वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 १०/१ पृ. ९-१३
  • “आतिथ्य करण्यात तत्पर असा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “आतिथ्य करण्यात तत्पर असा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अनोळखी लोकांविषयी स्नेह
  • परिपूर्ण यजमान, यहोवा
  • देवदूतांचा यजमान
  • आतिथ्यशील लोक
  • तुम्ही “आतिथ्य करण्यात तत्पर” आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • पाहुणचार—एक आनंददायी अनुभव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • पाहुणचार करू या!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • पाहुणचार करण्याद्वारे इतरांना “चांगल्या गोष्टी” द्या (मत्त. १२:३५क, पं.र.भा.)
    आमची राज्य सेवा—२०१४
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 १०/१ पृ. ९-१३

“आतिथ्य करण्यात तत्पर असा”

“पवित्र जनांच्या गरजा भागवा. आतिथ्य करण्यात तत्पर असा.”—रोमकर १२:१३.

१. एक मूलभूत मानवी गरज कोणती आहे व ती कशी प्रकट होते?

रात्रीच्या वेळेस उशिरा एखाद्या अनोळखी परिसरातील निर्जन रस्त्यावरून चालणे हा आजच्या काळात एक भयावह अनुभव असू शकतो. परंतु, तुम्हाला कोणाचीही ओळख नाही, किंवा कोणालाही तुमची ओळख नाही अशा गर्दीत असणे देखील तितकेच तणावपूर्ण ठरू शकते. खरोखर, कोणाकरवी तरी काळजी घेतली जाण्याची, कोणालातरी हवेहवेसे व प्रिय वाटण्याची गरज ही मानवी स्वभावात अभिन्‍नपणे सामावलेली आहे. अनोळखी किंवा परका असल्यासारखी वागणूक मिळणे कोणालाही आवडत नाही.

२. सहवासाची आपली गरज यहोवाने कशाप्रकारे पूर्ण केली आहे?

२ मानवांना सहवासाची गरज आहे हे सर्व गोष्टींचा निर्माता व सृष्टीकर्ता यहोवा देव, पूर्णपणे जाणून आहे. मानवी निर्मितीचा रचनाकार असल्यामुळे, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही” याविषयी देवाला अगदी सुरवातीपासून कल्पना होती व त्याने त्या अनुषंगाने पावले देखील उचलली. (उत्पत्ति २:१८, २१, २२) यहोवा व त्याच्या सेवकांनी मानवांवर केलेल्या दयेच्या कृत्यांविषयी बायबलमध्ये भरपूर उदाहरणे आहेत. यामुळे, इतरांना आनंद मिळावा व आपल्यालाही समाधान प्राप्त व्हावे या दृष्टीने कशाप्रकारे ‘आतिथ्य करण्यात तत्पर असावे,’ हे शिकण्यास आपल्याला मदत मिळते.—रोमकर १२:१३.

अनोळखी लोकांविषयी स्नेह

३. आतिथ्याचा मूळ अर्थ स्पष्ट करा.

३ बायबलमध्ये वापरण्यात आल्याप्रमाणे “आतिथ्य” हा शब्द, “प्रीती” व “अनोळखी व्यक्‍ती” या अर्थाच्या दोन मूळ शब्दांपासून बनलेल्या, फिलोक्सेनिया या ग्रीक शब्दातून अनुवादित केलेला आहे. त्याअर्थी, आतिथ्य याचा मुळात, “अनोळखी लोकांविषयी प्रीती” असा अर्थ होतो. परंतु, ही केवळ एक औपचारिकता किंवा शिष्टाचाराची बाब नव्हे. यात एखाद्याच्या भावना व त्याची मायाममता गोवलेली असते. जेम्स स्ट्राँग यांच्या एग्झॉस्टिव्ह काँकॉर्डन्स ऑफ द बायबल या ग्रंथानुसार फिलिओ या क्रियापदाचा अर्थ, “([एखादी व्यक्‍ती किंवा वस्तू] हिच्याबद्दल स्नेह वाटणे) मैत्री असणे, म्हणजेच तिजविषयी (संवेदनशीलपणे व भावनिकपणे, वैयक्‍तिक जिव्हाळा असण्याच्या अर्थाने) माया असणे,” असा होतो. यास्तव, आतिथ्य हे तत्त्वावर आधारित असलेल्या, कदाचित कर्तव्याच्या जाणीवेमुळे किंवा बंधन असल्यामुळे निपजणाऱ्‍या प्रीतीच्याही पलीकडे जाते. ते सहसा प्रांजळ स्नेह, माया व मैत्री अभिव्यक्‍त करते.

४. आतिथ्य हे कोणाला दाखवण्यास हवे?

४ या स्नेहाचा किंवा या मायेचा मानकरी “अनोळखी व्यक्‍ती” (ग्रीक, झेनॉस) असतो. यात कोणकोण समाविष्ट असू शकते? पुन्हा, स्ट्राँग यांचा काँकॉर्डन्स झेनॉस या शब्दाची, ‘परदेशी (शब्दशः परकीय, किंवा आलंकारिक भाषेत, नवा); त्याअर्थी एक अतिथी किंवा (उलटपक्षी त्याचप्रमाणे) एक अनोळखी व्यक्‍ती’ अशी व्याख्या करतो. यास्तव, बायबलने दिलेल्या आदर्शाप्रमाणे आतिथ्य हे, आपल्याला ज्याबद्दल स्नेह वाटते अशा एखाद्यास दाखवलेला दयाळूपणा प्रतिबिंबित करते अथवा पूर्णपणे अनोळखी असणाऱ्‍या एखाद्याप्रती देखील ते दाखवता येऊ शकते. येशूने स्पष्ट केले: “जे तुमच्यावर प्रीति करितात त्यांच्यावर तुम्ही प्रीति केली तर तुमचे प्रतिफळ काय? जकातदारहि तसेच करितात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करिता? परराष्ट्रीयहि तसेच करितात ना?” (मत्तय ५:४६, ४७) निष्कपट आतिथ्य हे पूर्वग्रह व भीती यांमुळे उत्पन्‍न होणाऱ्‍या विभाजनापेक्षा व भेदभावापेक्षा सरस असते.

परिपूर्ण यजमान, यहोवा

५, ६. (अ) “तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे,” असे म्हणताना येशूच्या मनात काय होते? (ब) यहोवाचे औदार्य कशातून दिसून येते?

५ वरती उद्धृत केलेल्या वचनाप्रमाणे, मानव परस्परांविषयी व्यक्‍त करत असलेल्या प्रीतीतील उणीवांकडे लक्ष वेधल्यानंतर येशूने पुढे असे म्हटले: “ह्‍यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.” (मत्तय ५:४८) अर्थात, यहोवा तर प्रत्येक बाबतीत परिपूर्ण आहे. (अनुवाद ३२:४) तथापि, येशू मात्र यहोवाच्या परिपूर्णतेच्या एका विशिष्ट पैलूवर भर देत होता; त्याने आधी म्हटल्याप्रमाणे: “[देव] वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.” (मत्तय ५:४५) दयाळुपणे वागण्याच्या बाबतीत यहोवा मुळीच पक्षपात करत नाही.

६ यहोवा निर्माता असल्यामुळे, सर्वकाही त्याच्या मालकीचे आहे. “वनातील सर्व पशु, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत. डोंगरांवरील सर्व पाखरे मला ठाऊक आहेत, आणि रानातील प्राणी माझ्या लक्षात आहेत,” असे यहोवा म्हणतो. (स्तोत्र ५०:१०, ११) तरीसुद्धा, तो स्वार्थाने काहीही साठवून ठेवत नाही. तो औदार्याने त्याच्या सर्व प्राण्यांच्या गरजा भागवतो. स्तोत्रकर्त्याने यहोवाबद्दल म्हटले: “तू आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी करितोस.”—स्तोत्र १४५:१६.

७. अनोळखी आणि गरजू लोकांना यहोवा ज्याप्रकारे वागवतो त्यातून आपण कोणता धडा शिकू शकतो?

७ यहोवा लोकांच्या गरजा भागवतो—त्याला ओळखत नसलेल्या व त्याअर्थी त्याच्या दृष्टीने अनोळखी असलेल्यांच्याही गरजा तो भागवतो. पौल व बर्णबा यांनी लुस्त्र या नगरातील मूर्तीपूजकांना आठवण करून दिली की यहोवाने “स्वतःस साक्षीविरहित राहू दिले नाही, म्हणजे त्याने उपकार केले, आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतु तुम्हाला दिले, आणि अन्‍नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले.” (प्रेषितांची कृत्ये १४:१७) गरजवंतांच्या बाबतीत यहोवा विशेषतः दयाळूपणे व औदार्याने वागतो. (अनुवाद १०:१७, १८) दयाळुपणा व औदार्य दाखवण्याच्या बाबतीत—इतरांचे आतिथ्य करण्याच्या बाबतीत—आपल्याला यहोवाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

८. आपल्या आध्यात्मिक गरजा तृप्त करण्यासंबंधाने यहोवाने त्याचे औदार्य कशाप्रकारे दाखवले आहे?

८ आपल्या प्राणीमात्रांच्या भौतिक गरजा वैपुल्याने भागवण्याव्यतिरिक्‍त, यहोवा आध्यात्मिक दृष्टीने देखील त्यांच्या गरजा भागवतो. आपण आध्यात्मिकरित्या एका आशाहीन स्थितीत आहोत याची आपल्यापैकी कोणाला जाणीव होण्याआधीच, यहोवाने आपल्या आध्यात्मिक कल्याणासाठी अतिउदारपणे कार्य केले. आपण रोमकर ५:८, १० येथे वाचतो: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. . . . आपण शत्रु असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला.” या तरतुदीमुळे पापमय मानवांना आपल्या स्वर्गीय पित्यासोबत एक आनंददायक कौटुंबिक नातेसंबंध जोडणे शक्य होते. (रोमकर ८:२०, २१) पापमय व अपरिपूर्ण स्थितीत असूनही, आपण जीवनाचे सार्थक करावे यासाठी आपल्याला योग्य मदत व मार्गदर्शन मिळेल याची देखील यहोवाने खात्री करून घेतली.—स्तोत्र ११९:१०५; २ तीमथ्य ३:१६.

९, १०. (अ) यहोवा हा परिपूर्ण यजमान आहे, हे आपण का म्हणू शकतो? (ब) या बाबतीत खऱ्‍या उपासकांनी यहोवाच्या उदाहरणाचे कोणत्या अर्थाने अनुकरण करण्यास हवे?

९ हे लक्षात घेता, यहोवा कितीतरी दृष्टींनी खरोखर परिपूर्ण यजमान आहे असे आपण म्हणू शकतो. तो गरजू, दीन व गोरगरीब यांकडे दुर्लक्ष करत नाही. अनोळखी लोकांबद्दल, एवढेच काय तर त्याच्या शत्रूंबद्दलही तो मनापासून कळकळ व्यक्‍त करतो; शिवाय, तो याऐवजी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा करत नाही. या सर्व बाबतीत, तो एका परिपूर्ण यजमानाचे सर्वतोपरी उत्कृष्ट उदाहरण नव्हे का?

१० अशाप्रकारे, यहोवा कृपाळु व उदार देव असल्याकारणाने आपल्या उपासकांनी आपले अनुकरण करावे अशी त्याची इच्छा आहे. सबंध बायबलमध्ये आपल्याला या कृपावंत गुणाची उल्लेखनीय उदाहरणे आढळतात. एन्सायक्लोपिडिया जुडाईका याच्या निरीक्षणानुसार, “प्राचीन इस्राएलात, आतिथ्य म्हणजे निव्वळ शिष्टाचाराचा प्रश्‍न नव्हता, तर तो एक नैतिक रिवाज होता . . . थकलेल्या प्रवाशाचे स्वागत करणे व अनोळखी व्यक्‍तीला आपल्यामध्ये स्वीकारणे यांसारख्या बायबलवर आधारित असलेल्या रिवाजांच्या गाभ्यातून जणू, आतिथ्य व त्याजशी संबंधित असणारे सर्व पैलू, यहुदी परंपरेतील एका अत्यंत प्रशंसित सद्‌गुणाच्या रूपात विकसित झाले.” कोणत्याही विशिष्ट राष्ट्रीयत्वाचे किंवा वांशिक गटाचे ओळखचिन्ह असण्यापेक्षा, आतिथ्य हे यहोवाच्या सर्वच खऱ्‍या उपासकांचे वैशिष्ट्य असण्यास हवे.

देवदूतांचा यजमान

११. आतिथ्यामुळे अनपेक्षित आशीर्वाद प्राप्त झाले असल्याचे कोणत्या उल्लेखनीय उदाहरणावरून स्पष्ट होते? (उत्पत्ति १९:१-३; शास्ते १३:११-१६ देखील पाहा.)

११ हेब्रोनजवळील मम्रेच्या राईत डेरा करत असताना अब्राहाम व सारा यांनी दाखविलेल्या आतिथ्याचा अहवाल, ज्ञात असलेल्या बायबल अहवालांपैकी सर्वोत्तम आहे. (उत्पत्ति १८:१-१०; २३:१९) निःसंशये, प्रेषित पौलाने हीच घटना मनात बाळगून सल्ला दिला की, “अतिथिप्रेमाचा विसर पडू देऊ नका, कारण तेणेकरून कित्येकांनी देवदूतांचे आतिथ्य नकळत केले आहे.” (इब्री लोकांस १३:२) या अहवालाचा अभ्यास केल्यामुळे, आपल्याला हे समजण्यास मदत मिळेल की आतिथ्य म्हणजे निव्वळ रिवाजाची किंवा लहानपणी झालेल्या संस्कारांची बाब नव्हे, तर एक ईश्‍वरी गुण आहे ज्याकरवी अद्‌भुत आशीर्वाद प्राप्त होतात.

१२. अब्राहामाने अनोळखी लोकांविषयीची आपली प्रीती कशाप्रकारे प्रदर्शित केली?

१२ उत्पत्ति १८:१, २ या वचनांतून सूचित होते की ते पाहुणे अब्राहामाला अनोळखी व अनपेक्षित होते, म्हणजे त्या तीन अनोळखी व्यक्‍ती केवळ वाटसरू होत्या असे म्हटले तरी चालेल. काही समीक्षकांच्या मते, पूर्वदेशांतील लोकांच्या रिवाजानुसार अनोळखी देशातील प्रवाशास, तेथील कोणाचीही ओळख नसली तरीही आतिथ्याची अपेक्षा करण्याचा हक्क होता. तथापि, या अनोळखी लोकांनी आपला हक्क सांगेपर्यंत अब्राहाम थांबला नाही; त्याने पुढाकार घेतला. थोड्या दूरवर असलेल्या या अनोळखी लोकांना भेटण्यासाठी तो ‘धावत गेला’—हे सारे “भर उन्हाच्या वेळी” घडले व अब्राहाम तेव्हा ९९ वर्षांचा होता! पौलाने, अनुकरण करण्याजोगा आदर्श म्हणून अब्राहामाचा अप्रत्यक्ष उल्लेख का केला हे यावरून स्पष्ट होत नाही का? अनोळखी व्यक्‍तींबद्दल दाखवलेला स्नेह किंवा प्रीती, त्यांच्या गरजांबद्दल व्यक्‍त केलेली कळकळ, हेच मुळात आतिथ्याचे मर्म आहे. तो एक वांच्छनीय गुण आहे.

१३. अब्राहामाने पाहुण्यांना “नमन” का केले?

१३ त्या अनोळखी व्यक्‍तींची भेट घडली तेव्हा अब्राहामाने “सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लवून त्यांना नमन केले” असेही आपल्याला अहवाल सांगतो. पूर्णपणे अनोळखी असणाऱ्‍यांना नमन? अब्राहामाने केलेले नमन म्हणजे, एखाद्या आदरणीय पाहुण्याला किंवा उच्च पदावर असणाऱ्‍या कोणाला अभिवादन करण्याची एक पद्धत होती; उपासनेचे कृत्य समजून त्याचा दुर्बोध करण्यात येऊ नये, उपासनेच्या कृत्यावर केवळ देवाचा हक्क आहे. (पडताळा प्रेषितांची कृत्ये १०:२५, २६; प्रकटीकरण १९:१०.) अब्राहामाने नमन करण्याद्वारे, केवळ मान वाकवून नव्हे तर “जमिनीपर्यंत लवून” नमन करण्याद्वारे या अनोळखी व्यक्‍तींना महत्त्वपूर्ण असण्याचा बहुमान बहाल केला. तो स्वतः एका मोठ्या सुसंपन्‍न पितृप्रधान कुटुंबाचा प्रमुख होता, पण त्याने या अनोळखी लोकांना आपल्यापेक्षा अधिक आदरास पात्र असे समजले. सहसा अनोळखी लोकांबद्दल असलेल्या शंकाकुशंकापेक्षा आणि दुरून-डोंगर-साजरा, अशा मनोवृत्तीपेक्षा हे खरोखर किती वेगळे आहे! अब्राहामाने, “प्रत्येक जण दुसऱ्‍याला आदराने आपणापेक्षा थोर माना,” या विधानाची खरोखर यथार्थता प्रदर्शित केली.—रोमकर १२:१०.

१४. अब्राहामाने अनोळखी लोकांचे आतिथ्य केले, त्यांत कोणते परिश्रम व त्याग अंतर्भूत होता?

१४ अहवालाचा उर्वरित भाग दाखवतो की अब्राहामाच्या भावना प्रांजळ होत्या. भोजन उत्कृष्ट होते यात शंका नाही. अनेक गुरेढोरे असलेल्या मोठ्या घराण्यात देखील “एक चांगले कोवळे वासरु” म्हणजे रोजचाच प्रकार नसतो. त्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या प्रघातांविषयी जॉन किट्टो यांच्या दररोजचे बायबल दृष्टान्त (इंग्रजी) यात म्हटलेले आहे: “एखादा सण किंवा एखाद्या अनोळखी व्यक्‍तीचे आगमन, यांसारखे अपवाद वगळता चैनीच्या वस्तूंचा कधीही वापर केला जात नाही; शिवाय, ज्यांच्याजवळ अनेक कळप व गुरे असतात ते देखील, केवळ अशाच प्रसंगी मांसाहार करतात.” येथील उष्ण हवामानामुळे कोणतेही नासणारे अन्‍नपदार्थ साठवून ठेवणे शक्य नव्हते व त्याअर्थी अशाप्रकारचे भोजन द्यावयाचे झाल्यास सर्वकाही आयत्या वेळी करणे अनिवार्य होते. यामुळे, या लहानशा अहवालात “त्वरेने” व “लवकर” हे शब्द तीन वेळा आढळतात व भोजन तयार करण्यासाठी अब्राहाम अक्षरशः “धावत गेला” असे सांगण्यात आले आहे यात नवल नाही!—उत्पत्ति १८:६-८.

१५. अब्राहामाने आदर्श ठेवल्याप्रमाणे आतिथ्य दाखवण्यासंबंधाने भौतिक तरतुदींविषयी कोणता दृष्टिकोन योग्य आहे?

१५ तथापि, केवळ कोणावर छाप पाडण्यासाठी एक चमचमीत मेजवानी देणे हे उद्दिष्ट नव्हे. ते भोजन तयार करण्यासाठी व सादर करण्यासाठी अब्राहामाने व सारेने इतके परिश्रम केले असले तरीसुद्धा, आधी अब्राहामाने त्याबद्दल कशाप्रकारे उल्लेख केला ते पाहा: “थोडे पाणी आणू द्या; तुम्ही आपले पाय धुऊन ह्‍या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणितो तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा; यासाठी तुमचे या आपल्या दासाकडे येणे झाले असावे.” (उत्पत्ति १८:४, ५) ती “थोडी भाकर” म्हणजे, धष्टपुष्ट वासरू, चांगल्या पीठाच्या गोलाकार भाकरी, दही व दूध या पदार्थांचा—जणू राजभोगच ठरली. यातून शिकावयाचा धडा कोणता? आतिथ्य करताना, खाद्यपदार्थ व पेय किती चमचमीत असतील किंवा कोणकोणती खर्चीक करमणूक पुरवली जाईल वगैरे, ही महत्त्वाची किंवा भर देण्याजोगी बाब नसते. महागड्या वस्तू एखाद्याच्या खिशाला परवडतात की नाही यावर आतिथ्य अवलंबून नसते. उलटपक्षी, ते इतरांच्या हिताची प्रांजळ जाणीव असण्यावर व इतरांचे होता होईल तितके चांगले करण्याची इच्छा असण्यावर अवलंबून असते. एक बायबल नीतिसूत्र म्हणते: “पोसलेल्या बैलाची मेजवानी देऊन मनांत द्वेष वागविणे, यापेक्षा प्रेमाची भाजीभाकरी बरी,” व यातच खऱ्‍या आतिथ्याची गुरुकिल्ली दडलेली आहे.—नीतिसूत्रे १५:१७.

१६. अब्राहामाने पाहुण्यांसाठी जे काही केले त्यातून त्याने आध्यात्मिक गोष्टींविषयीची जाणीव कशाप्रकारे व्यक्‍त केली?

१६ तथापि, आपण लक्षात घेण्यास हवे की या संपूर्ण घटनेत एक आध्यात्मिक गर्भितार्थ देखील होता. ते पाहुणे यहोवाकडून आलेले संदेष्टे होते हे अब्राहामास कळून आले. तो त्यांना उद्देशून, “हे प्रभू, [यहोवा, NW] मजवर तुझी कृपादृष्टि असेल तर ये; तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको,” असे म्हणाला याद्वारे हे सूचित होते.a (उत्पत्ति १८:३; पडताळा निर्गम ३३:२०.) त्यांच्याजवळ आपल्यासाठी संदेश आहे किंवा ते सहज त्या मार्गाने जात आहेत हे अब्राहामास आधीपासून माहीत नव्हते. तरीसुद्धा, यहोवाचा उद्देश पूर्ण होत आहे हे मात्र त्याला जाणवले. हे लोक यहोवाकडून मिळालेल्या कोणत्यातरी कामगिरीत गोवलेले होते. यामध्ये तो काही हातभार लावू शकत असल्यास तसे करण्यास तो आनंदाने तयार झाला असता. यहोवाच्या सेवकांना सर्वोत्तम तेच मिळण्यास हवे याची त्याला जाणीव होती व तो त्याच्या परीने सर्वोत्तम तेच देणार होता. असे केल्यामुळे, त्याला किंवा इतर कोणालातरी आध्यात्मिक आशीर्वाद मिळणार होते. घटनाक्रमातून स्पष्ट झाल्याप्रमाणे, अब्राहाम व सारा यांना त्यांच्या निःस्वार्थ आतिथ्याबद्दल उदंड आशीर्वाद प्राप्त झाले.—उत्पत्ति १८:९-१५; २१:१, २.

आतिथ्यशील लोक

१७. अनोळखी व गरजू लोकांसंबंधाने यहोवाने इस्राएल लोकांकडून काय अपेक्षिले?

१७ अब्राहामापासून उत्पन्‍न झालेल्या राष्ट्रास त्याचा उल्लेखनीय आदर्श विसरून चालणार नव्हते. यहोवाने इस्राएल लोकांना दिलेल्या नियमशास्त्रात, त्यांच्यामधील अनोळखी लोकांना आतिथ्य दाखवण्याची तरतूद अंतर्भूत होती. “तुमच्याबरोबर राहणाऱ्‍या परदेशीय मनुष्याला तुम्ही स्वदेशीय मनुष्यासारखेच लेखा; आणि त्याच्यावर स्वतःसारखी प्रीति करा; कारण तुम्हीहि मिसर देशात परदेशीय होता; मी परमेश्‍वर तुमचा देव आहे.” (लेवीय १९:३४) भौतिक आधाराची गरज असणाऱ्‍यांकडे त्या लोकांना विशेष लक्ष द्यावयाचे होते व अशांकडे डोळेझाक करायची नव्हती. यहोवा त्यांना विपुल उत्पन्‍नाद्वारे आशीर्वादित करत असे तेव्हा, त्यांच्या सणांच्या वेळी ते आनंदोत्सव करत असत, शब्बाथ वर्षांच्या दरम्यान ते आपल्या परिश्रमापासून विश्राम घेत असत तेव्हा व यांशिवाय इतर प्रसंगी, त्यांना या अभावजन्य परिस्थितीत असणाऱ्‍यांची, अर्थात विधवा, अनाथ व उपरी असलेल्यांची आठवण ठेवायची होती.—अनुवाद १६:९-१४; २४:१९-२१; २६:१२, १३.

१८. यहोवाची कृपादृष्टी आणि आशीर्वाद प्राप्त करण्याच्या दृष्टीने आतिथ्य दाखवणे केवढे महत्त्वपूर्ण आहे?

१८ इस्राएल लोकांनी दयाळूपणा, औदार्य व आतिथ्य दाखविण्याकडे कानाडोळा केला तेव्हा यहोवाने त्यांच्याशी ज्याप्रकारे व्यवहार केला त्याकडे पाहता, इतरांविषयी व विशेषतः गरजू लोकांविषयी हे गुण प्रदर्शित करणे केवढे महत्त्वाचे आहे हे स्पष्ट होते. यहोवाने स्पष्ट केले की त्याच्या लोकांना त्याच्याकडून निरंतर आशीर्वाद हवे असल्यास ज्या अपेक्षा त्यांना पूर्ण करावयाच्या होत्या, त्यांत अनोळखी व गरजू लोकांबद्दल दयाळूपणा व औदार्य हे देखील समाविष्ट होते. (स्तोत्र ८२:२, ३; यशया १:१७; यिर्मया ७:५-७; यहेज्केल २२:७; जखऱ्‍या ७:९-११) या व इतर अपेक्षा पूर्ण करण्यात ते राष्ट्र दक्ष राहिले तोपर्यंत त्यांची भरभराट झाली व त्यांना भौतिक आणि आध्यात्मिक सुबत्ता लाभली. जेव्हा आपल्याच वैयक्‍तिक स्वार्थांचा पाठलाग करण्यात गुंतून जाऊन त्यांनी गरजू लोकांप्रती हे कृपावंत गुण दाखवण्याकडे दुर्लक्ष केले तेव्हा मात्र त्यांना यहोवाने दोषी ठरवले व शेवटी त्यांच्याविरुद्ध प्रतिकूल न्यायदंड बजावण्यात आला.—अनुवाद २७:१९; २८:१५, ४५.

१९. आपण आणखी काय विचारात घेण्यास हवे?

१९ तर मग, आत्मपरीक्षण करून या बाबतीत आपण यहोवाच्या अपेक्षा पूर्ण करत आहोत किंवा नाही हे पडताळून पाहणे केवढे अगत्याचे आहे! आजच्या जगातील स्वार्थी व विभाजक प्रवृत्ती लक्षात घेता हे आणखीनच खरे आहे. एका विभाजित जगात आपण ख्रिस्ती आतिथ्य कशाप्रकारे दाखवू शकतो? याच विषयावर पुढील लेखात चर्चा करण्यात आली आहे.

[तळटीपा]

a या मुद्द्‌यावर अधिक विश्‍लेषणात्मक चर्चेसाठी टेहळणी बुरुज च्या मे १५, १९८८ (इंग्रजी) ह्‍या अंकात पृष्ठे २१-३ वरील “देवाला कोणी पाहिले आहे का?” हा लेख पाहा.

तुम्हाला आठवते का?

◻ ‘आतिथ्य’ याअर्थी अनुवाद केलेल्या बायबलच्या शब्दाचा काय अर्थ आहे?

◻ आतिथ्य दाखवण्यामध्ये यहोवा कोणकोणत्या बाबतीत एक परिपूर्ण उदाहरण आहे?

◻ आतिथ्य दाखवण्यासाठी अब्राहाम कोठवर गेला?

◻ सर्व खऱ्‍या उपासकांनी “आतिथ्य करण्यात तत्पर” का असावे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा