माहितीपूर्वक संमतीच्या हक्कास
पुन्हा निग्रहाने सांगणे
इटलीतील, मेसिना न्यायालयाच्या प्राथमिक-चौकशी न्यायाधीशाने दिलेल्या अलीकडील निकालाने पुन्हा एकदा निग्रहाने सांगितले, की एखाद्या प्रौढ रुग्णाच्या उपचारासंबंधी असणाऱ्या इच्छांस डॉक्टर बांधील आहेत. हा निर्णय यहोवाच्या साक्षीदारांविरुद्ध सादर केलेल्या दाव्याच्या वेळी देण्यात आला.
जानेवारी १९९४ मध्ये, हेमोफिलियाचा रुग्ण असलेले ६४ वर्षांचे साक्षीदार, ऑन्टोनीनो स्टेलारियो लेनटिनी यांना मेसिनो येथील टोर्मिनामधील एका इस्पितळात तत्परतेने नेण्यात आले. ऑन्टोनीनोची पत्नी, कॉटेना हिने इस्पितळातील कर्मचाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले, की यहोवाचे साक्षीदार या नात्याने ती आणि तिचा पती रक्त संक्रमणाचा उपचार स्वीकारणार नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १५:२०, २८, २९) त्यांच्या इच्छांचा आदर करण्यात आला.
परंतु, दुसऱ्या एका आरोग्य-सेवा केंद्रामध्ये नेतेवेळी, ऑन्टोनीनोंचा श्वासोच्छ्वास थांबला आणि तेथे पोहंचल्यानंतर त्यांची परिस्थिती अगदी नाजूक झाली. त्यानंतर थोड्या वेळातच ते मरण पावले. कॉटेनाचे जीवन उद्ध्वस्त झाले होते, तरी देखील बायबलमधील पुनरुत्थानाच्या अभिवचनामुळे तिला सांत्वन प्राप्त झाले. (प्रेषितांची कृत्ये २४:१५) जेव्हा, न्यायाधिशांनी—कदाचित प्रसार माध्यमाद्वारे पसरलेल्या चुकीच्या बातमीमुळे गैररीतीने—पतीवर डॉक्टरांना आवश्यक वाटणारी शस्त्रक्रिया करण्यास नकार दिल्यामुळे आपल्या पतीच्या मृत्यूस ती कारणीभूत असल्याचा आरोप तिच्यावर लावण्यात आला तेव्हा मात्र तिला आश्चर्य वाटले.
एका वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर, जुलै ११, १९९५ च्या दिवशी कॉटेनाला निर्दोष सोडण्यात आले कारण तिने कोणताही गुन्हा केला नव्हता. खरे तर, रुग्णाच्या प्रकृतीचा विचार करता कोणत्याही शस्त्रक्रियाविषयक उपचाराचा उपयोग झाला नसता, हे तज्ज्ञांच्या सांगण्यावरून स्पष्ट झाले.
परंतु न्यायाधीशाच्या विवरणांनी मुख्य गोष्टीस हात घातला. त्याने हे स्पष्ट केले, की जेव्हा रुग्ण अथवा त्याचे प्रतिनिधित्व करणारे लोक संबंधित व्यक्तीवरील उपचारास नकार दर्शवितात तेव्हा वैद्यकीय कर्मचारी वर्गाला हस्तक्षेप करावा लागतो, या कल्पनेचा स्वीकार करणे इतके सोपे नाही. त्याने म्हटले, की इटलीमधील वैद्यकीय कर्तव्यशास्त्र संहितेत कायद्यात “हस्तक्षेप करण्यापूर्वी, संबंधित व्यक्तीची माहितीपूर्वक संमती मिळविण्याच्या गोष्टीस पहिल्यांदा पाहिले जाते.” त्यानंतर पुढे त्याने म्हटले, की कॉटेना यांनी “कायदेशीररीत्या आपल्या पतीवर अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला.”
हा न्याय, एका प्रौढ व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध असणारा वैद्यकीय उपचार नाकारण्याच्या त्याच्या हक्कास पुन्हा निग्रहाने सांगतो.