जलप्रलयाची आख्यायिका बायबलच्या अहवालाचे समर्थन करते
नोहाच्या दिवसांतील जगव्याप्त जलप्रलय ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे अनेक अहवाल संपूर्ण जगातील अनेक विभिन्न संस्कृतींच्या दंतकथांमध्ये पाहण्यास मिळतात. चाड या आफ्रिकी देशातील मुसॉई जमातीचे लोक या जलप्रलयाचे वर्णन पुढीलप्रमाणे करतात:
‘एकेकाळी दूरवरच्या ठिकाणी एक कुटुंब राहत होते. एके दिवशी या कुटुंबातील आईला आपल्या प्रियजनांसाठी खास भोजन तयार करण्याची इच्छा झाली. यास्तव तिने आपले उखळ घेतले आणि त्यात धान्य घालून कुटण्यास सुरवात केली. आकाश आता जितके दूर आहे तितके ते त्यावेळी नव्हते. खरे तर, तुम्ही आपला हात वर केला असता तर तुम्हाला त्यास स्पर्श करता आला असता. तिने आपल्या सर्व सामर्थ्याने धान्य कुटण्यास सुरवात केली आणि थोड्याच अवधीत धान्याचे पीठ तयार झाले. परंतु धान्य कुटतेवेळी या स्त्रीने मुसळ इतका वर उचलला, की त्यामुळे तो आकाशात खुपसला गेला आणि आभाळ फाटले! तत्क्षणी, पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात पाणी पडण्यास सुरवात झाली. तो सर्वसाधारण पाऊस नव्हता. संपूर्ण पृथ्वी पाण्याने व्यापली जात नाही तोपर्यंत म्हणजे सात दिवस आणि सात रात्री हा पाऊस पडला. जसजसा पाऊस पडत होता तसतसे आकाश दूर—पोहंचता येणार नाही इतक्या उंचावर जाऊन स्थिर झाले. मानवतेवर किती मोठे हे महासंकट! तेव्हापासून आपल्या हातांनी आकाशास स्पर्श करण्याचा सुहक्क आपण गमावला आहे.’
मनोरंजक गोष्ट म्हणजे, जगव्याप्त जलप्रलयाचा उल्लेख करणारा प्राचीन अहवाल संपूर्ण जगभरात पाहावयास मिळू शकतो. अमेरिकेच्या स्थानिक संस्कृतींमध्ये तसेच ऑस्ट्रेलियाच्या आदिवासी लोकांमध्ये देखील या अहवालाविषयीच्या गोष्टी आहेत. इत्थंभूत अहवालांमध्ये कदाचित वैविध्य असेल तरी संपूर्ण पृथ्वी पाण्याने व्यापलेली होती आणि मानव-निर्मित गलबताद्वारे काही लोक या जलप्रलयातून बचावले होते, हा विचार बहुतेक अहवालांत आढळतो. सर्वज्ञात असणारी ही घटना जगव्याप्त जलप्रलय होऊन गेला, या बायबलमधील वास्तविकतेस आणखी पुष्टी देते.—उत्पत्ति ७:११-२०.