वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 ६/१५ पृ. २३-२८
  • पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • ‘आपण थुले येथे केव्हा जाऊ शकू?’
  • थुलेकडे रवाना
  • बिकट आव्हान
  • आमचे स्वागत
  • प्रवास समाप्त
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 ६/१५ पृ. २३-२८

पृथ्वीच्या शेवटापर्यंत साक्षी

थुले हा शब्द, भौगोलिक अथवा इतर बाबतीत एखाद्या शेवटच्या उद्दिष्टाचे वर्णन करण्यासाठी प्राचीन काळापासून उपयोगात आणलेल्या नावाचा अंश आहे. आज थुले हे, जगातील सर्वात मोठ्या बेटाच्या, म्हणजेच ग्रीनलँडच्या उत्तर दिशेच्या टोकावर असलेल्या एका लहानशा वसाहतीचे नाव आहे. सन १९१० मध्ये डॅनिश शोधक नूट रॅसमुस्सनने या वसाहतीला, ध्रुवावरील आपल्या मोहिमांसाठी तळ बनवले होते तेव्हापासून या वसाहतीला हे नाव पडले. आजही, थुले येथे जाणे सहल म्हणण्यापेक्षा एक मोहीमच आहे.

तथापि, थुले येथे जाण्याच्या मोहिमा राबवण्याची तातडीची गरज आहे. ‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा’ या येशूच्या आज्ञेला प्रतिसाद देण्यासाठी यहोवाचे साक्षीदार, पृथ्वीवरील सर्वात दूरच्या उत्तरेकडील टोकावर कायमस्वरूपी मानवी वस्ती असलेल्या वसाहतींपैकी एक अर्थात थुले, या ठिकाणी देवाच्या राज्याची सुवार्ता नेण्यास उत्सुक आहेत.—प्रेषितांची कृत्ये १:८; मत्तय २४:१४.

‘आपण थुले येथे केव्हा जाऊ शकू?’

सन १९५५ मध्ये “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” साक्षकार्यात भाग घेऊ इच्छिणारे दोन डॅनिश साक्षीदार ग्रीनलँडला आले. नंतर आणखी इतर जण आले व हळूहळू मेल्विल उपसागरापर्यंतचे दक्षिणी आणि पश्‍चिमी तट तसेच पूर्वेकडील तटावरून वरती काही अंतरापर्यंतचा प्रदेश त्यांनी आपल्या प्रचार कार्याने व्यापला. तथापि, थुलेसारख्या आणखीन दूरवरच्या भागांत केवळ पत्रव्यवहाराद्वारे किंवा दूरध्वनीद्वारे सुवार्ता देण्यात आली होती.

वर्ष १९९१ मध्ये एके दिवशी, बो व त्याची पत्नी हेलन हे दोन पूर्ण-वेळेचे सेवक एका कड्यावर उभे राहून मेल्विल उपसागराकडे पाहात होते. उत्तरेकडे पाहात त्यांनी विचार केला, ‘थुलेपर्यंत जाऊन तेथील लोकांना राज्याचा संदेश देणे आपल्याला केव्हा शक्य होईल?’

दुसरा एक पूर्ण-वेळेचा सेवक, वर्नर याने १९९३ साली कॉमॉनेक (लाइट) या ५.५-मीटर लांबी असलेल्या जलदगतीच्या मोटरबोटीने मेल्विल उपसागर पार करण्याचे धाडस केले. त्याने आधीच गॉट्‌हॉप येथून उपर्नाविक क्षेत्रापर्यंत १२०० किलोमीटरचा प्रवास केला होता. तरीसुद्धा, मेल्विल उपसागर—म्हणजे ४०० किलोमीटरचा अथांग आर्क्टिक महासागर पार करणे म्हणावे तितके सोपे नाही. या उपसागराचा मार्ग वर्षातील अधिकांश काळ, बर्फामुळे अडलेला असतो. बर्फामुळे वर्नरचे एक इंजिन निकामी झाले, तरीसुद्धा उपसागर पार करण्यात तो यशस्वी ठरला. तसेच, परत जाण्याआधी तो थोडेबहुत प्रचार कार्य देखील करू शकला.

थुलेकडे रवाना

त्या सफरीनंतर वर्नरने नवीन योजना आखण्यास सुरू केले. त्याने ऑर्न व कॉरीन यांच्यासोबत थुले येथे एकत्र मिळून जाण्याविषयी विचारविनिमय केला. त्यांच्याजवळ देखील, चार बर्थ असलेली सात-मीटरची बोट होती. विशेष म्हणजे या बोटीत जलपर्यटनाची अत्याधुनिक साधने होती. या बोटींमुळे राहण्याची व्यवस्था होणार होती, शिवाय दोन बोटी एकत्र प्रवास करीत असल्यामुळे मेल्विल उपसागर पार करणे तितके जोखिमीचे नव्हते. तथापि, ६०० रहिवासी असलेल्या मुख्य गावांत व त्या क्षेत्रातील सहा वसाहतींत साक्षकार्य उरकण्यासाठी त्यांना आणखी मदतीची गरज होती. यामुळे त्यांनी या देशात प्रवास करण्याची सवय असलेले अनुभवी सेवक—बो व हेलन तसेच योर्न व इंग यांनाही सोबत येण्याचे आमंत्रण दिले. या गटातील पाच जणांना ग्रीनलँडिक भाषा देखील येते.

त्यांनी बायबल साहित्याचा साठा आधीच पाठवला. बोटींमध्येसुद्धा साहित्य तसेच खाण्याचे पदार्थ व पाणी, इंधन, एक जादा इंजिन आणि एक रबरी होडी इ. सामान देखील सोबत घेण्यात आले. शेवटी ऑगस्ट ५, १९९४ रोजी अनेक महिन्यांच्या पूर्वतयारी नंतर, इल्युलिसॉट बंदरावर दोन्ही बोटी प्रवासासाठी तयार करून ठेवलेल्या होत्या तेथे, सर्वजण एकत्र आले. उत्तर दिशेकडे प्रवास सुरू झाला. वर्नर, बो व हेलन या तिघांनी दोन बोटींपैकी लहान बोटीने प्रवास केला. बो लिहितो, “आपल्या बर्थवर बसणे, पडून राहणे नाही तर कशासतरी धरून राहणे याशिवाय प्रवासात करण्यासारखे काहीच नव्हते.” प्रवासाचा क्रम पाहण्यासाठी आपण जहाजाची नोंदवही वाचू या.

“दूर दूर पर्यंत शांत सागर पसरलेला होता. आमच्या नजरेसमोर अप्रतिम दृश्‍ये उलगडत होती—चकाकता समुद्र, दाट धुके, लख्ख सूर्यप्रकाश व निळे आसमंत, अतिशय विलक्षण आकारांचे व रंगछटांचे हिमगिरी, एका प्रचंड हिमखंडावर उन्हात आरामशीर पहुडलेला वालरस, गर्द डोंगरांचे उतार व लहान लहान मैदाने—नैसर्गिक देखाव्यांचे रूपांतर अखंड सुरू होते.

वाटेवरील वसाहतींना भेट देणे हा त्यांपैकी सर्वात विशेष अनुभव होता. कोण पाहुणे आले आहेत हे पाहण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी किनाऱ्‍यावरील पुलावर लोक येत; लहान मुले तर हमखास असायचीच. आम्ही बायबल साहित्याचे वाटप केले व आपल्या संघटनेबद्दल असलेली एक व्हिडियो फिल्म त्यांना दिली. आम्ही तेथून निघण्याआधी पुष्कळ जण ही फिल्म पाहू शकले. दक्षिण उपर्नाविक येथे तर आम्ही किनाऱ्‍यावर पोहंचण्याआधीच अनेक लोक आपल्या बोटींनी आमच्या बोटींकडे आले. यामुळे आम्ही एक संपूर्ण संध्याकाळ, आमच्या बोटीवर आलेल्या पाहुण्यांना बायबलच्या असंख्य प्रश्‍नांची उत्तरे देण्यात घालवली.”

प्रवासाच्या सुरवातीचे ७०० किलोमीटर पार केल्यावर दोन्ही बोटी आता मेल्विल उपसागर पार करण्याच्या बेतात होत्या.

बिकट आव्हान

“हा प्रवासाचा सर्वात बिकट भाग असल्याचे सर्वसाधारणपणे समजले जात होते. शिवाय, आम्हाला हा प्रवास वाटेवर कोठेही न थांबता करायचा होता कारण सॅविस्सेविक (जेथून हे क्षेत्र सुरू होते व जेथे आम्हाला मुक्कामाचे ठिकाण मिळू शकले असते) या वसाहतीचा मार्ग बर्फामुळे, अद्यापही अडलेला होता.

“शेवटी आम्ही निघालो. पुष्कळ बर्फ असल्यामुळे आम्ही किनाऱ्‍यापासून आणखी दूर जाऊन खुल्या समुद्रातून प्रवास करू लागलो. सुदैवाने समुद्र शांत होता. प्रथम, अनेक तास आम्ही फक्‍त महासागराचे मैलोमैल अंतर पार करीत राहिलो व त्यादरम्यान काहीही विशेष घडले नाही. संध्याकाळ होत आली तेव्हा आम्हाला केप यॉर्क दिसले व आम्ही हळूहळू किनाऱ्‍याजवळ, उत्तर दिशेकडे वळलो. येथे देखील बर्फच बर्फ होता, म्हणजे जेथपर्यंत नजर जाईल तेथपर्यंत केवळ असंख्य जुनाट, जाडसर व जीर्ण होत असलेले हिमखंड दिसत होते. आम्ही पुष्कळ अंतरापर्यंत बर्फाच्या कडेने जात राहिलो, कधीकधी तर आम्ही बर्फामधील अरुंद मार्गांनी सुद्धा वाट काढत असू. धुकेही चांगलेच दाटलेले होते; गर्द करड्या रंगाचे हे धुके, मावळत्या सूर्याच्या प्रकाशात विलक्षण सुंदर दिसत होते. शिवाय त्या समुद्रलाटा! एकाच वेळी धुके, समुद्रलाटा व बर्फसुद्धा—सहसा यांपैकी एकही असले तर ते बिकट आव्हान ठरते.”

आमचे स्वागत

आम्ही पिट्युफ्फिच्या जवळ येऊ लागलो तसतसे आम्ही आणखी शांत सागरातून प्रवास करू लागलो. निसर्गाच्या स्वागताने आम्ही हरखून गेलो: निळ्या आकाशात उंचावर असलेला सूर्य, नजरेसमोर पसरलेले लखलखते फियोर्ड ज्यांवर अधूनमधून तरंगणारे हिमनग दिसत असत, व तेथून पुष्कळ अंतरावर डन्डस येथील खडकाची वैशिष्ट्यपूर्ण काळी बाह्‍याकृती—पूर्वीचे थुले!” उत्तर दिशेने सुमारे १०० किलोमीटर पार केल्यावर, प्रवासी आपल्या अंतिम मुक्कामाच्या स्थळी पोहंचले.

आता ते घरोघरचे प्रचार कार्य सुरू करण्यास अधीर झाले होते. त्यांपैकी दोघांना पहिल्याच दारावर उर्मट उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले, “आम्हाला असे फटकारण्यात आले, की आपण डेन्मार्कमध्येच आहोत असा क्षणभर भास झाला. तथापि, अधिकांश लोकांनी आमचे हार्दिक स्वागत केले. तेथील लोक विचारशील व माहितगार होते. आमच्याविषयी आधीच ऐकले असल्याचे काहींनी सांगितले व शेवटी आम्ही तेथे आलो याबद्दल समाधान व्यक्‍त केले. आमची काही फारच उल्लेखनीय लोकांशी गाठ पडली, जसे उत्तर ध्रुवावरील मोहिमांमध्ये सहभागी झालेले सील माशांचे शिकारी; तसेच स्वतःच्या संसारात समाधानी, काटकसरी व आधुनिक संस्कृतीविषयी काहीसा संशयास्पद दृष्टिकोन बाळगणाऱ्‍या येथील मूळ रहिवाशांना देखील आम्ही भेटलो.”

पुढील काही दिवसांत सर्वांनाच चांगले अनुभव आले. बायबल साहित्य सर्वत्र कौतुकाने स्वीकारण्यात आले. अनेक घरांत साक्षीदारांनी लगेच बायबल अभ्यासही सुरू केले. आस्था असल्याचे आढळलेल्या एका घराविषयी इंग सांगते: “ते एकच खोली असलेले घर स्वच्छ, नीटनेटके व उबदार होते. सलग तीन दिवस, आम्ही तेथे राहणाऱ्‍या नम्र मनुष्याला भेट देत राहिलो व हळूहळू आमची चांगलीच गट्टी जमली. तो सील माशांची शिकार करणारा एक हाडाचा शिकारी होता आणि त्याच्या घराबाहेर त्याचे कायॅक ठेवलेले होते. त्याने अनेक ध्रुवीय अस्वल, वालरस आणि अर्थातच सील मासे देखील मारले होते. आमच्या शेवटच्या भेटीत, आम्ही त्याच्या सोबत प्रार्थना केली तेव्हा नकळत त्याचे डोळे भरून आले. आता सर्वकाही यहोवाच्या इच्छेवर सोपवून, पुन्हा येण्याच्या वेळेची व संधीची वाट पाहणे एवढेच आमच्या हाती होते.”

थुले येथे कॅनडातील एस्किमो वारंवार येत असतात. इंग सांगते: “हेलन व मी कॅनडाहून आलेल्या अनेक एस्किमोंना भेटलो. गंमत म्हणजे ते ग्रीनलँडच्या लोकांशी बोलू शकतात; आर्क्टिक क्षेत्रातील लोक जवळजवळ सारख्याच भाषा बोलतात असे दिसते. कॅनडाच्या एस्किमोंची स्वतःची लिपी आहे, तरीसुद्धा ते आमचे साहित्य वाचू शकत होते. यामुळे त्यांना अनेक रोमांचक संधी उपलब्ध होऊ शकतील.”

बोटीने, ५० ते ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्‍या वसाहतींतही भेट देण्यात आली. “नार्वल या जलचर प्राण्यांची शिकार करण्यास आलेले शिकारी भेटतील या आशेने केकेरटॅट वसाहतीस जाताना, आम्ही किनारपट्टीच्या जवळूनच प्रवास केला. आमचा अंदाज खरा ठरला; एका सपाट खडकावर काही लोकांनी तळ ठोकला असल्याचे आम्हाला आढळले, तेथे जनावरांच्या कातडीचे कपडे घातलेली तीनचार कुटुंबे, त्यांचे तंबू व कायॅक देखील होते. हातात बरची घेऊन ती माणसे आळीपाळीने खडकावर अतिशय मोलवान नार्वल प्राण्यांसाठी टपून बसत होते. अनेक दिवस वाट पाहून देखील काहीही हाती न लागल्यामुळे आम्हाला पाहून त्यांना फारसा आनंद झाला नाही, कारण आम्हाला घाबरून देवमासे दूर पळून जाण्याची शक्यता होती! ते जणू आपल्याच दुनियेत मग्न होते. तेथील स्त्रियांनी काही साहित्य स्वीकारले तथापि, त्यावेळी आणखी संभाषण करणे उचित नव्हते. शेवटी आम्ही संध्याकाळी ११ वाजता क्वेकरटॅट येथे पोहंचलो व त्या वसाहतीतील घरांना भेटी देता देता शेवटच्या घरी, पहाटेचे २ वाजले!”

“शेवटी आम्ही सियोरापालुक अर्थात ग्रीनलँडच्या उत्तरेकडे असलेल्या अंतिम वसाहतीत पोहंचलो. बाकीचा परिसर ओसाड असला तरीसुद्धा हिरव्यागार गवताने आच्छादलेल्या काही खडकांच्या पायथ्याशी असलेल्या वालुकामय समुद्रकिनाऱ्‍यावर ही वसाहत आहे.“ निदान उत्तरेकडच्या भागांत तरी, साक्षीदार आपल्या प्रचार कार्यात अक्षरशः पृथ्वीच्या शेवटापर्यंत पोहंचले आहेत.

प्रवास समाप्त

साक्षीदारांनी आपले कार्य पूर्ण केले आहे. त्यांनी घरोघरी व तंबूतंबूत प्रचार कार्य केले, साहित्याचे वाटप केले, वर्गण्या मिळवल्या, व्हिडियो फिल्म दाखवल्या, अनेक ग्रीनलँडर्सशी बोलले व बायबल अभ्यास देखील चालवले. आता घरी परतण्याची वेळ आली आहे. “आम्ही त्या दिवशी संध्याकाळी आमच्या होडीत बसून मोर्यूसॉर्क वसाहतीहून जाण्यास निघालो तेव्हा अनेक लोक समुद्र किनारी, त्यांना मिळालेली पुस्तके किंवा हस्तपत्रिका हातात घेऊन ती हालवीत आमचा निरोप घेत होती.”

काही वेळाने, साक्षीदारांना किनारपट्टीच्या एका निर्जन भागात—त्या अत्यंत एकाकी ठिकाणी, खडकावर उभा राहून हात हालवणारा एक माणूस दिसला तेव्हा त्यांना आश्‍चर्यच झाले! “अर्थातच, आम्ही त्याला भेटण्यास किनाऱ्‍यापाशी गेलो. तो तरुण, जर्मनीतील बर्लिन शहराचा रहिवासी असून जवळजवळ एका महिन्यापासून आपल्या कायॅकमध्ये किनारपट्टीहून वरच्या दिशेने प्रवास करीत असल्याचे कळले. जर्मनीत असताना साक्षीदार त्याला नियमित भेटी देत होते व त्याच्यापाशी त्यांची अनेक पुस्तके होती. आम्ही त्याच्यासोबत थोडा वेळ होतो व अशा ठिकाणी साक्षीदारांना भेटून तो चांगलाच प्रभावित झाला.”

जाताना जेथे जाता आले नव्हते, म्हणजे सॅविसेविक वसाहतीत, या प्रवासी सेवकांचे हार्दिक स्वागत झाले. तेथील काही लोकांना मागील वर्षी काही साहित्य वाचायला मिळाले होते व ते आणखी आध्यात्मिक अन्‍नासाठी आसूसलेले होते.

मेल्विल उपसागर पार करण्याचा परतीचा प्रवास १४ तासाचा होता. “आम्हाला सूर्यास्त पाहावयास मिळाला. येथे सूर्यास्त अनेक तासांचा अनुभव असतो व त्यात सतत बदलणाऱ्‍या रमणीय रंगछटा पाहायला मिळतात. यानंतर लगेच होणाऱ्‍या सूर्योदयास देखील पुष्कळ वेळ लागला. सूर्यास्ताच्या पंखाकार किरणांची लालिमा इशान्येकडील आकाशात पुरती मावळलीही नव्हती तोच दक्षिणेकडील क्षितिजावर सूर्य हळूच डोकावला. त्या दृश्‍याचे शब्दांत वर्णन करणे—किंवा त्याचे संपूर्ण सौंदर्य छायाचित्रात कैद करणे—शक्य नाही.” जहाजावरील सर्वांनी संपूर्ण रात्र जागून काढली.

“आम्ही क्युलोरस्यॉर्क जवळ आलो तोपर्यंत खूप थकून गेलो होतो. पण मनात एका आगळ्याच आनंदाची व समाधानाची भावना होती. आम्ही आपला प्रवास यशस्वीपणे पूर्ण केला होता! बाकीच्या प्रवासात, किनारपट्टीवरील गावांमध्ये व वसाहतींमध्ये लोकांना पुष्कळ आस्था असल्याचे आम्हाला आढळले. अनेकांनी विचारले, ‘तुमच्यापैकी काही जण आमच्यासोबतच का राहात नाही? तुम्ही इतक्या लवकर परत जात आहात याचे आम्हाला वाईट वाटते!’”

कॉरस्युट येथील एका मनमिळावू कुटुंबाने, प्रवाशांपैकी पाच जणांना आपल्यासोबत जेवण्याचे आमंत्रण दिले. “आम्ही रात्री त्यांच्याकडेच मुक्काम करावा अशी या कुटुंबाची इच्छा होती. पण तेथून आणखी दूर गेल्यास ४० किलोमीटरवर नांगर टाकण्यासाठी चांगली ठिकाणे असल्यामुळे आम्ही आमंत्रण न स्वीकारता प्रवास सुरू ठेवला. नंतर आम्हाला समजले की दुसऱ्‍या दिवशीच पहाटे एक हिमगिरी कोसळून, आम्ही जेथे होतो तेथे एका समुद्रलाटेत १४ लहान बोटी उलटल्या होत्या!”

शेवटी, बांधवाचा हा गट आपली थुले मोहीम पूर्ण करून लुलिसॅट येथे परतला. जवळजवळ त्याच वेळी इतर दोन प्रचारक ग्रीनलँडच्या पूर्वेकडील किनाऱ्‍यावर असलेल्या एकाकी प्रदेशांत गेले होते. या दोनही मोहिमांमध्ये प्रचारकांनी एकूण १,२०० पुस्तके, २,१९९ माहितीपत्रके व ४,२२४ नियतकालिके, अशा भरमसाट साहित्याचे वाटप केले व त्यांनी १५२ वर्गण्या प्राप्त केल्या. अनेक नवीन आस्थेवाईक लोकांशी आता दूरध्वनी व पत्रव्यवहाराद्वारे संपर्क कायम राखण्यात येत आहे.

वेळ, शक्‍ती व पैसा खर्च करावा लागला तरीसुद्धा यहोवाच्या साक्षीदारांना, ‘पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हा,’ ही आपल्या धन्याची आज्ञा पूर्ण करण्यात मोठा आनंद प्राप्त होतो.—प्रेषितांची कृत्ये १:८.

[२८ पानांवरील चौकट]

ग्रीनलँडच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर

प्रचारकांचा गट थुले येथे पोहंचला तेव्हा जवळजवळ त्याच वेळी, वेगो आणि सोन्या हे दांपत्य कार्य न झालेल्या आणखी एका क्षेत्रास, म्हणजेच ग्रीनलँडच्या पूर्वेकडील किनारपट्टीवर असलेले इटोकरटूरमिट (स्कोअर्सबायसूंद) येथे गेले. तेथे पोहंचण्यासाठी त्यांना आइसलँडचा प्रवास करून परत विमानाने ग्रीनलँडच्या किनाऱ्‍यावरील कॉन्स्टेबल पॉइंट येथे, यावे लागले व तेथून पुढे हेलिकॉप्टरने जावे लागले.

ग्रीनलँडिक मातृभाषेचे हे दोन पायनियर सांगतात, “यहोवाचे साक्षीदार येथे येण्याची ही पहिलीच वेळ होती. अशा एकाकी ठिकाणी राहत असूनही, आश्‍चर्य म्हणजे येथील लोक माहितगार होते. तथापि, नवीन गोष्टी शिकण्यास देखील ते आनंदी होते. गोष्टी सांगण्यात पटाईत असल्यामुळे त्यांनी सील माशांच्या शिकारींबद्दल व निर्सगातील इतर अनुभवांबद्दल आम्हाला मोठ्या उत्साहाने सांगितले.” प्रचार कार्यास त्यांनी कसा प्रतिसाद दिला?

“घरोघरी प्रचार करीत असताना आम्हाला जे—— हा ख्रिस्ती धर्माचा शिक्षक भेटला. तो म्हणाला, ‘तुमच्या भेटींमध्ये मलाही समाविष्ट केल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.’ आम्ही आमचे साहित्य त्याला दाखवले व त्यांचा कसा वापर करावा हे देखील दाखवले. पुढच्या दिवशी तो आमच्याकडे आला व त्याला यहोवा या नावाबद्दल शिकायचे होते. आम्ही त्याला त्याच्या स्वतःच्या ग्रीनलँडिक बायबलमधून एका तळटिपेतील स्पष्टीकरण दाखवले. आम्ही गेल्यानंतर त्याने न्युक येथील आमच्या मित्रांना दूरध्वनी केला व आमच्या भेटीसाठी आभार व्यक्‍त केले. आम्ही या माणसाला मदत करीत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

“आम्ही ओ——, या शिक्षकाला देखील भेटलो ज्याला यहोवाच्या साक्षीदारांविषयी माहिती आहे. त्याने आम्हाला, आपल्या १४ ते १६ वर्षीय मुलांच्या वर्गाशी दोन तास बोलण्याची परवानगी दिली. आम्ही त्यांना आपली व्हिडियो फिल्म दाखवली व त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे दिली. तरुण लोक विचारत असलेले प्रश्‍न—उपयोगी पडणारी उत्तरेa (इंग्रजी) व इतर पुस्तके पटापट स्वीकारली गेली. नंतर आम्ही त्यांपैकी तीन मुलींना भेटलो. त्यांची पुष्कळ प्रश्‍ने होती. विशेषतः त्यांतील एक मुलगी तर फारच आस्थेवाईक होती. तिने विचारले, ‘साक्षीदार व्हायचे असल्यास काय करावे लागते? तुम्ही करीत असलेल्या कामात खरंच खूप समाधान मिळत असेल. माझे बाबा देखील तुमच्या बाजूने आहेत.’ आम्ही तिला पत्र लिहिण्याचे वचन दिले.

“एका वसाहतीत आम्हाला एम——, हा आणखी एक ख्रिस्ती धर्माचा शिक्षक भेटला व एक चांगली चर्चा झाली. तो म्हणाला की शिकारीला गेलेल्या माणसांना परत आल्यावर तो खात्रीने आमचे साहित्य देईल. अशा रितीने त्या एकाकी ठिकाणी आता तो आमचा ‘प्रचारक’ आहे.”

प्रवास, फेऱ्‍याचा व थकवणारा होता तरीसुद्धा, या दोन पायनियरांना त्यांच्या प्रयत्नांचे सार्थक झाल्यासारखे वाटले.

[तळटीपा]

a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा