विभाजित जगात ख्रिस्ती आतिथ्य
‘म्हणून आपण अशांचे आतिथ्य करावे, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.’—३ योहान ८.
१. निर्माणकर्त्याने मानवजातीला दिलेल्या सर्वात इष्ट देणग्या कोणत्या आहेत?
“ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यांत श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.” (उपदेशक ८:१५) या शब्दांतून प्राचीन इब्री उपदेशक आपल्याला सांगतो, की यहोवा त्याच्या मानवी निर्मितीने आनंदी व हर्षित असावे अशी केवळ इच्छाच बाळगत नाही तर त्यांना तसे राहण्याची सोय देखील तो उपलब्ध करून देतो. सबंध मानवी इतिहासात, लोकांमध्ये सर्वत्र एक समान इच्छा दिसून येते व ती म्हणजे आनंद लुटण्याची व मौजमजा करण्याची इच्छा.
२. (अ) यहोवाच्या उद्देशाचा मानवजातीने कशाप्रकारे विपर्यास केला आहे? (ब) याचा काय परिणाम झाला आहे?
२ आज आपण एका सुखवादी समाजात राहतो ज्यात लोक सुखाच्या व मौजमजेच्या शोधात गुंतलेले आहेत. बायबलने भाकीत केल्याप्रमाणे बरीचशी माणसे “स्वार्थी, . . . देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” झाली आहेत. (२ तीमथ्य ३:१-४) अर्थात, हा देवाने ठरवलेल्या उद्देशाचा घोर विपर्यास आहे. जेव्हा मौजमजेचा शोधच स्वतः एक उद्दिष्ट बनतो, किंवा आत्मतृप्ती ही एकमात्र उद्देश होऊन बसते तेव्हा यथार्थ समाधान लाभत नाही व “सर्व काही व्यर्थ व वायफळ उद्योग” बनतात. (उपदेशक १:१४; २:११) यामुळेच हे जग एकलकोंड्या व हताश लोकांनी भरलेले आहे व याच्या परिणामस्वरूपात समजातील बऱ्याचशा समस्या घडून येतात. (नीतिसूत्रे १८:१) लोक एकमेकांविषयी शंकेखोर बनतात व जातीय, वांशिक, सामाजिक तथा आर्थिकदृष्ट्या विभाजित होतात.
३. आपण खरा संतोष व समाधान कसे मिळवू शकतो?
३ लोकांनी दयाळू, उदार आणि आतिथ्यपूर्ण होऊन—इतरांशी वागण्यात यहोवाचे अनुकरण केल्यास परिस्थिती किती वेगळी असेल! त्याने स्पष्ट केले की खऱ्या आनंदाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे ही नव्हे. उलटपक्षी, ती गुरुकिल्ली म्हणजे: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता [आनंद] आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) खरा संतोष व समाधान मिळवण्यासाठी आपण आपल्यावर बंधन घालणाऱ्या अडसरांवर व भेदभावांवर मात करण्यास हवी. शिवाय, आपल्यासोबत यहोवाची सेवा करत असलेल्यांना आपण जवळ करण्यास हवे. ‘म्हणून आपण अशांचे आतिथ्य करावे, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ,’ हा सल्ला मनावर घेणे अत्यावश्यक आहे. (३ योहान ८) सुयोग्य व्यक्तींचे, आपल्या परीने होईल तितके आतिथ्य केल्यामुळे दोन मार्गांनी लाभ होतो—त्यामुळे देणाऱ्यांचा तसेच प्राप्त करणाऱ्यांचा देखील फायदा होतो. तर मग, आपण ज्यांचे ‘आतिथ्य करावे’ अशा सुयोग्य व्यक्ती कोण आहेत?
‘अनाथांचा व विधवांचा समाचार घ्या’
४. कौटुंबिक नातेसंबंधातील कोणता बदल, यहोवाच्या काही लोकांतही दिसून येतो?
४ बळकट कुटुंबे आणि आनंदी विवाह आज क्वचितच आढळतात. जगभरात घटस्फोटाचे वाढते प्रमाण आणि अविवाहित मातांची वाढती संख्या यामुळे पारंपारिक कुटुंबात लक्षणीय बदल घडून आले आहेत. याच कारणास्तव, अलीकडील वर्षांत यहोवाचे साक्षीदार बनलेल्यांत अनेक जण भग्न कुटुंबांतून आले आहेत. ते आपल्या विवाह जोडीदारापासून एकतर घटस्फोटित किंवा विलग झालेले आहेत, किंवा ते एक पालकीय कुटुंबांत राहतात. या व्यतिरिक्त, येशूने भाकीत केल्याप्रमाणे, त्याने शिकवलेल्या सत्यामुळे देखील अनेक कुटुंबांत विभाजन झाले आहे.—मत्तय १०:३४-३७; लूक १२:५१-५३.
