पूर्वग्रहास तुम्ही बळी पडलेले आहात का?
जातीय हिंसा, वंशविद्वेश, भेदभाव, विभक्तीकरण व जातीसंहार या सर्वांत कोणता सारखेपणा आहे? ते सर्व एका प्रचलित मानवी प्रवृत्तीचे परिणाम आहेत व ती म्हणजे, पूर्वग्रह!
पूर्वग्रह म्हणजे नेमके काय? “प्रामाणिकपणे न्याय करण्याची पर्वा न करता प्रथमपासूनच घडवलेले मत,” अशा प्रकारे एक विश्वकोष त्याची व्याख्या करतो. अपरिपूर्ण मानव असल्यामुळे काही अंशी पूर्वग्रह बाळगण्याकडे आपला कल असतो. तुम्हाला कदाचित असे प्रसंग आठवत असतील जेव्हा तुम्ही संपूर्ण वस्तुस्थिती विचारात न घेता एखादे मत बनवले होते. ही पूर्वग्रहदुषित प्रवृत्ती व त्याउलट यहोवा देवाची पारख करण्याची पद्धत यांमध्ये बायबल तफावत दाखवते. ते म्हणते: “मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर [यहोवा, NW] हृदय पाहतो.”—१ शमुवेल १६:७.
पूर्वग्रह अपायकारक ठरू शकतो
आपल्यातील प्रत्येकाबद्दल कधी न कधी कोणीतरी विपरीत ग्रह निश्चित केला असेल. (पडताळा उपदेशक ७:२१, २२.) स्थूलमानाने बोलल्यास, आपण सारेच पूर्वग्रहाचे बळी आहोत. तथापि, पूर्वग्रहदुषित विचार मनातून लगेच काढून टाकल्यास ते कदाचित फारसा अपाय करणार नाहीत. उलटपक्षी, अशा विचारांना मनात घर करू दिल्यास, अपाय होऊ शकतो. असे करणे आपल्याला एखाद्या असत्य मतप्रणालीवर विश्वास ठेवण्यास भुलवू शकते. उदाहरणार्थ, पूर्वग्रहांच्या प्रभावाखाली काही लोक प्रांजळपणे असे समजतात की एखादी व्यक्ती केवळ विशिष्ट धार्मिक, जातीय किंवा राष्ट्रीय समूहाची असल्यामुळे लोभी, आळशी किंवा गर्विष्ठ असू शकते.
अनेक प्रकरणांत असे विपरीत ग्रह इतरांना अन्यायी, अविचारी एवढेच नव्हे तर हिंसक वागणूक देण्यात परिणीत होतात. कत्तली, जातीसंहार, जातीय विध्वंस व पूर्वग्रहाच्या इतर प्रकारच्या अतिरेकामुळे कोट्यवधी लोकांनी आपले जीव गमावले आहेत.
सबंध जगातील सरकारांनी स्वातंत्र्य, सुरक्षितता व समानतेच्या अनतिक्रमणीय हक्कांची कायदेशीरपणे हमी देण्याद्वारे पूर्वग्रहाविरुद्ध लढा दिला आहे. तुम्ही तुमच्या देशाची घटना किंवा नियमावली वाचली तर त्याअंतर्गत, नागरिकांची जात, लिंग किंवा धर्म लक्षात न घेता त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी बनविण्यात आलेले कलम किंवा सुधारित कायदा तुम्हाला आढळेल यात शंका नाही. असे असून देखील, पूर्वग्रह व भेदभाव हे जागतिक प्रमाणावर थैमान घालीत आहेत.
तुम्ही पूर्वग्रहास बळी पडलेले आहात का? निव्वळ तुमची जात, वय, लिंग, राष्ट्रीयत्व किंवा धार्मिक समजुतींवरून तुमच्यावर लोभी, आळशी, मूर्ख किंवा गर्विष्ठ असल्याचा शिक्का मारण्यात आला आहे का? तुम्हाला पूर्वग्रहामुळे योग्य शिक्षण, रोजगार, निवारा व सामाजिक सेवांपासून वंचित ठेवण्यात येत आहे का? असे असल्यास तुम्ही कसे तोंड देऊ शकता?
[३ पानांवरील चित्रं]
पूर्वग्रहांना मनात घर करू दिल्यास जातीय द्वेष फोफावतो