ख्रिस्ताच्या पूर्वीचे नियमशास्त्र
“अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” —स्तोत्र ११९:९७.
१. आकाशातील ग्रहताऱ्यांच्या हालचालींवर कशाचे नियंत्रण आहे?
बालपणात कदाचित ईयोबाने विस्मयाने आकाशातील ताऱ्यांकडे पाहिले असावे. त्याच्या आईवडिलांनी त्याला मोठमोठ्या नक्षत्रगणांची नावे व आकाशातील या नक्षत्रगणांच्या हालचालीस नियंत्रित करणाऱ्या नियमांबद्दल त्यांना जी माहिती होती त्याबद्दल शिकवले असावे. शेवटी, प्राचीन काळातील लोकांना तर याच विशाल, शोभिवंत तारकापुंजांच्या अविचल हालचालींद्वारे ऋतूंतील बदल दिसून येत असत. ईयोबाने कितीतरी वेळा यांकडे विस्मयचकीत होऊन पाहिले असले, तरीही या तारकापुंजांना कोणत्या सामर्थ्यवान शक्तींनी अभंग राखून ठेवले होते हे मात्र त्याला माहीत नव्हते. याच कारणास्तव, “आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय?” असा प्रश्न यहोवा देवाने विचारला तेव्हा तो निरुत्तर झाला. (ईयोब ३८:३१-३३) होय, आकाशातील तारका नियमांकरवी नियंत्रित केलेल्या आहेत; हे नियम एवढे अचूक व क्लिष्ट आहेत की आजच्या काळातील वैज्ञानिक त्यांस पुरते समजू शकत नाहीत.
२. सर्व निर्मिती नियमांनी नियंत्रित केली जाते असे का म्हणता येऊ शकेल?
२ यहोवा सबंध विश्वातील सर्वश्रेष्ठ नियमदाता आहे. त्याची सर्व कार्ये नियमांनी नियंत्रित केली जातात. भौतिक विश्व अद्याप अस्तित्वात आले नव्हते तेव्हापासून, “सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ” असणारा त्याचा प्रिय पुत्र, आपल्या पित्याच्या नियमांचे विश्वासूपणे पालन करत होता. (कलस्सैकर १:१५) देवदूतांना देखील नियमांद्वारे मार्गदर्शन दिले जाते. (स्तोत्र १०३:२०) प्राणीसुद्धा नियमांच्या अधीन असतात, कारण त्यांना आपल्या निर्मात्याकडून लाभलेल्या उपजत आज्ञांचे ते पालन करतात.—नीतिसूत्रे ३०:२४-२८; यिर्मया ८:७.
३. (अ) मानवजातीला नियमांची गरज का आहे? (ब) यहोवाने इस्राएल राष्ट्रावर कशाच्या माध्यमाने नियंत्रण केले?
३ मानवजातीविषयी काय? आपल्याला बुद्धिमत्ता, नैतिकता व आध्यात्मिकता यांसारख्या देणग्या लाभलेल्या असल्या तरीसुद्धा या कार्यक्षमतांचा उपयोग करण्यात आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी काही अंशी ईश्वरी नियमाची गरज आहेच. आपले प्रथम पालक अर्थात आदाम व हवा हे परिपूर्ण होते; या कारणास्तव त्यांच्या मार्गदर्शनासाठी मोजक्याच नियमांची गरज होती. आनंदाने आज्ञापालन करण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांच्या स्वर्गीय पित्याबद्दलच्या प्रीतीने पुरेसा आधार पुरवण्यास हवा होता. तथापि, त्यांनी आज्ञाभंग केला. (उत्पत्ति १:२६-२८; २:१५-१७; ३:६-१९) परिणामस्वरूप, त्यांची संतती म्हणजे पापमय प्राणी होते ज्यांना मार्गदर्शनासाठी कितीतरी अधिक नियमांची गरज पडली. कालांतराने, त्यांची ही गरज यहोवाने प्रेमळपणे पूर्ण केली. त्याने नोहाला विशिष्ट नियम दिले जे पुढे त्याने आपल्या कुटुंबास द्यावयाचे होते. (उत्पत्ति ९:१-७) अनेक शतकांनंतर, मोशेद्वारे देवाने नवनिर्मित इस्राएल राष्ट्रास एक तपशीलवार लेखी स्वरूपातील नियमशास्त्र दिले. यहोवाने एका सबंध राष्ट्रावर ईश्वरी नियमाकरवी नियंत्रण करण्याची ही पहिलीच वेळ होती. या नियमशास्त्राचे परीक्षण केल्यामुळे आजच्या काळातील ख्रिश्चनांच्या जीवनात ईश्वरी नियमाची महत्त्वपूर्ण भूमिका समजून घेण्यास आपल्याला मदत मिळेल.
मोशेचे नियमशास्त्र—त्याचा उद्देश
४. अब्राहामाच्या निवडलेल्या वंशजाकरता वचनदत्त संतान उत्पन्न करणे हे एक आव्हान का ठरणार होते?
४ नियमशास्त्राचा सखोल अभ्यास करणाऱ्या प्रेषित पौलाने विचारले: “तर मग नियमशास्त्र कशासाठी?” (गलतीकर ३:१९) याचे उत्तर देण्यासाठी, आपण आठवावयास हवे की अब्राहामाच्या वंशातून एक संतती उत्पन्न होईल व या संततीच्याद्वारे सर्व राष्ट्रांना मोठे आशीर्वाद प्राप्त होतील असे अभिवचन यहोवाने त्याचा मित्र अर्थात अब्राहाम यास दिले होते. (उत्पत्ति २२:१८) तथापि, यात एक आव्हान गोवलेले होते: अब्राहामाचे निवडलेले वंशज, म्हणजेच इस्राएली लोक यांपैकी सर्वच काही यहोवावर प्रीती करणारे नव्हते. जसजसा काळ ओसरला तसतसे हे लोक ताठ मानेचे, बंडखोर होते हे स्पष्ट झाले—काहींवर तर नियंत्रण करणेच अशक्य होते! (निर्गम ३२:९; अनुवाद ९:७) अशांबद्दल पाहू जाता, देवाच्या लोकांपैकी असणे हे केवळ जन्मामुळे होते, स्वेच्छेमुळे नव्हे.
५. (अ) मोशेच्या नियमशास्त्राद्वारे यहोवाने इस्राएली लोकांना काय शिकवले? (ब) नियमशास्त्राचे पालन करणाऱ्यांच्या आचरणावर प्रभाव पाडण्याच्या दृष्टीने त्याची रचना कशाप्रकारे करण्यात आली होती?
५ अशा प्रकारच्या लोकांतून वचनदत्त संतान उत्पन्न होणे व या संतानाकरवी त्यांना लाभ प्राप्त होणे हे कसे शक्य होते? यंत्रमानवांसारखे नियंत्रित करण्याऐवजी, यहोवाने त्यांना नियमाच्या सहाय्याने शिकवले. (स्तोत्र ११९:३३-३५; यशया ४८:१७) खरे पाहता, “नियम” या अर्थाचा हिब्रू शब्द तोराह म्हणजे “शिक्षण.” या नियमशास्त्राकरवी कसले शिक्षण मिळाले? प्रथमतः, त्याकरवी इस्राएली लोकांना, त्यांच्या पापमय स्थितीतून सुटका करील अशा मशीहाची त्यांना गरज आहे याविषयीचे शिक्षण मिळाले. (गलतीकर ३:२४) नियमशास्त्राकरवी त्यांना ईश्वरी भय व आज्ञाधारकता यांचे देखील शिक्षण मिळाले. अब्राहामास दिलेल्या अभिवचनाच्या अनुषंगाने, इस्राएली लोकांना इतर सर्व राष्ट्रांपुढे यहोवाच्या वतीने साक्षीदारांची भूमिका पार पाडायची होती. यास्तव, नियमशास्त्राने त्यांना यहोवाची प्रतिष्ठा वाढवेल अशा थोर व उदात्त आचारसंहितेचे शिक्षण द्यावयाचे होते; हे शिक्षण इस्राएलास त्याच्या अवतीभवतीच्या राष्ट्रांतील नीतिभ्रष्ट रीतींपासून अलिप्त राहण्यात सहायक ठरणार होते.—लेवीय १८:२४, २५; यशया ४३:१०-१२.
६. (अ) मोशेच्या नियमशास्त्रात जवळजवळ किती कायदे आहेत व ते आवश्यकतेपेक्षा अधिक आहेत असे का समजले जाऊ नये? (तळटीप पाहा.) (ब) मोशेच्या नियमशास्त्राबद्दल अभ्यास केल्याने आपल्याला कशाविषयीची मर्मदृष्टी प्राप्त होईल?
६ या दृष्टीने पाहता, मोशेच्या नियमशास्त्रात अनेक कायदे अर्थात ६०० पेक्षा अधिक कायदे आहेत यात काही नवल नाही.a या लिखित संहितेने उपासना, शासन, नीतिनियम, कायदा एवढेच काय तर आहार व आरोग्यतत्त्वांसारख्या बाबींवर देखील नियंत्रण केले. तथापि, नियमशास्त्र म्हणजे निव्वळ भावनाशून्य नियमांचा व सडेतोड आज्ञांचा एक संग्रह होता असा याचा अर्थ होतो का? मुळीच नाही! या नियमशास्त्राचा अभ्यास केल्याने आपल्याला यहोवाच्या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाविषयी विपुल मर्मदृष्टी प्राप्त होते. काही उदाहरणे लक्षात घ्या.
दया व करूणा प्रतिबिंबित करणारे नियमशास्त्र
७, ८. (अ) नियमशास्त्राने दया व कृपा यांवर कशाप्रकारे जोर दिला? (ब) यहोवाने दावीदाच्या बाबतीत नियमशास्त्र दयाळुपणे कसे लागू केले?
७ नियमशास्त्रात, विशेषतः दुबळ्या व असहाय्य लोकांच्या बाबतीत दया व करूणा यांवर जोर देण्यात आला होता. संरक्षणाच्या बाबतीत विधवा व अनाथ यांची विशेष दखल घेण्यात आली होती. (निर्गम २२:२२-२४) काम करणाऱ्या जनावरांचे निर्दयतेपासून संरक्षण करण्यात आले होते. मूलभूत संपत्ती अधिकारांना विचारात घेण्यात आले होते. (अनुवाद २४:१०; २५:४) हत्या करणाऱ्यास नियमशास्त्रानुसार मृत्यूची शिक्षा अनिवार्य होती तरीसुद्धा आकस्मिकपणे घडलेल्या हत्येच्या प्रकरणांत दया दाखवण्याची मुभा देण्यात आली होती. (गणना ३५:११) स्पष्टपणे, इस्राएली शास्त्यांना, काही गुन्ह्यांच्या बाबतीत गुन्हेगाराची मनोवृत्ती लक्षात घेऊन त्या गुन्ह्यासाठी लावण्यात आलेल्या दंडाविषयी निर्णय घेण्याची मोकळीक होती.—पडताळा निर्गम २२:७ व लेवीय ६:१-७.
८ जेथे आवश्यक होते तेथे खंबीरपणे व जेथे कोठे शक्य होते तेथे दयाळुपणे नियमशास्त्राचा अवलंब करण्याद्वारे यहोवा, शास्त्यांकरता एक आदर्श बनला. व्यभिचार व हत्या करणाऱ्या दावीद राजाला दया दाखवण्यात आली होती. त्याला शिक्षा मिळाली नाही असे नव्हे, कारण त्याच्या पापातून निपजणाऱ्या भयंकर परिणामांपासून यहोवाने त्याला आश्रय दिला नाही. तरीसुद्धा, राज्याच्या करारामुळे व दावीद हा स्वभावाने दयाळू व अत्यंत पश्चात्तापी मनोवृत्तीचा होता यामुळे त्याला मृत्युदंड देण्यात आला नाही.—१ शमुवेल २४:४-७; २ शमुवेल ७:१६; स्तोत्र ५१:१-४; याकोब २:१३.
९. मोशेच्या नियमशास्त्रात प्रीतीने कोणती भूमिका बजावली?
९ शिवाय, मोशेच्या नियमशास्त्रात प्रीतीवर जोर देण्यात आला होता. आजच्या काळातील एखाद्या राष्ट्राच्या कायदेसंहितेद्वारे प्रीतीची मागणी करण्यात आल्याची जरा कल्पना करून पाहा! या अनुषंगाने, मोशेच्या नियमशास्त्रात हत्येवर निर्बंध तर होताच पण, “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर,” अशीही त्यात आज्ञा देण्यात आली होती. (लेवीय १९:१८) त्यात परदेशीय रहिवाशाविरुद्ध अन्यायी व्यवहार करण्याची मनाई असण्यासोबतच, ‘परदेशीय मनुष्यावर स्वतःसारखी प्रीती करा; कारण तुम्हीही मिसर देशात परदेशीय होता,’ अशी आज्ञाही देण्यात आली होती. (लेवीय १९:३४) शिवाय, त्यात केवळ व्यभिचार नियमबाह्य ठरवलेला नव्हता तर पतींना आपापल्या पत्नींना आनंदित करण्याची आज्ञाही देण्यात आली होती! (अनुवाद २४:५) केवळ अनुवाद याच पुस्तकात, प्रीतीच्या गुणास सूचित करणारे शब्द जवळजवळ २० वेळा उपयोगात आणण्यात आले आहेत. यहोवाने इस्राएली लोकांविषयी त्याला असलेल्या भूतकाळातील, वर्तमानकाळातील तसेच भविष्यकाळातील प्रीतीविषयी खात्री दिली. (अनुवाद ४:३७; ७:१२-१४) खरोखर, मोशेच्या नियमशास्त्रातील सर्वात श्रेष्ठ आज्ञा हीच होती की, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर.” (अनुवाद ६:५) येशूने म्हटले, की या आज्ञेवर व आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करण्याविषयीच्या आज्ञेवर सबंध नियमशास्त्रच अवलंबून आहे. (लेवीय १९:१८; मत्तय २२:३७-४०) यास्तव, साहजिकच स्तोत्रकर्त्याने म्हटले: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.”—स्तोत्र ११९:९७.
नियमशास्त्राचा गैरवापर
१०. यहुद्यांनी बहुतांशी मोशेच्या नियमशास्त्रास कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?
१० तर मग, इस्राएलाने मोशेच्या नियमशास्त्राविषयी कृतज्ञता बाळगली नाही ही केवढी खेदाची बाब आहे! त्या लोकांनी नियमशास्त्राचे उल्लंघन केले, त्याकडे दुर्लक्ष केले, किंवा ते त्याविषयी विसरून गेले. त्यांनी इतर राष्ट्रांच्या ओंगळ धार्मिक पद्धतींकरवी शुद्ध उपासनेला विटाळले. (२ राजे १७:१६, १७; स्तोत्र १०६:१३, ३५-३८) याशिवाय, इतर मार्गांनी देखील ते नियमशास्त्राला अविश्वासू राहिले.
११, १२. (अ) एज्राच्या काळानंतर धार्मिक पुढाऱ्यांच्या गटांनी कशाप्रकारे नुकसान केले? (पेटी पाहा.) (ब) प्राचीन काळातील रब्बींना “नियमशास्त्राभोवती कुंपण” घालण्याची गरज का भासली?
११ खरे तर, नियमशास्त्र शिकवण्याचा व त्यास जतन करण्याचा दावा करणाऱ्यांकडूनच त्यास सर्वाधिक नुकसान झाले. हे सा. यु. पू. पाचव्या शतकातील विश्वासू शास्त्री एज्रा याच्या काळानंतर घडले. एज्राने इतर राष्ट्रांच्या नीतिभ्रष्ट प्रभावांचा जोरदार प्रतिकार केला व नियमशास्त्र वाचण्याच्या व त्याचे शिक्षण देण्याच्या महत्त्वावर त्याने जोर दिला. (एज्रा ७:१०; नहेम्या ८:५-८) नियमशास्त्राच्या काही शिक्षकांनी एज्राच्या पावलावर पाऊल ठेवत असल्याचा दावा केला व परिणामी त्यांनी ‘थोर सभास्थानाची’ स्थापना केली. त्याच्या वचनांतील एक हुकूम असा होता की, “नियमशास्त्राभोवती कुंपण घाला.” नियमशास्त्र म्हणजे जणू एका मोलवान बागेसारखे होते असा तर्क या शिक्षकांनी केला. त्यांतील नियमांचे उल्लंघन करण्याद्वारे या बागेच्या सीमा कोणी ओलांडून जाऊ नये, म्हणून त्यांनी अतिरिक्त नियमांची अर्थात ‘मौखिक नियमशास्त्राची’ रचना केली जेणेकरून असा गुन्हा करण्याचे कोणी धाडस करू नये.
१२ यहुदी पुढाऱ्यांना असे वाटणे हे रास्तच होते असा काही जण युक्तिवाद करतील. एज्राच्या काळानंतर यहुद्यांवर परदेशी साम्राज्यांचे विशेषतः ग्रीसचे वर्चस्व होते. ग्रीक तत्त्वज्ञान व संस्कृतीच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी यहुदी लोकांमध्ये धार्मिक पुढाऱ्यांचे गट निर्माण झाले. (पृष्ठ १० वरील पेटी पाहा.) कालांतराने या गटांपैकी काही, नियमशास्त्राचे शिक्षक या नात्याने लेवीय याजकपदाचा विरोध करू लागले, एवढेच नव्हे तर ते त्याहूनही वरचढ झाले. (पडताळा मलाखी २:७.) सा. यु. पू. २०० पर्यंत मौखिक नियमाने यहुद्यांच्या जीवनांत प्रवेश करण्यास सुरवात केलेली होती. लिखित नियमशास्त्राच्या बरोबरीचे लेखण्यात येऊ नये म्हणून, प्रथमतः, हे नियम लिहावयाचे नव्हते. तथापि, हळूहळू मानवी विचारांना ईश्वरी विचारांहून अधिक महत्त्व देण्यात आले, व परिणामस्वरूप या ‘कुंपणाने’ ज्या ‘बागेचे’ संरक्षण करावयाचे होते त्याचे उलटपक्षी नुकसानच केले.
परुशीय मतप्रणालीद्वारे विटाळले जाणे
१३. काही यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी अनेक नियम लावून देण्याच्या बाबतीत कशाप्रकारे स्वतःचे समर्थन केले?
१३ तोराह अर्थात मोशेचे नियमशास्त्र हे परिपूर्ण असल्यामुळे, उद्भवू शकेल अशा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यात उपलब्ध असलेच पाहिजे असा युक्तीवाद रब्बी लोकांनी केला. हा विचार मुळात आदरयुक्त नव्हता. खरे पाहता, यामुळे रब्बींना हुशारीने मानवी युक्तीवादाचा उपयोग करण्याची व याच्या परिणामस्वरूपात काही व्यक्तिगत स्वरूपाच्या तर काही अगदी लहानसहान, अशा सर्व प्रकारच्या प्रश्नांवर, देवाचे वचन हे नियमांचा आधार आहे असे भासवण्याची मोकळीक मिळाली.
१४. (अ) यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी राष्ट्रांपासून अलिप्ततेविषयीच्या शास्त्रवचनीय नियमाची कशाप्रकारे अशास्त्रवचनीय टोकापर्यंत ओढूनताणून अतिशयोक्ती केली? (ब) यहुदी लोकांचे मूर्तीपूजक प्रभावांपासून रक्षण करण्यात रब्बींचे नियम अपेशी ठरले हे कशावरून स्पष्ट होते?
१४ धार्मिक पुढाऱ्यांनी वारंवार शास्त्रवचनीय नियमांची ओढूनताणून अतिशयोक्ती केली. उदाहरणार्थ, मोशेच्या नियमशास्त्राने राष्ट्रांपासून अलिप्त राहण्याचे प्रोत्साहन दिले; तथापि, रब्बींनी तर गैर-यहुदी असलेल्या कोणत्याही गोष्टीचा अवाजवी तिरस्कार करण्याची शिकवणूक दिली. त्यांनी शिकवले की यहुद्याने आपली गुरेढोरे विदेश्यांच्या पथिकाश्रमांत ठेवू नयेत कारण विदेशी लोक “पशुगमन करणारे असण्याची शक्यता असते.” यहुदी स्त्रीला एखाद्या विदेशी स्त्रीच्या बाळंतपणात मदत करण्याची परवानगी नव्हती कारण त्याकरवी ती जणू “मूर्तीपूजा करण्यासाठी एका बालकाला जन्मास घालण्यात मदत करत असेल.” रब्बींना ग्रीक व्यायामशाळांविषयी रास्त अविश्वास असल्यामुळे त्यांनी सर्वच प्रकारच्या शारीरिक व्यायामांवर बंदी घातली. हे सर्व करूनही यहुद्यांना विदेश्यांच्या विश्वासांपासून सुरक्षित ठेवण्यात फारसे यश आले नाही याचा इतिहास पुरावा देतो. वस्तुतः, कालांतराने परुशी स्वतःच जीवाच्या अमरत्वाचा मूर्तीपूजक ग्रीक सिद्धान्त शिकवू लागले!—यहेज्केल १८:४.
१५. यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी शुद्धीकरण व गोत्रगमन यासंबंधी नियमांचा कशाप्रकारे विपर्यास केला?
१५ परुशांनी शुद्धीकरणाच्या नियमांचा देखील घोर विपर्यास केला. परुशांना संधी दिल्यास ते सूर्यालाही पवित्र करतील असे म्हटले जात असे. त्यांच्या नियमानुसार “शौचास जाण्यास” उशीर केल्यास मनुष्य अशुद्ध होऊ शकतो! हात धुणे हा देखील एक क्लिष्ट रिवाज होऊन बसला; यात कोणता हात आधी धुवावयाचा व कसा धुवावयाचा याबद्दलही नियम होते. स्त्रियांना विशेषतः अशुद्ध समजले जात असे. कोणत्याही जवळच्या आप्ताच्या “जवळ जाऊ” नये, या शास्त्रवचनीय आज्ञेच्या (खरे तर गोत्रगमनाविरुद्ध असलेला नियम) आधारावर रब्बींनी असा नियम घालून दिला की पतीने आपल्या पत्नीच्या मागून चालता कामा नये; तसेच त्याने बाजारात तिच्याशी बोलू नये.—लेवीय १८:६.
१६, १७. मौखिक नियमशास्त्र, प्रत्येक सप्ताहात शब्बाथ पाळण्याविषयीच्या आज्ञेच्या आणखी पुढे कशाप्रकारे गेले व याचा काय परिणाम झाला?
१६ मौखिक नियमशास्त्राने शब्बाथाच्या नियमाची केलेली विटंबना विशेषतः सर्वज्ञात आहे. देवाने इस्राएलास एक सरळसोपा नियम दिला: सप्ताहाच्या सातव्या दिवशी कोणतेही कामकाज करू नको. (निर्गम २०:८-११) तथापि, मौखिक नियमाने आणखी पुढे जाऊन जवळजवळ ३९ वेगवेगळ्या प्रकारची निषिद्ध कामे ठरवली; यात गाठ बांधणे किंवा सोडणे, दोन टाके घालणे, दोन हिब्रू अक्षरे लिहिणे, इत्यादी समाविष्ट होते. शिवाय, या प्रत्येकाशी संबंधित असलेले आणखी असंख्य नियम आवश्यक होते. कोणत्या गाठी निषिद्ध व कोणत्या चालण्यासारख्या होत्या? मौखिक नियमशास्त्रात स्वच्छंद नियमांकरवी उत्तरे देण्यात आलेली होती. बरे करणे यास निषिद्ध काम समजले जाऊ लागले. उदाहरणार्थ, शब्बाथाच्या दिवशी पायाचे तुटलेले हाड सांधणे देखील निषिद्ध होते. दातदुखी असलेला एखादा, अन्नात चवीसाठी शिरका घालू शकत होता तथापि, दातांतून शिरका चोखण्यास मात्र मनाई होती. त्यामुळे त्याचा दात बरा होण्याची शक्यता होती!
१७ अशाप्रकारे, शेकडो मानवनिर्मित नियमांच्या ओझ्याखाली दबून, अधिकांश यहुदी लोकांच्या बाबतीत शब्बाथाच्या नियमाचा आध्यात्मिक अर्थबोध हरपला. येशू ख्रिस्त अर्थात, ‘शब्बाथाच्या धन्याने’ शब्बाथाच्या दिवशी अद्भुत व हृदयंगम चमत्कार घडवले तेव्हा शास्त्री व परुशी यांच्या हृदयास मात्र पाझर फुटला नाही. तो जणू त्यांच्या नियमांकडे दुर्लक्ष करत होता या विचारानेच त्यांना काळजी लागली होती.—मत्तय १२:८, १०-१४.
परुशांच्या अज्ञानातून धडा घेणे
१८. मोशेच्या नियमशास्त्रात अतिरिक्त मौखिक नियम व संप्रदायांची भर पाडल्यामुळे कोणता परिणाम घडून आला? स्पष्ट करा.
१८ थोडक्यात, जहाजाच्या बुडाशी चिकटून राहणाऱ्या बार्नाकल या जलचर प्राण्यांसारखेच हे अतिरिक्त नियम व संप्रदाय मोशेच्या नियमशास्त्राशी जुळून गेले असे म्हणता येऊ शकेल. जहाजाचा मालक या त्रासदायक प्राण्यांना जहाजाच्या पृष्ठभागावरून खरवडून काढण्यासाठी आतोनात प्रयत्न करतो कारण ते जहाजाची गती मंदावतात व त्याच्या गंजरोधक रंगाचेही नुकसान करतात. तसेच, मौखिक नियम व संप्रदायांकरवी नियमशास्त्र भारग्रस्त झाले व त्यास गैरवापराकरवी झिजवून टाकण्याच्या धोक्यात घालण्यात आले. तथापि, अशा अनावश्यक नियमांना खरवडून टाकण्याऐवजी रब्बी लोक त्यांत भर पाडत राहिले. नियमशास्त्राची पूर्णता करण्यास मशीहा येईपर्यंत तर ‘जहाजाच्या’ तळाशी ‘बार्नाकल प्राण्यांचे’ असे कवच तयार झाले होते की ते जवळजवळ बुडालेच होते! (पडताळा नीतिसूत्रे १६:२५.) नियमशास्त्राच्या कराराचे रक्षण करण्याऐवजी या धार्मिक पुढाऱ्यांनी त्याचे उल्लंघन करण्याचे अज्ञानी कार्य केले. तथापि, नियमांचे त्यांचे “कुंपण” अयशस्वी का ठरले?
१९. (अ) ‘नियमशास्त्राभोवतीचे कुंपण’ अयशस्वी का ठरले? (ब) यहुदी धार्मिक पुढारी खऱ्या विश्वासात कमी पडले हे कशावरून दिसून येते?
१९ नीतिभ्रष्टतेविरुद्धचा संघर्ष, नियम अभिलिखित असलेल्या ग्रंथांच्या पृष्ठांवर नव्हे तर अंतःकरणात लढवला जातो, हे यहुदी धर्माचे पुढारी समजू शकले नाहीत. (यिर्मया ४:१४) विजयाची गुरुकिल्ली आहे प्रीती; अर्थात, यहोवा, त्याचे नियमशास्त्र, व त्याची नीतिमान तत्त्वे यांबद्दल प्रीती. अशा प्रीतीकरवी सुसंगतपणे, यहोवा घृणा करतो अशा सर्व गोष्टींबद्दल घृणा निर्माण होते. (स्तोत्र ९७:१०; ११९:१०४) ज्यांची अंतःकरणे अशाप्रकारे प्रीतीने ओतप्रोत भरलेली असतात ते या नीतिभ्रष्ट जगात यहोवाच्या नियमांना विश्वासू राहतात. यहुदी धार्मिक पुढाऱ्यांना अशी प्रीती प्रोत्साहित करण्याची व प्रवृत्त करण्याची मोठी सुसंधी उपलब्ध होती. मग, असे करण्यात ते अपेशी का ठरले? स्पष्टपणे, ते विश्वासात कमी पडले. (मत्तय २३:२३) विश्वासू मानवांच्या अंतःकरणांत कार्य करण्याच्या यहोवाच्या आत्म्याठायी असलेल्या सामर्थ्यावर त्यांचा विश्वास असता तर इतरांच्या जीवनांवर कडक नियंत्रण ठेवण्याची त्यांना गरजच भासली नसती. (यशया ५९:१; यहेज्केल ३४:४) विश्वासाच्या उणीवेमुळे त्यांनी विश्वास प्रदान केला नाही; उलटपक्षी त्यांनी लोकांवर मानवनिर्मित आज्ञांचे ओझे लादले.—मत्तय १५:३, ९; २३:४.
२०, २१. (अ) संप्रदायांचा पगडा असलेल्या विचारसरणीचा यहुदी धर्मावर कोणता व्यापक परिणाम झाला? (ब) यहुदी धर्मासंबंधाने जे घडले त्यातून आपल्याला कोणता धडा मिळतो?
२० त्या यहुदी पुढाऱ्यांनी प्रीतीस चालना दिली नाही. त्यांच्या संप्रदायांनी, निव्वळ बाह्यरूपास अत्यंत महत्त्व देऊन फक्त दिखाव्यासाठी यांत्रिक आज्ञाधारकता दाखविणारा एक धर्म उत्पन्न केला—जणू दांभिकता फोफावण्यासाठी एक सुपीक जमीन. (मत्तय २३:२५-२८) त्यांच्या नियमांनी इतरांचे दोष काढण्यासाठी अमर्याद वाव दिला. अशाप्रकारे चढेल व सत्तावादी परुशांना स्वतः येशू ख्रिस्ताची टीका करतानाही आपण काही गैर करत आहोत असे वाटले नाही. त्यांनी नियमशास्त्राच्या मुख्य उद्देशाकडे दुर्लक्ष केले व एकाच खऱ्या मशीहाला देखील अव्हेरले. शेवटी, त्याला या यहुदी राष्ट्रास सांगावे लागले, की “पाहा! तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.”—मत्तय २३:३८; गलतीकर ३:२३, २४.
२१ यात आपल्यासाठी कोणता धडा आहे? संप्रदायांचा पगडा असलेली कडक विचारसरणी यहोवाच्या शुद्ध उपासनेला चालना देत नाही हे स्पष्टच आहे! परंतु, पवित्र शास्त्रवचनात विशिष्टपणे सांगण्यात आलेले नसल्यास, आजच्या काळातील यहोवाच्या उपासकांना कोणतेच नियम पाळावयाचे नाहीत असा याचा अर्थ होतो का? नाही. संपूर्ण उत्तरासाठी आता आपण, मोशेच्या नियमशास्त्राच्या जागी येशूने एक नवीन व अधिक चांगला नियम कशाप्रकारे आणला यावर विचार करू.
[तळटीपा]
a अर्थात, आधुनिक राष्ट्रांच्या न्यायव्यवस्थांच्या तुलनेत ही संख्या अत्यल्पच आहे. उदाहरणार्थ, १९९० सालाच्या सुरवातीपर्यंत, संयुक्त संस्थानांचे संघीय कायदे १,२५,००० पेक्षा अधिक पानांत सामावलेले होते, शिवाय दर वर्षी सहस्रावधी नव्या कायद्यांची यात भर पडतच आहे.
तुम्ही स्पष्टीकरण देऊ शकता का?
◻ सर्व निर्मिती ईश्वरी नियमांनी कशाप्रकारे नियंत्रित केली जाते?
◻ मोशेच्या नियमशास्त्राचा मुख्य उद्देश काय होता?
◻ मोशेच्या नियमशास्त्राने दया व कृपा यांवर जोर दिला हे कसे स्पष्ट होते?
◻ यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी मोशेच्या नियमशास्त्रात असंख्य नियमांची भर का पाडली व याचा कोणता परिणाम झाला?
[१० पानांवरील चौकट]
यहुदी धार्मिक पुढारी
शास्त्री: ते स्वतःस एज्राचे उत्तराधिकारी व नियमशास्त्राचे स्पष्टीकरण देणारे समजत होते. यहुद्यांचा इतिहास (इंग्रजी) नामक पुस्तकानुसार, “सर्व शास्त्री म्हणजे काही उदात्त आत्मे नव्हते, व नियमशास्त्रात दडलेले गर्भितार्थ शोधून काढण्याचे त्यांचे प्रयत्न सहसा अर्थहीन नियमांच्या व निर्रथक बंधनांच्या अगदी तुच्छ पातळीवर घसरत असत. ही बंधने बळकट होऊन त्यांच्या रूढी बनत व काही काळातच ती एखाद्या निर्दयी जुलूम करणाऱ्याचे रूप घेत असत.”
हॅसिडिम: या नावाचा अर्थ, “पवित्र जन” अथवा “संत” असा होतो. सर्वप्रथम, सा. यु. पू. २०० मध्ये त्यांचा एक वर्ग या नात्याने उल्लेख झाला; ते राजनैतिक दृष्टीने सामर्थ्यवान असून ग्रीक प्रभावाच्या जुलमापासून नियमशास्त्राच्या पावित्र्याचे धर्मांध रक्षणकर्ते होते. हॅसिडिमचे तीन गटांत विभाजन झाले: परुशी, सदुकी व एस्सेनी लोक.
परुशी: काही विद्वानांच्या मते हे नाव “अलिप्त केलेले” किंवा “अलिप्ततावादी” या अर्थांच्या शब्दांतून घेतलेले आहे. विदेशी लोकांपासून अलिप्त राहण्याच्या त्यांच्या अट्टाहासाविषयी ते खरोखरच अतिरेकी वृत्तीचे होते, एवढेच नव्हे तर मौखिक नियमशास्त्राच्या क्लिष्ट बाबींविषयी अज्ञानी असलेल्या सामान्य यहुदी लोकांपासून ते स्वतःच्या समाजास अलिप्त व त्यांच्यापेक्षा वरचढ समजत असत. एका इतिहासकाराने परुशांबद्दल म्हटले: “सर्वसाधारणपणे, परंपरागत रितीरिवाजांना औपचारिक रूप देण्याद्वारे व बारीकसारीक तपशील विशिष्ट करण्याद्वारे ते लोकांना लहान मुलांची वागणूक देत होते.” आणखी एका विद्वानाने म्हटले: “परुशी मतप्रणालीने सर्व प्रकारच्या प्रसंगांना सामावणारा कायदेशीर नियमांचा मोठा साठा उत्पन्न केला; याच्या अपरिहार्य परिणामस्वरूपात त्यांनी क्षुल्लक बाबींविषयी अतिशयोक्ती केली व असे करताना त्यांनी अतिशय महत्त्वाच्या बाबींना क्षुल्लक असल्यासारखे थट्टेवारी नेले (मत्त. २३:२३).”
सदुकी: या गटाचा अमीर उमराव व याजकगण यांच्यासोबत जवळचा संबंध होता. मौखिक नियमशास्त्राठायी लिखित नियमशास्त्रासारखी बंधनकारकता नव्हती असे म्हणून त्यांनी शास्त्री व परुशी लोकांचा हिरिरीने विरोध केला. तथापि, या झगड्यात त्यांचा पराभव झाला असे स्वतः मिश्ना स्पष्ट करतो: “[लिखित] नियमशास्त्रातील शब्दांचे [पालन करणे] यापेक्षा शास्त्र्यांच्या शब्दांचे [पालन करणे] अधिक सक्तीचे आहे.” मौखिक परंपरेवर बरेचसे भाष्य करणाऱ्या तालमूदने तर नंतर असे म्हणण्यासही कमी केले नाही की, “शास्त्र्यांचे शब्द . . . तोराहच्या शब्दांपेक्षा अधिक प्रिय आहेत.”
एस्सेनी: हा, स्वतःला अलिप्त केलेल्या समुदायांत इतरांपासून विलग करणारा वैराग्यांचा गट होता. भाषांतरकारांचा बायबल शब्दकोश (इंग्रजी) यानुसार एस्सेनी लोक परुशांपेक्षा अधिक वगळलेले होते व “याबाबतीत काही वेळा तर ते परुशांनाही मागे टाकत असत.”
[९ पानांवरील चित्रं]
ईयोबाच्या आईवडिलांनी कदाचित त्याला नक्षत्रगणांना नियंत्रित करणाऱ्या नियमांविषयी शिकवले असावे