५. येशूचे कोणते उद्गार विभाजित कुटुंबात राहणाऱ्यांना प्रोत्साहक ठरू शकतील?
५ नवीन लोकांना सत्यासाठी खंबीर भूमिका घेताना पाहून आपल्याला हर्ष होतो आणि आपण अनेकदा त्यांना येशूच्या या प्रोत्साहक अभिवचनाने सांत्वन देतो: “मी तुम्हाला खचित सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.”—मार्क १०:२९, ३०.
६. आपण आपल्यामध्ये असणाऱ्या ‘अनाथ व विधवा’ यांचे ‘भाऊ, बहिणी, आया व मुले’ कशाप्रकारे होऊ शकतो?
६ तथापि, हे ‘भाऊ, बहिणी, आया व मुले’ कोण आहेत? राज्य सभागृहात एकमेकांना बंधू व भगिनी म्हणणाऱ्या खूपशा लोकांना, सहसा शंभर किंवा त्याहून अधिक लोकांना फक्त पाहून, आपोआप एखाद्याला हे त्याचे भाऊ, बहिणी, आया व मुले आहेत असे वाटत नाही. हा मुद्दा विचारात घ्या: शिष्य याकोब आपल्याला आठवण करून देतो की आपली उपासना यहोवाच्या नजरेत स्वीकारयोग्य व्हावी याकरता आपण ‘अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटात समाचार घ्यावा व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवावे’ हे अगत्याचे आहे. (याकोब १:२७) त्याअर्थी, आपण आर्थिक वर्चस्वाच्या व वर्गीय श्रेष्ठत्वाच्या जगिक मनोवृत्तींना, ‘अनाथ व विधवा’ यांच्याबद्दल करुणा दाखवण्याच्या आड येऊ देता कामा नये. त्याउलट आपण त्यांना आपला सहवास व आतिथ्य देऊ करण्यासाठी पुढाकार घेण्यास हवा.
७. (अ) ‘अनाथ व विधवा’ यांचे आतिथ्य करण्याचा खरा उद्देश कोणता आहे? (ब) ख्रिस्ती आतिथ्य दाखवण्यात आणखी कोण सहभागी होऊ शकतील?
७ ‘अनाथ व विधवा’ यांचे आतिथ्य करण्यात नेहमीच त्यांच्या भौतिक उणीवा भरून काढणे अंतर्भूत नसते. एक-पालकीय कुटुंबे किंवा धार्मिकदृष्ट्या विभाजित घराणी हलाखीच्या स्थितीत असतील हे काही अनिवार्य नाही. तथापि, श्रेयस्कर संगती, कौटुंबिक वातावरण, विविध वयोगटांतील व्यक्तींशी सहवास व आध्यात्मिक आशीर्वादांची घेवाणदेवाण—हे सारे जीवनातील हवेहवेसे पैलू आहेत. यास्तव, प्रसंगाचा डामडौल नव्हे तर प्रीती व ऐक्याचा आत्मा हा महत्त्वाचा असतो हे लक्षात घेता, काही वेळा ‘अनाथ व विधवा’ हे देखील सहख्रिस्ती जनांचे आतिथ्य करू शकतात हे किती वांच्छनीय आहे!—पडताळा १ राजे १७:८-१६.
आपल्यामध्ये परदेशीय आहेत का?
८. यहोवाच्या साक्षीदारांच्या अनेक मंडळ्यांमध्ये कोणता बदल दिसून येतो?
