अत्याचार पीडितांना सांत्वन
तुमच्या सबंध जीवनावधीत, बातमीपत्रातील ठळक मथळ्यांमध्ये विशिष्ट शब्दांची वारंवार पुनरुक्ती झालेली तुम्हाला आढळली आहे का? युद्ध, अपराध, संकट, दुष्काळ व पीडा यांसारखे शब्द वाचून तुम्हाला उबग आला आहे का? तथापि, बातमी वृत्तांमध्ये एका शब्दाची उणीव मात्र प्रकर्षाने जाणवते. तरीसुद्धा, तो शब्द मानवजातीला अत्यंत आवश्यक असलेल्या एका गोष्टीचे द्योतक आहे. तो शब्द म्हणजे “सांत्वन.”
“सांत्वन देणे” याचा अर्थ, एखाद्याला “आधार व उमेद देणे” आणि त्याचे “दुःख किंवा त्याचा त्रास कमी करणे,” असा होतो. २० व्या शतकात या जगात झालेल्या उलथापालथीमुळे, उमेदीची व दुःख कमी होण्याची नितान्त गरज आहे. आपल्या पूर्वजांनी ज्यांची कधी कल्पनाही केली नसेल, इतक्या अधिक सुखसोयी आज आपल्यातील अनेकांना लाभल्या आहेत हे कबूल आहे. हे मुख्यतः वैज्ञानिक प्रगतीमुळे शक्य झाले. तथापि, विज्ञान व तंत्रज्ञान यांद्वारे आपल्याला सुख लाभलेले नाही, अर्थात, त्यांकरवी मानवाच्या जीवनातून दुःखाच्या सर्व कारणांचे निर्मूलन झालेले नाही. ही कारणे कोणती?
अनेक शतकांपूर्वी शलमोन हा सुज्ञ पुरुष दुःखाच्या एका पायाभूत कारणाबद्दल सांगताना म्हणाला: “एक मनुष्य दुसऱ्यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.” (उपदेशक ८:९) विज्ञान व तंत्रज्ञान हे, सहमानवावर वर्चस्व करण्याच्या मानवी प्रवृत्तीत बदल घडवून आणू शकलेले नाहीत. हे २० व्या शतकात विविध देशांमध्ये अत्याचारी हुकुमशाही राज्यपद्धतींस आणि देशांच्या आपसांतील भयंकर युद्धांस कारणीभूत ठरले आहे.
१९१४ सालापासून, दहा कोटीपेक्षा अधिक लोक युद्धांमुळे मृत्युमुखी पडले आहेत. या संख्येमागे दडलेल्या मानवी यातना, अर्थात सांत्वनासाठी आसूसलेल्या कोट्यवधी शोकाकूल कुटुंबांची जरा कल्पना करा. तसेच, वेदनामय मृत्यूव्यतिरिक्त युद्धांमुळे इतरही प्रकारची दुःखे निपजतात. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटास युरोपमध्ये १.२ कोटी पेक्षा अधिक निर्वासित लोक होते. त्याच्या तुलनेत अलीकडील वर्षांत, १५ लाखाहून अधिक लोकांनी आग्नेय आशियातील युद्धग्रस्त प्रदेशांतून पळ काढला. बाल्कन प्रदेशांतील युद्धांनी २० लाखापेक्षा अधिकांना नाईलाजास्तव त्यांचे घर सोडावयास भाग पाडले आहे—अनेकांना ‘वांशिक शुद्धीकरणापासून’ आपला जीव वाचवण्यासाठी असे करावे लागले.
निर्वासितांना नक्कीच सांत्वनाची गरज आहे, विशेषतः अशांना, ज्यांना कोठे जावे व भविष्यात आपल्यासाठी आणि आपल्या बायकामुलांसाठी काय वाढून ठेवले आहे याची पुसटशी कल्पनाही नसताना, केवळ सोबत वागवता येतील इतक्याच वस्तू घेऊन घर सोडावे लागते. अत्याचाराला बळी पडलेल्यांपैकी असे लोक सर्वाधिक दयनीय स्थितीत आहेत; त्यांना सांत्वनाची अतिशय गरज आहे.
