ईरीनॉचे आवडते गायन पुस्तक
अलीकडेच, सोफिया, बल्गेरियामधील ईरीनॉ नामक नऊ वर्षांच्या मुलीचा एक यहोवाची साक्षीदार या नात्याने बाप्तिस्मा झाला. तिला गाण्याची अत्यंत आवड असून मुख्यतः, यहोवाचे गुणगान करा (इंग्रजी), या पुस्तकातील गीतांचा आनंद ती लुटत असते. यास्तव, ईरीनॉने दर महिन्याला काही गीते तोंडपाठ करण्याचे ध्येय ठेवले.
शाळेतील अत्यंत आवडत्या विषयांमधील, संगीत हा ईरीनॉचा एक आवडता विषय आहे. त्यामुळे, जेव्हा तिने शाळेतील गायकमंडळीमध्ये गाण्याच्या आमंत्रणास नकार दिला, तेव्हा तिची संगीत विषयाची शिक्षिका अतिशय गोंधळून गेली. ईरीनॉने का नकार दिला? तिने हे ओळखले, की तिला गावे लागणाऱ्या संगीतातील अधिकतर संगीत, मूर्तिपूजक उगम असणाऱ्या राष्ट्रीय वीर पुरुषांचे आणि सुटींचे गौरव करतात. काही गीते तर, राष्ट्रीय ध्येयांस चेतना देण्यासाठी बंडाळी आणि हिंसाचाराचेही समर्थन करतात. या बाबतीतील ईरीनॉच्या भूमिकेस तिची शिक्षिका समजू शकत नव्हती. ईरीनॉने आपल्या शिक्षिकेस पत्र लिहून त्यात स्वतःच्या धार्मिक विश्वासाबद्दलचे स्पष्टीकरण दिले—परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
ईरीनॉच्या वडिलांना एक कल्पना सुचली. त्यांनी तिच्या शिक्षिकेस, यहोवाचे गुणगान करा हे पुस्तक दिले, ज्यात ईरीनॉला गाण्यास आवडणारी गीते होती. काही दिवसांनंतर त्या शिक्षिकेने ईरीनॉला संगीत दालनात बोलवले. शिक्षिकेने ईरीनॉला तिच्या वर्गातील विद्यार्थ्यांदेखत—तिला पियानोवर साथ देत असता, त्या पुस्तकातील तिची काही आवडती गीते गाण्यास सांगितले. हा प्रयोग तासाभरापेक्षाही अधिक वेळ चालू राहिला! तिच्या शिक्षिकेला हे कबूल करावे लागले, की ईरीनॉच्या आवडत्या गायन पुस्तकात नक्कीच काही सुंदर अशी चाल होती.