८ आपण सामुदायिक लोकसंख्या संसरणाच्या काळात जगत आहोत. वर्ल्ड प्रेस रीव्यू प्रमाणे “सबंध जगात १०० दशलक्षांपेक्षा अधिक लोक अशा देशांत राहात आहेत ज्यांचे ते नागरिक नाहीत व २३ दशलक्षांपेक्षा अधिक लोकांना स्वतःच्या देशात स्थानांतर करावे लागले आहे.” याच्या थेट परिणामस्वरूपात, अनेक क्षेत्रांतील, विशेषतः मोठ्या शहरांतील, एकेकाळी प्रमुखपणे एकाच जातीच्या किंवा राष्ट्रीयत्वाच्या लोकांनी बनलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांमध्ये आता जगातील निरनिराळ्या प्रदेशांतील लोक आहेत. कदाचित, तुम्ही राहता त्या ठिकाणी देखील हीच परिस्थिती असेल. तथापि, जग ज्यांना “उपरी” किंवा “परदेशीय” म्हणत असेल, अर्थात ज्यांची भाषा, रिवाज व जीवनशैली आपल्यापेक्षा वेगळी आहे, अशांकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे?
९. ख्रिस्ती मंडळीत येणाऱ्या “उपरी” व “परदेशीय” लोकांबद्दल आपल्या दृष्टिकोनासंबंधाने कोणत्या गंभीर पाशास आपण बळी पडण्याचा संभव आहे?
९ सोप्या शब्दांत बोलायचे झाल्यास, परदेशीय-भयगंडाच्या कोणत्याही प्रवृत्तींनी प्रेरित होऊन, एखाद्या नवीन किंवा तथाकथित विधर्मी देशातून आलेल्यांपेक्षा, सत्य जाणून घेण्याचा सुहक्क प्राप्त करण्यासाठी आपण अधिक लायक आहोत, अथवा हे नवीन लोक राज्य सभागृह व इतर मालमत्तेच्या उपयोगावर अतिक्रमण करताहेत असे कधीही समजू नये. अशा दृष्टिकोनांना थारा देणाऱ्या, पहिल्या शतकातील काही यहुदी ख्रिश्चनांना पौलाला आठवण करून द्यावी लागली की खरे पाहता कोणीही पात्र नव्हते; प्रत्येकाचे तारण हे देवाच्या अपात्री कृपेमुळे शक्य झाले. (रोमकर ३:९-१२, २३, २४) या ना त्याप्रकारे सुवार्ता ऐकण्याच्या संधीपासून वंचित राहिलेल्या अनेकांपर्यंत आता देवाची अपात्री कृपा पोहंचत आहे याबद्दल आपण आनंद करण्यास हवा. (१ तीमथ्य २:४) त्यांच्याबद्दल असलेला आपला स्नेह प्रांजळ आहे हे आपण त्यांना कसे दाखवू शकतो?
१०. आपल्यामधील “परदेशीय” लोकांबद्दल आपण प्रांजळपणे आतिथ्यपूर्ण आहोत हे कशाप्रकारे दाखवू शकतो?
१० आपण पौलाच्या सल्ल्याचे पालन करू शकतो: “देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीहि एकमेकांचा स्वीकार करा.” (रोमकर १५:७) दुसऱ्या देशाचे किंवा पार्श्वभूमीचे लोक सहसा अभावजन्य परिस्थितीत असतात याची जाणीव राखून आपण आपल्याकडून होता होईल तेव्हा त्यांच्याविषयी दया व काळजी व्यक्त करण्यास हवी. आपण त्यांना आपल्यामध्ये स्वीकारून त्यांपैकी प्रत्येकाला “स्वदेशीय मनुष्यासारखेच” लेखावे व ‘त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करावी.’ (लेवीय १९:३४) असे करणे कदाचित सोपे नसेल पण हे मार्गदर्शन मनात बाळगल्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो: “देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरुप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:२.
पवित्र जनांच्या गरजा भागवा
११, १२. यहोवाच्या विशिष्ट सेवकांची (अ) प्राचीन इस्राएलात (ब) पहिल्या शतकात, कोणती विशेष दखल घेण्यात आली होती?
११ आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठी झटणारे प्रौढ ख्रिस्तीजन हे, आपल्याकरवी कदर केली जाण्यासाठी व आपले आतिथ्य प्राप्त करण्यासाठी खरोखर सुयोग्य असलेल्यांपैकी आहेत. यहोवाने प्राचीन इस्राएलातील याजक व लेवीय लोकांसाठी खास सोयी केल्या होत्या. (गणना १८:२५-२९) पहिल्या शतकात, ख्रिश्चनांना देखील विशेष पात्रतेत त्यांची सेवा करणाऱ्यांची काळजी वाहण्याविषयी आर्जवण्यात आले होते. ३ योहान ५-८ येथील अहवालातून, आपल्याला आरंभीच्या ख्रिस्ती लोकांमध्ये विद्यमान असणाऱ्या प्रीतीच्या घनिष्ट बंधनाची ओझरती झलक पाहावयास मिळते.
१२ मंडळीला भेट देण्यासाठी पाठवण्यात आलेल्या विशिष्ट प्रवासी बांधवांबद्दल गायस याने दाखवलेली दया व आतिथ्य, यांची वयोवृद्ध प्रेषित योहानाने खूप प्रशंसा केली. ज्याच्या हाती पत्र होते, त्या देमेत्रियासहित हे सर्व बांधव—त्यापूर्वी गायस यास अनोळखी किंवा अपरिचित होते. तरीसुद्धा, त्यांना आतिथ्यपूर्ण स्वागत मिळाले कारण ते ‘[देवाच्या] नावासाठी बाहेर पडले होते.’ योहानाच्या शब्दांत: ‘म्हणून आपण अशांचे आतिथ्य करावे, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.’—३ योहान १, ७, ८.
१३. आपण “आतिथ्य करावे” यासाठी आपल्यामध्ये कोण विशेषतः सुयोग्य आहेत?
१३ आज यहोवाच्या संघटनेत, अनेक जण संपूर्ण बंधूवर्गासाठी परिश्रमपूर्वक झटत आहेत. यात, मंडळ्यांना बळकट करण्यासाठी दर आठवडी आपला वेळ व शक्ती खर्च करणारे प्रवासी पर्यवेक्षक; परदेशात प्रचार कार्य करण्यासाठी आपली कुटुंबे व आप्तेष्ट यांचा त्याग करणारे मिशनरी; जागतिक प्रचार कार्यास हातभार लावण्यासाठी बेथेल गृहांत अर्थात शाखा दप्तरात स्वेच्छेने सेवा करणारे सदस्य; व अधिकांश वेळ व शक्ती क्षेत्र सेवेत खर्च करणारे पायनियर सेवेतील बांधव समाविष्ट आहेत. खरे पाहता, हे सर्वजण कोणत्याही प्रकारे स्वतःच्या गौरवासाठी किंवा फायद्यासाठी नव्हे तर ख्रिस्ती बंधुत्वाविषयी व यहोवाविषयी असलेल्या प्रेमापोटी परिश्रम करतात. त्यांनी स्वतःला जिवेभावे वाहून घेतले असल्यामुळे आपण त्यांचे अनुकरण करावे यासाठी ते पात्र आहेत तसेच आपण त्यांचे “आतिथ्य करावे” यासाठीही ते सुयोग्य आहेत.
१४. (अ) विश्वासू जनांचे आतिथ्य केल्याने आपण कशाप्रकारे अधिक चांगले ख्रिस्ती बनतो? (ब) मरियेने “चांगला वाटा” निवडला असे येशूने का म्हटले?
१४ आपण अशांचे ‘आतिथ्य करतो’ तेव्हा प्रेषित योहानाने स्पष्ट केल्याप्रमाणे, आपण ‘सत्यामध्ये सहकारी होतो.’ त्याअर्थी याच्या परिणामस्वरूपात आपण अधिक चांगले ख्रिस्ती बनतो. कारण ख्रिस्ती कार्यांत, सहविश्वासू जनांचे चांगले करणे हे अंतर्भूत आहे. (नीतिसूत्रे ३:२७, २८; १ योहान ३:१८) हे आणखी एका मार्गाने लाभप्रद ठरू शकते. मरिया व मार्था यांनी येशूचे आपल्या घरात स्वागत केले तेव्हा, मार्था हिला येशूसाठी ‘पुष्कळ गोष्टी’ तयार करण्याद्वारे एक चांगली यजमानीण व्हायचे होते. मरियेने मात्र एका वेगळ्या प्रकारे आतिथ्य दाखवले. ती “प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली” व येशूने तिची, “चांगला वाटा” निवडून घेतल्याबद्दल प्रशंसा केली. (लूक १०:३८-४२) अनेक वर्षांचा अनुभव असणाऱ्यांच्या सहवासात घालवलेली एखादी रम्य संध्याकाळ, त्यांच्यासोबत केलेल्या सुखसंवादामुळे व चर्चेमुळे आठवणीत राहते.—रोमकर १:११, १२.
विशेष प्रसंगी
१५. कोणते विशेष प्रसंग यहोवाच्या लोकांसाठी आनंदाचे क्षण ठरतील?
१५ खरे ख्रिस्ती जन प्रचलित रूढींचे पालन करीत नसले किंवा जगिक सण साजरे करीत नसले तरीसुद्धा, काही प्रसंगी एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटण्यासाठी ते एकत्र येत असतात. उदाहरणार्थ, येशू काना येथे एका लग्नाला उपस्थित राहिला व तेथे आपला पहिला चमत्कार घडवून त्याने या प्रसंगाचा आनंद द्विगुणीत केला. (योहान २:१-११) तशाच प्रकारे आज, यहोवाचे लोक देखील अशाप्रकारच्या विशेष प्रसंगी एकमेकांसोबत आनंदाचे क्षण घालवतात व औचित्यपूर्ण आनंदोत्सव व मौज याद्वारे प्रसंगांची शोभा वाढते. तथापि, औचित्यपूर्ण कशास म्हणावे?
१६. विशेष प्रसंगी देखील औचित्यपूर्ण वर्तनासंबंधी, आपल्याजवळ कोणते मार्गदर्शन आहे?
१६ बायबलच्या आपल्या अभ्यासाद्वारे आपण शिकतो की ख्रिस्ती जनांसाठी कशाप्रकारचे वर्तन औचित्यपूर्ण आहे व आपण सर्वदा याचे पालन करतो. (रोमकर १३:१२-१४; गलतीकर ५:१९-२१; इफिसकर ५:३-५) सामाजिक मेळावे, मग ते विवाहासंबंधी असोत अथवा आणखी कोणत्या निमित्ताने असोत, त्यांमुळे आपल्याला आपल्या ख्रिस्ती दर्जांचा त्याग करण्याचा किंवा आपण साधारणतः करणार नाही असे काहीतरी करून बसण्याचा परवाना मिळत नाही; तसेच, आपण राहतो त्या देशाच्या सर्व रूढी पाळण्याचेही आपल्यावर बंधन नाही. यांतील अनेक, खोट्या धार्मिक पद्धतींवर किंवा अंधविश्वासांवर आधारित असतात आणि इतर काहींत, ख्रिश्चनांसाठी स्पष्टपणे अस्वीकारणीय असणारे वर्तन सामील असते.—१ पेत्र ४:३, ४.
१७. (अ) काना येथील लग्नाच्या मेजवानीचा कार्यक्रम सुव्यस्थित होता व त्यावर चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात आली होती हे कोणत्या मुद्द्यांवरून स्पष्ट होते? (ब) या प्रसंगास येशूची संमती होती हे कशावरून सूचित होते?
१७ योहान २:१-११ वाचताना, येथे उल्लेखलेला प्रसंग थाटामाटाचा होता आणि मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित होते हे सहज कळून येते. तथापि, येशू व त्याचे शिष्य ‘आमंत्रित’ पाहुणे होते; आणि निदान काही जण तरी कदाचित यजमानाचे आप्त होते तरीसुद्धा, ते अगांतुकपणे कार्यक्रमास गेले नाहीत. आपल्याला हे देखील आढळते की तेथे ‘चाकर’ होते, व काय वाढावयाचे किंवा काय करावयाचे होते याविषयी सूचना देणारा एक ‘भोजनकारभारी’ देखील होता. या सर्वांवरून दिसून येते की तो कार्यक्रम सुव्यवस्थित होता व त्यावर चांगल्याप्रकारे देखरेख करण्यात आली होती. हा वृत्तान्त शेवटी म्हणतो की या लग्न प्रसंगी येशूने जे केले, त्यातून त्याने “आपले गौरव प्रगट केले.” समजा, हा एक दंगेखोर प्रसंग असता किंवा ती एक बेफाम पार्टी असती तर येशूने त्याप्रसंगी करण्याचे निवडले असते का? निश्चितच नाही.
१८. कोणत्याही सामाजिक कार्यक्रमासंबंधी, कोणता गंभीर विचार करण्यास हवा?
१८ तर मग, आपण आयोजित केलेल्या एखाद्या विशेष प्रसंगांविषयी काय? आपण सर्वांनी ‘सत्यामध्ये सहकारी व्हावे’ हाच इतरांचे आतिथ्य करण्यामागचा उद्देश आहे, याची आपण आठवण ठेवावी. त्याअर्थी, एखाद्या प्रसंगावर “साक्षीदारांचा” मेळावा असा निव्वळ शिक्का मारून चालणार नाही. आपण असा प्रश्न विचारू शकतो की हा प्रसंग, आपण कोण आहोत व आपला काय विश्वास आहे याची खरोखर साक्ष देणारा आहे का? अशाप्रकारचे प्रसंग म्हणजे “देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी,” यांसंबंधी इच्छा पूर्ण करण्यात जगाच्या कुयुक्त्यांशी स्पर्धा करीत आपण कोठवर जाऊ शकतो हे पाहण्यासाठी जणू संधी आहेत असे आपण कधीही समजू नये. (१ योहान २:१५, १६) उलटपक्षी या प्रसंगांतून, यहोवाचे साक्षीदार याअर्थी आपली भूमिका उचितपणे प्रतिबिंबित होण्यास हवी व आपण जे काही करतो ते यहोवाला गौरव व सन्मान आणील याची आपण खात्री करून घ्यावी.—मत्तय ५:१६; १ करिंथकर १०:३१-३३.
‘कुरकूर न करता आतिथ्यशील असा’
१९. आपण ‘कुरकूर न करता एकमेकांचे आतिथ्य का करावे’?
१९ जगातील परिस्थिती सतत अवनत होत जातात व लोक अधिकाधिक विभाजित होतात तसतसे आपण, खऱ्या ख्रिस्ती जनांत असणाऱ्या घनिष्ट संबंधास बळकट करण्यासाठी आपल्याकडून जे जे होऊ शकेल ते करण्यास हवे. (कलस्सैकर ३:१४) या उद्देशाने, पेत्राने आपल्याला आर्जवल्याप्रमाणे आपण “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीति” करण्यास हवी. यानंतर, व्यावहारिक शब्दांत तो पुढे म्हणाला: ‘कुरकूर न करता एकमेकांबद्दल आतिथ्यशील असा.’ (१ पेत्र ४:७-९) आपण आपल्या बांधवांबद्दल आतिथ्यपूर्ण असण्यात पुढाकार घेण्यास, दयाळू होण्यास व साहाय्य देण्यासाठी झटण्यास तयार आहोत का? की अशी संधी येते तेव्हा आपण कुरकूर करतो? जर आपण असे करत असू तर याद्वारे आपण आपल्याला मिळू शकणाऱ्या आनंदावर विरजण घालतो आणि चांगले करण्यामुळे मिळणारे आनंदाचे प्रतिफळ देखील गमावून बसतो.—नीतिसूत्रे ३:२७; प्रेषितांची कृत्ये २०:३५.
२०. आजच्या विभाजित जगात आपण आतिथ्य करत राहिल्यास आपल्याकरता कोणते आशीर्वाद राखून ठेवलेले आहेत?
२० आपल्या सहख्रिश्चनांच्या निकट सहवासात कार्य केल्यामुळे, एकमेकांबद्दल दयाळू व आतिथ्यपूर्ण असल्यामुळे अपरिमित आशीर्वाद प्राप्त होतील. (मत्तय १०:४०-४२) अशांना यहोवाने अभिवचन दिले की तो “त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. ते ‘ह्यापुढे’ भुकेले असे होणार नाहीत, व तान्हेलेहि होणार नाहीत.” यहोवाच्या मंडपात असणे म्हणजे त्याचे संरक्षण व आतिथ्य उपभोगणे होय. (प्रकटीकरण ७:१५, १६; यशया २५:६) खरोखर, सर्वदा यहोवाचे आतिथ्य उपभोगण्याचे भवितव्य आपल्यापुढे आहे.—स्तोत्र २७:४; ६१:३, ४.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
◻ आपल्याला खरा संतोष व समाधान मिळवायचे असल्यास आपण कोणत्या बाबींकडे दुर्लक्ष करू नये?
◻ ‘अनाथ व विधवा’ कोण आहेत व आपण त्यांचा कशाप्रकारे ‘समाचार घ्यावा?’
◻ आपल्यामधील “उपरी” व “परदेशीय” यांच्याबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगावा?
◻ आज विशेष दखल घेतली जाण्यासाठी कोण सुयोग्य आहेत?
◻ विशेष प्रसंगी आतिथ्याचा खरा आत्मा कशाप्रकारे प्रतिबिंबित होण्यास हवा?
[१७ पानांवरील चित्रं]
मौजमजेच्या प्रसंगी आपण परदेशीय लोकांचे, अनाथ मुलांचे, पूर्ण-वेळेच्या सेवेत असणाऱ्यांचे व इतर पाहुण्यांचे आतिथ्य करू शकतो