आशीर्वाद वा शाप —निवड समोर आहे!
“जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील.”—अनुवाद ३०:१९.
१. मानवांना कोणत्या क्षमतेची देणगी देण्यात आली होती?
यहोवा देवाने आपली—त्याच्या बुद्धिमान मानव प्राण्यांची—स्वतंत्र नैतिक प्रतिनिधी या नात्याने रचना केली आहे. आपली निर्मिती निव्वळ यंत्रमानव किंवा रोबोट्स अशी केली नव्हती, तर आपल्याला निवड करण्याचा सुहक्क व जबाबदारी देण्यात आली होती. (स्तोत्र १००:३) पहिल्या मानवांना—आदाम आणि हव्वेला—आपल्या मार्गाक्रमणाची निवड करण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्यांच्या निवडीबाबत ते देवाला जबाबदार होते.
२. आदामाने कोणती निवड केली, व त्याचा परिणाम काय झाला?
२ सृष्टीकर्त्याने मानवी जीवनाकरता परादीस पृथ्वीवरील शाश्वत आशीर्वाद विपुलतेने दिला आहे. मग तो उद्देश अद्याप साध्य का झालेला नाही? कारण आदामाने चुकीची निवड केली. “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील,” अशी आज्ञा यहोवाने मानवाला दिली होती. (उत्पत्ति २:१६, १७) आदामाने आज्ञेचे पालन करण्याचे निवडले असते तर आपल्या पहिल्या पालकांना आशीर्वाद मिळाला असता. अवज्ञा केल्यामुळे त्यांच्यावर मृत्यू ओढवला. (उत्पत्ति ३:६, १८, १९) म्हणूनच, पाप आणि मृत्यू आदामाच्या प्रजेवरही ओढवला.—रोमकर ५:१२.
आशीर्वाद शक्य करून देण्यात आले
३. देवाने मानवजातीकरिता आपला उद्देश पूर्ण होईल याची खात्री कशी दिली?
३ यहोवा देवाने मानवजातीला आशीर्वादित करण्याचा आपला उद्देश कालांतराने पूर्ण होईल असा एक मार्ग तयार केला. त्याने स्वतः एदेन बागेमध्ये एका संततीविषयीची भविष्यवाणी केली: “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन; ती तुझे डोके फोडील, व तू तिची टांच फोडिशील.” (उत्पत्ति ३:१५) अब्राहामाच्या वंशातून येणाऱ्या या संततीद्वारे, आज्ञाधारक मानवजातीला आशीर्वाद मिळणार होते असे वचन देवाने नंतर दिले.—उत्पत्ति २२:१५-१८.
४. मानवजातीला आशीर्वाद देण्यासाठी यहोवाने कोणती व्यवस्था केली आहे?
४ आशीर्वादाची ती वचनयुक्त संतती येशू ख्रिस्त असल्याचे शाबीत झाले. मानवजातीला आशीर्वाद देण्याच्या यहोवाच्या व्यवस्थेमधील येशूच्या भूमिकेविषयी ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) पापी मानवजातीपैकी देवाची आज्ञा पाळणारे आणि येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाच्या फायद्यांचा लाभ घेणारे आशीर्वादांचा आनंद लुटतील. (प्रेषितांची कृत्ये ४:१२) तुम्ही आज्ञाधारकता व आशीर्वाद यांची निवड कराल का? अवज्ञा केल्याने तर याच्या विपरीत परिणाम होतील.
शापांविषयी काय?
५. “शाप” या शब्दाचा अर्थ काय आहे?
५ आशीर्वादाच्या विरुद्ध शाप आहे. “शाप” या शब्दाचा अर्थ, कोणाला तरी वाईट बोलणे किंवा एखाद्याविरुद्ध अभद्र बोलणे. हिब्रू शब्द क्वेलालाह, क्वालाल या मूळ क्रियापदातून घेण्यात आला आहे ज्याचा अक्षरशः अर्थ “हलके होणे” असा होतो. परंतु लाक्षणिक अर्थाने वापरल्यास त्याचा अर्थ, “शिव्याशाप” देणे किंवा ‘तुच्छ समजणे’ असा होतो.—लेवीय २०:९; २ शमुवेल १९:४३.
६. प्राचीन बेथेल जवळ अलीशाच्या बाबतीत कोणती घटना घडली?
६ शापाविषयीचे वर्णन असलेल्या एका त्वरित हालचालीच्या नाट्यमय उदाहरणाचा विचार करा. देवाचा संदेष्टा अलीशा जेरिकोहून बेथेलला चालला असताना ही घटना घडली. वृत्तान्त सांगतो: “तो वाट चढून जात असता, नगरातून काही पोरे बाहेर येऊन त्याची थट्टा करून म्हणाली, ‘अरे टकल्या, चालता हो.’ तेव्हा त्याने मागे वळून त्यांजकडे पाहिले व परमेश्वराचे नाम घेऊन त्यांस शाप दिला, तेव्हा वनातून दोन अस्वली बाहेर पडल्या व त्यांनी त्यांतल्या बेचाळीस पोरांस फाडून टाकिले.” (२ राजे २:२३, २४) अलीशाची थट्टा करणाऱ्या पोरांना शाप देताना तो नेमके काय म्हणाला ते प्रकट करण्यात आलेले नाही. तरीपण, त्या शाब्दिक उच्चाराचा काहीतरी परिणाम घडला; कारण तो, ईश्वरी इच्छेच्या सुसंगतेत कार्य करणाऱ्या देवाच्या संदेष्ट्याने यहोवाचे नाव घेऊन शाप दिला होता.
७. अलीशाची थट्टा करणाऱ्या पोरांचे काय झाले, व का?
७ अलीशाने एलीयाचा झगा परिधान केला होता, व त्या संदेष्ट्याचा कोणताही उत्तराधिकारी मुलांना नको होता हे, थट्टा करण्याचे मुख्य कारण होते. (२ राजे २:१३) एलीयाचा उत्तराधिकारी होण्याच्या आव्हानाला उत्तर देण्यासाठी व या तरुणांना आणि त्यांच्या पालकांना, यहोवाच्या संदेष्ट्याला आदर दाखवण्याचे शिकवण्यासाठी अलीशाने एलीयाच्या देवाचे नाव घेऊन, थट्टा करणाऱ्यांना शाप दिला. वनातील दोन अस्वलींना बाहेर आणून ४२ थट्टेखोरांना फाडण्यास लावून, अलीशा आपला संदेष्टा आहे याची स्वीकृती यहोवाने प्रकट केली. यहोवा त्या काळी पृथ्वीवर ज्या दळणवळणाच्या माध्यमाचा उपयोग करत होता त्याबद्दल निर्लज्जपणे अनादर दाखवल्यामुळे त्याने निर्णायकपणे त्यांच्याशी असा व्यवहार केला.
८. इस्राएलचे लोक काय करण्यास तयार झाले, व त्याचे परिणाम कोणते होते?
८ अनेक वर्षांपूर्वी, इस्राएल लोकांनी अशाच प्रकारे देवाच्या व्यवस्थेला अनादर दाखवला होता. त्याची सुरवात काहीशी अशी झाली: सा. यु. पू १५१३ मध्ये, यहोवाने इस्राएल लोकांची इजिप्तच्या दास्यत्वातून सुटका करून, जणू काय “गरुडांच्या पंखांवर बसवून” त्यांच्यावर आपली कृपा दाखवली. त्यानंतर लगेचच त्यांनी देवाच्या आज्ञेत राहण्याची शपथ घेतली. आज्ञाधारकतेचा अविभाज्य संबंध देवाची कृपापसंती प्राप्त करण्याशी कशा प्रकारे होता ते पहा. यहोवा मोशेद्वारे म्हणाला: “आता तुम्ही खरोखर माझी वाणी ऐकाल आणि माझा करार पाळाल तर सर्व लोकांपेक्षा माझा खास निधि व्हाल, कारण सर्व पृथ्वी माझी आहे.” त्यानंतर लोकांनी असे म्हणून होकारार्थी प्रतिसाद दिला: “परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू.” (निर्गम १९:४, ५, ८; २४:३) इस्राएल लोकांनी यहोवावर प्रेम करण्याचा दावा केला, ते त्याला समर्पित होते, आणि त्याची वाणी ऐकण्याची त्यांनी शपथ घेतली होती. असे वागल्यामुळे त्यांना पुष्कळ आशीर्वाद मिळणार होते.
९, १०. सीनाय पर्वतावर मोशे होता तेव्हा इस्राएल लोकांनी काय केले, व त्याचा काय परिणाम झाला?
९ परंतु, त्या कराराचे मूळ सिद्धांत ‘देवाच्या बोटाने’ दगडावर कोरण्याआधी ईश्वरी शाप आवश्यक बनले. (निर्गम ३१:१८) ते इतक्या भयंकर परिणामांच्या लायक का झाले होते बरे? यहोवाने जे काही म्हटले ते सर्व काही पाळण्याची इस्राएल लोकांनी इच्छा दर्शवली नव्हती का? होय, त्यांच्या शब्दांद्वारे त्यांनी आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या कृत्यांद्वारे त्यांनी शापास पात्र असलेले मार्गाक्रमण निवडले.
१० दहा आज्ञा घेण्यासाठी मोशे सीनाय पर्वतावर गेला होता त्या ४० दिवसांच्या कालावधी दरम्यान, इस्राएल लोकांनी पूर्वी यहोवाला त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचे दिलेले वचन मोडले. अहवाल सांगतो, “मोशेला पर्वतावरून उतरण्यास विलंब लागला असे लोकांनी पाहिले तेव्हा ते अहरोनाभोवती जमून त्याला म्हणाले, ‘ऊठ, आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी बनीव; कारण आम्हाला मिसर देशातून बाहेर आणणारा हा मनुष्य मोशे ह्याचे काय झाले हे आम्हाला कळत नाही.’” (निर्गम ३२:१) यहोवा, त्या काळी आपल्या लोकांचे नेतृत्व व मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मानवी माध्यमाचा वापर करीत होता त्याला अनादर दाखवल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे. इस्राएल लोक इजिप्शियन मूर्तिपूजेचे अनुसरण करण्यामध्ये पूर्णपणे बुडाले होते आणि जेव्हा एका दिवसामध्ये सुमारे ३,००० जणांचा तलवारीने वध करण्यात आला तेव्हा त्यांनी त्याचे परिणामही भोगले.—निर्गम ३२:२-६, २५-२९.
आशीर्वाद आणि शाप यांचे उच्चारण
११. आशीर्वाद आणि शाप यांच्याविषयीच्या कोणत्या सूचना यहोशवाने अंमलात आणल्या?
११ इस्राएलच्या ४० वर्षांच्या रानातील भटकंतीच्या अंताला, मोशेने, देवाच्या आज्ञेत राहण्याच्या मार्गाक्रमणाची निवड केल्यास मिळणाऱ्या आशीर्वादांची तपशीलवार माहिती दिली. यहोवाची अवज्ञा करण्याची इस्राएल लोकांनी निवड केल्यास त्यांना अनुभवाव्या लागणाऱ्या शापांचीही त्याने यादी दिली. (अनुवाद २७:११–२८:१०) इस्राएलने वाग्दत्त देशात पदार्पण केल्याच्या काही काळातच, या आशीर्वादांचा आणि शापांचा समावेश असलेल्या मोशेने दिलेल्या सूचना यहोशवाने अंमलात आणल्या. इस्राएलचे सहा वंश एबाल पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिले, आणि इतर सहा वंश गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिले. लेवी खोऱ्याच्या मधोमध उभे राहिले. स्पष्टतः, एबाल पर्वतासमोर उभे राहिलेल्या वंशांनी, त्यांना शापांची वचने वाचून दाखवल्यानंतर “आमेन!” म्हटले. गरिज्जीम पर्वताच्या पायथ्याशी उभ्या असलेल्या इतरांनी, लेव्यांनी त्यांना आशीर्वादाची वचने वाचून दाखवल्यानंतर असाच प्रतिसाद दिला.—यहोशवा ८:३०-३५.
१२. लेव्यांनी उच्चारलेले काही शाप कोणते होते?
१२ समजा, लेव्यांना असे म्हणताना तुम्ही ऐकता: “जो परमेश्वराला वीट आणणारी कोरीव अथवा ओतीव मूर्ति कारागिराकडून करवून तिची गुप्तपणे स्थापना करितो तो शापित असो. . . . जो आपल्या बापाला किंवा आईला तुच्छ मानितो तो शापित असो. . . . जो आपल्या शेजाऱ्याच्या शेताच्या सीमेची खूण सरकवितो तो शापित असो. . . . जो आंधळ्याची वाट चुकवितो तो शापित असो. . . . जो उपरी, अनाथ व विधवा ह्यांचा विपरीत न्याय करितो तो शापित असो. . . . जो आपल्या [पित्याच्या पत्नीशी] गमन करितो तो आपल्या बापाची बेअब्रू करितो म्हणून तो शापित असो. . . . जो कोणत्याही पशूशी गमन करितो तो शापित असो. . . . जो आपल्या सख्ख्या अथवा सावत्र बहिणीशी गमन करितो तो शापित असो. . . . जो आपल्या सासूशी गमन करितो तो शापित असो. . . . जो आपल्या शेजाऱ्याला गुप्तपणे ठार मारितो तो शापित असो. . . . निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी जो लांच घेतो तो शापित असो. . . . जो ह्या नियमशास्त्राची वचने मान्य करून ती आचरणात आणीत नाही तो शापित असो.” प्रत्येक शापानंतर, एबाल पर्वतासमोर उभे असलेले वंश “आमेन” म्हणतात!—अनुवाद २७:१५-२६.
१३. लेव्यांनी उच्चारलेल्या विशिष्ट आशीर्वादांना तुम्ही तुमच्या शब्दांत कसे व्यक्त कराल?
१३ आता, लेवी जेव्हा प्रत्येक आशीर्वाद वाचून दाखवतात तेव्हा गरिज्जीम पर्वतासमोर उभे राहिलेले मोठ्या आवाजाने त्यांना प्रतिसाद देताना तुम्ही ऐकत असल्याची कल्पना करा: “नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होतील. तू आत येशील तेव्हा आशीर्वादित होशील व बाहेर जाशील तेव्हा आशीर्वादित होशील.”—अनुवाद २८:३-६.
१४. इस्राएल लोकांना कशाच्या आधारावर आशीर्वाद मिळणार होते?
१४ कोणत्या आधारावर हे आशीर्वाद प्राप्त करता येऊ शकत होते? अहवाल सांगतो: “तुझा देव परमेश्वर ह्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील; तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील.” (अनुवाद २८:१, २) होय, देवाच्या आज्ञेत राहणे, ही ईश्वरी आशीर्वाद उपभोगण्याची गुरुकिल्ली होती. पण आज आपल्याबद्दल काय? “आपला देव परमेश्वर याची वाणी” नित्य ऐकून, आपण व्यक्तिगतरीत्या आशीर्वाद व जीवन यांची निवड करू का?—अनुवाद ३०:१९, २०.
निरखून पाहणे
१५. अनुवाद २८:३ मध्ये लिहिलेल्या आशीर्वादामध्ये कोणता मुख्य मुद्दा होता, व आपण त्यातून कसा लाभ मिळवू शकतो?
१५ यहोवाच्या आज्ञेत राहिल्यामुळे एखादा इस्राएल उपभोगू शकत होता अशा विशिष्ट आशीर्वादांचा आपण जरा विचार करू या. उदाहरणार्थ, अनुवाद २८:३ म्हणते: “नगरात तू आशीर्वादित होशील व शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील.” देवाकडून आशीर्वाद मिळणे, हे ठिकाण किंवा नेमणूक यावर अवलंबून नाही. काहींना त्यांच्या परिस्थितींत जखडल्यासारखे वाटेल, कारण कदाचित ते भौतिकरीत्या उद्ध्वस्त झालेल्या क्षेत्रात किंवा युद्धग्रस्त राष्ट्रात राहतात. आणखी इतरांना यहोवाची सेवा एका वेगळ्या ठिकाणाहून करण्याची उत्कंठा लागली असेल. काही ख्रिस्ती पुरुष, मंडळीमध्ये त्यांना सेवासेवक अथवा वडील नियुक्त केले नाही म्हणून निरुत्साहित झाले असतील. काही वेळा ख्रिस्ती स्त्रियांना, त्या पायनियर किंवा मिशनरी या नात्याने पूर्ण वेळेचे सेवक या स्थितीत राहू शकत नसल्यामुळे नाउमेद वाटू शकेल. तरीही, जे ‘यहोवाची वाणी ऐकतात व तो ज्या अपेक्षा करतो त्यांना पूर्ण करतात’ ते सर्व आता आणि चिरकालासाठी आशीर्वादित होतील.
१६. अनुवाद २८:४ चे तत्त्व यहोवाची संघटना आज कसे अनुभवत आहे?
१६ अनुवाद २८:४ म्हणते: “तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचा उपज आणि तुझी खिल्लारे, गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांचे वत्स आशीर्वादित होतील.” “तुझ्या” या इब्री सर्वनामाचा एकवचनी वापर केल्यामुळे यावरून हेच सूचित होते, की प्रत्येक आज्ञाधारक इस्राएलाचा तो व्यक्तिगत अनुभव असणार होता. आज यहोवाच्या आज्ञाधारक सेवकांबद्दल काय? राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणाऱ्या ५०,००,००० पेक्षा अधिक उद्घोषकांनी मनापासून केलेल्या परिश्रमावर देवाच्या आशीर्वादामुळे यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेतील जगव्याप्त वाढ आणि विस्तार यांमध्ये प्रगती होत आहे. (मार्क १३:१०) तसेच आणखी वाढ होण्याची संभावना स्पष्ट दिसत आहे कारण, १९९५ मधील प्रभूच्या सांजभोजनाला १,३०,००,००० पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. तुम्ही देखील राज्य आशीर्वादांचा उपभोग घेत आहात का?
इस्राएलच्या निवडीमुळे बराच परिणाम घडला
१७. आशीर्वाद किंवा शाप ‘आपल्या मागे’ येणे, कशावर अवलंबून होते?
१७ खरे पाहता, आशीर्वाद आज्ञाधारक इस्राएलाच्या मागोमाग येणार होते. “हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील,” असे वचन देण्यात आले होते. (अनुवाद २८:२) त्याचप्रमाणे, शापांबद्दलही असे सांगण्यात आले होते: “सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील.” (अनुवाद २८:१५) तुम्ही प्राचीन काळातील एखादा इस्राएली असता तर ‘तुमच्या मागे’ काय आले असते, आशीर्वाद की शाप? तुम्ही देवाची आज्ञा मानणार की त्याची अवज्ञा करणार यावर ते अवलंबून होणार होते.
१८. इस्राएल लोकांना शाप कसे टाळता आले असते?
१८ अनुवाद २८:१५-६८ मध्ये अवज्ञा केल्यामुळे मिळणाऱ्या दुःखदायक परिणामांना शाप म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यातील काही अनुवाद २८:३-१४ मध्ये सविस्तरपणे सांगितलेल्या आज्ञाधारकतेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादांच्या अगदी विरुद्ध आहेत. बहुतेकवेळा, इस्राएल लोकांनी खोट्या उपासनेत भाग घेण्याचे निवडल्यामुळे शापांच्या पीडादायक परिणामांची कापणी केली. (एज्रा ९:७; यिर्मया ६:६-८; ४४:२-६) केवढे भयंकर! चांगले आणि वाईट असे स्पष्टपणे ठरवणाऱ्या यहोवाच्या हितकारक नियमांच्या व तत्त्वांच्या आज्ञेत राहणे, ही योग्य निवड करून अशा परिणामांना टाळता आले असते. आज अनेक लोकांनी, खोट्या धर्माचे आचरण करून, लैंगिक अनैतिकतेत भाग घेऊन, बेकायदेशीर अमली पदार्थांचा वापर करून, मादक पेयांचे अतिप्राशन करून आणि यासारख्याच गोष्टी करून बायबल तत्त्वांच्या विरुद्ध कार्य करण्याचे निवडल्यामुळे ते दुःख आणि शोक यांचा सामना करीत आहेत. प्राचीन इस्राएल आणि यहुदाप्रमाणे अशा वाईट निवडी केल्यामुळे ईश्वरी नापसंती आणि हृदयाच्या अनावश्यक यातना परिणीत होतात.—यशया ६५:१२-१४.
१९. यहुदा आणि इस्राएलने यहोवाची आज्ञा पाळण्याची निवड केली तेव्हा त्यांनी उपभोगलेल्या परिस्थितींचे वर्णन करा.
१९ इस्राएलने यहोवाची आज्ञा पाळल्यानंतरच सर्वत्र विपुल आशीर्वाद व मनाची शांती होती. उदाहरणार्थ, राजा शलमोनाच्या दिवसांविषयी आपण वाचतो: “यहूदा आणि इस्राएल हे समुद्रकिनाऱ्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत. . . . दानापासून बैर-शेब्यापर्यंत सारे यहूदी व इस्राएल आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दींत निर्भय राहत होते.” (१ राजे ४:२०-२५) राजा दावीदाच्या काळात देवाच्या शत्रूंकडून पुष्कळ विरोध होता, तरी राष्ट्राने सत्य देवाची आज्ञा पाळण्याची निवड केली तेव्हा आपल्या पाठीशी यहोवा व त्याचे आशीर्वाद असल्याची त्याला जाणीव झाली.—२ शमुवेल ७:२८, २९; ८:१-१५.
२०. मानवांविषयी देवाला कशाची खातरी आहे?
२० तुम्ही देवाची आज्ञा पाळाल की त्याची अवज्ञा कराल? इस्राएल लोकांपुढे निवड होती. आपण सर्वांनी आदामाकडून पापी प्रवृत्ती वारशाने प्राप्त केली असली तरी, आपल्याला स्वतंत्र इच्छेचे दान सुद्धा मिळाले आहे. सैतान, हे दुष्ट जग आणि आपली अपरिपूर्णता, हे सर्व असले तरी आपण योग्य निवड करू शकतो. शिवाय, प्रत्येक परीक्षेत आणि मोहात, केवळ बोलण्याद्वारेच नव्हे तर कृतीद्वारे योग्य निवड करणारे लोक असतील याची आपल्या निर्माणकर्त्याला खात्री आहे. (१ पेत्र ५:८-१०) तुम्ही त्यांच्यातील एक असाल का?
२१. पुढील लेखात कशाचे परीक्षण केले जाईल?
२१ पुढील लेखात, आपण गत उदाहरणांच्या प्रकाशात आपल्या मनोवृत्ती आणि आपली कृत्ये यांना तोलून पाहू शकतो. “जीवन व मरण आणि आशीर्वाद व शाप मी तुझ्यापुढे ठेवले आहेत; म्हणून तू जीवन निवडून घे म्हणजे तू व तुझी संतति जिवंत राहील,” या मोशेद्वारे देवाच्या वचनांना आपल्यातील प्रत्येक जण कृतज्ञतापूर्वक प्रतिसाद देवो.—अनुवाद ३०:१९.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
◻ पापी मानवांकरता यहोवाने कशा प्रकारे आशीर्वाद शक्य केले आहेत?
◻ शाप म्हणजे काय?
◻ इस्राएल लोकांना शापाऐवजी आशीर्वाद कसे प्राप्त करता आले असते?
◻ देवाची आज्ञा पाळल्यामुळे इस्राएल लोकांनी कोणते आशीर्वाद उपभोगले?
[१५ पानांवरील चित्रं]
इस्राएल लोक एबाल व गरिज्जीम पर्वतासमोर एकत्र जमले