वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १/१५ पृ. ५-९
  • ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक एकत्रित येतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक एकत्रित येतात
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘शांतीची घोषणा करणारे किती मनोरम दिसतात’
  • ‘देवाची शांती सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे जाते’
  • “ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटा”
  • तुम्हाला ते चुकवावेसे वाटणार नाही!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • “आवेशी राज्य उद्‌घोषक” आनंदित मनाने एकत्र जमतात
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने कार्य करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • देवाच्या वचनाच्या शिक्षकांना आपली कामगिरी पूर्ण करण्याचे आवाहन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १/१५ पृ. ५-९

ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक एकत्रित येतात

अमेरिकेतील एका ख्रिस्ती वडिलांनी म्हटले: “आम्ही ज्या प्रांतीय अधिवशेनांना उपस्थित राहिलोय त्या प्रत्येक प्रांतीय अधिवेशनामुळं आमची उभारणी झालीय. या वर्षीचे अधिवेशन अवर्णनीय होतं. अधिवेशनाच्या प्रत्येक दिवशी आम्ही अशी खूणगाठ मनी बाळगून परतत होतो, की दुसरा दिवस आमच्या अपेक्षांपेक्षाही चांगला जाईल आणि आमची एकदाही निराशा झाली नाही!”

“ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनास तुम्ही उपस्थित राहिला असल्यास निःसंशये तुम्ही या उत्साही प्रतिनिधीशी सहमत व्हाल. यहोवाचे साक्षीदार देवाचे संदेशवाहक या नात्याने जी कामगिरी पूर्ण करतात त्या कामगिरीच्या एका पैलूची चर्चा दर दिवशी करण्यात आली. आपण या तीन दिवसांच्या कार्यक्रमाची उजळणी करू या.

‘शांतीची घोषणा करणारे किती मनोरम दिसतात’

हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचा विषय होता. यशया ५२:७ यावर तो आधारित होता. या कठीण काळात अनेक जण आव्हानात्मक परिस्थितींमध्ये यहोवाची सेवा करत आहेत. “शांतीच्या आवेशी उद्‌घोषकांचे वृत्त ऐकणे” या भाषणात काही विश्‍वासू जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यांचे व्यक्‍तिगत अनुभव ऐकणे खरोखरच उत्तेजनात्मक होते आणि अशा प्रकारे उपस्थितांना या गोष्टीची हमी देण्यात आली, की टिकून राहण्यासाठी ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देण्याद्वारे यहोवा त्यांना देखील मजबूत करू शकतो.—२ करिंथकर ४:७.

यहोवाच्या अपेक्षा भारी नाहीत. (१ योहान ५:३) हे सकाळच्या कार्यक्रमाच्या शेवटच्या भाषणात स्पष्ट करण्यात आले आणि या भाषणाच्या अखेरीस देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे शीर्षक असलेले ३२ पानांचे माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. सुंदररीत्या वर्णन केलेले हे नवीन अभ्यास माध्यम देवाच्या उद्देशांविषयी अधिकाधिक लोकांना शिकवण्यासाठी मदत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडील यात काही शंका नाही. या नवीन प्रकाशनाच्या वापराविषयीच्या सूचना या नियतकालिकातील शेवटच्या अभ्यास लेखात आणि पृष्ठे १६ व १७ वर आहेत.

“चांगल्या कामात टिकून राहणे” या भाषणात यहोवाला आपल्या परीक्षांची चांगली जाणीव आहे, या गोष्टीवर जोर देण्यात आला. अटळ राहणे आणि आशा न सोडणे, हा टिकून राहण्याचा अर्थ आहे. आपल्या मदतीसाठी यहोवाने त्याचे वचन, त्याचा आत्मा आणि त्याची संघटना आपल्याला दिली आहे. प्रचार करण्यासाठी सहनशीलता लागते आणि प्रचार आपल्याला सहनशील होण्यास मदत करतो कारण हा प्रचार आपल्या विश्‍वासास जिवंत ठेवतो. यास्तव, अंतिम रेखेच्या जवळ असल्यामुळे आपल्या समस्यांमुळे आपण आपल्या आवेशात कमी पडता कामा नये कारण शेवटपर्यंत टिकून राहणाऱ्‍यांचाच उद्धार होईल.—मत्तय २४:१३.

सा. यु. पू. ५३७ मध्ये बॅबिलोनमधील बंदिवासी यहुद्यांची सुटका आणि जेरुसलेमेत शुद्ध उपासनेची पुनःस्थापना या गोष्टींकडे “ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने आपली भूमिका” या प्रमुख भाषणाने लक्ष आकर्षित केले. वक्‍त्‌याने सांगितले, की ही घटना, देवाचे राज्य लवकरच जगव्याप्त प्रमाणात जे साध्य करणार आहे त्या गोष्टीची फक्‍त एक पूर्वझलक होती. (स्तोत्र ७२:७; यशया ९:७) या राज्याच्या सुवार्तेता प्रचार करणे आणि त्या संदेशाच्या एकवाक्यतेत जगणे हे आपले सध्याचे काम आहे. या कामाचा त्याग न करता ते पुढे चालू ठेवण्यासाठी देवावरील आणि शेजाऱ्‍यावरील प्रेमाने आपल्याला प्रेरित करण्यास हवे.—प्रेषितांची कृत्ये ५:४२.

“मनोरंजनाच्या गूढ पाशांबद्दल सावध असा” हा परिसंवाद शुक्रवारच्या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. आजचे संगीत, चित्रपट, व्हिडियो, दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम, व्हिडियो गेम्स, पुस्तके, नियतकालिके आणि कॉमिक्स यांमध्ये अनेकदा पैशाचिक विचारसरणी दिसून येते. यास्तव, आपल्याला “वाइटाचा वीट” मानण्याची आणि “बऱ्‍याला चिकटून” राहण्याची गरज आहे. (रोमकर १२:९) होय, तिरस्कृत गोष्ट या अर्थाने भ्रष्ट मनोरंजनाकडे पाहणे आणि ते टाळणे आपल्यासाठी अगत्याचे आहे तसेच आपण शुद्ध, सद्‌गुणी व स्तुत्य गोष्टींवर मन लावण्यास हवे. (फिलिप्पैकर ४:८) यहोवाच्या संघटनेद्वारे पुरवण्यात आलेली प्रकाशने आणि संशोधन साधने यांमुळे आपले मन उभारणीकारक विचारांनी प्रेरित होते तसेच योग्य आणि अयोग्य यातील भेद जाणण्यास ही प्रकाशने आणि संशोधन साधने आपल्याला प्रशिक्षित करतात. (इब्री लोकांस ५:१४) खवळलेल्या समुद्रातील तराफ्याप्रमाणे आपण या तरतुदींना चिकटून राहिले पाहिजे.

“दियाबलाचा विरोध करा—कोणतीही प्रतिस्पर्धी सहन करू नका” हे त्यानंतरचे भाषण होते. वाग्दत्त देशात प्रवेश करण्याच्या काही काळाआधी हजारो इस्राएली अनैतिकतेच्या पाशात अडकले. फीनहासने खऱ्‍या उपासनेसाठी कोणतीही प्रतिस्पर्धी सहन केली नाही. पातक्यांच्या विरोधात त्याने निर्णयात्मक कार्य केले आणि त्याच्या एकनिष्ठ भक्‍तीमुळे यहोवाला आनंद झाला. (गणना २५:१-१३) देवाच्या नवीन जगात प्रवेश करण्यासाठी आपल्यांतील प्रत्येकाला अयोग्य शाबीत करणे, हा सैतानाचा उद्देश आहे. आपल्याला भ्रष्ट करू पाहणाऱ्‍या सैतानाच्या प्रयत्नांस आपण फिनहासप्रमाणे विरोध केला पाहिजे. आपण अविवाहित असो अथवा विवाहित, “जारकर्माच्या प्रसंगापासून पळ” काढणे अगत्याचे आहे.—१ करिंथकर ६:१८.

“देववचनाच्या सचोटीला निष्ठेने उंचावून धरणे” हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे अखेरचे भाषण होते. अनेक भाषांतरकार शास्त्रवचनांच्या भागांत फेरफार करतात किंवा ते गाळतात. उदाहरणार्थ, स्त्रियांच्या हक्कांचे समर्थन करणाऱ्‍यांना संतुष्ट करण्यासाठी, नवा करार आणि स्तोत्रे: बहुव्यापी आवृत्ती (इंग्रजी) चे भाषांतरकार देवाला पिता या अर्थाने नव्हे तर माता-पिता आणि येशूला “मनुष्याचा पुत्र” असे सूचित न करता “मनुष्य” असे सूचित करतात. उलटपक्षी, नवे जग भाषांतर (इंग्रजी) मूळ भाषेच्या मजकुराशी अगदी विश्‍वासूपणे जडून राहते ज्यामुळे अनेक शास्त्रवचनीय बाबींवरील आपले विचार स्पष्ट होण्यास मदत झाली आहे. उदाहरणार्थ, वक्‍त्‌याने म्हटले: “नवे जग भाषांतर यात केलेल्या अचूक भाषांतरामुळे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीच्या नमुन्याप्रमाणे वडीलवर्गाच्या नेमणुकीद्वारे आपल्याला मंडळींची पुनःरचना करण्यास आधार मिळाला.” देवाचे वचन दररोज वाचण्याद्वारे आणि त्याच्या सल्ल्याचा अवलंब केल्याने आपण देववचनाला एकनिष्ठा दाखवतो. या वक्‍त्‌याने असेही म्हटले: “देववचनाचा इतरांना आवेशाने प्रचार करणे आणि इतरांना शिकवताना त्याचा काळजीपूर्वक उपयोग करणे तसेच देववचन जे म्हणते त्यात फेरफार करून किंवा ते आपल्या विचारांशी जुळण्यासाठी त्यात फेरफार करून त्याचे पाल्हाळ लावण्याचा कधीही प्रयत्न न करण्याद्वारे आपण हे दाखवून देतो, की आपण देववचनाचे एकनिष्ठ समर्थक आहोत.”

‘देवाची शांती सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे जाते’

फिलिप्पैकर ४:७ या वचनावर आधारित असलेल्या विषयाने अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवसाचे वातावरण तयार केले. देण्यात आलेली माहिती एखाद्याचे सेवाकार्य, कुटुंब, समर्पण आणि दररोजच्या इतर गोष्टींच्या योग्य दृष्टिकोनाशी संबंधित होती.

दैनंदिन वचनाची चर्चा केल्यानंतर “शांतीची सुवार्ता आणणारे संदेशवाहक” हा परिसंवाद सादर करण्यात आला. आपला संदेश शांतीचा संदेश आहे आणि तो शांतिमय पद्धतीने दिला पाहिजे. (इफिसकर ६:१५) वादविषय नव्हे, तर हृदय जिंकणे हे आपले ध्येय आहे. यहोवाच्या संघटनेपासून मिळणारे प्रशिक्षण आणि प्रकाशने आपल्याला अगदी हेच करण्यास मदत करतात. औदासिन्य किंवा उदासीनता यांमुळे आपण निराश होता कामा नये. उलटपक्षी, व्यक्‍तिगत अभ्यास, सभांची उपस्थिती आणि प्रचार कार्यातील सहभाग यांचा चांगला नित्यक्रम असण्यास हवा आणि आपण “होईल तितके” करण्यातही कायम असण्यास हवे. (२ तीमथ्य २:१५) इतरांचे आणि विशेषतः सत्यात असणाऱ्‍यांचे चांगले करण्याकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. (गलतीकर ६:१०) होईल तितके करण्याचा असा अर्थ होत नाही, की आपण आपली दमछाक करून घ्यावी. आपली स्वतःची क्षमता आणि परिस्थितींनुरूप एखाद्याला जे काही करणे शक्य आहे ते यहोवाला स्वीकाहार्य आहे.

राज्य आस्थांना वृद्धिंगत करण्यासाठी देवाचे लोक आपला वेळ, आपली शक्‍ती आणि आपली सामुग्री देतात. “यहोवाच्या संघटनेत संतोषाने देणे” या भाषणाने स्पष्ट केले, की जसजसे राज्य संदेशाला अधिक मेंढरासमान लोक प्रतिक्रिया दाखवतात तसतसे ज्यादा साहित्याची, सभेच्या ठिकाणांची आणि शाखा सुविधांची गरज पडते. जगव्याप्त प्रचार कार्य पूर्ण करण्यासाठी जे काही आवश्‍यक आहे ते देण्यास आपल्या देणग्यांमुळे संघटनेला शक्य होते. उदारपणे दिल्याने यहोवाचा सन्मान देखील होतो आणि देणगी देणाऱ्‍यास आनंद मिळतो. यामुळे ख्रिस्ती या नात्याने आपण उपासनेच्या या महत्त्वपूर्ण पैलूकडे दुर्लक्ष करता कामा नये.—२ करिंथकर ८:१-७.

यहोवाच्या साक्षीदारांच्या मोठ्या एकत्रीकरणांचे नेहमी प्रमुख आकर्षण असणाऱ्‍या बाप्तिस्म्याच्या भाषणाने सकाळचा कार्यक्रम संपला. पाण्याचा बाप्तिस्मा घेण्याद्वारे नवीन समर्पित लोक येशूच्या पदचिन्हांचे अनुकरण करतात हे पाहून किती आनंद होतो! (मत्तय ३:१३-१७) असे पाऊल ज्यांनी उचलले आहे त्या सर्वांनी महान बुद्धीच्या स्रोताद्वारे—बायबलद्वारे शिक्षण प्राप्त केले आहे. तसेच, त्यांना जीवनात खरा उद्देश सापडला आहे आणि आपण योग्य तेच करत आहोत हे जाणल्याने मिळणाऱ्‍या शांतीद्वारे ते आशीर्वादित झाले आहेत.—उपदेशक १२:१३.

“समजबुद्धी तुमचे संरक्षण करो” या भाषणात समर्पक सल्ला देण्यात आला. व्यवसायाच्या व्यवहारांमध्ये समजबुद्धी फार महत्त्वाची आहे. राज्य सभागृहांमध्ये आपण व्यक्‍तिगत व्यवसायाबद्दलच्या गोष्टी करू नये तसेच आर्थिक लाभासाठी सहख्रिश्‍चनांचा गैरफायदा घेऊ नये. (पडताळा योहान २:१५, १६.) व्यवसायात गुंतवणूक करतेवेळी किंवा पैसे उधार घेतेवेळी अथवा देतेवेळी देखील समजबुद्धी आवश्‍यक आहे. वक्‍त्‌याने म्हटले: “व्यवसायातील जोखीमेत अपयश आल्याने ख्रिश्‍चन निराश झाले आहेत आणि पैसा मिळवून देणाऱ्‍या जोखीमीच्या योजनांत उतावीळपणे उतरलेल्या काहींची तर आध्यात्मिकताही नाहीशी झाली आहे.” एकमेकांशी व्यवसाय करणे हे ख्रिश्‍चनांकरता गैर नसले तरी सावधगिरी बाळगणे सुज्ञतेचे आहे. जेव्हा दोन आसामींत व्यवसाय करार करण्यात येतो तेव्हा अटी नेहमी लेखी स्वरूपात असाव्यात.

“त्याने त्यांना नर आणि नारी असे उत्पन्‍न केले” या भाषणात स्त्री आणि पुरुषांसंबंधी असणाऱ्‍या देवाच्या दर्जाविषयी चर्चा करण्यात आली. संपूर्ण इतिहासात स्त्री-पुरुषांच्या भूमिकांचा विपर्यास करण्यात आला आहे. वक्‍त्‌याने असे म्हटले: ‘मर्दानगी म्हणजे निर्दयी अंमल, परखडपणा किंवा पौरुषत्वाचा अभिमान असा अनेकांचा चुकीचा ग्रह आहे. काही संस्कृतींमध्ये पुरुषाने चारचौघांत अथवा एकांतात रडणे दुर्मिळ किंबहुना शरमेची गोष्ट मानली जाते. तथापि, योहान ११:३५ सांगते, की लाजरच्या कबरेच्या बाहेरील लोकांसमोर “येशू रडला.”’ स्त्रियांबद्दल काय? स्त्रीत्व म्हणजे शारीरिक सौंदर्य असे अनेकदा मानले जाते. परंतु वक्‍त्‌याने असे विचारले: “एखादी स्त्री लावण्यवती असेल परंतु तिच्यात समजूतदारपणाचा अभाव असल्यास आणि ती भांडणे करणारी, टोमणे देणारी किंवा मगरूर असल्यास ती खऱ्‍या अर्थाने कोमल, सुंदर होऊ शकते का?“ (नीतिसूत्रे ११:२२; ३१:२६.) ख्रिस्ती पुरुष आणि स्त्रिया आपल्या बोलण्यात, वागण्यात आणि पेहरावात बायबलचे दर्जे अनुसरण्याचा प्रयत्न करतात. वक्‍त्‌याने पुढे म्हटले: “पवित्र आत्म्याची फळे प्रदर्शित करणाऱ्‍या पुरुषास आदर आणि स्त्रीस प्रेम देणे सोपे आहे.”—गलतीकर ५:२२, २३.

“शांतीचा देव तुमची काळजी घेतो” हा परिसंवाद त्यानंतर होता. अनेक ख्रिश्‍चनांना पैशाची चणचण आहे. तथापि, यहोवा अभिवचन देतो: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही.” (इब्री लोकांस १३:५) बिकट आर्थिक परिस्थिती असताना देखील सहायक पायनियर किंवा नियमित पायनियर सेवा करण्याद्वारे काही जणांनी या अभिवचनावरील आपला विश्‍वास दाखविला आहे. पायनियर या नात्याने आता कार्य करता येणे ज्यांना शक्य नाही असे इतर जण साक्ष देण्याच्या हरएक संधीचा फायदा घेण्याद्वारे राज्य आस्थांना प्रथमस्थानी ठेवतात. (मत्तय ६:३३) हे सर्व प्रयत्न प्रशंसनीय आहेत! आपल्या सेवाकार्यात मदत व्हावी आणि समस्यांना तोंड देण्यास साहाय्य व्हावे यांकरता यहोवाच्या संघटनेने आपल्याला पुष्कळ प्रकाशने पुरवली आहेत. आपण यहोवाच्या आध्यात्मिक तरतुदींचे मोल जाणल्यास या आर्थिकरीत्या बिकट काळात शांती देण्याद्वारे तो आपल्याला आशीर्वादित करील.—स्तोत्र २९:११.

“कौटुंबिक जीवनात ईश्‍वरी शांती अनुसरा” हा दिवसाच्या अखेरच्या भाषणाचा विषय होता आणि यावेळी कौटुंबिक सौख्यानंदाची गुरूकिल्ली हे नवीन पुस्तक प्राप्त झाल्याने उपस्थितांना आनंद झाला. वक्‍त्‌याने आर्जवले: “या पुस्तकाचा व्यक्‍तिगतपणे आणि कौटुंबिक गट म्हणून चांगल्याप्रकारे अभ्यास करा. बायबलवर आधारित सल्ल्याचा अवलंब करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा आणि तुमच्या कुटुंबाची शांती आणि आनंद निश्‍चितच वृद्धिंगत होईल.“

“ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटा”

हा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवसाचा समर्पक विषय इफिसकर ४:३ या वचनावर आधारित होता. यहोवाचे साक्षीदार सर्व राष्ट्रांतून आलेले आहेत आणि त्यांना यहोवाने शिकवले आहे. यास्तव, ते शांतिप्रिय आहेत. ते येशूच्या उदाहरणाचे अनुकरण करतात आणि ‘आत्म्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्याचा’ प्रयत्न करतात.

“योग्य प्रकारच्या संदेशवाहकांना ओळखणे” या परिसंवादात यहोवाच्या संघटनेतील शांतीवर जोर देण्यात आला. प्राचीन इस्राएलमध्ये खोटे संदेष्टे होते. तथापि, जेरुसलेमेचे अधःपतन, बंदिवासाचा काळ आणि कालांतराने देवाच्या लोकांची सुटका यांविषयी देवाच्या खऱ्‍या संदेशवाहकांनी—जसे की यशया, यहेज्केल आणि यिर्मया—यांनी अचूकपणे भाकीत केले होते. तशाच प्रकारची परिस्थिती आज आहे. राजकीय आणि खोट्या धार्मिक क्षेत्रांत खोटे संदेशवाहक मोठ्या प्रमाणात आहेत. तथापि, या व्यवस्थीकरणाविषयीच्या आपल्या उद्देशाची घोषणा करण्यासाठी यहोवाने आपल्या साक्षीदारांना तयार केले आहे. विशेषतः १९१९ पासून देवाच्या संदेशाची घोषणा करण्याकरता यहोवाच्या सेवकांचा उपयोग करण्यात आला आहे. ख्रिस्ती धर्मजगताच्या खोट्या संदेशवाहकांपासून ते किती भिन्‍न आहेत! पूर्ण झाले, असे यहोवा जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपण या कार्यातील आपला भाग प्रामाणिकपणे पूर्ण करू.

मार्गदर्शन, सांत्वन आणि आशा यांचा महान स्रोत शास्त्रवचने आहेत यावर “देवाचे वचन ऐका आणि त्याचे पालन करा” या भाषणाने जोर दिला. (यशया ३०:२०, २१; रोमकर १५:४) आजच्या जगातील स्वैराचार अधिकाधिक वाढत आहे. यामुळे देवाचे वचन आणि त्याची संघटना यांकडून येणारा सल्ला ऐकण्याची आपल्याला पूर्वी कधीही नव्हती इतकी आज गरज आहे. यहोवाला आपल्या कमतरता ठाऊक आहेत आणि आपल्याला लाभदायक ठरेल असा मार्ग त्याने आपल्या वचनात स्पष्टपणे नमूद करून ठेवला आहे. यहोवा आपला पाठीराखा आहे हे जाणल्याने तो आपल्याला जे काही करण्यास सांगतो ते करण्यासाठी पुढे जाण्यास आपल्याला आत्मविश्‍वास मिळतो.

या भाषणाने त्यानंतर होणाऱ्‍या पूर्ण-पोशाख नाटकासाठी उपस्थित जणांची मनःस्थिती तयार केली. “ईश्‍वरशासित प्रबंधांना आदर का द्यावा?” हा त्या नाटकाचा विषय होता. बायबलमधील गिदोनाच्या अहवालाचा उपयोग करून या प्रस्तुतीने एक चांगला धडा शिकायला मिळाला—आपण देवाच्या सूचना पाळल्या पाहिजेत आणि त्याच्या सूचनांऐवजी आपल्याच विचारसरणीप्रमाणे वागू नये किंवा ईश्‍वरशासित सल्ला टाळू नये.

“अखेरीस शांती!—कोणत्या उगमाकडून?” हा जाहीर भाषणाचा विषय होता. देवाने अभिवचन दिलेल्या शांतीची कल्पना करणे ह्‍या जगाला शक्य नाही. वक्‍त्‌याने म्हटले: “खरी शांती म्हणजे प्रत्येक दिवशी शांती. देवाची शांती म्हणजे आजार, वेदना, दुःख आणि मृत्यू यांपासून मुक्‍त असलेले जग.” बायबल आपल्याला सांगते, की यहोवा “दिगंतापर्यंत लढाया बंद करितो.” (स्तोत्र ४६:९) तो हे कसे करील? युद्ध भडकावणाऱ्‍या दियाबल सैतानाला काढण्याद्वारे. (प्रकटीकरण २०:१-३) यामुळे लीन लोकांना ‘पृथ्वीचे वतन मिळणे आणि उदंड शांतिसुखाचा उपभोग घेणे’ शक्य होईल.—स्तोत्र ३७:११.

सप्ताहासाठी असणाऱ्‍या टेहळणी बुरूज अभ्यासाच्या सारांशानंतर अधिवेशनातील शेवटचे भाषण देण्यात आले. आपले प्रचार कार्य अतुलनीय आणि निकडीचे आहे या गोष्टीवर “ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने पुढे जाणे” हे शीर्षक असलेल्या प्रेरक भाषणाने जोर दिला. आराम करण्याची, रेंगाळत बसण्याची किंवा चुकीच्या कल्पनांकडे फिरण्याची ही वेळ नाही. आपल्याला आवश्‍यक असणाऱ्‍या गोष्टी—देवाचा संदेश, त्याचा पवित्र आत्मा आणि त्याच्या प्रेमळ ईश्‍वशासित संघटनेकडून येणाऱ्‍या पुष्कळ तरतुदी आपल्याजवळ आहेत. यास्तव देवाचे सेवक म्हणून आपण ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक या नात्याने आगेकूच करीत राहू!

[९ पानांवरील चौकट/चित्रं]

कुटुंबांसाठी प्रेमळ तरतूद

“ईश्‍वरी शांतीचे संदेशवाहक” या प्रांतीय अधिवेशनाच्या दुसऱ्‍या दिवशी उपस्थित राहिलेल्यांना कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे शीर्षक असलेले नवीन प्रकाशन प्राप्त झाल्यावर ते रोमहर्षित झाले. देवावर प्रेम करणाऱ्‍या सर्व कुटुंबांना या पुस्तकातील शास्त्रवचनीय माहितीचा लाभ मिळेल.

अमेरिकेतील कनेक्टिकट येथील एक वडील असा अभिप्राय मांडतात: “कौटुंबिक सौख्यानंद हे पुस्तक आम्हाला जूनच्या १५ तारखेला मिळालं. जून १६ पर्यंत ते माझं निम्मं वाचून झालं. जून १७ ला आम्ही या पुस्तकातून पहिला कौटुंबिक अभ्यास घेतला तेव्हा आम्हाला किती उत्तेजन मिळालं! त्याच दिवशी पुस्तक वाचून झालं. या पुस्तकापासून लाभ घेवू इच्छिणाऱ्‍यांकरता ते फार मोलाचं शाबीत होईल यात काही शंका नाही. या पुस्तकातील स्पष्ट आणि अद्ययावत माहितीमुळे या गोष्टीची पुन्हा एकदा प्रचिती मिळते, की ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास यथाकाळी खावयास’ देत आहे आणि या बिकट काळातील आपल्या गरजांविषयी त्याला फार काळजी आहे.”—मत्तय २४:४५-४७.

[७ पानांवरील चित्र]

देव काय अपेक्षितो हे जाणण्याची युवकांची आणि वृद्धांची देखील इच्छा आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा