराकरता शिकवण्याचे साधन म्हणून वापरता येऊ शकतात. उदाहरणार्थ, गृह बायबल अभ्यासाच्या सुरवातीला तुम्ही विद्यार्थ्याला, त्याचे उत्तर मिळण्यासाठी प्रश्ने विचारू शकता. त्याने चुकीचे उत्तर दिल्यास बरोबर उत्तर सांगण्याऐवजी तुम्ही अभ्यास चालू करू शकता. प्रत्येक धड्याच्या शेवटी, विद्यार्थ्याला बायबलच्या सुसंगतेत उत्तरे देता येतात की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा ते प्रश्न विचारू शकता.
शास्त्रवचने उघडून पाहा. प्रत्येक धड्यात, बायबल सत्याच्या संक्षिप्त विधानांसोबत त्यांना आधार देणारी शास्त्रवचने दिलेली आहेत. बहुतेक शास्त्रवचने उद्धृत केलेली नसून केवळ उल्लेखित असल्यामुळे विद्यार्थ्याला ती वचने आपल्या स्वतःच्या बायबलमधून उघडून पाहण्याचे उत्तेजन देणे महत्त्वाचे आहे. त्याने देवाच्या वचनाचा अवलंब आपल्या जीवनात करण्याआधी ते वाचून त्यावर मनन करणे आवश्यक आहे.—यहोशवा १:८.
चित्रांवर जोर द्या. या माहितीपत्रकात भरपूर फोटो व रंगवलेली चित्रे आहेत—एकूण ५० कलात्मक चित्रे आहेत. ती चित्रे फक्त लक्ष आकर्षित करण्यासाठीच नाहीत तर शिकवण्याचे साधन म्हणून सुद्धा त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, शेवटल्या दोन धड्यांचा (आमोरासमोर असलेल्या पानांच्या, प्रत्येक पानावरील) विषय, “देवाची इच्छा आचरण्यास इतरांना मदत करणे” आणि “देवाची सेवा करण्याचा तुमचा निर्णय,” हे आहेत. संपूर्ण दोन पानभर असलेली चित्रे एकाच व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती दाखवतात, तो अनौपचारीक साक्ष देताना, घरोघरचे कार्य करताना, समर्पण करताना व शेवटी बाप्तिस्मा घेतानाचे चित्र दाखवण्यात आले आहे. या चित्रांकडे विद्यार्थ्याचे लक्ष आकर्षित करून तुम्ही त्याला देवाची सेवा करण्यासाठी उचलावी लागणाऱ्या पावलांबद्दलची माहिती घेण्यास मदत करू शकता.
जर एखाद्या आस्थेवाईक व्यक्तिला चांगल्याप्रकारे वाचता येत नाही किंवा मुळीच वाचता येत नाही अशा वेळी काय करायचे? संस्था या नवीन माहितीपत्रकाचे अनेक भाषांमध्ये ऑडिओकॅसेट तयार करत आहे. या कॅसेटमध्ये माहितीपत्रकातील माहिती तसेच अनेक उल्लेखित शास्त्रवचने आहेत. ते पुढीलप्रमाणे रेकॉर्ड करण्यात आले आहे: पहिला प्रश्न वाचला जातो, मग त्या प्रश्नाचे उत्तर देणारा परिच्छेद (किंवा अनेक परिच्छेद) व त्यासोबत काही उल्लेखित शास्त्रवचने वाचली जातात. मग दुसरा प्रश्न वाचला जातो, त्याचे उत्तर देणारी माहिती, शास्त्रवचने वाचली जातात. अशाप्रकारे ते रेकॉर्ड केले आहे. विद्यार्थी आपल्या अभ्यासाची तयारी करताना ती कॅसेट ऐकू शकतो. ती कॅसेट अभ्यास चालवताना देखील वापरली जाऊ शकते.
अधिवेशनात उपस्थित असलेले, क्षेत्र सेवेमध्ये या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग करण्यास उत्सुक होते. उदाहरणार्थ, माहितीपत्रक मिळून काही दिवस उलटले होते आणि अमेरिकेतील दोन पायनियरांनी (पूर्ण वेळेचे सुवार्तिक), ते ज्या तरुण जोडप्याकडे पुनर्भेट करत होते त्यांना सादर केले. त्या जोडप्याने अनुक्रमणिका पाहिली तेव्हा, “देवास वीट आणणाऱ्या प्रथा” हा धडा त्यांच्या चटकन नजरेस पडला. ती तरुण स्त्री म्हणाली, “मला नेहमी, देव संपूर्णतः प्रेमळ आहे, तो वीट मानू शकत नाही असं शिकवण्यात आलं होतं. मी हाच धडा पहिल्यांदा वाचणार.” दुसऱ्या आठवडी जेव्हा पायनियर पुन्हा त्यांच्याकडे गेले, ती तरुण स्त्री त्यांना म्हणाली: “मी ते नवीन माहितीपत्रक वाचत होते. आपण ज्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या करणं किती अवघड आहे. यहोवा आमच्याबाबतीत संतुष्ट नाही—आमचा विवाह झालेला नाही. पण आम्ही ठरवलं आहे. पुढच्या शुक्रवारी विवाह करण्याची आम्ही व्यवस्था केली आहे.” त्या दोघा पायनियरांना मिठी मारून ते म्हणाले: “आम्ही नियमित अभ्यास करू शकलो नाही म्हणून आम्हाला क्षमा करा, पण विवाह करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आमच्या डोक्यावरचा पुष्कळसा भार कमी झालाय.”
या नवीन अपेक्षा माहितीपत्रकाचा नक्की उपयोग करा. देवाच्या अपेक्षांविषयी इतरांना शिकवण्यास हे उत्तम साधन आहे.
[१७ पानांवरील चित्रं]
तुम्ही या नवीन माहितीपत्रकाचा उपयोग कसा कराल?