पूर्वग्रह अस्तित्वात नसेल तेव्हा!
या दुर्दैवी जगात एखादा पूर्वग्रह मनातून काढून टाकणे, अणूचे विभाजन करण्यापेक्षा अधिक कठीण आहे, असे एकदा वैज्ञानिक ऑल्बर्ट आइन्स्टाइन यांनी म्हटल्याचे सांगितले जाते. तसेच, दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान प्रकाशझोतात आलेले व नंतर अमेरिकेच्या माहिती संस्थेचे संचालक झालेले पत्रकार एड्वर्ड आर. मर्रो म्हणतात की, “पूर्वग्रहांना कोणीही मिटवू शकत नाही—त्यांना केवळ मान्य करता येते.”
ही विधाने खरी आहेत असे वाटते का? भेदभाव व वंशविद्वेष मिटवणे अशक्य आहे का? पूर्वग्रहाविषयी देवाचा कोणता दृष्टिकोन आहे?
देव पक्षपाती नाही
बायबल पक्षपाताच्या विरोधात आहे. (नीतिसूत्रे २४:२३; २८:२१) ते म्हणते की “वरून येणारे ज्ञान [बुद्धी, NW] हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फले ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.” (याकोब ३:१७) अशा प्रकारच्या बुद्धीच्या अगत्याविषयी प्राचीन
इस्राएलातील शास्त्यांना ठासून सांगण्यात आले होते. ‘न्यायनिवाडा करताना अन्याय करू नका,’ अशी सूचना त्यांना देण्यात आली होती. ‘गरिबाच्या गरिबीकडे पाहू नका आणि समर्थापुढे नमू नका.’—लेवीय १९:१५.
पक्षपात व पूर्वग्रह याविषयी बायबलच्या खंबीर दृष्टिकोनावर येशू ख्रिस्त तसेच पेत्र आणि पौल या त्याच्या प्रेषितांनी जोर दिला. ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारख्या’ लोकांविषयी येशू निःपक्षपाती होता. (मत्तय ९:३६) “वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा,” असे त्याने शिकवले.—योहान ७:२४.
स्वतः यहोवा देव पक्षपाती नसल्याची, पेत्र व पौल आपल्याला खात्री देतात. पेत्राने म्हटले: “‘देव पक्षपाती नाही,’ हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रांत जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) प्रेषित पौल आपल्याला सांगतो: “देवाजवळ पक्षपात नाही.”—रोमकर २:११.
बायबलचा प्रभाव
बायबलच्या मार्गदर्शनानुसार चालणाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व बदलण्यास ते समर्थ आहे. इब्री लोकांस ४:१२ म्हणते: ‘देवाचे वचन सजीव व सक्रिय आहे.’ यहोवाच्या मदतीने पूर्वग्रहदूषित मते बाळगणारा मनुष्य आपल्या विचारसरणीत परिवर्तन करून इतरांसोबतच्या आपल्या व्यवहारात निःपक्षपाती होऊ शकतो.
उदाहरणार्थ, तार्सकर शौलास विचारात घ्या. बायबलच्या अहवालानुसार, एके काळी त्याने ख्रिस्ती मंडळीचा कट्टरपणे विरोध केला कारण तो कर्मठ धार्मिक संप्रदायांचे पालन करणारा होता. (प्रेषितांची कृत्ये ८:१-३) सर्व ख्रिश्चन लोक धर्मत्यागी होते तसेच खऱ्या भक्तीचे वैरी होते अशी यहुदी संप्रदायामुळे त्याला पक्की खात्री झाली होती. आपल्या पूर्वग्रहामुळे त्याने ख्रिश्चनांची कत्तल करण्यास समर्थन दिले. बायबल म्हणते की तो “प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे व त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फूत्कार टाकीत होता.” (प्रेषितांची कृत्ये ९:१) असे करताना, आपण देवाचीच सेवा करत आहोत असे त्याला वाटले.—पडताळा योहान १६:२.
तथापि, तार्सकर शौल आपला टोकाचा पूर्वग्रह मिटवू शकला. एवढेच नव्हे तर तो स्वतः ख्रिश्चन देखील झाला! नंतर पौल, अर्थात येशू ख्रिस्ताचा प्रेषित या नात्याने त्याने लिहिले: “मी . . . पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो. मी असा होतो तरी मी जे केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली.”—१ तीमथ्य १:१३.
आपल्या विचारसरणीत असे अमूलाग्र बदल करणारा पौल एकटाच नव्हता. पौलाने आपल्या सह सुवार्तिक तीतास लिहिलेल्या पत्रात ख्रिश्चन लोकांना सल्ला दिला, की त्यांनी “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे . . . कारण आपणहि पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बहकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालविणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.”—तीत ३:२, ३.
पूर्वग्रहाच्या अडखळणांवर मात करणे
आज, प्रांजळ ख्रिश्चन तो सल्ला पाळण्याचा प्रयत्न करतात. ते वरकरणी ग्रहांवरून लोकांबद्दल अंदाज बांधायचे टाळू इच्छितात. यामुळे ते इतरांची ‘निंदा करत’ नाहीत. त्यांना या जगातील राष्ट्रीयत्वाच्या, जातीय व वांशिक बंधनांना न जुमानणारे आंतरराष्ट्रीय बंधुत्व लाभले आहे.
काळ्या रंगाचा ब्राझीलियन, एन्रीक याचा अनुभव विचारात घ्या. स्वतः वांशिक भेदभावाला बळी पडल्याने त्याच्या मनात गोऱ्या लोकांबद्दल तीव्र घृणा विकसित झाली. तो सांगतो: “दोन गौरवर्णीय साक्षीदार माझ्या घरी देवाच्या नावाविषयी चर्चा करण्यासाठी आले. सुरवातीला मला ऐकण्याची इच्छा नव्हती कारण माझ्या नजरेत गोरे लोक विश्वासहार्य नव्हते. तथापि, लवकरच मला दिसून आले की त्यांच्या संदेशात सत्याची झाक होती. यामुळे, मी बायबल अभ्यास स्वीकारला. माझा पहिलाच प्रश्न होता, ‘तुमच्या चर्चमध्ये अनेक काळे लोक आहेत का?’ त्यांनी उत्तर दिले, ‘होय.’ मग त्यांनी मला बायबल कथांचं माझं पुस्तक,a (इंग्रजी) या पुस्तकातील शेवटले चित्र दाखवले ज्यात विविध वंशांची लहान मुले दाखवलेली आहेत. त्यात एका काळ्या मुलाचा देखील समावेश होता व याने मला दिलासा मिळाला. नंतर मी यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात गेलो व तेथे मला वेगवेगळ्या वंशाचे लोक एकमेकांना आदराने वागवताना आढळले. हे माझ्या नजरेत फार महत्त्वपूर्ण होते.”
आता एक यहोवाचा साक्षीदार या नात्याने एन्रीक, एका अस्सल ख्रिस्ती बंधुत्वाचा भाग असल्यामुळे आनंदी आहे. याचे श्रेय कोणत्याही मनुष्याला जात नाही याची त्याला जाणीव आहे. तो म्हणतो: “यहोवा व येशू यांनी माझ्यासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आज मी त्यांचा आभारी आहे. मी सर्व वंश, वर्ण व पार्श्वभूमींतून येणाऱ्या तसेच एकाच उद्देशासाठी एकत्रित असलेल्या यहोवाच्या लाखो एकनिष्ठ सेवकांसोबत कार्य करतो.”
डार्यो, लहानाचा मोठा होत असताना, पूर्वग्रहाचा आणखी एक बळी ठरला. वयाच्या १६ व्या वर्षी तो यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागला. त्याने निरीक्षले: “साक्षीदारांत, वांशिक वर्चस्वाच्या कोणत्याही भावना नसतात असे मला आढळले आहे.” निष्कपट प्रेमाचे वातावरण पाहून तो प्रभावित झाला. विशेषतः, त्याने हे पाहिले की मंडळीतील जबाबदारीच्या हुद्यांवर वेगवेगळ्या वंशाचे लोक सेवा करत होते. मंडळीच्या बाहेरच्या लोकांकडून डार्यो जेव्हाही कोणत्या प्रकारचा पूर्वग्रह किंवा भेदभाव अनुभवतो तेव्हा तो लक्षात ठेवतो की यहोवा सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांवर प्रेम करतो.
कसे तोंड द्यावे
आपल्या सर्वांनाच आदर व सन्मानाची वागणूक हवीहवीशी वाटते. याच कारणास्तव, पूर्वग्रहास बळी पडणे ही सहन करण्यास कठीण अशी परीक्षा असते. या दुष्ट जगातील सर्व पूर्वग्रहदुषित मनोवृत्तींपासून ख्रिस्ती मंडळी आपले पूर्ण संरक्षण करत नाही. जोपर्यंत दियाबल सैतान या जगातील कारभारांवर नियंत्रण करतो तोपर्यंत अन्याय हे असणारच. (१ योहान ५:१९) प्रकटीकरण १२:१२ आपल्याला ताकीद देते: “पृथ्वी व समुद्र ह्यांवर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काळ थोडा आहे हे ओळखून अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे.” त्याचा हेतू केवळ त्रास देणे हा नाही. त्याची तुलना एका भक्ष्योपजीवी प्राण्याशी करण्यात आली आहे. प्रेषित पेत्र आपल्याला सांगतो: “तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.”—१ पेत्र ५:८.
तसेच बायबल आपल्याला असे सांगते की: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) पूर्वग्रहास तोंड देण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे संरक्षणासाठी यहोवाकडे पाहणे, जसे दाविदाने केले: “हे माझ्या देवा, दुर्जनाच्या हातातून मला मुक्त कर, अन्यायी व निर्दय ह्यांच्या तावडीतून मला मुक्त कर.” (स्तोत्र ७१:४) आपण स्तोत्रकर्त्यासारखी प्रार्थना देखील करू शकतो: “हे देवा, माझ्यावर दया कर, कारण मनुष्य मला तुडवीत आहे; दिवसभर माझ्याशी लढून त्याने माझा छळ मांडिला आहे.”—स्तोत्र ५६:१.
देव अशा प्रार्थनांना कसा प्रतिसाद देईल? बायबल उत्तर देते: “धावा करणारा दरिद्री, दीन व अनाथ, ह्यांना तो सोडवील. दुबळा व दरिद्री ह्यांच्यावर तो दया करील, दरिद्र्यांचे जीव तो तारील.” (स्तोत्र ७२:१२, १३) यहोवा, नेमलेल्या वेळी अन्यायास बळी पडलेल्या सर्वांना मुक्त करील हे जाणणे खरोखर केवढे हर्षवर्धक आहे!
“ती उपद्रव देणार नाहीत”
या जगातील विविध सरकार कदाचित आपले कायदे व योजना यांकरवी पूर्वग्रहाविरुद्ध लढत राहतील. कदाचित ते समानता व न्याय यांचे अभिवचन देत राहतील. परंतु ते यशस्वी होणार नाहीत. (स्तोत्र १४६:३) केवळ देवच सर्व पूर्वग्रहदुषित वागणुकीला नाहीसे करू शकतो व तो तसे करीलही. तो मानवजातीचे एका संयुक्त कुटुंबात रूपांतर करील. “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा . . . मोठा लोकसमुदाय” या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या शेवटातून बचावून शांतिमय जीवनाचा उपभोग घेईल.—प्रकटीकरण ७:९, १०.
वांशिक व सामाजिक पूर्वग्रहामुळे घडलेले सर्व अपाय यहोवा दूर करील. जरा कल्पना करा, कोणालाही अन्यायी वागणूक दिली जाणार नाही! “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही.” (मीखा ४:४) तसेच यशया ११:९ म्हणते: “ती उपद्रव देणार नाहीत.”
जर तुम्ही आता पूर्वग्रहाला बळी पडलेल्यांपैकी एक असाल, तर ही भविष्याची अद्भुत आशा, यहोवासोबत तुमचा नातेसंबंध अधिक बळकट करील. ती तुम्हाला या दुष्ट व्यवस्थीकरणाचे अन्याय सहन करण्यास मदत करील. पूर्वग्रहाला तोंड देऊन भविष्याकडे डोळे लावताना बायबलच्या पुढील सुज्ञ सल्ल्याचे पालन करा: “अहो परमेश्वराची [यहोवा, NW] आशा धरणारे तुम्ही सर्व हिम्मत बांधा; तुमचे मन धीर धरो.”—स्तोत्र ३१:२४.
[तळटीपा]
a वॉचटावर बायबल ॲन्ड ट्रॅक्ट सोसायटी यांच्याद्वारे प्रकाशित.