वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १/१ पृ. ६-११
  • सर्व जण यहोवाची स्तुती करोत!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व जण यहोवाची स्तुती करोत!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “सैन्यांचा यहोवा” म्हणतो
  • वैभवी आध्यात्मिक मंदिर
  • “मी तुम्हाबरोबर आहे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • आपले हात दृढ करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • हाग्गय व जखऱ्‍या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००७
  • “मी सर्व राष्ट्रांना हलवीन”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १/१ पृ. ६-११

सर्व जण यहोवाची स्तुती करोत!

‘उगवतीकडल्या लोकांनो, यहोवाचे गौरव करा.’—यशया २४:१५.

१. यहोवाच्या संदेष्ट्यांनी त्याचे नाव कसे लेखले व हे आजच्या ख्रिस्ती धर्मजगताच्या मनोवृत्तीच्या विरुद्ध कसे आहे?

यहोवा—देवाचे महशूर नाव! प्राचीन विश्‍वासू संदेष्ट्यांना त्या नावाने बोलण्यास किती आनंद होत होता! त्यांनी मोठ्या हर्षाने आपला सार्वभौम प्रभू यहोवाची, महान उद्देशक अशी ओळख करून देणाऱ्‍या नावाची स्तुती केली. (यशया ४०:५; यिर्मया १०:६, ७; यहेज्केल ३६:२३) तथाकथित साधारण संदेष्टेसुद्धा यहोवाची स्तुती करण्यात अतिशय सूचक होते. त्यापैकी हाग्गय संदेष्टा होता. ३८ वचनांचे मिळून बनलेल्या हाग्गय नामक पुस्तकात ३५ वेळा देवाच्या नावाचा वापर करण्यात आला आहे. ख्रिस्ती धर्मजगताचे अतिश्रेष्ठ प्रेषित आपल्या बायबल भाषांतरांमध्ये अशाप्रकारच्या भविष्यवाणीत यहोवा या अनमोल नावाऐवजी “प्रभू” ही पदवी घालून त्याचा अनुवाद करतात तेव्हा ती निर्जीव वाटते.—पडताळा २ करिंथकर ११:५

२, ३. (अ) इस्राएलच्या पुनर्स्थापनेविषयीची एक उल्लेखनीय भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (ब) यहुदी शेषांनी व त्यांच्या सोबत्यांनी कोणत्या आनंदात सहभाग घेतला?

२ यशया १२:२, मध्ये या नावाची दोन रुपे वापरण्यात आली आहेत.a संदेष्टा अशी घोषणा करतो: ‘पाहा, यहोवा माझे तारण आहे; मी भरवसा ठेवीन व भिणार नाही, कारण याह म्हणजे यहोवाच माझे सामर्थ्य व बल आहे, आणि तो माझे तारण झाला आहे.’ (तसेच यशया २६:४ पाहा, पंडिता रमाबाई भाषांतर) अशा प्रकारे, बॅबिलोनी दास्यत्वातून इस्राएलची सुटका होण्याच्या सुमारे २०० वर्षांपूर्वी, याह यहोवा आपला संदेष्टा यशयाद्वारे, तो त्यांचा बलवन्त तारणकर्ता असल्याची हमी देत होता. त्यांचा बंदिवास सा. यु. पू. ६०७ पासून ५३७ पर्यंत टिकणार होता. यशयाने असेही लिहिले: “यहोवा . . . जो सर्व पदार्थ निर्माण करतो, . . . जो कोरेशाविषयी म्हणतो, तो माझा . . . मेंढपाळ आहे, तो माझा सर्व मनोरथ साधील, व यरुशलेमविषयी म्हणेल, ती बांधण्यात येईल, आणि मंदिराविषयी म्हणेल, तुझा पाया घातला जाईल.” हा कोरेश कोण होता? तो, सा. यु. पू. ५३९ मध्ये बॅबिलोनवर विजय मिळवणारा पर्शियाचा राजा कोरेश शाबीत झाला, ही उल्लेखनीय गोष्ट आहे.—यशया ४४:२४, २८, पं. र. भा.

३ यशयाने नोंद करून ठेवलेल्या यहोवाच्या शब्दांच्या पूर्ततेनुसार, कोरेशने बंदिवासात असलेल्या इस्राएली लोकांना हा हुकूम दिला: “त्याच्या सर्व लोकांतला जो कोणी तुम्हांमध्ये आहे त्याच्या संगती त्याचा देव असो; आणि त्याने यहुदांतल्या यरुशलेमेस वरती जाऊन यहोवा इस्राएलचा देव याचे घर बांधावे. जो यरुशलेमेत आहे तोच [खरा, NW] देव आहे.” गैर इस्राएली नेथीनीम आणि शलमोनाच्या सेवकांच्या पुत्रांसह एक अत्यानंदित यहुदी शेष जेरुशलमेस परतला. सा. यु. पू. ५३७ मध्ये मंडपाचा सण साजरा करण्यासाठी तसेच यहोवाच्या वेदीवर अर्पणे वाहण्यासाठी ते वेळेवर पोहंचले. पुढील वर्षाच्या दुसऱ्‍या महिन्यात त्यांनी यहोवाच्या स्तुतीचा आनंदाने जयघोष होत असताना दुसऱ्‍या मंदिराचा पाया घातला.—एज्रा १:१-४, पं. र. भा; २:१, २, ४३, ५५; ३:१-६, ८, १०-१३.

४. यशया ३५ आणि ५५ हे अध्याय एक वास्तविकता कशी बनली?

४ पुनर्स्थापनेविषयी यहोवाने केलेली पुढील भविष्यवाणी वैभवीरीत्या इस्राएलमध्ये पूर्ण होणार होती: “रान व कोरडी भूमि आनंदतील, आणि वाळवंट उल्लासेल व कमळाप्रमाणे फुलेल. . . . ते यहोवाचे वैभव, आमच्या देवाचे ऐश्‍वर्य पाहतील.” “तुम्ही हर्षाने निघाल, आणि शांतीने चालवले जाल; तुम्हांपुढे पर्वत व डोंगर गायन करीत सुटतील, . . . आणि ते यहोवासाठी नाव व सर्वकाळचे अविनाशी चिन्ह असे होईल.”—यशया ३५:१, २; ५५:१२, १३, पं. र. भा.

५. इस्राएलचा आनंद तात्पुरता का होता?

५ परंतु, हा आनंद तात्पुरता होता. शेजारील लोकांनी मंदिर बांधण्यासाठी संमिश्र विश्‍वासाची मैत्री ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरवातीला यहुद्यांनी असे घोषित करून ती मैत्री अमान्य केली की: “आमच्या देवाचे घर बांधण्यास तुमचा आमचा काही संबंध नाही; केवळ पारसाच्या कोरेश राजाने आम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे आम्हीच यहोवा इस्राएलचा देव याचे मंदिर बांधू.” आता हे शेजारी त्यांचे कट्टर विरोधक बनले. ते सतत “यहूदाच्या लोकांचे हात ढिले करू लागले व त्यांना त्रास देऊ लागले.” इतकेच नव्हे, तर त्यांनी कोरेश नंतर आलेल्या अर्तहशश्‍त राजाला परिस्थितीविषयी चुकीची माहिती दिली ज्यामुळे त्याने मंदिराच्या बांधकामावर बंदी आणली. (एज्रा ४:१-२४, पं. र. भा.) १७ वर्षांपर्यंत ते काम ठप्प झाले. त्या काळादरम्यान यहुदी लोक भौतिक जीवनशैलीत पूर्णपणे बुडाले, ही दुःखाची गोष्ट आहे.

“सैन्यांचा यहोवा” म्हणतो

६. (अ) यहोवाने इस्राएलमधील परिस्थितीला कसा प्रतिसाद दिला? (ब) हाग्गयच्या नावाचा स्पष्ट अर्थ उचित का आहे?

६ तरीसुद्धा, यहोवाने यहुद्यांना आपल्या जबाबदारीसंबंधाने जागृत करण्यासाठी, विशेषकरून हाग्गय व जखऱ्‍या यांसारखे संदेष्ट्ये पाठवून इस्राएलच्या वतीने आपली ‘शक्‍ती आणि आपले सामर्थ्य’ प्रदर्शित केले. हाग्गयच्या नावाचा अर्थ एका सणाशी संबंधित आहे, कारण त्याचा अर्थ “सणाच्या दिवशी जन्मलेला” असा होतो. उचितपणे, मंडपाचा सण ज्या महिन्यात चालू झाला त्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तो भाकिते करू लागला आणि त्या वेळी यहुद्यांना ‘दुसरे काही नव्हे तर केवळ आनंद’ करावयाचा होता. (अनुवाद १६:१५) हाग्गयद्वारे यहोवाने ११२ दिवसांच्या कालमर्यादेत चार संदेश दिले.—हाग्गय १:१; २:१, १०, २०.

७. हाग्गयच्या सुरवातीच्या शब्दांनी आपल्याला प्रोत्साहन कसे मिळण्यास हवे?

७ आपल्या भविष्यवाणीची सुरवात करताना हाग्गय म्हणाला: “सैन्यांचा यहोवा असे म्हणतो.” (हाग्गय १:२अ, पं. र. भा.) ती ‘सेना’ कोण असेल बरे? ती सेना यहोवाच्या देवदूतांची आहे, जिला काहीवेळा बायबलमध्ये लष्करी सेना असे संबोधले आहे. (ईयोब १:६; २:१; स्तोत्र १०३:२०, २१; मत्तय २६:५३) सार्वभौम प्रभू यहोवा स्वतः, पृथ्वीवर खऱ्‍या उपासनेच्या पुनर्स्थापनेच्या आपल्या कार्याला मार्गदर्शन देण्याकरता या अजिंक्य स्वर्गीय सैन्यबलाचा उपयोग करीत आहे हे ऐकून आपल्याला प्रोत्साहन मिळत नाही का?—पडताळा २ राजे ६:१५-१७.

८. इस्राएलवर कोणत्या दृष्टिकोनाचा प्रभाव पडला होता व त्याचा काय परिणाम झाला?

८ हाग्गयच्या पहिल्या संदेशातील मजकूर काय होता? लोकांनी म्हटले होते: “समय, यहोवाचे घर बांधायचा समय अजून आला नाही.” ईश्‍वरी उपासनेच्या पुनर्स्थापनेला चित्रित करणारे मंदिराचे बांधकाम, त्यांची मुख्य चिंता राहिली नव्हती. त्याऐवजी ते स्वतःसाठी राजवाड्यासारखी घरे बांधू लागले होते. भौतिक दृष्टिकोनामुळे यहोवाच्या उपासनेबद्दलचा त्यांचा आवेश कमी झाला होता. परिणाम, त्याचा आशीर्वाद त्यांच्यावरून काढून घेण्यात आला. त्यांची शेते आता सुपीक राहिली नाहीत, कडक हिवाळ्यात त्यांच्याकडे पुरेसे वस्त्र नव्हते. त्यांचा पगार अपुरा पडत होता, जणू काय ते छिद्र असलेल्या पिशवीत आपला पैसा टाकत होते.—हाग्गय १:२अ-६.

९. यहोवाने कोणता जोरदार, उभारणीकारक सल्ला दिला?

९ दोन वेळा यहोवाने हा कडक सल्ला दिला: “तुम्ही आपल्या मार्गांकडे लक्ष लावा.” स्पष्टपणे, जेरुसलेमचा प्रांताधिकारी जरुब्बाबेल आणि महायाजक यहोशूb यांनी याला प्रतिसाद दिला व सर्व लोकांना ‘यहोवा त्यांचा देव याच्या शब्दाला आणि यहोवा त्यांचा देव याने पाठवलेल्या हाग्गय भविष्यवाद्याच्या वचनांस मान्य करण्यास’ उत्तेजन दिले, “आणि लोक यहोवाचे भय धरू लागले.” याशिवाय, “यहोवाचा निरोप्या हाग्गय यहोवाच्या निरोपाने लोकांशी बोलला; तो म्हणाला, यहोवा म्हणतो, मी तुम्हांपाशी आहे.”—हाग्गय १:५, ७-१४, पं. र. भा.

१०. यहोवाने इस्राएलसाठी आपल्या शक्‍तीचा कसा वापर केला?

१० जेरुसलेममधील काही वयस्कांना वाटले असावे, की पुनः बांधलेल्या मंदिराचे वैभव भूतपूर्व मंदिराच्या तुलनेत “काहीच” नसेल. परंतु ५१ दिवसांनंतर, यहोवाने हाग्गयला दुसरा संदेश घोषित करण्यास प्रेरित केले. तो म्हणाला: ‘हे जरूब्बाबेला, बलवान्‌ हो, आणि मुख्य याजका यहोसादाकाच्या मुला यहोशवा, बलवान्‌ हो, आणि देशांतल्या सर्व लोकांनो, बलवान व्हा व काम करा, कारण मी तुम्हांपाशी आहे, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो. तुम्ही भिऊ नका.’ यहोवा, जो आपल्या नियुक्‍त वेळी ‘आकाश व पृथ्वी हालवण्यासाठी’ आपल्या सर्वश्रेष्ठ शक्‍तीचा उपयोग करणार होता, सर्व विरोधाचा, बादशाही बंदीवरही मात करण्यात आली आहे याची त्याने खात्री केली. अवघ्या पाच वर्षांत मंदिराचे बांधकाम भव्य यशाने पार पाडले.—हाग्गय २:३-६.

११. देवाने दुसरे मंदिर ‘अधिक वैभवाने’ कसे भरले?

११ तेव्हा एक उल्लेखनीय अभिवचन पूर्ण झाले: “सर्व राष्ट्रांच्या मौल्यवान वस्तु येतील; आणि मी हे घर वैभवाने भरीन, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो.” (हाग्गय २:७, पं. र. भा.) त्या “मौल्यवान वस्तु” गैर इस्राएली लोक शाबीत झाले जे, त्याच्या उदात्त उपस्थितीचे वैभव प्रतिबिंबित करत असलेल्या मंदिरात उपासनेसाठी आले होते. या पुनः बांधलेल्या मंदिराची तुलना शलमोनाच्या दिवसात बांधलेल्या मंदिरासोबत कशी करण्यात आली? देवाच्या संदेष्ट्याने म्हटले: “ह्‍या घराचे शेवटचे वैभव ह्‍याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा अधिक मोठे होईल, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो.” (हाग्गय २:९, पं. र. भा.) भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेत, पुनः बांधलेले मंदिर पहिल्या मंदिरापेक्षा अधिक काळ टिकले. सा. यु. २९ मध्ये मशीहा प्रकट झाला तोपर्यंत ते शाबूत होते. शिवाय, स्वतः मशीहाने, सा. यु. ३३ मध्ये त्याच्या धर्मत्यागी शत्रूंनी त्याचा वध करण्याआधी त्यांच्यासमोर सत्याचा प्रचार करून मंदिराला वैभव आणले होते.

१२. पहिल्या दोन मंदिरांनी कोणता उद्देश साध्य केला?

१२ जेरुसलेममधील पहिल्या आणि दुसऱ्‍या मंदिराने, मशीहाच्या याजकीय सेवेची महत्त्वपूर्ण लक्षणे तसेच मशीहाचे वास्तविक येणे होईपर्यंत यहोवाच्या शुद्ध उपासनेला पृथ्वीवर सजीव ठेवण्याच्या पूर्वचिन्हात प्रमुख उद्देश या नात्याने कार्य केले.—इब्री लोकांस १०:१.

वैभवी आध्यात्मिक मंदिर

१३. (अ) सा. यु. २९ ते ३३ दरम्यान आध्यात्मिक मंदिराच्या बाबतीत कोणत्या घटना घडल्या? (ब) येशूच्या खंडणी बलिदानाने या विकासांमध्ये कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली?

१३ पुनर्स्थापनेविषयी हाग्गयने केलेली भविष्यवाणी नंतरच्या काळाकरता काही खास अर्थ राखून होती का? होय निश्‍चितच! जेरुसलेममधील पुनः बांधलेले मंदिर पृथ्वीवरील सर्व खऱ्‍या उपासनेचे केंद्रस्थान बनले. पण, त्याने एका अतिवैभवी आध्यात्मिक मंदिराची आगाऊ कल्पना दिली. या मंदिराच्या कार्याची सुरवात, सा. यु. २९ मध्ये यार्देन नदीत येशूच्या बाप्तिस्म्याच्या वेळी यहोवाने येशूला महायाजक या नात्याने अभिषिक्‍त केले तेव्हा झाली. त्यावेळेला पवित्र आत्मा त्याच्यावर कबूतराच्या रुपाने आला. (मत्तय ३:१६) बलिदानरूपी मृत्यूद्वारे येशूने आपली पार्थिव सेवा समाप्त केल्यानंतर, मंदिराच्या परम पवित्र स्थानाला चित्रित करणाऱ्‍या स्वर्गात त्याचे पुनरुत्थान करण्यात आले व तेथे त्याने यहोवासमोर आपल्या बलिदानाची किंमत पेश केली. ही किंमत खंडणी ठरली जिने त्याच्या शिष्यांच्या पापांना झाकून टाकले व यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात सहयाजक या नात्याने सा. यु. ३३ च्या पेन्टेकॉस्ट दिवशी त्यांना अभिषिक्‍त करण्याकरता मार्ग खुला झाला. पृथ्वीवरील मंदिराच्या अंगणात मृत्यूपर्यंत विश्‍वासूपणे सेवा केल्यामुळे, निरंतर याजकीय सेवेसाठी त्यांचे भवितव्यात स्वर्गीय पुनरुत्थान होणार होते.

१४. (अ) प्रारंभिक ख्रिस्ती मंडळीच्या आवेशी कार्यासोबत कोणता आनंद होता? (ब) हा आनंद तात्पुरता का होता?

१४ हजारो पश्‍चात्तापी यहुदी—आणि नंतर विदेशी—त्या ख्रिस्ती मंडळीकडे झुंडीने येऊ लागले व पृथ्वीवर येणाऱ्‍या देवाच्या राज्य शासनाच्या सुवार्तेची घोषणा करण्यात त्यांनी भाग घेतला. सुमारे ३० वर्षांनंतर, प्रेषित पौल म्हणू शकला, की सुवार्तेच्या प्रचाराची घोषणा “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” झाली आहे. (कलस्सैकर १:२३) पण प्रेषितांच्या मृत्यूनंतर, बऱ्‍याच प्रमाणात धर्मत्याग स्थिरावला आणि सत्याचा प्रकाश मंदावू लागला. खोट्या शिकवणुकींवर व तत्त्वज्ञानावर आधारित ख्रिस्ती धर्मजगताच्या गटबाजीने अस्सल ख्रिस्ती विश्‍वासाला झाकून टाकले.—प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०.

१५, १६. (अ) १९१४ मध्ये भविष्यवाणीची कशी पूर्णता झाली? (ब) कोणत्या एकत्रीकरणाने १९ व्या शतकाच्या उत्तरार्धाला व २० व्या शतकाच्या प्रारंभाला चिन्हित केले?

१५ शतके सरून गेली. मग १८७० च्या दशकात, प्रांजळ ख्रिश्‍चनांचा एक गट बायबलचा सखोल अभ्यास करू लागला. १९१४ हे वर्ष ‘परराष्ट्रीयांच्या सद्दीच्या’ अंताला चिन्हित करणारे आहे, असे ते शास्त्रवचनातून दाखवू शकले. पृथ्वीचा मशीही राजा या नात्याने “हक्क” असलेल्या ख्रिस्त येशूला स्वर्गीय राजा करण्यात आले तेव्हाच सात लाक्षणिक ‘सद्दींचा’ (२,५२० वर्षांचे पशूसमान मानवी शासन) अंत झाला. (लूक २१:२४; दानीएल ४:२५; यहेज्केल २१:२६, २७) विशेषकरून १९१९ पासून, आजपर्यंत यहोवाचे साक्षीदार या नावाने लोकप्रिय असलेल्या या बायबल विद्यार्थ्यांनी, येणाऱ्‍या राज्याच्या सुवार्तेचा संपूर्ण पृथ्वीतलावर जोरदार प्रचार करण्यात भाग घेतला आहे. ही १९१९ ची गोष्ट आहे जेव्हा, अमेरिकेतील सिडर पॉईंट ओहायो येथे झालेल्या एका अधिवेशनात कार्यासाठी दिलेल्या बोलावण्याला यातील काही हजारोंनी होकार दिला. सन १९३५ पर्यंत यांची संख्या वाढली, कारण ५६,१५३ जणांनी क्षेत्र सेवेचा अहवाल दिला. त्या वर्षी, ५२,४६५ जणांनी येशूच्या मृत्यूच्या वार्षिक स्मारकविधीत भाकर आणि द्राक्षारस ही बोधचिन्हे सेवन केली होती. हे, यहोवाच्या स्वर्गीय महान आध्यात्मिक मंदिरात ख्रिस्त येशूसोबत याजक होण्याच्या त्यांच्या आशेचे द्योतक होते. त्यांना त्याच्यासोबत त्याच्या मशिही राज्यात सहराजे या नात्याने देखील कार्य करायचे आहे.—लूक २२:२९, ३०; रोमकर ८:१५-१७.

१६ परंतु, प्रकटीकरण ७:४-८ आणि १४:१-४ दाखवते, की या अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची एकूण संख्या १,४४,००० इतकीच मर्यादित आहे. यांतील बहुतेकांना, मोठ्या प्रमाणात धर्मत्यागाची सुरवात होण्याआधीच म्हणजेच पहिल्या शतकादरम्यान एकत्र करण्यात आले होते. १९ व्या शतकाच्या अंतापासून व २० व्या शतकात यहोवा, सर्व राष्ट्रांतून एका गटाचे एकत्रीकरण पूर्ण करत आहे ज्याला त्याच्या वचनाच्या पाण्याने शुद्ध केले आहे, येशूच्या प्रायश्‍चित्त बलिदानावर विश्‍वास प्रकट करण्याद्वारे धार्मिक घोषित केले आहे व १,४४,००० ही संख्या पूर्ण करण्याकरता सरतेशेवटी अभिषिक्‍त ख्रिस्ती या नात्याने त्यांच्यावर शिक्कामोर्तब केला आहे.

१७. (अ) १९३० च्या दशकापासून कोणत्या एकत्रीकरणाची सुरवात झाली आहे? (ब) येथे योहान ३:३० आस्थेचे का वाटते? (तसेच लूक ७:२८ ही पहा.)

१७ अभिषिक्‍त जणांच्या पूर्ण संख्येची निवड झाल्यानंतर काय घडणार आहे? १९३५ मध्ये अमेरिकेतील वॉशिंग्टन, डी. सी. येथील कलाटणी देणाऱ्‍या अधिवेशनात हे प्रकट करण्यात आले, की प्रकटीकरण ७:९-१७ मधील मोठा लोकसमुदाय, १,४४,००० “नंतर”चा गट म्हणून आपण जाणला पाहिजे ज्याला परादीस पृथ्वीवर अनंतकालिक जीवनाची आशा आहे. ‘दुसऱ्‍या मेंढरांतील’ एक असे ज्याचे पुनरुत्थान पृथ्वीवर होणार आहे तो बाप्तिस्मा करणारा योहान, अभिषिक्‍त येशूची स्पष्ट ओळख झाल्यावर मशीहाविषयी म्हणाला: “त्याची वृद्धि व्हावी व माझा ऱ्‍हास व्हावा हे अवश्‍य आहे.” (योहान १:२९; ३:३०; १०:१६; मत्तय ११:११) येशूने, १,४४,००० यांपैकी असणाऱ्‍या वाढत्या संख्येची निवड करण्याचे कार्य हाती घेतले तेव्हा, मशिहाकरता शिष्य तयार करण्याचे बाप्तिस्मा करणाऱ्‍या योहानाचे कार्य समाप्तीस आले. १९३० च्या दशकात उलट घडले. १,४४,००० पैकी होण्यासाठी कमी संख्येच्या लोकांना ‘बोलावण्यात व निवडण्यात’ आले तर, ‘दुसऱ्‍या मेंढरांच्या’ ‘मोठ्या समुदायाच्या’ संख्येत प्रचंड वाढ होऊ लागली. जगाचे दुष्ट व्यवस्थीकरण, हर्मगिदोनात आपल्या अंताकडे जसजसे वाटचाल करीत जाते तसतसा हा मोठा लोकसमुदाय द्विगुणित होत चालला आहे.—प्रकटीकरण १७:१४ब.

१८. (अ) “आज जिवंत असणारे लाखो लोक कधीच मरणार नाहीत” याची आपण पूर्ण आत्मविश्‍वासाने अपेक्षा का करू शकतो? (ब) आपण हाग्गय २:४ कडे अगदी आवेशाने लक्ष का द्यावे?

१८ सन १९२० च्या दशकाच्या सुरवातीला, यहोवाच्या साक्षीदारांनी एक खास जाहीर भाषण सादर केले ज्याचा विषय “आज जिवंत असणारे लाखो लोक कधीच मरणार नाहीत” हा होता. हे विधान त्या वेळेला कदाचित फाजील आशावादी वाटले असावे. पण, आज पूर्ण आत्मविश्‍वासाने हे विधान मांडले जाऊ शकते. बायबल भविष्यवाणीवरील वाढता प्रकाश आणि या मरणोन्मुख जगाची अराजकता या दोन्ही गोष्टी, सैतानाच्या व्यवस्थेचा अंत फार फार जवळ असल्याचे ठामपणे दर्शवतात! १९९६ चा स्मारक अहवाल दाखवतो, की १,२९,२१,९३३ जण उपस्थित राहिले ज्यांपैकी केवळ ८,७५७ (.०६८ टक्के) लोकांनी बोधचिन्हे सेवन करून आपली स्वर्गीय आशा प्रकट केली. खऱ्‍या उपासनेची पुनर्स्थापना पूर्णत्वास पोहंचत आहे. पण आपण त्या कार्यात आपले हात ढिले होऊ देऊ नयेत. होय, हाग्गय २:४ म्हणते: “देशांतल्या सर्व लोकांनो, बलवान्‌ व्हा व काम करा, असे यहोवा म्हणतो.” भौतिकवादाचा अथवा जगिकपणाचा कोणताही दबाव, यहोवाच्या कार्याकरता असलेला आपला आवेश कमी न करो असा आपण दृढनिश्‍चय करू या!—१ योहान २:१५-१७.

१९. हाग्गय २:६, ७ च्या पूर्णतेत आपण कसा भाग घेऊ शकतो?

१९ “सैन्यांचा यहोवा असे म्हणतो, आणखी एकदा, थोड्या वेळाने मी आकाशांना आणि पृथ्वीला आणि समुद्राला व कोरड्या भूमीला हालवीन, आणि मी सर्व राष्ट्रांस हालवीन आणि सर्व राष्ट्रांच्या मोलवान्‌ वस्तु येतील; आणि मी हे घर वैभवाने भरीन, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो,” या हाग्गय २:६, ७ (पं. र. भा.) च्या आधुनिक पूर्णतेत भाग घेण्याचा आपला सुहक्क आनंदविणारा आहे. लोभ, भ्रष्टाचार आणि द्वेष या २० व्या शतकातील जगात फोफावत आहे. या जगाचे हे खरोखरचे शेवटले दिवस आहेत व यहोवाने आपल्या साक्षीदारांना ‘त्याच्या सूडाचा दिवस विदित करण्यास लावण्याद्वारे’ त्याला ‘हालवून सोडणे’ केव्हाच चालू केले आहे. (यशया ६१:२) हर्मगिदोनात जेव्हा जगाचा नाश होईल तेव्हा हे प्रारंभिक हालवणे थांबेल, पण त्या काळाआधी, यहोवा त्याच्या सेवेकरता “सर्व राष्ट्रांच्या मोलवान्‌ वस्तु”—पृथ्वीवरील नम्र, मेंढरासमान लोक गोळा करत आहे. (योहान ६:४४) हा “मोठा लोकसमुदाय” आता त्याच्या उपासना घराच्या पार्थिव अंगणात ‘पवित्र सेवा’ करत आहे.—प्रकटीकरण ७:९, १५.

२०. सर्वात मौल्यवान खजिना कोठे मिळतो?

२० यहोवाच्या आध्यात्मिक मंदिरात केलेली सेवा, कोणत्याही भौतिक खजिन्यापेक्षा अधिक मौल्यवान लाभ देते. (नीतिसूत्रे २:१-६; ३:१३, १४; मत्तय ६:१९-२१) याशिवाय, हाग्गय २:९ (पं. र. भा.) म्हणते: “ह्‍या घराचे शेवटचे वैभव ह्‍याच्या पूर्वीच्या वैभवापेक्षा अधिक मोठे होईल, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो; आणि मी या स्थानात शांति देईन, असे सैन्यांचा यहोवा म्हणतो.” या शब्दांचा आज आपल्यासाठी काय अर्थ होतो? आमचा पुढील लेख ते सांगेल.

[तळटीपा]

a “याह यहोवा“ ही संज्ञा विशेष जोर देण्यासाठी वापरली जाते. शास्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी), खंड १, पृष्ठ १२४८ पाहा.

b एज्रा आणि इतर बायबल पुस्तकातील येशूवा.

उजळणीचे प्रश्‍न

◻ यहोवाच्या नावाच्या बाबतीत संदेष्ट्यांच्या कोणत्या उदाहरणाचे आपण अनुसरण करावे?

◻ पुनर्स्थापित इस्राएलला यहोवाने दिलेल्या जोरदार सल्ल्यातून आपल्याला कोणते उत्तेजन प्राप्त होते?

◻ आज कोणते वैभवी आध्यात्मिक मंदिर कार्यरत आहे?

◻ १९ व्या आणि २० व्या शतकांदरम्यान कोणती एकत्रीकरणे क्रमाक्रमाने घडली व कोणत्या भावी आशेसह?

[७ पानांवरील चित्र]

यहोवाची स्वर्गीय सेना पृथ्वीवरील त्याच्या साक्षीदारांना मार्गदर्शन देते व टिकवून ठेवते

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा