वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ९/१ पृ. १४-१९
  • ख्रिस्ताचा नियम

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ख्रिस्ताचा नियम
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • नवा करार
  • स्वातंत्र्याचा नियम
  • येशू व परुशी
  • ख्रिस्ताचा नियम अनावश्‍यक मोकळीक देणारा आहे का?
  • ख्रिस्ती धर्मजगत ख्रिस्ताच्या नियमास विटाळते
  • ख्रिस्ती धर्मजगताच्या घोडचुकांतून धडा घेणे
  • ख्रिस्ताच्या पूर्वीचे नियमशास्त्र
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • मोशेच्या नियमशास्त्राचा तुमच्याकरता असलेला अर्थ
    उपासनेतील ऐक्य
  • आपण दहा आज्ञांच्या अधीन आहोत का?
    तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ९/१ पृ. १४-१९

ख्रिस्ताचा नियम

‘मी ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन आहे.’—१ करिंथकर ९:२१.

१, २. (अ) मानवजातीच्या अनेक घोडचुका कशाप्रकारे टाळता येऊ शकत होत्या? (ब) ख्रिस्ती धर्मजगत हे यहुदी धर्माच्या इतिहासातून कोणता धडा घेण्यात अपयशी ठरले?

“लोक व सरकारांनी इतिहासातून कोणताही धडा घेतला नाही किंवा त्याकरवी प्रमाणित झालेल्या तत्त्वांवर कधी अंमलबजावणीही केलेली नाही.” हे होते १९ व्या शतकातील एका जर्मन तत्त्वज्ञान्याचे उद्‌गार. खरोखर, मानवी इतिहासाच्या मार्गक्रमणाचे वर्णन, “अज्ञानीपणाची वाटचाल” या शब्दांत करण्यात आले आहे; दुसऱ्‍या शब्दांत ती घोडचुका व संकटांची एक भयावह श्रृंखला होती; व मानवजात गतकाळातील चुकांतून धडा घेण्यास तयार असती तर यातील अनेक घोडचुका व संकटे टाळता आली असती.

२ गतकाळातील चुकांतून धडा न घेण्याचा तोच प्रकार ईश्‍वरी नियमशास्त्राच्या या चर्चेतही दिसून येतो. यहोवा देवाने मोशेच्या नियमशास्त्राच्या जागी एक आणखी चांगला नियम आणला—ख्रिस्ताचा नियम. तथापि, या नियमाचे शिक्षण देण्याचा व यानुसार जगण्याचा दावा करणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगताच्या पुढाऱ्‍यांनी परुशांच्या भयंकर अज्ञानातून धडा घेतला नाही. यामुळे, यहुदी धर्माने मोशेच्या नियमशास्त्राचा गैरवापर केला त्याच प्रकारे, ख्रिस्ती धर्मजगतानेही ख्रिस्ताच्या नियमाचा विपर्यास करून त्याचा गैरवापर केला आहे. कशाप्रकारे? सुरवातीला आपण या नियमावरच अर्थात तो काय आहे, त्याचे कोणावर व कशाप्रकारे नियंत्रण आहे शिवाय तो मोशेच्या नियमशास्त्रापासून कोणत्या बाबतीत वेगळा आहे यावर चर्चा करू. यानंतर आपण, ख्रिस्ती धर्मजगताने त्याचा कशाप्रकारे विपर्यास केला आहे याचे परीक्षण करू. अशाप्रकारे आपण इतिहासातून धडा घेऊन त्याद्वारे लाभ प्राप्त करू!

नवा करार

३. यहोवाने नव्या करारासंबंधाने कोणते अभिवचन दिले?

३ एका परिपूर्ण नियमशास्त्रात यहोवा देवाशिवाय आणखी कोण सुधारणा करू शकत होता? मोशेच्या नियमशास्त्राचा करार परिपूर्ण होता. (स्तोत्र १९:७) असे असूनही यहोवाने अभिवचन दिले: ‘पाहा! असे दिवस येत आहेत की त्यांत इस्राएलाचे घराणे व यहूदाचे घराणे यांच्याबरोबर मी नवा करार करीन; मी त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेल्या तेव्हाच्या कराराप्रमाणे हा करार व्हावयाचा नाही.’ मोशेच्या नियमशास्त्राच्या केंद्रभागी असणाऱ्‍या दहा आज्ञा, दगडी पाट्यांवर लिहिण्यात आल्या होत्या. परंतु, नव्या कराराविषयी यहोवाने म्हटले: “मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन; मी ते त्यांच्या हृदयपटलावर लिहीन.”—यिर्मया ३१:३१-३४.

४. (अ) नव्या करारात कोणते इस्राएल सामावलेले आहे? (ब) आध्यात्मिक इस्राएली लोकांशिवाय आणखी कोण ख्रिस्ताच्या नियमाच्या अधीन आहेत?

४ या नव्या करारात कोणास सामावण्यात येणार होते? या कराराच्या मध्यस्थाचा अव्हेर करणाऱ्‍या शाब्दिक ‘इस्राएल घराण्यास’ निश्‍चितच नाही. (इब्री लोकांस ९:१५) उलटपक्षी, हे नवे “इस्राएल” ‘देवाचे इस्राएल,’ अर्थात आध्यात्मिक इस्राएलांचे राष्ट्र ठरणार होते. (गलतीकर ६:१६; रोमकर २:२८, २९) आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या ख्रिश्‍चनांच्या या लहानशा गटात कालांतराने सर्व राष्ट्रांतून, यहोवाची उपासना करण्याची इच्छा धरील असा “एक मोठा लोकसमुदाय” येऊन मिळणार होता. (प्रकटीकरण ७:९, १०; जखऱ्‍या ८:२३) यातील सदस्यांचा नव्या करारात प्रत्यक्ष सहभाग नसला तरीसुद्धा नियमाचे बंधन त्यांच्यावरही असणार होते. (पडताळा लेवीय २४:२२; गणना १५:१५.) ‘एका मेंढपाळाच्या’ देखरेखीखाली “एक कळप” या नात्याने ते सर्व पौलाने लिहिल्याप्रमाणे ‘ख्रिस्ताच्या नियमाच्या’ अधीन होणार होते. (योहान १०:१६; १ करिंथकर ९:२१) पौलाने हा नवा करार ‘अधिक चांगला’ आहे असे म्हटले. असे का? एक कारण म्हणजे, तो भावी गोष्टींच्या पडछायेवर नव्हे तर पूर्ण झालेल्या अभिवचनांवर आधारलेला आहे.—इब्री लोकांस ८:६; ९:११-१४.

५. नव्या कराराचा उद्देश काय आहे व तो कोणकोणत्या कारणांमुळे यशस्वी होईल?

५ या कराराचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश म्हणजे सर्व मानवजातीस आशीर्वादित करण्यासाठी राजे व याजकांनी बनलेले एक राष्ट्र उत्पन्‍न करणे होय. (निर्गम १९:६; १ पेत्र २:९; प्रकटीकरण ५:१०) मोशेच्या नियमशास्त्राच्या कराराने हे राष्ट्र पूर्णार्थाने उत्पन्‍न केलेच नाही कारण इस्राएलाने, राष्ट्र या नात्याने बंड केले व ते आपली सुसंधी गमावून बसले. (पडताळा रोमकर ११:१७-२१.) तथापि, नवा करार यशस्वी होईल हे निश्‍चित आहे कारण तो एका अगदी वेगळ्या प्रकारच्या नियमाशी संबंधित आहे. कोणकोणत्या प्रकारे वेगळा?

स्वातंत्र्याचा नियम

६, ७. ख्रिस्ताचा नियम मोशेच्या नियमशास्त्राने दिले होते त्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य कशाप्रकारे देऊ करतो?

६ ख्रिस्ताच्या नियमाचा वारंवार स्वातंत्र्यासोबत संबंध जोडण्यात आला आहे. (योहान ८:३१, ३२) त्याचा उल्लेख ‘स्वतंत्र लोकांचा नियम’ व ‘स्वातंत्र्याचा परिपूर्ण नियम’ या शब्दांत करण्यात आला आहे. (याकोब १:२५; २:१२, NW) अर्थात, मनुष्यांसंबंधी कोणतेही स्वातंत्र्य हे सापेक्ष आहे. तरीसुद्धा, हा नियम आपल्या पूर्वीच्या अर्थात मोशेच्या नियमशास्त्रापेक्षा अधिक स्वातंत्र्य देऊ करतो. कशाप्रकारे?

७ एकतर, कोणीही ख्रिस्ताच्या नियमाधीन जन्मास येत नाही. जात किंवा जन्माचे ठिकाण यांसारख्या बाबींचा त्याच्याशी काहीच संबंध नाही. खरे ख्रिश्‍चन या नियमाचे पालन करण्याचे जू आपल्या अंतःकरणांपासून स्वेच्छेने स्वीकारतात. असे केल्यामुळे त्यांना हे जू सोयीचे अर्थात एक हलके ओझे असल्याचे भासते. (मत्तय ११:२८-३०) शेवटी, मोशेच्या नियमशास्त्राची रचना ही मानवास, तो पापी आहे व त्यास मुक्‍तीसाठी खंडणी यज्ञार्पणाची आत्यंतिक गरज आहे हे शिकवण्यासाठी देखील करण्यात आली होती. (गलतीकर ३:१९) ख्रिस्ताचा नियम, मशीहा आला असून त्याने त्याचे जीवन देऊन खंडणीची किंमत दिली व पाप आणि मृत्यूच्या भयंकर जुलुमापासून मुक्‍त होण्याची वाट आपल्यासाठी मोकळी केली आहे अशी शिकवण देतो! (रोमकर ५:२०, २१) स्वतःसाठी लाभ करून घ्यायचा असल्यास आपण त्या यज्ञार्पणावर ‘विश्‍वास ठेवण्यास’ हवा.—योहान ३:१६.

८. ख्रिस्ताच्या नियमात काय अंतर्भूत आहे, परंतु त्यानुसार चालण्याचा अर्थ, शेकडो कायदेविषयक नियम तोंडपाठ करणे असा का होत नाही?

८ ‘विश्‍वास ठेवणे’ यात ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालणे अंतर्भूत आहे. म्हणजेच यात ख्रिस्ताच्या सर्व आज्ञांचे पालन करणे समाविष्ट आहे. शेकडो नियम व कायदे तोंडपाठ करणे असा याचा अर्थ होतो का? नाही. मोशेने, अर्थात जुन्या कराराच्या मध्यस्थाने मोशेचे नियमशास्त्र लिहिलेले असले तरीसुद्धा, नव्या कराराचा मध्यस्थ येशू ख्रिस्त याने अक्षरशः एकही नियम कधी लिहिला नाही. उलटपक्षी, तो या नियमाप्रमाणे जगला. त्याच्या परिपूर्ण जीवनक्रमाच्या माध्यमातून त्याने सर्वांना अनुसरण्यासाठी एक नमुना घालून दिला. (१ पेत्र २:२१) कदाचित, याच कारणामुळे आरंभीच्या ख्रिश्‍चनांच्या उपासनेस “तो मार्ग” असे म्हणण्यात आले होते. (प्रेषितांची कृत्ये ९:२; १९:९, २३; २२:४; २४:२२) त्यांच्यासाठी ख्रिस्ताचे जीवन हेच ख्रिस्ताच्या नियमाचे जिवंत उदाहरण होते. येशूचे अनुकरण करणे म्हणजेच या नियमाचे पालन करण्यासारखे होते. त्याच्याविषयी एकनिष्ठ प्रीती असण्याचा अर्थ असा होता की हा नियम खरोखरच त्यांच्या हृदयपटलांवर लिहिलेला होता. (यिर्मया ३१:३३; १ पेत्र ४:८) शिवाय, जो प्रीतीने प्रेरित होऊन आज्ञाधारक राहतो त्याला आपल्यावर जुलूम होत आहे असे कधीही वाटत नाही—हे, ख्रिस्ताच्या नियमास ‘स्वतंत्र लोकांचा नियम’ म्हणता येऊ शकण्याचे आणखी एक कारण आहे.

९. ख्रिस्ताच्या नियमाचे मूलतत्त्व काय आहे, व या नियमात एक नवी आज्ञा कोणत्या अर्थाने समाविष्ट केलेली आहे?

९ प्रीती हा गुण मोशेच्या नियमशास्त्रात महत्त्वपूर्ण होता पण तो ख्रिस्ती नियमाचे तर मूलतत्त्व आहे. यामुळे ख्रिस्ताच्या नियमात एक नवी आज्ञा समाविष्ट आहे—ख्रिश्‍चनांना एकमेकांबद्दल स्वार्थत्यागी प्रीती बाळगावयाची आहे. येशूने केली त्याप्रमाणे त्यांना प्रीती करावयाची आहे; त्याने आपल्या मित्रांखातर स्वेच्छेने आपले जीवन बहाल केले. (योहान १३:३४, ३५; १५:१३) तर मग, मोशेच्या नियमशास्त्राच्या तुलनेत ख्रिस्ताचा नियम हा ईश्‍वरी शासन पद्धतीला अधिक उदात्तपणे अभिव्यक्‍त करणारा होता असे म्हणता येऊ शकेल. या नियतकालिकाने पूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे “ईश्‍वरी शासन पद्धत म्हणजे देवाचे शासन; देव प्रीती आहे; म्हणून ईश्‍वरी शासन पद्धत म्हणजे प्रीतीचे शासन होय.”

येशू व परुशी

१०. येशूची शिकवण ही परुशांच्या शिकवणीपेक्षा कशाप्रकारे वेगळी होती?

१० यास्तव, येशू व त्याच्या काळातील यहुदी धार्मिक पुढाऱ्‍यांत मतभेद झाला यात काहीच नवल नाही. शास्त्री व परुशांच्या मनाला ‘स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचा’ विचार शिवला देखील नव्हता. त्यांनी मानवनिर्मित नियमांनी लोकांवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला. त्यांची शिकवण ही जुलमी, टीकात्मक व नकारात्मक बनली. याच्या अगदी विरोधात, येशूची शिकवण ही अत्यंत उभारणीकारक व सकारात्मक होती! तो व्यवहार्य मतांचा होता व त्याने लोकांच्या खऱ्‍या गरजा व विवंचनांकडे लक्ष पुरवले. त्याने सरळसोप्या पद्धतीने व निष्कपट भावनांनी शिकवले; शिवाय, शिकवत असताना त्याने दररोजच्या जीवनातील दाखले उपयोगात आणले व देवाच्या वचनाचा आधार घेतला. यामुळेच, “लोकसमुदाय त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले.” (मत्तय ७:२८) होय, येशूचे शिक्षण त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहंचले!

११. मोशेच्या नियमशास्त्राचा अवलंब सामंजस्याने व दयेने करण्यास हवा होता हे येशूने कशाप्रकारे दाखवले?

११ मोशेच्या नियमशास्त्रात आणखी नियमांची भर घालण्याऐवजी, यहुद्यांनी आधीपासून नियमशास्त्राचा कशाप्रकारे सामंजस्याने व दयेने अवलंब करण्यास हवा होता हे येशूने दाखवून दिले. उदाहरणार्थ, रक्‍तस्रावाने पीडित असलेली स्त्री त्याच्याजवळ आली तेव्हाचा प्रसंग आठवा. मोशेच्या नियमशास्त्रानुसार ती ज्या कोणाला शिवेल तो अशुद्ध होणार होता, यामुळे तिने लोकांच्या गर्दीत निश्‍चितच मिसळायचे नव्हते! (लेवीय १५:२५-२७) तथापि, ती बरी होण्यास एवढी अधीर झाली होती की तिने गर्दीतून कशीबशी वाट केली व ती येशूच्या कपड्याला शिवली. रक्‍तस्राव तत्क्षणी थांबला. नियमशास्त्राचे उल्लंघन केल्याबद्दल त्याने तिला फटकारले का? नाही; उलट, त्याने तिची दयनीय स्थिती समजून घेतली व प्रीती हे नियमशास्त्राचे सर्वश्रेष्ठ तत्त्व कृतीत आणले. त्याने सहानुभूतीने तिला सांगितले: “मुली, तुझ्या विश्‍वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्‍त हो.”—मार्क ५:२५-३४.

ख्रिस्ताचा नियम अनावश्‍यक मोकळीक देणारा आहे का?

१२. (अ) ख्रिस्त मोकळीक देतो असे आपण का गृहीत धरू नये? (ब) अनेक नियम निर्माण केल्यामुळे अनेक पळवाटा निर्माण करण्यास चालना मिळते हे कशावरून दिसून येते?

१२ तर मग, ख्रिस्ताचा नियम ‘स्वतंत्रतेचा नियम’ असल्यामुळे तो अनावश्‍यक मोकळीक देणारा आहे पण दुसरीकडे पाहता, परुशी त्यांच्या असंख्य मौखिक परंपरांच्या माध्यमाने लोकांच्या आचरणास निदान कडक मर्यादेत तरी ठेवत होते, असा निष्कर्ष आपण काढावा का? नाही. आजच्या काळातील न्यायव्यवस्थांवरून स्पष्ट होते की सहसा जितके अधिक नियम असतात, त्यांतून लोक तितक्याच अधिक पळवाटा शोधून काढतात.a येशूच्या काळात परुशांचे अत्याधिक नियम असल्यामुळे पळवाटा शोधण्यास, प्रीतीविरहीत वरकरणी कृत्ये करण्यास व आंतरिक भ्रष्टपणावर पांघरूण घालण्यासाठी फाजील धार्मिक बाह्‍य स्वरूप निर्माण करण्यास चालना मिळाली.—मत्तय २३:२३, २४.

१३. ख्रिस्ताच्या नियम कोणत्याही लिखित कायदेसंहितेपेक्षा, आचरणाचा अधिक उच्च दर्जा का उत्पन्‍न करतो?

१३ याविरुद्ध, ख्रिस्ताचा नियम अशाप्रकारच्या मनोवृत्ती जोपासत नाही. खरे पाहता, एका औपचारिक कायदेसंहितेचे पालन केल्याने परिणीत होणाऱ्‍या आचरणापेक्षा, जे यहोवाच्या प्रीतीवर आधारित आहे व ज्याचे पालन इतरांविषयी ख्रिस्ताच्या स्वार्थत्यागी प्रीतीचे अनुकरण करण्याद्वारे करता येते अशा नियमास अधीन झाल्यामुळे आचरणाचा कितीतरी अधिक उच्च दर्जा परिणीत होतो. प्रीती ही पळवाटा शोधत नाही; ती तर कायदेसंहितेत स्पष्टपणे निषिद्ध केलेली नाहीत अशी अपायकारक कृत्ये करण्यापासूनही आपल्याला मागे खेचते. (मत्तय ५:२७, २८ पाहा.) त्याअर्थी, ख्रिस्ताचा नियम आपल्याला दुसऱ्‍यांना उपयोगी पडण्यास व कोणताही औपचारिक नियम आपल्याला करावयास लावणार नाही अशा मार्गांनी औदार्य, पाहुणचार व प्रीती दाखवण्यास प्रवृत्त करील.—प्रेषितांची कृत्ये २०:३५; २ करिंथकर ९:७; इब्री लोकांस १३:१६.

१४. ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालल्यामुळे पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीत कोणता परिणाम घडून आला?

१४ आरंभीच्या ख्रिस्ती मंडळीतील सदस्य जेवढ्या प्रमाणात ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालले, तेवढ्या प्रमाणात मंडळीला एक मैत्रिपूर्ण, प्रेमळ वातावरण लाभले जे तुलनात्मकपणे त्या काळातील सभास्थानांत अतिशय रूढ असलेल्या कडक, टीकात्मक व ढोंगी मनोवृत्तींपासून मुक्‍त होते. या नवख्या मंडळींना आपण ‘स्वतंत्र लोकांच्या नियमाने’ चालत आहोत याची निश्‍चितच जाणीव झाली असावी!

१५. ख्रिस्ती मंडळीला भ्रष्ट करण्याचे सैतानाचे काही आरंभीचे प्रयत्न कोणते होते?

१५ तथापि, सैतानाने इस्राएल राष्ट्रास भ्रष्ट केले होते त्याचप्रमाणे तो ख्रिस्ती मंडळीला देखील आतून भ्रष्ट करण्यास उत्सुक होता. प्रेषित पौलाने देवाच्या कळपावर दयामाया न करता “विपरीत गोष्टी बोलतील” अशा लांडग्यासारख्या माणसांबद्दल ताकीद दिली होती. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) त्यास, ख्रिस्ताच्या नियमातील सापेक्ष स्वातंत्र्याच्या ऐवजी ख्रिस्तामध्ये पूर्ण झालेल्या मोशेच्या नियमशास्त्राची गुलामगिरी देणाऱ्‍या यहुदी मत समर्थकांना देखील तोंड द्यावे लागले. (मत्तय ५:१७; प्रेषितांची कृत्ये १५:१; रोमकर १०:४) शेवटच्या प्रेषिताच्या मृत्यूनंतर अशाप्रकारच्या धर्मत्यागावर कोणताच प्रतिबंध उरला नाही. यामुळे नीतिभ्रष्टता बोकाळली.—२ थेस्सलनीकाकर २:६, ७.

ख्रिस्ती धर्मजगत ख्रिस्ताच्या नियमास विटाळते

१६, १७. (अ) ख्रिस्ती धर्मजगतात कोणकोणत्या प्रकारे नीतिभ्रष्टता घडून आली? (ब) कॅथोलिक चर्चच्या नियमांनी लैंगिक संबंधांविषयी कशाप्रकारे एका विपर्यस्त दृष्टिकोनास जन्म दिला?

१६ यहुदी धर्माप्रमाणे, ख्रिस्ती धर्मजगतातही नीतिभ्रष्टता बहुविध प्रकारांनी घडून आली. हे सुद्धा खोट्या सिद्धान्तांना व शिथिल नैतिकतेला बळी पडले. तसेच, बाहेरच्या प्रभावांपासून त्याच्या कळपाचे रक्षण करण्याचे प्रयत्न सहसा शुद्ध उपासनेमध्ये जे काही उरले होते त्यासही झिजवणारे ठरले. कडक व अशास्त्रवचनीय नियमांना उधाण आले.

१७ कॅथलिक चर्च हे चर्चच्या नियमांचे अफाट संचय निर्माण करण्यात सर्वात अग्रेसर राहिले आहे. हे नियम लैंगिक संबंधांच्या बाबतीत विशेषतः विपर्यस्त होते. लैंगिकता व कॅथलिक धर्म (इंग्रजी) या पुस्तकानुसार, चर्चने स्टोइक पंथाचे ग्रीक तत्त्वज्ञान आत्मसात केले जे सर्व प्रकारच्या सुखाबद्दल संशयवादी होते. चर्च असे शिकवू लागले की सामान्य वैवाहिक संबंधांसहित सर्व लैंगिक सुख हे पापमय आहे. (नीतिसूत्रे ५:१८, १९ यातील फरक पडताळा.) लैंगिक संबंध प्रजननाकरता असून इतर कोणत्याही उद्देशासाठी नाहीत असा दावा करण्यात येत असे. यामुळे चर्चच्या नियमाने कोणत्याही प्रकारच्या गर्भनिरोधनास एक गंभीर पाप म्हणून धिक्कारले, काहीवेळा तर यासाठी अनेक वर्षे प्रायश्‍चित्त करावे लागे. शिवाय, पाळकवर्गापैकी असलेल्यांना विवाह करण्याची मनाई होती; ही एक अशी आज्ञा आहे जिने लहान मुलांसोबत लैंगिक दुर्व्यवहारासहित प्रचंड प्रमाणात इतर अवैध लैंगिक कृत्यांना जन्म दिला.—१ तीमथ्य ४:१-३.

१८. चर्चच्या नियमांची संख्या वाढत गेल्यामुळे काय घडले?

१८ चर्चच्या नियमांची संख्या वाढत गेली तसतसे हे नियम ग्रंथांमध्ये संग्रहित करण्यात आले. ते बायबलला अस्पष्ट करून त्याहूनही वरचढ होऊ लागले. (पडताळा मत्तय १५:३, ९.) यहुदी धर्माप्रमाणे, कॅथोलिक धर्मानेदेखील सांसारिक साहित्याबद्दल अविश्‍वास दाखवला व त्यातील बरेचसे धोकेदायक असल्याची त्यांची समजूत होती. हा दृष्टिकोन लवकरच सदर विषयावर बायबलने दिलेल्या सुज्ञ इशाऱ्‍याच्याही पलीकडे गेला. (उपदेशक १२:१२; कलस्सैकर २:८) जेरोम नामक एका चर्च लेखकाने सा. यु. चौथ्या शतकात असे उद्‌गार काढले: “हे प्रभू, मी यापुढे कधीही सांसारिक पुस्तके बाळगली किंवा वाचली तर मी तुला धिक्कारले असा त्याचा अर्थ होईल.” काही काळानंतर, चर्चने पुस्तकांचे आचारनियंत्रण करण्याचेही सुरू केले, यांत धर्मातीत विषयांची पुस्तकेदेखील समाविष्ट होती. यामुळेच, १७ व्या शतकातील खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ याची, पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते असे लिहिण्याबद्दल निर्भर्त्सना करण्यात आली. कल्पना करता येईल अशा प्रत्येक बाबीविषयी मग ती बाब खगोलशास्त्रासंबंधी असली तरीसुद्धा, सर्व बाबतीत चर्चलाच निर्णायक अधिकार आहे हा चर्चचा आग्रह, कालांतराने बायबलवरील विश्‍वासाला क्षती करण्यास कारणीभूत ठरणार होता.

१९. मठांनी कडक सत्तावादास कशाप्रकारे उचलून धरले?

१९ मठवासी जेथे आत्मत्यागी जीवन जगण्यासाठी स्वतःला या जगापासून अलिप्त करतात अशा मठांमध्ये चर्चची नियम-निर्मिती भरभराटीस आली. बरेचसे कॅथोलिक मठ ‘संत बेनेडिक्ट यांच्या नियमावलीच्या’ अधीन होते. ॲबॉट (“पिता” या अर्थाच्या अरामी भाषेतील शब्दापासून घेतलेली संज्ञा) हे पूर्ण अधिकार गाजवत होते. (पडताळा मत्तय २३:९.) मठवासींपैकी एखाद्यास त्याच्या आईवडिलांकडून भेटवस्तू मिळाल्यास ती त्याला स्वतःला मिळावी अथवा आणखी कोणाला हे ॲबॉट ठरवत असत. बीभत्स वर्तनाचा निषेध करण्यासोबतच एका नियमाने असे म्हणून सर्व प्रकारच्या गप्पागोष्टी व हास्यविनोदावर बंदी घातली, की “कोणत्याही शिष्याने असे संभाषण करता कामा नये.”

२०. प्रॉटेस्टंट धर्माने देखील अशास्त्रीय सत्तावादास जोपासले हे कशावरून दिसून येते?

२० कॅथोलिक धर्माच्या अशास्त्रवचनीय अतिरेकी प्रकारांना सुधारण्यास निघालेला प्रॉटेस्टंट धर्मही काही काळातच, ख्रिस्ताच्या नियमाचा कोणताही आधार नसलेले हुकूमशाही नियम घालून देण्यात तरबेज झाला. उदाहरणार्थ, प्रमुख सुधारक जॉन कॅल्विन यांना “सुधारित चर्चचे विधिकार” असे म्हणून संबोधण्यात आले. त्यांनी, ‘वडिलांनी’ ठरवलेल्या असंख्य कडक नियमांच्या आधारे जिनेवावर नियंत्रण केले; कॅल्विन यांनी सांगितल्याप्रमाणे या ‘वडिलांना,’ “सर्वांच्या जीवनावर लक्ष ठेवण्याचा” “पदाधिकार” होता. (२ करिंथकर १:२४ यातील फरक पडताळा.) पथिकाश्रमांवर व कोणत्या प्रकारचे संभाषणाचे विषय चालू द्यावेत यावर चर्चचे नियंत्रण होते. थिल्लर गाणी गाणे व नाचणे यांसारख्या अपराधांसाठी कडक शिक्षा भोगावी लागत असे.b

ख्रिस्ती धर्मजगताच्या घोडचुकांतून धडा घेणे

२१. “शास्त्रलेखापलीकडे” जाण्याच्या ख्रिस्ती धर्मजगताच्या प्रवृत्तीमुळे सर्वसाधारणपणे कोणते परिणाम घडून आले आहेत?

२१ या सर्व नियमांनी व कायद्यांनी ख्रिस्ती धर्मजगतास नीतिभ्रष्टतेपासून सुरक्षित ठेवण्यास हातभार लावला आहे का? नव्हे, याउलटच घडले आहे! आज ख्रिस्ती धर्मजगत शेकडो पंथांत विभाजित झाले आहे; यात अत्यंत कडक असलेल्या पंथांपासून, अत्यंत मोकळीक देणारे पंथ आहेत. हे सर्व कोणत्या न कोणत्या मार्गाने “शास्त्रलेखापलीकडे” गेले आहेत; त्यांनी मानवी विचारांना कळपावर नियंत्रण करू दिले व त्यांना ईश्‍वरी नियमात हस्तक्षेप करू दिला आहे.—१ करिंथकर ४:६.

२२. ख्रिस्ती धर्मजगताच्या परित्यागामुळे ख्रिस्ताचा नियम का संपुष्टात आला नाही?

२२ तथापि, ख्रिस्ताच्या नियमाचा इतिहास म्हणजे एक शोकांतिका नव्हे. यहोवा देव तुच्छ मानवांच्या हातून ईश्‍वरी नियम कदापि नाहीसा होऊ देणार नाही. ख्रिस्ती नियम आज खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्ये पूर्णार्थाने क्रियाशील आहे व त्यांना यानुसार चालण्याचा मोठा विशेषाधिकार आहे. परंतु, यहुदी धर्माने व ख्रिस्ती धर्मजगताने ईश्‍वरी नियमाचे काय केले याचे परीक्षण केल्यावर आपण साहजिकच विचार करू की, ‘ईश्‍वरी नियमाच्या खऱ्‍या मतितार्थास कमजोर करणाऱ्‍या मानवी युक्‍तिवादांनी व नियमांनी देवाचे वचन विटाळण्याच्या पाशास बळी न पडता आपण ख्रिस्ताच्या नियमानुसार कशाप्रकारे चालू शकतो? ख्रिस्ताच्या नियमाने आपल्या मनात कोणता संतुलित दृष्टिकोन बिंबवण्यास हवा?’ पुढील लेख या प्रश्‍नांची उत्तरे देईल.

[तळटीपा]

a आज यहुदी धर्म ज्या स्वरूपात अस्तित्वात आहे त्यासाठी परुशी लोक बहुतकरून जबाबदार आहेत; यास्तव, अनेक अतिरिक्‍त शब्बाथ निर्बंधांतून यहुदी धर्म आजतागायत पळवाटा शोधतो यात काहीही नवल नाही. उदाहरणार्थ, शब्बाथाच्या दिवशी एखाद्या ऑर्थोडॉक्स यहुदी इस्पितळास भेट देणाऱ्‍याला दिसून येईल की यात्रेकरूंना लिफ्टची कळ दाबण्याचे पापमय “काम” करण्याचे टाळता यावे म्हणून, येथील लिफ्ट प्रत्येक मजल्यावर आपोआप थांबते. काही ऑर्थोडॉक्स डॉक्टर अशा शाईने औषधोपचार लिहून देतात जी काही दिवसांनी उडून जाईल. का बरे? कारण मिश्‍ना, लिहिणे याचे “काम” याअर्थी वर्गीकरण करते पण ते “लिहिणे” याची व्याख्या कायमची खूण सोडणे या शब्दांत करते.

b कॅल्विनच्या काही धर्मशास्त्रीय मतांवर आक्षेप घेणाऱ्‍या सर्वेटसला पाखंडी ठरवून खांबावर जिवंत जाळण्यात आले.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

◻ ख्रिस्ताच्या नियमाचे खरे मूलतत्त्व काय आहे?

◻ येशूची शिकवण्याची शैली परुशांपेक्षा कोणत्या अर्थाने वेगळी होती?

◻ ख्रिस्ती धर्मजगतास नीतिभ्रष्ट करण्यासाठी सैतानाने एक कडक व नियम घालून देण्याची प्रवृत्ती कशाप्रकारे उपयोगात आणली?

◻ ख्रिस्ताच्या नियमाप्रमाणे चालण्याचे काही सकारात्मक परिणाम कोणते आहेत?

[१६ पानांवरील चित्रं]

येशूने मोशेच्या नियमशास्त्राचा सामंजस्याने व दयेने अवलंब केला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा