हार मानू नका!
“चांगले करत राहण्यात हार मानू नका, कारण आपण खचलो नाही तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल.”—गलतीकर ६:९, NW.
१, २. (अ) सिंह कोणत्या प्रकारे शिकार करतो? (ब) दियाबल खासकरून कोणाला त्याचे सावज बनवण्यात रस घेतो?
सिंह वेगवेगळ्या मार्गांनी शिकार करतो. कधीकधी तो पाणवट्यांजवळ किंवा पायवाटांजवळ आपल्या सावजासाठी दबा धरून बसतो. पण काहीवेळा सिंह, “एखाद्या परिस्थितीचा सहजासहजी फायदा घेतो—उदाहरणार्थ, झोपलेल्या झेब्राचे शिंगरू त्याला सापडते तेव्हा,” असे वन्य प्राण्यांचे शब्दचित्र (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते.
२ आपला “शत्रु सैतान, हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो,” असे प्रेषित पेत्र म्हणाला. (१ पेत्र ५:८) त्याचा समय थोडा आहे हे सैतानाला माहीत असल्यामुळे तो, यहोवाची सेवा करण्यापासून मानवांना परावृत्त करण्यासाठी त्यांच्यावर अधिक दबाव आणत आहे. पण, हा ‘गर्जणारा सिंह’ यहोवाच्या सेवकांना त्याचे सावज बनवण्यात खास रस घेतो. (प्रकटीकरण १२:१२, १७) त्याच्याही पद्धती, प्राणिराज्यातील त्याच्या प्रतिरूपाच्या शिकार करण्याच्या पद्धतींप्रमाणेच आहेत. ते कसे?
३, ४. (अ) यहोवाच्या सेवकांना सावज बनवण्यासाठी सैतान कोणत्या पद्धतींचा उपयोग करतो? (ब) हे ‘तोंड द्यावे लागणारे कठीण दिवस’ असल्यामुळे कोणते प्रश्न उभे राहतात?
३ कधीकधी सैतान, दबा धरून बसतो—आपण यहोवाची सेवा करण्याचे सोडून देऊ या उद्देशाने तो आपल्यावर संकट किंवा विरोध आणून आपली सचोटी तोडण्याचा प्रयत्न करतो. (२ तीमथ्य ३:१२) सिंहाप्रमाणेच सैतानही एखाद्या परिस्थितीचा सहजासहजी फायदा घेतो. आपण निरुत्साहित किंवा थकून जाईपर्यंत तो थांबतो आणि मग आपण हार मानावी म्हणून तो आपल्या निराश झालेल्या मानसिक अवस्थेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतो. आपण त्याचे सहज सावज होऊ नये!
४ तरी, आपण सर्व मानवी इतिहासातील सर्वात कठीण काळात जगत आहोत. ‘तोंड द्याव्या लागणाऱ्या या कठीण दिवसांमध्ये’ आपल्यातील पुष्कळजणांना कदाचित एखाद्या प्रसंगी निरुत्साहीत किंवा खिन्न वाटेल. (२ तीमथ्य ३:१) तेव्हा दियाबलाला सहजासहजी बळी पडण्याइतपत निराश होण्याचे आपण कसे टाळू शकतो? होय, “चांगले करत राहण्यात हार मानू नका; कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल,” हा प्रेषित पौलाचा प्रेरित सल्ला आपण कसा आत्मसात करू शकतो?—गलतीकर ६:९, NW.
इतर आपल्याला निराश करतात तेव्हा
५. दावीद कशामुळे निराश झाला, पण त्याने काय केले नाही?
५ बायबल काळात यहोवाच्या सर्वात विश्वासू सेवकांना देखील काहीवेळा भारावून गेल्यासारखे वाटले असेल. स्तोत्रकर्ता दावीदाने लिहिले, “मी कण्हून कण्हून थकलो आहे. रोज रात्री मी आपले अंथरूण आसवात पोहवितो. मी आपला पलंग अश्रूंनी विरघळवितो. शोकाने माझी दृष्टी मंद झाली आहे.” दावीदाला असे का वाटले बरे? तो म्हणतो, “माझ्या सर्व शत्रूंमुळे माझे नेत्र क्षीण झाले आहेत.” इतरांच्या हानीकारक कृत्यांनी दावीदाच्या अंतःकरणाला इतके दुःखित केले, की त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. पण, सहमानवांनी दावीदाला कसेही वागवले होते तरी देखील त्यामुळे तो यहोवापासून दूर गेला नाही.—स्तोत्र ६:६-९.
६. (अ) इतरांच्या बोलण्यामुळे किंवा कृत्यांमुळे आपल्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो? (ब) काही जण स्वतःला दियाबलाचे सावज सहजासहजी कसे होऊ देतात?
६ त्याचप्रमाणे, इतरांच्या बोलण्यामुळे किंवा कृत्यांमुळे आपलेही अंतःकरण दुःखित होऊन आपण निराश होऊ शकतो. नीतिसूत्रे १२:१८ म्हणते: “कोणी असा असतो, की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करितो.” अविचारीपणे बोलणारा एखादा ख्रिस्ती बांधव किंवा भगिनी असल्यास ‘भोसकल्याची जखम’ अधिक खोल असू शकते. आणि अशावेळी संतप्त होणे, कदाचित मनात राग बाळगणे ही मानवी प्रवृत्तीच असू शकते. आपल्याला अतिशय वाईटरितीने किंवा अन्यायाने वागवण्यात आले आहे असे आपल्याला वाटू लागते तेव्हा मात्र अशी मनोवृत्ती निर्माण होणे विशेषतः खरे आहे. आपल्याला दुःखित करणाऱ्या व्यक्तीसोबत बोलण्यास कठीण वाटेल; आपण कदाचित त्याला किंवा तिला मुद्दामहून टाळण्याचाही प्रयत्न करू. रागामुळे निराश होऊन काहींनी हार मानली व ख्रिस्ती सभांना येण्याचे सोडून दिले. दुःखाची गोष्ट म्हणजे, अशारितीने ते सैतानाचे सहजासहजी सावज होऊन “सैतानाला वाव” देतात.—इफिसकर ४:२७.
७. (अ) इतर आपल्याला निराश करतात किंवा इजा पोहंचवतात तेव्हा न कळत दियाबलाचा फायदा करून देण्याचे आपण कसे टाळू शकतो? (ब) आपण मनातून राग का काढून टाकला पाहिजे?
७ इतर आपल्याला निराश करतात किंवा इजा पोहंचवतात तेव्हा न कळत सैतानाचा फायदा करून देण्याचे आपण कशा प्रकारे टाळू शकतो? आपण राग मनात न धरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उलट, होता होईल तितक्या लवकर शांती घडवून आणण्यास किंवा समस्या सोडवण्यास पुढाकार घ्या. (इफिसकर ४:२६) कलस्सैकर ३:१३ आपल्याला आर्जवते: “कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा.” इजा पोहंचवणारी व्यक्ती चूक कबूल करून खरोखरच क्षमा मागते तेव्हा क्षमाशील होणे खासकरून उचित आहे. (पडताळा स्तोत्र ३२:३-५ आणि नीतिसूत्रे २८:१३.) परंतु क्षमा करण्याचा अर्थ, इतरांनी केलेल्या चुकांना सूट देणे किंवा त्या चुकांना क्षुद्र समजणे असा होत नाही ही गोष्ट लक्षात ठेवल्याने आपल्याला मदत मिळते. क्षमा करण्याचा अर्थ, मनातून राग कायमचा काढून टाकणे असा होतो. राग असे एक ओझे आहे की जे सांभाळण्यास अतिशय जड असते. राग आपल्या विचारांचा नाश करू शकतो, आपला आनंद आपल्यापासून हिरावून घेऊ शकतो. त्याचा परिणाम आपल्या प्रकृतीवरही होऊ शकतो. पण याच्या विरुद्धतेत, उचित प्रसंगी दाखवण्यात आलेली क्षमाशीलता आपल्याच फायद्याकरता ठरते. यास्तव आपणही इतर मानवांनी आपल्याला जे म्हटले किंवा जसे वागवले त्यामुळे दावीदासारखे हार मानून यहोवापासून दूर जाऊ नये!