विश्वातील अधिक शांतिमय प्रदेशांत, खरे पाहता, कोट्यवधी लोक जागतिक अर्थ प्रणालीच्या गुलामगिरीत दिवस कंठत आहेत. काहींजवळ भरपूर भौतिक संपत्ती आहे हे कबूल. तथापि, अधिकांश लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी दररोजच्या संघर्षाला सामोरे जावे लागते. अनेक जण राहाण्याकरता पुरेशा जागेच्या शोधात आहेत. बेकारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. एक आफ्रिकन वृत्तपत्र भाकीत करते की, “जग एका अभूतपूर्व रोजगार पेचप्रसंगाकडे वाटचाल करत आहे; २०२० सालापर्यंत आजच्या तुलनेत १.३ अब्जापेक्षा अधिक लोक नोकऱ्यांच्या शोधात भटकत असतील.” आर्थिक अत्याचाराने पीडित असलेल्यांना निश्चितच, ‘आधार व उमेदीची’ अर्थात सांत्वनाची गरज आहे.
आशाहीन परिस्थितीमुळे काही जण गुन्हेगारीचे जीवन पत्करतात. अशा गुन्हेगारांना बळी पडणाऱ्यांसमोर, अर्थातच यामुळे संकट उत्पन्न होते व गुन्हेगारीच्या तीव्र प्रमाणांमुळे अत्याचाराने पीडित असण्याच्या भावनेला खतपाणी मिळते. दक्षिण आफ्रिकेत, जोहान्सबर्ग येथून प्रसिद्ध होणारे एक वृत्तपत्र, द स्टार यात अलीकडे एक ठळक मथळा असा होता: “‘जगातील सर्वाधिक खुनशी देशातील’ दिनक्रम.” या लेखाने जोहान्सबर्ग व आसपासच्या परिसरातील एका सर्वसाधारण दिवसाचे वर्णन केले. अशा एका दिवशी, चौघांचा खून झाला व आठ जणांच्या मोटार वाहनांचे अपहरण करण्यात आले. एका मध्यमवर्गीय उपनगरात सतरा चोऱ्यांचे वृत्त देण्यात आले. शिवाय, अनेक सशस्त्र दरोडे देखील पडले. सदर वृत्तपत्रानुसार, पोलिसांनी या दिवसाचे एक “तुलनात्मकपणे शांत” दिवस म्हणून वर्णन केले. साहजिकच, खून झालेल्यांच्या नातेवाईकांना तसेच घरफोडी व मोटार अपहरण यांना बळी पडणाऱ्यांना अशा अत्याचारामुळे अतिशय पीडित वाटते. त्यांना दिलासा व उमेदीची अर्थातच, सांत्वनाची गरज आहे.
काही प्रदेशांत, असेही पालक आहेत जे आपल्या मुलांना वेश्याव्यवसायासाठी विकतात. ‘सेक्स दौऱ्यांवर’ येणारे पर्यटक जेथे सहसा गर्दी करतात अशा एका आशियाई देशात २० लाख वेश्या असल्याचे वृत्त आहे; यांतील अनेकांना त्यांच्या लहानपणी विकत घेण्यात आले होते अथवा पळवून आणलेले होते. या दयनीय बळींपेक्षा अत्याचाराने आणखी पीडित कोण असतील? टाइम नियतकालिकाने या अतिनिंद्य व्यवसायाबद्दल चर्चा करताना, १९९१ साली झालेल्या आग्नेय आशियातील स्त्री संघटनांच्या एका परिषदेवर वृत्त प्रकाशित केले. या परिषदेत असे अनुमान काढण्यात आले की “१९७० च्या दशकातील मधल्या वर्षांपासून सबंध जगात तीन कोटी स्त्रियांना विकण्यात आले होते.”
अर्थात, केवळ वेश्याव्यवसायासाठी विकण्याद्वारेच मुलांचा बळी घेतला जातो असे नाही. वाढत्या संख्येने लहान मुलांचा त्यांच्या स्वतःच्याच घरांत पालकांकडून व नातेवाईकांकडून शारीरिक दुर्व्यवहार किंवा त्यांच्यावर बलात्कार सुद्धा होतो. अशा मुलांच्या मनावर या आघातांचे भावनिक व्रण प्रदीर्घ काळापर्यंत राहतात. निश्चितच, अत्याचाराचे शोचनीय बळी असल्याकारणाने त्यांना सांत्वनाची गरज आहे.
अत्याचाराचा जुना अभ्यासक
मानवी अत्याचाराचे परिमाण पाहून शलमोन राजा अचंबित झाला होता. त्याने लिहिले: “मग ह्या भूतलावर चालू असलेल्या सर्व जुलुमांचे [अत्याचारांचे] मी फिरून निरीक्षण केले; तो पाहा, गांजलेल्याचे [अत्याचार पीडितांचे] अश्रु गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही, त्यांजवर जुलूम करणाऱ्यांच्या ठायी बळ आहे, पण गांजलेल्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही.”—उपदेशक ४:१.
अत्याचार पीडितांना सांत्वन करणाऱ्याची गरज आहे हे जर सुज्ञ राजाने ३,००० वर्षांपूर्वीच ओळखले होते, तर मग आज त्याने काय म्हटले असते? तथापि, शलमोनास जाणीव होती की कोणताही अपरिपूर्ण मानव, अर्थात तो स्वतः देखील, मानवजातीला हवे असणारे सांत्वन पुरवू शकत नव्हता. अत्याचार करणाऱ्यांचे बळ मोडून काढण्यासाठी आणखीन श्रेष्ठ असे कोणीतरी असणे आवश्यक होते. अशी व्यक्ती अस्तित्वात आहे का?
बायबलमधील स्तोत्र ७२ हे सर्व लोकांकरता एका थोर सांत्वनदात्याबद्दल सांगते. हे स्तोत्र शलमोनाचा पिता, राजा दावीद याने लिहिले होते. त्यावरील उपरिलेखनात म्हटले आहे: “शलमोनाचे स्तोत्र.” स्पष्टतः, ते वयोवृद्ध राजा दावीद याने त्याच्या सिंहासनाच्या उत्तराधिकाऱ्यासंबंधाने लिहिले होते. या स्तोत्रानुसार हा उत्तराधिकारी अत्याचारापासून कायमची मुक्ती देणार होता. ‘त्याच्या कारकीर्दीत नीतिमान उत्कर्ष पावतील; आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असेल. समुद्रापासून समुद्रापर्यंत . . . पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहील.’—स्तोत्र ७२:७, ८.
दावीदाने हे शब्द लिहिले तेव्हा कदाचित तो आपला पुत्र शलमोन याबद्दल विचार करत होता. तथापि, शलमोनाने ओळखले की त्या स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे मानवजातीची सेवा करणे हे त्याच्या सामर्थ्यापलीकडले होते. तो या स्तोत्रातील शब्द केवळ थोड्या प्रमाणावर व सबंध पृथ्वीच्या लाभासाठी नव्हे तर फक्त इस्राएल राष्ट्रासाठी पूर्ण करू शकला असता. तर मग स्पष्टपणे, हे प्रेरित भविष्यसूचक स्तोत्र शलमोनापेक्षा कितीतरी थोर अशा एका व्यक्तीकडे लक्ष वेधत होते. ती व्यक्ती कोण होती? ती केवळ येशू ख्रिस्तच असू शकते.
एका देवदूताने येशूच्या जन्माबद्दल घोषणा केली तेव्हा तो म्हणाला: “प्रभु देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल.” (लूक १:३२) शिवाय, येशूने “शलमोनापेक्षा थोर” असे म्हणून स्वतःचा उल्लेख केला. (लूक ११:३१) येशूचे पुनरुत्थान होऊन तो देवाच्या उजवीकडे बसला, तेव्हापासून तो स्वर्गात म्हणजेच जेथून स्तोत्र ७२ चे शब्द तो पूर्ण करू शकेल अशा स्थानी आहे. त्याचप्रमाणे, त्याला अत्याचार करणाऱ्या मानवांपासून सुटका देण्याचे सामर्थ्य व अधिकार देवाकडून लाभला आहे. (स्तोत्र २:७-९; दानीएल २:४४) यास्तव, स्तोत्र ७२ चे शब्द पूर्ण करणारा, येशू आहे.
अत्याचार लवकरच नाहीसा होणार
याचा काय अर्थ होतो? याचा असा अर्थ होतो की सर्व प्रकारच्या मानवी अत्याचारापासूनचे स्वातंत्र्य, लवकरच एक वास्तविकता बनेल. या २० व्या शतकात अनुभवण्यात आलेले अभूतपूर्व दुःख व अत्याचार हे ‘ह्या युगाच्या समाप्तीच्या चिन्हातील’ भाग असल्याचे येशूने पूर्वभाकित केले होते. (मत्तय २४:३) इतर गोष्टींसोबतच त्याने असेही भाकीत केले होते की, “राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल.” (मत्तय २४:७) १९१४ साली पहिले जागतिक महायुद्ध पेटले त्या सुमारास सदर भविष्यवाणीच्या या पैलूची पूर्णता होण्यास आरंभ झाला. येशूने पुढे म्हटले, “अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल.” (मत्तय २४:१२) नीती व प्रीती या दोहोंच्या अभावामुळे एक दुष्ट व अत्याचारी पीढी निपजली आहे. यास्तव, पृथ्वीचा नवीन राजा या नात्याने येशू ख्रिस्ताने हस्तक्षेप करण्याची घटका निश्चितच जवळ आली असावी. (मत्तय २४:३२-३४) येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून, देवाने नियुक्त केलेला मानवजातीचा सांत्वनदाता म्हणून त्याच्याकडे दृष्टी लावणाऱ्या अत्याचार पीडितांसाठी यातून काय निष्पन्न होईल?
या प्रश्नाच्या उत्तरासाठी, आपण ख्रिस्त येशूमध्ये पूर्णता होणारी, स्तोत्र ७२ मधील आणखी काही वचने वाचून पाहू: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्यांपासून त्यांचे जीव तो मुक्त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्त अमोल ठरेल.” (स्तोत्र ७२:१२-१४) अशा प्रकारे, देवाचा नियुक्त राजा अर्थात येशू ख्रिस्त हा, कोणावरही अत्याचार होणार नाही याची निश्चित खात्री केल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकडे सर्व प्रकारच्या अन्यायास नष्ट करण्याचे सामर्थ्य आहे.
काही जण म्हणतील, ‘हे तर अत्यंत सुखावह आहे, पण सद्य परिस्थितीबद्दल काय? सध्या पीडिले जात आहेत अशांसाठी कोणते सांत्वन आहे?’ वस्तुतः, अत्याचार पीडितांसाठी सांत्वन निश्चितच आहे. खरा देव यहोवा व त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त यांसोबत एक घनिष्ट नातेसंबंध विकसित करण्याद्वारे लक्षावधी लोक आजही कशाप्रकारे सांत्वन मिळवत आहेत हे या नियतकालिकातील पुढील दोन लेख दाखवतील. या अत्याचारी काळातही अशाप्रकारचा नातेसंबंध आपल्याला सांत्वन देऊ शकतो व एखाद्या व्यक्तीला अत्याचारापासून स्वतंत्र करून सार्वकालिक जीवनाकडे नेऊ शकतो. येशूने देवास प्रार्थना करताना म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”—योहान १७:३.
[४, ५ पानांवरील चित्रं]
देवाच्या नव्या जगात कोणीही मानव आपल्या सहमानवावर अत्याचार करणार नाही