त्यांनी नम्रपणे यहोवाची सेवा केली
“तुम्ही कोठे सेवा करता हे नव्हे, तर कोणाची सेवा करता हेच वास्तविकपणे महत्त्वाचे आहे.” हे होते जॉन बूथ यांचे आवडते शब्द व ते या शब्दांनुसार जगले. सोमवार, जानेवारी ८, १९९६ या दिवशी संपुष्टात आलेल्या त्यांच्या पृथ्वीवरील जीवनावर एक नजर टाकल्यास, त्यांनी कोणाची सेवा करण्याची निवड केली याबाबत कोणतीही शंका उरत नाही.
सन १९२१ मध्ये एक तरुण या नात्याने जॉन बूथ, जीवनातील उद्देशाच्या शोधात होते. डच रिफॉर्म्ड चर्चमध्ये ते संडे स्कूलमध्ये शिकवित होते, पण सेवक बनण्यासाठी प्रशिक्षण घेण्याचा विचार त्यांना नकोसा वाटला कारण त्यांच्या मते, पाळक स्वार्थी जीवन जगत होते. “आज जिवंत असणारे लाखो लोक कधीच मरणार नाहीत,” या भाषणाची हस्तपत्रिका त्यांनी पाहिली तेव्हा त्यातील जाहिरातीत दाखविलेली प्रकाशने त्यांनी ताबडतोब मागविली. वाचलेल्या माहितीने मोहित होऊन, काही काळातच ते बायबल अभ्यासकांच्या अर्थात त्या काळातील यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना २४ किलोमीटर सायकलने प्रवास करून जाऊ लागले. त्यांचा बाप्तिस्मा १९२३ साली झाला व त्यांच्या कुटुंबाचा डेअरी फार्म असलेल्या ठिकाणी म्हणजेच वॉलकिल, न्यूयॉर्कच्या प्रदेशात ते घरोघरचे प्रचार कार्य करू लागले.
बंधू बूथ यांनी एप्रिल १९२८ मध्ये पूर्ण-वेळेच्या सेवेत पदार्पण केले. भोजन व राहाण्याच्या व्यवस्थेच्या बदल्यात बायबल साहित्य देऊन त्यांनी आपल्या जन्मस्थानी व दक्षिण प्रदेशांतील खेडेगावांत प्रचार केला. त्यांना वेगवेगळ्या जोखिमांना सामोरे जावे लागले; उदाहरणार्थ, बेकायदेशीर दारू भट्ट्यांच्या बंदुकधारी मालकांच्या धोक्यास त्यांना सामोरे जावे लागले. यांपैकी एकाने तर जॉन बूथ यांच्या पायनियर जोडीदारास गोळी घालून जखमी केले. सन १९३५ मध्ये, बंधू बूथ यांना प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले व ते देशभरातील मंडळ्यांना व लहानलहान गटांना भेटी देऊ लागले. त्यांनी संमेलने आयोजित केली व बंधुभगिनींना विरोध असताना देखील टिकून राहाण्यास साहाय्य केले. संतप्त जमावांना तोंड देणे, न्यायालयात उभे राहाणे व तुरुंगवास, या सर्व प्रकारांना बंधू बूथ जणू रुळले होते. त्यांनी एकदा लिहिले, “त्या रोमहर्षक काळाविषयी सांगायला बसलो तर एक संबंध पुस्तकही कमी पडेल.”
सन १९४१ मध्ये, वॉच टावर सोसायटीचे त्या काळचे अध्यक्ष जोसेफ एफ. रदरफोर्ड यांनी बंधू बूथ यांना इथाका, न्यूयॉर्क जवळील राज्य मळ्यावर कार्य करण्यास नेमले. तेथे त्यांनी २८ वर्षे विश्वासूपणे सेवा केली. सेवेबद्दल त्यांचे प्रेम अविकल होते; पुढील काही वर्षांदरम्यान, सन १९६१ पर्यंत राज्य मळ्यावर स्थित, मिशनऱ्यांना प्रशिक्षित करणाऱ्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या हजारो विद्यार्थ्यांचा त्यांना सहवास लाभला. सन १९७० मध्ये बंधू बूथ यांना वॉलकिल, न्यूयॉर्क येथील वॉचटावर मळ्यांमध्ये सेवा करण्यास सांगण्यात आले व अशा रितीने, त्यांनी जवळजवळ ४५ वर्षांपूर्वी जेथे पायनियर सेवा सुरू केली होती तेथेच ते पुन्हा आले.
बंधू बूथ यांना १९७४ मध्ये ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य म्हणून नेमण्यात आले. त्यांनी वयाच्या ९३ व्या वर्षी आपला मृत्यू होईपर्यंत या पदावर विश्वासूपणे सेवा केली. जॉन बूथ आपल्या अत्यंत नम्र व दयाळू ख्रिश्चन व्यक्तिमत्त्वामुळे सर्वांचे लाडके होते. त्यांच्या तब्येतीने व शक्तीने त्यांना साथ दिली तोवर ते घरोघरी व शहरातील सार्वजनिक मार्गांवर विश्वासूपणे प्रचार करीत होते.
त्यांच्या सहवासात कार्य केलेल्यांना त्यांच्या मृत्यूचा शोक तर निश्चितच आहे, पण त्याचवेळेस अभिषिक्त ख्रिश्चनांचे स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान होते व “त्यांची कृत्ये . . . त्यांच्याबरोबर जातात,” या बायबलच्या अभिवचनाने त्यांचे सांत्वन देखील होते. (प्रकटीकरण १४:१३; १ करिंथकर १५:५१-५४) अर्थातच, ते एक नवीन वातावरण आहे, ज्यात जॉन बूथ यहोवाची सेवा सर्वकाळ करू शकतील!
[३२ पानांवरील चित्रं]
जॉन बूथ १९०३-१९९६