वॉचटावर शैक्षणिक केंद्र मिशनऱ्यांना पाठवते
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेने विविध ठिकाणी वर्ग भरविले आहेत. सन १९४३ ते १९६० च्या दरम्यान दक्षिण लानसिंग, न्यूयॉर्क, अमेरिका येथील सुविधांमध्ये, ९५ देशांच्या मिळून बनलेल्या ३५ वर्गांतील विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षण प्राप्त झाले. नंतर प्रशाला ब्रुकलिन, अमेरिका येथील जागतिक मुख्यालयात स्थलांतरीत होऊन तेथून तिने सुमारे २८ वर्षांपर्यंत कार्य केले. सन १९८८ पासून १९९५ च्या पूर्वार्धापर्यंत गिलियड प्रशालेचे वर्ग वॉलकिल, न्यूयॉर्क येथे भरवण्यात येत असत.
या वर्षांदरम्यान प्रशालेने तिच्या कृतिकक्षा वाढवल्या. तिच्या मार्गदर्शनानुसार, दश-सप्ताह प्रशिक्षणाच्या कोर्सच्या तीन वर्गांची तरतूद करण्यात आली; तीन वर्ग मेक्सिकोत; अशा प्रकारचे पाच वर्ग जर्मनीत व भारतात दोन वर्ग भरवण्यात आले. सन १९८७ पासून सेवा प्रशिक्षण प्रशाला या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साहाय्यकारी प्रशालेचे वर्ग ३४ देशांमध्ये भरविण्यात आले; पात्र असणाऱ्या तरुणांकरता आठ आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षण कोर्सची त्यात तरतूद केली होती. तथापि, पॅटरसन, न्यूयॉर्क येथे नवनिर्मित वॉचटावर शैक्षणिक केंद्रामध्ये गिलियडच्या ९९ व्या वर्गाकरता २० आठवड्यांचे प्रशिक्षण देण्यात आले, ज्यामध्ये संपूर्ण बायबलचा बहुव्यापक अभ्यास, यहोवाच्या साक्षीदारांचा आधुनिक दिवसातील इतिहास आणि संघटना यांची चर्चा तसेच परदेशी मिशनरी कार्याविषयी बराच सल्ला यांचा समावेश होता.
सप्टेंबर २, रोजी ९९ वा वर्ग पदवीधर झाला. वॉचटावर शैक्षणिक केंद्रातील नवीन प्रेक्षकगृहात तीन तासांचा पदवीदान समारंभ भरवण्यात आला होता. ते पूर्ण भरलेले होते. पॅटरसन, वॉलकिल आणि ब्रुकलिन येथील बेथेल सुविधांमधील अधिक श्रोतृगणांना हा कार्यक्रम विद्युतरित्या ऐकवण्यात आला. हा दिवस, पदवीधरांसोबत त्यांचे नातेवाईक व निकटच्या मित्रांकरताच उद्दीपित करणारा नव्हता तर या नवीन सुविधांची बांधणी करण्यासाठी ज्यांनी स्वयंसेवक या नात्याने भाग घेतला होता अशा हजारोंकरता देखील होता.
नियमन मंडळाचे कॅरी बाबर यांनी आपल्या प्रास्ताविक विवेचनात, जे काही घडत होते त्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी म्हटले: “या पृथ्वीवर पुढे चालू ठेवलेल्या सर्वात महान ईश्वरी शैक्षणिक कार्याचे हे केंद्रस्थान असले पाहिजे.” आपण स्रीची संतती आणि सर्पाची संतती यांच्यामधील लढाईचा कळस गाठण्याप्रत येत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. (उत्पत्ति ३:१५) येणाऱ्या मोठ्या संकटादरम्यान भीतिदायक रुजवातातून, देवाच्या वचनाचे अचूक ज्ञान असलेले व त्याच्या आज्ञांकित असणारेच केवळ बचावतील असे त्यांनी दाखवले.
त्यांनी म्हटले: “आपला सध्याचा शैक्षणिक कार्यक्रम, नीतिसूत्रे १:१-४ मध्ये वर्णन केलेल्या प्रौढतेच्या उत्तम स्थितीत—म्हणजे सुज्ञता आणि शिस्तीची जाणीव, समजबुद्धी जाणण्याची कुवत, सुक्ष्मदृष्टी, नीतिमत्त्व, न्यायबुद्धी, सात्त्विकपणा आणि वैचारिक क्षमता देणारी शिस्त स्वीकारणे यासाठी सर्व ठिकाणातील यहोवाच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी बनवला आहे.” अशा प्रकारची आध्यात्मिक संपत्ती असणे किती सुरक्षिततेचे आहे!
पदवीदान केलेल्या वर्गाला सल्ला
त्या प्रास्ताविक अभिप्रायानंतर पदवीदान केलेल्या वर्गासाठी पाच संक्षिप्त भाषणांची श्रृंखला होती. आधी गिलियड अध्यापक असलेले व आता ब्रुकलिन मुख्यालयाच्या कर्मचारी वर्गातील एक सदस्य, हेरल्ड जॅकसन यांनी “तुमचे ईश्वरी समाधान टिकवून ठेवा,” असे वर्गाला आर्जवले. प्रदीर्घ काळापर्यंत मिशनरी असलेले व आता नियमन मंडळाचे सदस्य असलेले लॉइड बॅरी, “नम्रतेने यहोवाची सेवा करणे,” यावर बोलले. त्यांनी स्पष्ट केले की हा गुण, पदवीधारकांना त्यांच्या नव्या परिस्थितींत तसेच सहमिशनऱ्यांसोबतच्या त्यांच्या नातेसंबंधात, ते सेवा करतील त्या मंडळ्यांत आणि स्थानिक लोकांसोबत जुळेल असे करून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.
अलीकडेच गिलियड शिक्षक म्हणून सेवा करणारे कार्ल ॲडम्स यांनी, “विश्वास तुम्हाला काय करण्यास प्रवृत्त करील?,” या प्रश्नावर वर्गासोबत तर्क केला. अरण्यवासातील परिस्थितींविषयी कुरकूर केलेल्या आणि परत इजिप्तला जाण्याची ओढ लागलेल्या इस्राएल लोकांप्रमाणे नव्हे, तर ज्याने समस्यांवरील उपाय म्हणून कसद्यांचे उर येथे परत जाण्याऐवजी देवाच्या राज्याकडे पाहिलेल्या अब्राहामासारखे होण्याचे त्यांना उत्तेजन दिले. (निर्गम १६:२, ३; इब्रीयांस ११:१०, १५, १६) “तुमच्या आशीर्वादांची गणती करा” याबद्दल पदवीधर वर्गाला बोध करण्यासाठी, प्रशालेचे सचिव युलीसिस ग्लास यांनी स्तोत्र ७३ मध्ये लिखित असलेल्या आसाफाच्या अनुभवाचा उपयोग केला. तसेच नियमन मंडळाच्या शिक्षण समितीचे सदस्य, अल्बर्ट श्रोडर “यहोवा तरतूद करतो,” या विषयावर बोलले. अशा तरतुदीचा एक पुरावा म्हणून त्यांनी गिलियड प्रशालेकडे व प्रचारकार्य आणि शिष्य बनविणे हे महान कार्य साध्य करण्यातील तिच्या भूमिकेकडे लक्ष वेधले.
मग वॉच टावर सोसायटीचे अध्यक्ष, मिल्टन हेन्शल हे “एकमेकांशी जवळचे नातेसंबंध असलेले सदस्य” यावर बोलत असताना श्रोत्यांनी गाढ आस्थेने श्रवण केले. त्यांनी रोमकर अध्याय १२ चे वाचन केले आणि त्यावर विस्तृत विवेचन केले. इतर गोष्टींपैकी, त्यांनी म्हटले: “मंडळीतील आपल्या सहकाऱ्यांसोबत आपले नातेसंबंध अतिशय जवळचे आहेत हे आपण विचारात घेतले पाहिजे.” त्यांनी पुढे म्हटले: “यहोवाची मालमत्ता अशा रितीने आपण एकमेकांचा नेहमीच विचार करणे चांगले आहे आणि टीकात्मक असण्याऐवजी किंवा दोष काढण्याऐवजी आपण नेहमीच साहाय्यकारी असू या. आपण ख्रिस्ती मंडळीची ऐक्यता टिकवतो तेव्हा स्वतःला मदत करत असतो.” मिशनरी गृहात भोजन तयार करताना, प्रत्येकजण एकाच प्रकारचे अन्न खाऊ शकत नाही हे विचारात घेऊन साहाय्य कसे प्रदर्शित केले जाऊ शकते हे त्यांनी दाखवले. क्षेत्रसेवेत गरीब सहख्रिश्चनांसोबत कार्य करत असताना टीकात्मक असण्याऐवजी साहाय्यकारी असण्याचे देखील उत्तेजन त्यांनी दिले. बंधू हेन्शल यांनी दर्शवले की, आपण खरोखर साहाय्यक, उत्तेजनकारक आणि एकमेकांना प्रोत्साहन देणारे असलो तर “यामुळे यहोवा आपल्यावर प्रीती करील.” सध्या राहात असलेल्या देशाला सोडून त्यापासून निराळ्या असलेल्या देशांमध्ये जाणाऱ्या मिशनऱ्यांसाठी तो किती सर्वोत्तम बोध!
वर्गाला चांगल्यारीतीने जाणून घेणे
या ९९ व्या वर्गातील ४८ विद्यार्थ्यांचे सरासरी वयोमान ३२ वर्षें असे होते तर त्यांनी पूर्ण वेळेच्या सेवेत आधीच ११ पेक्षा अधिक वर्षे समर्पित केलेली होती.
पदवीधर समारंभातील एक भाग मुलाखतींचा असल्यामुळे श्रोत्यांना पदवीधरांपैकी काहींसोबत परिचित होण्याची संधी मिळाली. संयुक्त संस्थानातील निकी लिबल व इंग्लंडमधील सायमन बोल्टन यांनी यहोवा त्यांच्या भौतिक गरजा पुरवील या त्यांच्या विश्वासाची परीक्षा घेतलेल्या घटना सांगितल्या. पूर्ण वेळेची सेवा प्रथम स्थानी ठेवली असताना यहोवाने त्यांची काळजी घेतली याला त्यांनी अनुभवले.
फ्रेंच मातृभाषा असलेली ईजबेल कॉझॉन हिने म्हटले, की तिच्या मायदेशात अरबी भाषा बोलणाऱ्या लोकांना साक्ष देण्याकरता ती अरबी भाषा शिकली. तिने १९८७ मध्ये साक्षकार्य सुरू केले तेव्हा, ती तसेच आणखी एक बहीण या दोघी अरबी भाषा शिकत होत्या; त्यांच्याव्यतिरिक्त, पॅरिसमधील त्या लहान गटात अरबी भाषा बोलणारे केवळ चार बांधव होते. (भाषा शिकणे सोपे नव्हते. विवेचन करता यावे म्हणून दर आठवड्याला टेहळणी बुरूज लेखाची तयारी करण्यासाठी त्या आठ तास खर्च करीत.) हा प्रयत्न सार्थक ठरला का? आज संपूर्ण फ्रान्सभर पाच विभागांत संघटित झालेले, अरबी भाषा बोलणारे साक्षीदार आहेत. दुसरा विद्यार्थी, मिको प्युरो, शाळेत फ्रेंच शिकल्यामुळे आपला मायदेश फिनलंडमध्ये आफ्रिकेच्या आश्रितांना प्रचार करण्यास तो कसा समर्थ झाला तसेच हेच बेनिनमधील मिशनरी नियुक्तीच्या बाबतीतही किती मोलाचे असेल हे त्याने सांगितले. क्युबेक, कॅनडात प्रभावीपणे साक्ष देता यावी म्हणून बॉनी बोझ हिने अस्खलित फ्रेंच बोलण्यासाठी केलेल्या तिच्या प्रयत्नांबद्दल आठवून सांगितले. डेन्मार्कच्या ब्यॉर्की रसमस्सेन यांनी फॅरो द्वीपांवरील सेवेच्या वर्षांतच त्यांना तसेच त्यांच्या पत्नीला आलेले अनुभव सांगितले. होय, हे नवीन मिशनरी, पूर्ण वेळेचे अनुभवी सेवक आहेत.
पदवीधारकांची आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, पूर्वीय युरोप आणि पौर्वात्य—अशा १९ देशांमध्ये नियुक्ती केली गेली. पूर्वीच्या वर्गांतील पदवीधारकांनी २०० पेक्षा अधिक देशांमध्ये आधीच सेवा केली आहे. त्यांच्यातील अनेक पदवीधर अजूनही त्यांच्या नियुक्तींत व्यग्र आहेत. हे नवीन मिशनरी आता पृथ्वीच्या दिगतांपर्यंत राज्याची अधिक साक्ष देण्यासाठी त्यांना जाऊन मिळत आहेत—प्रेषितांची कृत्ये १:८.
[२५ पानांवरील चित्रं]
वॉचटावर शैक्षणिक केंद्राच्या वर्गामधील दृश्ये
[२६ पानांवरील चित्रं]
वॉचटावर बायबल गिलियड प्रशालेच्या पदवीधारकांचा ९९ वा वर्ग
खाली दिलेल्या यादीत, रांगांना पुढून मागे क्रमांक देण्यात आले आहेत आणि प्रत्येक ओळीत डावीकडून उजवीकडे नावांची यादी दिली आहे. (१) हॅफी, एस.; रिले, इ.; मॉर्टेन्सेन, डी.; ऑनेबल, ए.; बोल्टन, जे.; पूल, जे.; सीमस, जी.; सोझा, एल. (२) पॉशनिटस्की, बी.; शेपर्ड, डी.; पॉशनिटस्की, डब्ल्यू.; यॉरविनन, जे.; पॉलसन, के.; रसमुस्सन, इ.; श्वेवे, के.; ओलसन, एल. (३) पॉलसन, इ.; सॅमसल, टी.; बोझ, बी.; हरीझ, इ.; कॉझन, आय.; लिबल, एन.; सोझा, पी.; प्युरो, जे. (४) लॉगर, के.; लॉगर, व्ही.; गोल्डन, के.; बोल्टन, एस.; जॉनसन, एम.; जॉनसन, एस.; लिबल, ए.; रस्समुसन, बी. (५) हरीझ, डी.; सॅमसल, डब्ल्यू.; श्वेवे, ओ.; हॅफी, आर.; कॉझन, एल.; रिले, टी.; यॉरविनन, ओ.; प्युरो, एम. (६) मॉर्टेन्सेन, डी.; गोल्डन, आर.; ऑनेबल, एल.; शेपर्ड, एम.; बोझ, आर.; सीमस, टी.; पूल, इ.; ओलसन, जे.
[२७ पानांवरील चित्रं]
अजूनही त्यांच्या नेमणुकांमध्ये: (डावीकडे) गिलियडच्या पहिल्या आणि सहाव्या वर्गातील चार्ल्स लेथको त्यांची पत्नी फर्न हिच्यासह, ब्राझीलमध्ये; (खाली) गिलियडच्या सातव्या वर्गातील पदवीधर मार्था हस जपानमध्ये