आपण उणे पडतो तेव्हा
८. (अ) काही वेळा काहींना खासकरून दोषास्पद का वाटते? (ब) आपण हार मानू अशा रीतीने दोषी भावनेला आपल्याला पूर्णपणे गिळंकृत करू देण्यात कोणता धोका आहे?
८ याकोब ३:२ म्हणते, “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो.” आणि आपण चुका करतो तेव्हा आपल्याला दोषी असल्यासारखे वाटणे साहजिक आहे. (स्तोत्र ३८:३-८) आपण एखाद्या शारीरिक कमजोरीविरुद्ध लढत देत असल्यास आणि वेळोवेळी पीछेहाट अनुभवत असल्यास दोषी भावना अधिक तीव्र होऊ शकतात.a अशा लढ्यास तोंड दिलेल्या एका ख्रिस्ती भगिनीने म्हटले: “मी अक्षम्य पाप केले आहे किंवा नाही हे माहीत नसल्यामुळे, मला आणखी जगावयाचे नव्हते. मला वाटत होते, की मी यहोवाच्या सेवेमध्ये आणखी झटण्याची गरज नाही कारण नाहीतरी फार उशीर झालेला आहे.” अशा प्रकारची दोषी भावना आपल्याला इतकी गिळंकृत करते, की आपण हार मानतो आणि तेव्हाच तर आपण दियाबलाला वाव देतो—व तो लगेचच कदाचित त्याचा फायदा घेईल! (२ करिंथकर २:५-७, ११) दोषी असल्याचा समतोल दृष्टिकोन, याची खरी आवश्यकता असेल.
९. आपल्याला देवाच्या दयेवर भरवसा का असला पाहिजे?
९ आपण पाप करतो तेव्हा काही प्रमाणात दोषी असल्यासारखे वाटणे योग्य आहे. परंतु काहीवेळा दोषी असल्याची भावना तशीच राहते कारण मी कधीच यहोवाच्या दयेस पात्र होऊ शकत नाही असे एखाद्या ख्रिश्चनाला वाटत राहते. पण बायबल आपले उबदारपणे सांत्वन करून म्हणते: “जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.” (१ योहान १:९) आपल्या बाबतीत देव असे करणार नाही असा विश्वास बाळगण्यास कोणतेही योग्य कारण आहे का? यहोवा ‘क्षमा करण्यास तयार’ आहे असे तो आपल्या वचनात म्हणतो हे लक्षात असू द्या. (स्तोत्र ८६:५; १३०:३, ४) तो खोटे बोलू शकत नसल्यामुळे, आपण जर पश्चात्तापी अंतःकरणाने त्याच्याजवळ गेलो तरच, त्याचे वचन अभिवचन देते त्याप्रमाणे तो करील.—तीत १:२.
१०. शरीराच्या कमजोरीविरुद्ध लढण्याविषयी आधीच्या एका टेहळणीबुरूज नियतकालिकाने हृदयाला प्रसन्नचित्त करणारी कोणती हमी दिली होती?
१० तुम्ही एखाद्या कमजोरीविरुद्ध लढत आहात आणि ती पुन्हा उद्भवली तर काय? हार मानू नका! मागे फिरल्याने तुम्ही आधी केलेली प्रगती नेहमीच व्यर्थ जात नाही. या नियतकालिकाच्या फेब्रुवारी १५, १९५४ च्या अंकात अशा प्रकारे स्नेहपूर्ण हमी दिली होती: “आपल्या पूर्वीच्या जीवनशैलीत अधिक खोलवर रुजलेल्या एखाद्या वाईट सवयीमुळे आपण अनेकदा न कळत अडखळल्याचे किंवा तिच्या आहारी गेल्याचे आपल्याला कदाचित आढळेल. . . . निराश होऊ नका. तुम्ही अक्षम्य पाप केले आहे असा निष्कर्ष काढू नका. तुम्ही असा तर्क करावा अशीच तर सैतानाची इच्छा आहे. तुम्ही स्वतःवर अतिशय दुःखित, क्षोभित होता ती वस्तुस्थितीच याचा पुरावा देते, की तुम्ही फारसे दूर गेलेला नाहीत. देवाकडे नम्रपणे व मनापासून वळण्याचा, त्याची क्षमा, शुद्धीकरण व मदत प्राप्त करण्याचा कंटाळा करू नका. एखादे मूल अडचणीत असते तेव्हा आपल्या पित्याकडे जाते त्याचप्रमाणे त्याच्याजवळ जा, मग एकाच कमजोरीवर मात मिळवण्यासाठी तुम्हाला वारंवार त्याच्याकडे जावे लागले तरी काही हरकत नाही. यहोवा तुम्हाला त्याच्या अपात्री कृपेमुळे दयाळुपणे मदत करील. तुम्ही प्रामाणिक आहात तर शुद्ध विवेक असल्याची जाणीव तो तुम्हाला प्रदान करील.”
आपण पुरेसे करत नाही असे आपल्याला वाटते तेव्हा
११. (अ) राज्य प्रचाराच्या कार्यात भाग घेण्याविषयी आपल्याला कसे वाटले पाहिजे? (ब) सेवेमध्ये भाग घेण्याविषयी काही ख्रिस्ती कोणत्या प्रकारच्या भावनांविरुद्ध झटत असतात?
११ राज्याच्या प्रचाराचे कार्य, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका निभावते आणि त्यात सहभाग घेतल्याने आनंद मिळतो. (स्तोत्र ४०:८) परंतु काही ख्रिश्चनांना सेवेमध्ये जास्त भाग घेता येत नसल्यामुळे दोषी असल्यासारखे वाटते. आपण पुरेसे कार्य कधीच करत नाही असे यहोवाला वाटत असावे अशी कल्पना केल्यामुळे अशा प्रकारची दोषी भावना आनंद नाहीसा करू शकते व हार मानण्यास भाग पाडू शकते. काहींना कोणत्या भावनांशी लढा द्यावा लागतो त्याचा जरा आपण विचार करू या.
आपल्या पतीसह तीन मुलांचे पालनपोषण करणारी एक ख्रिस्ती भगिनी म्हणते: “दारिद्र्य किती वेळखाऊ आहे हे तुम्हाला माहीत आहे का? मी शक्य तेथे बचत केलीच पाहिजे. त्याचा अर्थ काटकसर, निष्कासन विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये कमी किंमतीतील वस्तू शोधण्यात किंवा कधीकधी कपडे शिवण्यात वेळ खर्च करणे असा होतो. मी [अन्नाच्या डिस्काऊन्ट] कूपनची कात्रणे गोळा करणे, फायलीत ठेवणे आणि त्यांचा व्यवसाय करणे यात प्रत्येक आठवडी एक किंवा दोन तास खर्च करत असते. कधीकधी हे सर्व करताना मला खूप दोषी असल्यासारखे वाटते, इतका सर्व वेळ मी क्षेत्रसेवेत खर्च करण्यास हवा होता असे मला वाटू लागते.”
चार मुले आणि ख्रिस्ती विश्वासात नसलेला पती असलेली एक बहीण म्हणते, “मी यहोवावर पुरेसे प्रेम करत नव्हते असे मला वाटत होते. म्हणून मी यहोवाची सेवा करण्यास खूप झटले. मी खरोखरच खूप प्रयत्न केले, पण तरी ती सेवा पुरेशी आहे असे मला कधीच वाटले नाही. मला आत्म-पात्रतेची भावना नसल्यामुळे, यहोवासाठी मी जी सेवा करते ती तो स्वीकारेल याची कल्पनाच मी करू शकत नव्हते.”
पूर्ण वेळेची सेवा सोडाव्या लागणाऱ्या एका ख्रिस्ती बहिणीने म्हटले: “यहोवाची सेवा मी पूर्ण वेळेसाठी करणार हे दिलेले वचन पूर्ण करू शकत नाही ही कल्पनाच मुळी मला सहन झाली नाही. मी किती निराश झाले याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकणार नाही! ती गोष्ट आता आठवली की मी अक्षरशः रडते.”
१२. काही ख्रिश्चनांना, ख्रिस्ती सेवेत अधिक करता येत नाही म्हणून दोषी असल्यासारखे का वाटते?
१२ शक्य तितकी यहोवाची पूर्णपणे सेवा करण्याची इच्छा स्वाभाविकच आहे. (स्तोत्र ८६:१२) परंतु आपण जास्त करू शकत नाही म्हणून काहींना दोषी असल्यासारखे का वाटते बरे? काहींना त्याचा संबंध कदाचित, जीवनातील कटू अनुभवांपासून निर्माण होणाऱ्या निरुपयोगीपणाच्या सर्वसामान्य भावना असल्याचे आढळेल. इतरांच्या बाबतीत, यहोवा आपल्याकडून जे अपेक्षितो त्याबद्दलच्या असत्य दृष्टिकोनामुळे अयोग्य दोषी भावना निर्माण होऊ शकते. एक ख्रिस्ती महिला म्हणाली, “पूर्णपणे थकून जाईपर्यंत काम करत नसल्यास पुरेशी सेवा केली जात नाही असे मला वाटले होते.” त्यामुळे तिने स्वतःसाठी अति उच्च दर्जे स्थापित केले—आणि मग ते पूर्ण करू न शकल्यामुळे तिला आणखीनच दोषास्पद वाटले.
१३. यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो?
१३ यहोवा आपल्याकडून कशाची अपेक्षा करतो? सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर, आपण आपल्या परिस्थितींनुसार यहोवाची सेवा पूर्ण अंतःकरणाने करावी हेच तो अपेक्षितो. (कलस्सैकर ३:२३) परंतु, आपण काय करू इच्छितो आणि आपण खरोखरी काय करू शकतो यामध्ये जमीन आसमानाचा फरक असू शकतो. वय, प्रकृती, शारीरिक ठेवण किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या या कारणांमुळे आपण सीमित असू. तरीदेखील, आपल्याला होईल तितके आपण करतो, तेव्हा यहोवासाठी आपण करत असलेली सेवा पूर्ण अंतःकरणाची आहे ही खात्री बाळगू शकतो—प्रकृती व परिस्थितींमुळे पूर्ण वेळ सेवा करू शकत असलेल्या व्यक्तीपेक्षा ती कमी अगर जास्त पूर्ण अंतःकरणाची असणार नाही.—मत्तय १३:१८-२३.
१४. तुम्ही खरोखर स्वतःकडून कशाची अपेक्षा करू शकता हे ठरवण्यासाठी तुम्हाला मदत हवी असल्यास तुम्ही काय करू शकता?
१४ तेव्हा तुम्ही स्वतःकडून खरोखरच काय अपेक्षिता हे कसे ठरवू शकाल? याबद्दल तुम्हाला कदाचित तुमच्या क्षमता, तुमच्या मर्यादा आणि तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ज्यास माहीत आहेत अशा एखाद्या विश्वसनीय, प्रौढ ख्रिस्ती मित्रासोबत, कदाचित एखाद्या वडिलाबरोबर किंवा अनुभवी भगिनीसोबत बोलण्यास आवडेल. (नीतिसूत्रे १५:२२) देवाच्या नजरेत, व्यक्ती या नात्याने तुम्ही क्षेत्र सेवेमध्ये किती करता यावरून तुमची पात्रता मोजली जात नाही हे लक्षात ठेवा. यहोवाला त्याचे सर्व सेवक मौल्यवान आहेत. (हाग्गय २:७; मलाखी ३:१६, १७) इतर जण जितके कार्य करतात जवळजवळ त्या इतकेच तुमचेही कार्य असेल, परंतु जोपर्यंत तुम्ही केलेले कार्य सर्वोत्तम आहे तोपर्यंत यहोवाला त्याचा आनंद वाटतो आणि म्हणून तुम्हाला दोषास्पद असल्याचे वाटण्याची काहीच गरज नाही.—गलतीकर ६:४.
आपल्याकडून पुष्कळ अपेक्षिले जाते तेव्हा
१५. कोणत्या प्रकारे मंडळीच्या वडिलांकडून पुष्कळ अपेक्षिले जाते?
१५ “ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याजवळून पुष्कळ मागण्यात येईल,” असे येशू म्हणाला. (लूक १२:४८) होय, मंडळ्यांमध्ये वडील या नात्याने कार्य करणाऱ्यांकडून “पुष्कळ मागण्यात” येते. पौलाप्रमाणे ते मंडळीसाठी खपतात. (२ करिंथकर १२:१५) त्यांना भाषणे तयार करावी लागतात, मेंढपाळकत्वाच्या भेटी द्याव्या लागतात, न्यायिक बाबी हाताळाव्या लागतात—हे सर्व त्यांच्या कुटुंबांकडे दुर्लक्ष न करता करावे लागते. (१ तीमथ्य ३:४, ५) काही वडील तर राज्य सभागृहे बांधण्यासाठी मदत करण्यात, इस्पितळ संपर्क समितींमध्ये काम करण्यात आणि संमेलन व अधिवेशनांमध्ये स्वयंसेवा करण्यात व्यग्र आहेत. हे कष्टाळू, भक्तिमान लोक, इतक्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाऊन निराश होण्याचे कसे टाळू शकतात?
१६. (अ) इथ्रोने मोशेला कोणता व्यावहारिक उपाय सुचवला? (ब) कोणता गुण इतरांना उचित जबाबदाऱ्या वाटून देण्यास एखाद्या वडिलाला प्रवृत्त करील?
१६ विनयशील आणि नम्र मोशे, इतरांच्या समस्यांची काळजी घेण्यासाठी झटत होता तेव्हा इथ्रोने म्हणजे, त्याच्या सासऱ्याने त्याला एक व्यावहारिक उपाय सुचवला: इतर पात्र पुरुषांनाही काही जबाबदाऱ्या दे. (निर्गम १८:१७-२६; गणना १२:३) “नम्र जनांच्या ठायी ज्ञान असते,” असे नीतिसूत्रे ११:२ म्हणते. नम्र होण्याचा अर्थ, तुमच्या मर्यादा ओळखणे व त्या स्वीकारणे. नम्र मनुष्य इतरांना जबाबदाऱ्या देण्यास मागेपुढे पाहत नाही किंवा इतर पात्र असलेल्या पुरुषांना उचित जबाबदाऱ्या देऊन तो त्याचा मक्ता गमावत आहे अशी भीती देखील त्याला वाटत नाही.b (गणना ११:१६, १७, २६-२९) उलटपक्षी, त्यांनी प्रगती करावी म्हणून तो उत्सुक असतो.—१ तीमथ्य ४:१५.
१७. (अ) मंडळीतील सदस्य वडिलांचे ओझे कशा प्रकारे हलके करू शकतात? (ब) वडिलांच्या पत्नी कोणता त्याग करतात व आपण त्या त्यागाकडे क्षुल्लक दृष्टीने पाहत नाही हे आपण कसे दाखवू शकतो?
१७ वडिलांचे ओझे हलके करण्यात मंडळीतील सदस्य पुष्कळ काही करू शकतात. वडिलांना आपापल्या कुटुंबांकडे सुद्धा लक्ष द्यावे लागते हे समजून घेतल्याने इतर जण त्यांच्याकडे वेळ आणि लक्ष देण्याच्या अयोग्य मागण्या करणार नाहीत. तसेच वडिलांच्या पत्नी स्वेच्छेने त्यांच्या पतींबरोबर मंडळीच्या कामात जो सहभाग घेतात त्याला शुल्लक समजणार नाहीत. तीन मुलांची आई असलेली व जिचा पती मंडळीमध्ये वडील या नात्याने कार्य करतो ती भगिनी म्हणाली: “माझ्या पतीने वडील या नात्याने कार्य करता यावे म्हणून मी घरामध्ये स्वेच्छेने जो जादा भार उचलते त्याबद्दल मी कधीच कुरकूर करत नाही. मला माहीत आहे, की त्यांच्या सेवेमुळे आमच्या कुटुंबावर यहोवाचा समृद्ध आशीर्वाद आहे, आणि यहोवा जे काही देतो त्याबद्दल मी कुरकूर करत नाही. तरीसुद्धा, खरे पाहता मी केले असते त्यापेक्षा अधिक मला अंगणातील कामे करावी लागतात आणि आमच्या मुलांना शिस्त द्यावी लागते कारण माझे पती व्यग्र आहेत.” परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, ती जो कामाचा जादा भार घेत होती त्याबद्दल तिची प्रशंसा करण्याऐवजी, “तुम्ही पायनियरींग का करीत नाही?” असे काहींनी संवेदनाशून्य शेरे मारल्याचे या भगिनीला दिसून आले. (नीतिसूत्रे १२:१८) इतर जण जे करू शकत नाहीत त्याबद्दल त्यांची टीका करण्यापेक्षा ते ज्या गोष्टी करू शकतात त्याची प्रशंसा करणे किती चांगले आहे बरे!—नीतिसूत्रे १६:२४; २५:११.
अंत अद्याप आलेला नाही यास्तव
१८, १९. (अ) सार्वकालिक जीवनाच्या शर्यतीत धावण्याचे थांबवण्याची ही वेळ का नव्हे? (ब) जेरूसलेममधील ख्रिश्चनांना प्रेषित पौलाने कोणता समयोचित सल्ला दिला?
१८ धावपट्टू शर्यतीच्या समाप्तीस आल्याचे माहीत झाल्यावर तो त्याचे प्रयत्न करण्याचे सोडत नाही. त्याचे शरीर आता सहनशक्तीच्या मर्यादेपर्यंत पोहंचले असेल—तो थकून गेला असेल, त्याला अतिउष्ण वाटत असेल, शुष्क झाल्यासारखे वाटत असेल—पण शर्यतीची समाप्ती इतकी जवळ असताना ही थांबण्याची वेळ नव्हे. त्याचप्रकारे, ख्रिस्ती या नात्याने आपण जीवनाचे बक्षीस असलेल्या शर्यतीत आहोत व अंतिम रेषेच्या अगदी जवळ आहोत. आपले धावणे थांबवण्याची ही वेळ नाही!—पडताळा १ करिंथकर ९:२४; फिलिप्पैकर २:१६; ३:१३, १४.
१९ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी अशाच परिस्थितीला तोंड दिले. सा. यु. ६१ च्या सुमारास, प्रेषित पौलाने जेरूसलेममधील ख्रिश्चनांना लिहिले होते. वेळ निघून चालली होती—दुष्ट “पिढी,” धर्मत्यागी यहुदी व्यवस्थीकरण लवकरच ‘नाहीसे होणार’ होते. जेरूसलेममधील ख्रिश्चनांना विशेषकरून जागृत आणि विश्वासू राहायचे होते; सैन्याचा वेढा पडत असल्याचे पाहून त्यांना शहर सोडून पळून जावे लागणार होते. (लूक २१:२०-२४, ३२) तेव्हा पौलाचा प्रेरित सल्ला प्रसंगोचित होता: ‘तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नका.’ (इब्रीयांस १२:३) येथे प्रेरित पौलाने दोन स्पष्ट क्रियापदांचा वापर केला: ‘खचणे’ (काʹमनो) आणि ‘थकणे’ (ए·क्लेʹओ·माय). एका बायबल विद्वानाच्या मते, हे ग्रीक शब्द “अंतिम रेषा पार केल्यानंतर थांबणाऱ्या व कोसळणाऱ्या धावपट्टूंसाठी अरिस्टोटलने वापरले होते. [पौलाच्या पत्राचे] वाचक अद्याप शर्यतीतच होते. त्यांनी मुदती पूर्वीच हार मानू नये. थकव्यामुळे त्यांनी स्वतःला बेशुद्ध होऊन कोसळू देऊ नये. कठीण परिस्थितीला तोंड देताना पुन्हा एकदा टिकून राहण्यासाठी आर्जवण्यात आले आहे.”
२०. पौलाचा सल्ला आज आपल्यासाठी समयोचित का आहे?
२० पौलाचा सल्ला आज आपल्याकरता किती समयोचित आहे! वाढत्या दबावांचा सामना करताना कधीकधी आपल्याला त्या थकलेल्या धावपट्टूसारखे वाटेल जो कोसळून पडण्याच्या बेतात आहे. परंतु अंतिम रेषेच्या अगदी जवळ आल्यामुळे आपण हार मानू नये! (२ इतिहास २९:११) आपला विरोधक, ‘गर्जणारा सिंह’ आपण तेच करावे असे इच्छितो. यहोवाने “भागलेल्यास जोर” देणाऱ्या तरतुदी केल्या आहेत त्यासाठी आपण त्याचे आभार मानू या. (यशया ४०:२९) त्या तरतूदी कोणत्या आहेत आणि आपण त्यांचा लाभ कसा घेऊ शकतो ते पुढील लेखात चर्चिले जाईल.
[तळटीपा]
a उदाहरणार्थ, काही जण खोलवर रुजलेली एखादी सवय जसे की, रागीट स्वभाव कह्यात ठेवण्यास किंवा हस्तमैथुनाच्या समस्येवर मात मिळवण्यास कदाचित झटतील.—पाहा सावध राहा!, मे २२, १९८८, पृष्ठे १९-२१; नोव्हेंबर ८, १९८१, पृष्ठे १६-२०; तसेच वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने प्रकाशित केलेले, तरुण लोक विचारत असलेले प्रश्न—उपयोगी पडणारी उत्तरे (इंग्रजी) पुस्तक, पृष्ठे १९८-२११.
b टेहळणीबुरूज नियतकालिकाच्या ऑक्टोबर १५, १९९२, पृष्ठ २०-३ वरील, “वडिलांनो—सोपवा!” हा लेख पाहा.
तुमचे उत्तर काय आहे?
◻ इतर आपल्याला निराश करतात किंवा इजा पोहंचवतात तेव्हा आपण हार मानण्याचे कसे टाळू शकतो?
◻ दोषी असल्याचा कोणता समतोल दृष्टिकोन आपल्याला हार मानण्यापासून दूर ठेवील?
◻ यहोवा आपल्याकडून काय अपेक्षितो?
◻ नम्रता, मंडळीतील वडिलांना निराश होण्याचे टाळण्यास कशी मदत करू शकते?
◻ इब्रीयांस १२:३ मधील पौलाचा सल्ला आज आपल्यासाठी समयोचित का आहे?