खऱ्या मित्रांची आपणास गरज आहे
जेनी आणि सू यांच्यात चैतन्यपूर्ण संभाषण चालले आहे. हास्याची लकीर उठते, डोळ्यांत अर्थपूर्ण भाव उमटतात—अशा त्यांच्या प्रत्येक हालचालीतून, दुसऱ्याला काय सांगावयाचे आहे याविषयीची त्यांची तीव्र आस्था प्रकट होते. पार्श्वभूमी विभिन्न असल्या, तरी त्यांच्यामध्ये अर्थातच अनेक गोष्टी समान आहेत आणि त्या दोघी एकमेकींना पुष्कळ आदर देखील दाखवतात.
दुसरीकडे, एरिक आणि डेनिस एका प्रकल्पावर काम करीत आहेत; कित्येक वर्षांपासून एकत्र मिळून काम केलेल्या अनेक प्रकल्पांपैकी तो एक प्रकल्प आहे. ते बिनधास्त आहेत आणि त्यांच्या हास्यात कोणताही नाटकीपणा नाही. गंभीर विषयांवर संभाषण करताना ते प्रामाणिकपणे मतांची देवाणघेवाण करतात. ते एकमेकांचा आदर करतात. जेनी आणि सू यांप्रमाणे एरिक आणि डेनिस देखील खरे मित्र आहेत.
या वर्णनांमुळे तुम्हाला आनंद होईल आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या मित्रांचा विचार कराल. दुसऱ्या बाजूला पाहता, या वर्णनांमुळे अशा मैत्री असाव्यात, असे तुम्हाला मनापासून वाटेल. तुम्ही सुद्धा त्यांस प्राप्त करू शकता!
आपणास खऱ्या मित्रांची गरज का आहे
आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हितकारक मैत्री आवश्यक आहेत. तथापि, आपणास एकाकी वाटते, तेव्हा आपल्यामध्ये काही कमी आहे, असा याचा अर्थ होत नाही. एकाकीपणा, ही एक क्षुधा आहे; आपणास साहचर्याची गरज आहे हे दाखविणारा तो एक नैसर्गिक संकेत आहे, असे काही संशोधक म्हणतात. तथापि, अन्नामुळे एकतर आपली भूक कमी होते किंवा आपण त्यामुळे तृप्त होतो अगदी त्याचप्रमाणे योग्य प्रकारच्या मैत्रींमुळे एकाकीपणा कमी किंवा नाहीसा होऊ शकतो. याशिवाय, आपणास मोलवान समजणारे मित्र असणे, ही काही अशक्य कोटीतील गोष्ट नव्हे.
मानवांस साहचर्याच्या गरजेसह निर्माण करण्यात आले होते. (उत्पत्ति २:१८) खरा मित्र किंवा सहचर ‘विलापकालासाठी निर्माण झालेला असतो,’ असे बायबल म्हणते. (नीतिसूत्रे १७:१७) यास्तव, आवश्यकता असते तेव्हा खऱ्या मित्रांनी एकमेकांची मदत मागण्यास समर्थ असले पाहिजे. केवळ मदत प्राप्त करणे अथवा कामात किंवा खेळात सहचर होणे, यांपेक्षा अधिक काही मैत्रीमध्ये सामावलेले आहे. चांगले मित्र एकमेकांमधील गुण प्रभाविपणे विकसित करतात. नीतिसूत्रे २७:१७ (कॉमन लँग्वेज भाषांतर) म्हणते: “लोखंड लोखंडाला तीक्ष्ण करते. माणूस माणसाची बुद्धी तीक्ष्ण करतो.” ज्याप्रमाणे लोखंडाच्या एका तुकड्याचा वापर त्याच धातूपासून तयार करण्यात आलेल्या पात्यास तीक्ष्ण करण्यासाठी करता येऊ शकतो त्याचप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्याच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक स्थितीस तीक्ष्ण करण्यात यशस्वी होईल. आपणास निराशाजनक घटना खिन्न करीत असल्यास, मित्राचा सहानुभूतिपूर्वक दृष्टिक्षेप आणि शास्त्रवचनीय उत्तेजन अत्यंत उभारणीकारक होऊ शकते.
बायबलमध्ये मैत्रीची सांगड प्रेम, दाट परिचय, गोपनीयता आणि साहचर्य यांसोबत घालण्यात येते. मैत्रींमध्ये शेजाऱ्यांचा, सहकर्मचाऱ्यांचा आणि अशाच इतर लोकांचा कदाचित समावेश होईल. काही जण जिवलग मित्रांमध्ये त्यांच्या विशिष्ट नातेवाईकांचा देखील समावेश करतात. तथापि, आज अनेकांसाठी खरे मित्र लाभणे आणि ते टिकवून ठेवणे कठीण आहे. असे का आहे? तुम्ही खऱ्या आणि चिरस्थायी मैत्रींचा आनंद लुटू शकता का?