त्यांच्या सर्वश्रेष्ठ मित्राद्वारे सामर्थ्य प्राप्त झालेले
यहोवाच्या साक्षीदारांना एका मैत्रीमुळे खासपणे सामर्थ्य मिळते. ती मैत्री म्हणजे, त्यांचा सर्वश्रेष्ठ मित्र यहोवा देव यासोबतचा त्यांचा मोलवान नातेसंबंध होय. (पडताळा याकोब २:२३.) तो त्यांना त्यांच्या विश्वासाच्या कठीण परीक्षांमध्ये आधार देतो.
हुकुमशाही आधिपत्याधीन, साक्षीदारांच्या सचोटीच्या अहवालाची अनेक निरीक्षकांनी वाखाणणी केली आहे. त्यांपैकी इरजी क्रुपिक्का हे एक आहेत. ते तत्त्वज्ञान आणि नैसर्गिक विज्ञानांचे डॉक्टर असून त्यांनी झेकोस्लोव्हाकिया येथील कम्युनिस्ट छळ छावण्यांमध्ये पुष्कळ वर्षे घालविल्यानंतर १९६८ मध्ये देशांतर केले. रेनेसान्स रोझुमू (बुद्धीचे पुनरूज्जीवन) या त्यांच्या पुस्तकात, तटस्थतेमुळे कारावास झालेल्या साक्षीदारांच्या दुःखाविषयी आणि दृढतेविषयी ते टिपणी करतात.
कम्युनिस्ट शासनाच्या अधीन असणाऱ्या अनेक यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या विश्वासामुळे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांना तुरुंगात डांबण्यात आले तरी त्यांनी युद्धाच्या उद्देश्यांस्तव युरेनियम धातूस खाणीतून बाहेर काढण्यास नकार दिला. (यशया २:४) सन १९५२ मध्ये एका खाणीत पाहिलेल्या दृश्याचे क्रुपिक्का वर्णन करतात. त्यांनी कडक थंडीच्या हवामानामध्ये दोन व्यक्तींना बर्फाच्या पुतळ्यांसारखे उभे असलेले पाहिले. त्यांच्या डोक्यांना आणि शरीराच्या वरील भागांना धातूच्या बॅरलने आच्छादलेले होते.
क्रुपिक्का लिहितात: “त्या व्यक्ती तुरुंगातील जीर्ण वस्त्रांनिशी भल्या पहाटेपासून बाहेर उभ्या राहिल्या होत्या. पाय गारठलेले असतानाही इतक्या वेळ उभे राहणे त्यांना कसे शक्य झाले? विश्वासाच्या सामर्थ्यामुळे. बॅरल जुने आणि गंजलेले होते. एका निष्ठुर मनुष्याने त्यांच्या डोक्यांवर आणि खांद्यावर बॅरल इतक्या जोराने ठोकला की त्यामुळे बॅरलची टोकदार कड एकाच्या जॅकेटला छेदून त्वचेमध्ये घुसली आणि त्याच्या बाहीमधून रक्त ठिपकू लागले.
“संरक्षकाने आमच्या रांगेस त्यांच्यासमोर उभे केले आणि त्यानंतर सेनापतीने आम्हाला एक छोटेसे भाषण दिले. काम करण्यास नकार देणे बंडखोरी आहे आणि त्यास त्यानुसार शिक्षा देण्यात येते, असे त्याने म्हटले. युद्ध आणि संहाराविषयीच्या कोणत्याही वायफळ भावनिक सबबी या विरोधकांना, समाजाच्या शत्रूंना उपयोगी ठरणार नाहीत.”
सेनापतीने एक गज घेऊन एका बॅरलवर प्रहार केला. तो मनुष्य बॅरलसह खाली कोसळला, अजूनही त्याचे डोके झाकलेले होते. त्यानंतर जे काही घडले ते क्रुपिक्कांच्या स्मरणशक्तीत खोलवर रुजले आहे.
ते अहवाल देतात: “ड्रममधून गाण्याचा आवाज येत होता. हलका आवाज, पुटपूटत देवाला केलेली प्रार्थना, जो सर्वकाही आणि कोठूनही—जुन्या, गंजलेल्या युरेनियमच्या बॅरलमधून प्रयत्नपूर्वक गायलेला गाण्याचा आवाज सुद्धा ऐकू शकतो. तो, या गाण्यास, प्रमुख चर्चमध्ये गायलेल्या सामूहिक गीतापेक्षा अधिक सुस्पष्टपणे ऐकतो.”
चेक प्रजासत्ताकमधील यहोवाच्या साक्षीदारांना सप्टेंबर १, १९९३ मध्ये अधिकृत वैध मान्यता मिळाली. चेक साक्षीदार आता त्यांचे ख्रिस्ती शैक्षणिक कार्य स्वतंत्रतेत पार पाडण्यात आनंदी आहेत. होय, त्यांचा सर्वश्रेष्ठ मित्र, यहोवा याविषयी इतरांना सांगण्यास ते हर्षित आहेत.
[७ पानांवरील चित्रं]
चेक प्रजासत्ताक येथील अधिवेशनातील उपस्थित जण