गमलिएल त्याने तार्सकर शौलास शिकवले
लोक अगदीच शांत झाले. काही क्षणांपूर्वीच त्यांनी प्रेषित पौलास जवळजवळ ठारच केले होते. रोमी शिपायांनी, तार्सकर शौल असेही म्हणण्यात आलेल्या पौलाचा बचाव केला होता व आता तो जेरुसलेमेत, मंदिराजवळील पायऱ्यांवर लोकांसमोर उभा होता.
सर्वांनी शांत व्हावे म्हणून हाताने खुणावून, पौल इब्री भाषेत बोलू लागला; तो म्हणाला: “बंधुजनहो व वडील मंडळींनो, मी जे आता तुम्हास प्रत्युत्तर करितो ते ऐका. . . मी यहूदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानाचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळाले, आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहा तसा मीहि होतो.”—प्रेषितांची कृत्ये २२:१-३.
जीव धोक्यात असताना, पौलाने आपल्या बचावाकरता, गमलिएलाकडून शिक्षण मिळाले होते असे सुरवातीलाच का म्हटले बरे? गमलिएल कोण होता, व त्याने शिकवले होते म्हणजे नेमके काय? त्याच्या प्रशिक्षणाचा प्रभाव शौलावर, तो ख्रिस्ती प्रेषित पौल झाल्यानंतरही कायम होता का?
गमलिएल कोण होता?
गमलिएल एक ख्यातनाम परुशी होता. तो, परुशीय यहुदी धर्मातील दोन प्रमुख मतप्रणालींपैकी एकीचा शोध लावणाऱ्या थोरल्या हिल्लेलाचा नातू होता.a हिल्लेलाची शिक्षणपद्धती, त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या अर्थात शाम्मायच्या शिक्षणपद्धतीपेक्षा अधिक सोशीक असल्याचे समजले जात असे. जेरुसलेमच्या मंदिराचा सा. यु. ७० मध्ये विनाश झाला त्यानंतरच्या काळात, बेत हिल्लेल (हिल्लेलाचे घराणे) यास, बेत शाम्माय (शाम्मायचे घराणे) याच्या तुलनेत अधिक पसंत केले जाई. हिल्लेलाचे घराणे यहुदी धर्माचे अधिकृत प्रतीक बनले कारण मंदिराच्या विनाशानंतर इतर सर्व पंथ लयास गेले होते. तालमूदचा आधारभूत ग्रंथ बनलेल्या मिश्नातील यहुदी कायदे अनेकदा बेत हिल्लेलाच्या निर्णयांवर आधारित असत; बेत हिल्लेलाच्या वर्चस्वात गमलिएलाच्या प्रभावाने बराचसा हातभार लावला होता असे दिसते.
गमलिएलाची एवढी जबरदस्त ख्याती होती की रब्बान म्हणण्यात आलेला तो पहिलाच ठरला; रब्बान ही रब्बी पेक्षाही श्रेष्ठ अशी पदवी आहे. खरे पाहता, गमलिएल एवढा सन्मानित व्यक्ती बनला की मिश्ना त्याच्याबद्दल म्हणते: “थोरले गमलिएल रब्बान यांचा मृत्यू झाल्यानंतर तोराहचे वैभव नाहीसे झाले व पावित्र्य आणि साधुवृत्ती [अक्ष. “वैराग्य”] यांचे पतन झाले.”—सोताह ९:१५.
गमलिएलाद्वारे शिक्षित—ते कसे?
प्रेषित पौलाने, ‘गमलिएलाच्या चरणाजवळ शिक्षण मिळाले’ हे जेरुसलेम येथील लोकसमुदायास सांगितले तेव्हा त्याचे असे सांगण्याचे काय तात्पर्य होते? गमलिएलासारख्या शिक्षकाचा शिष्य होण्यात काय समाविष्ट होते?
अशाप्रकारच्या प्रशिक्षणाबद्दल, अमेरिकेच्या यहुदी धर्मशास्त्रीय सेमिनरीचे प्राध्यापक दोव झ्लॉतनीक लिहितात: “मौखिक कायद्याची अचूकता व त्याअर्थी त्याची विश्वसनीयता देखील, गुरू-शिष्याच्या संबंधावरच, अर्थात कायद्याचे शिक्षण देण्यात गुरूने घेतलेली दक्षता व ते आत्मसात करण्यात शिष्याची तन्मयता, यावरच सर्वतोपरी अवलंबून असते. . . . यास्तव शिष्यांना, विद्वानांच्या चरणाजवळ बसण्यास . . . व ‘त्यांचे शब्द ज्ञानतृष्णेने ग्रहण करण्यास’ आवर्जून सांगण्यात येत असे.”—एवॉट १:४, मिश्ना.
येशू ख्रिस्ताच्या काळातील यहुदी लोकांचा इतिहास, या पुस्तकात लेखक एमील श्युर्र पहिल्या शतकातील रब्बी शिक्षकांच्या शिक्षणपद्धतींवर स्पष्टीकरण देतात. ते लिहितात: “तुलनात्मकपणे अधिक प्रसिद्धीस आलेल्या रब्बींभोवती सहसा मोठ्या संख्येने, शिक्षण घेण्यास उत्सुक असलेले तरुण लोक गराडा घालीत असत; मोठ्या प्रमाणावर विभाजित व अलंकारिक अशा ‘मौखिक कायद्याचा’ सर्वांगीण परिचय व्हावा हा यामागील उद्देश होता. . . . या शिक्षणात स्मरणशक्तीचा अविश्रांत व सातत्यपूर्ण सराव समाविष्ट होता. . . . शिक्षक आपल्या शिष्यांपुढे अनेक कायदेविषयक प्रश्न ठेवत असे व त्यांना या प्रश्नांवर निर्णय द्यावा लागे; शिक्षक, एकतर त्यांना उत्तर सांगू देत असे किंवा मग स्वतः ते सांगत असे. विद्यार्थ्यांना शिक्षकास प्रश्न विचारण्याची देखील परवानगी होती.”
रब्बींच्या मते निश्चितच, विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे गुण मिळवावे एवढेच सर्वकाही निश्चितच नव्हते. या शिक्षकांच्या हाताखाली शिकत असलेल्यांना सक्त ताकीद दिली जात होती: “जो कोणी शिकलेल्या धड्यांपैकी एकही अक्षर विसरतो—त्याच्यासाठी शास्त्रानुसार, हा एक जीवनमरणाचा प्रश्न ठरेल.” (एवॉट ३:८) “पाण्याचा एकही थेंब न गळू देणाऱ्या गिलावा दिलेल्या विहिरीसारखा” असणारा विद्यार्थी सर्वाधिक प्रशंसेस पात्र ठरत असे. (एवॉट २:८) तर मग, त्याकाळी तार्सकर शौल या त्याच्या हिब्रू नावाने ओळखल्या जाणाऱ्या पौलाने गमलिएलाकडून अशा प्रकारचे प्रशिक्षण ग्रहण केले होते.
गमलिएलाच्या शिकवणुकींचा आशय
परुशीय शिकवणुकींच्याच धर्तीवर, गमलिएलानेही मौखिक कायद्यावरील विश्वासास समर्थन दिले. याकरवी त्याने प्रेरित शास्त्रवचनांऐवजी रब्बींच्या संप्रदायांना अधिक महत्त्व दिले. (मत्तय १५:३-९) मिश्नामध्ये गमलिएलाचे पुढील कथन उद्धृत केलेले आहे: “एखाद्या गुरूच्या [रब्बीच्या] अधीन व्हा व स्वतःच्या शंकेचे निरसन करून घ्या, कारण तुम्ही अंदाज बांधून आवश्यकतेपेक्षा अधिक दशांश देता कामा नये.” (एवॉट १:१६) सांगण्याचे तात्पर्य असे, की विशिष्ट प्रसंगी काय करावे याबद्दल इब्री शास्त्रवचने स्पष्टपणे सांगत नसत तेव्हा, अशा बाबतीत एखाद्याने मनाप्रमाणे युक्तिवाद करून, स्वतःच्या सदसद्विवेकबुद्धीच्या आधारावर निर्णय घ्यावयाचा नव्हता. त्याऐवजी त्यास एखाद्या योग्यताप्राप्त रब्बीची मदत घ्यावी लागे व हा रब्बी त्यासाठी निर्णय घेत असे. गमलिएलाच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या व्यक्तीला पाप करण्याचे टाळावयाचे असल्यास त्याच्यासमोर हा एकमात्र मार्ग होता.—पडताळा रोमकर १४:१-१२.
तथापि, गमलिएल हा धार्मिक कायदेविषयक निर्णयांबद्दल तुलनात्मकपणे अधिक सोशीक म्हणजेच उदारमतवादी प्रवृत्ती बाळगत असल्यामुळे सर्वत्र सुविख्यात होता. उदाहरणार्थ, “एखाद्या स्त्रीला, [तिच्या पतीच्या मृत्यूचा] एकही साक्षीदार असल्यास त्याच्या साक्षीच्या आधारावर पुनर्विवाह करण्याची परवानगी” आपण देऊ असा निर्णय स्थापित करताना, त्याने स्त्रियांसाठी सहानुभूती दाखवली. (येवामॉट १६:७, मिश्ना) याशिवाय, घटस्फोट घेतलेल्यांस कायदेशीर संरक्षण देण्यासाठी गमलिएलाने सूटपत्र देण्याबाबत अनेक निर्बंध लावून दिले.
येशू ख्रिस्ताच्या प्रारंभिक अनुयायांसोबत गमलिएलाच्या संबंधांकडे पाहता, तेथेही त्याची हीच प्रवृत्ती दिसून येते. प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक सांगते, की प्रचार करण्याच्या आरोपावरून अटक केलेल्या येशूच्या प्रेषितांना इतर यहुदी नेते जिवे मारू पाहात होते तेव्हा, “सर्व लोकांनी प्रतिष्ठित मानलेला गमलिएल नावाचा एक परूशी शास्त्राध्यापक होता; त्याने न्यायसभेत उभे राहून त्या माणसांना थोडा वेळ बाहेर पाठविण्यास सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, अहो इस्राएल लोकांनो, तुम्ही ह्या माणसांचे काय करणार ह्याविषयी जपून असा. . . . मी तुम्हाला आता सांगतो, ह्या माणसांपासून दूर राहा व त्यांना जाऊ द्या; . . . तुम्ही . . . देवाचे विरोधी ठराल.” गमलिएलाचा सल्ला मानण्यात आला व प्रेषितांना मोकळे करण्यात आले.—प्रेषितांची कृत्ये ५:३४-४०.
पौलावर त्याचा कसा प्रभाव पडला?
पौलास सा. यु. प्रथम शतकातील सर्वश्रेष्ठ रब्बी शिक्षकाकडून प्रशिक्षण प्राप्त झाले होते. प्रेषित पौल गमलिएलाच्या संदर्भाने बोलला, त्यामुळे जेरुसलेम येथील लोकसमुदायाने त्याच्या भाषणाकडे विशेष लक्ष दिले याविषयी दुमत नाही. तथापि, त्याने त्या लोकांना, गमलिएलाच्या तुलनेत कितीतरी वरचढ असणाऱ्या एका शिक्षकाविषयी, अर्थात येशू मशीहाविषयी सांगितले. त्याअर्थी आता पौलाने गमलिएलाचा नव्हे तर येशूचा शिष्य या नात्याने लोकसमुदायाला भाषण दिले.—प्रेषितांची कृत्ये २२:४-२१.
गमलिएलाकडून मिळालेल्या प्रशिक्षणाचा, ख्रिस्ती या नात्याने पौलाच्या शिकवणुकींवर प्रभाव पडला का? धर्मशास्त्र व यहुदी कायदा यांबद्दल पौलास मिळालेले कडक शिक्षण, त्याला एका ख्रिस्ती शिक्षकाची भूमिका पार पाडताना कदाचित उपयोगी पडले असावे. तथापि, गमलिएलाच्या परुशीय समजुतीच्या मुलभूत आशयाचा पौलाने अव्हेर केला हे बायबलमधील, त्याने ईश्वरी प्रेरणेने लिहिलेल्या पत्रांवरून स्पष्ट होते. पौलाने आपल्या सह-यहुद्यांना व इतर सर्वांनाही, यहुदी धर्माच्या रब्बींकडे किंवा मानव-निर्मित संप्रदायांकडे नव्हे तर येशू ख्रिस्ताकडे निदेशित केले.—रोमकर १०:१-४.
पौल पुढेही गमलिएलाचा शिष्य राहिला असता तर त्याला चांगलीच प्रतिष्ठा लाभली असती. गमलिएलाच्या शिष्यांच्या गटातील इतरांनी, यहुदी धर्माचे भवितव्य घडविण्यास हातभार लावला. उदाहरणार्थ, कदाचित पौलाचा वर्गसोबती असलेला गमलिएलाचा पुत्र सिमियोन याचा रोमविरुद्ध यहुद्यांनी केलेल्या विद्रोहात सिंहाचा वाटा होता. मंदिराच्या विनाशानंतर, गमलिएलाचा नातू गमलिएल दुसरा याने सन्हेद्रिनाचा अधिकार पुनःस्थापित केला व त्यास याव्नेह येथे हलवले. दुसरा गमलिएल याचा नातू, यहुदा हा-नासी हा मिश्नाचा संकलक होता; आजही मिश्ना, यहुदी मतप्रणालीचा आधारभूत ग्रंथ आहे.
गमलिएलचा विद्यार्थी म्हणून तार्सकर शौल यहुदी धर्मात प्रमुख पद मिळवू शकला असता. तथापि, अशा प्रापंचिक ध्येयाबद्दल पौलाने लिहिले: “तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे; इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभु, ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानि असे समजतो; त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो, आणि त्या केरकचरा अशा लेखतो; ह्यासाठी की, मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा.”—फिलिप्पैकर ३:७, ८.
परुशी या नात्याने आपल्या प्रापंचिक ध्येयाचा त्याग करून येशू ख्रिस्ताचा अनुयायी बनण्याद्वारे पौलाने, ‘देवाचे विरोधी’ ठरू नये म्हणून सावध राहण्याविषयीचा आपल्या पूर्वीच्या शिक्षकाचा सल्ला व्यवहारात आणला. येशूच्या शिष्यांचा छळ करण्याचे थांबवण्याकरवी पौलाने देवाचा विरोध करण्याचे थांबवले. त्याउलट, ख्रिस्ताचा अनुयायी बनल्यामुळे तो ‘देवाच्या सहकाऱ्यांपैकी’ एक होऊ शकला.—१ करिंथकर ३:९.
खऱ्या ख्रिस्ती विश्वासाचा संदेश आजही यहोवाच्या आवेशी साक्षीदारांकरवी उद्घोषित केला जात आहे. पौलाप्रमाणे या साक्षीदारांपैकी अनेकांनी आपापल्या जीवनात लक्षणीय परिवर्तन घडवून आणले आहेत. काहींनी तर राज्य प्रचार कार्यात म्हणजेच जे खरोखर “देवाचे” आहे अशा कार्यात अधिक सहभाग घेता यावा म्हणून प्रगतीशील प्रापंचिक ध्येये देखील त्यागली आहेत. (प्रेषितांची कृत्ये ५:३९) पौलाचा पूर्वीचा शिक्षक, गमलिएल याचे नव्हे तर स्वतः पौलाचे उदाहरण अनुसरल्यामुळे ते किती धन्य आहेत!
[तळटीपा]
a गमलिएल हा हिल्लेलाचा पुत्र होता असे काही माहितीसूत्र सांगतात. तथापि, या बाबतीत तालमूद कोणतीही स्पष्ट माहिती देत नाही.
[२८ पानांवरील चित्रं]
तार्सकर शौलाने, प्रेषित पौल या नात्याने सर्व जातींच्या लोकांना सुवार्ता सांगितली