वाचकांचे प्रश्न
ख्रिश्चनाने मानसिक-आरोग्य तज्ज्ञाचा सल्ला घेणे सुज्ञतेचे होईल का?
या ‘शेवटल्या काळात’ भावनात्मक आणि मानसिक आजारांत वाढ झाल्याचे काही देशांचे अहवाल दाखवतात. (२ तीमथ्य ३:१) सहविश्वासू जणांवर याचा परिणाम होतो तेव्हा ख्रिश्चनांना त्यांच्याबद्दल गाढ दया वाटते, परंतु ते या गोष्टीस ओळखून आहेत, की स्वतःच्या आजारावर उपचार करावा किंवा कसे आणि उपचार करावयाचा असल्यास तो कोणत्या प्रकारचा करावा, याचा निर्णय प्रत्येकाने व्यक्तीशः घेतला पाहिजे.a “प्रत्येकाने आपला स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे.” (गलतीकर ६:५) छिन्नमानसी, द्विध्रुवी विकृती, सखोल निदानीय निराशा, भावातिरेकी-सक्तियुक्त विकृती, स्वयं-अंगच्छेदन आणि इतर यातनामय विकृत्यांनी अगदी कष्टी असणाऱ्या काही जणांना योग्य व्यावसायिक मदत प्राप्त झाल्यामुळे अधिक सामान्य जीवन व्यतीत करण्यास शक्य झाले आहे.
काही ठिकांणी उपचार करणे पुष्कळ प्रचलित आहे. अनेक बाबतींत रुग्णामध्ये गंभीर मानसिक विकृती नसते परंतु जीवनातील काही परिस्थितींशी तोंड देण्यास त्याला अवघड जात असते. तथापि, जीवनातील कठीण समस्या हाताळण्यासाठी बायबलच आपल्याला अगदी परिणामकारक मदत पुरवते. (स्तोत्र ११९:२८, १४७) यहोवा आपल्याला बायबलद्वारे मानसिक आणि भावनात्मकरीत्या बळकट करणाऱ्या गोष्टी—बुद्धी, वैचारिक क्षमता आणि खरे ज्ञान पुरवतो. (नीतिसूत्रे २:१-११; इब्री लोकांस १३:६) गंभीर आंतरिक संभ्रमामुळे देवाचे विश्वासू सेवक असमंजसपणे स्वतःस व्यक्त करू शकतात. (ईयोब ६:२, ३) याकोब ५:१३-१६ या शास्त्रवचनांमध्ये अशा जणांना मदत आणि सल्ल्यासाठी वडिलांना बोलवण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे. कदाचित एखादा ख्रिस्ती आध्यात्मिकरीत्या आजारी असेल किंवा तो अपरिवर्तनीय परिस्थितीमुळे किंवा जबरदस्तीच्या दबावामुळे दुःखी झाला असेल अथवा आपल्यावर अन्याय होत असल्याचे त्याला कदाचित वाटत असेल. (उपदेशक ७:७; यशया ३२:२; २ करिंथकर १२:७-१०) अशा प्रकारचा मनुष्य वडिलांची मदत प्राप्त करू शकतो जे ‘त्याला तेल’ लावतील—म्हणजे कौशल्याने बायबलचा सांत्वनदायक सल्ला देतील—आणि “त्याच्यावर ओणवून प्रार्थना” सुद्धा करतील. याचा परिणाम? “विश्वासाची प्रार्थना दुःखणाइतास वाचवील आणि प्रभु त्याला [निराशेमधून किंवा देवाने आपल्याला त्यागले आहे या त्याच्या भावनेपासून] उठवील.”
तथापि, आध्यात्मिक मेंढपाळांनी कौशल्यपूर्ण मदत दिली असतानाही मानसिक त्रास आणि संभ्रम कायम राहिल्यास काय? काही लोकांनी अशा परिस्थितीत संपूर्ण शारीरिक चाचणी करण्याचे निवडले आहे. (पडताळा नीतिसूत्रे १४:३०; १६:२४; १ करिंथकर १२:२६.) भावनात्मक किंवा मानसिक निराशेच्या मागे शारीरिक समस्या असू शकते. काही बाबतींत अशा प्रकारच्या समस्येवर उपचार केल्याने भावनात्मकरीत्या आजारी असलेल्या मनुष्याला आराम मिळाला आहे.b कोणत्याही प्रकारची शारीरिक समस्या निदर्शनास न आल्यास विनंती केल्यानंतर मानसोपचारतज्ज्ञ कदाचित मानसिक-आरोग्य व्यावसायिकाकडे जाण्याचा सल्ला देईल. असे असल्यास काय? आधी उल्लेख केल्यानुसार, हा निर्णय व्यक्तीशः घ्यावयाचा आहे. इतरांनी टीका करू नये किंवा दोष लावू नये.—रोमकर १४:४.
तथापि, व्यवहार्य बुद्धीचा अवलंब करण्यास हवा आणि बायबलच्या तत्त्वांचे विस्मरण होणार नाही याची काळजी घेण्यास हवी. (नीतिसूत्रे ३:२१; उपदेशक १२:१३) शारीरिक आजारपणाच्या बाबतीत रुग्णांच्या पुढे नानाविध उपचारांच्या निवडी असतात ज्यांमध्ये रूढीबद्ध औषधापासून विविध उचारपद्धती असतात जसे, की निसर्गोपचार, सूचिचिकित्सा आणि समचिकित्सा. विभिन्न प्रकारचे अनेक विश्लेषणीय मानसोपचारतज्ज्ञ देखील आहेत. त्यांमध्ये मानसोपचारतज्ज्ञ आणि इतरही आहेत जे अपसामान्य वर्तन किंवा वेदनादायक भावनांचे कारण शोधण्यासाठी कदाचित रुग्णाच्या व्यक्तिगत इतिहासाचे संशोधन करतील. वर्तन मानसोपचारतज्ज्ञ कदाचित रुग्णास नवीन वर्तनाचे सिद्धान्त शिकण्यासाठी मदत करील. बहुतेक मानसिक आजार औषधांचा वापर करून बरे केले जावेत, असे काही मानसिक-आरोग्य तज्ज्ञांना वाटते.c अहवालानुसार, इतर जण विशिष्ट आहार आणि जीवनसत्त्वांचा सल्ला देतात.
अशा पर्यायी मार्गांचा विचार करतेवळी रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. (नीतिसूत्रे १४:१५) महत्त्वाची गोष्ट ही आहे, की जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन येथील मनोदोषचिकित्सा आणि वर्तनोपचार विभागाचे संचालक प्राध्यापक पॉल मॅकह्यू यांनी म्हटले, की मानसिक-आरोग्य व्यवसाय “ही प्राथमिक वैद्यकीय कला आहे. जरी याचा संबंध मानवी जीवनातील अतिशय कठीण पैलू—मन आणि वर्तन यांजशी असला तरी त्यांत त्याच्या प्रस्तावांच्या पुराव्यात सहजतेची कमी आहे.” या परिस्थितीमुळे विक्षिप्तपणा आणि लबाडीस संधी प्राप्त होते, त्याचप्रमाणे योग्य उद्देशाने केलेल्या उपचारांचा चांगला परिणाम होण्याऐवजी अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
या गोष्टीचा उल्लेख करणे देखील आवश्यक आहे, की मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ यांकडे व्यावसायिक, अधिस्नातक पदवी असते परंतु इतरांकडे अशा प्रकारची कोणतीही व्यावसायिक योग्यता नसते तरी देखील ते देखरेखीविना सल्लागार किंवा उपचारतज्ज्ञ म्हणून वैद्यकी करतात. काही लोकांनी अशा योग्यता नसलेल्या लोकांकडे सल्ला घेण्यासाठी पुष्कळ पैसे खर्च केले आहेत.
प्रशिक्षित, योग्यताप्राप्त मानसिक-आरोग्य व्यावसायिकाच्या बाबतीत सुद्धा विचारात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत. वैद्यकीय डॉक्टर किंवा सर्जन निवडतेवेळी तो बायबलवर आधारित असलेल्या आपल्या दृष्टिकोनांचा आदर करील, याची आपण खात्री करून घेण्यास हवी. त्याचप्रमाणे आपल्या धार्मिक आणि नैतिक दृष्टिकोनांचा आदर न करणाऱ्या मानसिक-आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घेणे धोक्याचे होईल. मानसिक आणि भावनात्मक संभ्रम असताना देखील अनेक ख्रिस्ती ‘ख्रिस्त येशूप्रमाणे एकचित्त होण्याकरिता’ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. (रोमकर १५:५) असे ख्रिस्ती स्वतःच्या विचारसरणीवर किंवा वर्तनावर परिणाम होईल अशा कोणत्याही व्यक्तीच्या मनोवृत्तींबद्दल यथायोग्यपणे विचार करतात. शास्त्रवचनावरील विश्वासामुळे येणारे निर्बंध अनावश्यक आहेत आणि त्यामुळे मानसिक आरोग्यास हानी पोहंचू शकते, असा दृष्टिकोन काही चिकित्सक बाळगतात. समलैंगिकता किंवा वैवाहिक विश्वासघात यांसारख्या गोष्टी बायबलमध्ये निषेधार्ह आहेत आणि नेमक्या त्या गोष्टी आचरण्यास अशा प्रकारचे चिकित्सक अनुमती देतील किंबहुना तसे करण्याचा सल्ला देखील देतील.
या कल्पनांचा अशा गोष्टींत समावेश होतो ज्यास “चुकीने ‘ज्ञान’ म्हटलेल्याच्या विरुद्ध पौलाने प्रतिपादन” केले. (१ तीमथ्य ६:२०, NW) या कल्पना ख्रिस्ताविषयीच्या सत्याच्या विरोधात प्रतिपादन करतात आणि या जगाचे “तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा” यांच्या भाग आहेत. (कलस्सैकर २:८) बायबलचे प्रमाण स्पष्ट आहे: “परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धि व युक्ति ही मुळीच चालत नाहीत.” (नीतिसूत्रे २१:३०) “वाईटाला बरे व बऱ्याला वाईट” म्हणणारे मानसिक-आरोग्य चिकित्सक एक प्रकारची ‘कुसंगतीच’ आहे. अस्थिर मनांस बरे करण्यास मदत करण्याऐवजी ते ‘नीती बिघडवितात.’—यशया ५:२०; १ करिंथकर १५:३३.
यास्तव, मानसिक-आरोग्य व्यावसायिकाचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे ज्या ख्रिश्चनास वाटते त्याने संबंधित चिकित्सकाची योग्यता, मनोवृत्ती आणि त्याची ख्याती व सुचविलेल्या उपचारपद्धतीचे संभाव्य परिणाम या सर्व बाबींची योग्य पाहणी करून घ्यावी. पीडाग्रस्त ख्रिश्चनास असे करणे शक्य नसल्यास कदाचित एखादी प्रौढ व्यक्ती, निकट मित्र किंवा नातेवाईक त्याला मदत करू शकतील. एखादा ख्रिस्ती विशिष्ट उपचारपद्धतीच्या सुज्ञतेसंबंधी अनिश्चित असल्यास मंडळीच्या वडिलांशी याविषयी बोलणे त्याला मदतदायक असल्याचे दिसून येईल—तथापि, अंतिम निर्णय त्याचा स्वतःचा आहे (किंवा त्याच्या पालकांचा अथवा पती आणि पत्नी यांचा मिळून घेतलेला निर्णय असेल).d
मागील काळाची तुलना करता पीडा क्षमविण्यासाठी आज विज्ञान पुष्कळ काही करू शकते. तरी देखील असे अनेक रोग आहेत—शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे—जे वर्तमान काळात बरे होऊ शकत नाहीत. या व्यवस्थीकरणामध्ये आपल्याला ते सहन करणे भाग आहे. (याकोब ५:११) या दरम्यान ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास,’ वडील तसेच मंडळीतील इतर सर्वजण आजारी असणाऱ्यांना सहानुभूतीचा आणि आधाराचा हात देतात. तसेच, जेव्हा कोणत्याही प्रकारचा आजार नसेल त्या वैभवी काळापर्यंत ही पीडा सहन करण्यासाठी स्वतः यहोवा त्यांना शक्ती पुरवतो.—मत्तय २४:४५; स्तोत्र ४१:१-३; यशया ३३:२४.
[तळटीपा]
a उच्च पदाच्या नोकरीचा विचार करण्यात येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीला कदाचित मनोविकार मूल्यमापन करण्याचे सांगण्यात येईल. अशा प्रकारचे मूल्यमापन करावे अथवा करू नये हा एक व्यक्तिगत निर्णय आहे, परंतु मनोविकार मूल्यमापन म्हणजे मनोविकार उपचार नाही या गोष्टीची नोंद घ्यावी.
b टेहळणी बुरूज (इंग्रजी) मार्च १, १९९० या अंकातील “विषण्णतेच्या विरोधात असणाऱ्या संघर्षात जय मिळविणे,” हा लेख पाहा.
c काही मानसिक आजारांवर योग्य औषधांचा चांगला परिणाम होत असल्याचे दिसते. परंतु अशा प्रकारच्या औषधांचा वापर निष्णात आणि अनुभवी वैद्यकीय चिकित्सक किंवा मानसोपचारतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या सावधगिरीने करण्यास हवा कारण औषधांच्या डोसच्या प्रमाणांत योग्य प्रकारचा बदल न केल्यास त्याचे गंभीर अनिष्ट परिणाम होऊ शकतात.
d टेहळणी बुरूज (इंग्रजी) ऑक्टोबर १५, १९८८ या अंकातील “मानसिक निराशा—याचा ख्रिश्चनावर परिणाम होतो तेव्हा” हा लेख पाहा.