वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w99 ९/१५ पृ. ४-७
  • खरोखर काळजी घेणारा आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • खरोखर काळजी घेणारा आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • दारिद्र्‌य आणि जुलूम—का?
  • मानवांच्या शक्‍तीपलीकडे असलेली समस्या
  • “पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो”
  • जगाचा कायापालट करण्याचे सामर्थ्य खरोखरच कोणाजवळ आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • येशूचे अनुकरण करा आणि गरिबांबद्दल काळजी दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • अत्याचार पीडितांना सांत्वन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • बायबल प्रश्‍नांची उत्तरं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१६
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
w99 ९/१५ पृ. ४-७

खरोखर काळजी घेणारा आहे

हजारो लोक दाखवतात, की त्यांना काळजी आहे. इतरांच्या समस्यांचे आपल्याला काय करायचे, असा त्यांचा कठोर, स्वार्थी दृष्टिकोन नाही. उलट, इतरांचे दुःख कमी करण्यासाठी ते आपल्याकडून होईल तितके—कधीकधी तर स्वतःचे जीवन धोक्यात घालून—प्रयत्न करतात. हे काम इतके साधेसोपे नाही; शिवाय मानवी नियंत्रणाबाहेर असलेल्या शक्‍ती सामील असल्यामुळे ते अधिकच बिकट आहे.

लोभ, राजकीय कारस्थाने, युद्धे आणि नैसर्गिक आपत्ती, यांसारख्या समस्या “अन्‍न टंचाईची समस्या सोडवण्यासाठी केल्या जाणाऱ्‍या सर्वात समंजस आणि निश्‍चयी प्रयत्नांनाही हाणून पाडू शकतात,” असे एका समाजसेवकाने म्हटले. अन्‍न टंचाईची समस्या अनेक समस्यांतील केवळ एक समस्या आहे जी काळजी घेणाऱ्‍या लोकांना लागली आहे. रोगराई, दारिद्र्‌य, अन्याय आणि युद्धांमुळे निर्माण होणाऱ्‍या असंख्य समस्या यांसारख्या गोष्टींविरुद्धही ते लढत असतात. पण त्यांना यश मिळत आहे का?

भूक आणि दुःख कमी करण्याचा “समंजस आणि निश्‍चयी प्रयत्न” करणारे लोक येशू ख्रिस्ताने दिलेल्या दाखल्यातील दयाळू शोमरोनी मनुष्यासारखे आहेत, असे साहाय्य एजन्सीच्या एका प्रमुख अधिकाऱ्‍याने म्हटले. (लूक १०:२९-३७) पण त्यांनी काहीही केले तरी बळी पडणाऱ्‍यांची संख्या वाढतच राहते, असे ते म्हणतात. त्यासाठी त्यांनी विचारले: “समजा तो दयाळु शोमरोनी अनेक वर्षांपर्यंत दररोज त्याच रस्त्यावरून येजा करतो आणि दर आठवडी त्याला रस्त्याच्या बाजूला चोरांनी लुटलेला एक जखमी व्यक्‍ती आढळतो तेव्हा त्याने काय करावे?”

एखादा मनुष्य कदाचित मदत करून करून पार थकून जाईल आणि शेवटी निराश होऊन सर्व काही सोडून देईल. परंतु, ज्यांना खरोखरच काळजी आहे ते हार मानत नाहीत. (गलतीकर ६:९, १०) उदाहरणार्थ, ब्रिटनच्या ज्युईश टेलिग्राफ दैनिकाला लिहिताना एका मनुष्याने, नात्सी जर्मनीच्या वेळी “ऑश्‍वीट्‌सच्या पिडांतून हजारो यहुद्यांना वाचण्यास मदत” करणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांची प्रशंसा केली. “अन्‍न कमी होते तेव्हा त्यांनी आपल्या [यहुदी] बंधूभगिनींबरोबर जे हातात होते ते वाटून खाल्ले!” असे लेखक म्हणतो. यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्यापरीने होईल तितके केले.

परंतु, सत्य परिस्थिती अशी आहे, की केवळ अन्‍न वाटून खाल्ल्याने मानवी दुःखाचा अंत होणार नाही. अर्थात, दयाळु लोकांनी केलेले प्रयत्न व्यर्थ आहेत असा याचा अर्थ नाही. दुःख कमी करणारे कोणतेही कार्य व्यर्थ म्हणता येणार नाही. साक्षीदारांच्या प्रयत्नांमुळे ते आपल्यासोबत कैदेत असलेल्यांचे दुःख थोड्या प्रमाणात का होईना, कमी करू शकले आणि राहिला नात्सी हुकूमशाहीचा प्रश्‍न, तर ती कालांतराने नामशेष झाली. परंतु, अशा प्रकारच्या जुलूमांना मुळात कारणीभूत असणारी जगिक व्यवस्था अजूनही अस्तित्वात आहे आणि आजही अधिकांश लोक बेपर्वा प्रवृत्तीचे आहेत. होय, “पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल यांस खाऊन नाहीतसे करावे, असे तरवारीसारखे ज्यांचे दांत व सुऱ्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.” (नीतिसूत्रे ३०:१४) ही परिस्थिती अशी का आहे असा कदाचित तुम्ही विचार करत असाल.

दारिद्र्‌य आणि जुलूम—का?

येशू ख्रिस्त एकदा म्हणाला होता: “गोरगरीब नेहमीच तुमच्याबरोबर असतात व पाहिजे तेव्हा तुम्हाला त्यांचे बरे करिता येते.” (मार्क १४:७) दारिद्र्‌य आणि जुलूम कधीच नाहीसे होणार नाहीत असे येशूला म्हणायचे होते का? काही लोकांचा विश्‍वास आहे त्याप्रमाणे तोही असे मानत होता का, की हे दुःख देवाच्या योजनेचा एक भाग आहे जेणेकरून त्याला दयाळु लोकांना, लोकांची किती काळजी आहे हे दाखवण्याची संधी देता येईल? नाहीच! येशू असे मानत नव्हता. उलट, हे व्यवस्थीकरण अस्तित्वात आहे तोपर्यंत दारिद्र्‌य जीवनाचा एक भागच राहील, असे तो सांगू इच्छित होता. पण येशूला एक गोष्ट चांगली माहीत होती, ती अशी की पृथ्वीवर अशी परिस्थिती असावी, हा आपल्या स्वर्गीय पित्याचा मूळ उद्देश नव्हता.

यहोवा देवाने ही पृथ्वी दारिद्र्‌य, अन्याय आणि जुलूमाने पोखरून निघावी म्हणून नव्हे तर तिला परादीस बनवण्यासाठी निर्माण केली होती. जीवनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी असंख्य अद्‌भुत तरतुदी करण्याद्वारे आपल्याला मानवजातीची किती काळजी आहे हे त्याने दाखवून दिले. आपल्या पहिल्या पालकांना, अर्थात आदाम आणि हव्वेला ज्या बागेत ठेवले होते त्या बागेच्या नावाचाच विचार करा! तिला एदेन म्हटले जायचे; एदेनाचा अर्थ, “आनंद.” (उत्पत्ति २:८, ९) यहोवाने मानवांना, जिवंत राहायला जितके आवश्‍यक आहे तितकेच पुरवून, कंटाळवाण्या, दुःसह वातावरणात ठेवले नाही. उलट, सृष्टीची निर्मिती पूर्ण करून झाल्यावर यहोवाने सर्व पाहून ते “फार चांगले” आहे असे म्हटले.—उत्पत्ति १:३१.

मग, दारिद्र्‌य, जुलूम आणि इतर दुःख आज संपूर्ण पृथ्वीवर का बोकाळले आहे? आपल्या पहिल्या पालकांनी देवाची आज्ञा मोडण्याचे ठरवल्यामुळे सध्याचे हे दुष्ट व्यवस्थीकरण अस्तित्वात आहे. (उत्पत्ति ३:१-५) यामुळे, देवाने त्याच्या प्राण्यांकडून आज्ञाधारकतेची मागणी करणे उचित आहे का, हा प्रश्‍न तेव्हा उपस्थित झाला. त्यासाठी यहोवाने आदामाच्या वंशाला एका मर्यादित काळासाठी स्वातंत्र्य दिले आहे. तरीपण मानवजातीची त्याला अद्यापही काळजी होती. त्याच्याविरुद्ध केलेल्या बंडाळीचे सर्व दुष्परिणाम नाहीसे करण्यासाठी त्याने तरतूद केली. आणि फार लवकरच तो दारिद्र्‌य आणि जुलूम—नव्हे, सर्व प्रकारचे दुःख नाहीसे करेल.—इफिसकर १:८-१०.

मानवांच्या शक्‍तीपलीकडे असलेली समस्या

मानवाची सृष्टी झाल्यापासून जी अनेक शतके उलटली आहेत, त्यांत मानवजात यहोवाच्या दर्जांपासून खूप दूर भरकटत गेली आहे. (अनुवाद ३२:४, ५) देवाच्या नियमांच्या व तत्त्वांच्या सतत विरोधात जाऊन मानव एकमेकांबरोबर लढले व एका ‘मनुष्याने दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान’ केले आहे. (उपदेशक ८:९) मानवजातीला पीडित करणाऱ्‍या सर्व दुःखापासून मुक्‍त असा खरोखरच एक न्यायपूर्ण समाज आणण्यासाठी करण्यात आलेले सर्व प्रयत्न, देवाच्या सार्वभौमत्वाच्या अधीन राहण्यापेक्षा मनमान्य जीवन जगू इच्छिणाऱ्‍या स्वार्थी लोकांनी हाणून पाडले आहेत.

आणखी एक समस्या आहे—पुष्कळ लोक कदाचित या समस्येकडे अंधविश्‍वास म्हणून दुर्लक्ष करतील. देवाविरुद्ध बंड पुकारण्यास चिथावणारा, आजही लोकांना वाईट व स्वार्थी कृत्ये करण्यास प्रवृत्त करतो. तो आहे दियाबल सैतान; येशू ख्रिस्ताने त्याला “जगाचा अधिकारी” म्हटले आहे. (योहान १२:३१; १४:३०; २ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९) प्रेषित योहानाला झालेल्या प्रकटीकरणात, पिडांचा मुख्य उगम—‘सर्व जगाला ठकविण्यास’ जबाबदार असलेला, अशी सैतानाची ओळख करून दिली आहे.—प्रकटीकरण १२:९-१२.

काही लोक सहमानवांची कितीही पर्वा करत असले तरी, ते दियाबल सैतानाचा नाश करू शकणार नाहीत किंवा बळी पडणाऱ्‍यांची संख्या ज्या परिस्थितीमुळे वाढत चालली आहे ती परिस्थिती ते काढून टाकू शकणार नाहीत. मग, मानवजातीच्या समस्या सोडवण्यासाठी कशाची आवश्‍यकता आहे? काळजी करणारा कोणी असला म्हणजे प्रश्‍न मिटला असे नाही. सैतान आणि त्याच्या सर्व अन्यायी व्यवस्थीकरणाचा समूळ नाश करण्यासाठी ज्याच्याकडे इच्छा व शक्‍ती आहे अशा व्यक्‍तीची गरज आहे.

“पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो”

देव, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा नाश करण्याचे वचन देतो. असे करण्यासाठी त्याच्याकडे इच्छा आणि शक्‍ती दोन्ही आहेत. (स्तोत्र १४७:५, ६; यशया ४०:२५-३१) बायबलमधील दानीएल नावाच्या भविष्यसूचक पुस्तकात असे भाकीत केले आहे: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल,”—होय ते अनंतकाळ टिकेल. (दानीएल २:४४) येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना प्रार्थनेमध्ये, “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गांत तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छे प्रमाणे होवो,” ही विनंती करायला जेव्हा येशूने आपल्या शिष्यांना शिकवले तेव्हा त्याच्या मनात याच चिरकाल व जनहितेच्छु स्वर्गीय सरकाराचा विचार होता.—मत्तय ६:९, १०.

यहोवा अशा प्रार्थनांना नक्की उत्तर देईल कारण त्याला मानवी कुटुंबाची खरोखर काळजी आहे. स्तोत्र ७२ मधील भविष्यसूचक शब्दांनुसार, देव त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याला, ख्रिस्ताच्या राजेशाहीला पाठबळ देणाऱ्‍या गरीब, पीडित आणि जुलूमाखाली दबलेल्या लोकांचे दुःखपरिहार करण्याचा अधिकार देईल. म्हणूनच ईश्‍वरप्रेरणा मिळालेल्या स्तोत्रकर्त्याने गायिले: “तो [देवाचा मशिही राजा] प्रजेतल्या दीनांचा न्याय करो. तो दरिद्र्‌यांच्या मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणाऱ्‍यांस चिरडून टाको. . . . धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्‍यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्‍यांच्यावर तो दया करील, दरिद्रयांचे जीव तो तारील. जुलूम व जबरदस्ती ह्‍यांपासून त्यांचे जीव तो मुक्‍त करील; आणि त्याच्या दृष्टीने त्यांचे रक्‍त अमोल ठरेल.”—स्तोत्र ७२:४, १२-१४.

आपल्या दिवसांविषयी एका दृष्टान्तात प्रेषित योहानाने “नवे आकाश व नवी पृथ्वी,” अर्थात देवाने स्थापन केलेले एक पूर्णपणे नवीन व्यवस्थीकरण पाहिले. पीडित मानवजातीसाठी काय हा आशीर्वाद! यहोवा काय करणार आहे ते भाकीत करताना योहानाने लिहिले: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पाहा! देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो. तो म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:१-५.

होय, आपण या शब्दांवर विश्‍वास करू शकतो कारण ते विश्‍वसनीय व सत्य आहेत. यहोवा लवकरच, पृथ्वीवरून दारिद्र्‌य, भूक, जुलूम, आजारपण आणि सर्वप्रकारचा अन्याय काढून टाकण्यासाठी कार्य करणार आहे. ही सर्व अभिवचने आपल्याच काळात पूर्ण होतील याचा भरपूर पुरावा या मासिकाने नेहमी शास्त्रवचनांतून दाखवला आहे. देवाचे वचनयुक्‍त नवीन जग जवळ आहे! (२ पेत्र ३:१३) यहोवा लवकरच “मृत्यू कायमचा नाहीसा” करील आणि ‘सर्वांच्या चेहऱ्‍यावरील अश्रु पुसेल.’—यशया २५:८.

परंतु हे सर्व होईपर्यंत, आपण या गोष्टीचा आनंद मानू शकतो, की आताही खरी काळजी घेणारे लोक आहेत. स्वतः यहोवा देव आपली काळजी घेतो, हे आनंद करण्याचे सर्वात मोठे कारण आहे. तो लवकरच सर्व प्रकारचा जुलूम आणि दुःख काढून टाकणार आहे.

तुम्ही यहोवाच्या वचनांवर पूर्ण भरवसा ठेवू शकता. त्याचा सेवक यहोशवा याचा पूर्ण भरवसा होता. पूर्ण आत्मविश्‍वासाने त्याने देवाच्या प्राचीन लोकांना म्हटले: “तुम्ही सर्व जण मनात विचार करा आणि लक्षात घ्या की, आपला देव परमेश्‍वर ह्‍याने तुमच्याबाबतीत हिताच्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; तुमच्याबाबतीत त्या सर्व सिद्धीस गेल्या; त्यातली एकहि व्यर्थ गेली नाही.” (यहोशवा २३:१४) यास्तव, सद्याचे व्यवस्थीकरण आहे तोपर्यंत, तुम्हाला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या परीक्षांच्या ओझ्याखाली तुम्ही दबून जाऊ नका. तुमच्या सर्व चिंता यहोवावर टाका कारण तो आपली खरोखर काळजी घेतो.—१ पेत्र ५:७.

[७ पानांवरील चित्रं]

देवाच्या वचनयुक्‍त नवीन जगात पृथ्वीवर दारिद्र्‌य, जुलूम, आजारपण आणि अन्याय नसेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा