‘उपजतः बुद्धिमान’ असणारे प्राणी आपल्याला काय शिकवू शकतात
वातानुकूलन, गोठणविरोध, क्षार कमी करणारे व सोनार यंत्र, यांचा शोध २० व्या शतकामध्ये मानवजातीच्या परिचयाचा झाला आहे. पण हे सर्व गुणधर्म प्राण्यांमध्ये हजारो वर्षांच्या आधीपासूनच होते. होय, अशा ‘उपजतःच बुद्धिमान’ असलेल्या प्राण्यांचा अभ्यास केल्याने मानवजातीला लाभ होतो. (नीतिसूत्रे ३०:२४-२८; ईयोब १२:७-९) असे दिसते, की काही विशिष्ट प्राणी मानवजातीचे अबोल शिक्षक झाले आहेत, व त्यांचे परीक्षण करण्यास आपल्याला खूप आवडू शकते.
विशिष्ट प्राण्यांच्या लक्षणांचा विचार केल्याने आपल्याला लाभ होऊ शकतो का? येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांची तुलना मेंढरे, साप, कबुतरे आणि टोळ यांच्याशी देखील केली. आपल्या शिष्यांची तुलना अशा प्राण्यांसोबत करताना त्याच्या मनात काय होते बरे? चला पाहू या.
“माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात”
बायबलमध्ये मेंढरांचा उल्लेख २०० पेक्षा अधिक वेळा करण्यात आला आहे. स्मीथ यांचा बायबल विश्वकोष (इंग्रजी), स्पष्टीकरण देतो त्याप्रमाणे, “मेंढरू नम्रता, सहनशीलता आणि आज्ञाधारकता याचे प्रतीक आहे.” यशयाच्या ५३ व्या अध्यायात, स्वतः येशूची भविष्यसूचक तुलना एका मेंढरासोबत केली होती. तेव्हा त्याने आपल्या अनुयायांची तुलना या प्राण्याशी करणे किती योग्य आहे! पण मेंढराची कोणती विशिष्ट गुणलक्षणे येशूच्या मनात होती बरे?
“माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो व ती माझ्यामागे येतात,” असे येशू म्हणाला. (योहान १०:२७) अशाप्रकारे त्याने आपल्या शिष्यांची नम्रता व त्याचे अनुकरण करण्याच्या त्यांच्या उत्कंठेवर जोर दिला. खरोखरची मेंढरे आपल्या मेंढपाळाचे ऐकतात आणि स्वेच्छेने त्याचे अनुसरण करतात. मेंढपाळाची देखील कळपाशी जवळीक असते.
एखादा कळप कुरणावर चरत असताना इतरत्र विखुरलेला असला तरी, प्रत्येक मेंढराचे लक्ष संपूर्ण कळपाकडे असते. यास्तव, जेव्हा या प्राण्यांना असुरक्षित किंवा भीती वाटते तेव्हा “ते लगेच एकत्र जमू शकतात,” असे ऑलेस फ्यूर डॉस शॉफ (मेंढरांबद्दलची सर्व माहिती) या पुस्तकाने म्हटले. धोक्यापासून बचाव होण्याकरता जेव्हा मेंढरे पळू लागतात तेव्हा ते सर्व सोबत पळतात व परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी वेळोवेळी थांबतात. “टप्प्याटप्प्यांनी पळण्यामुळे कोकरांना व दुर्बळ प्राण्यांना कायम सोबत राहता येते. कळप त्यांना खास संरक्षणही देतो.” या वागणुकीवरून आपण काय शिकतो?
खरे ख्रिस्ती आज ख्रिस्ती धर्मजगताच्या पंथ व संप्रदायांमध्ये विखुरलेले नाहीत. उलट ते एक कळप या नात्याने एकत्रित आहेत. प्रत्येक ख्रिश्चनाला देवाच्या या कळपासोबतच्या व्यक्तिगत जवळीकीची जाणीव होते आणि यामुळे यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेच्या ऐक्याला हातभार लागतो. आणीबाणीचा प्रसंग येतो—मग तो गंभीर आजार, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती असो—तेव्हा प्रत्येक उपासक मार्गदर्शन व संरक्षणासाठी कोठे पाहतो बरे? यहोवाच्या संघटनेकडे, कारण ती आध्यात्मिक संरक्षण पुरवते.
बायबलचा सल्ला कशा रीतीने उपलब्ध करून दिला जातो? टेहळणी बुरूज आणि त्याच्या सोबतचे सावध राहा! या प्रकाशनांद्वारे. ही नियतकालिके तसेच ख्रिस्ती सभा, कळपातील कोकरे आणि दुर्बळ मेंढरांप्रमाणे जादा काळजी हवी असणाऱ्यांना खास मदत देतात. उदाहरणार्थ, एकटे पालक आणि नैराश्याचा सामना करणाऱ्यांकडे लक्ष दिले जाते. तेव्हा, प्रत्येक नियतकालिक वाचणे, मंडळीच्या प्रत्येक सभेला उपस्थित राहणे व शिकत असलेल्या सर्व गोष्टी लागू करणे किती सुज्ञतेचे आहे बरे! अशा प्रकारे आपण नम्रता व देवाच्या कळपाशी दृढ जवळीक प्रकट करतो.—१ पेत्र ५:२.
“सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी”
स्मीथ यांचा बायबल विश्वकोष म्हणतो: “पूर्वेकडील सर्व भागात, सापाचा वापर दुष्ट तत्त्वाचे, अवज्ञेच्या आत्म्याचे प्रतीक असा केला जात होता.” दुसऱ्या बाजूला पाहता, “माझे कपोते” ही प्रेमाची संज्ञा होती. (गीतरत्न ५:२) मग, “सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा” असे येशूने आपल्या शिष्यांना उत्तेजन दिले तेव्हा त्याच्या मनामध्ये काय होते बरे?—मत्तय १०:१६.
येशू, प्रचार करणे व शिकवणे यांबद्दलच्या सूचना देत होता. त्याचे शिष्य संमिश्र प्रतिसादाची अपेक्षा करू शकत होते. कमी लोक आस्था दाखवणार होते परंतु इतर लोक सुवार्तेला नाकारणार होते. काही तर देवाच्या सेवकांचा छळ देखील करणार होते. (मत्तय १०:१७-२३) शिष्यांनी छळाप्रती कोणती प्रतिक्रिया दाखवावयास हवी होती?
डस एवेनजिलियम डेस मतायुस (मत्तयाचे शुभवर्तमान) या पुस्तकात, फ्रिट्झ रायनेकर मत्तय १०:१६ विषयी असे म्हणतात: “चातुर्यासोबत . . . सत्त्व, प्रामाणिकपणा व निष्कपटता देखील असली पाहिजे, नाहीतर शत्रूंना तक्रारीकरता योग्य कारणे देण्यासाठी काहीही घडू शकते. येशूचे राजदूत, प्रेषितांचा विचार न करणाऱ्या व थोड्याशा संधीला देखील निर्दयपणे प्रेषितांवर हल्ला करणाऱ्या निष्ठुर शत्रूंमध्ये राहतात. यास्तव—सापाप्रमाणेच—शत्रूंवर लक्ष ठेवणे व डोळ्यांनी व जागृत ज्ञानेन्द्रियांनी परिस्थितीकडे लक्ष देऊन पाहणे; चालबाजी किंवा लबाडी न करता परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे, बोलण्यात व कृतीत शुद्ध व सत्य असणे आणि अशाप्रकारे स्वतःला कबुतराप्रमाणे शाबीत करणे अत्यंत जरूरीचे आहे.”
मत्तय १०:१६ मधील येशूच्या शब्दांवरून देवाचे आधुनिक दिवसांतील सेवक काय शिकू शकतात? पहिल्या शतकात लोक ज्याप्रकारे सुवार्तेला प्रतिसाद देत होते तसाच प्रतिसाद ते आजही देतात. छळाचा सामना करताना खऱ्या ख्रिश्चनांनी सापाच्या चातुर्यासोबत कबुतरासारख्या शुद्धतेप्रमाणे असणे जरूरीचे आहे. ख्रिस्ती जण केव्हाही लबाडी किंवा अप्रामाणिकतेचा उपयोग करीत नाहीत परंतु ते इतरांना राज्याच्या संदेशाची घोषणा करण्यात शुद्ध, खरे आणि प्रामाणिक आहेत.
उदाहरण द्यायचे झाल्यास: नोकरीच्या ठिकाणावरील सहकर्मचारी, शाळेतील तरुण, किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य देखील, यहोवाचा एक साक्षीदार या नात्याने असलेल्या तुमच्या विश्वासांबद्दल मर्मभेदक शेरे मारतील. तेव्हा लागलीच त्यांच्या विश्वासांबद्दलही तेवढाच खरमरीत प्रतिसाद देण्याची आपली प्रतिक्रिया असू शकते. पण हे वागणे निष्कपटतेचे ठरेल का? मुळीच नाही. तुमची टीका करणाऱ्यांना जर तुम्ही हे दाखवून दिले, की त्यांच्या शेऱ्यांचा तुमच्या आनंदी वर्तणुकीवर काहीच प्रभाव पडत नाही, तेव्हा ते स्वतःच शांत होतील. तेव्हा तुम्ही बुद्धिमान तसेच निष्कलंक—“सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी” ठराल.
‘लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे स्वरूप असलेले टोळ’
जिओ नावाचे एक नियतकालिक असा अहवाल देते, की १७८४ मध्ये दक्षिण आफ्रिकेवर “[टोळांच्या] थव्यांची धाड आली होती जी इतिहासात आजपर्यंत कधीच इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हती.” ही टोळधाड हाँग काँगच्या आकाराच्या पाच पट म्हणजे ५,२०० चौ. किमी विस्ताराची होती. स्मीथ यांचा बायबल विश्वकोष (इंग्रजी) म्हणतो, की टोळ ज्या देशांत भ्रमण करतात तेथील “पीकांचे अतिशय वाईटरीत्या नुकसान करतात.”
येशूने “प्रभूच्या दिवशी” घडणाऱ्या गोष्टींच्या देवप्रणित प्रकटीकरणात, टोळांच्या थव्याच्या दृष्टान्ताचा उपयोग केला. त्यांच्याविषयी ‘लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे स्वरूप असलेले टोळ,’ असे म्हटले होते. (प्रकटीकरण १:१, १०; ९:३-७) या संकेतपद्धतीचा अर्थ काय होता?
प्रकटीकरण ९ व्या अध्यायातील टोळ या शतकात पृथ्वीवरील देवाच्या अभिषिक्त सेवकांना चित्रित करतात हे यहोवाच्या साक्षीदारांनी केव्हाच समजून घेतले आहे.a या ख्रिश्चनांना एक विशिष्ट कार्य नेमण्यात आले आहे—संपूर्ण पृथ्वीवर राज्याच्या संदेशाचा प्रचार करणे व शिष्य बनवणे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) यासाठी त्यांना अडथळ्यांवर मात करावी लागते व त्यांच्या कार्यात टिकून राहावे लागते. याचे उदाहरण दुर्दम्य टोळांपेक्षा इतर कोणत्याही गोष्टीद्वारे उत्तमरीत्या देता येऊ शकेल का?
एका टोळाची लांबी पाच सेंटीमीटर पेक्षा थोडीशी जास्त असली तरी, तो सामान्यपणे दर दिवशी १०० व २०० किलोमीटरच्या दरम्यान भ्रमण करतो. वाळवंटी टोळ तर १,००० किलोमीटरपर्यंत भ्रमण करू शकतात. “ते, दर सेकंदाला १८ वेळा व दिवसाला १७ तासांसाठी त्यांचे पंख फडफडतात—इतर कोणतेही किटक असे करू शकत नाही,” असे जिओ म्हणते. या चिमुकल्या प्राण्यासाठी केवढे मोठे हे काम!
गट या नात्याने, यहोवाचे साक्षीदार राज्याच्या सुवार्तेचा प्रसार धैर्याने करतात. ते आता २३० पेक्षा अधिक देशांत प्रचार करतात. हे कार्य पूर्ण करण्यामध्ये भाग घेण्यासाठी देवाच्या या सेवकांना पुष्कळ अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. त्यांना कोणत्या प्रकारच्या अडीअडचणींना तोंड द्यावे लागते? कलुषितपणा, कायदेशीर बंधने, आजारपण, निरुत्साह आणि नातेवाईकांकडून विरोध, या काही समस्या आहेत. पण कोणतीही गोष्ट त्यांची प्रगती थांबवू शकली नाही. ते देवाने त्यांना दिलेल्या कार्याशी जडून राहतात.
ख्रिस्ती गुण प्रकट करत राहा
होय, येशूने आपल्या अनुयायांची तुलना मेंढरे, साप, कबुतरे आणि टोळ यांच्याशी केली. हे आपल्या दिवसांकरता उचित आहे. असे का? कारण या युगाचा शेवट जवळ येऊन ठेपला आहे, आणि समस्या पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहेत.
येशूच्या लाक्षणिक शब्दांना लक्षात ठेवून खरे ख्रिस्ती देवाच्या कळपाच्या समीप राहतात आणि यहोवाच्या संघटनेकडून येणारा सल्ला नम्रतेने स्वीकारतात. ते नेहमी जागृत असतात व सर्व गोष्टींमध्ये निष्कलंक राहताना त्यांच्या ख्रिस्ती कार्यांमध्ये कदाचित अडथळा आणणाऱ्या परिस्थितींविषयी दक्ष असतात. शिवाय, अडचणींमध्येसुद्धा ते देवाची इच्छा पूर्ण करण्यात टिकून आहेत. तसेच ‘उपजतः बुद्धिमान’ असलेल्या प्राण्यांकडून ते नेहमी काही ना काही तरी शिकत असतात.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ इंडियाने प्रकाशित केलेल्या प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! या पुस्तकाचा २२ वा अध्याय पाहा.