राज्य घोषकांचा वृत्तान्त
“तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत”
मोशेने आपल्या मृत्यूच्या काही काळापूर्वी इस्राएल लोकांना यहोवाच्या आज्ञांपैकी एकूण एक आज्ञा पाळण्यास आर्जवले. तो म्हणाला: “ज्या गोष्टी आज मी तुम्हाला साक्षीदाखल सांगत आहे त्या सर्व लक्षात ठेवा, ह्या नियमशास्त्रातील सर्व गोष्टी काळजीपूर्वक पाळण्याची तुम्ही आपल्या मुलांना आज्ञा करा. ही बाब तुमच्या दृष्टीने निरर्थक नसावी, कारण हीच तुमचे जीवन होय.”—अनुवाद ३२:४६, ४७.
शेकडो वर्षांनंतर स्तोत्रकर्त्याने देवाच्या सर्व शिकवणुकींच्या महत्त्वावर जोर देताना म्हटले: “हे परमेश्वरा, [यहोवा, NW] तू जवळ आहेस, तुझ्या सर्व आज्ञा सत्य आहेत.” (स्तोत्र ११९:१५१) पहिल्या शतकात, येशूने स्वतः ‘यहोवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाच्या’ महत्त्वाचा उल्लेख केला. (मत्तय ४:४) तसेच, देवाच्या प्रेरणेने प्रेषित पौलाने लिहिले की “प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख . . . उपयोगी आहे.”—२ तीमथ्य ३:१६.
यहोवा देवाने त्याच्या वचनातून दिलेला संपूर्ण संदेश गांभिर्याने विचारात घ्यावा अशी तो आपल्या उपासकांकडून अपेक्षा करतो हे स्पष्ट आहे. बायबलमध्ये, महत्त्वाचा नाही असा एकही उतारा नाही. देवाच्या वचनाविषयी यहोवाच्या साक्षीदारांचा हाच दृष्टिकोन आहे व हे मॉरिशियसच्या पुढील अनुभवावरून दिसून येते.
श्रीयुत डी ——एका दूरच्या खेड्यात राहत होते, जेथे ते रात्रीच्या पहारेकऱ्याचे काम करत. पुष्कळ काळापासून त्यांनी देवाची उपासना करण्याच्या उचित मार्गाचा मनःपूर्वक शोध घेतला होता. रात्री, गस्त घालतेवेळी त्यांनी बायबल वाचणे सुरू केले. कालांतराने त्यांचे आरंभापासून शेवटापर्यंत वाचून झाले होते. देवाचे नाव यहोवा आहे हे त्यांना शिकायला मिळाले व हे नाव त्यांना आपल्या हिन्दी बायबलमध्ये अनेकदा आढळले. त्यांना प्रकटीकरणाचे पुस्तक विशेषतः मनोवेधक असल्याचे जाणवले.
संपूर्ण बायबलचे पालन करणारा एखादा धर्म अस्तित्वात असेल का असा त्यांनी स्वतःशीच विचार केला. त्यांना माहीत असलेले धर्म बहुतेक करून बायबलच्या काही भागांचे पालन करीत होते हे त्यांच्या लक्षात आले. काही धर्म इब्री शास्त्रवचनांना स्वीकारून ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांना नाकारत होते. याउलट, इतर धर्म इब्री शास्त्रवचनांकडे दुर्लक्ष करून केवळ ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांनाच व्यावहारिक महत्त्वाचे श्रेय देत होते.
एके दिवशी श्रीयुत डी —— यांना एक जोडपे पावसात भिजत असल्याचे आढळले व हे पाहून त्यांनी या जोडप्यास आपल्या घरात आसरा घेण्यासाठी आमंत्रित केले. ते यहोवाचे साक्षीदार होते. पत्नीच्या हातात प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!a हे पुस्तक होते. श्रीयुत डी ——यांनी लगेच त्यांच्याकडे ते पुस्तक मागितले. प्रकटीकरणाच्या भविष्यवाणीवर आधारित माहिती फार गहन असल्याने समजण्यास कठीण जाईल असे साक्षीदारांना वाटले व यामुळे त्यांनी त्या पुस्तकाऐवजी दुसरे पुस्तक प्रस्तुत केले. परंतु श्रीयुत डी ——यांना प्रकटीकरण हेच पुस्तक हवे होते.
त्यांनी आपली प्रत मिळाल्याबरोबर लवकरच सबंध पुस्तक वाचून काढले. यानंतर, त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास स्वीकारला. साक्षीदार संपूर्ण बायबलला खूप महत्त्व देतात हे पाहून ते खूपच प्रभावित झाले. यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात, जेथे इब्री शास्त्रवचनांचा तसेच ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचाही सखोल अभ्यास केला जातो तेथे सभांना उपस्थित राहणे त्यांनी सुरू केले. ते आता एक राज्य प्रचारक व ख्रिस्ती मंडळीतील बाप्तिस्मा घेतलेले सदस्य आहेत.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित.