तुम्ही चिरस्थायी मैत्रींचा आनंद घेऊ शकता
मैत्रींमध्ये अनेक अडसर असतात. खरे पाहता, “शेवटल्या काळी” प्रेम, स्वाभाविक स्नेह आणि निष्ठा कमी होईल, असे बायबलने भाकीत केले. (२ तीमथ्य ३:१-५; मत्तय २४:१२) या परिस्थिती, एकाकीपणाच्या अभूतपूर्व पीडेस कारणीभूत ठरल्या आहेत. एका व्यक्तीने म्हटले: “माझ्या सभोवतालची परिस्थिती नोहाच्या तारवाप्रमाणे आहे. तुम्ही अविवाहित असल्यास, तुम्ही त्यामध्ये प्रवेश करू शकत नाही.” याचा सर्वस्वी दोष एकाकी असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लावता येत नाही. जगातील काही भागांत चिरस्थायी मैत्रींना आव्हान देणाऱ्या गोष्टींमध्ये वारंवार स्थानांतर करणे, कुटुंबांचे विभाजन होणे, भावनाशून्य आणि धोकेदायक शहरे आणि रिकाम्या वेळेतील लक्षणीय घट यांचा समावेश होतो.
अठराव्या शतकातील ग्रामस्थाने एका वर्षात किंवा त्याच्या आयुष्यात जेवढे लोक पाहिले त्यापेक्षा अधिक लोक आधुनिक दिवसातील शहरात राहणाऱ्या व्यक्तीच्या एका सप्ताहात संपर्कात येतील! तरी देखील, आजचे संबंध बहुतेक वेळा वरकरणी असतात. अनेक जण निरंतर समूहांमध्ये राहण्यासाठी आणि चांगला वेळ घालविण्याच्या प्रयत्नांत पूर्णपणे गुंतलेले असतात. तथापि, चुकीच्या निवडलेल्या सोबत्यांसह निरर्थक आनंद करणे म्हणजे इंधनासाठी काट्यांचा वापर करण्यासारखे आहे, हे आपण मान्य केलेच पाहिजे. उपदेशक ७:५, ६ म्हणते: “मूर्खाचे गायन ऐकण्यापेक्षा शहाण्याची निषेधवाणी ऐकणे बरे. कारण मूर्खाचे हास्य हंड्याखाली जळणाऱ्या काट्याकुट्यांच्या कडकडण्यासारखे असते; हेहि व्यर्थ होय.” काट्यांमुळे थोडावेळ तेजस्वी आणि कडकड आवाज करणारा अग्नी निर्माण होऊ शकतो, परंतु, त्यामध्ये आपणास ऊब देण्याइतपत पुरेशी क्षमता नसते. त्याचप्रमाणे, गोंगाट करणारे, हसणारे सोबती आपणास क्षणिक काळासाठी विकर्षित करतील, परंतु ते एकाकीपणास पूर्णपणे काढणार नाहीत आणि खऱ्या मित्रांसाठी असणाऱ्या आपल्या गरजेचे समाधान देखील करणार नाहीत.
एकांत हा एकाकीपणापासून वेगळा आहे. काही एकांत, स्वतःस ताजेतवाने करण्यासाठी आणि अशा प्रकारे मित्र या नात्याने अधिक काही देण्यासाठी आवश्यक आहेत. एकाकीपणाला तोंड देत असता, अनेक जण इलेक्ट्रॉनिक मनोरंजनाच्या माध्यमाकडे तात्काळ वळतात. एकाकीपणामुळे उमटणारी अगदी सामान्य प्रतिक्रिया म्हणजे दूरदर्शन पाहणे, असे एका अभ्यासानुसार दिसून आले. तथापि, आपण एकाकी असतो तेव्हा दीर्घकालीन दूरदर्शन पाहणे ही सर्वात वाईट गोष्ट आपण करू शकतो, असा समारोपही संबंधित संशोधकांनी केला. ते क्रियाशून्यता, कंटाळवाणेपणा आणि दिवास्वप्न पाहणे यांसारख्या गोष्टी वाढीस लावते व इतर लोकांशी व्यक्तिगत दळणवळणाचे अपर्याप्त पर्याय बनते.
खरे तर, आपण आपल्या वेळेचा रचनात्मकरीत्या उपयोग केल्यास एकांत फार मोलवान ठरू शकतो. वाचन करणे, पत्रे लिहिणे, वस्तू तयार करणे आणि विश्राम करणे यांसारख्या गोष्टी करण्याद्वारे आपण तसे करू शकतो. देवास प्रार्थना करणे, बायबलचा अभ्यास करणे आणि त्यावर मनन करणे या बाबींचा रचनात्मक एकांतामध्ये आंतर्भाव होतो. (स्तोत्र ६३:६) आपला सर्वश्रेष्ठ मित्र होईल अशा यहोवा देवाशी जवळीक साधण्याचे हे मार्ग आहेत.
मैत्रींची बायबलमधील उदाहरणे
अनेक लोकांसोबत मित्रत्वाने राहणे चांगले असले तरी बायबल आपणास, ‘बंधूपेक्षाही जवळ असणारा मित्र असतो’ याचे स्मरण देते. (नीतिसूत्रे १८:२४) आपल्या सर्वांना जिव्हाळ्याचे काही मित्र हवे असतात जे आपली खरोखरच काळजी घेतात आणि ज्यांच्या मैत्रींमुळे आपल्याला आनंद, सामर्थ्य आणि शांती मिळते. आज अशा खऱ्या मैत्री असामान्य असल्या तरी बायबलमध्ये प्राचीन काळातील काही उदाहरणे खासपणे नमूद आहेत. उदाहरणार्थ, दावीद आणि योनाथान यांमधील उल्लेखनीय मैत्री. आपण त्यापासून काय शिकू शकतो? त्यांची मैत्री चिरस्थायी का ठरली?
एक कारण म्हणजे, दावीद आणि योनाथानामधील महत्त्वपूर्ण आस्था समान होत्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यहोवा देवावर त्यांची सखोल श्रद्धा होती. देवावरील दावीदाचा विश्वास आणि यहोवाच्या लोकांच्या संरक्षणार्थ केलेल्या त्याच्या कार्यांना पाहून, “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.” (१ शमुवेल १८:१) अशा प्रकारे, देवासाठी असणाऱ्या परस्पर प्रेमाद्वारे मित्रांना एकमेकांच्या बंधनात ठेवण्यास मदत होते.
योनाथान आणि दावीद कणखर पुरुष होते आणि त्यांनी ईश्वरी तत्त्वांप्रमाणे जीवन व्यतीत केले. यामुळे ते एकमेकांचा आदर करू शकले. (१ शमुवेल १९:१-७; २०:९-१४; २४:६) आपल्याकडे शास्त्रवचनीय तत्त्वांप्रमाणे चालणारे ईश्वरी मित्र असल्यास आपण खरोखरच आशीर्वादित आहोत.
दावीद आणि योनाथानाच्या मैत्रीला इतर बाबींनी देखील हातभार लावला. त्यांची मैत्री प्रामाणिक व खरी होती आणि त्यांचा एकमेकांवर पूर्ण विश्वास होता. योनाथानाने निष्ठापूर्वक दावीदाच्या लाभांना प्रथमस्थानी ठेवले. दावीदास राजपदाचे अभिवचन मिळाले म्हणून त्याने त्याचा हेवा केला नाही, तर त्याने त्यास भावनात्मक आणि आध्यात्मिकरीत्या पाठिंबा दिला. तसेच दावीदाने त्याच्या मदतीचा स्वीकार केला. (१ शमुवेल २३:१६-१८) दावीदाने आणि योनाथानाने परस्परांविषयीच्या भावना शास्त्रवचनीयरीत्या उचित मार्गांनी एकमेकांस व्यक्त केल्या. त्यांची ईश्वरी मैत्री खऱ्या कृतज्ञतेवर आणि स्नेहावर पायाभूत होती. (१ शमुवेल २०:४१; २ शमुवेल १:२६) ते दोघेही देवास विश्वासू राहिल्याने ती मैत्री अतूट होती. अशा प्रकारच्या तत्त्वांना कार्यान्वयित केल्याने खऱ्या मैत्रींची उभारणी करण्यास आणि त्यांना टिकवून ठेवण्यास आपणास मदत होऊ शकते.
मैत्रींना विकसित कसे करावे
तुम्ही खऱ्या मित्रांच्या शोधात आहात का? त्यासाठी तुम्हाला लांब जावे लागणार नाही. तुमच्या नियमित संपर्कात येणाऱ्यांपैकी काही तुमचे मित्र होऊ शकतात आणि कदाचित त्यांना तुमच्या मैत्रीची आवश्यकता असेल. विशेषतः सहख्रिश्चनांबद्दल, ‘अंतःकरण विशाल करा’ या पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करणे बुद्धिमत्तेचे आहे. (२ करिंथकर ६:११-१३) तथापि, हरएक प्रयत्न करूनही मित्र अगदी घनिष्ठ संपर्कात येत नसल्यास त्रागा करून घेऊ नका. मैत्री विकसित करण्यासाठी सामान्यपणे अवधी लागतो आणि प्रत्येक मैत्री समान प्रमाणात घनिष्ठ होणार नाही. (उपदेशक ११:१, २, ६) अर्थातच, खऱ्या मैत्रींचा आनंद घेण्यासाठी आपण निःस्वार्थी असले पाहिजे आणि येशूच्या पुढील सल्ल्याचे अनुकरण करण्याची आपल्याला गरज आहे: “ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.”—मत्तय ७:१२.
तुमच्या मैत्रीची कोणास गरज आहे? तुमच्या समवयस्कांखेरीज, तुमच्यापेक्षा लहान किंवा मोठे असणाऱ्यांविषयी काय? दावीद आणि योनाथान, रूथ व नामी तसेच पौल आणि तीमथ्य यांच्यातील मैत्रीमध्ये वयाची काही तफावत होती. (रूथ १:१६, १७; १ करिंथकर ४:१७) तुम्ही, विधवा आणि इतर अविवाहित लोकांशी मैत्री करू शकता का? तुमच्या क्षेत्रात नवीन असणाऱ्या लोकांचा देखील विचार करा. स्थानांतर अथवा त्यांच्या जीवनमार्गाच्या परिवर्तनामुळे बहुतेक किंवा सर्वच मित्रांच्या सहवासापासून ते वंचित झाले असतील. त्यांनी तुमचा शोध घ्यावा म्हणून थांबून राहू नका. तुम्ही ख्रिस्ती असल्यास पौलाच्या पुढील सल्ल्याचे अनुकरण करण्याद्वारे चिरस्थायी मैत्री करा: “बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा; तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना.”—रोमकर १२:१०.
देण्याचा एक मार्ग या अर्थाने आपण मैत्रींचा विचार करू शकतो. आपण देत राहण्याचे शिकल्यास, लोक आपणासही देतील असे येशूने म्हटले. घेण्यापेक्षा देण्यात अधिक धन्यता आहे, याकडे देखील त्याने अंगुली दर्शवली. (लूक ६:३८; प्रेषितांची कृत्ये २०:३५) तुम्ही नानाविध पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना कधी भेटलात का? विभिन्न संस्कृतींचे लोक एकाच देवाची उपासना करतात तेव्हा ते खरी आणि चिरस्थायी मैत्री प्रस्थापित करू शकतात, ही गोष्ट यहोवाच्या साक्षीदारांच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनांनी सिद्ध केली आहे.
मैत्री अखंड ठेवणे
खेदाची गोष्ट म्हणजे, वरकरणी मित्र काहीवेळा एकमेकांस दुःख देतात. घातक चहाडी, विश्वासघात आणि गुणग्राहकतेची कमी—अशा काही गोष्टी तुम्ही मित्र मानलेल्या व्यक्तीद्वारे केल्या जातात तेव्हा फारच दुःखदायक वाटतात. अशा परिस्थितींमध्ये काय करता येऊ शकते?
उत्तम उदाहरण ठेवा. अनावश्यक दुःख देण्याचे टाळण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करा. काही ठिकाणी, दुसऱ्यांची थट्टा करणे मित्रांसाठी लोकप्रिय आहे. निव्वळ “थट्टा” करण्याच्या उद्देशाने देण्यात आलेली कठोर वागणूक किंवा करण्यात आलेली बनवाबनवी मित्रांना जवळ आणणार नाही.—नीतिसूत्रे २६:१८,१९.
मैत्रींना कायम ठेवण्यासाठी कठीण परिश्रम करा. मित्र एकमेकांपासून फारच अपेक्षा बाळगतात तेव्हा काहीवेळा गैरसमज निर्माण होतात. नेहमीप्रमाणे स्नेहभाव दाखविण्यास, आजारी व गंभीर समस्येने त्रस्त असणाऱ्या मित्राला संभवतः शक्य होणार नाही. अशा वेळी समंजस होण्याचा आणि आधार देण्याचा प्रयास करा.
समस्यांना त्वरित आणि प्रेमळपणे मिटवा. शक्य असल्यास हे खासगीमध्ये करा. (मत्तय ५:२३, २४; १८:१५) तुम्हाला तुमच्या मित्रासोबतचे चांगले संबंध टिकवून ठेवायचे आहेत, हे त्याला ठाऊक असल्याची खात्री करा. प्रामाणिक मित्र एकमेकांना क्षमा करतात. (कलस्सैकर ३:१३) जो बंधूपेक्षाही जवळचा असतो—अशाप्रकारचा मित्र तुम्ही व्हाल का?
मैत्रींविषयी वाचणे आणि त्यावर विचार करणे, ही केवळ एक सुरवात आहे. आपल्याला एकाकीपणा जाणवत असल्यास, उचित कार्य करू या त्यामुळे आपण अधिक काळ एकाकी राहणार नाही. आपण प्रयत्न केल्यास आपल्याला खरे मित्र मिळू शकतात. त्यांपैकी काही जणांसोबत आपले खास संबंध प्रस्थापित होतील. परंतु देव या सर्वश्रेष्ठ मित्राची जागा कोणीही घेऊ शकत नाही. केवळ यहोवाच आपल्याला पूर्णपणे जाणून घेऊ शकतो, समजून घेऊ शकतो आणि आधार देऊ शकतो. (स्तोत्र १३९:१-४, २३, २४) याशिवाय, त्याचे वचन जेथे चिरस्थायी खरे मित्र प्राप्त करणे शक्य होईल अशा नवीन जगाच्या भवितव्याची वैभवी आशा प्रदान करते.—२ पेत्र ३:१३.
[५ पानांवरील चित्रं]
दावीदाने आणि योनाथानाने खऱ्या मैत्रीचा आनंद लुटला तसा आपण देखील लुटू शकतो