देव हर तऱ्हेच्या उपासना स्वीकारतो का?
देवाने मानवाला आध्यात्मिक गरजेसह, अर्थात उपासना करण्याच्या गरजेसह निर्माण केले. ही गरज आपोआप विकसित झाली नाही. उलटपक्षी ती सुरवातीपासूनच मानवात अंतर्भूत होती.
तथापि, दुर्दैवाची बाब म्हणजे मानवजातीने उपासनेचे बहुविध मार्ग विकसित केले आहेत व सामान्यतः यांनी आनंदी, एकजूटीचे मानवी कुटुंब निर्माण केलेले नाही. त्याउलट, धर्माच्या नावाखाली अजूनही रक्तरंजित युद्धे लढवली जात आहेत. यामुळे, एखादी व्यक्ती कोणत्या मार्गाने देवाची उपासना करते याने काही फरक पडतो का, असा महत्त्वपूर्ण प्रश्न उद्भवतो.
प्राचीन काळातील आक्षेपार्ह उपासना
मध्य पूर्वेचा प्रदेश व्यापणारी प्राचीन राष्ट्रे, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यास आपल्याला साहाय्य करणारे ऐतिहासिक उदाहरण पुरवतात. अनेक जण बआल नामक देवाची उपासना करीत होते. ते बआलाच्या सहचरिणींची देखील उपासना करीत होते, उदाहरणार्थ अशेरा. अशेराच्या उपासनेत, लैंगिक प्रतीक समजले जाणाऱ्या एका पवित्र स्तंभाचा उपयोग समाविष्ट होता. त्या प्रदेशात कार्य करणाऱ्या पुराणवस्तु संशोधकांना उत्खनन करताना नग्न स्त्रियांच्या अनेक प्रतिमा गवसल्या आहेत. धर्माचा विश्वकोष (इंग्रजी) असे म्हणतो की या प्रतिमा, “लक्षवेधक जननेंद्रिय असलेल्या व आपले वक्ष वर उचलत असलेल्या एका देवीच्या आहेत . . . त्या कदाचित अशेरा देवीचे प्रतिनिधित्व करीत असाव्यात.” तथापि, बआलाची उपासना सहसा अत्यंत अनैतिक स्वरूपाची असे हे खात्रीने म्हणता येईल.
याच कारणाने, बआलाच्या उपासनेत कामुक मेजवान्यादेखील समाविष्ट होत्या यात काही नवल नाही. (गणना २५:१-३) कनानी पुरुष शखेम याने तरुण कुमारिका दीनावर बलात्कार केला. तरीसुद्धा, त्याला त्याच्या कुटुंबातील सर्वात सन्माननीय पुरुष समजले जात होते. (उत्पत्ति ३४:१, २, १९) गोत्रगमन, समलैंगिकता व पशुगमन अगदी सर्वसामान्य होते. (लेवीय १८:६, २२-२४, २७) इंग्रजी भाषेतील शब्द “सॉडमी” (गुदमैथून) हा समलैंगिकतेचा एक प्रकार असून मुळात तो जगाच्या त्या भागात एकेकाळी अस्तित्वात असलेल्या एका शहराच्या नावावरून आला आहे. (उत्पत्ति १९:४, ५, २८) बआलाच्या उपासनेत रक्तपात देखील समाविष्ट होता. एवढेच नव्हे तर बआलाचे उपासक आपल्या दैवतांप्रीत्यर्थ बलिदान म्हणून स्वतःची मुले अग्नीत टाकत असत! (यिर्मया १९:५) या सर्व प्रथा धार्मिक शिकवणुकींशी संबंधित होत्या. कोणत्या प्रकारे?
डॉ. मेरिल अंगर हे पुरातत्त्वविद्या व जुना करार (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात स्पष्ट करतात की, “कनानातील दंतकथांमधील नृशंसता, वासना व अनिर्बंध, हे त्या काळात जवळच्या पौर्वात्य देशांतील आणखी कोणत्याही ठिकाणापेक्षा कितीतरी अधिक पटीने घृणास्पद होते. कनानी दैवतांना नैतिक चरित्र मुळी नव्हतेच आणि या धक्कादायक वैशिष्ट्याने, त्यांच्या भाविकांत अतिनिकृष्ट असे गुण विकसित केले असतील, एवढेच नव्हे तर धार्मिक वेश्यागमन, [व] बालकांचे बलिदान, यांसारख्या त्या काळातील अत्यंत नीतिभ्रष्ट करणाऱ्या प्रथांना देखील जन्म दिला असेल.”
देवाने कनानी लोकांची उपासना स्वीकारली का? निश्चितच नाही. त्याने इस्राएलांना शुद्ध मार्गाने त्याची भक्ती करणे शिकवले. वर उल्लेखिलेल्या प्रथांविषयी, त्याने अशी ताकीद दिली: “असल्या प्रकारचे कोणतेहि कृत्य करून अशुद्ध होऊ नका; कारण जी राष्ट्रे मी तुमच्यासमोर घालविणार आहे, ती असल्याच सर्व कृत्यांनी अशुद्ध झाली आहेत. त्यांचा देशहि भ्रष्ट झाला आहे, म्हणून त्यांच्या दुष्टतेमुळे मी त्यांचा समाचार घेत आहे व तो देश आपल्या रहिवाश्यांचा त्याग करीत आहे.”—लेवीय १८:२४, २५.
शुद्ध उपासनेचे दूषित होणे
अनेक इस्राएलांनी शुद्ध उपासनेविषयी देवाचा दृष्टिकोन स्वीकारला नाही. उलटपक्षी, त्यांनी आपल्या देशात बआलाची उपासना खपवून घेतली. काही काळातच इस्राएल लोक यहोवाच्या उपासनेत बआलाच्या उपासनेला मिसळण्याचा प्रयत्न करण्याच्या पाशास बळी पडले. देवाने अशी मिश्र उपासना स्वीकारली का? मनश्शे राजाच्या कारकिर्दीत जे झाले ते विचारात घ्या. त्याने बआलमूर्तीसाठी वेदी बांधल्या, स्वतःच्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याचे अर्पण केले व जादूटोणा केला. ‘आपण केलेली अशेरामूर्ती [पवित्र स्तंभ] त्याने यहोवाच्या मंदिरात ठेविली; ह्या मंदिराविषयी . . . यहोवा म्हणाला होता की या मंदिरात . . . मी आपले नाम निरंतर ठेवीन.’—२ राजे २१:३-७.
मनश्शेच्या प्रजेने आपल्या राजाच्या पावलावर पाऊल ठेवले. खरे पाहता, त्याने “त्यांस एवढे बहकविले की इस्राएलांदेखत परमेश्वराने ज्या राष्ट्रांचा संहार केला होता त्यांच्याहिपेक्षा ते अधिकच दुष्कर्म करू लागले.” (२ राजे २१:९) देवाच्या संदेष्ट्याद्वारे सतत मिळणाऱ्या इशाऱ्यांकडे लक्ष देण्याऐवजी मनश्शेने निर्दोष जनांचा इतका मनस्वी संहार केला की त्यामुळे जेरुसलेम रक्तमय झाले. कालांतराने मनश्शेचे मनपरिवर्तन झाले हे खरे असले तरीसुद्धा, त्याचा पुत्र व उत्तराधिकारी राजा आमोन याने बआलाच्या उपासनेला पुनरुज्जीवित केले.—२ राजे २१:१६, १९, २०.
कालांतराने, मंदिरात वेश्याव्यवसाय करणाऱ्या पुरुषांची वहिवाट सुरू झाली. देवाने बआल उपासनेच्या या प्रकाराला कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले? मोशेद्वारे त्याने अशी ताकीद दिली होती: “वेश्येच्या कमाईचा किंवा कुत्र्याच्या प्राप्तीचा पैसा कोणताहि नवस फेडण्यासाठी तू आपला देव परमेश्वर ह्याच्या घरात आणू नको; कारण ह्या दोघांचाहि तुझा देव परमेश्वर ह्याला वीट आहे.”—अनुवाद २३:१७, १८.
मनश्शेचा नातू, राजा योशीया याने अनैतिक बआलाच्या उपासनेपासून मंदिरास शुद्ध केले. (२ राजे २३:६, ७) परंतु, परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती. राजा योशीयाच्या मृत्यूनंतर काही काळातच, यहोवाच्या मंदिरात पुन्हा एकदा मूर्तिपूजा सुरू झाली. (यहेज्केल ८:३, ५-१७) या कारणास्तव, यहोवाने बाबेलच्या राजाकडून जेरुसलेम नगरी व तिच्या मंदिराचा नाश करविला. इतिहासातील ही दुःखद घटना शाबीत करते की देवाच्या नजरेत उपासनेचे काही मार्ग स्वीकार्य नाहीत. आपल्या काळाबद्दल काय?