वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w96 २/१ पृ. २७-३१
  • कधी न मरणे—माझी सर्वकाळची आशा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कधी न मरणे—माझी सर्वकाळची आशा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रेज का मरण पावला?
  • बायबलचे सत्य कवटाळणे
  • प्रचार कार्याची व्यवस्था करणे
  • युद्धकालीन अनुभव
  • विश्‍वासाच्या परीक्षा सहन करणे
  • आत्मविश्‍वासाने भविष्याला तोंड देणे
  • यहोवा नम्र लोकांना सत्याकडे आकर्षित करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
w96 २/१ पृ. २७-३१

कधी न मरणे—माझी सर्वकाळची आशा

हेक्टर आर. प्रीस्ट यांच्याद्वारे कथित

डॉक्टर म्हणाले, “हा कर्करोग असाध्य आहे. तुमच्यासाठी आता आम्ही आणखी काहीही करू शकत नाही.” हे निदान दहा वर्षांच्याही आधी करण्यात आले होते. असे असूनही, मी कधीही न मरता पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची बायबल-आधारित आशा अजूनही बाळगून आहे.—योहान ११:२६.

माझे आईवडील, आमच्या मळ्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या लहानशा गावातील चर्चला नियमितपणे उपस्थित राहणारे प्रांजळ मेथोडिस्ट होते. न्यूझीलंडमधील वेलिंगटनच्या जवळजवळ १३० किलोमीटर ईशान्येकडे, वायरॉरॉपाच्या शेतजमिनी असलेल्या सुंदर खोऱ्‍यांतील ठिकाणी माझा जन्म झाला. तेथून आम्हाला बर्फाच्छादित पर्वत, डोंगरातून वाहणाऱ्‍या निर्मळ नद्या, पर्वतराशी व सुपीक मैदानांची मनोरम दृश्‍ये पाहावयास मिळत असत.

मेथोडिस्ट चर्चमध्ये, सर्व चांगले लोक स्वर्गात जातात पण वाईट लोक अग्निमय यातनेच्या ठिकाणी म्हणजेच नरकात जातात असे आम्हाला शिकविण्यात आले होते. मानवांनी स्वर्गात राहावे अशीच देवाची इच्छा होती तर त्याने सुरवातीलाच त्यांना तेथे का ठेवले नाही हे मी समजू शकलो नाही. मला नेहमीच मृत्यूचे भय होते व आपल्याला का मरावे लागते याचा मी अनेकदा विचार करत असे. आमच्या कुटुंबावर १९२७ या वर्षी, मी १६ वर्षांचा असताना एक संकट कोसळले. यानेच मला माझ्या प्रश्‍नांच्या उत्तरांचा शोध घेण्यास भाग पाडले.

रेज का मरण पावला?

माझा भाऊ रेज ११ वर्षांचा असताना गंभीरपणे आजारी पडला. रेजला काय झाले होते हे डॉक्टर ठरवू शकले नाहीत व ते त्यास मदत करण्यास असमर्थ ठरले. आईने मेथोडिस्ट पाळकाला बोलावले. त्याने रेजसाठी प्रार्थना केली परंतु यामुळे आईला सांत्वन मिळू शकले नाही. खरे तर, तिने पाळकाला असेही सांगितले की त्यांच्या प्रार्थना निष्फळ होत्या.

रेजचा मृत्यू झाल्यावर आई, तिच्या लहान मुलाचा मृत्यू का व्हावा याविषयी खऱ्‍या व समाधानकारक उत्तरांसाठी ती सर्वांशी बोलत होती. गावातील एका व्यापाऱ्‍याशी बोलत असता मृत लोकांच्या स्थितीबद्दल त्याला काही माहीत आहे का असे तिने विचारले. त्याला काही ठाऊक नव्हते, पण तो म्हणाला: “कोणीतरी येथे हे पुस्तक देऊन गेले व तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते नेऊ शकता.”

आईने ते पुस्तक घरी आणले व ते वाचू लागली. ती ते खाली ठेवूच शकली नाही. हळूहळू तिची संपूर्ण मनोवृत्ती बदलली. तिने कुटुंबास सांगितले, “हेच ते आहे; हेच सत्य आहे.” ते पुस्तक म्हणजे, शास्त्रवचनांवरील अभ्यास (इंग्रजी) याचा पहिला खंड, युगांचा ईश्‍वरी आराखडा (इंग्रजी) हे होते. मी सुरवातीला साशंक होतो व या पुस्तकातील, निर्माणकर्त्याच्या उद्देशाच्या प्रस्तुतीकरणावर मी वाद घालण्याचा प्रयत्न केला. कालांतराने माझे वाद थांबले.

बायबलचे सत्य कवटाळणे

मी विचार केला, ‘कधी न मरता जगणे, खरंच काय कल्पना आहे!’ प्रेमळ परमेश्‍वराकडून कोणीही अशाच आशेची अपेक्षा करील. एक परादीस पृथ्वी! होय, हे नक्कीच माझ्यासाठी होते.

या अद्‌भुत सत्यांचे शिक्षण घेतल्यावर, आई व वेलिंगटनच्या आणखी तीन भगिनी—सिस्टर थॉम्पसन, बार्टन व जोन्स—खेड्यापाड्यांत राज्याचे बीज दूरवर पसरविण्यासाठी अनेक दिवसांपर्यंत, गेलेल्या असत. वडिलांच्या ठायी आईसारखा मिशनरी आत्मा नसला तरीसुद्धा ते तिच्या कार्यहालचालींना पाठिंबा देत होते.

मला सत्याविषयी खात्री होती परंतु काही काळापर्यंत मी माझ्या विश्‍वासांबद्दल कोणतेही विशेष पाऊल उचलले नाही. रोईना कॉरलेट हिच्यासोबत मी १९३५ या वर्षी विवाहबद्ध झालो व काही काळाने आम्हाला एक मुलगी, ईनड व एक मुलगा, बॅरी अशी दोन मुले झाली. मी जनावरांची विक्री करणारा म्हणून काम केले, व जवळपासच्या परिसरातील शेतकऱ्‍यांकडून हजारो जनावरे विकत घेत असे. हे शेतकरी राजकारणावर चर्चा करायचे तेव्हा, “मानवांचे कोणतेही प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, तर केवळ देवाचे राज्यच असे शासन आहे जे सफल होईल,” असे त्यांना सांगताना मला आनंद होत असे.

दुर्दैवाने मी तंबाखूच्या आहारी गेलो; माझ्या तोंडात सदा एक सिगार असे. काही काळातच माझी प्रकृती खालावली व मला पोटाच्या वेदनादायक विकारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मला माझ्या धूम्रपानामुळे तीव्र स्वरूपाचा गॅस्ट्रोएन्टरायटिस झाल्याचे सांगण्यात आले. मी ती सवय सोडली, तरीसुद्धा मी कधीही न संपणारे एक सिगार किंवा सिगारेट ओढत असल्याचे स्वप्न पाहणे माझ्यासाठी असामान्य नव्हते. तंबाखू केवढे भयंकर व्यसन असू शकते!

तंबाखू सोडल्यावर मी आणखी काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. मी २८ वर्षांचा असताना १९३९ या वर्षी माझा, खेड्यातील आमच्या घराजवळील माँगताई नदीत बाप्तिस्मा झाला. नंतर न्यूझीलंडमधील प्रचार कार्याची देखरेख करणारे रॉबर्ट लेझनबाय, वेलिंगटनहून आमच्या घरी भाषण देण्यासाठी व मला बाप्तिस्मा देण्यासाठी आले. त्यानंतर, मी यहोवाचा निर्भय साक्षीदार बनलो.

प्रचार कार्याची व्यवस्था करणे

माझा बाप्तिस्मा झाल्यावर मला एकेटॉह्‍यूना मंडळीचा पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. माझी पत्नी रोईना हिने अजून बायबल सत्याचा स्वीकार केला नव्हता. तरीसुद्धा, मी ऑल्फ ब्रायन्ट ह्‍यांना, मला पद्धतशीरपणे घरोघरी साक्ष कशी देतात हे दाखवण्यासाठी पॉहीऑट्यूआ येथून येण्याचे आमंत्रण देणार असल्याचे तिला सांगितले. मला प्रचार कार्य संघटित करून पद्धतशीरपणे आमचे क्षेत्र उरकायचे होते.

रोईना म्हणाली: “हेक्टर, जर तुम्ही घरोघरी जाणार असाल तर तुम्ही परत आल्यावर मी येथे नसेन. मी तुम्हाला सोडून जाईन. तुमची जबाबदारी येथे—घरी, तुमच्या कुटुंबाची आहे.”

काय करावे हे मला कळेना. भीतभीत मी कपडे घालून तयार झालो. ‘मला हे करायचेच आहे,’ असा मी स्वतःशीच विचार करत होतो. ‘यावर माझे व माझ्या कुटुंबीयांचे जीवन देखील अवलंबून आहे.’ यामुळे, मला तिचे मन दुखवण्याची इच्छा नाही असे म्हणून मी रोईनाला दिलासा दिला. माझे तिच्यावर खूप प्रेम आहे परंतु यहोवाचे नाव व सार्वभौमत्व, तसेच आमच्या जीवनांचा समावेश असल्यामुळे मला अशा प्रकारे प्रचार करणे भाग आहे असे मी तिला सांगितले.

ऑल्फ व मी पहिल्या दारी गेलो व त्याने बोलणे सुरू केले. परंतु, नंतर मीच संभाषणावर मक्‍ता मिळवला असल्याचे मला आढळले. नोहाच्या दिवसात जे घडले ते आपल्या दिवसात घडत असलेल्या घटनांचे समांतर आहे व आपल्या तारणाची खात्री करून घेण्यासाठी आपण काहीतरी कृती केली पाहिजे हे मी घरमालकास सांगितले. (मत्तय २४:३७-३९) मी त्या घरात काही पुस्तिका दिल्या.

आम्ही तेथून गेल्यावर, ऑल्फ म्हणाले: “तुला एवढे ज्ञान कोठून मिळाले? तुला माझी गरज नाही. तू एकटाच जा, यामुळे आपल्याला दुप्पट क्षेत्र उरकता येईल.” आम्ही तसेच केले.

आम्ही परत जाताना, आम्हाला घरी काय पाहायला मिळेल हे मला माहीत नव्हते. पण रोईनाने आमच्यासाठी चहा तयार ठेवला होता हे पाहून मला खूप आनंद झाला व आश्‍चर्य वाटले. पंधरवड्यानंतर माझी पत्नी जाहीर सेवेत माझ्यासोबत आली व ख्रिस्ती आवेशाचे चांगले उदाहरण बनली.

आमच्या शेतीच्या खोऱ्‍यात यहोवाचे साक्षीदार बनणाऱ्‍यांपैकी पहिले, मोड मंसर, तिचा मुलगा विल्यम व तिची मुलगी रूबी हे होते. मोडचा पती, निष्ठुर स्वभावाचा कठोर माणूस होता. एके दिवशी रोईना व मी मोड हिला सेवेसाठी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मळ्यावर गेलो. छोट्या विल्यमने त्याची कार आम्ही वापरावी यासाठी व्यवस्था केली होती, पण त्याचे वडील याच्या विरोधात होते.

स्थिती तणावपूर्ण होती. मी रोईनाला आमचे बाळ म्हणजेच आमची मुलगी ईनड हिला घेण्यास सांगितले. मी विल्यमच्या कारमध्ये बसलो व गॅरेजच्या बाहेर गाडी भरधाव वेगाने चालवून नेली आणि दुसरीकडे मि. मंसर यांनी, आम्ही बाहेर पडण्याच्या आतच गॅरेजचे दार बंद करण्यासाठी घाई केली. पण त्यांना यश आले नाही. थोडे दूर गेल्यावर आम्ही थांबलो व मी कारमधून उतरलो तेव्हा माझ्यासमोर बिथरलेले मि. मंसर होते. मी त्यांना सांगितले: “आम्ही क्षेत्र सेवेला जात आहोत व मिसेस. मंसर आमच्यासोबत येत आहेत.” मी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांचा राग थोडा मंदावला. त्या घटनेची आठवण केल्यास, मी कदाचित स्थिती वेगळ्या पद्धतीने हाताळली पाहिजे होती पण जरी ते स्वतः कधीच एक साक्षीदार बनले नाहीत तरीही नंतर ते यहोवाच्या साक्षीदारांप्रती अधिक अनुकूल बनले.

त्या काळी केवळ थोडेच यहोवाचे लोक होते, आणि आमच्या मळ्यावर आमच्यासोबत राहणाऱ्‍या पूर्ण-वेळेच्या सेवकांच्या भेटींचा आम्ही खरोखर आनंद लुटत होतो व त्यातून लाभ घेत होतो. या भेटी देणाऱ्‍यांत मिशनऱ्‍यांसाठी असलेल्या वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या सुरवातीच्या वर्गांत उपस्थित राहिलेले व जपान आणि पाकिस्तानमध्ये परदेशी नेमणुकींत सेवा केलेले एड्रियन थॉम्पसन व त्यांची बहीण मॉली हे होते.

युद्धकालीन अनुभव

सप्टेंबर १९३९ मध्ये, दुसरे महायुद्ध सुरू झाले व ऑक्टोबर १९४० मध्ये, न्यूझीलंड सरकारने यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आणली. आमच्या ख्रिश्‍चन बांधवांपैकी अनेकजणांना त्या देशाच्या न्यायालयापुढे आणले गेले. काहींना कारागृहांत टाकण्यात आले व त्यांच्या बायकामुलांपासून वेगळे करण्यात आले. युद्ध जोरात सुरू असताना, आमचा डेअरी फार्म असूनसुद्धा मला लष्करी सेवेसाठी बोलावण्यात येईल का असा मी विचार करत असे. त्यानंतर, यापुढे आणखी शेतकऱ्‍यांना त्यांच्या जमिनी सोडून लष्करी सेवेत घेतले जाणार नाही अशी घोषणा करण्यात आली.

रोईना व मी आमची ख्रिस्ती सेवा सुरू ठेवली; आम्ही दोघेही प्रचार कार्यासाठी प्रत्येक महिन्यात ६० पेक्षा अधिक तास देत होतो. या काळादरम्यान, ख्रिस्ती तटस्थता कायम राखत असलेल्या तरुण साक्षीदारांना मदत करण्याची सुसंधी मला लाभली. मी त्यांच्या वतीने वेलिंगटन, पामर्सटन, पॉहीऑट्यूआ व मॅस्टर्टनच्या न्यायालयांत हजर राहिलो. सहसा निर्णायक मंडळात पाळकवर्गाचा एखादा सदस्य असे व युद्धाला देत असलेल्या त्यांच्या गैर ख्रिस्ती समर्थनाला उघड करणे आनंददायक होते.—१ योहान ३:१०-१२.

एके रात्री रोईना व मी टेहळणी बुरूजचा अभ्यास करत होतो, एवढ्यात गुप्तचरांनी आमच्यावर धाड घातली. तपास केला असता आमच्या घरात बायबल साहित्य आढळले. “यासाठी तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो,” असे आम्हाला सांगण्यात आले. ते त्यांच्या कारमध्ये बसून जायला निघाले तेव्हा ब्रेकमध्ये काहीतरी बिघाड असल्याचे त्यांना कळले व यामुळे कार हलत नव्हती. विल्यम मंसरने गाडी दुरुस्त करण्यात मदत केली व ती माणसे त्यानंतर पुन्हा कधीही परतली नाहीत.

बंदीच्या काळात, आम्ही आमच्या मळ्याच्या दूरच्या कोपऱ्‍यात असलेल्या एका इमारतीत बायबल साहित्य लपवून ठेवत असू. मध्यरात्री, मी न्यूझीलंडच्या शाखा दफ्तरात जाऊन माझ्या कारमध्ये बायबल साहित्य भरत असे. मग मी ते घरी आणून त्या एकाकी ठिकाणी ठेवत असे. एका रात्री गुप्त माल घेण्यासाठी मी शाखा दफ्तरात आलो तेव्हा अचानक सगळीकडे उजेड झाला! “शेवटी आम्ही तुला धरले,” असे पोलीस मोठ्याने ओरडले. पण आश्‍चर्य म्हणजे त्यांनी जास्त वितंडवाद न घालता मला जाऊ दिले.

रोईना व मी १९४९ या वर्षी आमचा मळा विकला व आमचे पैसे संपेपर्यंत पायनियर सेवा करण्याचे ठरवले. आम्ही मॅस्टर्टन येथे एका घरात मुक्काम हलवला व मॅस्टर्टन मंडळीसोबत पायनियर सेवा केली. दोन वर्षांतच फेदर्सटन मंडळी स्थापण्यात आली ज्यात २४ सक्रिय प्रचारक होते व मी तेथे अध्यक्षीय पर्यवेक्षक या नात्याने सेवा केली. त्यानंतर १९५३ मध्ये, मला न्यूयॉर्क शहरातील यांकी स्टेडियममध्ये भरलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या आठ-दिवसीय आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहाण्यासाठी अमेरिकेस जाण्याची सुसंधी प्राप्त झाली. अर्धांगवायूने ग्रस्त असलेली आमची मुलगी ईनड हिची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे रोईना माझ्यासोबत येऊ शकली नाही.

न्यूझीलंडला परतल्यावर मला प्रापंचिक काम करावे लागले. आम्ही मॅस्टर्टन मंडळीत परतलो जेथे मला अध्यक्षीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आले. एव्हाना, विल्यम मंसरने मॅस्टर्टन येथील लिटिल थीएटर विकत घेतले व हे वायरॉरॉपातील पहिले राज्य सभागृह बनले. आमच्या मंडळीची, १९५० या दशकादरम्यान आध्यात्मिकरित्या व आकड्यांच्या दृष्टीने चांगली वाढ झाली. यास्तव, विभागीय पर्यवेक्षक आमच्या मंडळीला भेट देण्यास यायचे तेव्हा प्रौढ जणांना देशातील इतर भागांत जाऊन तेथील प्रचार कार्यास मदत करण्याचे उत्तेजन देत असत व अनेकांनी तसेच केले.

आमचे कुटुंब मॅस्टर्टनमध्येच राहिले व त्यापुढील दशकांत, मला मंडळीत विशेषाधिकार तर मिळालेच पण त्यासोबतच राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अधिवेशनांत नेमणुकींचा देखील मला आस्वाद घेता आला. रोईनाने क्षेत्र कार्यात आवेशी सहभाग घेतला व त्याचवेळेस ती इतरांनासुद्धा असेच करण्यासाठी सतत मदत करीत होती.

विश्‍वासाच्या परीक्षा सहन करणे

लेखाच्या सुरवातीला उल्लेखिल्यानुसार १९८५ या वर्षी, मला असाध्य कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले. माझी विश्‍वासू पत्नी रोईना व मला आमच्या मुलांसोबत, सध्या जिवंत असलेले व कधीच मरणार नाही अशा लोकांपैकी असण्याची किती कळकळीची इच्छा होती! परंतु, डॉक्टरांनी मला मरण्यासाठी घरी पाठवले. तथापि त्याअगोदर, या निदानाविषयी मला काय वाटते असे त्यांनी मला विचारले.

मी उत्तर दिले, “मी मन शांत राखून आशावादी राहणार आहे.“ खरोखर, “शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे,” हे बायबलचे नीतिसूत्र, मला माझा समतोल राखण्यास मदत करणारे साधन बनले.—नीतिसूत्रे १४:३०.

कर्करोग विशेषज्ञांनी या बायबल सल्ल्याची प्रशंसा केली. ते म्हणाले, “कर्करोगाने पीडित असलेल्या रुग्णात असा मानसिक दृष्टिकोन उपचारातील ९० टक्के भूमिका पार पाडतो.” त्यांनी सात आठवड्यांच्या किरणोपचाराची देखील शिफारस केली. सुदैवाने, मी कालांतराने कर्करोगावर मात करू शकलो.

या अत्यंत बिकट काळात माझ्यावर आभाळ कोसळले. माझ्या सुंदर, निष्ठावान पत्नीच्या मेंदूत रक्‍तस्त्राव झाला व त्यात ती दगावली. शास्त्रवचनांत नमूद असलेल्या विश्‍वासू जणांच्या उदाहरणांत तसेच ते त्यांची सचोटी राखत असताना यहोवाने कशाप्रकारे त्यांचा मार्ग मोकळा केला याचा विचार करून मला सांत्वन मिळाले. याप्रकारे, नवीन जगाची आशा माझ्या मनात उज्ज्वल राहिली.—रोमकर १५:४.

तथापि, मी विषण्ण झालो व मला वडील या नात्याने सेवा करणे थांबवावेसे वाटले. चालत राहाण्याचे सामर्थ्य पुन्हा मिळेपर्यंत स्थानिक बांधव मला प्रोत्साहन देत राहिले. यामुळेच, ख्रिस्ती वडील व पर्यवेक्षक या नात्याने मागील ५७ वर्षांपासून सतत सेवा करणे मला शक्य झाले आहे.

आत्मविश्‍वासाने भविष्याला तोंड देणे

इतकी वर्षे यहोवाची सेवा करणे एक अमूल्य विशेषाधिकार राहिला आहे. मला खरोखरी किती आशीर्वाद मिळाले आहेत! मी १६ वर्षांचा असताना जेव्हा माझ्या आईला, “हेच ते आहे; हेच सत्य आहे!” असे म्हणताना मी ऐकले होते, ती घटना फार जुनी असल्यासारखी मला वाटत नाही. माझी आई, ती १०० पेक्षा अधिक वर्षांच्या वयात १९७९ मध्ये मरण पावली तोपर्यंत एक विश्‍वासू, आवेशी साक्षीदार होती. तिची मुलगी व सहा मुले देखील निष्ठावान साक्षीदार बनले.

यहोवाचे नाव सर्व कलंकापासून मुक्‍त झालेले माझ्या डोळ्यांनी पाहण्याची माझी उत्कट इच्छा आहे. कधी न मरण्याची माझी सर्वकाळची इच्छा खरोखरंच संभव होईल का? अर्थात, हे पाहणे आता शिल्लक आहे. तथापि, अनेकजण, होय लाखोजण या आशीर्वादाचा अनुभव घेतील याची मला खात्री आहे. कधीही मरणार नाहीत अशा लोकांत गणल्या जाण्याच्या सुसंधीची, मी जिवंत असेपर्यंत सदा जपणूक करीन.—योहान ११:२६.

[२८ पानांवरील चित्रं]

माझी आई

[२८ पानांवरील चित्रं]

माझ्या पत्नी व मुलांसह

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा