आपल्या निःपक्षपाती देवाचे तुम्ही अनुकरण करीत आहात का?
निःपक्षपातीपणा—तो कोठे आढळू शकतो? अशी एक व्यक्ती आहे जी पूर्वग्रह, पक्षानुग्रह आणि दुजाभाव यांपासून मुक्त अर्थात पूर्णपणे निःपक्षपाती आहे. ती व्यक्ती म्हणजे यहोवा देव, मानवजातीचा निर्माणकर्ता. तथापि, मानवांबद्दल, १९ व्या शतकातील इंग्रजी लेखक चार्ल्स लॅम्ब यांनी प्रांजळपणे असे लिहिले: “सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास मी पूर्णपणे पूर्वग्रहांनी—आवडीनिवडींनी बनलो आहे.”
निःपक्षपातीपणाची बाब येते तेव्हा, मानवी संबंधात ही बाब कमी पडते. “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो,” असे निरीक्षण शलमोन या इस्राएलाच्या सुज्ञ राजाने अनेक शतकांपूर्वी केले. (उपदेशक ८:९) जातीय द्वेष, राष्ट्रीय संघर्ष आणि कौटुंबिक हाडवैर यांमध्ये सतत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यास्तव, मानव स्वतः होऊन निःपक्षपाती समाज विकसित करू शकतील, असा विश्वास बाळगणे वास्तववादी आहे का?
आपल्या प्रवृत्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि खोलवर मुळावलेल्या कोणत्याही पूर्वग्रहापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी पराकाष्ठेच्या प्रयत्नाची गरज असते. (इफिसकर ४:२२-२४) आपल्या सामाजिक आणि शैक्षणिक वातावरणाने स्थापन केलेल्या तसेच आपल्या कौटुंबिक, जातीय व राष्ट्रीय पार्श्वभूमींमध्ये मुळावलेल्या प्रवृत्ती नकळत आपल्या मनांत ठाण मांडून असतात. अगदी साधारण वाटणाऱ्या या प्रवृत्ती बहुतेकवेळा खोलवर रुजलेल्या असतात आणि पक्षपाती होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या प्रवृत्तींस त्या चालना देतात. स्कॉटीश कायदेपंडित आणि संपादक आचार्य फ्रॅन्सिस जेफरी यांनी असे देखील कबूल केले: “पूर्वग्रहाचे प्रमाण आणि शक्ती याशिवाय इतर दुसरी कोणतीही गोष्ट नाही ज्याविषयी एखादा मनुष्य इतक्या कालावधीपर्यंत अंधारात राहील.”
पक्षपाती होण्याच्या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न लागतो हे मानणाऱ्यांपैकी लिनाa देखील एक आहे. ती म्हणते, की एखाद्याठायी असणाऱ्या पूर्वग्रहाच्या भावनांस दाबून टाकण्यासाठी “पुष्कळ प्रयास करावा लागतो कारण संगोपनाचा फार मोठा प्रभाव पडत असतो.” लिना हे सुद्धा मान्य करते, की नियमित स्मरणिकांची आवश्यकता आहे.
यहोवाचा निःपक्षपातीपणाचा अहवाल
यहोवा निःपक्षपातीपणाचे परिपूर्ण उदाहरण आहे. यहोवाने मानवांशी केलेल्या त्याच्या व्यवहारांत कशा प्रकारे त्याचा निःपक्षपातीपणा प्रकट केला, हे आपल्याला बायबलच्या सुरवातीच्या पृष्ठांपासूनच वाचावयास मिळते. या अत्युत्तम उदाहरणांपासून आणि स्मरणिकांपासून आपण पुष्कळ काही शिकू शकतो.
सा. यु. ३६ मध्ये यहोवाने बाबींची योग्य हाताळणी करण्याद्वारे निःपक्षपातीपणा दाखविला ज्यामुळे यहुदी प्रेषित पेत्राने कर्नेल्यास आणि इतर परराष्ट्रीयांत सुवार्तेची घोषणा केली. त्यावेळी पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, . . . तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.”—प्रेषितांची कृत्ये १०:३५.
मानवी कुटुंबाशी केलेल्या आपल्या सर्व व्यवहारांत, यहोवाने त्याचा निःपक्षपातीपणा नियमितपणे दाखविला आहे. ख्रिस्त येशूने आपल्या पित्याविषयी म्हटले: “तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) निःपक्षपाती देव या नात्याने यहोवाचे आणखी गौरव करून पेत्राने पुरावा दिला: “तो तुमचे धीराने सहन करितो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.”—२ पेत्र ३:९.
नोहाच्या दिवसांत ‘पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार झाली होती आणि त्यांच्या मनातील विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट होत्या,’ तेव्हा यहोवाने मानवजातीच्या त्या जगाचा नाश करण्याचा निर्णय घोषित केला. (उत्पत्ति ६:५-७, ११, १२) तथापि, देवाच्या आज्ञेनुसार नोहाने त्यावेळच्या समकालीन लोकांदेखत तारू तयार केले. तो आणि त्याची मुले तारू तयार करीत होते त्यावेळी नोहा “नीतिमत्त्वाचा उपदेशक” देखील होता. (२ पेत्र २:५) यहोवाला त्या पिढीच्या दुष्ट आतंरिक प्रवृत्तीची कल्पना होती तरीसुद्धा त्याने निःपक्षपातीपणे त्यांच्यासाठी एक स्पष्ट संदेश धाडला. नोहाला तारू बांधण्यास आणि प्रचार करण्यास सांगण्याद्वारे त्याने त्यांच्या मनांस आणि अंतःकरणांस आर्जवले. प्रतिक्रिया दाखविण्यास त्यांच्याकडे प्रत्येक संधी होती, परंतु “जलप्रलय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही.”—मत्तय २४:३९.
यहोवाच्या निःपक्षपातीपणाचे किती उत्तम हे उदाहरण! या शेवटल्या कठीण काळात हे उदाहरण देवाच्या सेवकांना राज्याच्या सुवार्तेची घोषणा तितक्याच निःपक्षपातीपणे करण्यास प्रेरित करते. याशिवाय, यहोवाच्या सुडाच्या दिवसाची घोषणा करण्यात ते माघार घेत नाहीत. यहोवाचा संदेश प्रत्येकास ऐकू यावा म्हणून ते तो संदेश सर्व लोकांसमोर पक्षपात न करता सादर करतात.—यशया ६१:१, २.
कुलपिता अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना दिलेल्या यहोवाच्या अभिवचनांनी तो निःपक्षपाती देव असल्याची प्रचिती दिली. त्यांच्या विशिष्ट कौटुंबिक वंशातून नियुक्त जण येणार होता ज्याच्याद्वारे ‘पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होणार होती.’ (उत्पत्ति २२:१८; २६:४; २८:१४) ख्रिस्त येशूने तो स्वतः नियुक्त जण असल्याचे सिद्ध केले. येशूचे मरण आणि पुनरुत्थान यांद्वारे यहोवाने सर्व आज्ञाधारक मानवजातीसाठी उद्धाराच्या मार्गाची तरतूद केली. होय, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचे लाभ कोणत्याही पक्षपाताविना उपलब्ध आहेत.
मोशेच्या दिवसांत, सलाफहादाच्या मुलींच्या संबंधाने यहोवाचा निःपक्षपातीपणा अगदी वेधकपणे दिसून आला. या पाच स्त्रियांनी वाग्दत्त देशातील आपल्या पित्याचे वतन मिळण्यासंबंधाने उभ्या राहिलेल्या एका पेचप्रसंगाला तोंड दिले. याचे कारण म्हणजे इस्राएलमध्ये असा प्रघात होता, की संबंधित मनुष्याच्या पुत्राला जमिनीचे वतन मिळत असे. तथापि, सलाफहाद मेला तेव्हा वतन प्राप्त करण्यासाठी त्याला मुलगा नव्हता. यामुळे सलाफहादाच्या पाच मुलींनी आपल्यासोबत निःपक्षपातीपणे व्यवहार करावा म्हणून मोशेला विनंती केली: “मुलगे नव्हते एवढ्यावरूनच आमच्या बापाचे नाव त्याच्या कुळातून का गाळावे? आम्हालाहि आमच्या बापाच्या भाऊबंदांबरोबर वतन द्या.” यहोवाने त्यांची विनंती ऐकली आणि मोशेला मार्गदर्शन केले: “कोणी मनुष्य निपुत्रिक मेला तर त्याचे वतन त्याच्या मुलीला द्यावे.”—गणना २७:१-११.
प्रेमळ निःपक्षपातीपणाचे किती उत्तम पूर्वोदाहरण! मुलींचा विवाह झाल्यानंतर एका वंशाचे वतन दुसऱ्या वंशात जाऊ नये याची खात्री करावी म्हणून त्यांनी ‘आपल्या बापाच्या वंशाच्या कुळामध्येच’ विवाह करावा, अशी त्यांच्याकडून अपेक्षा करण्यात आली होती.—गणना ३६:५-१२.
शास्ता आणि संदेष्टा असलेल्या शमुवेलाच्या दिवसांत यहोवाचा निःपक्षपातीपणा आणखी पाहावयास मिळतो. यहोवाने त्याला इशाय बेथलेहेमकराच्या कुटुंबातील यहुदा वंशाच्या नवीन राजाचा अभिषेक करण्याची कामगिरी दिली. परंतु इशायला आठ मुले होती. राजा म्हणून कोणाचा अभिषेक करण्यात येणार होता? अलियाबाची शरीरयष्टी पाहून शमुवेल प्रभावित झाला. तथापि, बाहेरील स्वरूपाचा यहोवावर परिणाम होत नाही. त्याने शमुवेलास सांगितले: “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, . . . मानवांसारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.” इशायाचा सर्वात धाकटा मुलगा दावीद याची निवड करण्यात आली.—१ शमुवेल १६:१, ६-१३.
यहोवाच्या निःपक्षपातीपणापासून शिकणे
सहविश्वासू जणाच्या आध्यात्मिक गुणांकडे पाहण्याद्वारे ख्रिस्ती वडील यहोवाचे अनुकरण करतात तेव्हा ते चांगले करतात. आपल्या स्वतःच्या दर्जांनुसार एखाद्याचा न्याय करणे, स्वतःच्या व्यक्तिगत भावनांमुळे आपल्या न्यायास धूसर करणे सोपे आहे. एका वडिलाने असे म्हटले, “माझ्या पूर्वग्रहीत कल्पनांच्या आधारावर नव्हे तर ज्याद्वारे यहोवाला आनंद होईल अशा प्रकारे इतरांसोबत व्यवहार करण्याचा मी प्रयत्न करतो.” यहोवाच्या सर्व सेवकांना स्वतःचा दर्जा म्हणून त्याच्या वचनाचा उपयोग करणे किती लाभदायक आहे!
बायबलमधील पूर्वोदाहरणे जातीय किंवा राष्ट्रीय पूर्वग्रहाच्या जुनाट भावनांचा विरोध करण्यास आपल्याला मदत करतात. यहोवाच्या निःपक्षपातीपणाचे अनुकरण करण्याद्वारे पूर्वग्रह, दुजाभाव आणि पक्षानुग्रह यांपासून आपण ख्रिस्ती मंडळीचे संरक्षण करतो.
“देव पक्षपाती नाही,” हे प्रेषित पेत्राला समजले. (प्रेषितांची कृत्ये १०:३५) पक्षानुग्रह हा निःपक्षपातीपणाचा शत्रू असून त्यामुळे प्रीतीच्या आणि ऐक्याच्या तत्त्वांचा भंग होतो. येशूने गरीब, अशक्त व कष्टी लोकांबद्दल अनुकंपी प्रतिक्रिया व्यक्त केली तसेच त्याने त्यांचे ओझे कमी केले. (मत्तय ११:२८-३०) लोकांवर नियमांचे मोठे ओझे टाकून त्यांना भाराक्रांत करणाऱ्या धार्मिक पुढाऱ्यांच्या विरोधात तो प्रामुख्याने उभा राहिला. (लूक ११:४५, ४६) असे करणे आणि श्रीमंत तसेच महत्त्वाच्या लोकांविषयी पक्षानुग्रह दाखविणे निश्चितच येशूच्या शिकवणींच्या सुसंगतेत नव्हते.—याकोब २:१-४, ९.
आज, ख्रिस्ती वडील ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन होतात आणि यहोवाच्या सर्व समर्पित लोकांबद्दल निःपक्षपातीपणा दाखवितात. “देवाच्या कळपाचे पालन” करतेवेळी ते आर्थिक स्थिती, व्यक्तिमत्त्वातील मतभेद किंवा कौटुंबिक बंधने यांवर आधारित असणाऱ्या पक्षानुग्रहापासून स्वतःला अलिप्त ठेवतात. (१ पेत्र ५:२) निःपक्षपाती देवाचे अनुकरण करण्याद्वारे आणि पक्षानुग्रहाच्या विरोधातील त्याचा इशारा लक्षपूर्वक ऐकण्याद्वारे ख्रिस्ती वडील मंडळीमध्ये निःपक्षपातीपणाच्या आत्म्यास उद्युक्त करतात.
यहोवाच्या साक्षीदारांची ख्रिस्ती मंडळी एक आंतरराष्ट्रीय बंधुत्व आहे. येशू ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली पूर्वग्रहरहित, निःपक्षपाती समाज एक वास्तव होऊ शकतो, या गोष्टीचा हा जिवंत पुरावा आहे. या साक्षीदारांनी “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण” केला आहे. (इफिसकर ४:२४) होय, निःपक्षपाती यहोवा देवापासून ते शिकत आहेत आणि पक्षपातीपणापासून मुक्त असलेल्या नवीन जगात सार्वकालिक जीवनाची त्यांना आशा आहे.—२ पेत्र ३:१३.
[तळटीपा]
a बदली नाव.
[२६ पानांवरील चित्रं]
देव पक्षपाती नाही, हे प्रेषित पेत्राला समजले