आशीर्वाद वा शाप —आज आपल्यासाठी उदाहरणे
“ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहंचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत.”—१ करिंथकर १०:११.
१. एखादा जशी अवजाराची तपासणी करतो तसे आपण कोणती तपासणी केली पाहिजे?
लोखंडाच्या एखाद्या अवजारावरील रंगाच्या थराखाली गंज लागण्यास सुरवात होऊ शकते, पण ते आपल्याला दिसणार नाही. काही काळातच पृष्ठभागावर गंज दिसू लागतो. त्याचप्रमाणे, एखाद्याच्या अंतःकरणातील प्रवृत्ती व इच्छा यांची क्षती, ती गंभीर परिणाम धारण करण्याआधी किंवा इतरांच्या लक्षात येण्याच्या बऱ्याच काळाआधी सुरू होते. एखाद्या अवजारावर गंज चढत आहे की काय हे जसे आपण सुज्ञपणे तपासतो त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणाची कडक तपासणी व समयोचित देखभाल आपल्या ख्रिस्ती सत्वनिष्ठेला टिकवू शकते. म्हणजेच, आपण देवाचे आशीर्वाद प्राप्त करू शकतो व ईश्वरी शाप टाळू शकतो. प्राचीन इस्राएलवर जे आशीर्वाद वा शाप उच्चारले होते ते या युगाच्या समाप्तीचा सामना करणाऱ्यांसाठी इतके महत्त्वाचे नाही असे काहींना वाटेल. (यहोशवा ८:३४, ३५; मत्तय १३:४९, ५०; २४:३) परंतु ते तसे नाही. आपण १ करिंथकर १० व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे इस्राएलच्या इशारेवजा उदाहरणांमधून पुष्कळ लाभ मिळवू शकतो.
२. इस्राएल लोकांना रानामध्ये आलेल्या अनुभवांविषयी १ करिंथकर १०:५, ६ काय म्हणते?
२ प्रेषित पौल, मोशेच्या देखरेखीखाली असलेल्या इस्राएलांची तुलना ख्रिस्ताच्या देखरेखीखाली असलेल्या ख्रिश्चनांशी करतो. (१ करिंथकर १०:१-४) इस्राएल लोकांना वाग्दत्त देशात प्रवेश करता आला असता तरी, “त्यांच्यापैकी बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता,” यामुळे “त्यांचा रानात नाश झाला.” यास्तव, पौलाने सह ख्रिश्चनांना लिहिले: “ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या, अशा हेतूने की, त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टींचा लोभ धरू नये.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर १०:५, ६) भावनांना हृदयामध्ये खतपाणी घातले जाते, यास्तव पौलाने उल्लेखलेल्या इशारेवजा उदाहरणांकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
मूर्तिपूजेविरुद्ध इशारा
३. इस्राएल लोकांनी सोनेरी वासराच्या संबंधाने पाप कसे केले?
३ पौलाचा पहिला इशारा आहे: “त्यांच्यापैकी कित्येक मूर्तिपूजक होते तसे तुम्ही होऊ नका; ‘लोक खावयाला प्यावयाला बसले, नंतर नाचतमाशा करावयास उठले,’ असे शास्त्रात लिहिलेले आहे.” (तिरपे वळण आमचे.) (१ करिंथकर १०:७) हे इशारेवजा उदाहरण, इस्राएल लोक इजिप्तच्या वहिवाटींकडे मागे वळाल्याविषयी व मूर्तीपूजक सोनेरी वासरू करण्याविषयी आहे. (निर्गम अध्याय ३२) शिष्य स्तेफनाने त्यामागील समस्या सूचित केली: “[देवाचा प्रतिनिधी, मोशे] याचे ऐकण्याची आपल्या पूर्वजांची इच्छा नव्हती; तर त्यांनी त्याला धिक्कारिले व आपले मन मिसर देशाकडे फिरवून ते अहरोनाला म्हणाले, ‘आमच्यापुढे चालतील असे देव आम्हाला करून दे; कारण ज्याने आम्हाला मिसर देशातून आणले त्या मोशेचे काय झाले हे आम्हाला कळत नाही.’ मग त्या दिवसांत त्यांनी वासराची मूर्ति बनविली व तिच्यापुढे यज्ञ करून आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.” (प्रेषितांची कृत्ये ७:३९-४१) या स्वच्छंदी इस्राएल लोकांनी ‘आपल्या मनात’ चुकीच्या भावना बाळगल्यामुळे त्यांनी मूर्तिपूजा केली याची नोंद घ्या. ‘त्यांनी वासराची मूर्ती बनविली व तिच्यापुढे यज्ञ केला.’ शिवाय, त्यांनी “आपल्या हातच्या कृतींबद्दल आनंदोत्सव केला.” तेथे, संगीत, गायन, नृत्य, खाणे व पिणे होते. स्पष्टतः, ती मूर्तिपूजा भुरळ पाडणारी व मनोरंजक होती.
४, ५. आपण कोणत्या मूर्तिपूजक रूढी टाळाव्यात?
४ प्रतिनमुनेदार इजिप्त—सैतानी जगत—खरे पाहता मनोरंजनाची उपासना करते. (१ योहान ५:१९; प्रकटीकरण ११:८) ते अभिनेता, गायक आणि खेळांतील तारकांची तसेच त्यांच्या नाचण्याची, त्यांच्या संगीताची, मौजमजेबद्दलच्या त्यांच्या शिकवणींची भक्ती करतात. यहोवाची उपासना करत असल्याचा अजूनही दावा करणारे अनेक जण मनोरंजनामध्ये बुडून जाण्याच्या मोहात पडले आहेत. एखाद्या ख्रिश्चनाला त्याच्या चुकीबद्दल वाग्दंड द्यावा लागतो तेव्हा त्याची दुर्बळ आध्यात्मिक स्थिती बहुधा त्याला मादक पेयांचे प्राशन करण्यास, नाचण्यास व मूर्तिपूजेच्या जवळपास असलेल्या कोणत्याही मार्गात आनंद मिळवण्याकडे नेऊ शकते. (निर्गम ३२:५, ६, १७, १८) काही मनोरंजन हितकारक व मनास समाधान देणारे आहे. तरीही, आज बहुतेक जगीक संगीत, नृत्य, चित्रपट आणि व्हिडिओ भ्रष्ट शारीरिक अभिलाषा पुरवतात.
५ खरे ख्रिस्ती मूर्तींच्या उपासनेला बळी पडत नाहीत. (२ करिंथकर ६:१६; १ योहान ५:२१) आपल्यातील प्रत्येक जण मूर्तीपूजक मनोरंजनाचे व्यसनी न होण्याची खबरदारी घेवो व जगीक मार्गाने मौजमजेत बुडून जाऊन त्याच्या हानीकारक परिणामांना भोगण्याचा धोका टाळो. आपण जर स्वतःला जगीक प्रभावांखाली येऊ दिले तर घातक अभिलाषा आणि मनोवृत्ती आपल्या मनात आणि हृदयात नकळत जवळजवळ घर करू शकतील. सुधारणा न केल्यास, या गोष्टींमुळे कालांतराने सैतानी युगाच्या ‘रानात आपलाही नाश’ होईल.
६. मनोरंजनाविषयी आपल्याला कदाचित कोणती सकारात्मक पावले उचलावी लागतील?
६ सोनेरी वासराच्या घटनेच्या प्रसंगी मोशेने म्हटल्याप्रमाणे ‘विश्वासू आणि बुद्धिमान दास’ खरे पाहता म्हणत आहे: “परमेश्वराच्या पक्षाचा जो कोणी असेल त्याने माझ्याकडे यावे.” खऱ्या उपासनेसाठी आपण दृढपणे उभे आहोत हे दाखवण्यासाठी सकारात्मक कृती करणे जीवन वाचवणारे ठरू शकते. मोशेच्या लेवी वंशाने हिणकस प्रभावांना काढून टाकण्यासाठी त्वरित हालचाल केली. (मत्तय २४:४५-४७; निर्गम ३२:२६-२८) यास्तव, मनोरंजन, संगीत, व्हिडिओ आणि यांसारख्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या निवडीचे बारकाईने परीक्षण करा. ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे भ्रष्ट असल्यास यहोवाच्या बाजूने राहा. देवावरील प्रार्थनापूर्वक भरवशाने मनोरंजन आणि संगीताच्या तुमच्या निवडीमध्ये बदल करा, व मोशेने ज्याप्रमाणे सोनेरी वासराचा नाश केला त्याचप्रकारे आध्यात्मिकरीत्या घातक असलेल्या साहित्याचा नाश करा.—निर्गम ३२:२०; अनुवाद ९:२१.
७. आपण लाक्षणिक हृदयाचे संरक्षण कसे करू शकतो?
७ आपल्या हृदयाची झीज होण्याला आपण विफल कसे करू शकतो? देवाच्या वचनाचा परिश्रमपूर्वक अभ्यास करण्याद्वारे, त्यातील सत्य आपल्या मनांत व हृदयांत मुरण्यास लावण्याद्वारे. (रोमकर १२:१, २) अर्थात, आपण खिस्ती सभांना नित्याने उपस्थित राहिले पाहिजे. (इब्री लोकांस १०:२४, २५) अधूनमधून सभांना उपस्थित राहणे, गंज लागलेल्या जागेवर रंग लावण्यासारखे आहे. यामुळे, आपण काही काळापर्यंत चकचकीत होऊ पण, आपल्या आंतरिक समस्या सुटत नाहीत. उलट, पूर्वतयारी, मनन व सभांमध्ये सक्रिय भाग यामुळे आपण आपल्या लाक्षणिक हृदयाच्या कप्प्यांमध्ये रेंगाळणाऱ्या हृदयाची झीज घडवणाऱ्या गोष्टींना साहसाने काढून टाकू शकतो. हे आपल्याला देवाच्या वचनानुसार चालण्यास मदत करील व विश्वासाच्या परीक्षांना सहन करून ‘कशातही उणे न पडण्यास’ बळकटी देईल.—याकोब १:३, ४; नीतिसूत्रे १५:२८.
जारकर्माविरुद्ध इशारा
८-१०. (अ) १ करिंथकर १०:८ मध्ये कोणत्या इशारेवजा उदाहरणाचा उल्लेख करण्यात आला आहे? (ब) मत्तय ५:२७, २८ मधील येशूचे शब्द कशा प्रकारे लाभदायकरीत्या लागू केले जाऊ शकतात?
८ पौलाच्या पुढील उदाहरणात आपल्याला असा सल्ला दिला जातो: “त्यांच्यापैकी कित्येकांनी जारकर्म केले व ते एका दिवसात तेवीस हजार मरून पडले; तेव्हा आपण जारकर्म करू नये.”a (१ करिंथकर १०:८) इस्राएल लोकांनी खोट्या दैवतांना दंडवत घातला व “मवाबी कन्यांशी व्यभिचार” केला तो काळ प्रेषित सुचवत होता. (गणना २५:१-९) लैंगिक अनैतिकता ही मृत्युदंड देणारी आहे! अनैतिक विचारांना व इच्छांना आपल्या मनामध्ये घोळू देणे, अंतःकरणाला गंज चढू देण्यासारखेच आहे. येशूने म्हटले: “‘व्यभिचार करू नको’ म्हणून सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.”—मत्तय ५:२७, २८.
९ ‘एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहण्याचे’ परिणाम, नोहाच्या दिवसांतील जलप्रलयाच्या आधी अवज्ञा केलेल्या देवदूतांच्या हिणकस विचारांना शाबीत करतात. (उत्पत्ति ६:१, २) हेही लक्षात ठेवा, की अयोग्य दृष्टीने सतत एका स्त्रीकडे बघत राहिल्यामुळेच दावीद राजाच्या जीवनात सर्वात दुःखदायक घटना घडली. (२ शमुवेल ११:१-४) याच्या अगदी विरुद्धतेत, धार्मिक विवाहित ईयोबाने ‘आपली नजर कोणा कुमारीवर जाऊ नये म्हणून आपल्या डोळ्यांशी करार केला,’ व अशा प्रकारे अनैतिकता टाळली आणि सत्त्वनिष्ठ शाबीत झाला. (ईयोब ३१:१-३, ६-११) डोळ्यांची तुलना हृदयाच्या खिडक्यांशी केली जाऊ शकते. भ्रष्ट हृदयातूनच पुष्कळ वाईट गोष्टी बाहेर निघतात.—मार्क ७:२०-२३.
१० आपण येशूच्या शब्दांना लागू केल्यास, अश्लील साहित्य पाहून किंवा एखाद्या सहख्रिश्चनाबद्दल, सहकर्मीबद्दल किंवा इतर कोणाबद्दलचे अनैतिक विचार आपल्या मनात ठेवून चुकीच्या विचारांना मोकळीक देणार नाही. एखाद्या धातूला लागलेला गंज केवळ झटकल्याने निघत नसतो. त्याचप्रकारे, अनैतिक कल्पना व प्रवृत्तींना, त्या जणू काय कमी महत्त्वाच्या आहेत अशाप्रकारे केवळ बाजूला सारून देऊ नका. या अनैतिक प्रवृत्तींपासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी जोरदार पावले उचला. (पडताळा मत्तय ५:२९, ३०.) “जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे हे जिवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो,” असे पौल सहविश्वासूंना आर्जवतो. होय, लैगिंक अनैतिकता यासारख्या गोष्टींकरता “देवाचा कोप,” त्याच्या शापाचे एक वक्तव्य म्हणून येत आहे. यास्तव, आपण या गोष्टींबाबत आपल्या शरीराच्या अवयवांना ‘जिवे मारले’ पाहिजे.—कलस्सैकर ३:५, ६.
बंडखोरी तक्रारींविरुद्ध इशारा
११, १२. (अ) १ करिंथकर १०:९ मध्ये कोणता इशारा देण्यात आला आहे व कोणत्या घटनेचा तेथे उल्लेख करण्यात आला आहे? (ब) पौलाच्या इशाऱ्याचा परिणाम आपल्यावर कसा झाला पाहिजे?
११ पौल नंतर असा इशारा देतो: “त्यांच्यापैकी कित्येकांनी प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापांच्या योगे नाश पावले; तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू नये.” (१ करिंथकर १०:९) एदोमच्या किनाऱ्यालगत असलेल्या रानात भटकत असताना इस्राएल लोक “परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध असे बोलू लागले की ‘तुम्ही आम्हाला मिसर देशातून काढून ह्या रानात मरावयाला कशाला आणिले? येथे तर अन्न नाही व पाणीहि नाही, आणि ह्या हलक्या अन्नाला [चमत्कारिकरीत्या पुरवलेला मान्ना] आम्ही कंटाळलो आहो.’” (गणना २१:४, ५) जरा विचार करा! ते इस्राएल लोक परमेश्वराच्या तरतुदींना तुच्छ लेखून ‘यहोवाविरुद्ध बोलू लागले!’
१२ इस्राएल लोक आपल्या तक्रारींद्वारे यहोवाच्या सहनशीलतेची परीक्षा घेत होते. ते शिक्षेपासून वंचित झाले नाहीत, कारण यहोवाने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठवले आणि कित्येक लोक त्यांच्या दंशांमुळे मरण पावले. लोकांनी पश्चात्ताप केल्यानंतर व त्यांच्यासाठी मोशेने मध्यस्थी केली तेव्हा ती पीडा थांबवण्यात आली. (गणना २१:६-९) आपणही देव आणि त्याच्या ईश्वरशासित व्यवस्थेद्वारे विशेषकरून बंडखोरीचा, तक्रारीचा आत्मा दाखवू नये म्हणून ही घटना आपल्यासाठी एक इशारा ठरली पाहिजे.
कुरकूर करण्याविरुद्ध इशारा
१३. १ करिंथकर १०:१० कोणा विरुद्ध ताकीद देते व पौलाच्या मनामध्ये कोणत्या बंडाळीविषयीची गोष्ट होती?
१३ रानातील इस्राएल लोकांचे शेवटले उदाहरण देते वेळी पौल लिहितो: “त्यांच्यापैकी कित्येकांनी कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले, तेव्हा तुम्ही कुरकुर करू नका.” (१ करिंथकर १०:१०) कोरह, दाथान, अबीराम आणि त्यांच्या साथीदारांनी मोशे आणि अहरोनाच्या अधिकारपदाविरुद्ध ईश्वरशासित नसलेले कार्य करून त्यास आव्हान केले तेव्हा बंड उसळला. (गणना १६:१-३) बंडखोरांच्या नाशानंतर इस्राएल लोक कुरकूर करू लागले. कारण ते असा तर्क करू लागले, की बंड करणाऱ्यांचा नाश न्याय्य नव्हता. गणना १६:४१ म्हणते: “दुसऱ्या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, ‘तुम्ही परमेश्वराच्या लोकांना मारून टाकिले आहे.’” त्या प्रसंगी जो न्याय करण्यात आला होता त्यामध्ये चूक काढल्यामुळे एका ईश्वरी पीडेद्वारे १४,७०० इस्राएल लोकांचा नाश झाला.—गणना १६:४९.
१४, १५. (अ) मंडळीमध्ये चोरून आत शिरलेल्या ‘अभक्त माणसांची’ कोणती पापे होती? (ब) कोरहाचा समावेश असलेल्या घटनेतून आपण काय शिकू शकतो?
१४ सा. यु. पहिल्या शतकामध्ये, ख्रिस्ती मंडळीमध्ये चोरून आत शिरलेली ‘अभक्त माणसे’ खोटे शिक्षक तसेच कुरकूर करणारे ठरले. ही माणसे ‘प्रभुत्व तुच्छ लेखत होते व थोरांची’ म्हणजेच, मंडळीची देखरेख करण्याची जबाबदारी सोपवलेल्या तेव्हाच्या अभिषिक्त पुरुषांची निंदा करत होते. अभक्त धर्मत्याग्यांविषयी प्रेषित यहूदानेही असे म्हटले: “ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत.” (यहूदा ३, ४, ८, १६) आज, काही जण कुरकूर करणारे बनतात कारण ते आपल्या हृदयामध्ये आध्यात्मिकरीत्या झिजवणाऱ्या मनोवृत्तीला वाढू देण्यास अनुमती देतात. बहुतेक वेळा ते मंडळीची देखरेख करण्याच्या हुद्यावर असलेल्यांच्या अपरिपूर्णतांवर आपले मन एकाग्र करतात व त्यांच्या विरुद्ध कुरकूर करू लागतात. त्यांची कुरकूर करणारी आणि तक्रारी प्रवृत्ती, ‘विश्वासू दासाच्या’ प्रकाशनांची टिका करण्यापर्यंत मजल मारू शकते.
१५ एखाद्या शास्त्रवचनीय विषयावर प्रामाणिक प्रश्न विचारणे उचित आहे. परंतु, घनिष्ठ मित्रांमधील टीकात्मक चर्चांद्वारे आपण एक नकारात्मक मनोवृत्ती विकसित करत असल्यास काय? आपण स्वतःला असे विचारणे उचित ठरेल की, ‘अशी कुरकूर केल्यामुळे कोणते परिणाम होतील? त्यापेक्षा कुरकूर करण्याचे थांबवणे व बुद्धीसाठी प्रार्थना करणे सर्वात उत्तम ठरणार नाही का?’ (याकोब १:५-८; यहूदा १७-२१) मोशे व अहरोन यांच्या अधिकाराविरुद्ध बंड केलेल्या कोरह आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांना कदाचित त्यांचा दृष्टिकोन साधार असल्याची इतकी खात्री पटली असावी, की त्यांनी त्यांच्या हेतूंचे परीक्षणच केले नाही. तरीसुद्धा, ते पूर्णपणे चुकत होते. त्याचप्रमाणे कोरह आणि इतर बंडखोरांचा नाश झाल्याबद्दल कुरकूर करणाऱ्या इस्राएल लोकांचेही चुकत होते. अशा प्रकारच्या उदाहरणांना आपल्या हेतूंचे परीक्षण करण्यास, कुरकूर करण्याची किंवा तक्रारी प्रवृत्ती काढून टाकण्यास व यहोवास आपणाला शुद्ध करू देण्यास प्रवृत्त करणे किती सुज्ञतेचे आहे!—स्तोत्र १७:१-३.
शिका आणि आशीर्वादांचा आनंद लुटा
१६. १ करिंथकर १०:११, १२ मधील आर्जवाचे सार काय आहे?
१६ ईश्वरी प्रेरणेने पौल, इशारेवजा संदेशांच्या यादीचा समारोप असे आर्जवून करतो: “ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहंचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून संभाळावे.” (१ करिंथकर १०:११, १२) ख्रिस्ती मंडळीतील आपले स्थान आपण हलके समजू नये.
१७. आपल्या अंतःकरणात आपल्याला एखादी अयोग्य हेतूची चुणचूण लागल्यास आपण काय करावे?
१७ लोखंडाला जसा गंज चढतो, तसेच पापी आदामाचे वंशज असल्यामुळे आपल्यालाही वाईट गोष्टींकडे झुकण्याची मनोवृत्ती वारशाने मिळाली आहे. (उत्पत्ति ८:२१; रोमकर ५:१२) यास्तव, आपल्या अंतःकरणात आपल्याला एखादी अयोग्य हेतूची चुणचूण लागल्यास निरुत्साहित होऊ नका. त्याउलट, आपण निर्णायक पावले उचलू या. लोखंडाला जेव्हा दमट किंवा दाहक वातावरणात उघड्यावर ठेवले जाते तेव्हा त्याची झीज लवकर घडते. आपणही, नीच मनोरंजन, सर्वत्र असलेली लैंगिक अनैतिकता आणि मनाचा नकारात्मक कल, या सर्व गोष्टी असलेल्या सैतानी जगाच्या ‘आत्म्यात’ उघड्यावर येण्याचे टाळले पाहिजे.—इफिसकर २:१, २.
१८. मानवजातीच्या चुकीच्या प्रवृत्तींविषयी यहोवाने काय केले आहे?
१८ वारशाने प्राप्त केलेल्या चुकीच्या प्रवृत्तींना विफल करण्यासाठी यहोवाने मानवजातीकरीता एक मार्ग तयार केला आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला जेणेकरून जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होऊ शकेल. (योहान ३:१६) आपण जर येशूच्या पावलांचे जवळून अनुकरण केले व त्याच्या सारखे मनुष्यत्व प्रदर्शित केले तर आपण इतरांसाठी एक आशीर्वाद ठरू. (१ पेत्र २:२१) आपल्यालाही शाप नव्हे तर आशीर्वाद मिळतील.
१९. शास्त्रवचनीय उदाहरणांचा विचार केल्याने आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?
१९ प्राचीन इस्राएल लोकांप्रमाणे आज आपलीही चुका करण्याची शक्यता असली तरी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे देवाचे संपूर्ण लिखित वचन आहे. त्याच्या पानांद्वारे आपण मानवजातीसोबत यहोवाच्या व्यवहारांबद्दल तसेच “त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप” येशू याच्यामध्ये दिसत असलेल्या त्याच्या गुणांबद्दल शिकतो. (इब्री लोकांस १:१-३; योहान १४:९, १०) प्रार्थना आणि शास्त्रवचनांचा मेहनती अभ्यास याद्वारे आपलेही ‘ख्रिस्तासारखे मन’ होऊ शकते. (१ करिंथकर २:१६) आपल्याला मोह होतात तेव्हा व विश्वासाच्या इतर परीक्षांना सामोरे जावे लागते तेव्हा प्राचीन शास्त्रवचनीय उदाहरणांवरून विशेषकरून येशू ख्रिस्ताच्या सर्वोच्च उदाहरणामधून आपण लाभ प्राप्त करू शकतो. असे केले तर आपण ईश्वरी शाप अनुभवणार नाही. उलट, आपण आज आणि चिरकाल, यहोवाची कृपा आणि आशीर्वाद यांचा उपभोग घेऊ.
[तळटीपा]
a टेहळणी बुरूज जुलै १५, १९९२ (इंग्रजी), पृष्ठ ४ पाहा.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ मूर्तिपूजक होऊ नये म्हणून आपण पौलाच्या सल्ल्याला कसे लागू करू शकतो?
◻ जारकर्माविरुद्ध प्रेषिताने दिलेला इशारा ऐकण्यासाठी आपण काय करू शकतो?
◻ कुरकूर व तक्रारी प्रवृत्ती आपण का टाळली पाहिजे?
◻ आपण शाप नव्हे तर आशीर्वाद कसे प्राप्त करू शकतो?
[१८ पानांवरील चित्रं]
आपल्याला ईश्वरी आशीर्वाद हवे असल्यास, आपण मूर्तिपूजा टाळली पाहिजे
[२० पानांवरील चित्रं]
गंज ज्याप्रकारे काढलाच पाहिजे त्याचप्रकारे आपणही आपल्या अंतःकरणातील अयोग्य इच्छांना काढून टाकण्यासाठी सकारात्मक पावले उचलू या