वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 २/१५ पृ. ८-१३
  • आपल्याकडे आनंदाने जयघोष करण्याचे कारण आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपल्याकडे आनंदाने जयघोष करण्याचे कारण आहे
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आनंद करण्याची गरज असणारे लोक
  • परिवर्तित परिस्थितीमुळे आनंदी
  • त्या प्रदेशाला परादीससारखे बनवणे
  • आता आणि सदासर्वकाळासाठी आनंदी
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • परादीस—तुम्ही ही आशा बाळगता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • “हा मी आहे! मला पाठीव” असे तुम्ही म्हणाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 २/१५ पृ. ८-१३

आपल्याकडे आनंदाने जयघोष करण्याचे कारण आहे

“ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.”—यशया ३५:१०.

१. आनंदी असण्याचे आज विशेषकरून कोणाकडे कारण आहे?

तुम्ही कदाचित पाहिले आहे की आजकाल, थोडे लोक खरोखर आनंदी आहेत. तथापि, खरे ख्रिस्ती या नात्याने, यहोवाचे साक्षीदार आनंदी आहेत. आणि त्याचप्रकारचा आनंद प्राप्त करण्याची आशा, साक्षीदारांबरोबर सहवास ठेवणाऱ्‍या आणखी लाखो बाप्तिस्मा न घेतलेल्या आबालवृद्धांसमोर आहे. तुम्ही हे शब्द या नियतकालिकात वाचत आहात ही वस्तुस्थितीच सूचित करते की हा आनंद केव्हाचाच तुमचा झाला आहे किंवा तुम्ही तो नक्कीच साध्य करू शकता.

२. एखाद्या ख्रिश्‍चनाचा आनंद बहुतांश लोकांच्या सामान्य स्थितीचे वैधर्म्य कसे दाखवतो?

२ अनेक लोकांना वाटते की त्यांच्या जीवनात कशाची तरी उणीव आहे. तुमच्याबद्दल काय? तुम्ही वापरू शकाल अशा सर्वच भौतिक वस्तू तुमच्याकडे नाहीत हे कबूल आहे, निश्‍चितच आजच्या सर्वच श्रीमंत आणि सत्ताधारी लोकांकडे असलेल्या त्या सर्वच वस्तू नाहीत. शिवाय तुम्हाला आणखी चांगले आरोग्य आणि जोम हवे असेल. तरीही, आनंदाच्या बाबतीत तुम्ही पृथ्वीवरील कोट्यावधी लोकांपेक्षा सर्वात श्रीमंत आणि आरोग्यपूर्ण आहात, असे निर्धास्तपणे म्हणू शकता. ते कसे?

३. कोणत्या अर्थभरीत शब्दांकडे आपण लक्ष दिले पाहिजे व का?

३ येशूच्या शब्दांची आठवण करा: “माझा आनंद तुम्हामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्‍या गोष्टी सांगितल्या आहेत.” (योहान १५:११) “तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.” वाह, किती छान हे वर्णन! ख्रिस्ती जीवनाचा सखोल अभ्यास आमचा आनंद परिपूर्ण होण्याची कारणे प्रकट करील. पण आता, यशया ३५:१० मधील अर्थभरीत शब्दांकडे लक्ष द्या. हे अर्थभरीत आहेत कारण त्यांचा आज आपल्याशी खूप संबंध आहे. आपण वाचतो: “मुक्‍त केलेले परमेश्‍वराचे [यहोवाचे, NW] लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.”

४. यशया ३५:१० मध्ये कोणत्या प्रकारच्या आनंदाचा उल्लेख केलेला आहे व आपण त्याकडे लक्ष का दिले पाहिजे?

४ “अक्षय आनंद.” “अक्षय” ही संज्ञा यशयाने हिब्रूमध्ये जे लिहिले त्याचे अचूक भाषांतर आहे. पण इतर शास्त्रवचनांत भाषांतरीत केल्याप्रमाणे या वचनाचे तात्पर्य ‘युगानुयुग’ असे आहे. (स्तोत्र ४५:६; ९०:२; यशया ४०:२८) यास्तव, आनंदाचा समय अंतहीन असेल, तेथे अशी परिस्थिती—होय, उचित परिस्थिती—असेल जी सार्वकालिक आनंदास अनुमती देईल. हे खरोखरच आल्हाददायक वाटत नाही का? परंतु कदाचित, या वचनामुळे तुम्ही एखाद्या सैद्धांतिक प्रसंगावर विवेचन करताना हा विचार तुमच्या मनाला चाटून जाईल, की ‘माझ्या दैनिक समस्या आणि चिंता जितक्या गोवल्या जातात तितके खरे तर ते मला गोवत नाही.’ परंतु वस्तुस्थिती याच्या विपरीत काहीतरी शाबीत करतात. यशया ३५:१० मधील भविष्यसूचक अभिवचनाचा आज तुमच्यासाठी काही अर्थ आहे. तो काय हे शोधून काढण्यासाठी आपण या सुंदरशा अध्यायाचे, यशया ३५ चे, प्रत्येक भागाची संदर्भासहित नोंद घेऊन परीक्षण करू या. आपल्याला जे काही आढळेल, त्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल याची खात्री बाळगा.

आनंद करण्याची गरज असणारे लोक

५. कोणत्या भविष्यसूचक मांडणीत यशया ३५ व्या अध्यायातील भविष्यवाणी आढळते?

५ साह्‍य म्हणून आपण या मोहक भविष्यवाणीच्या पार्श्‍वभूमीकडे, त्याच्या ऐतिहासिक मांडणीकडे पाहू या. एक हिब्रू संदेष्टा यशया याने सा. यु. पू. ७३२ च्या आसपास ती लिहिली. ते बॅबिलोनी सैन्यांनी जेरूसलेमचा नाश करण्याच्या दशकांआधी होते. यशया ३४:१, २ सूचित करते त्याप्रमाणे देवाने राष्ट्रांवर, जसे की यशया ३४:८ मध्ये उल्लेखल्यानुसार एदोमवर त्याचा क्रोध प्रकट करणार असल्याचे भाकीत केले होते. स्पष्टपणे त्याने तेव्हा हे करण्यासाठी प्राचीन बॅबिलोनी लोकांचा उपयोग केला. त्याचप्रमाणे, यहुदी अविश्‍वासू असल्यामुळे देवाने बॅबिलोनी लोकांना यहुदाचा नाश करण्याची परवानगी दिली. परिणाम? देवाच्या लोकांना बंदिवासात नेण्यात आले आणि त्यांची मातृभूमी ७० वर्षांसाठी उजाड राहिली.—२ इतिहास ३६:१५-२१.

६. एदोमी लोकांवर आणि यहुद्यांवर जे गुदरणार होते त्यामध्ये कोणते वैधर्म्य आहे?

६ परंतु, एदोमी आणि यहुदी लोकांमध्ये महत्त्वपूर्ण फरक होता. एदोमी लोकांवरील ईश्‍वरी बदला कायम होता; कालांतराने ते लोक या नात्याने नाहीसे झाले. होय, एदोमी लोक ज्या क्षेत्रात राहत होते तो उजाड भग्नावशेष तुम्ही पाहू शकता जसे, की पेट्राचे जगप्रसिद्ध अवशेष. पण, आज असे कोणतेही राष्ट्र किंवा लोक नाहीत ज्यांना ‘एदोमी लोक’ म्हणून ओळखता येईल. दुसऱ्‍या बाजूला पाहता, बॅबिलोन्यांनी यहुदाचा केलेला नाश कायमचाच, म्हणजे त्या देशाला चिरकालासाठी दुःखित करून सोडणारा होता का?

७. बॅबिलोनच्या बंदिवासात नेलेल्या यहुद्यांनी यशयाच्या ३५ व्या अध्यायाला कसा प्रतिसाद दिला असावा?

७ यशयाच्या ३५ व्या अध्यायातील या आश्‍चर्यकारक भविष्यवाणीचा अर्थ उद्दीपित करणारा आहे. त्याला पुनःस्थापन भविष्यवाणी असे म्हटले जाऊ शकते, कारण सा. यु. पू. ५३७ मध्ये जेव्हा यहुदी पुन्हा त्यांच्या मायदेशी परतले तेव्हा तिची पहिली पूर्णता झाली. बॅबिलोनमध्ये बंदिवासात नेलेल्या इस्राएलांना त्यांच्या मायदेशी परतण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. (एज्रा १:१-११) तरीही, असे घडेपर्यंत बॅबिलोनमध्ये बंदिवासात असलेल्या ज्या यहुद्यांनी या ईश्‍वरी भविष्यवाणीचा विचार केला त्यांना, आपल्या राष्ट्रीय मायदेशी म्हणजे यहुदाकडे गेल्यावर कशी परिस्थिती दिसेल याबद्दलचे कुतुहल वाटले असेल. तसेच, ते स्वतः कोणत्या परिस्थितीत असतील? या प्रश्‍नांच्या उत्तरांचा थेट संबंध, आनंदाचा खरोखर गजर करण्याचे कारण आपल्याकडे का आहे याजशी आहे. ते आपण पाहू या.

८. बॅबिलोनमधून परतल्यावर यहुद्यांना कोणती स्थिती दिसणार होती? (पडताळा यहेज्केल १९:३-६; होशेय १३:८.)

८ आता ते आपल्या मायदेशी पुन्हा जाऊ शकतात असे यहुद्यांनी ऐकले तेव्हा, निश्‍चितच परिस्थिती आशादायक वाटली नसेल. त्यांचा देश सात दशकांसाठी, एका संपूर्ण आयुष्याकरता उजाड होता. काय झाले होते त्या देशाला? होत्या नव्हत्या त्या सर्व लागवडीच्या शेती, द्राक्षमळे, किंवा फळबागा रान झाल्या असतील. सिंचित बागा किंवा लघुप्रबंधांचा ऱ्‍हास रूक्ष पडीत जमीन किंवा वाळवंट झाला असेल. (यशया २४:१, ४; ३३:९; यहेज्केल ६:१४) शिवाय, वन्य प्राण्यांचा संचारसुद्धा केवढ्या मोठ्या प्रमाणात झाला असावा त्याचा विचार करा. त्यामध्ये सिंह आणि बिबट्या यासारख्या मांसभक्षी प्राण्यांचाही समावेश असेल. (१ राजे १३:२४-२८; २ राजे १७:२५, २६; गीतरत्न ४:८) तसेच त्यांना पुरुष, स्त्री किंवा मुलावर हल्ला करण्यास धजणाऱ्‍या अस्वलांकडे दुर्लक्ष करता येणार नव्हते. (१ शमुवेल १७:३४-३७; २ राजे २:२४; नीतिसूत्रे १७:१२) त्याशिवाय, आपण फुरसे आणि इतर विषारी साप किंवा विंचवांचा उल्लेख करणे अनावश्‍यक असेल. (उत्पत्ति ४९:१७; अनुवाद ३२:३३; इयोब २०:१६; स्तोत्र ५८:४; १४०:३; लूक १०:१९) सा. यु. पू. ५३७ मध्ये बॅबिलोनमधून परतलेल्या यहुद्यांपैकी तुम्ही एक असता तर अशा क्षेत्रामधून चालण्यास तुम्ही नक्कीच कचरला असता. ते आले तेव्हा ते क्षेत्र परादीस नव्हते.

९. कोणत्या कारणास्तव परतलेल्यांना आशा आणि विश्‍वासासाठी आधार होता?

९ तरीही, यहोवाने स्वतः आपल्या उपासकांना घरी आणले होते. एका ओसाड परिस्थितीचे रुपांतर करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. निर्माणकर्त्याविषयी या गोष्टीवर तुमचा विश्‍वास नाही का? (ईयोब ४२:२; यिर्मया ३२:१७, २१, ३७, ४१) तेव्हा परतणाऱ्‍या यहुद्यांसाठी आणि त्यांच्या प्रदेशासाठी—तो काय करील—त्याने काय केले? आधुनिक काळातील देवाच्या लोकांवर आणि तुमच्या—सद्य किंवा भविष्यातील परिस्थितीवर याचा काय परिणाम होतो? आपण मागे काय घडले ते आधी पाहू या.

परिवर्तित परिस्थितीमुळे आनंदी

१०. यशया ३५:१, २ ने कोणता बदल भाकीत केला?

१० कोरेशने यहुद्यांना त्या उग्र स्वरूपाच्या प्रदेशाकडे येण्यास अनुमती दिल्यावर काय होणार होते? यशया ३५:१, २ मधील रोमांचकारी भविष्यवाणी वाचा: “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील; लबानोनाची शोभा त्याला मिळेल; कर्मेल व शारोन यांचे ऐश्‍वर्य त्याला प्राप्त होईल; ती परमेश्‍वराचे वैभव आमच्या देवाचे ऐश्‍वर्य पाहतील.”

११. यशयाने प्रदेशाबद्दलच्या कोणत्या ज्ञानाच्या आधारावर वर्णन केले आहे?

११ बायबल काळामध्ये, लेबनन, कार्मल आणि शरॉन त्यांच्या हिरव्यागार सौंदर्यासाठी प्रसिद्ध होते. (१ इतिहास ५:१६; २७:२९; २ इतिहास २६:१०; गीतरत्न २:१; ४:१५; होशेय १४:५-७) देवाच्या मदतीने यशयाने तो रुपांतरीत प्रदेश कसा असेल याचे वर्णन देण्यासाठी त्या उदाहरणांचा उपयोग केला. परंतु, हा परिणाम निव्वळ मातीवर व्हावयाचा होता का? नाही, मुळीच नाही!

१२. यशया ३५ व्या अध्यायातील भविष्यवाणी लोकांवर केंद्रित आहे, असे आपण का म्हणू शकतो?

१२ “ते अत्यंत प्रफुल्लित होईल, आनंदाने गाऊन उत्सव करील” असे यशया ३५:२ त्या प्रदेशाबद्दल म्हणते. भूमी आणि झाडे ही अक्षरशः “अत्यंत प्रफुल्लित” नव्हती हे आपल्याला माहीत आहे. तरीही, सुपीक आणि उत्पादक होण्यासाठी त्यांच्या रूपांतरामुळे लोकांना तसे वाटू लागेल. (लेवीय २३:३७-४०; अनुवाद १६:१५; स्तोत्र १२६:५, ६; यशया १६:१०; यिर्मया २५:३०; ४८:३३) प्रदेशावर झालेले अक्षरशः बदल, लोकांमध्ये झालेल्या बदलांच्या अनुरूप असतील कारण ही भविष्यवाणी लोकांवरच केंद्रित आहे. यास्तव, यशयाचे शब्द प्रामुख्याने परत आलेल्या यहुद्यांमध्ये झालेल्या बदलांवर, खासकरून त्यांच्या आनंदावर केंद्रित आहेत हे समजण्यासाठी आपल्याकडे कारण आहे.

१३, १४. यशया ३५:३, ४ ने लोकांमधील कोणत्या परिवर्तनाबद्दल भाकीत केले?

१३ त्याचप्रमाणे, आपण यहुद्यांच्या मुक्‍ततेनंतर आणि बॅबिलोनमधून परतल्यावर या उत्तेजक भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली त्याचे अधिक परीक्षण करू या. ३ आणि ४ वचनांमध्ये, त्या परतलेल्यांमध्ये झालेल्या परिवर्तनांबद्दल यशया म्हणतो: “गलित हस्त दृढ करा; लटपटणारे गुडघे बळकट करा. घाबऱ्‍या मनाच्यांस म्हणा, धीर धरा, भिऊ नका; पाहा, तुमचा देव सूड घ्यावयास, अनुरूप असे प्रतिफल द्यावयास येईल; तो येईल व तुमचा उद्धार करील.”

१४ ओसाड जमिनीचे देखील रूपांतर करू शकणारा आपला देव त्याच्या उपासकांमध्ये इतका रस बाळगून आहे याचा विचार करणे बळकटी देणारे नाही का? बंदिवासातील यहुद्यांना भवितव्याबद्दल गलित, निरुत्साहित किंवा चिंता वाटू नये अशी त्याची इच्छा होती. (इब्रीयांस १२:१२) त्या बंदिवासातील यहुद्यांच्या परिस्थितीची कल्पना करा. त्यांच्या भवितव्याबद्दल देवाच्या भविष्यवाण्यांतून ते जी आशा मिळवू पाहत होते त्याच्याव्यतिरिक्‍त, आशावादी होण्यास त्यांना कठीण गेले असेल. ते जणू काय एका अंधारकोठडीत होते, इकडेतिकडे हालचाल करू शकत नव्हते व यहोवाची सक्रिय सेवा करू शकत नव्हते. पुढे कोणताही प्रकाश नाही असेच त्यांना वाटले असेल.—पडताळा अनुवाद २८:२९; यशया ५९:१०.

१५, १६. (अ) यहोवाने परतलेल्यांसाठी काय केले असा आपण निष्कर्ष काढू शकतो? (ब) परतलेल्यांनी चमत्कारिकरीत्या शारीरिक बरे होणे का अपेक्षिले नसेल, पण यशया ३५:५, ६ नुसार देवाने काय केले?

१५ परंतु यहोवाने कोरेश राजाला, त्यांना आपल्या मायदेशी परत जाण्यासाठी त्यांची सुटका करण्यास प्रवृत्त केले तेव्हा केवढा मोठा बदल घडला! देवाने तेथे चमत्कारिकरीत्या परतलेल्या अंधळ्या यहुद्यांना दृष्टी दिली, काही बहिऱ्‍यांचे कान उघडले किंवा कोणा विकलांग वा हातपाय नसलेल्यांना बरे केले असा कोणताही बायबलचा पुरावा नाही. परंतु, त्याने असे काही तरी केले जे खरोखर त्याहीपेक्षा भव्य होते. त्याने त्यांना प्रकाशाकडे व त्यांच्या प्रिय स्वदेशाकडे पुन्हा आणून स्वतंत्र केले.

१६ यहोवाने अशाप्रकारे चमत्कारिकरीत्या शारीरिक बरे करावे अशी परतलेल्यांनी अपेक्षा केली असा कोठेही उल्लेख नाही. इसहाक, शमशोन किंवा एली यांच्याबरोबर देवाने असे केले नाही हे त्यांनी ओळखले असावे. (उत्पत्ति २७:१; शास्ते १६:२१, २६-३०; १ शमुवेल ३:२-८; ४:१५) परंतु, लाक्षणिकरीत्या त्यांच्या परिस्थितीचे ईश्‍वरी रूपांतर व्हावे अशी त्यांनी अपेक्षा केली असती तर त्यांना नाराज व्हावे लागले नाही. निश्‍चितच एका लाक्षणिक अर्थाने, ५ व ६ वचनांची खरोखर पूर्णता झाली. यशयाने अचूकपणे भाकीत केले: “तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्‍यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील.”

त्या प्रदेशाला परादीससारखे बनवणे

१७. यहोवाने कोणते शारीरिक बदल स्पष्टपणे घडवून आणले?

१७ यशयाने पुढे वर्णन केलेल्या परिस्थितींमुळे त्या परतलेल्यांना निश्‍चितच आनंदाचे कारण मिळाले असेल: “कारण रानात जलप्रवाह, वाळवंटांत झरे फुटतील. जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमिचे ठिकाणी उपळते झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे यांसहित गवत उगवेल.” (यशया ३५:६ब, ७) आज आपण त्या संपूर्ण भागात हे पाहू शकत नसलो तरी, एकेकाळी यहुदाचे क्षेत्र “चराईयोग्य परादीस” होते, असे पुराव्यानिशी सुचवले जाते.a

१८. परतलेल्या यहुद्यांनी कदाचित कशाप्रकारे देवाच्या आशीर्वादांना प्रतिसाद दिला असावा?

१८ आनंदाच्या कारणांचा विचार करताना, यहुद्यांच्या शेषांनी वाग्दत्त देशी स्वदेशप्रत्यावर्तन केले तेव्हा त्यांना कसे वाटले असेल याचा जरा विचार करा! कोल्हे आणि इतर प्राण्यांचे वस्तीस्थान झालेल्या त्या पडीत जमिनीचा ताबा घेऊन त्याचे रूपांतर करण्याची त्यांच्याकडे संधी होती. तुम्हालाही विशेषकरून देव तुमच्या प्रयत्नांवर आशीर्वाद देत आहे हे माहीत होते, तेव्हा अशा प्रकारच्या पूर्ववत करण्याच्या कामात आनंद मिळाला नसता का?

१९. कोणत्या अर्थाने बॅबिलोनी बंदिवासातून परतणे सशर्त होते?

१९ परंतु, बॅबिलोनमध्ये बंदिवासात असलेल्या कोणत्याही किंवा सर्वच यहूदी त्या आनंदी रूपांतरात भाग घेण्यासाठी परतले नसते किंवा परतले नाहीत. देवाने काही अटी मांडल्या. बॅबिलोनी, खोट्या धार्मिक प्रथांमुळे अशुद्ध झालेल्या कोणालाही परतण्याचा हक्क नव्हता. (दानीएल ५:१, ४, २२, २३; यशया ५२:११) किंवा मूर्ख मार्गाक्रमण करणारा कोणी देखील परत जाऊ शकत नव्हता. हे सर्व लोक देवासमोर अयोग्य होते. दुसऱ्‍या बाजूला पाहता, देवाच्या दर्जांनुरूप वागणाऱ्‍यांना ज्यांना त्याने सापेक्ष अर्थाने पवित्र लेखले ते यहूदाला परत जाऊ शकत होते. ते जणू काय पवित्र मार्गाने प्रवास करू शकत होते. यशयाने ८ व्या वचनात ते स्पष्ट केले: “तेथील राजमार्ग होईल; त्याला पवित्र मार्ग म्हणतील; त्याने अपवित्र जन जाणार नाहीत; पण तो त्यांच्यासाठीच, परमेश्‍वराच्या लोकांसाठी होईल; त्या मार्गाने जाणारे मूढ असले तरी मार्ग चुकणार नाहीत.”

२०. यहुदी परत येताना त्यांना घाबरण्याचे काही कारण का नव्हते व त्याचा परिणाम काय झाला?

२० परतणाऱ्‍या यहुद्यांना, पाशवी लोक किंवा लुटारूंच्या टोळ्यांच्या हल्ल्यांना घाबरण्याचे काही कारण नव्हते. का नव्हते? कारण अशा लोकांना यहोवा त्याच्या पुन्हा विकत घेतलेल्या लोकांबरोबर त्या मार्गावर येण्याची अनुमती देणार नव्हता. म्हणूनच ते हर्षदायक आशावाद, आनंदी भवितव्याने प्रवास करू शकत होते. यशयाने या भविष्यवाणीची समाप्ती करताना त्याचे वर्णन कसे केले त्याची नोंद घ्या: “तेथे सिंह असणार नाहीत, हिंस्त्र पशूंचा तेथे रिघाव होणार नाही, तेथे ते आढळणार नाहीत; पण तेथे उद्धारलेले संचार करितील. मुक्‍त केलेले परमेश्‍वराचे लोक परत येतील; ते जयजयकार करीत सीयोनेत येतील; त्यांच्या मस्तकी अक्षय आनंद राहील; ते आनंद व हर्ष पावतील, दुःख व उसासे पळ काढितील.”—यशया ३५:९, १०.

२१. यशया ३५ व्या अध्यायाच्या आधीच झालेल्या पूर्णतेकडे आपण कसे पाहिले पाहिजे?

२१ आपल्याकडे येथे केवढे हे भविष्यसूचक चित्र आहे! पण, आपण हे गत इतिहासाशी काहीसे संबंधित आहे, जणू काय एखादी सुंदरशी कथा जिचा आपल्या परिस्थितीशी किंवा भवितव्याशी काहीच संबंध नाही या दृष्टिकोनाने त्याकडे पाहू नये. वस्तुस्थिती अशी आहे, की या भविष्यवाणीची आज देवाच्या लोकांमध्ये आश्‍चर्यकारकपणे पूर्णता होत असल्यामुळे त्यामध्ये आपण प्रत्येक जण गोवलेलो आहोत. आनंदाने हर्ष करण्यासाठी ते आपल्याला सुयोग्य कारण देते. आत्ता आणि भवितव्यात तुमचे जीवन गोवलेल्या पैलूंना पुढील लेखात चर्चिले आहे.

[तळटीपा]

a कृषिविद्यावेत्ता वॉल्टर सी. लाउडरमिल्क (सं.राष्ट्र अन्‍न आणि कृषि संघटनेचे प्रतिनिधीत्व करणारे) यांनी प्रदेशाचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की: “हा प्रदेश एकेकाळी चराईयोग्य परादीस होता.” त्यांनी हेही सांगितले, की महत्त्वाची गोष्ट म्हणजे “रोमी काळापासून” तेथील हवामान बदललेले नाही आणि “एकेकाळी भरभराट असलेल्या प्रदेशाचे रूपांतर वाळवंटात होणे हे निसर्गाच्या नव्हे तर मानवाच्या कार्यांमुळे झाले.”

तुम्हाला आठवते का?

◻ यशया ३५ अध्यायाची पहिली पूर्णता केव्हा झाली?

◻ भविष्यवाणीच्या पहिल्या पूर्णतेमुळे कोणता परिणाम होणार होता?

◻ यहोवाने यशया ३५:५, ६ ची पूर्णता कशी केली?

◻ परतलेल्या यहुद्यांनी प्रदेश आणि त्यांच्या परिस्थितीत कोणते बदल अनुभवले?

[९ पानांवरील चित्रं]

एदोमी लोक एकेकाळी जेथे राहत होते तो पेट्राचा भग्नावशेष

[१० पानांवरील चित्रं]

यहुदी लोक बंदिवासात होते तेव्हा, यहूदाचे बहुतांश क्षेत्र ओसाड प्रदेशाप्रमाणे झाले जेथे अस्वल आणि सिंह यांसारख्या हिंस्त्र श्‍वापदांचा सुळसुळाट झाला होता

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा