वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १२/१ पृ. ४-८
  • विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ॲक्रा—“लघू नोहाचा दिवस”
  • सॅन ॲन्जेलो—“जगाचा जणू काय अंत होत आहे असे वाटले”
  • कोबे—“लाकूड, प्लास्टर आणि मानवी शरीरांचे भग्नावशेष”
  • नैसर्गिक आपत्तींचा घाला पडतो तेव्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाचे साक्षीदार विपत्कालीन साहाय्य देतात का?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • संकटात असलेल्या आमच्या बांधवांना आम्ही कशी मदत करतो?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
  • विपत्तीनंतर मदत कशी कराल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १२/१ पृ. ४-८

विनाशादरम्यान साहाय्य पुरवणे

आपत्तींमागोमाग साहाय्य पुरवण्याचे मानवाचे प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आहेत. अनेक मदत पुरवठा योजनांनी घरांची पुनःबांधणी करण्यास, कुटुंबाला पुनः एकत्र आणण्यास आणि यासर्वांहून अधिक म्हणजे जीव वाचवण्यास मदत केली आहे.

आपत्तीचा घाला पडतो तेव्हा यहोवाचे साक्षीदार, लौकिक पीडानिवारण योजनांद्वारे केल्या जाणाऱ्‍या तरतुदींचा लाभ घेतात—तसेच याबद्दल ते कृतज्ञही आहेत. त्यासोबतच, “विशेषतः विश्‍वासाने [त्यांच्याशी] एका घरचे झालेल्यांचे बरे करावे,” हे त्यांचे शास्त्रवचनीय कर्तव्य आहे. (गलतीकर ६:१०) होय, साक्षीदारांना आपण एकमेकांचे नातेवाईक असल्यासारखे वाटते; ते एकमेकांना एका “कुटुंबाचे” लेखतात. म्हणूनच तर ते एकमेकांना ‘बंधू’ व ‘भगिनी’ असे संबोधतात.—पडताळा मार्क ३:३१-३५; फिलेमोन १, २.

याकारणास्तव, शेजारच्या प्रदेशावर जेव्हा एखादी आपत्ती ओढवते तेव्हा, यहोवाच्या साक्षीदारांपैकी वडीलजन मंडळीतील प्रत्येक सदस्याच्या ठावठिकाणांची व त्यांच्या गरजांची खात्री करून घेण्यासाठी परिश्रमी प्रयत्न करतात व आवश्‍यक साहाय्याची व्यवस्था करतात. घानातील ॲक्रा; संयुक्‍त संस्थानांतील सॅन ॲन्जेलो; आणि जपानमधील कोबेमध्ये हे कसे खरे ठरले त्याचा जरा विचार करा.

ॲक्रा—“लघू नोहाचा दिवस”

रात्री ११ वाजता पावसाला सुरवात झाली आणि पुष्कळ तासांपर्यंत अखंड वर्षाव होत होता. ॲक्रातील जॉन त्वुमासी नामक यहोवाचे एक साक्षीदार म्हणतात, “इतका जोरात पाऊस पडत होता, की माझे कुटुंब रात्रभर जागेच होते.” डेली ग्रॅफिक नावाच्या एक वृत्तपत्राने त्याला “लघू नोहाचा दिवस” असे संबोधले. जॉन पुढे म्हणतात, “आम्ही काही मौल्यवान वस्तू वरील मजल्यावर नेण्याचा प्रयत्न केला पण जिन्याचा दरवाजा उघडताच पाण्याचा लोंढा आत शिरला.”

अधिकाऱ्‍यांनी लोकांना तेथून निघून जाण्याचा इशारा दिला होता, तरीसुद्धा पुष्कळ जन कचरत होते, त्यांना वाटले रिकामे घर—अगदी पाण्याने भरलेले घर देखील—लूटमार करणाऱ्‍यांना आमंत्रण देऊ शकते. काहींची इच्छा असतानाही त्यांना घर सोडता आले नाही. पाऊलिना नामक एक मुलगी म्हणते, “मला आणि माझ्या आईला दार उघडता येत नव्हते. पाणी वाढतच चालल्यामुळे आम्ही दोघी लाकडी पिंपांवर उभे राहून छप्पराच्या वास्याला धरून राहिलो. शेवटी, पहाटे पाच वाजता आमच्या शेजाऱ्‍यांनी आमची सुटका केली.”

तुरंत, यहोवाचे साक्षीदार कामाला लागले. बेट्रिस नामक एक ख्रिस्ती भगिनी कथन करते: “मंडळीतील वडील आम्हाला शोधत होते आणि आम्ही ज्या सहसाक्षीदाराकडे आसरा घेतला होता तेथे त्यांना आम्ही आढळलो. पूर येऊन केवळ तीन दिवस उलटले होते. वडील व मंडळीतील तरुण सदस्य आमच्या साह्‍याला धावून आले, त्यांनी आमच्या घरातील व बाहेरील माती खरवडून काढली. वॉच टावर संस्थेनं डिटर्जंट, जंतुनाशके, रंग, गाद्या, रघ, कपडे आणि मुलांसाठी वस्त्र पुरवली. बांधवांनी कैक दिवसांसाठी आमच्यासाठी जेवण पाठवलं. माझ्यावर याचा गहिरा प्रभाव झाला!”

आधी ज्यांचा उल्लेख केला ते जॉन त्वुमासी असा अहवाल देतात: “आमच्या संस्थेनं आमच्यासाठी संपूर्ण घर स्वच्छ करण्याकरता पुरेल इतकं डिटर्जंट आणि जंतुनाशके पाठवलीत, असे मी इतर भाडेकरूंना सांगितलं. सुमारे ४० भाडेकरूंनी साफसफाई करायला मदत केली. मी आमच्या शेजाऱ्‍यांना आणि स्थानिक चर्चमध्ये पाळक असलेल्या मनुष्याला पण थोडं डिटर्जंट दिलं. यहोवाचे साक्षीदार फक्‍त आपल्याच लोकांवर प्रेम करतात अशी माझ्या सहकर्मचाऱ्‍यांची चुकीची समजूत होती.”

ख्रिस्ती बांधव आणि भगिनींनी त्यांना दिलेल्या प्रेमळ साहाय्याबद्दल गाढ कदर व्यक्‍त केली. बंधू त्वुमासी असा समारोप करतात: “साहाय्य म्हणून मिळालेल्या वस्तूंपेक्षा जास्त महाग असलेल्या वस्तू मी पूरामध्ये गमावल्या असल्या तरी, संस्थेकडून आलेल्या या हृदयद्रावक तरतुदीमुळे मी आणि माझ्या कुटुंबाने जितके गमावले त्याच्या कैक पटीने अधिक प्राप्त केले असे आम्हाला वाटते.”

सॅन ॲन्जेलो—“जगाचा जणू काय अंत होत आहे असे वाटले”

मे २८, १९९५ रोजी, सॅन ॲन्जेलोला उद्‌ध्वस्त करणाऱ्‍या वादळाने झाडांना मुळांसकट उखडले, विजेचे खांब उचकटले आणि विजेचा प्रवाह चालू असलेल्या तारा रस्त्यांवर फेकल्या. ताशी १६० किलोमीटर वेगाने वारा वाहत असल्यामुळे सार्वजनिक उपयुक्‍ततेच्या इमारतींना हानी पोहंचली. २०,००० पेक्षा अधिक घरे काळोखात बुडाली. मग गारांचा वर्षाव होऊ लागला. सुरवातीला, ‘आलुबुखारच्या आकाराच्या’ मग, ‘संत्र्याच्या आकाराच्या’ आणि शेवटी ‘ईडलिंबूच्या आकाराच्या गारांचा’ अहवाल राष्ट्रीय हवामान सेवेने दिला. गारांच्या वर्षावाचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. एका नागरिकाने म्हटले, “जगाचा जणू काय अंत होत आहे असे वाटले.”

वादळानंतर अभद्र शांतता पसरली. केवढी हानी झाली ते पाहण्यासाठी लोक हळूहळू आपल्या मोडतोड झालेल्या घरांमधून बाहेर पडू लागले. तग धरून उभे राहिलेल्या झाडांची सर्व पाने जणू काय ओरबडून काढल्याप्रमाणे वाटत होती. अजूनही उभी असलेली घरे सोलून काढल्यासारखी दिसत होती. काही क्षेत्रांमध्ये वाहून आलेल्या गारांच्या एक मीटर खोल ढीगामुळे जमीन झाकून गेली होती. वादळामुळे घरांच्या व वाहनांच्या हजारो खिडक्यांचा चक्काचूर झाला असल्यामुळे जमिनीला झाकून टाकलेल्या गारांशेजारी फुटलेल्या काचेचे तुकडे चकाकत होते. एक स्त्री म्हणते, “मी घराजवळ पोहंचले तेव्हा, प्रवेश-मार्गावर गाडीतच बसून मी रडू लागले. इतकी भयंकर हानी झाली होती की मी चक्रावून गेले.”

साहाय्य कार्यक्रमांनी व इस्पितळांनी वेळ न दवडता आर्थिक साहाय्य, बांधकामाचे साहित्य, वैद्यकीय उपचार व सल्ला दिला. वादळात स्वतः हानी पावलेले लोक इतरांना होता होईल तितकी मदत देत होते ही गोष्ट प्रशंसनीय आहे.

यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनी देखील पटापट कार्य केले. सॅन ॲन्जेलो येथे वडील या नात्याने कार्य करत असलेले ओब्रे कॉनर यांनी सांगितले: “वादळ शांत झाल्यानंतर लगेचच आम्ही फोनवरून एकमेकांची विचारपूस चालू केली. खिडक्यांना तक्‍तपोशी करण्यासाठी, छतावर प्लास्टिक घालण्यासाठी आणि होता होईल तसे हवामानापासून घरांचा बचाव करण्यासाठी आम्ही एकमेकांना व साक्षीदार नसलेल्या आमच्या शेजाऱ्‍यांनाही मदत केली. मग आम्ही, मंडळीतील ज्यांच्या घराला हानी पोहंचली होती अशा प्रत्येक व्यक्‍तीचे नाव लिहून घेतले. सुमारे शंभर एक घरांची दुरुस्ती करायची होती व रिलिफ एजन्सींनी पुरवलेले साहित्य पुरेसे नव्हते. म्हणून आम्ही आणखी साहित्य खरेदी करून कामासाठी संघटित झालो. एकूण, १,००० साक्षीदार, प्रत्येक सप्ताहांती सुमारे २५० जण स्वेच्छेने मदत करण्यासाठी आले. ते, ७४० किलोमीटर दूरवरून आले होते. सर्वांनी अविश्रांतपणे व बहुतेक वेळा ४० डिग्री सेल्सियसच्या हवामानात काम केले. आमच्याबरोबर एक ७० वर्षीय वृद्ध भगिनी देखील होती जी केवळ एक सप्ताहांती, म्हणजे जेव्हा त्यांच्या स्वतःच्या घराची दुरुस्ती होणार होती तो सप्ताहांत सोडून इतर प्रत्येक सप्ताहांती काम करत होत्या. आणि त्या सप्ताहांती त्या स्वतः आपल्या घराच्या छतावर दुरुस्ती करायला मदत करत होत्या!

“बघ्यांकडून आम्ही बहुतेकवेळा असे ऐकत असू, ‘इतर धर्मांनी देखील आपल्या सदस्यांसाठी असे केले तर किती चांगले होईल, नाही का?’ एका सहसाक्षीदाराच्या घरी शुक्रवारी पहाटे, दुरुस्तीच्या कामासाठी किंवा विनामूल्य अख्ख्ये छत पुनः बांधून देण्यास सज्ज असलेल्या १० ते १२ स्वयंसेवकांना (यात भगिनींचाही समावेश आहे) पाहून आमचे शेजारी प्रभावित झाले. बहुतेकवेळा एकाच सप्ताहांतात संपूर्ण काम पूर्ण व्हायचं. कधीकधी, बाहेरचा कंत्राटदार एखाद्या घराच्या छताच्या दुरुस्तीच्या कामात गर्क असायचा आणि त्याच्याच शेजारच्या घरी आमचा कर्मचारीगण यायचा. त्यांच्या आधी आम्ही जुने छत काढून दुसरे छत बांधत असू व आजूबाजूचा आवार स्वच्छ करत असू. कधीकधी फक्‍त आम्हाला पाहण्यासाठी ते आपले काम थांबवायचे!”

बंधू कॉनर शेवटी म्हणाले: “आम्ही एकत्र मिळून लुटलेल्या अनुभवांच्या आनंदाची उणीव आम्हा सर्वांना भासणार आहे. पूर्वी कधी नव्हते असे बंधूप्रेम दाखवण्याद्वारे व इतरांनी आम्हाला दाखवल्याने आम्ही एकमेकांना एका वेगळ्या दृष्टिकोनातून ओळखले आहे. आम्हाला वाटते की हा, देवाच्या नवीन जगात कशी परिस्थिती असेल याचा केवळ एक नमुना आहे जेव्हा बंधू व भगिनी, आपल्या प्रांजळ इच्छेपोटी एकमेकांना मदत करतील.”—२ पेत्र ३:१३.

कोबे—“लाकूड, प्लास्टर आणि मानवी शरीरांचे भग्नावशेष”

कोबेच्या रहिवाशांना खरे तर तयारीत असावयास हवे होते. होय, सप्टेंबर १ हा दिवस ते आपत्ती प्रतिबंध दिन म्हणून पाळतात. शाळेला जाणारी मुले भूकंप कवाईती करतात, लष्कर हेलीकॉप्टर बचाव कार्यांची तालीम करतो व अग्निशामक विभाग आपले भूकंप-सदृशीकरण उपकरणे बाहेर आणतो ज्यामध्ये, खरोखरच्या भूकंपाप्रमाणे हलणाऱ्‍या व हादरविणाऱ्‍या खोलीच्या आकाराच्या एका पेटीच्या आत स्वयंसेवक त्यांच्या उत्तरजीवी कलांचा सराव करतात. पण जानेवारी १७, १९९५ रोजी जेव्हा प्रत्यक्षात भूकंप झाला तेव्हा ही सर्व पूर्वतयारी जणू काय निरर्थक ठरली. सादृशित्रात कधीही झाले नाही असे काही तरी घडले—हजारो हजारो छते खाली कोसळली. ट्रेन उलट्या पालट्या झाल्या; महामार्गाच्या काही विभागांचे विघटन झाले; गॅस आणि पाण्याचे मुख्य नळ फुटले; पुठ्ठ्याप्रमाणे घरे कोसळली. टाईम नियतकालिकाने या दृश्‍याचे वर्णन, “लाकूड, प्लास्टर आणि मानवी शरीरांचे भग्नावशेष” असे केले.

त्यानंतर आगीचा लोळ. इमारतींना आग लागली होती आणि कितीतरी किलोमीटर दूरपर्यंत खोळंबून राहिलेल्या वाहतुकीमुळे अडकून राहिलेले अग्निशामक चिडले होते. जे आग लागलेल्या प्रत्येक ठिकाणी पोहंचले त्यांना बहुतेकवेळा शहराच्या नासधूस झालेल्या पाण्याच्या व्यवस्थांमधूनही पाणी प्राप्त करता येऊ शकत नव्हते. एका अधिकाऱ्‍याने म्हटले: “पहिला दिवस अत्यंत भीतीदायक होता. त्या जळत्या घरांमध्ये इतकी लोकं पुरली होती व त्याबद्दल मी काहीच करू शकत नाही या जाणीवेने माझ्यामध्ये त्राणच उरला नाही; मी माझ्या जीवनात पूर्वी कधीच असे अनुभवले नव्हते.”

एकूण, सुमारे ५,००० लोक मारले गेले होते व अंदाजे ५०,००० इमारतींची नासधूस झाली होती. कोबेत केवळ एक तृतीय आवश्‍यक अन्‍नसाठा होता. पाण्यासाठी काही जण फुटलेल्या नळाखालील घाणेरडे पाणी खरवडून घेऊ लागले. पुष्कळ बेघर लोकं आश्रयस्थानांकडे गेले, जेथे अन्‍नसामग्री वाटून दिली जात होती, प्रत्येक व्यक्‍तीला दर दिवशी अतिशय कमी प्रमाणात भात दिला जाई. लवकरच लोकांनी असमाधान व्यक्‍त केले. एकाने तक्रार केली, “अधिकाऱ्‍यांनी काहीच केलेले नाही. आपण त्यांच्यावर अवलंबून राहिलो तर भुकेने मरून जाऊ.”

कोबेमधील व आसपासच्या क्षेत्रांमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनी लगेच स्वतःला संघटित केले. त्यांचे काम प्रत्यक्षात पाहणाऱ्‍या एका हेलिकॉप्टर चालकाने म्हटले: “भूकंप झालेल्या दिवशी मी, घटनास्थळी गेलो आणि तेथे एक आठवडा राहिलो. मी एका आश्रयस्थानात आलो तेव्हा सगळीकडे गोंधळच गोंधळ होता. निदान साहाय्य कार्यही तेथे होत नव्हते. फक्‍त यहोवाचे साक्षीदार भूकंप झालेल्या ठिकाणी धावून आले होते व एकापाठोपाठ एक कार्य आटपू लागले.”

खरेच, पुष्कळ काम अद्याप करायचे होते. दहा राज्य सभागृहांना वापरण्यास अयोग्य ठरवण्यात आले व ४३० पेक्षा अधिक साक्षीदार बेघर झाले होते. याशिवाय, १,२०६ जण अशा घरांमध्ये राहत होते जेथे दुरुस्तीची आवश्‍यकता होती. एवढेच नव्हे तर, या आपत्तीत मरण पावलेल्या १५ साक्षीदारांच्या कुटुंबांना सांत्वनाची अत्यंत गरज होती.

संपूर्ण राष्ट्रातील सुमारे १,००० साक्षीदारांनी, दुरुस्तीचे काम करण्यासाठी आपला वेळ खर्च करण्यासाठी स्वेच्छा दाखवली. एक बंधू अशी नोंद करतात: “अद्याप बाप्तिस्मा न घेतलेल्या बायबल विद्यार्थ्यांच्या घरी जेव्हा आम्ही काम केले तेव्हा आम्हाला वारंवार विचारले जात होते, ‘याचे आम्ही किती पैसे द्यायचे?’ पण जेव्हा आम्ही त्यांना सांगितले, की हे कार्य मंडळीकडून होत आहे तेव्हा त्यांनी असे म्हणत आमचे आभार मानले, की ‘आम्ही जे काही शिकलो ते आता वास्तविकतेत आम्हाला दिसत आहे.’”

आपत्ती येऊन गेल्याबरोबर साक्षीदारांचा त्वरित व पूर्ण प्रतिसाद पाहून पुष्कळ जण प्रभावित झाले. आधी ज्या चालकाचा उल्लेख करण्यात आला तो म्हणतो, “माझ्यावर खोल प्रभाव पडला. तुम्ही एकमेकांना ‘बंधू’ व ‘भगिनी’ असे संबोधता. एकमेकांना तुम्ही कशी मदत करता हे मी पाहिले आहे; तुम्ही सर्व खरोखरच एका कुटुंबाप्रमाणे आहात.”

स्वतः साक्षीदारांनी या भूकंपातून मौल्यवान धडे शिकले. एका भगिनीने असे मान्य केले: “मला नेहमी वाटायचं, की संघटना जसजशी मोठी होत जाते तसतशी व्यक्‍तिगत चिंता व्यक्‍त करणं अवघड होतं.” पण तिची दयाळूपणे काळजी घेतल्यामुळे तिचा हा दृष्टिकोन बदलला. “मला माहीत आहे, की यहोवा केवळ संघटना या नात्यानेच नव्हे तर व्यक्‍ती या नात्यानेही आपली काळजी घेतो.” परंतु, लवकरच आपत्तींपासून कायमची मुक्‍ती भविष्यात मिळेल.

[८ पानांवरील चौकट]

कायमची मुक्‍तता लवकरच!

आपत्ती पुन्हा कधीही मानवी जीवन व उपजीविका यांच्यावर घाव घालणार नाही अशा समयाची यहोवाचे साक्षीदार चातकासमान वाट पाहत आहेत. देवाच्या नवीन जगात, पृथ्वीच्या वातावरणाशी सहकार्य करण्यासंबंधी मानवाला शिकवले जाईल. मानव जसजशा आपल्या स्वार्थी कृती सोडून देईल तसतसे नैसर्गिक आपत्तींना तो कमी भेद्य होईल.

शिवाय, यहोवा देव—नैसर्गिक शक्‍तींचा निर्माणकर्ता—त्याच्या मानवी कुटुंबाला व पार्थिव सृष्टीला निसर्गाच्या शक्‍तींकडून पुन्हा धोका होणार नाही याची खात्री करील. तेव्हा पृथ्वी खरोखरच एक परादीस असेल. (यशया ६५:१७, २१, २३; लूक २३:४३) “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या,” ही प्रकटीकरण २१:४ मधील भविष्यवाणी वैभवीरीत्या पूर्ण होईल.

[५ पानांवरील चित्रं]

पुराच्या पाण्यातून पलीकडे जाताना बेट्रिस जोन्स (डावीकडून) आणि इतरांनी साखळी कशी बनवली हे ती दाखवते

[६ पानांवरील चित्रं]

वादळानंतरचे साहाय्य कार्य

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा