या शेवटल्या दिवसांमध्ये ऐक्य टिकवून ठेवा
‘सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहा.’ —फिलिप्पैकर १:२७.
१. यहोवाचे साक्षीदार आणि जग यांच्यामध्ये कोणता फरक आहे?
हे ‘शेवटले दिवस’ आहेत. म्हणूनच तर “कठीण दिवस” आले आहेत यात काही प्रश्नच नाही. (२ तीमथ्य ३:१-५) ‘अंत समयात’ मानव समाजातील अस्वस्थतेत, यहोवाचे साक्षीदार त्यांच्यातील शांती व ऐक्यामुळे अगदी उठून दिसतात. (दानीएल १२:४) परंतु यहोवाच्या उपासकांच्या विश्वव्यापी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने हे ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी कष्ट केले पाहिजेत अशी तिच्याकडून अपेक्षा केली जाते.
२. ऐक्य टिकवून ठेवण्याविषयी पौल काय म्हणाला, व आपण कोणत्या प्रश्नांवर विचार करणार आहोत?
२ प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना ऐक्य टिकवून ठेवण्यास आर्जवले. त्याने लिहिले: “ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकजिवाने सुवार्तेच्या विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर राहता; आणि विरोध करणाऱ्या लोकांकडून कशाविषयीहि भयभीत झाला नाही; हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे, आणि ते देवापासून आहे.” (फिलिप्पैकर १:२७, २८) ख्रिस्ती या नात्याने आपण एकत्र मिळून कार्य केले पाहिजे हे पौलाचे शब्द स्पष्टपणे दाखवून देतात. तेव्हा मग, या कठीण काळात आपले ख्रिस्ती ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करील?
ईश्वरी इच्छेच्या अधीन व्हा
३. सुंता न झालेले विदेशी कधी आणि केव्हा ख्रिस्ताचे अनुयायी झाले?
३ आपले ऐक्य टिकवून ठेवण्याचा एक मार्ग, सर्ववेळी ईश्वरी इच्छेच्या अधीन होणे हा होय. यासाठी आपल्याला आपल्या विचारसरणीत फेरबदल करावा लागेल. येशू ख्रिस्ताच्या आरंभीच्या यहुदी शिष्यांचा विचार करा. प्रेषित पेत्राने सा. यु. ३६ मध्ये सुंता न झालेल्या विदेश्यांना पहिल्यांदा प्रचार केला तेव्हा, परराष्ट्रीय लोकांवर देवाने आपला पवित्र आत्मा ओतला आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. (प्रेषितांची कृत्ये १० वा अध्याय) तोपर्यंत, केवळ यहुदी, यहुदीधर्माचे यहूदीय मतानुसारी आणि शोमरोनी लोक येशू ख्रिस्ताचे अनुयायी झाले होते.—प्रेषितांची कृत्ये ८:४-८, २६-३८.
४. कर्नेल्य याच्या बाबतीत काय झाले त्याचे स्पष्टीकरण दिल्यानंतर पेत्राने काय म्हटले, व यामुळे येशूच्या यहुदी शिष्यांवर कोणती परीक्षा आली?
४ प्रेषितांना व जेरूसलेममधील इतर बांधवांना कर्नेल्य आणि इतर विदेश्यांच्या परिवर्तनाविषयी समजले तेव्हा पेत्राचा अहवाल ऐकण्याची त्यांना उत्कंठा लागली होती. कर्नेल्य आणि इतर विश्वासू विदेश्यांच्या बाबतीत काय घडले होते त्याचे वर्णन दिल्यानंतर प्रेषिताने अशारीतीने समारोप केला: “जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास [यहुदी] तसे त्यांसहि [ते विश्वासू विदेशी] देवाने सारखेच दान [पवित्र आत्मा] दिले; तर मग देवाला अडविणारा असा मी कोण?” (प्रेषितांची कृत्ये ११:१-१७) यामुळे, येशू ख्रिस्ताच्या यहुदी अनुयायांना एका परीक्षेला तोंड द्यावे लागले. ते देवाच्या इच्छेच्या अधीन होऊन आपले सहउपासक म्हणून विश्वासू विदेश्यांचा स्वीकार करणार का? की यहोवाच्या पार्थिव सेवकांचे ऐक्य धोक्यात येणार होते?
५. देवाने विदेश्यांसाठी पश्चात्तापाची अनुमती दिली होती या वस्तुस्थितीला प्रेषितांनी व इतर बांधवांनी कसा प्रतिसाद दिला, आणि या मनोवृत्तीवरून आपण काय शिकू शकतो?
५ अहवाल म्हणतो: “हे ऐकून ते [प्रेषित आणि इतर बांधव] उगे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले, ‘तर मग देवाने परराष्ट्रीयांसहि जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धि दिली आहे.’” (प्रेषितांची कृत्ये ११:१८) या मनोवृत्तीने येशूच्या अनुयायांमधील ऐक्य टिकवून ठेवले व त्याला बढती मिळाली. अल्प समयातच, प्रचाराचे कार्य विदेश्यांमध्ये, किंवा राष्ट्रांतील लोकांमध्ये वाढत गेले आणि अशा कार्यांवर यहोवाचा आशीर्वाद होता. एखाद्या नवीन मंडळीच्या स्थापनेबाबत किंवा देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली काही ईश्वरशासित तडजोडीबाबत तुमच्या सहकार्याची विनंती केली जाते तेव्हा आपण स्वतःहून याला मूकसंमती दिली पाहिजे. पूर्ण अंतःकरणाने आपण दिलेले सहकार्य यहोवाला आवडेल व ते आपल्याला या शेवटल्या दिवसांमध्ये आपले ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत करील.
सत्याशी जडून राहा
६. यहोवाच्या उपासकांच्या ऐक्यावर सत्याचा कोणता परिणाम होतो?
६ आपण सर्व जण ‘यहोवाने शिकवलेले’ आहोत व त्याने प्रगट केलेल्या सत्याला दृढपणे जडून आहोत म्हणून यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग या नात्याने आपल्यामध्ये ऐक्य टिकून आहे. (योहान ६:४५; स्तोत्र ४३:३) आपल्या शिकवणुकी देवाच्या वचनावर आधारित असल्यामुळे आपण सर्व जण एकवाक्यतेत बोलतो. ‘विश्वासू आणि बुद्धिमान दासाकरवी’ यहोवा जे आध्यात्मिक अन्न उपलब्ध करून देतो ते आपण आनंदाने स्वीकारतो. (मत्तय २४:४५-४७) अशी एकाच प्रकारची शिकवण जगभरात आपले ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत करते.
७. एखादा विशिष्ट मुद्दा समजण्यास आपल्याला व्यक्तिगतरीत्या कठीण वाटत असल्यास आपण काय करावे, व काय करू नये?
७ परंतु एखादा विशिष्ट मुद्दा समजण्यास किंवा स्वीकारण्यास आपल्याला जड जात असल्यास काय? आपण ज्ञानासाठी प्रार्थना करावी आणि शास्त्रवचनांमध्ये तसेच ख्रिस्ती प्रकाशनांमध्ये संशोधन करावे. (नीतिसूत्रे २:४, ५; याकोब १:५-८) वडिलांसोबत चर्चा करणे मदतदायक ठरू शकते. आणि तरीही मुद्दा समजत नसेल तर त्यावर अधिक विचार न करणे उत्तम. कदाचित, त्या विषयावर अधिक माहिती प्रकाशित करण्यात येईल व तेव्हा आपल्याला स्पष्ट समज मिळेल. परंतु तफावत असलेले आपले स्वतःचे मत स्वीकारण्यास मंडळीतील इतरांना पटवून देणे चुकीचे ठरेल. असे करणे म्हणजे, ऐक्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी विसंगती पसरविणे होय. तेव्हा, ‘सत्यात चालत’ राहणे व इतरांनाही असेच करण्याचे उत्तेजन देणे केवढे उत्तम आहे बरे!—३ योहान ४.
८. सत्याबद्दलची कोणती मनोवृत्ती उचित आहे?
८ पहिल्या शतकामध्ये, पौलाने म्हटले: “हल्ली आपल्याला आरशांत अस्पष्ट असे दिसते; परंतु नंतर आपण साक्षात् पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे; पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन.” (१ करिंथकर १३:१२) प्रारंभीच्या ख्रिश्चनांना सर्व काही सविस्तरपणे समजले नसले तरी, ते संयुक्त राहिले. आपल्याला आता यहोवाचे उद्देश आणि त्याच्या सत्याच्या वचनाबद्दलची स्पष्ट समज मिळाली आहे. यास्तव, ‘विश्वासू दासाकरवी’ मिळालेल्या सत्याबद्दल आपण कृतज्ञ असू या. तसेच यहोवाने त्याच्या संघटनेकरवी आपल्याला मार्गदर्शन केल्याबद्दल आपण त्याचे आभार मानू या. आपल्या सर्वांकडे एकाच प्रमाणात ज्ञान नसले तरी, आपण आध्यात्मिकरीत्या भुकेले किंवा तान्हेले नाही. उलट आपला मेंढपाळ यहोवा याने आपल्याला संयुक्त ठेवून आपली चांगली काळजी घेतली आहे.—स्तोत्र २३:१-३.
जिभेचा नीट वापर करा!
९. ऐक्याला बढती देण्यासाठी जिभेचा कशारीतीने वापर करता येऊ शकतो?
९ इतरांना उत्तेजन देण्यासाठी जिभेचा वापर करणे, हा ऐक्याला व बंधुत्वाच्या आत्म्याला वाढवणारा महत्त्वपूर्ण मार्ग होय. पहिल्या शतकातील नियमन मंडळाने सुंतेचा प्रश्न सोडवणाऱ्या उत्तरासंबंधाने पाठवलेले पत्र उत्तेजनाचा एक स्रोत होते. ते वाचल्यानंतर, ॲन्टीयोकमधील विदेशी शिष्यांना “आनंद झाला.” जेरुसलेममधून ज्यांच्या हाती पत्र पाठवले त्या यहुदा व सीला यांनी “पुष्कळ बोलून बंधुजनांना बोध केला व स्थिरावले.” पौल व बर्णबा यांच्या उपस्थितीमुळे ॲन्टीयोकमधील सहविश्वासूंना पुष्कळ उत्तेजन व बळकटी मिळाली यात काही शंका नाही. (प्रेषितांची कृत्ये १५:१-३, २३-३२) आपण देखील ख्रिस्ती सभांसाठी एकत्र जमतो तेव्हा असेच करू शकतो व आपल्या उपस्थितीद्वारे आणि उभारणीकारक विवेचनांद्वारे ‘एकमेकांना’ उत्तेजन देऊ शकतो.—इब्री लोकांस १०:२४, २५.
१०. एखाद्याची निंदा केली जात असल्यास ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी काय करावे लागेल?
१० तथापि, जिभेचा गैरवापर आपल्या ऐक्याला धोका ठरू शकतो. “जीभहि लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पाहा, लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटविते!” असे शिष्य याकोबाने लिहिले. (याकोब ३:५) भांडणे लावणाऱ्यांचा यहोवाला वीट आहे. (नीतिसूत्रे ६:१६-१९) अशामुळे ऐक्यभंग होऊ शकतो. पण मग, जर एखाद्याची निंदा केली जाते म्हणजे, एखाद्याला शिवीगाळ केली जाते किंवा त्याच्याशी वा तिच्याशी अपमानास्पद भाष्य केले जाते तेव्हा काय? वडील जन चूक करणाऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करतील. परंतु, अपश्चात्तापीपणे शिवीगाळ करणाऱ्याला बहिष्कृत केले पाहिजे जेणेकरून मंडळीची शांती, व्यवस्था व ऐक्य टिकवून ठेवता येईल. नाही तरी पौलाने लिहिले: ‘बंधु म्हटलेला असा कोणी शिवीगाळी करत असला तर तशाची संगत धरू नये. त्याच्या पंक्तीसहि बसू नये.’—१ करिंथकर ५:११.
११. आपल्या बोलण्यामुळे आपल्यामध्ये आणि एखाद्या सहविश्वासूमध्ये तणाव निर्माण झाला असल्यास नम्रता महत्त्वपूर्ण का आहे?
११ जिभेला लगाम लावल्यामुळे ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत होते. (याकोब ३:१०-१८) परंतु समजा आपल्या बोलण्यामुळे आपल्यामध्ये आणि एखाद्या सहख्रिश्चनामध्ये तंग वातावरण निर्माण झालेले असेल. तेव्हा आपल्या बांधवासोबत शांतता घडवून आणण्यासाठी आपण पुढाकार घेणे, आवश्यकता असल्यास क्षमा मागणे उचित ठरणार नाही का? (मत्तय ५:२३, २४) हे खरे आहे की, यासाठी नम्रता किंवा मनाची दीनता लागते, पण पेत्राने लिहिले: “एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारुपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करितो, आणि लीनांवर कृपा करितो.” (१ पेत्र ५:५) नम्रता आपल्याला आपल्या बांधवासोबत ‘शांती राखण्यास,’ आपल्या चुका कबूल करण्यास व योग्यरीत्या क्षमा मागण्यास प्रवृत्त करील. हे आपल्याला यहोवाच्या कुटुंबातील ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत करते.—१ पेत्र ३:१०, ११.
१२. यहोवाच्या लोकांमध्ये ऐक्याला बढती देण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्या जिभेचा आपण कसा वापर करू शकतो?
१२ आपल्या जिभेच्या योग्य वापराद्वारे आपण यहोवाच्या संघटनेत असणाऱ्यांमधील कौटुंबिक आत्मा वाढवू शकतो. पौलाने तेच केल्यामुळे तो थेस्सलनीकाकरांना याची आठवण करून देऊ शकला की, ‘तुम्हास ठाऊकच आहे की, बाप आपल्या मुलांना करितो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की, देवाला शोभेल असे तुम्ही शेवटपर्यंत चालावे.’ (१ थेस्सलनीकाकर २:११, १२) याबाबतीत पौलाने उत्तम उदाहरण मांडल्यामुळे “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या,” असे तो सहख्रिश्चनांना आर्जवू शकला. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) इतरांना धीर देण्यास, उत्तेजन देण्यास व त्यांची उभारणी करण्यास आपल्या जिभेचा वापर केल्यामुळे आपण किती उत्तम करू शकतो याचा जरा विचार करा. होय, “समयोचित बोल किती उत्तम!” (नीतिसूत्रे १५:२३) शिवाय, अशा प्रकारचे बोल यहोवाच्या लोकांमध्ये ऐक्य वाढवण्यास व टिकवून ठेवण्यास हातभार लावतात.
क्षमाशील असा!
१३. आपण क्षमाशील का असले पाहिजे?
१३ ख्रिस्ती ऐक्य टिकवून ठेवावयाचे आहे तर, ज्याने क्षमा मागितली आहे अशा अपराध्याला क्षमा करणे जरूरीचे आहे. आपण किती वेळा क्षमा केली पाहिजे? येशूने पेत्राला सांगितले: ‘फक्त सात वेळा नव्हे तर साताच्या सत्तर वेळा.’ (मत्तय १८:२२) आपण क्षमाशील नसल्यास आपल्याच हिताविरुद्ध कार्य करीत असतो. ते कसे? वैरभाव व अढी जोपासल्यामुळे आपल्या मनाची शांती हिरावून घेतली जाते. आणि आपण क्रूर व निष्ठुर म्हणून प्रसिद्ध झालो तर स्वतःवर संकट ओढवून घेऊ शकतो. (नीतिसूत्रे ११:१७) मनामध्ये अढी बाळगणे देवाला आवडत नाही व त्यामुळे आपण गंभीर पाप करू शकतो. (लेवीय १९:१८) दुष्ट हेरोदिया बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर “डाव धरून” असल्यामुळे तिने योजलेल्या कटामध्ये त्याचा शिरच्छेद करण्यात आला हे लक्षात ठेवा.—मार्क ६:१९-२८.
१४. (अ) मत्तय ६:१४, १५ आपल्याला क्षमाशीलतेविषयी काय शिकवते? (ब) एखाद्याला क्षमा करण्याआधी आपण नेहमीच त्याने माफी मागावी म्हणून थांबून राहिले पाहिजे का?
१४ येशूच्या आदर्श प्रार्थनेत “आम्हाला आमच्या पापांची क्षमा कर, कारण आम्हीहि आपल्या प्रत्येक ऋण्याला क्षमा करितो,” हे शब्द आहेत. (लूक ११:४) आपण क्षमाशील नसल्यास, आपल्यासमोर एक धोका आहे आणि तो म्हणजे एक ना एक दिवशी यहोवा देव आपल्या पापांना क्षमा करण्याचे थांबवील, कारण येशूने म्हटले: “तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हांलाहि क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताहि तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.” (मत्तय ६:१४, १५) यास्तव, यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबामध्ये आपल्या बाजूने आपण खरोखरच ऐक्य टिकवून ठेवू इच्छितो तर, अविचारीपणामुळे व कोणत्याही दुष्ट हेतूविना आपल्याविरुद्ध केलेल्या अपराधाला कदाचित विसरून जाऊन आपण क्षमा करणारे ठरु. पौलाने म्हटले: “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीहि करा.” (कलस्सैकर ३:१३) आपण क्षमाशील असतो तेव्हा यहोवाच्या संघटनेतील मौल्यवान ऐक्य टिकवून ठेवण्यास हातभार लावतो.
ऐक्य व व्यक्तिगत निर्णय
१५. व्यक्तिगत निर्णय घेताना ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी यहोवाच्या लोकांना कोणती गोष्ट मदत करते?
१५ देवाने आपल्याला व्यक्तिगत निर्णय घेण्याचा सुहक्क व जबाबदारी देऊन स्वतंत्र नैतिक प्राणी असे निर्माण केले आहे. (अनुवाद ३०:१९, २०; गलतीकर ६:५) तरीही आपण बायबलचे नियम व तत्त्व मान्य करत असल्यामुळे आपले ऐक्य टिकवून ठेवू शकतो. व्यक्तिगत निर्णय घेताना आपण त्यांचाही विचार करतो. (प्रेषितांची कृत्ये ५:२९; १ योहान ५:३) समजा तटस्थतेविषयी एखादा प्रश्न उभा राहिला. आपण या ‘जगाचे भाग नाही’ व “आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ” केले आहे या गोष्टींची आठवण करून आपण माहीतगार व्यक्तिगत निर्णय घेऊ शकतो. (योहान १७:१६; यशया २:२-४) त्याचप्रकारे, सरकारासोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयी आपल्याला व्यक्तिगत निर्णय घ्यावा लागतो तेव्हा, लौकिक बाबींमध्ये स्वतःला “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या” अधीन ठेवून “देवाचे ते देवाला” देण्याविषयी बायबल काय म्हणते त्याचा आपण विचार करतो. (लूक २०:२५; रोमकर १३:१-७; तीत ३:१, २) होय, व्यक्तिगत निर्णय घेताना बायबलच्या नियमांना व तत्त्वांना विचारात घेतल्याने आपले ख्रिस्ती ऐक्य टिकून राहण्यास मदत मिळते.
१६. शास्त्रवचनीयदृष्ट्या बरोबर किंवा चुकीचे नसलेले निर्णय घेताना ऐक्य टिकवून ठेवण्यास आपण कसा हातभार लावू शकतो? उदाहरण द्या.
१६ पूर्णपणे व्यक्तिगत स्वरुपाचा आणि शास्त्रवचनीयदृष्ट्या बरोबर किंवा चुकीचा नसणारा निर्णय घेताना देखील आपण ख्रिस्ती ऐक्य टिकवून ठेवण्यास हातभार लावू शकतो. ते कसे? आपल्या निर्णयामुळे ज्यांच्यावर परिणाम झाला अशांना प्रेमळ काळजी दाखवण्याद्वारे. उदाहरण द्यायचे झाल्यास: प्राचीन करिंथमधील मंडळीमध्ये मूर्तीला अर्पिलेले मांस खाण्याविषयी एक वाद निर्माण झाला होता. अर्थात, एक ख्रिस्ती, मूर्तिपूजक समारंभात भाग घेणार नाही. परंतु, योग्यरीत्या कत्तल करण्यात आलेले व बाजारात विकले जाणारे अशा प्रकारचे मांस खाणे पाप नव्हते. (प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; १ करिंथकर १०:२५) तरीसुद्धा, अशा प्रकारचे मांस खाण्यावर काही ख्रिश्चनांचा विवेक त्यांना अनुमती देत नव्हता. म्हणूनच, अशांना अडखळण होऊ नये असे पौलाने इतर ख्रिश्चनांना आर्जवले. वास्तविक पाहता त्याने लिहिले: “अन्नामुळे माझ्या बंधूला अडखळण होत असेल तर मी आपल्या बंधूला अडखळवू नये म्हणून मी मांस कधीच खाणार नाही.” (१ करिंथकर ८:१३) यास्तव, अशा वेळी कोणत्याही बायबल नियमाचा किंवा तत्त्वाचा समावेश नसला तरी, देवाच्या कुटुंबाच्या ऐक्यावर कदाचित प्रभाव पाडू शकतील असे व्यक्तिगत निर्णय करण्याआधी इतरांचा विचार करणे केवढे प्रेमळपणाचे आहे बरे!
१७. व्यक्तिगत निर्णय घ्यावे लागतात तेव्हा आपण काय करणे उचित आहे?
१७ कोणत्या मार्गाक्रमणाचा अवलंब करावा याबद्दल आपण निश्चित नसल्यास, आपला विवेक शुद्ध राहील असे मार्गाक्रमण निवडणे बुद्धिमत्तेचे आहे, व इतरांनी आपल्या निर्णयाचा आदर करावा. (रोमकर १४:१०-१२) अर्थात, व्यक्तिगत निर्णय घेताना आपण प्रार्थनेद्वारे यहोवाचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण आत्मविश्वासाने प्रार्थना करू शकतो: “माझ्याकडे आपला कान लाव; . . . कारण माझा दुर्ग व माझा गड तूच आहेस; तू आपल्या नावासाठी मला हाती धरून चालीव.”—स्तोत्र ३१:२, ३.
ख्रिस्ती ऐक्य नेहमी टिकवून ठेवा
१८. पौलाने ख्रिस्ती मंडळीतील ऐक्याचे उदाहरण कशाप्रकारे दिले?
१८ पौलाने १ करिंथकर १२ व्या अध्यायात, ख्रिस्ती मंडळीतील ऐक्याचे उदाहरण देण्यासाठी मानवी शरीराचा उल्लेख केला. त्याने परस्परावलंबनावर आणि प्रत्येक अवयवाच्या महत्त्वावर जोर दिला. पौलाने विचारले, “ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की, ‘मला तुझी गरज नाही.’ तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की, ‘मला तुमची गरज नाही.’” (१ करिंथकर १२:१९-२१) त्याचप्रकारे, यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबामधील आपल्या सर्वांचा एकसारखाच कार्यभाग नसतो. तरीसुद्धा, आपण संयुक्त आहोत, आणि आपल्याला एकमेकांची गरज आहे.
१९. देवाच्या आध्यात्मिक तरतुदींपासून आपण लाभ कसा मिळवू शकतो, व याबाबतीत एका वृद्ध बांधवाने काय म्हटले?
१९ शरीराला ज्याप्रमाणे अन्न, काळजी आणि मार्गदर्शनाची गरज आहे, तसेच आपल्यालाही देव त्याचे वचन, त्याचा आत्मा आणि त्याची संघटना यांच्याद्वारे पुरवत असलेल्या आध्यात्मिक तरतुदींची आवश्यकता आहे. या तरतुदींपासून लाभ मिळवण्यासाठी आपण यहोवाच्या पार्थिव कुटुंबाचे एक भाग असले पाहिजे. देवाच्या सेवेत अनेक वर्षे घालवल्यानंतर एका बांधवाने लिहिले: “मी यहोवाच्या उद्देशांविषयी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार, १९१४ च्या सुरवातीच्या दिवसांपासून, जेव्हा सर्वच सत्य इतके स्पष्ट नव्हते तेव्हापासून . . . सत्य जसे भरदुपारच्या सूर्याप्रमाणे प्रकाशते त्या आजपर्यंत आपले जीवन व्यतित केले आहे याबद्दल मी फार ऋणी आहे. एक गोष्ट मला महत्त्वपूर्ण वाटते व ती म्हणजे, यहोवाच्या दृश्य संघटनेच्या निकट राहणे. माझ्या पूर्वीच्या अनुभवाने मला, मानवी तर्कावर अवलंबून राहणे किती चुकीचे आहे हे शिकवले. या बाबतीत माझ्या मनाने एकदाचा निर्धार केल्यावर मी संघटनेसोबत विश्वासू राहण्याचा दृढनिश्चय केला. आणखी कोणत्या दुसऱ्या मार्गाने एखादा यहोवाची कृपापसंती व आशीर्वाद मिळवू शकेल बरे?”
२०. यहोवाचे लोक या नात्याने आपल्या ऐक्याविषयी काय करण्यास आपण दृढनिश्चयी असले पाहिजे?
२० यहोवाने आपल्या लोकांना जगाच्या अंधकारातून व फुटीतून बाहेर काढले आहे. (१ पेत्र २:९) त्याने आपल्याला त्याच्या सोबतच्या आणि आपल्या सहविश्वासूंसोबतच्या आशीर्वादित ऐक्यात आणले आहे. हे ऐक्य नजीकच्या नवीन व्यवस्थीकरणामध्ये असेल. यास्तव, या शेवटल्या कठीण काळामध्ये, आपण “प्रीति धारण” करत राहू आणि आपले मौल्यवान ऐक्य वाढवण्यासाठी व ते टिकवून ठेवण्यासाठी सर्वकाही करत राहू या.—कलस्सैकर ३:१४.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ देवाची इच्छा पूर्ण केल्याने व सत्याशी जडून राहिल्याने आपल्याला ऐक्य टिकवून ठेवण्यास मदत होते ते का?
◻ जिभेच्या योग्य वापराचा संबंध ऐक्याशी कसा आहे?
◻ क्षमाशील असण्यामध्ये काय गोवले आहे?
◻ व्यक्तिगत निर्णय घेताना आपण ऐक्य कसे टिकवून ठेवू शकतो?
◻ ख्रिस्ती ऐक्य टिकवून का ठेवावे?
[१६ पानांवरील चित्रं]
हा मेंढपाळ त्याचा कळप एकत्र ठेवतो त्याचप्रमाणे यहोवा त्याच्या लोकांना एकतेत ठेवतो
[१८ पानांवरील चित्रं]
आपण एखाद्याविरुद्ध अपराध करतो, तेव्हा नम्रतेने क्षमा मागण्याद्वारे आपण ऐक्य वाढवण्यास मदत करतो