ईश्वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने कार्य करणे
“जो . . . शांतीची घोषणा करितो . . . त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.”—यशया ५२:७.
१, २. (अ) यशया ५२:७ मध्ये भाकीत केल्यानुसार, कोणत्या सुवार्तेची घोषणा करावयाची आहे? (ब) प्राचीन इस्राएलच्या बाबतीत यशयाच्या भविष्यसूचक शब्दांचा काय अर्थ होता?
घोषणा करावयाची एक सुवार्ता आहे! ती शांतीची—खऱ्या शांतीची सुवार्ता आहे. तो तारणाचा संदेश देवाच्या राज्याच्या आहे. बऱ्याच वर्षांआधी संदेष्टा यशयाने त्याच्याबद्दल लिहिले आणि यशया ५२:७ मध्ये आपल्यासाठी ते लिहून ठेवण्यात आले आहे: “जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करितो, शुभवृत्त विदित करितो, तारण जाहीर करितो, तुझा देव राज्य करीत आहे असे सीयोनास म्हणतो, त्याचे पाय पर्वतांवरून येताना किती मनोरम दिसतात.”
२ प्राचीन इस्राएलासाठी आणि आज आपल्या लाभासाठी यहोवाने आपला संदेष्टा यशया याला तो संदेश लिहून ठेवण्यास प्रेरित केले. त्या संदेशाचा काय अर्थ होतो? यशयाने हा संदेश लिहिला त्या वेळी, उत्तरेकडील इस्राएलाचे राज्य अश्शूरी लोकांनी कदाचित आधीच बंदिवासात नेलेले असावे. नंतर, यहुदाच्या दाक्षिणात्य राज्यातील रहिवाश्यांना बॅबिलोनमध्ये बंदिवान म्हणून नेले जाणार होते. ते लोक यहोवाच्या आज्ञेत राहिले नव्हते व देवाबरोबर त्यांचे शांतीचे संबंध नसल्यामुळे ते दिवस त्या राष्ट्रासाठी दुःखाचे व अस्वस्थतेचे होते. यहोवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या पापी वर्तनामुळे आपापसात व देवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होत होता. (यशया ४२:२४; ५९:२-४) परंतु, नियुक्त समयी बॅबिलोनच्या वेशी खुल्या होतील हे यहोवाने यशयाद्वारे भाकीत केले. देवाचे लोक आपल्या मायदेशी परतण्यासाठी, यहोवाचे मंदीर पुन्हा बांधण्यासाठी मुक्त होणार होते. सियोनाची पुनर्स्थापना होणार होती व पुन्हा एकदा जेरुसलेममध्ये खऱ्या देवाची उपासना केली जाणार होती.—यशया ४४:२८; ५२:१, २.
३. इस्राएलच्या पुनर्स्थापनेचे अभिवचन शांतीची भविष्यवाणी देखील कशी होती?
३ मुक्ततेचे हे अभिवचन, शांतीची भविष्यवाणी देखील होती. इस्राएलांना यहोवाने देऊ केलेल्या देशात त्यांची पुनर्स्थापना देवाच्या दयेचा व त्यांच्या पश्चात्तापाचा पुरावा ठरणार होती. ते आता देवाबरोबर शांतीने होते हे त्यावरून सूचित होणार होते.—यशया १४:१; ४८:१७, १८.
‘तुझा देव राजा झाला आहे’
४. (अ) सा. यु. पू. ५३७ मध्ये ‘यहोवा राजा झाला होता’ हे कोणत्या अर्थाने म्हटले जाऊ शकत होते? (ब) नंतरच्या वर्षांमध्ये यहोवाने आपल्या लोकांच्या भल्यासाठी कशाप्रकारे गोष्टी घडवून आणल्या?
४ सा. यु. पू. ५३७ मध्ये यहोवाने ही मुक्तता घडवून आणली तेव्हा, सियोनेविषयी ही घोषणा उचितपणे करता येऊ शकत होती: ‘तुझा देव राजा झाला आहे!’ खरेच, यहोवा ‘युगानुयुगांचा राजा’ आहे. (प्रकटीकरण १५:३) पण आपल्या लोकांची त्याने केलेल्या या मुक्ततेमुळे त्याच्या सार्वभौमत्वाचे आणखी एकदा दर्शन घडले. त्या मुक्ततेने एका उल्लेखनीय पद्धतीद्वारे, आजपर्यंत होऊन गेलेल्या सर्वात शक्तिशाली मानवी साम्राज्यावरील त्याच्या सामर्थ्याची सर्वश्रेष्ठता प्रदर्शित केली. (यिर्मया ५१:५६, ५७) यहोवाच्या आत्म्याच्या कार्यामुळे त्याच्या लोकांविरुद्धचे इतर कट हाणून पाडण्यात आले. (एस्तेर ९:२४, २५) यहोवाने, विविध मार्गांनी पुनःपुनः हस्तक्षेप करून आपली सार्वभौम मनीषा पूर्ण करताना मेडोपर्शियाच्या राजांना त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्यास लावले. (जखऱ्या ४:६) त्या दिवसांतील घटित घटना आपल्याकरता एज्रा, नहेम्या, एस्तेर, हाग्गय आणि जखऱ्या या बायबल पुस्तकांमध्ये लिहून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांची उजळणी करणे किती विश्वास बळकट करणारे आहे!
५. यशया ५२:१३–५३:१२ मध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण घटना दर्शवल्या आहेत?
५ परंतु, सा. यु. पू. ५३७ मध्ये आणि त्यानंतर जे घडले ती केवळ एक सुरवात होती. ५२ व्या अध्यायातील पुनर्स्थापनेच्या भविष्यवाणीनंतर लगेचच यशयाने मशीहाच्या येण्याविषयी लिहिले. (यशया ५२:१३–५३:१२) येशू ख्रिस्त जो मशीहा ठरला त्याच्याद्वारे यहोवा, सा. यु. पू. ५३७ मध्ये जे घडले त्याहीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण मुक्ततेचा आणि शांतीचा संदेश देणार होता.
यहोवाचा शांतीचा महान संदेशवाहक
६. यहोवाचा शांतीचा महान संदेशवाहक कोण आहे व त्याने कोणती कामगिरी मन लावून केली?
६ येशू ख्रिस्त यहोवाचा शांतीचा महान संदेशवाहक आहे. तो देवाचा शब्द, यहोवाचा खासगी प्रवक्ता आहे. (योहान १:१४) याच्या सुसंगतेत, यार्देन नदीत बाप्तिस्मा घेऊन काही काळ लोटल्यावर येशूने, नासरेथच्या सभास्थानात यशया ६१ व्या अध्यायातील त्याच्याकरता असलेली कामगिरी मोठ्याने वाचून काढली. त्या आज्ञेने स्पष्ट केले, की त्याला ज्याचा प्रचार करावयास पाठवले होते त्यात, “मुक्तता” व ‘बरे करणे’ तसेच यहोवाकडून स्वीकृती प्राप्त करण्याची संधी यांचा समावेश होता. तरीसुद्धा, येशूने शांतीच्या संदेशाची घोषणा करण्यापेक्षा अधिक काही केले. कायम शांतीचा आधार पुरवण्यासाठीही देवाने त्याला पाठवले होते.—लूक ४:१६-२१.
७. येशू ख्रिस्ताद्वारे शक्य होणाऱ्या देवासोबतच्या शांतीमुळे काय घडून येते?
७ येशूचा जन्म झाला तेव्हा, बेथलेहेमनजीक देवदूत मेंढपाळांना प्रकट झाले व त्यांनी देवाची स्तुती करत म्हटले: “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांति.” (तिरपे वळण आमचे.) (लूक २:८, १३, १४) होय, देवाला ज्यांच्यावर प्रसाद झाला होता त्यांना शांती मिळणार होती, कारण त्याने आपल्या पुत्राकरवी जी तरतूद केली त्यावर त्यांनी आपला विश्वास ठेवला. याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा, की मानवांचा जन्म पापात झालेला असला तरी, ते देवासमोर एका शुद्ध भूमिकेत, त्याच्यासोबत एका स्वीकृत नातेसंबंधात राहू शकत होते. (रोमकर ५:१) इतर कोणत्याही मार्गाने शक्य होत नाही अशी शांती, आतंरिक शांती ते उपभोगू शकत होते. देवाच्या नियुक्त समयी, आदामाकडून वारशाने मिळालेल्या पापाच्या परिणामांपासून, त्याचप्रमाणे आजारपण आणि मृत्यूपासूनही मुक्तता मिळणार होती. लोक येथूनपुढे अंधळे, बहिरे किंवा अपंग राहणार नव्हते. वैफल्यग्रस्त करणारा अशक्तपणा व भयंकर मानसिक अस्वस्थता कायमचीच काढली जाणार होती. परिपूर्णतेत चिरकालीक जीवन जगणे शक्य होणार होते.—यशया ३३:२४; मत्तय ९:३५; योहान ३:१६.
८. ईश्वरी शांती कोणास दिली जाते?
८ ईश्वरी शांती कोणास दिली जाते? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या सगळ्यांना. प्रेषित पौलाने लिहिले, ‘येशूच्या रक्ताद्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे त्या सर्वाचा स्वतःबरोबर ख्रिस्ताद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.’ प्रेषित पौलाने पुढे म्हटले, की या समेटामध्ये, ‘स्वर्गातील गोष्टींचा’—अर्थात, स्वर्गामध्ये ख्रिस्तासोबत सहवारीस असणाऱ्यांचा समावेश होणार होता. त्यामध्ये ‘पृथ्वीवरील गोष्टींचा’—म्हणजे, पृथ्वीला पूर्णपणे परादीस बनवल्यानंतर तिच्यात चिरकालासाठी राहण्याची संधी ज्यांना दिली जाणार होती त्यांचाही समावेश होणार होता. (कलस्सैकर १:१९, २०) येशूच्या बलिदानाचा फायदा करून घेतल्यामुळे व अंतःकरणपूर्वक देवाच्या आज्ञेत राहिल्यामुळे हे सर्व जण देवासोबत उबदार मैत्रीचा आनंद लुटू शकत होते.—पडताळा याकोब २:२२, २३.
९. (अ) देवासोबत शांती राखल्याने कोणत्या इतर नातेसंबंधांवर प्रभाव पडतो? (ब) सर्वत्र कायम शांती आणण्याचा हेतू बाळगून यहोवाने आपल्या पुत्राला कोणता अधिकार प्रदान केला आहे?
९ देवासोबत अशाप्रकारच्या शांतीत राहणे किती महत्त्वपूर्ण आहे! देवाबरोबर आपली शांती नसल्यास, इतर कोणत्याही नातेसंबंधात कायमस्वरूपी अथवा अर्थपूर्ण शांती असू शकत नाही. यहोवासोबत शांतीत असणे पृथ्वीवरील खऱ्या शांतीचा पाया आहे. (यशया ५७:१९-२१) उचितपणे, येशू ख्रिस्त शांतीचा अधिपती आहे. (यशया ९:६) मानव ज्याच्याद्वारे देवासोबत समेट करू शकतात त्याला यहोवाने राज्य करण्याचा अधिकार देखील दिला आहे. (दानीएल ७:१३, १४) आणि मानवजातीवरील येशूच्या राजसी शासनाच्या परिणामांविषयी यहोवा अभिवचन देतो: “शांतीला अंत नसणार.”—यशया ९:७; स्तोत्र ७२:७.
१०. देवाच्या शांतीच्या संदेशाची घोषणा करण्यात येशूने कशा प्रकारे उदाहरण मांडले?
१० सर्व मानवजातीला देवाच्या शांतीच्या संदेशाची गरज आहे. स्वतः येशूने याचा प्रचार करण्यामध्ये आवेशी उदाहरण मांडले. जेरुसलेममधील मंदिरांच्या परिसरात, डोंगरावर, रस्त्यावर, एका शोमरोनी स्त्रीला विहीरीजवळ सांगताना व लोकांच्या घरी जाऊन त्याने तसे केले. जेथे जेथे लोक होते, तेथे तेथे येशूने शांतीचा आणि देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी संधी निर्माण केल्या.—मत्तय ४:१८, १९; ५:१, २; ९:९; २६:५५; मार्क ६:३४; लूक १९:१-१०; योहान ४:५-२६.
ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्यास प्रशिक्षित
११. येशूने आपल्या शिष्यांना कोणत्या कार्यासाठी प्रशिक्षण दिले?
११ येशूने आपल्या शिष्यांना देवाच्या शांतीच्या संदेशाचा प्रचार करण्यास शिकवले. येशू जसा यहोवाचा “विश्वसनीय व खरा साक्षी” होता, त्याचप्रमाणे साक्ष देण्याची जबाबदारी त्यांच्यावरही होती हे त्यांनी ओळखले. (प्रकटीकरण ३:१४; यशया ४३:१०-१२) त्यांनी ख्रिस्ताकडे आपला नेता या नात्याने पाहिले.
१२. पौलाने प्रचारकार्याचे महत्त्व कसे दाखवून दिले?
१२ प्रेषित पौलाने असे म्हणत प्रचारकार्याच्या महत्त्वावर तर्क केला: “शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही.’” अर्थात, तारणाचा यहोवाचा प्रमुख प्रतिनिधी या नात्याने येशू ख्रिस्तावर विश्वास प्रकट करणाऱ्या कोणासही निराश केले जाणार नाही. शिवाय कोणाचीही वांशिक पार्श्वभूमी त्याला अपात्र ठरवणार नाही, कारण पौलाने पुढे म्हटले: “यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभु तोच आणि जे त्याचा धावा करितात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे. कारण ‘जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल.’” (रोमकर १०:११-१३) परंतु लोकांना या संधीविषयी कशाप्रकारे माहीत होणार होते?
१३. लोकांनी सुवार्ता ऐकावयाची होती तर कशाची गरज होती व पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी या गरजेला कसा प्रतिसाद दिला?
१३ यहोवाच्या प्रत्येक सेवकाने विचार केला पाहिजे असे प्रश्न विचारून पौलाने ही गरज हाताळली. प्रेषिताने विचारले: “ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणाऱ्यावाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील?” (रोमकर १०:१४, १५) आरंभीच्या ख्रिस्ती विश्वासाचा अहवाल, हा पुरुषांनी, स्त्रियांनी, व आबालवृद्धांनी ख्रिस्त आणि त्याच्या प्रेषितांनी मांडलेल्या उदाहरणास प्रतिसाद दिल्याचा स्पष्ट पुरावा देतो. ते सुवार्तेचे आवेशी उद्घोषक बनले. ख्रिस्ताचे अनुसरण करताना, त्यांना लोक जेथे कोठे भेटत असत तेथे त्यांनी प्रचार केला. एकही जण चुकू नये अशी त्यांची इच्छा असल्यामुळे त्यांनी सार्वजनिक ठिकाणी व घरोघरी आपली सेवा कायम ठेवली.—प्रेषितांची कृत्ये १७:१७; २०:२०.
१४. सुवार्तेची घोषणा करणाऱ्यांचे “चरण” “मनोरम” होते हे खरे कसे सिद्ध झाले?
१४ अर्थातच, सर्वांनीच ख्रिस्ती प्रचारकांना चांगला प्रतिसाद दिला नाही. तरीसुद्धा, पौलाने यशया ५२:७ मधून घेतलेला उतारा खरा ठरला. “त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील?” असे विचारल्यानंतर, त्याने पुढे म्हटले: “‘चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम दिसतात!’ असा शास्त्रलेख आहे.” आपल्यातील बहुतेकजण आपल्या चरणांना मनोरम किंवा सुंदर लेखत नाहीत. मग या वचनाचा काय अर्थ होतो? इतरांना प्रचार करायला जाताना एखाद्याचे चरणच त्याला ठिकठिकाणी नेत असतात. असे चरण निश्चितच त्या व्यक्तिचे प्रतिनिधीत्व करतात. आणि आपण याची खात्री बाळगू शकतो, की ज्यांनी ज्यांनी प्रेषितांकडून व येशू ख्रिस्ताच्या पहिल्या शतकातील इतर शिष्यांकडून सुवार्ता ऐकली त्यांना हे ख्रिश्चन निश्चितच मनोहर वाटले. (प्रेषितांची कृत्ये १६:१३-१५) याहूनही अधिक म्हणजे, ते देवाच्या नजरेत मौल्यवान होते.
१५, १६. (अ) आरंभीच्या ख्रिश्चनांनी ते खरोखरच शांतीचे संदेशवाहक असल्याचे कसे प्रदर्शित केले? (ब) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी केले त्याचप्रमाणे आपल्यालाही आपली सेवा पार पाडण्यास काय मदत करू शकते?
१५ येशूच्या अनुयायांकडे शांतीचा संदेश होता व त्यांनी तो शांतिमय पद्धतीने सादर केला. येशूने आपल्या शिष्यांना या सूचना दिल्या: “ज्या कोणत्या घरांत जाल तेथे, ह्या घरास शांति असो, असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतिप्रिय माणूस असला तर तुमची शांति त्याच्यावर राहील. नसला तर तुम्हांकडे ती परत येईल.” (लूक १०:५, ६) शालोम अथवा “शांती,” हे पारंपारिक यहुदी अभिवादन आहे. परंतु, येशूच्या सूचना एवढ्यापुरत्याच मर्यादित नव्हत्या. ‘ख्रिस्ताच्या वतीने वकील’ या नात्याने त्याच्या अभिषिक्त शिष्यांनी लोकांना आर्जवले: “देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा.” (२ करिंथकर ५:२०) येशूच्या सूचनांच्या सुसंगतेत, ते लोकांबरोबर देवाच्या राज्याविषयी व व्यक्तिगत पातळीवर त्याचा त्यांच्यासाठी काय अर्थ होऊ शकतो याविषयी बोलले. ज्यांनी त्यांचे ऐकले त्यांना आशीर्वाद मिळाला; ज्यांनी नाकारले त्यांनी आशीर्वाद गमावला.
१६ यहोवाचे साक्षीदार आज अशाचप्रकारे आपली सेवा करतात. लोकांना ते जी सुवार्ता सांगतात ती त्यांची नाही; ज्याने त्यांना पाठवले त्याची आहे. ती सांगण्याची त्यांना कामगिरी दिली आहे. लोकांनी तिचा स्वीकार केल्यास, ते आश्चर्यकारक आशीर्वाद मिळण्याच्या मार्गावर येतात. नाकारल्यास, यहोवा देवासोबत व त्याचा पुत्र, येशू ख्रिस्तासोबत शांतीत राहण्यास ते नाकारतात.—लूक १०:१६.
अशांत जगात शांतीपूर्ण
१७. दुर्भाषण करणारे लोक भेटल्यावरही आपले वर्तन कसे असावे व का?
१७ लोकांची प्रतिक्रिया काहीही असो, यहोवाच्या सेवकांनी हे ध्यानात ठेवणे महत्त्वपूर्ण आहे, की ते ईश्वरी शांतीचे संदेशवाहक आहेत. जगिक लोक, खोचक बोलण्याद्वारे किंवा त्यांना चीड आणणाऱ्या लोकांवर खेकसून वाद घालू शकतात व आपला राग व्यक्त करू शकतात. कदाचित आपल्यातील काही जण गत काळात असेच वागले असावेत. परंतु, आपण नवीन मनुष्यत्व धारण केल्यास व आता जगाचे भाग नसल्यास, आपण त्यांच्या मार्गांचे अनुकरण करणार नाही. (इफिसकर ४:२३, २४, ३१; याकोब १:१९, २०) इतर कसेही वागले तरी आपण हा सल्ला लागू करू: “शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा.”—रोमकर १२:१८.
१८. एखादा सरकारी अधिकारी आपल्यासोबत कठोरतेने बोलत असला तरी आपली प्रतिक्रिया काय असावी व का?
१८ कधीकधी आपल्या सेवेमुळे आपल्याला सरकारी अधिकाऱ्यांसमोर उभे राहावे लागेल. आपला अधिकार प्रतिपादून ते आपल्याकडे, आपण विशिष्ट गोष्टी का करतो किंवा विशिष्ट कार्यांत भाग घेण्याचे का टाळतो याचे स्पष्टीकरण देण्याची ‘मागणी’ करतील. आपण खोट्या धर्माचा दंभस्फोट करणाऱ्या व या सद्य व्यवस्थीकरणाच्या शेवटाबद्दल सांगणाऱ्या संदेशाचा प्रचार का करत आहोत हे त्यांना माहीत करून घ्यावेसे वाटेल. ख्रिस्ताने मांडलेल्या उदाहरणाबद्दलचा सन्मान आपल्याला सौम्यता व गाढ आदर प्रदर्शित करण्यास प्रवृत्त करील. (१ पेत्र २:२३; ३:१५) बहुतेक वेळा हे अधिकारी, पाळकांच्या अथवा कदाचित त्यांच्या स्वतःच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावाखाली असतात. सौम्यपणे उत्तर दिल्याने, आपल्या कार्यामुळे त्यांना अथवा समाजाच्या शांतीला कोणताही धोका नाही हे समजण्यास त्यांना मदत होऊ शकते. अशा प्रकारचे उत्तर, त्याचा स्वीकार करणाऱ्यांमध्ये आदर, सहकार्य व शांतीचा आत्मा निर्माण करते.—तीत ३:१, २.
१९. यहोवाचे साक्षीदार कोणत्या कार्यांमध्ये केव्हाही भाग घेत नाहीत?
१९ यहोवाचे साक्षीदार जगाच्या झगड्यांमध्ये भाग न घेणारे लोक म्हणून संपूर्ण पृथ्वीवर ओळखले जातात. जाती, धर्म किंवा राजनीतीच्या जगिक झगड्यांमध्ये ते भाग घेत नाहीत. (योहान १७:१४) देवाचे वचन आपल्याला “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन” असण्यास सांगत असल्यामुळे आपण, सरकारी धोरणांच्या निषेधात सविनय कायदाभंगाच्या कृत्यांमध्ये भाग घेण्याचा विचारसुद्धा करणार नाही. (रोमकर १३:१) यहोवाच्या साक्षीदारांनी, एखाद्या सरकाराला उलथून पाडण्यासाठी योजिलेल्या कोणत्याच चळवळीत केव्हाही भाग घेतलेला नाही. यहोवाने आपल्या ख्रिस्ती सेवकांसाठी दर्जे स्थापित करून दिल्यामुळे, कोणत्याही प्रकारच्या रक्तपातात किंवा हिंसेत त्यांनी भाग घेण्याचा प्रश्नच उठत नाही! खरे ख्रिस्ती फक्त शांतीबद्दल बोलतच नाहीत तर ते जो प्रचार करतात त्यानुसार जगतात.
२०. शांतीच्या बाबतीत, मोठ्या बाबेलने कोणते नाव कमवले आहे?
२० खऱ्या ख्रिश्चनांच्या विरुद्ध, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वतःला शांतीचे संदेशवाहक असल्याचे शाबीत केलेले नाही. मोठ्या बाबेलचे धर्म—ख्रिस्ती धर्मजगताचे चर्चेस आणि गैर-ख्रिस्ती धर्म, या दोघांनी—राष्ट्रांच्या युद्धांकडे दुर्लक्ष केले, त्यांना पाठिंबा दिला आहे आणि वास्तविकतेत त्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. शिवाय त्यांनी यहोवाच्या विश्वासू सेवकांच्या छळास आणि त्यांची हत्या करण्यासही इतरांना चेतवले आहे. यास्तव, मोठ्या बाबेलविषयी प्रकटीकरण १८:२४ घोषित करते: “तिच्यामध्ये संदेष्ट्यांचे, पवित्र जनांचे व पृथ्वीवर वधलेल्या सर्वांचे रक्त सापडले.”
२१. यहोवाच्या लोकांचे व खोट्या धर्माचे पालन करणाऱ्यांचे वर्तन यांतील फरक जेव्हा अनेक नम्र अंतःकरणाचे लोक पाहतात तेव्हा ते कसा प्रतिसाद देतात?
२१ खरा धर्म हा, ख्रिस्ती धर्मजगताचे आणि मोठ्या बाबेलचे बाकीचे धर्म यांच्यासारखा नसून तो सकारात्मक, संयोजित करणारी शक्ती आहे. येशू ख्रिस्ताने आपल्या खऱ्या अनुयायांना म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) आज बाकीच्या मानवजातीला विभाजित करणाऱ्या राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक आणि वांशिक मर्यादांपेक्षा वरचढ असणारी ती प्रीती आहे. याचे निरीक्षण केल्यामुळे अखिल पृथ्वीवरील लाखो लोक यहोवाच्या अभिषिक्त सेवकांना म्हणत आहेत: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले आहे.”—जखऱ्या ८:२३.
२२. अद्याप पूर्ण व्हावयाच्या साक्षकार्याकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो?
२२ यहोवाचे लोक ह्या नात्याने, साध्य झालेल्या गोष्टीबद्दल आपल्याला अत्यानंद होतो, पण ते कार्य अद्याप पूर्ण झालेले नाही. शेतकऱ्याने आपल्या शेतात बी पेरून लागवड केल्यानंतर तो सोडून देत नाही. तो काम करत राहतो, विशेषकरून कापणीच्या कामाला वेग येतो तेव्हा तो अधिक काम करतो. कापणीसमयी सतत, जोरदार परिश्रम करावे लागतात. आणि पूर्वीपेक्षा आता खऱ्या देवाच्या उपासकांना अधिक कापणी करावयाची आहे. हा काळ आनंदाचा आहे. (यशया ९:३) आपल्याला विरोध आणि उदासीनतेचा सामना करावा लागतो हे खरे आहे. आपल्याला, कदाचित गंभीर आजारपण, कठीण कौटुंबिक परिस्थिती किंवा आर्थिक अडचणी हाताळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. पण यहोवाबद्दलचे प्रेम आपल्याला टिकून राहण्यास प्रवृत्त करते. ज्या संदेशाची घोषणा करावयाचे देवाने आपल्यावर सोपवले आहे तो संदेश लोकांनी ऐकणे अगत्याचे आहे. तो शांतीचा संदेश आहे. होय, स्वतः येशूने प्रचार केलेला तो संदेश आहे—देवाच्या राज्याची सुवार्ता.
तुमचे उत्तर काय आहे?
◻ प्राचीन इस्राएलच्या बाबतीत यशया ५२:७ ची कोणती पूर्णता झाली?
◻ येशू शांतीचा महान संदेशवाहक कसा शाबीत झाला?
◻ ख्रिस्ती ज्यामध्ये सहभाग घेतात त्या कार्याशी प्रेषित पौलाने यशया ५२:७ चा संबंध कसा जोडला?
◻ आपल्या दिवसांत शांतीचे संदेशवाहक होण्यामध्ये काय समाविष्ट आहे?
[१३ पानांवरील चित्र]
येशूप्रमाणे, यहोवाचे साक्षीदार ईश्वरी शांतीचे संदेशवाहक आहेत
[१५ पानांवरील चित्र]
लोकांनी राज्य संदेशाला कोणताही प्रतिसाद दिला तरी यहोवाचे साक्षीदार शांतीमय राहतात