मातीस पुन्हा मिळणे कसे?
“तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” पहिला मानव, आदाम ह्याने हे शब्द ऐकले तेव्हा पुढे काय होणार हे त्याला ठाऊक होते. जमिनीच्या मातीतून त्याची निर्मिती करण्यात आली होती आणि तो परत त्या मातीलाच जाऊन मिळणार होता. तो मरणार होता कारण त्याने निर्माणकर्ता, यहोवा देवाची अवज्ञा केली होती.—उत्पत्ति २:७, १५-१७; ३:१७-१९.
मानवांची जमिनीच्या मातीद्वारे निर्मिती करण्यात आली आहे, असे बायबल दाखवते. ते असेही म्हणते: “जो जीव पाप करीत आहे—तो स्वतः मरेल.” (यहेज्केल १८:४ NW; स्तोत्र १०३:१४) मरणामुळे करोडो लोकांना शोक करावा लागला आहे आणि मानवी मृत शरीरांची अंत्यव्यवस्था लावण्याबद्दलचे अनेक प्रश्न वारंवार उभे राहिले आहेत.
पूर्वीच्या आणि सध्याच्या पद्धती
प्राचीन काळातील देवाच्या लोकांमधील मानवी मृत शरीरांची व्यवस्था कशा प्रकारे लावण्यात आली? याबद्दल बायबलच्या सुरवातीच्या भागात सांगण्यात आले आहे, की शवाची उत्तरक्रिया करण्याचे अनेक मार्ग असून त्यात जमिनीत पुरण्याच्या पद्धतीचा देखील समावेश होतो. (उत्पत्ति ३५:८) कुलपिता अब्राहाम, त्याची पत्नी सारा तसेच त्यांचा पुत्र इसहाक आणि नातू याकोब यांना मकपेलाच्या गुहेत पुरले होते. (उत्पत्ति २३:२, १९; २५:९; ४९:३०, ३१; ५०:१३) इस्राएली शास्ते गिदोन आणि शमशोन यांना ‘त्यांच्या पित्यांच्या कबरेत पुरण्यात आले.’ (शास्ते ८:३२; १६:३१) प्राचीन काळातील देवाच्या लोकांनी कौटुंबिक कबरेची जागा असणे पसंत केले, हे यावरून सूचित होते. सा. यु. पहिल्या शतकात येशू ख्रिस्त मरण पावला तेव्हा त्याचे शरीर खडकात खोदलेल्या नवीनच कबरेत ठेवण्यात आले. (मत्तय २७:५७-६०) सामान्यपणे मानवी मृत शरीराला जमिनीत पुरण्यात येत होते किंवा कबरेत ठेवण्यात येत होते. आजही जगव्याप्तपणे ही पद्धत आचरली जाते.
तथापि, आज जगाच्या काही भागांत जागेची कमालीची कमतरता असून जागेचे भाव आकाशाला भिडणारे आहेत यांमुळे कबरेची जागा मिळणे अगदी कठीण होऊन बसले आहे. यास्तव, काही लोक मानवी मृत शरीराची व्यवस्था लावण्याच्या इतर पद्धतींचा विचार करीत आहे.
मानवी मृत शरीरावर दहनसंस्कार केल्यानंतर उरलेली राख विखरणे आता अधिक सर्वसामान्य होत आहे. इंग्लंडमध्ये आता सुमारे ४० टक्के मृतांची अशा प्रकारे व्यवस्था लावली जाते. स्वीडनमध्ये, नागरीय क्षेत्रांतील ८० टक्केपेक्षा अधिक शवांचे दहन केले जाते आणि काही जंगले मृत शरीराची राख विखरण्यासाठी राखून ठेवण्यात आली आहेत. शंघाय आणि चीनच्या काही सागरी किनारपट्टीवरील शहरांत, शहरी सरकारे वर्षातून पुष्कळ वेळा मृत शरीरांची राख समुद्रात टाकण्याची योजना करतात.
ही राख कोठे विखरली जाऊ शकते? प्रत्येक ठिकाणी नव्हे. ही राख विखरल्याने पर्यावरणास हानी पोहंचेल, असी भीती कदाचित काही लोकांना वाटेल. तथापि, खरे पाहता, दहन केल्यामुळे साथीच्या रोगाची कोणतीही शक्यता राहत नाही. इंग्लंडमधील काही विशिष्ट स्मशानभूमींत आणि संयुक्त संस्थानांतील स्मृती उद्यानांत राख विखरण्यासाठी गवताची पटांगणे आणि फुलांचे बगीचे राखून ठेवण्यात आले आहेत. अर्थातच, प्रेतदहन आणि राख विखरण्यावरील शास्त्रवचनीय दृष्टिकोनाबद्दल ख्रिस्ती विशेषतः चिंता बाळगून आहेत.
शास्त्रवचनीय दृष्टिकोन कोणता आहे?
भविष्यवक्ता यशयाने ‘बाबेलच्या राज्याविरुद्ध’ न्यायदंडाची घोषणा करताना म्हटले: “तुला . . . आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे.” (यशया १४:४, १९) राख विखरण्याची तुलना अशा प्रकारच्या मानखंडनेशी करण्यास हवी का? नाही, कारण तेथे प्रेतदहन आणि मृत शरीराची राख सुरक्षित ठेवणे किंवा राख विखरणे याचा कोणताही उल्लेख नाही.
“कबरेतील सर्व माणसे त्याची [माझी] वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.” असे येशूने म्हटले तेव्हा तो मृतांच्या पृथ्वीवरील पुनरुत्थानाविषयी बोलला जे त्याच्या हजार वर्षांच्या राजवटीत होणार आहे. (योहान ५:२८, २९) तथापि, पुनरुत्थानासंबंधाने असणारे इतर भविष्यसूचक वर्णन या गोष्टीचे समर्थन करतात, की एखाद्याचे पुनरुत्थान होण्यास एका खास कबरेची आवश्यकता नाही. प्रकटीकरण २०:१३ म्हणते: “समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यास बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.” यास्तव, मनुष्य कोठे व कसा ‘मातीस परत जाऊन मिळतो’ ही बाब महत्त्वाची नाही. उलटपक्षी, देव त्यास स्मरणात ठेवतो किंवा नाही आणि त्याचे पुनरुत्थान होते किंवा कसे ही गोष्ट महत्त्वाची आहे. (ईयोब १४:१३-१५; पडताळा लूक २३:४२, ४३.) लोकांना लक्षात ठेवण्यासाठी यहोवाला आकर्षक कबरांची निश्चितच गरज नाही. प्रेतदहन एखाद्या मनुष्याचे पुनरुत्थान रोखू शकत नाही. राख विखरणे योग्य उद्देशाने आणि खोट्या धार्मिक प्रघातांशिवाय केल्यास तसे करणे शास्त्रवचनांच्या विरोधात होणार नाही.
जे राख विखरण्याचे पसंत करतात त्यांना त्यांच्या देशाच्या कायद्याकडे लक्ष द्यावे लागेल. शोकित जण आणि इतरांच्या भावनांचा विचार करणे देखील त्यांच्यासाठी उचित होईल. यहोवाचे सेवक या बाबतीत दक्ष राहून चांगले ते करतात, की ज्यामुळे त्यांच्या शास्त्रवचनीय स्वातंत्र्याचा या संबंधाने उपयोग केल्यामुळे ख्रिश्चनांनी धारण केलेल्या चांगल्या नामास कलंकित केले जात नाही. हे विशेषतः अशा देशामंध्ये महत्त्वाचे आहे जेथे प्रेतदहन आणि राख विखरण्यास कायद्याने अनुमती दिली जाते परंतु अद्यापही समाजाने त्याचा पूर्णतः स्वीकार केलेला नाही. अर्थातच, एखादा ख्रिस्ती मानवी जीवाच्या अमरत्वावर विश्वास असणाऱ्या कोणत्याही प्रघातांपासून आणि चालीरितींपासून दूर राहील.
कबरेपासून पूर्ण स्वातंत्र्य!
राख विखरण्यास समर्थन देणारे असे म्हणतात, की याचा अर्थ म्हणजे कबरेमध्ये दफन करण्यापासून स्वातंत्र्य. तथापि, बायबलची पुढील भविष्यवाणी सर्वोत्तम सांत्वनदायक ठरेल: “शेवटला शत्रु नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.”—१ करिंथकर १५:२४-२८.
याचा अर्थ कबर, थडगे व प्रेतदहन आणि मृत शरीराची राख विखरणे सुद्धा भूतकाळातील गोष्टी झालेल्या असतील. होय, मृत्यू राहणार नाही. ईश्वरी प्रेरणेद्वारे प्रेषित योहानाने लिहिले: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा,’ देवाचा ‘मंडप’ मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर ‘देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि’ देव स्वतः ‘त्यांच्याबरोबर राहील.’”—प्रकटीकरण २१:३, ४.
हे सर्व तेव्हा होईल जेव्हा देवाच्या राज्याच्या आधिपत्याखालील आदामाच्या पापामुळे होणाऱ्या मृत्यूला पूर्णपणे काढून टाकले जाईल. त्यावेळी आज्ञाधारक मानवजातीला मातीत पुन्हा मिळण्याच्या संभावनेस तोंड द्यावे लागणार नाही.
[२९ पानांवरील चित्रं]
मानवी मृत शरीराची व्यवस्था लावण्याच्या पद्धती
[३१ पानांवरील चित्रं]
जपान, सागामी उपसागरात राख विखरताना